मुंडकोपनिषद

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
19 Jul 2016 - 12:43 pm

===================================================================

उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...

===================================================================

मुण्डकोपनिषद
मुण्डकोपनिषद हे दशोपनिषदातील पंचम असून संन्यासाश्रमाचा पुरस्कार करणारे श्रेष्ठ, तत्वज्ञानपर उपनिषद असून भगवत्गीतेत याचा उपयोग केलेला दिसतो. अथर्ववेदाची तीन उपनिषदे, प्रश्न ,मुण्डक आणि माण्डुक्य. हे त्यांतील पूरातन. प्रश्न हे नंतर मुण्डकच्या स्पष्टीकरणा करता लिहले गेले असे दिसते. अंगिरस ऋषींचा शिष्य शौनक हा प्रणेता.
"संन्यासधर्माचा (मुंडण) पुरस्कार करणारे उपनिषद" अशा अर्थाने "मुंडक उपनिषद असे नाव पडले. या उपनिषदाचे तीन अध्याय (मुंडक) असून ६५ मंत्र आहेत. प्रथम मुंडक (९+१३=) २२; द्वितीय ((१०+१२=) २२ व तृतीय (१०+११=) २१ अशी विभागणी आहे.
या वेळी संस्कृत श्लोक महत्वाचे तेवढे देऊन तत्वज्ञान विचार सविस्तर पाहणार आहोत.

मुंडकोपनिषदात पुढील विषयांचा विचार केला आहे;

(१) परा व अपरा विद्या.
(२) ब्रह्माचे होकारात्मक-नकारात्मक वर्णन
(३) यज्ञनिंदा
(४) प्रणवध्यानाने आत्मज्ञानप्राप्ती
(५) द्वा सुपर्णा मंत्राचा अर्थ
(६) आत्मज्ञानासाठी संन्यासाश्रम आवष्यक
(७) सत्यद्वारा आत्मज्ञान
(८) आत्मा वर्णन
(९) आत्मानुभूति वर्णन
(१०) ब्रह्मविद्येचा उपदेश कोणाला ?

शौनक गुरू अंगिरस ऋषींना विचारतो " भगवन्, काय जाणले की सर्व जाणले जाते ?" अंगिरस म्हणाले "दोन जाणण्यासारख्या विद्या आहेत. एक परा विद्या व दुसरी अपरा (कनिष्ट)
विद्या.. चार वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष (वेदांगे) इ. ही "अपरा विद्या" होय ब्रह्मज्ञान म्हणजे अक्षरविद्या ही "परा विद्या" होय. ते ब्रह्म अदृष्य, अग्राह्य, अगोत्र, वर्णरहित, डोळे-कान नसलेले, हातपाय नसलेले, नित्य, व्यापक, विविधरूपी, अतिसूक्ष्म, अव्यय , जगाचे उत्पत्तिस्थान अशा स्वरूपात ज्ञात्यांना कळते. कोळी तंतू उत्पन्न करतो व पुन्हा ते परत घेतो, पृथ्वीवर जशा वनस्पति निर्माण होतात, शरीरावर जसे लव व केस उत्पन्न होतात, तसे अक्षरब्रह्मापासून जग निर्माण होते." (१.१.६-७)

शौनकाला पडलेला प्रश्न नारदांनाही पडला होता व ते सनत्कुमारांकडे जाऊन म्हणाले की " मी वेद, पुराणे आदी (अपरा) विद्या शिकलो पण माझे समाधान झालेले नाही "(छांदोघ्य़ ७.१-५)
म्हणजे त्या काळीही विचारवंतांना यज्ञातील कर्मकांडाबद्दल संशय निर्माण झालेला होता.

