नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ८ .....शेवटचा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 1:02 pm

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ६
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ७

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ८

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

किनार्‍यावर आता अवजड युद्धसाहित्याचा ढीग पडला होता. दारुगोळ्याच्या पेट्या, मोडलले रेडिओ, हेल्मेट्स, तारांची भेंडोळी, दोरखंड, आणि असंख्य बंदुकांचा खच पडला होता. वाकड्यातिकड्या झालेल्या बोटी आकाशाकडे नाके करुन पाण्यात अर्धवट बुडाल्या होत्या. जळलेले रणगाडे काळा कुट्ट तेलकट धूर ओकत होते. त्यातच पाण्यात हेलकावे खात तरंगत असलेले एक गिटारही दिसत होते.

या सगळ्या गोंधळात अमेरिकन सैन्याची दुसरी लाट किनार्‍याला लागली. ते आले आणि ते दृष्य पाहून थांबले. काही मिनिटातच तिसरी तुकडी आली. ते आले आणि तेही थांबले. वाळूवर व पाण्यावर प्रेतांचा खच पडला होता. त्यांनी मेलेल्या सैनिकांच्या शरीराचा आडोसा केला व स्वत:च्या रक्षणाचा प्रयत्न केला. हवेतून संरक्षण नाही, वाळूत बाँबमुळे खड्डे पडलेले नाहीत, लपण्यास आडोसा नाही, आजूबाजूला मृत्युचे थैमान, अशा अवस्थेत त्यांची परिस्थिती अर्धांगवायू झालेल्या माणसासारखी झाली. हे सगळे पाहताना त्यांना वाटले की ही लढाई ते हरले आहेत. त्यांची मानसिक अवस्था विचित्र झाली. एक सैनिक तर पाण्यात बसून रडत शांतपणे पाण्यात खडे फेकत होता. त्याला कसलेही भान नव्हते. त्या धक्क्यातून काही सैनिक लवकरच सावरले व पुढे जाऊ लागले कारण तेथे थांबणे म्हणजे मृत्युला आमंत्रण दिल्यासारखेच होते. त्यांनी किनार्‍याच्या दिशेने मुसंडी मारली.

ओमाहाच्या किनार्‍यावर अमेरिकन सैन्याला जवळजवळ सात तास मान वर काढता आली नाही. या सैन्याची किनार्‍यावरील प्रगती एका बोटीवरुन जनरल गेरो त्याच्या दुर्बिणीतून न्याहाळत होता. त्याने शेवटी दुपारी दीड वाजता जनरल ओमर ब्रॅडलेला ‘अखेरीस सैनिकांनी किनार्‍यावरची वाळू पार करुन जमिनीवर जायला सुरवात केली आहे’ या अर्थाचा संदेश पाठवला. ओमाहाच्या किनार्‍यावर या पहिल्या हल्ल्यात जरी दोन हजार सैनिक ठार झाले असले तरी रात्रीपर्यंत ३४००० सैनिकांनी किनारा पार केला होता. यातच दोन रेंजर बटालियन होत्या ज्यांनी दोराच्या शिड्या वापरुन पॉईंट द हॉ येथील जर्मनीच्या तोफखान्याचा आवाज बंद पाडला.

दहा मैल दूर, उताहच्या किनार्‍यावर तुलनेने परिस्थिती बरी होती म्हणायची. येथे चौथ्या डिव्हिजनच्या सैनिकांना विशेष प्रतिकार झाला नाही. ते पटापट उतरुन किनार्‍यावरुन आत घुसले. तिसरा हल्ला झाला आणि तरीही त्यांना विशेष प्रतिकार होत नव्हता. कित्येक सैनिकांचे प्रशिक्षण यापेक्षा खडतर होते. फक्त काहीच अधिकार्‍यांना यामागचे खरे कारण माहीत होते. चुकीने हे सैन्य त्यांच्या लक्ष्यापासून बरेच दूर उतरले होते. त्यामुळे त्यांना विरोध असा झालाच नाही.

स्वोर्ड, जुना व गोल्ड या सांकेतिक नावाच्या किनार्‍यावर ब्रिटिश व कॅनडाच्या फौजा उतरत होत्या. ऑर्ने नदीच्या मुखापासून ते ल्-हामेल नावाच्या गावापर्यंत म्हणजे जवळजवळ १५ मैलांच्या किनार्‍यावर आता बोटींची गडबड उडाली. या विभागातील पाण्याखाली उभे केलेले अडथळे हे जर्मन तोफांपेक्षा जास्त हानिकारक होते असे म्हणावे लागेल. प्रथम उतरले ते पाणबुडे. त्यांना फक्त वीस मिनिटात पाण्याखालील अडथळे स्फोटकांनी उडवून सैनिकवाहू नौकांसाठी मार्ग मोकळा करायचा होता.

