असा ही एक क्लायंट

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
20 Apr 2016 - 8:06 pm

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते. त्याच्या बाहेरचं गिर्‍हाइक त्याच्याकडे नियमितपणे येत नाही. एखाद्या पानवाल्याची अर्धा किलोमीटर असेल तर चांगल्या रेस्टॉरंटची शहरभर. जनरल छपाई करणार्यांची ही त्रिज्या तीन कि.मी. असते.

एक दिवस मगरपट्ट्याहून एका कंपनीकडून विचारणा झाली. म्हणजे माझ्यापासून सतरा अठरा कि.मी. दूर. पूर्वीच्या अनुभवावरून मला माहीत होतं की इतक्या दूरच्या स्थळाबरोबर आपली पत्रिका जमणं शक्य नाही. मी दरपत्रक पाठवलं पण फारसा रस दाखविला नाही. तरी देखील त्यांनीच पाठपुरावा सुरू केला. एक तर कित्येक कंपन्यांची कामं म्हणजे ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय्’ अशी अवस्था असते. कामं मोठी असतात पण किमती अगदी पाडून मागतात, शिवाय पैसे मिळवण्यासाठी सारखं मागे लागावं लागतं ते वेगळंच. त्यातून ही कंपनी तुर्कस्थानातली.

या कंपनीने काहीही आढेवेढे न घेता किमती मान्य केल्या. लगेचच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली! “पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही” ह्या वाक्याचा खरा अर्थ पूर्वानुभवावरून व्यवस्थित माहीत होता. बहुदा असं असेल की या कंपनीच्या आसपासच्या प्रिन्टर्सचे पैसे तरी यांनी दिले नसतील किंवा हे प्रचंड चिकित्सक असतील ज्यामुळे दुसरे कोणी यांचं काम करायला तयार नसेल. त्यामुळेच ते इतके लांब यायला तयार झाले असणार असा माझा कयास. ऑर्डर सोडवत नव्हती आणि घेववतही. शंभर टक्के अड्व्हान्स मागितला की ते देणार नाहीत आणि सुंठीवाचून खोकला जाईल अशा कल्पनेनी मी मागितला. आश्चर्य म्हणजे ते द्यायला तयार झाले!

आता मला नाही म्हणण्याला काही कारणंच राहिलं नव्हतं.

मला आठवण झाली की आमची बोट एकदा हॉन्गकॉन्गला गेलेली असताना मी घड्याळ्याच्या दुकानात गेले होते. एक महागातलं घड्याळ मी घ्यावं म्हणून विक्रेता फारच मागे लागला होता. माझी सुटका करून घ्यायला मी किंमत भन्नाट कमी करून मागितलं. तर तो द्यायला तयार झाला! मग घ्यावंच लागलं. फार दिवस चाललं नाही हे सांगायलाच नको. असो.

ती ऑर्डर पूर्ण केली. थोड्या दिवसात दुसरी आली! मी पुन्हा शंभर टक्के अड्व्हान्स मागितला. पुन्हा त्यांनी दिला. होता होता कित्येक ऑर्डर्स झाल्या. मी जास्तच बेचैन.

If something looks too good to be true, it usually is. यावर माझा विश्वास. मग त्यांच्या Procurement Manager ना त्यांच्या इतक्या दिलदार वृत्तीचं कारण विचारलं. त्यांच्या उत्तरानी मला फारच आश्चर्य वाटलं. केमिकल्स बनविणारी कंपनी होती. कंपनीचा मालक तुर्की. नाव यिल्दिग्लू. म्हणे त्यानी सांगून ठेवलं आहे की सर्व छपाईची कामं यांच्याचकडे करायची. क्वॉलिटीत तडजोड करायची नाही पण किंमतीत घासाघीस करायची नाही!

यिल्दिग्लू! यिल्दिग्लू? कोण हा? आमचा आणि याचा काय संबंध? हा इतका फरिश्ता का बनलाय?

मी आणि स्वीट टॉकर काहीतरी निमित्त काढून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिससारखं ऑफिस. जमेल तितक्या लोकांना भेटलो. नाव ठेवण्यासारखं काहीच दिसलं नाही. यापुढे खाजवून खरूज काढायची नाही असं ठरवलं. या यिल्दिग्लूच्या काहीतरी गैरसमजामुळे आपल्याला बिझनेस मिळत असेल तर ठीकच आहे की. आपण त्यांना वाजवी किमती लावल्या म्हणजे झालं.