अंगिरस पुढे अपरा विद्येचे वर्णन करतात " वेदांनी सुरू केलेली यज्ञातील "कर्मे" योग्य रीतीने पार पाडली की ती यजमानाला स्वर्गात नेतात. (पण त्याला तेथून परत पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागतो) (१.१.४-५)

प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा अष्तादशोक्तमवरं येषु कर्म !
पतत्च्छेयो येsभिनन्दन्ति मूढा जरा मृत्युं ते पुनरेवापुयन्ति !! (१.२.७)
(सोळा ऋत्विज्ञ, यजमान व पत्नी मिळून) अठरा जणांनी मिळून करावयाचे यज्ञरूप निकृष्ट कर्म संसारसागर तरून जाण्याला धोक्याच्या नावेसमान आहे. अज्ञानी लोक त्याचा आश्रय घेतात. त्यांना जरा-मृत्यू पुन:पुन्हा प्राप्त होतो.
उपनिषदात यज्ञातील कर्मकांडांची इतक्या स्पष्ट शब्दात निंदा केलेली इतरत्र आढळत नाही. त्या काळात तिकडे दुर्लक्ष करणे सोयिस्कर होते. उलट ईशावास्यात कर्म-ज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. गंमत म्हणजे याज्ञवल्क्य समन्वय साधतात तर त्यांचे गुरू उद्दालक आरुणी या अपरा विद्येची संभावना " तू जे काही जाणतोस ते नाममात्र आहे. ते फक्त शाब्दिक ज्ञान आहे" अशी करतात. (छांदोग्य ७.१.३) थोडक्यात, उपनिषदांत या कनिष्ट (अपरा) विद्येबद्दल तुच्छताच आहे.
पुढे जाऊन ते म्हणतात, अविद्येत रमणारे, स्वत:ला कृतार्थ समजणारे कर्मठ तत्व जाणत नाहीत, त्यामुले ते दु:खी होऊन पतन पावतात. मूर्ख लोक यज्ञयागादि कर्मे, विहिरी -धर्मशाळा बांधणे अशी लोकोपकारक कृत्येच श्रेष्ठ मानतात, ते स्वर्ग प्राप्त करून पुन्हा हीन योनीला जातात. जे वानप्रस्थ व सन्यासी साधक अरण्यात राहून तप व उपासना करतात व शांत वृत्तीने भिक्षा मागून जगतात, ते शुद्ध देवयान मार्गाने जेथे अव्यय पुरुष आहे (ब्रह्मलोक) तेथे स्थिर होतात.
येथे लोकोपयोगी कृत्ये करणार्‍याना स्वर्ग मिळतो हे मान्य केले आहे पण तो कनिष्ठ लाभ आहे असे सांगून सन्यासमार्गाची भलावण केली आहे. कर्माने मोक्ष प्राप्त नाही. त्या करिता ज्ञानाची गरज आहे. (१.२.८ ते ११)

द्वितीय मुंडकातील प्रथम खंडात विराट् पुरूषाचे वर्णन आहे. पेटलेल्या अग्नीतून शेकडो एकसारख्या ठिणग्या निघतात व त्यातच विलीन होतात त्याप्रमाणे अक्षरापासून विविध सृष्टी निर्माण होते. दिव्य, अमूर्त, व्यापक, अज, अप्राण. अशा अक्षराच्या पलिकडे परपुरूष आहे.
(२.१.१-२)
त्या श्रेष्ठ पुरुषापासून प्राण मन, रुप इन्द्रिये, आकाश, वायू, तेज, दिशा, सूर्यरूपी समिधा असलेला अग्नि, सोमापासून पर्जन्य, पर्जन्यापासून औषधी निर्माण झाल्या. औषधांपासून पुरुष रेत व त्या रेतापासून जग निर्माण झाले.,, अशी मोठी यादी दिली आहे. विश्वनिर्मिती प्रक्रीया अक्षरब्रह्मापासून कशी सुरू झाली हे इथे सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे अक्षरब्रह्म सृष्टी निर्माण करते असे म्हटलेले नाही, अक्षरब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली असे म्हटले आहे.
(२.१.५ ते ९)
पृथ्वीवरील, स्वर्गातील समस्त पदार्थ, सजीव -निर्जीव सृष्टीमनोधर्म, नैतिक गुण हे मूळ पुरुषापासून उत्पन्न झाले ही झाली "पौरुषेय" उपपत्ती. पण हा पुरुष अमूर्त व परेहून पर असल्याने व त्याने स्वत: सृष्टी निर्माण केली नसल्याने ही "सेश्वर मिमांसा" सदृष निर्मिती असेही म्हणता येईल.