वीस मिनिटांनी सैनिकांच्या पहिल्या तुकड्या पाण्यात उतरणार होत्या. ते मोठाले काँक्रिटचे अडथळे वीस मिनिटात कसे उडविणार याची त्यांना काळजी वाटत होती पण त्यांना माहिती होते की ते त्यांना करायचेच होते. ते काम करीत असतानाच पहिला हल्ला आला. बोटी त्या अडथळ्यांना धडकत कलंडत होत्या. काहींच्या खालून चिरफळ्या उडत होत्या. पाणसुरुंगांचे स्फोट होत होते व त्यात बोटी उलट्यापालट्या होत होत्या. त्या संपूर्ण किनार्‍यावर थोड्याफार फरकाने हेच दृष्य दिसत होते.
आश्चर्य म्हणजे तेथे जिवितहानी तुलनेने फार कमी झाली. पण जेव्हा एखादी बोट अडथळ्याला धडकायची तेव्हा फारच भयंकर प्रकार व्हायचा. गोल्डबीचवर पाणबुड्या पिटर जोन्स एका अडथळ्यावर काम करत असताना एक बोट सैनिकांना घेऊन तेथे आली. त्यात सैनिक उतरण्याच्या तयारीत होते. पाण्याला एकदम आलेल्या फुगवट्यामुळे ती बोट अचानक एका बाजूला कलंडली व सुरुंग जोडलेल्या अडथळ्यावर आदळली. जोन्सने स्वत: पाहिले. त्या बोटीवरील स्फोटकांचा स्फोट झाला व पाणी आकाशात उसळले.

‘एखाद्या कार्टूनमधे दाखवतात त्याप्रमाणे पाण्याची अजस्र लाट उसळली. एक सैनिक जो त्या बोटीत समोर उभा होता तो एका क्षणात त्या लाटेच्या टोकावर आकाशात दिसू लागला. ओसरताना त्या लाटेवरुन असंख्य सैनिकांच्या असंख्य तुकड्यांचा आसमंतात वर्षाव झाला’.

बोटीमागून बोटी या असल्या अडथळ्यात अडकत होत्या व बुडत होत्या. ४८-रॉयल मरीन्सच्या ले. अॅटल्डवर्थही अशाच एका बोटीत होता. त्याचीही बोट हळूहळू बुडत होती. त्याच्या सैनिकांनी आपण कधी उतरणार ? असा तक्रारवजा प्रश्नही त्याला केला. शेवटी त्यांना पाण्यात उड्या माराव्या लागल्या. नशिबाने सैनिकांना सोडून येणार्‍या एका बोटीने त्यांचे प्राण वाचविले. दुसर्‍या बाजूला ब्रिटिशांच्या विभागात ४७-रॉयल मरीन्स कमांडो रेजिमेंट गोल्डबीचवरुन पोर्ट-एन-बेसिनच्या दिशेने कूच केले व ते अमेरिकन सैन्याला जाऊन मिळाले. दुपारपर्यंत त्यांना ओमाहवरील अमेरिकन्स भेटणार होते पन्नासावी डिव्हिजननेही गोल्डबीचवरुन बेयूच्या दिशेने कूच केले. जुनो व स्वोर्डबीचवरुनही कॅनडा व ब्रिटनच्या फौजांही कार्पिकेटचे विमानतळ व काँच्या दिशेने निघाल्या.

इकडे जर्मनीमधे बेश्टेशगाडेन पहाटेच्या शांत वातावरणात पहुडले होते. हिटलरच्या मुख्यालयात जनरल जोडलने काल रात्री आलेल्या अहवालांवर नजर फिरविण्याचे काम चालू केले. तेवढ्या फोन खणखणला. दुसर्या टोकाला जनरल वॉल्टर वॉर्लिमाँट होता. त्याला काही काळापूर्वीच जनरल रुनस्टेडची पँझर डिव्हिजन संबंधीत विनंत टेलिप्रिंटरने मिळाली होती. त्या डिव्हिजन्स हिटलरच्या परवानगीशिवाय हलविता येणार नाहीत असे त्याने रुनस्टेडच्या चिफ ऑफ स्टाफला सांगितले होते व तेच तो आता जनरल जोडलला सांगत होता.

‘ब्लुमेंट्रीटचा फोन आला होता. त्याने त्या आक्रमणास प्रतिकार करण्यासाठी दोन पँझर डिव्हिजन मागितल्या आहेत. त्याला त्या नॉर्मंडीवर हव्या आहेत’.