सन १९९८ ते २००८ पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. अचानक ऑर्डर येणं बंद झालं. फोन केल्यावर कळलं की ती कंपनी भारतातून काढता पाय घेत होती. आता मात्र या यिल्दिग्लूपुराणाचा छडा लावणंच जरूर होतं. नाहीतर डोक्यात किडा कायम वळवळंत राहिला असता.

त्यांच्याकडून यिल्दिग्लूचा पत्ता घेऊन त्याला सविस्तर मेल पाठवून त्याच्या या निर्णयाचं कारण विचारलं. त्याच्या उत्तरानी कारण स्पष्ट झालं खरं पण आश्चर्य फारच वाटलं.

मी नुकतीच डी.टी.पी. आणि छपाई सुरू केली होती तेव्हांचा प्रसंग. नवीन धंद्यांमध्ये मालकापासून झाडूवाल्यापर्यंत सगळे आपणच असतो. स्वीट टॉकर नुकताच बोटीवरून परत सुट्टीवर आला होता. मी आणि तो दुकानात बसलो होतो. गिर्‍हाइकांची वाट बघत. त्या सुरवातीच्या काळात दिवसाचा बराच वेळ हीच activity करण्यात जायचा.

एक मनुष्य आला. मध्यपूर्व आशियाच्या लोकांसारखा चेहरा. समजायला अवघड असे इंग्रजी उच्चार. त्याच्या हातात चार कागद होते. ते त्याला टाइप करून मोठ्या फॉन्टमध्ये प्रिन्टाआऊट हवे होते. त्याच्या हातातले कागद म्हणजे संगणकावरचेच प्रिन्टआऊट वाटत होते. मी त्याला सुचवलं की सगळं पुन्हा टाइप करण्याऐवजी जर त्याची फाईल दिलीत तर अगदी स्वस्तात आणि लवकर काम होईल. मीच हे सुचवल्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटलं. हे चालू असताना स्वीट टॉकरनी ते पत्र नजरेखालून घातलं. त्यात त्याला व्याकरणाच्या बर्‍याच चुका आढळल्या. त्या सुधारून देण्याची आम्ही ऑफर दिली. त्यामुळे तो भलताच खूष झाला.

दहा मिनिटात त्याचं काम झालं. त्यानी आमचं दोनदा कौतुक केल्यामुळे स्वीट टॉकरनी एक Quote टाकला.
‘It is disheartening that we are shocked by honesty but not by deceipt’.

आम्ही हा प्रसंग विसरलो. पण तो विसरला नव्हता. तोच यिल्दिग्लू.

यिल्दिग्लूनी भावनेच्या भरात निर्णय घेतला असेल देखील, पण दहा वर्षं तो पाळला याचं स्वीट टॉकरनी कौतुक केलं. दोनदा. मग मी त्याचाच quote थोडा बदलून त्याच्याचवर टाकला.
‘It is disheartening to see you shocked by his honesty.’

कथासमाजkathaaविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

20 Apr 2016 - 8:15 pm | अभ्या..

भारीच की.

कविता१९७८'s picture

20 Apr 2016 - 8:20 pm | कविता१९७८

मस्त

मदनबाण's picture

20 Apr 2016 - 8:21 pm | मदनबाण

वाह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुकुरुकुकुरुकुकुरुकु किक... ;) :- Kick 2

क्या बात है!! आणि मिपावर स्वागत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2016 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अनुभव !

मिपावर स्वागत !

जगच असं झालंय की कोणी फार चांगला वागत असला तर त्याच्याकडे एकतर संशयाने पाहिलं जातं किंवा तो बावळट आहे असं समजून फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जातो ! :(

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2016 - 8:34 pm | श्रीरंग_जोशी

असं पण घडू शकतं :-) . खूप सकारात्मक अनुभव.

मिपावर स्वागत. पुलेशु.

पैसा's picture

20 Apr 2016 - 8:37 pm | पैसा

मस्त अनुभव! लिहिलंत पण छान!