तो पुरुषच हे सर्व विश्व आहे. तो पुरुषच कर्म अमृत, परब्रह्म आणि अंतरात्मा होय. त्याला जो जाणतो, त्याची अविद्या नष्ट होते. त्याला या लोकीच ज्ञान होते, व तो जीवन्मुक्त होतो. ( काय जाणले असता सर्व जाणले जाते या प्रश्नाचे उत्तर येथे संपले.) मुक्ती इहलोकीही मिळू, शकते हे नमुद केले आहे. (२.१.१०)

द्वितीय खंडात ब्रह्मवर्णन केले असून ब्रह्म जाणण्याचा मार्ग पुढीलप्रमाणे सांगितला आहे.
ॐकार हे धनुष्य, आत्मा हा बाण, ब्रह्म हे लक्ष होय.त्याच्या साह्याने सावधपणाने बाण मारावा.बाणाप्रमाणे चित्त एकाग्र असावे. ज्या ब्रह्मात स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष, मन व सर्व प्राण आहेत, त्या आत्म्यालाच तू जाण. बाकी सर्व सोड.हाच मोक्षाचा मार्ग आहे. हृदयात आत्मा असतो. त्या आत्म्याचे ॐ शब्दाने ध्यान कर. (२.२.४-५)
अतिशय थोडक्यात, स्पष्ट शब्दात मार्गदर्शन केले आहे. मोक्षस्थान सांगितल्यावर ज्ञानफलही लगेचच दिले आहे.

हृदयात निर्दोष व निष्कल ब्रह्म आहे.ते शुभ्र व अत्यंत तेजस्वी असणारे ब्रह्म ब्रह्मवेत्ते जाणतात. (2.2.8)

न तत्र सूर्यो भाति, न चंद्र तारकम्
नेमा विद्युतो भान्ति, कुतोsचमग्नि: !
तमेव भान्तमनुभाति सर्वम्
तस्या भासा सर्वमिदं विभाति !! (2.2.11)

तेथे सूर्य, चंद्र-तारका आणि वीज यांना प्रवेश नाही.मग अग्नीला प्रवेश कुठला ? त्या ब्रह्माच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होते व हे सर्व विश्व त्याच्या प्रकाशानेच प्रकाशमान आहे

मुंडकातील द्वितीय खंडात अध्यात्मिक कर्मयोग, आत्मानुभवाचे परिणाम व आत्मानुभावातील तेजाचा साक्षात्कार याचे सुरेख वर्णन आहे.

द्वा सुपर्णा सयुजा सखाया,समानं वृक्षं परिषस्वजाते !
तयोरन्य:पिप्पलं स्वाद्वत्ति, अनश्नन्नन्यो अभिचाकशति !! (ऋग्वेद १.१६४.२०)
ज्या दोघांचे मूळ बीज एकच आहे व नेहमी एकत्र असणारे परस्परांचे मित्र असे दोन पक्षी (जीवात्मा व परमात्मा) एकाच वृक्षाचा आश्रय करतात. त्यांपैकी एक (जीवात्मा) सुखदु:खात्मक अशा मधुर पिप्पल फलाचा (कर्मफळाचा) उपभोग घेतो आणि दुसरा (परमात्मा) फलाचा उपभोग न घेता केवळ पहात राहतो)..
ऋग्वेदातील एक महत्वाचे सूक्त. आत्मा-परमात्मा यांचे एकमेकांशी संबंध काय ? हे गुंतागुंतीचे व निरनिराळे मतप्रवाह मांडण्यास वाव देणारे सूक्त. याच कल्पनेचा विकास पातंजल योगसूत्रांतील केशकर्मविपाकाशये अपरामृष्ट:पुरुषविशेष: ईश्वर: ( सृष्टीपासून अलिप्त असा पुरुषविशेष म्हणजे ईश्वर) या विख्यात उपपत्तीत आढळते.
(ईश्वराबरोबर) त्याच वृक्षावर राहणारा जीव निराशेमुळे उत्पन्न झालेल्या दुबळेपणामुळे मोहित होऊन शोक करत राहतो. (परंतु) जेव्हा तो आपणाहून निराळा व योग्यांनी ज्याची उपासना केली आहे अशा ईश्वराचे माहात्म्य जाणतो तेव्हाच तो शोकरहित होतो.
जेव्हा साधक सुवर्णवर्ण आणि सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचेही उत्पत्तिस्थान असलेले जगतकारण पुरुषतत्व पाहतो तेव्हा तो विद्वान पापपुण्य झटकून, ज्ञानाने निर्लेप होऊन, परमात्म्याशी एकरूप होतो. (३.१.२-३)
या दोन मंत्रांत जीवाला मोक्ष कसा मिळवता येतो त्याचे दिग्दर्शन केले आहे. इथे नोंद करण्य़ासारखे म्हणजे आत्मा व परमात्वा दोघेही शरीरात वास करतात असे सांगितले आहे.