‘तुला खात्री आहे का या सगळ्याची ? माझ्याकडे आलेल्या इतर अहवालानुसार हा हल्ला आपली बुद्धीभेद करण्यासाठी करण्यात आला आहे व हे खरे आक्रमण नव्हे असे वाटते. आपल्या राखीव डिव्हिजन हलविण्यापूर्वी याची खात्री करुन घ्यायला हवी.’

दोस्तांच्या सैन्याला परतविण्यासाठी जो निर्णय अर्ध्या तासात हवा होता तो जवळजवळ आठ तासाने आला. अर्थातच त्याचा फायदा झाला नाही.

ज्या माणसाला या आक्रमणाची कल्पना होती व ते थोपविण्याची ज्याला शक्यता वाटत होती तो हिटलरच्या मुक्कामापासून एक तासाच्या अंतरावर होता. सकाळचे ७.३० झाले होते. जनरल रोमेलला नॉर्मंडीवरील आक्रमणाची किंवा तेथे जे काय चालले होते त्याबद्दल माहिती देण्यात आली होती का नव्हती हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आर्मी ग्रुप बीच्या काटेकोरपणे ठेवलेल्या बखरीत याबद्दल काही उल्लेख नाही हेही जरा विचित्रच म्हणायला हवे. इकडे नॉर्मंडीवरील आक्रमण जोरात असताना रुनस्टेड व रोमेलच्या कार्यालयात त्यांचे अधिकारी अजूनही चाचपडत होते. नॉर्मंडीच्या युद्धभूमीवरील जर्मनीची सर्व दळणवळण यंत्रणा कोलमडून पडली होती किंवा उध्वस्त केली गेली होती. जर्मनीच्या सातव्या आर्मीच्या ब्रि. जनरल पेम्सेलने रोमेलच्या मुख्यालयाला जो फोन केला त्यात या परिस्थितीचे यथार्थ वर्णन थोडक्यात केले आहे. तो म्हणाला,

‘मी हे युद्ध विल्यम द काँकरर लढला तसे लढतो आहे. डोळ्यांनी व कानांनी. माझे अधिकारी मला फोन करतात आणि सांगतात ‘ आम्हाला विमानांचे व जहाजांचे आवाज ऐकू येत आहेत’ पण मला ते पुरावा देत नाहीत’’.

ल्-मान्स येथील जर्मनीच्या सातव्या आर्मीच्या मुख्यालयात मात्र उत्साहाचे वातावरण होते. त्यांच्या ३५२व्या डिव्हिजनने जीव्हील-कोलव्हिल भागात आक्रमण हाणून पाडले होते. त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला होता की जेव्हा त्यांना सातव्या आर्मीच्या मुख्यालयातून मदतीचा हात पुढे करण्यात आला तेव्हा त्यांनी ती मदत स्पष्ट शब्दात नाकारली.

या लेखाची सुरुवात ज्या ठिकाणी झाली त्या रोमेलच्या कार्यालयातही असेच उत्साही वातावरण होते. व्हाईस अॅतडमिरल रुगे, जो जनरल रोमेलचा नौदलातील अधिकारी होता त्याचाही आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती त्या किल्ल्याचे मालक तेथील किमती सामान का हलवत होते.....

इग्लंडमधे आता सकाळचे ९.३० वाजले होते. जनरल आयसेहॉव्हरने रात्र येरझार्‍या घालण्यात व्यतीत केली होती. त्याला झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता. येणारी प्रत्येक बातमी तो काळजीपूर्वक नजरेखालून घालत होता. युरोपच्या भूमिवर पाय रोवण्यात त्याच्या सैन्याला आता यश मिळाले आहे याबद्दल त्याच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती. काही ठिकाणी हे पाऊल जरा निसरड्या मैदानावर होते पण त्याची त्याला काळजी वाटत नव्हती. त्याने काही तासांपूर्वी प्रसारणासाठी लिहिलेला मजकूराचा कागद फाडून टाकला. हा संदेश जर आक्रमण फसले असते तर प्रसारित केला जाणार होता.

‘चेरबोर्गच्या किनार्‍यावर केलेले आक्रमण फसले आहे. आम्हाला तेथे पाय रोवण्यास अपयश आले आहे. हे आक्रमण यावेळी करायचा माझा निर्णय सर्वस्वी हाती आलेल्या माहितीवर अवलंबून होता. माझ्या सैनिकांनी, विमानदल, नौदल व नौदलाच्या सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवूनही नशिबाने अपयश आमच्या पदरात टाकले आहे. हरकत नाही !. या पराभवाला जबाबदार कोणाला धरायचे असेल तर मलाच धरले पाहिजे.’