मधुरा देशपांडे's picture

20 Apr 2016 - 8:44 pm | मधुरा देशपांडे

मस्तच. मिपावर स्वागत.
मिपावर इथल्या प्रस्थापित आयडीशी मिळतेजुळते सदस्यनाम घेणारे बरेच डु आयडी आहेत. त्यामुळे क्षणभर तुमचे नाव बघून मला पहिली शंका डु आयडी आहे की काय अशीच आली. ;) लेख वाचल्यावर अर्थातच ती शंका खोटी आहे याची खात्री झाली.

जेपी's picture

20 Apr 2016 - 8:45 pm | जेपी

मस्त किस्सा..

रेवती's picture

20 Apr 2016 - 8:46 pm | रेवती

भारी किस्सा. लेखन आवडले.

टॉकरकाकू, मिपावर स्वागत..

शलभ's picture

20 Apr 2016 - 9:12 pm | शलभ

मिपावर स्वागत. :)
मस्त लिहीलय. यिल्दिग्लू आवडला. चांगली आठवण ठेवली त्याने.

अभिजित - १'s picture

20 Apr 2016 - 9:19 pm | अभिजित - १

मस्त .

आदूबाळ's picture

20 Apr 2016 - 9:34 pm | आदूबाळ

मस्त किस्सा! आणि मिपावर स्वागत!

बोटीवरचे "तुमचे" अनुभव वाचायलाही आवडतील.

उगा काहितरीच's picture

20 Apr 2016 - 9:36 pm | उगा काहितरीच

चांगला किस्सा ...

जव्हेरगंज's picture

20 Apr 2016 - 9:46 pm | जव्हेरगंज

नमस्कार

अनुभव लेखन आवडले आणि तुमचा आयडी सुद्धा! :)

स्वामी संकेतानंद's picture

20 Apr 2016 - 9:56 pm | स्वामी संकेतानंद

सुंदर अनुभव!

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2016 - 10:01 pm | टवाळ कार्टा

मस्त आणि स्वागत....तुम्हीपण भारी ल्हिता :)

आणि लेखही छान.

आतिवास's picture

20 Apr 2016 - 10:24 pm | आतिवास

अनुभव आवडला.
तुमच्या पोतडीतले आणखी अनुभव वाचायला आवडेल - आवडतील.

सुखीमाणूस's picture

20 Apr 2016 - 10:32 pm | सुखीमाणूस

छान लिहीला आहे.व्यवसाय करताना असे अनुभव म्हणजे जणु झुळुकच!!

मराठी कथालेखक's picture

20 Apr 2016 - 11:53 pm | मराठी कथालेखक

झकास..

वैभव जाधव's picture

21 Apr 2016 - 12:12 am | वैभव जाधव

यिल्दीग्लु आणि स्वीट टॉकरीण बाई ही दोन्ही हटके नावं आणि पहिल्याचा हटके स्वभाव दोन्ही आवडले.

आणि समृद्ध देखील :)

त्रिज्ज्या आवडली.उगाच आपला धंधा फार मोठा होईल ही गैरसमजूत न ठेवणं इत्यादी.चांगल्या मशीनची छपाई लगेच समजून येते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2016 - 6:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं. :).

दोघांचही अनुभवविश्वं जब्बर दिसतयं.

चांदणे संदीप's picture

21 Apr 2016 - 7:40 am | चांदणे संदीप

छानच अनुभव! सुरेख लेखन!
यिल्दिग्लू ला हाय सांगा आमचा! __/\__

Sandy

मृत्युन्जय's picture

21 Apr 2016 - 8:45 am | मृत्युन्जय

छान लिहिले आहे. मिपावर स्वागत

नाखु's picture

21 Apr 2016 - 8:47 am | नाखु

आणि समृद्ध अनुभव विश्व असलेले मिपाकर दांपत्य म्हणून अभिमान वाटतो!!
तिघांनाही कडक सलाम

बोटीच्या सफरीची वाट पाहणारा नाखु

शित्रेउमेश's picture

21 Apr 2016 - 10:17 am | शित्रेउमेश

सुंदर अनुभव !
आवडेश....

आय डी, स्वतःचा बिझिनेस असणं आणि लेखन सगळंच आवडलं !!

धन्यवाद!

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 10:43 am | सुबोध खरे

आपला अनुभव आणी लेखनाची शैली सुरेख आहे. अजून अनुभव असतील तर ते वाचायला आवडतील.
प्रामाणिकपणे व्यवसाय केल्याचे फळ नक्कीच मिळते. ( असा माझा हि अनुभव आहे. पण आपल्या ताजमहालाला वीट लावणे चूक ठरेल तेन्व्हातो पुन्हा केंव्हा तरी)

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Apr 2016 - 3:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमची सेपरेट वीट... आय मीन जिलबी टाका की मग. वाचायला आवडेल.