ज्ञानसाधना
सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा
सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ! (३.१.५)
हा आत्मा सत्याने, तपाने, आत्मज्ञानाने आणि ब्रह्मचर्याने प्राप्त होतो

सत्यप्रशंसा
सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयान: !
येनाक्रमन्स्त्युषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् !! (३.१.६)
सत्याचा जय होतो. असत्याचा होत नाही. सत्यानेच देवयान मार्ग भरलेला आहे. या देवयान मार्गानेच महर्षी जातात, तो मार्ग सत्याने भरलेला आहे
.पुढे आत्म्याचे वर्णन केले आहे.
ते सत्य मोठे, दिव्य व अचिंत्य आहे,ते सूक्ष्माहून सूक्ष्म, अतिशय दूर व अतिशय जवळ आहे. हे येथेच आपल्या हृदयात आहे, तेथे त्याचा साक्षात्कार होतो. ते सत्य डोळे, वाणी, इंद्रिये, कर्म याने समजत नाही. फक्त शुद्ध अंत:करणाच्या ज्ञात्याला, ध्यानमग्नाला ते निष्कल ब्रह्म समजते. हा सूक्ष्म आत्मा फक्त मनाला कळतो. शुद्ध चित्तात आत्मा प्रगट होतो. (३.१.७-८-९):
सर्व जगाचे आश्रयस्थान असे तेजस्वी ब्रह्म जे णतात, त्याची उपासना करतात, ते थोर लोक मुक्त
होतात.जे कामनिक उपासना करतात ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. निष्काम या जन्मातच मुक्त होतात. (३.२.१-२)
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधवा न बहुधा श्रुतेन
यमेवैष वृणते तेन् लभ्य: तस्यैष आत्मा विवृणते तनुं अयाम् !! (३.२.३)
इथे आत्मानुभूति वर्णन केली आहे.
हा आत्मा वेदादि शास्त्रांच्या अध्ययनाने, ज्ञानाच्या धारणाशक्तीने किंवा वेद-शास्त्राचे भरपूर श्रवण केल्यानेही मिळत नाही.जो विद्वान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो, त्याची ती इच्छाशक्तीच त्याला आत्म्याची प्राप्ती करून देते. परमात्मा आपले स्वरूप उघड करून दाखवितो.
नायमात्मा बलहीनेन लभ्यो नच प्रमादात्तपसो वाप्यलिंगात् !
एतैरूपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्म धाम !! (३.२.४)
हे आत्मज्ञान बलहीनाला, चुका करणार्‍याला, संन्यास न घेणार्‍याला, (त्याग न करणार्‍याला) होत नाही. बलयुक्त, अप्रमादी व त्यागी माणसाला ज्ञान होते. त्याचा आत्मा ब्रह्मधामात प्रवेश करतो.

ज्ञाता व परमात्मा
जशा वाहणार्‍या नद्या समुद्राला मिळाल्यावर नाम-रूपरहित होतात तसा ज्ञाता परमात्म्यात विलिन झाल्यावर नामरूपरहित होतो, व दिव्य स्वरूप प्राप्त करतो (३.२.८)
ही अद्वैत सिद्धांताला, "जीव व ब्रह्म एकच" याला पृष्टी होय.