या संदेशाऐवजी ९ वाजून ३३ मिनिटांनी दुसरा संदेश जगासाठी प्रसारित करण्यात आला,

‘जनरल आयसेहॉव्हरच्या अधिपत्याखाली दोस्तांच्या नौदलांनी हवाईदलाच्या सहाय्याने आपले सैन्य फ्रान्सच्या किनार्‍यावर यशस्वीपणे उतरविले आहे’’

१० वाजून १५ मिनिटांनी फिल्ड मार्शल रोमेलच्या घरातील फोन खणखणला. फोनवर मे. जनरल स्पायडेल होता व त्याने आक्रमणाचा पूर्ण अहवाल रोमेलला सादर केला. फिल्ड मार्शल रोमेल खचलेल्या मन:स्थितीत ऐकत राहिला......

हा काही साधासुधा हल्ला नव्हता. याच दिवसाबाद्दल तो पूर्वी अनेक वेळा बोलत असे....रोमेलला आता कळून चुकले की पुढे अनेक महिने ही लढाई चालू राहणार आहे पण जर्मनीचा खेळ संपलाय. आत्ता सकाळचे दहा वाजले होते पण तो ज्या ‘लाँगेस्ट डे’ बद्दल किनार्‍यावर बोलला होता, तो सकाळीच संपला. दुर्दैवाने फिल्ड मार्शल रोमेलला या शेवटच्या निकराच्या युद्धात भाग घेता आला नाही. सध्यातरी तो स्वत:ला दुषणे देण्याखेरीज काही करु शकत नव्हता. तो स्वत:शीच पुटपुटला....

‘ असा कसा मूर्खपणा केला मी ? कसा ?’.............

समाप्त.
जयंत कुलकर्णी

इतिहासलेख

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

16 Jul 2015 - 1:36 pm | खटपट्या

हा धागा नजरचूकीने वाचायचा राहुन गेला होता. धन्यवाद काका.
सर्व भाग एकदम वाचून प्रतिक्रीया देणार होतो पण सद्या संपादकीय धाग्यावर कमी प्रतिसादा बद्द्ल ओरड चालू आहे म्हणून..

एस's picture

16 Jul 2015 - 1:57 pm | एस

द लाँगेस्ट डे संपला तरी नाझी जर्मनीच्या साठी काळरात्र आता कुठे सुरू झाली होती. कुलकर्णीसाहेब, या विषयावर म्हणजे नाझी जर्मनीच्या पाडावावर अजून लिहावे ही विनंती.

अजया's picture

16 Jul 2015 - 2:25 pm | अजया

अप्रतिम लेखमाला. _____/\_____

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jul 2015 - 3:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

जबरदस्त!!! निव्वळ अप्रतिम

पाटील हो's picture

16 Jul 2015 - 4:20 pm | पाटील हो

अप्रतिम लेखमाला.

विशाल कुलकर्णी's picture

16 Jul 2015 - 4:56 pm | विशाल कुलकर्णी

निव्वळ अफाट ! धन्यवाद जयंतजी _/\_

राही's picture

16 Jul 2015 - 5:25 pm | राही

लेखमाला अतिशय आवडली. तपशीलवार वर्णनेही श्वास रोधून वाचली. चित्तथरारक आणि रोमहर्षक.
नॉर्मंडीची चढाई आणि डंकर्कची माघार ह्या दोन घटनांची वर्णने वाचताना दुसर्‍या महायुद्धाच्या विशाल पटाची आणि संसाधनांच्या भव्यतेची कल्पना येते. महायुद्धाचा हा पट शब्दांत उतरवणे कठिण. क्रौर्य, शौर्य, धैर्य, नियोजन, या सर्वच पातळ्यांवर या युद्धाचा पसारा जगद्व्याळ आणि मेंदूला झिणझिण्या आणणारा होता.
आपण हे सर्व शब्दांत अगदी व्यवस्थित पकडले आहे.

Jack_Bauer's picture

16 Jul 2015 - 8:17 pm | Jack_Bauer

नाझी जर्मनीच्या रशियातील मोहीम आणि पराभव ह्या विषयी पण एक लेखमालिका येऊ द्यात . ही लेख मालिका छानच झाली .

आपल्या नव्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस's picture

17 Jul 2015 - 9:35 am | प्रचेतस

अप्रतिम लेखमाला.