अजया's picture

21 Apr 2016 - 3:57 pm | अजया

डाॅ खरेंशी सहमत.
मिपावर स्वागत आणि छानशा सकारात्मक लेखाबद्दल अभिनंदन!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2016 - 10:48 am | पिलीयन रायडर

तुम्ही छान लिहीता. अजुनही अनुभव वाचायला आवडतील!

मोदक's picture

21 Apr 2016 - 3:20 pm | मोदक

+१११

Vasant Chavan's picture

21 Apr 2016 - 2:12 pm | Vasant Chavan

मिपावर आपले मनपुर्वक स्वागत्,आल्याबरोबर सिक्सर टाकला.छान.

अपरिचित मी's picture

21 Apr 2016 - 2:14 pm | अपरिचित मी

यिल्दिग्लू आवडला

मराठी कथालेखक's picture

21 Apr 2016 - 2:16 pm | मराठी कथालेखक

चाची ४२० मधला 'लक्ष्मी गोडबोले' आठवला :)

मस्त लिहिलंय! मिपावर स्वागत! :)

सविता००१'s picture

21 Apr 2016 - 2:23 pm | सविता००१

मस्त लिहिलंय! मिपावर स्वागत! :)

मस्त सुरुवात.. मिपावर स्वागत.

सूड's picture

21 Apr 2016 - 3:05 pm | सूड

सुंदर...पुभाप्र

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Apr 2016 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

दमदार सुरुवात केली आहे एस्टीबाईंनी... मिपावर स्वागत.

मन१'s picture

21 Apr 2016 - 3:14 pm | मन१

मस्त अनुभव. सध्या शब्दांत. आवडला किस्सा. जालावर शोधलं तर यिल्दिग्लू नावाचं नै पण yildizoglu नावाचे काही प्रोफाइल्स साप्डताहेत तुर्की परिसरातले.

शरभ's picture

21 Apr 2016 - 3:17 pm | शरभ

जर त्यांच नाव Yildizoglu (Yildızöğlu) असेल तर त्याचा उच्चार 'यिल्डीझोओलू' असा आहे. आणि त्याचा अर्थ 'Son of star' असा होइल. Yildiz = star(तारा) णि oglu = Son.

अकिलिज's picture

21 Apr 2016 - 8:13 pm | अकिलिज

दिवसातून असा एखादा लेख जरी पडला तरी मिसळपावावर आल्याचे समाधान मिळते.

स्वीट टॉकरीणबाई's picture

21 Apr 2016 - 8:53 pm | स्वीट टॉकरीणबाई

सगळ्यांना,
मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं आहे की मला संकोचल्यासारखं होत आहे.
पुनश्च धन्यवाद!

इडली डोसा's picture

21 Apr 2016 - 9:04 pm | इडली डोसा

तुम्ही स्वीट टॉकर याच्यां सारखेच भारी लिहिता. तुमचेपण बोटीवरचे अनुभव वाचायला आवडतील.

आनन्दिता's picture

21 Apr 2016 - 9:57 pm | आनन्दिता

वाह!! असं साधंसं च पण रिफ्रेशिंग आताशा फार कमी वाचायला मिळतं!

आनंद's picture

21 Apr 2016 - 10:40 pm | आनंद

छान! अनुभव
पण तुम्ही टाइप करत नसाव्यात. तुम्ही सांगत आहात आणि स्वीट टॉकर टाइप करत असावेत,
कारण हा शब्द "सबंद " :)

Pearl's picture

22 Apr 2016 - 9:48 am | Pearl

खूप छान. मस्त मिहिलं आहे.
व्यवसायातील भरभराटीबद्दल अभिनंदन.
आणखी अनुभव वाचायला आवडतील :)

प्रमोद देर्देकर's picture

22 Apr 2016 - 10:51 am | प्रमोद देर्देकर

मस्त आवड्लं. पदार्पणातच षटकार. पण तुमच्या स्वारींना ती मालिका पुर्ण करायला सांगा जरा.

स्वीट टॉकरीणबाई's picture

22 Apr 2016 - 12:59 pm | स्वीट टॉकरीणबाई

इ डो, आनन्दिता आणि आनंद,
धन्यवाद.

आनंद,
तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. स्वीट टॉकरच्या गोष्टीतल्या ताईंप्रमाणे तुमचीही निरीक्षणशक्ती जबरदस्त आहे!
टंकलेखन पूर्णपणे स्वीट टॉकरचं आहे. (ह्या प्रतिसादाचं देखील!)
त्याची दोन कारणं आहेत.
१. माझ्या शुद्धलेखनाची (ह्रस्व दीर्घाची) गोची आहे. त्यामुळे मी लिहिलेला प्रत्येक शब्द मी स्वीट टॉकरकडून प्रूफ रीड करून घेते.
२. मला मराठी टंकलेखन येतं पण मी सी डॅकचा इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरते. तो इथे चालत नाही. मला स्वीट टॉकरचं कौतुक वाटत की तो दोन्ही की-बोर्ड्समध्ये सहज वावरतो आणि न कंटाळता सगळं टायपिंग करून देतो. (मात्र ह्याचा नशिबवान असण्याशी संबंध लावू नये. ही काळजी लग्नाच्या वेळेस 'हो' म्हणण्याआधी घ्यावी लागते. एकदा तिकिटाची खिडकी सोडली की कोणतीही तक्रार ऐकून घेतली जात नाही हे सगळ्यांना माहीतच आहे!)
जस्ट जोकिंग !!

आनंदयात्री's picture

22 Apr 2016 - 10:05 pm | आनंदयात्री

मिपावर इन्स्क्रिप्ट वापरून लिहिता येते, अधिक माहितीसाठी इथे पहा.

जुइ's picture

23 Apr 2016 - 3:13 am | जुइ

शुद्धलेखन तपासून घेण्यासाठी मी मनोगतवरील शुद्धिचिकित्सक सुविधा वापरते.

बाकी लेखन आवडले. तुमचे व्यवसायाशी निगडित अजूनही अनुभव वाचायला आवडतील.

स्वीट टॉकरीणबाई's picture

22 Apr 2016 - 1:04 pm | स्वीट टॉकरीणबाई

पर्ल आणि प्र दे,
धन्यवाद.
स्वारींचं लिखाण हळुहळु चालू आहे पण आत्ता तरी खोडाखोडच जास्त दिसतिये.

अनुभवलेखन अतिशय आवडलं!!

नीलमोहर's picture

22 Apr 2016 - 5:44 pm | नीलमोहर

तुम्हा दोघांचे लेखन आधीही वाचले आहे आणि नेहमीच आवडते.
मात्र तुमचा 'स्वीटर टॉकर' आयडी जास्त आवडला होता, हे आपलं माझं मत :)
पुलेशु

विवेकपटाईत's picture

22 Apr 2016 - 9:17 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. यालाच बहुतेक निष्काम कर्माचे फळ म्हणतात.

स्वीट टॉकरीणबाई's picture

23 Apr 2016 - 12:24 am | स्वीट टॉकरीणबाई

आनंदयात्री - धन्यवाद.मोठीच समस्या सुटेल. आणि दुसरी निर्माण होईल. (आता स्वतःचं स्वतःच टंकावं लागेल!)

नीलमोहर - स्वीट टॉकर आणि स्वीटर टॉकर फारच जवळजवळचे असल्यामुळे वाचणार्यांचाही गोंधळ होण्याची शक्यता वाढते.

विवेकपटाईत - निष्काम कर्म वगैरे कुणाचं बौद्धिक घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही. एक मजेदार अनुभव शेअर करावा इतकंच.

रातराणी's picture

23 Apr 2016 - 2:00 am | रातराणी

छान अनुभव! सुंदर लिहिलं आहे!

नंदन's picture

23 Apr 2016 - 2:17 am | नंदन

अनुभव आणि तो कथन करण्याची शैली आवडली.

mugdhagode's picture

23 Apr 2016 - 6:48 am | mugdhagode

छान

एक एकटा एकटाच's picture

23 Apr 2016 - 8:49 pm | एक एकटा एकटाच

मस्त

भंकस बाबा's picture

24 Apr 2016 - 9:31 am | भंकस बाबा

स्वागत आहे तुमचे,

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2016 - 3:03 pm | श्रीगुरुजी

छान अनुभव आणि तितकेच चांगले लेखन!

माझिया मना's picture

25 Apr 2016 - 3:41 pm | माझिया मना

छान वाटले वाचायला!

१००मित्र's picture

25 Apr 2016 - 3:59 pm | १००मित्र

व्यवसायातले अनुभव ... असेही !
छान मांड्लंय !

सही रे सई's picture

18 Jun 2016 - 1:28 am | सही रे सई

अनुभव खुपच प्रेरणादायी आहे आणि तुम्ही लिहिताही खुप छान. असेच लिहिते रहा.

रुपी's picture

28 Jun 2016 - 4:15 am | रुपी

छान अनुभव!

विशेष म्हणजे तुम्ही छडा लावलात! नाहीतरी आपल्या नसत्या चौकशीला लोक काय म्हणतील हा विचार करुन कितीतरी किडे आपण उगीच डोक्यात वळवळत ठेवतो.

मारवा's picture

28 Jun 2016 - 10:42 am | मारवा

आणि स्वीट टॉकर च कौतुक तीन चार दा करण्यात आलेल आहे. नवरा हा तसा कौतुक करण्याचा विषय नसतो.
खिमा वगैरे करुन खाण्याचा विषय असतो संदर्भ ( चि.वि.जोशींची कथा)
तरी वाचुन मौज वाटली.

सुरेख लेख! आणि अनुभव अगदी चोख बावनकशी!

माझा एक सहकारी आमची कंपनी सोडून एमबीए करायला गेला. कंपनीमध्ये त्याने 3-4 वर्षे काम केलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव गाठीशी होता. शिवाय तो खूप हुशारदेखील होता. पुण्यातल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. दुसऱ्या वर्षी त्याने त्यांच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा एक मोठा कार्यक्रम ठरवला. सगळं आयोजन तोच करणार होता. म्हणून त्याने मोठी हॉटेले बघायला सुरुवात केली. बालेवाडीजवळ एका मोठ्या हॉटेलात तो गेला. तिथल्या व्यवस्थापकाने त्याला संपूर्ण हॉटेल दाखवले. मोठे दालन, जेवणाची व्यवस्था, प्रोजेक्टर वगैरे सगळे दाखवले. व्यवस्थापकाने सुरुवातीलाच दर सांगितले होते. ते यांना परवडण्यासारखे नव्हते. म्हणून माझ्या त्या सहकाऱ्याने त्याला आधीच 'क्षमस्व' म्हणून सांगितले. तरी त्या व्यवस्थापकाने त्याला सगळं नीट विस्तारपूर्वक समजावून सांगितलं.

शेवटी माझ्या सहकाऱ्याने नकार देऊन निरोप घेतला. जाता जाता त्याने व्यवस्थापकाला विचारलं की मी आधीच 'नाही' सांगितलं असतांना तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ का दिलात आणि इतकं सगळं व्यवस्थित का सांगितलं. त्यावर तो व्यवस्थापक म्हणाला की तुम्ही उद्या मोठ्या पदावर गेल्यानंतर असा कार्यक्रम करायचा असल्यास आमच्या हॉटेलचा नक्की विचार कराल. आज तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही कमी महत्वाचे असा विचार मी करत नाही. प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी सन्माननीय ग्राहक असते, मग ती छोटी असो किंवा मोठी! माझा सहकारी त्याच्या या उत्तराने भारावला. पुढे त्याने परत जुनीच कंपनी जॉईन केल्यानंतर एक कार्यक्रम त्याच हॉटेलात घेतला.

अशी निखळ प्रामाणिक व्यावसायीक व्रुत्ती हवी.. मस्त

स्वीट टॉकरीणबाई's picture

28 Jun 2016 - 4:39 pm | स्वीट टॉकरीणबाई

सर्वजण,
पुनश्च धन्यवाद!

समीरसुर - तुमचा मित्र भारतीय यिल्दिग्लू!

किसन शिंदे's picture

28 Jun 2016 - 9:49 pm | किसन शिंदे

अनुभव छान आणि तो लिहीण्याची हातोटी त्याहूनही मस्त!!

महामाया's picture

5 Jul 2016 - 6:45 pm | महामाया

छान अनुभव, सुरेख लेखन।

समीर सूरांचा भारतीय यिल्दिंग्लू देखील लई भारी...