. ब्रह्मज्ञस्तुति
ज्याने आत्मज्ञान मिळविले आहे त्याबद्दल म्हटले आहे की मन ज्या लोकाची इच्छा करतो, ते सारे लोक;शुद्ध अंत:करणाचा मनुष्य ज्याची इच्छा करतो, त्या साधकाच्या सर्‍या इच्छा पूर्ण होतात. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने अशा ज्ञात्याची सेवा करावी.(३.१.१९)
शेवटी संन्याशालाच सद्गुरूने आत्मज्ञानाचा मार्ग दाखवावा असे मुंडक उपनिषद सांगते.
लेख मोठा झाला खरा. पण मुंडक अनेक महत्वाच्या गोष्टींना स्पर्श करत असल्याने नाइलाज झाला
(कंसातले आकडे अनुक्रमे मुंडक,खंड व मंत्र यांचे)

शरद

.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

उडन खटोला's picture

19 Jul 2016 - 2:46 pm | उडन खटोला

लेखमाला सुरेख सुरु आहे. फारसं कळत नाही पण वाचतोय.

सूड's picture

19 Jul 2016 - 2:48 pm | सूड

मंडुक हवंय का ते?

उडन खटोला's picture

19 Jul 2016 - 2:53 pm | उडन खटोला

मुण्डक बरोबर आहे. संन्यास आणि मुण्डन पुरस्कार केलेला आहे असं लेखात म्हटलं आहे.

प्रचेतस's picture

21 Jul 2016 - 12:20 pm | प्रचेतस

हाही लेख आवडला.

मुंडकोपनिषदात 'ॐ' असं चिन्ह आहे का 'ओम' असा शब्द आहे?
ॐ चिन्हाची प्राचीनता हा बऱ्याच काळापासून पडलेला प्रश्न आहे मला.

मौखिक परंपरा असल्याने चिह्न उपनिषदकाळात होतं का यावर प्रकाश पडणार नाही.

प्रचेतस's picture

21 Jul 2016 - 1:03 pm | प्रचेतस

हो.
ते खरंच.
हा मुद्दा लक्षातच आला नव्हता.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 Jul 2016 - 8:36 am | खालीमुंडी पाताळधुंडी

ॐ चिन्हाची प्राचीनता हा बऱ्याच काळापासून पडलेला प्रश्न आहे मला.

माझ्या मते तो प्राचीन अरबी शब्द आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 Jul 2016 - 8:39 am | खालीमुंडी पाताळधुंडी

कारण त्यामध्ये अर्धचंद्र व त्यावर टिंब आहे,व असा प्रकार संस्कृत किंवा कोणत्याच प्राचीन भारतीय भाषेत नाही.

कडक काडी, धाग्याची होळी होण्याची क्षमता असलेला प्रतिसाद =))

यशोधरा's picture

21 Jul 2016 - 9:37 pm | यशोधरा

वाचते आहे.. हा भाग जरा क्लिष्ट वाटला.

शरद's picture

23 Jul 2016 - 8:10 am | शरद

यशोधराताई,
क्लिष्ट झाले हे अगदी योग्य निरीक्षण. या विषयांवर लिहतांना जेवडे कमी शब्दात लिहावे तेवढे ते कळावयास सोपे जाते. बर्‍याच गोष्टी गाळलेल्या असतात. "दुरून डोंगर साजरे" या न्यायाने विषयातील दर्‍या-खोर्‍या दिसत नाहीत, त्यातून चालणे दूरच राहिले. या गहन गुहेत बाहेरूनच पाहणे सोयिस्कर. केवळ आपण, श्री प्रचेतस स्नेहांकिता आदींनी लेख त्रोटक वाटतात, विस्ताराने लिहा. असे सांगितल्यावरून हा लेख जरा मोठा झाला. तरीही "कठ" वा "प्रश्न" वर लिहतांना जास्त काळजी घेईन.
शरद

यशोधरा's picture

23 Jul 2016 - 4:14 pm | यशोधरा

तरीही "कठ" वा "प्रश्न" वर लिहतांना जास्त काळजी घेईन.

म्हणजे कमी लिहाल असे नको, प्लीज. :) उलट अधिकाधिक विस्ताराने लिहावे, ही विनंती. भाग क्लिष्ट वाटणे हा दोष माझा, त्यासाठी कमी लिहिणे हा पर्याय नक्कीच नाही.

स्पा's picture

23 Jul 2016 - 8:15 am | स्पा

एकदम कडक बाउंसर जाताय

येऊदे अजुन

आपल्याला एकच परा ठावुके