विशाल कुलकर्णी's picture

17 Jul 2015 - 9:54 am | विशाल कुलकर्णी

हिटलरबद्दल मनात जेवढा तिरस्कार, घृणा आहे तितकेच 'रोमेल' बद्दल सुरुवातीपासून विलक्षण आकर्षण वाटत आलेले आहे. रोमेलबद्दल, त्याच्या आफ्रिका कॉर्प्सबद्दल (The Afrika Korps) अजुन सविस्तर वाचायला आवडेल. वाट पाहतोय.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2015 - 10:09 am | श्रीरंग_जोशी

रोमेलबाबत मिपावरच पूर्वी वाचले आहे. तरीपण तुम्ही म्हणता तसे अधिक वाचायला मिळाल्यास आवडेलच.

पूर्वी रोमेलबाबत वाचलेले लेखः

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2015 - 11:28 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद. निशदेचा लेख वाचला होता. जयंतजींचा देखील पाहतो आता. कदाचित त्यांच्या ब्लॉगवर वाचलाही असेल. आठवत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2015 - 10:18 am | श्रीरंग_जोशी

द्वितीय महायुद्धातील बहुधा सर्वात महत्वाच्या निर्णायक चढाईबाबत तपशीलवार व त्या सर्व घडामोडींना न्याय देणारे लेखन. इतिहासाची आवड असणार्‍या प्रत्येक वाचकासाठी ही लेखमालिका म्हणजे पर्वणी आहे.

विवेकपटाईत's picture

17 Jul 2015 - 7:50 pm | विवेकपटाईत

ज्ञानवर्धक लेखमाला, आवडली.

पैसा's picture

17 Jul 2015 - 8:49 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच वाचायला सुरुवात केली अन वाचतच राहिले!

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 3:20 pm | पद्मावति

अप्रतिम लेखमाला.
अतिशय रोचक माहीती आणि तुमची प्रभावी लेखनशैली यामुळे तुमचा प्रत्येक लेख, कथा एक एक मास्टरपीस बनतो.

जयंत कुलकर्णी's picture

18 Jul 2015 - 3:36 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !
आता दुसर्‍या महायुद्धाच्या रशियाच्या आघाडीबद्दल लिहायचे आहे... प्रथम मॉस्को आणि मग स्टॅलिनग्राड.... बघू केव्हा मुहुर्त लागतोय ते....

पैसा's picture

19 Jul 2015 - 10:24 pm | पैसा

मेजवानीच आहे आम्हाला! वाट बघते!

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2015 - 10:29 pm | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

लहान असताना दुसर्‍या महायुद्धात कामी आलेला रशियन बाल-गुप्तहेर इवान याच्यावरचं पुस्तक वाचलं होतं. त्यानंतर रशियन संदर्भ असलेलं महायुद्धांवरचं काही वाचलं नाही.

या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.

रघुनाथ.केरकर's picture

20 Jul 2015 - 10:21 am | रघुनाथ.केरकर

मेजवानी च आहे म्हणजे......

तोंडाला पाणी सुटले आहे!! ;)

मी-सौरभ's picture

18 Jul 2015 - 3:54 pm | मी-सौरभ

नेहमी प्रमाणे खणखणित लेखमाला
खुप छान माहिती मिळाली

ऐक शुन्य शुन्य's picture

19 Jul 2015 - 10:13 pm | ऐक शुन्य शुन्य

आपल्या लेखनाचा पंखा!!!

किल्लेदार's picture

4 Aug 2015 - 8:25 am | किल्लेदार

मझा आ गया.........

तुमची ही लेखमालाही अतिशय आवडली!

ब़जरबट्टू's picture

11 Aug 2015 - 2:42 pm | ब़जरबट्टू

खुपच जोरदार लेखमाला..

अतिशय आवडली..

नया है वह's picture

28 Aug 2015 - 6:48 pm | नया है वह

अप्रतिम लेखमाला!!

मन१'s picture

21 Apr 2016 - 2:34 pm | मन१

आख्खी मालिका व्यवस्थित वाचून काढली. मुद्दाम वेगळी ठेवली होती सावकाश वाचायला, त्याचं सार्थक झालं. नॉर्मण्डीमध्ये नाझी/जर्मनी/हिटलर गाफिल राहण्यामागंच एक कारण म्हणजे खरा, मोठा हल्ला भलतीकडेच ( पास द कॅलिस -- पा दा क्यॅले इथे ) होइल असं त्यांना वाटत राहिलं ह्याचा उल्लेख मालिकेत आलेलाच आहे. त्यांना तसं वाटण्यासाठी एका माणसानं अनेक उचापत्या करुन आख्ख्या युद्धावर काही अंशी का असेना प्रभाव टाकला. त्याच्याबद्दल ह्या माझ्या धाग्यांत लिहिलय :-

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १
थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २