नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'.....भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Jun 2015 - 9:29 am

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे' ....भाग-२
मागीलपानावरुन...
आपल्या हातातील चांदीची टोके असलेला फिल्डमार्शलचा बॅटन त्या वाळूकडे रोखत तो म्हणाला,
‘या किनाऱ्यावर आपण युद्ध जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत. शत्रूला थोपविण्याची आपल्याकडे फक्त एकच संधी आहे. तो पाण्यात असेपर्यंत. त्याचा नाश हा किनाऱ्यावर उतरतानाच होऊ शकतो. आपल्याला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर येथेच करावा लागेल. लँग, आक्रमणाचे पहिले २४ तास या युद्धाचे भवितव्य ठरविणार आहेत. जर्मनीसाठी आणि शत्रूसाठी या वर्षातील हा सगळ्यात मोठा दिवस असेल............... द लॉंगेस्ट डे.....’

हिटलरने रोमेलच्या योजनेला तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर रुनस्टेड हा नावालाच त्या सेनेचा प्रमुख राहिला. थोड्याच काळात रोमेलने त्याच्या योजना निर्दयपणे राबवून त्या किनाऱ्याचे रुपच पालटून टाकले. ज्या ज्या किनाऱ्यांवर आक्रमणाची शक्यता होती तेथे त्याने अडथळे उभे करण्याचे आदेश सोडले. हे अडथळे अनेक आकाराचे होते. काही लोखंडी, त्रिकोणी आकाराचे होते तर काही काटेरी तारांचे होते तर काही नुसतेच रोवलेले खांब होते. काँक्रीटचे मोठमोठाले शंकूचे आकारही तेथे टाकण्यात आले. ओहोटी आणि भरतीचा आभ्यास करुन त्याच्या मधल्या जागेत हे अडथळे उभे केले गेले व त्या प्रत्येक अडथळ्याला स्फोटके जोडलेली होती.

रोमेल... कितीही पुस्तकात कितीही वेळा रोमेलचे छायाचित्र पाहिले असले तरीही ते परत पहावेसे वाटतेच. असे म्हणतात तो युद्धभुमीवर एखाद्या युद्धदेवतेसारखा भासत असे...
रोमेल...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सगळ्या अडथळ्यांचा शोध खुद्द रोमेलने लावला होता. ते साधेसुधे, तयार करण्यास सोपे पण मृत्युचे सापळेच होते. या अडथळ्यांचे मुख्य काम होते शत्रूच्या सैनिकांना बोटीतून किनाऱ्यावर उतरु न देणे किंवा उतरलेच तर त्यांना उतरण्यास इतका वेळ लागायला पाहिजे की किनाऱ्यावरील तोफांना, मशिनगन्सला त्यांचा समाचार घेता आला पाहिजे. अटलांटिकच्या किनाऱ्यावर असे पाच लाखाहून जास्त अडथळे रोमेलने काही महिन्यात उभे करायला लावले. त्याला त्यांनी रोमेल अ‍ॅस्पॅरॅगस असे नाव दिले होते.

पण रोमेल यावरही समाधानी नव्हता. वाळूतून वरच्या बाजूला येणाऱ्या प्रत्येक घळीत, पायवाटेवर, ओघळात त्याने भूसुरुंग पेरण्याचे आदेश दिले. यात सैनिकविरोधी सुरुंगापासून रणगाडाविरोधी सुरुंगापर्यंत सर्व प्रकारचे सुरुंग वापरले गेले. यातच जर्मनीने शोधलेला एस्-सुरुंगही होता.
एस सुरुंग.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सुरुंगावर पाय पडल्यावर एक डबा जमिनीतून बाहेर उडायचा. साधारणत: माणसाच्या उंचीपर्यंत तो आला की तो फुटायचा व त्यातून ३६० कोनातून बॉलबेअरींग गोळ्यांसारखे उडायचे. फारच परिणामकारक हत्यार होते ते. किनाऱ्यावर असले ५० लाख सुरुंग पेरण्यात आले. आक्रमण होण्याआधी अजून साठ लाख सुरुंग वाळूत पेरण्याची त्याची योजना होती. त्याच्या योजनेत अजून ५० लाख सुरुंग त्या सर्व किनारपट्टीवर पेरायचे आदेश दिले गेले होते.

या सर्व अडथळ्यांच्या व सुरुंगाच्या जाळ्यापलिकडे किनाऱ्यावर, जर्मन सैन्य पिलबॉक्समधे पाण्यावर लक्ष ठेवून होते. या संरक्षणफळीत जर्मनीने त्यांच्या उत्कृष्ट तोफा आणून ठेवल्या होत्या. त्या तोफा व स्वयंचलित बंदुका अशा तऱ्हेने तैनात केल्या होत्या की त्यांच्या माऱ्यात सर्व किनारा येऊ शकेल. रोमेलने जमेल तेवढ्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. जेथे त्याला तोफा कमी पडल्या तेथे त्याने रॉकेट लाँचर तैनात केले. एका ठिकाणी त्याने रोबो रणगाडेही तैनात केले होते. त्यांचे नाव होते गोलिअॅ्थ. हे जरी प्राथमिक अवस्थेत असले तरीही रोमेलने त्याचा वापर करायचा ठरविले होते. त्या काळात हे अस्त्र बंकरमधून संचलित केले जायचे व योग्य वेळी किनाऱ्यावर नेऊन त्यातील अर्धा टन स्फोटकांचा स्फोट करता येत असे. यावरुन रोमेलला या आक्रमणाची किती काळजी वाटत होती हे स्पष्ट होते.

जर्मन पिलबॉक्स.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आजवरच्या इतिहासात आक्रमकांविरुद्ध या प्रकारची संरक्षण व्यवस्था क्वचितच उभी केली गेली असेल. पण यावरही रोमेल असमाधानी होता. त्याला अजून पिलबॉक्स, किनाऱ्यावरील अडथळे, सुरुंग हवे होते. अजून तोफा हव्या होत्या, अजून सैन्य पाहिजे होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला पँझरच्या तुकड्या ज्या राखीव म्हणून ठेवण्यात आल्या होत्या त्या किनाऱ्यावर पाहिजे होत्या. दुर्दैवाने या पँझरच्या तुकड्या हिटलरने स्वत:च्या आधिपत्याखाली ठेवण्याचे ठरविले व त्याला त्या तुकड्या दिल्या नाहीत. रोमेलला कमीतकमी पँझरच्या पाच डिव्हिजन्स किनारपट्टीवर आवश्यक वाटत होत्या. त्या मिळविण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे प्रत्यक्ष हिटलरची गाठ घेणे. लँगला त्या दिवशी रोमेल म्हणाला,
‘हिटलरची गाठ जो पहिल्यांदा घेईल तो जिंकणार आहे.’ त्या दिवशी जर्मनीला जाण्याच्या तयारीत असलेल्या रोमेलने ही शर्यत जिंकण्याचा निश्चय केला होता.....

१५ व्या आर्मीच्या मुख्यालयात (जे बेल्जियमच्या सीमेजवळ म्हणजे ला होशग्रियूं पासून १२५ मैल होते) ले. कर्नल हेलमुथ मायर ४ जून केव्हा उजाडतोय याची आतूरतेने वाट बघत होता. जून महिन्यात त्याला निवांत अशी झोपच मिळाली नव्हती पण आजची रात्र भयानकच होती. त्याची जबाबदारी जरा वेगळी होती. त्या आक्रमणाच्या सीमेवर तो अन्वेषण दलाचा प्रमुख होता. त्याच्या या दलाचा मुख्य भाग होता तीस माणसांचा चमू, ज्यांचे काम होते शत्रूचे संदेशवहनाचे जाळे भेदणे. यासाठी त्यांना ते संदेश सदा सर्वकाळ ऐकावे लागत असत. या तीस माणसामधील प्रत्येक माणूस तल्लख बुद्धिमत्तेचा होता व त्याला कमीतकमी तीन भाषा अवगत होत्या. दोस्तराष्ट्रांच्या प्रत्येक संदेशाची चाहूल त्यांना लागत असे. त्यांची यंत्रणा इतकी संवेदनशील होती की शेकडो मैल दूर असलेल्या ब्रिटनमधील लष्करी पोलीस दलाच्या बिनतारी यंत्रणांचे संदेश त्यांना ऐकू येत असत. अर्थातच याचा त्यांना फारच उपयोग होत असे. हे लष्करी पोलीस दोस्तांच्या विविध तुकड्यांना हालचालींसाठी मार्गदर्शन करीत तेव्हा कुठल्या तुकड्या कुठे तैनात आहेत याची माहिती विनासायास मायर्सला मिळत असे.

मायर्स त्याच्या कामात निष्णात होता. दिवसभरात त्याच्या टेबलावर आलेल्या प्रत्येक अहवालांच्या चळतीत तो प्रत्येक पान लक्ष घालून वाचत असे. कितीही हास्यास्पद, अविश्वसनीय बाब असली तरीही त्याच्या अभ्यासातून सुटत नसे. त्या रात्री त्याच्या माणसांनी असाच एक संदेश पकडला होता. तो संदेश असोसिएटेड प्रेसकडून प्रसारित केला गेला होता. त्यात लिहिले होते, ‘तातडीचा संदेश. न्युयॉर्क. आयसेनहॉव्हरच्या मुख्यालयाची फ्रान्सच्या किनाऱ्यावर सैन्य उतरविल्याची घोषणा.’ तो संदेश वाचून मायर्सची वाचाच बसली. त्याने ताबडतोब मुख्यालयाला हा संदेश पाठविण्याचा विचार केला जे स्वाभाविकपणे नैसर्गिक होते. पण त्याने नंतर स्वत:वर ताबा मिळवला. हा संदेश खरे असणे शक्यच नव्हते. असा हल्ला झाला असता तर त्याला आधीच कळले असते. आघाडीवर तर सर्वत्र शांतता होती. दुसरे कारण म्हणजे जर्मन गुप्तहेरखात्याच्या प्रमुखाने, अॅीडमिरल कॅनॅरिसने त्याच्याकडे दोस्तांचा एक संदेश सुपूर्द केला होता. त्यात आक्रमणास सुरुवात करण्याआधी जो सांकेतिक संदेश फ्रान्सच्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी दोन भागात प्रसारित करण्यात येणार होता तो दिला होता. तसा संदेश प्रसारित झाला असता तर त्याच्या माणसांना निश्चितच कळला असता.

अॅडमिरल कॅनॅरिसने त्याला सांगितले होते की दोस्तांकडून फ्रान्सच्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी आक्रमणाआधी शेकडो संदेश प्रसारित केले जातील पण यातील काहीच महत्वाचे असतील व डी-डे संबधित असतील. त्याने त्याला अशीही सूचना दिली होती की त्याने सर्व संदेश काळजीपूर्वक अभ्यासावेत जेणेकरुन महत्वाचा संदेश नजरेतून सुटणार नाही.
ले. कर्नल मायर्स....

मार्यसला सुरुवातीला हा सगळा वेडेपणा वाटला. म्हणजे एकाच संदेशावर हे आक्रमण केव्हा होणार हे ठरविण्याचा हा प्रकार त्याला फारसा रुचला नाही. पण १ जूनच्या रात्री त्याच्या माणसाने या संदेशाचा पहिला भाग पकडला होता. अगदी कॅनॅरिसने सांगितल्याप्रमाणे. तसे बीबीसीवरुन अनेक अर्थहीन संदेश प्रसारित व्हायचे. उदा.
‘‘ट्रोजन वॉर विल नॉट बी हेल्ड’’,
‘‘मळीचे भाव वाढल्यामुळे कोनॅकचे भाव चढे राहतील’’
‘‘जॉनच्या मिशा लांब आहेत’’.
त्या रात्री मात्र एक संदेश ऐकण्यात आला, तो होता,
‘आता काही व्यक्तिगत निरोप ! ‘‘लाँग सॉब्ज ऑफ द व्हायोलिन ऑफ ऑटम’’

हा संदेश प्रसारित होतानाच सार्जंट वॉल्टर राईशलिंगने त्याचा ध्वनिमुद्रक चालू केला व बाहेर धाव घेतली. मायर्सच्या कार्यालयात धापा टाकत तो पुटपुटला,

‘सर त्या संदेशाचा पहिला भाग आत्ताच प्रसारित होतोय !’

दोघे परत त्या रेडिओपाशी आले आणि मायर्सने ते ध्वनिमुद्रण परत ऐकले. कॅनॅरिसने सांगितलेल्या त्या संदेशाचा पहिला भाग प्रसारित केला गेला होता. ही ओळ फ्रान्सच्या पॉल र्व्हरलेन नावाच्या कवीच्या एका कवितेत होती. कॅनॅरिसच्या मते ही ओळ त्या संदेशाचा पहिला भाग म्हणून प्रसारित होणार होती. त्याचा दुसरा भाग असणार होता, ‘वुंड माय हार्ट विथ मोनोटॉनस लँगर’

कॅनॅरिसच्या मते ही दुसरी ओळ प्रसारित झाल्यावर अठ्ठेचाळीस तासात आक्रमणास सुरुवात होणार होती. पहिली ओळ ऐकल्यावर मायर्सने ताबडतोब पंधराव्या आर्मीच्या चिफ ऑफ स्टाफला, जनरल विल्यम हॉफमनला फोन लावला. ‘पहिला भाग आलेला आहे. काहीतरी होणार आहे हे निश्चित.’

हॉफमनने त्याच्या सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला. तोपर्यंत मायर्सने तो संदेश टेलिप्रिंटरवर हिटलरच्या मुख्यालयात पाठवून दिला. नंतर त्याने तो रुनस्टेडच्या मुख्यालयात व रोमेलच्या आर्मीग्रूप ‘बी’च्या मुख्यालयाला पाठविला. हिटलरच्या मुख्यालयात म्हणजे ओकेडब्ल्युमधे चिफ ऑफ ऑपरेशन, जनरल जोडलच्या हातात तो पडला. त्याने सतर्कतेचा इशारा दिला नाही कारण त्याला वाटले की रुनस्टेडने तो दिला असणार. रुनस्टेडने तो दिला नाही कारण त्याला वाटले की रोमेलच्या कार्यालयाने तो दिला असणार. रोमेलला या संदेशाबाबत माहिती असणार, पण त्याचा स्वत:चा अंदाज वेगळा असल्यामुळे त्याने याची विशेष दखल घेतली नाही. थोडक्यात त्या आख्ख्या किनारपट्टीवर फक्त पंधराव्या आर्मीलाच सतर्कतेचाच इशारा मिळाला. सातवी आर्मी जी नॉर्मंडीवर तैनात होती ती या संदेशाबाबत अनभिज्ञ होती ना तिला सतर्क राहण्याचा आदेश मिळाला.

२ व ३ जूनच्या रात्री संदेशाच्या पहिल्या भागाचे पुन:प्रसारण करण्यात आले. याच संदेशानंतर एका तासात वर उल्लेख केलेला, असोसिएटेड प्रेसचा संदेश प्रसारित झाला. मायर्सला हे माहीत होते की जर कॅनॅरिसने सांगितलेले बरोबर असेल तर हा दुसरा संदेश खोटा असला पाहिजे. त्याच्या दुर्दैवाने हा संदेश खरा होता व विचित्रपणे फुटला होता. त्या रात्री इंग्लंडमधे एक टेलिप्रिंटर चालक संदेश पाठविण्याचा वेग वाढविण्यासाठी सराव करत होता. काहीतरी गडबड झाली आणि त्याच्या सरावाची पट्टी रशियाला पाठविण्याच्या संदेशाला जोडली गेली. अर्थात चूक लगेचच लक्षात आली व दुरुस्तही करण्यात आली. पण तो संदेश प्रसारित झालाच.

सावरल्यावर मायर्सने कॅनॅरिसशी या बाबतीत पैजही लावली. पण त्याला थोडी काळजी वाटत होती. रात्र शांततेत गेल्यावर आता त्याला त्या संदेशाच्या दुसऱ्या भागाची वाट बघण्याशिवाय दुसरे महत्वाचे काम नव्हते. अर्थात तो कुठल्याही क्षणी येऊ शकत होता. मायर्स जेव्हा शांतपणे त्या संदेशाची वाट बघत होता त्याच वेळी जनरल रोमेल जर्मनीला परत जाण्याची तयारी करीत होता. सकाळी सात वाजता रोमेलची गाडी त्या गावातून पॅरिसच्या रस्त्याला लागली. तारीख होती ४ जून. त्याच्या शेजारच्या आसनावर एक कागदी पुठ्ठ्याचे खोके होते आणि त्यात हाताने तयार केलेले पाच नंबरचे सुंदर जोडे होते. जर्मनीला याच वेळी जायचे हेही एक कारण होते. सहा जूनला त्याच्या प्रिय पत्नीचा वाढदिवस होता व ते बूट त्याने खास तिच्यासाठी तयार करुन घेतले होते.

ब्रिटनमधे त्यावेळी सकाळचे ८ वाजले होते. पोर्टस्माऊथच्या जंगलात एका मोठ्या गाडीत दोस्तांचा सुप्रीम कमांडर जनरल ड्वाईट आयसेनहॉवर गाढ झोपेत होता. काल रात्री त्याला झोप अशी मिळालीच नव्हती. खरे तर तो दोनच मैलांवर असलेल्या नौदलाच्या साऊथविक हाऊस नावाच्या अलिशान इमारतीत राहू शकला असता पण त्याने ते नम्रपणे नाकारले होते कारण त्याला ज्या बंदरात त्याचे सैन्य बोटीत चढणार होते त्याच्या जास्तीतजास्त जवळ रहायचे होते.

जनरल ड्वाईट आयसेनहॉव्हर...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आयसेनहॉवरच्या लांबलचक साडेतीन टनी कॅराव्हॅनमधे त्याच्या तीन खोल्या कशाबशा बसविल्या होत्या. एकात त्याचे शयनगृह होते, एकात अभ्यासिका तर एकात उठण्याबसण्याची खोली. या ट्रेलरमधून आयसेनहॉवर दोस्तांच्या तीस लाख सैन्याचे आधिपत्य करत होता. त्या महाकाय सैन्यामधे अमेरिका, ब्रिटिश, कॅनडा, स्वतंत्र फ्रान्स,पोलंड चेक, बेल्जियम नॉर्वे व हॉलंड एवढ्या राष्ट्रांची सैन्यदले सामील होती. चारच महिन्यापूर्वी त्याची या पदावर नेमणूक करताना सर्व सैन्याच्या चिफ ऑफ स्टाफने अत्यंत अचूक व कमीतकमी शब्दात त्याच्या जबाबदारीचे वर्णन केले होते. ‘तुमच्या आधिपत्याखाली युनायटेड नेशन्सचे सैन्य युरोपमधे उतरेल. जर्मनीच्या मर्मस्थानी आघात करुन तिच्या सैन्यदलाचा नाश करेल.....’

आक्रमणाची तयारी गेले काही महिने चालू होती पण यावर विचार डंकर्कपासूनच चालू होता. आयसेनहॉवरची सर्वोच्चपदावर नेमणून होण्याआधीच इंग्लंड-अमेरिकेची एक तुकडी या आक्रमणाच्या योजनेवर काम करीत होती. तिचा प्रमुख होता ले. जनरल सर फ्रेडरिक मॉर्गन.

जनरल सर फ्रेडरिक मॉर्गन...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्यांच्या या सवीस्तर अभ्यासातच काही थोड्याफार सुधारणा झाल्या व आक्रमणाच्या योजनेचा शेवटचा मसुदा तयार झाला. या योजनेचे सांकेतिक नाव ठेवण्यात आले ‘ओव्हरलॉर्ड’. आयसेनहॉवरची त्या पदावर निवड झाल्यावर त्याने अधिक सैनिक, विमाने, रणगाडे, व इतर साहित्याची मागणी केली. यातून जी फौज तयार झाली तशी ना आत्तापर्यंत तयार झाली होती, ना यापुढे होईल.

आक्रमणाची योजना पूर्णत्वाला येण्याआधीच ब्रिटनमधे सामुग्री व सैन्य जमा होण्यास सुरुवात झाली. काहीच काळात तेथे इतके अमेरिकन सैनिक जमा झाले की किनाऱ्यालगतच्या गावांतून ब्रिटिश वंशाचे नागरिक अल्पसंख्यांक झाले. मे अखेरीस दक्षिण ब्रिटन एखाद्या महाकाय अस्त्राप्रमाणे भासू लागले. जंगलातून दारुगोळ्यांचे साठे दडविण्यात आले. गावागावातून लष्करी वाहनांची रीघ लागली होती. त्यांची संख्या पन्नास हजाराहून निश्चितच जास्त भरली असती. शेतातून हॉविट्झर व विमानविरोधी तोफांच्या रांगा लागल्या होत्या. सगळ्यात छाती दडपविवणारे दृष्य काय असेल तर १००० रेल्वेची इंजिने व २०,००० वॅगन्स तेथे जमा करण्यात आल्या होत्या. फ्रान्समधील उध्वस्त रेल्वेचे जाळे परत उभे करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार होता.
तयारी..युद्धासाहित्याचे एक उदाहरण...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दारुगोळ्याच्या पेट्या...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तोफा...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सामुग्रीत विचित्र दिसणारे काही साहित्यही होते. काही रणगाडे पोहू शकत होते तर काहींच्या पुढे हत्तीच्या सोंडेसारख्या लोखंडी साखळ्या लोंबकळत होत्या. हे रणगाडे या साखळ्या जमिनीत पुरलेले भूसुरुंग फोडण्यासाठी जमिनीवर आपटत असत. त्याच ठिकाणी दोन अवाढव्य तराफे उभे होते. त्यांचे नाव होते मलबेरी. ही छोटी बंदरेच होती. ही ओढून नेऊन नॉर्मंडीच्या जवळ समुद्रात उभी करायची योजना होती. यावर मोठी जहाजे त्यांचा माल उतरविणार होती व तेथून ती युद्धसामुग्री नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरविली जाणार होती. थोडक्यात हे पाण्यावरचे तरते अवाढव्य कार्यालय व गोदाम असणार होते. घरांच्या न संपणाऱ्या (निसेन हटस्) रांगातून व तंबूतून सैनिकांची व्यवस्था करण्यात आली होती. कधी कधी जेवणासाठी पाव मैल लांबीच्या रांगा लागत होत्या. मेच्या शेवटच्या आठवड्यात ही सगळी सामुग्री आणि सैनिक जहाजांवर चढविण्यास सुरुवात झाली. अखेरीस आक्रमणाची वेळ आली होती........

बुल्डोझरची रांग...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

(जर्मनीच्या सेनाधिकाऱ्यांना शत्रूला एवढे प्रचंड युद्धसाहित्य उतरविण्यास एखादे बंदर जवळपास लागणार व हल्ला त्यामुळे तशाच कुठल्यातरी ठिकाणी होणार असे वाटत होते. प्रत्यक्षात दोन मोठे कृत्रिम धक्के डेव्हॉनच्या बंदरातून नेऊन नॉर्मंडीजवळ समुद्रात बुडवून उभे करण्यात येणार होते. मार्टीन गिलबर्ट नावाचा इतिहासकार याबद्दल लिहितो, ‘त्यांना या दोन धक्क्यांसाठी (ज्यांची नावे मलबेरी ठेवण्यात आली होती) सहा लाख टन काँक्रीट व १५० लाख टन स्टील लागणार होते. ते बांधण्यासाठी २०,००० माणसे आठ गोद्यांमधे सतत कार्यरत होती.’ एक रबराची पाईपलाईन जिचे नाव ‘प्लुटो’ ठेवण्यात आले होते ती ‘आईल ऑफ वाईट’ पासून चेरबोर्गपर्यंत इंग्लिश चॅनेलच्या तळात टाकण्यात आली. याची लांबी होती ८० मैल व ती एकूण १७२० लाख गॅलन इंधनाचा पुरवठा करणार होती.

जर्मनीमधे एक माणूस मात्र असा होता की ज्याला दोस्तांचे सैन्य नॉर्मंडीमधे उतरणार याची खात्री प्रथमपासून होती. तो होता स्वत: हिटलर ! त्याने जनरल रुनस्टेडला अनेक वेळा इशारा दिला होता, ‘नॉर्मंडीकडे लक्ष ठेवा’. युद्ध संपल्यावर स्वत: रुनस्टेड व त्याचा चिफ ऑफ स्टाफ जनरल ब्लुमेंट्रीट या दोघांनीही इतिहासकार लिडेल हार्ट याच्याजवळ ही कबुली दिली. ब्लुमेंट्रीटने आठवणीत सांगितले की रुनस्टेडला हिटलरच्या कार्यालयातून सतत हा इशारा मिळत होता ‘फ्युररला नॉर्मंडीची काळजी वाटत आहे.’ हिटलरला असे का वाटत होते किंवा हिटलरने हा निष्कर्ष कशावरुन काढला होता हे त्या माणसांना कळत नव्हते पण लिडेल हार्ट म्हणतो तसे ‘या वेळेस हिटलरच्या अंत:प्रेरणेने सेनाधिकार्‍यांपेक्षाही अचूक भविष्य वर्तविले असे म्हणावे लागेल. त्याच्या या अंत:प्रेरणेचा नाहीतर सगळीकडे उपहासच होत असे.)

आयसेनहॉवर व त्याच्या अधिकाऱ्यांनी कमीतकमी मनुष्यहानी होईल व विजय मिळेलच याची काळजी घेऊन त्या योजनेची आखणी केली होती खरी पण आता प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्यांच्या हे लक्षात आले की ते एका बाबतीत कसलीही योजना आखू शकत नव्हते. ती गोष्ट होती हवामान. त्यांची सगळी गणिते व विजयाची आशा ही हवामानावर अवलंबून होती आणि निसर्गावर त्यांचा ताबा नव्हता. आता मात्र ४ जूनला ज. आयसेनहॉवरला शेवटचा अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा होता. आत्ता का नंतर ? यशापयश त्याच्या योग्य निर्णयावर अवलंबून होता व परिणामांची जबाबदारी सर्वस्वी त्याच्यावरच होती. एवढ्या मोठ्या योजनेचे त्याच्यावर किती दडपण असेल याचा आपण विचारच करु शकत नाही. दुर्दैव त्याचे की त्याच्यासमोर संभ्रमाची परिस्थिती उभी ठाकली होती. १७ मे ला त्याने ठरविले होते की आक्रमणाचा दिवस ५, ६ किंवा ७ जून असेल. हवामान खात्याने त्याला पाहिजे असलेले हवामान व वातावरण या तीन दिवसांपैकी कुठल्यातरी दिवशी असेल असे वर्तविले होते. उशीरा उगविणारा चंद्र व पहाटेची ओहोटी अशी त्याची गरज होती.

छत्रीधारी सैनिकांना, ग्लायडरमधून शत्रूच्या सैन्यापलिकडे उतरणारऱ्या ब्रिटिशांच्या सहाव्या एअरबोर्न डिव्हिजनच्या व अमेरिकेच्या १०१ व ८२ क्रमांकाच्या डिव्हिजन्सला थोडातरी चंद्रप्रकाश पाहिजे होता. या सैनिकांची संख्या काही थोडीथोडकी नव्हती. यात तब्बल २२००० सैनिकांना शत्रूच्या शिबंदीपलिकडे उतरायचे होते. पण अचानक हल्ला करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना तेथे पोहोचल्यावर थोडा काळोखही पाहिजे होता म्हणजे त्या दिवशी चंद्र उशीरा उगविणारा त्यांच्या हिताचे होते.

इकडे जे सैन्य किनाऱ्यावर उतरणार होते त्यांना रोमेलने उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ओहोटीच पाहिजे होती. ही ओहोटी केव्हा असणार आहे यावर आक्रमणाची वेळ ठरणार होती. एवढेच नाही तर नंतर येणाऱ्या सैन्यालाही उतरण्यासाठी ओहोटीच पाहिजे होती. आता हे कसे जमणार होते ते फक्त ‘तोच’ जाणे. या भरती, ओहोटी व चंद्रप्रकाशाच्या खेळात आयेसनहॉवरची भंबेरी उडाली. ओहोटीच्या गरजेमुळे त्या महिन्यात आक्रमणासाठी फक्त सहाच दिवस उरले आणि त्यातील तीन रात्री अमावस्या होती म्हणजे उरले तीन. हे एवढ्यावरच भागते तर ठीक होते. अजूनही बऱ्याच भानगडी होत्या. वाहतुकीच्या रेजिमेंटसना हे सगळे दिवसाढवळ्या करायचे होते कारण त्यांना सैन्यदल उतरविण्याच्या कामात चूक नको होती. शिवाय त्यांना समुद्रात शिरण्यावेळी बोटींच्या टकरींचीही काळजी वाटत होती. या असंख्य बोटी सीनच्या आखातात नांगरुन पडल्या होत्या व मुख्य समुद्रात शिरण्यावेळी त्यांच्यातील अंतर फार कमी असणार होते. शिवाय समुद्रात हलणाऱ्या बोटींमुळे सैनिक किनाऱ्यावर उतरण्याआधीच आजारी पडण्याची शक्यताही होतीच. ही यादी संपतच नव्हती. हवा किनाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारी हवी होती म्हणजे किनाऱ्यावर धूर साठणार नाही व लक्ष्ये अंधूक झाली नसती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहिल्या दिवसांनंतर दोस्तांच्या सैन्याला पुढील तीन दिवस शांत समुद्र पाहिजे होता, ज्या काळात सैनिकांचा व साहित्याचा प्रचंड पुरवठा करण्याची योजना होती.

अर्थात हवामानाच्या सगळ्या गरजा भागतील अशी भोळसट आशा आयसेनहॉवरच्या मुख्यालयात कोणालाच नव्हती. त्याला तर नाहीच नाही. या सगळ्यातून सुवर्णमध्य काढून तो क्षण निवडणे फार कठीण होते. हजारो सैनिकांचे जीव त्यावर अवलंबून होते. त्याच्या हवामानतज्ञांबरोबर असंख्य बैठकांमुळे तो स्वत:च जवळजवळ एक हवामान तज्ञ झाला होता असे म्हणायला हरकत नाही. परंतु त्याच्या तज्ञांनुसार या कमीतकमी गरजा भागविणारा दिवस मिळण्याची शक्यता जून महिन्यात तरी एकास दहा या प्रमाणात होती.

जे तीन दिवस प्राथमिक चाळणीतून मिळाले त्यातून आयसेनहॉवरने ५ जून ही तारीख निश्चित केली. या मागचे कारण साधे होते. जर ५ तारखेला हे नाही जमले तर त्याच्या हातात अजून एक दिवस होता. पण जर त्याने सहा तारीख मुक्रर केली असती तर कदाचित त्याला हे आक्रमण अमर्यादित काळासाठी पुढे ढकलायला लागले असते कारण परत आलेल्या जहाजांमधे इंधन भरण्यासाठी बराच काळ लागला असता. तसे झाले असते तर त्याच्यापुढे दोनच पर्याय उपलब्ध झाले असते एकतर पुढच्या ओहोटीला म्हणजे १९ जूनला हा कार्यक्रम पुढे ढकलणे. पण तेही शक्य नव्हते कारण त्या रात्री अमावस्या होती व आकाशातून उतरणाऱ्या सैन्याला अंधारात उतरावे लागले असते व त्यात जास्त हानी होण्याची शक्यता होती. दुसरे म्हणजे आक्रमण जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलायचे पण त्याने तो विचार निग्रहाने झटकून टाकला. योजना पुढे ढकलण्याची धास्ती एवढी होती की जे कमांडर्स अजिबात धोका पत्करायला तयार नव्हते त्यांनीही ७ किंवा ८ जून चालेल असा निर्वाळा दिला. अधिकाऱ्यांना तीन साडेतीन लाख सैनिकांना, ज्यांना त्यांच्या जबाबदारीची व कामगिरीची पूर्ण कल्पना देण्यात आली होती, त्यांना एका जागी नुसते थांबवून ठेवण्याची कल्पनाही असहाय्य वाटली. शिवाय मग ती योजनाही गुप्त राहिली असती की नाही ही शंका होतीच. सगळ्यांना आक्रमण पुढे ढकलण्याची कल्पना अशक्य वाटत होती पण शेवटी निर्णय आयसेनहॉवरला घ्यायचा होता. रविवारी, म्हणजे ४ जूनला पहाटे चार वाजता, ज्यावेळी रोमेल तिकडे, त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी उठला होता, त्याच वेळी आयसेनहॉव्हरने तो निर्णय घेतला. ‘अयोग्य हवामानामुळे आक्रमण चोवीस तासाने पुढे ढकलण्यात आले आहे. ते आता ६ जूनच्या रात्री होईल.’

त्याच रविवारच्या पहाटे युद्धनौका कोरीचा कमांडर जॉर्ज हॉफमन त्याच्या डेकवरुन दुर्बिणीतून समुद्र न्याहाळत होता. इंग्लिश चॅनेलमधून जहाजांचा व युद्धनौकांचा लांबलचक ताफा शांतपणे पाणी कापत आपल्या लक्ष्याकडे चालला होता. त्याने आपल्या मनगटावरील घड्याळात पाहिले. सगळे वेळेबरहुकूम चालले होते. फ्रान्सचा किनारा आता फक्त चाळीस मैल दूर होता. त्याचे वय फक्त ३३ होते व त्याला या वयात ताफ्यांचे आधिपत्य करण्याची जबाबदारी मिळाली आहे याचा विलक्षण अभिमान वाटत होता. अर्थात हा सर्व ताफा शत्रूच्या विमानांच्या तावडीत सापडल्यास त्याची लंगडतोड होण्यास वेळ लागला नसता व त्याची जाणीव त्याला होती. त्या ताफ्यात सगळ्यात पुढे होत्या सुरुंग काढणाऱ्या नऊ युद्धनौका. त्या तिरक्या रेषेत मार्गक्रमण करीत होत्या. त्याच्या मागे होत्या संरक्षण करणाऱ्या युद्धनौका. त्याच्या मागे दृष्टी पोहोचेपर्यंत किनाऱ्याला लागणाऱ्या बोटींच्या न संपणाऱ्या रांगा दिसत होत्या. त्यात होते असंख्य सैनिक, त्यांच्या गाड्या, हत्यारे, रणगाडे, तोफा व दारुगोळा. फार विलक्षण दृष्य होते ते. तो सगळा प्रकार इतका अवाढव्य होता की त्या रांगेचे शेवटचे टोक अजूनही प्लायमाऊथ बंदरात असणार याची हॉफमनला खात्री होती आणि हा एक ताफा होता असे अनेक ताफे इंग्लंडच्या बंदरातून निघणार होते. त्या रात्री ती सर्व जहाजे सीनच्या आखातात जमा होणार होती व ५ जूनच्या सकाळी हे २७०० बोटींचे आरमार नॉर्मडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असणार होते.

तेवढ्यात कॉरीच्या ब्रिजवरील दूरध्वनी खणाणला. हॉफमनने तो घेतला.
‘ब्रिज ! कॅप्टन !’..........

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३

इतिहासकथालेख

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

24 Jun 2015 - 10:24 am | अनुप ढेरे

जबहरी!!!
मस्तं लिहिलय!

छत्रीधारी सैनिकांना, ग्लायडरमधून शत्रूच्या सैन्यापलिकडे उतरणारऱ्या ब्रिटिशांच्या सहाव्या एअरबोर्न डिव्हिजनच्या व अमेरिकेच्या १०१ व ८२ क्रमांकाच्या डिव्हिजन्सला थोडातरी चंद्रप्रकाश पाहिजे होता. या सैनिकांची संख्या काही थोडीथोडकी नव्हती. यात तब्बल २२००० सैनिकांना शत्रूच्या शिबंदीपलिकडे उतरायचे होते. पण अचानक हल्ला करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना तेथे पोहोचल्यावर थोडा काळोखही पाहिजे होता म्हणजे त्या दिवशी चंद्र उशीरा उगविणारा त्यांच्या हिताचे होते.

या हंड्रेड एंड फस्ट एअर बोर्न डिव्हिजनवर टीव्ही सिरीजही बनली आहे. टॉम हँक्सने बनवलेली. बँड ऑफ ब्रदर्स म्हणून.

खेडूत's picture

24 Jun 2015 - 10:25 am | खेडूत

आवडला !

नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण .

चित्रांमुळे अजूनच रोचक झालाय .

पुभाप्र....

एस's picture

24 Jun 2015 - 10:36 am | एस

पुभाप्र.

साधा मुलगा's picture

24 Jun 2015 - 10:40 am | साधा मुलगा

मस्त लेखमाला , कृपया पहिल्या धाग्याचा दुवा द्या.
saving private ryan ची सुरुवातच या लढाईने होते, स्पिएल्बेर्गने त्याचे अप्रतिम सादरीकरण केले आहे.
एक शंका, रोमेल हा आफ्रिकेतील युद्धात पकडला गेला होता ना? तो D-DAY ला कसा प्रकट झाला? का हा रोमेल वेगळा आहे?
पु.भा.प्र.....

बापरे!! इतके बारकावे असतात हे असे लेख वाचल्याशिवाय कधीच समजले नसते.
"क्रमशः" अगदी उत्कंठावर्धक ठिकाणी टाकले आहे.
पुभाप्र.

आदूबाळ's picture

24 Jun 2015 - 11:17 am | आदूबाळ

जबरी! पु भा ल टा.

रोमेल आफ्रिकेत पकडला गेला नव्हता. आफ्रिका कॉर्प्सची वाताहत होत असतानाच त्याची बदली इटलीत झाली होती.

साधा मुलगा's picture

24 Jun 2015 - 11:38 am | साधा मुलगा

net वर त्याची सगळी गोष्ट वाचली. आता सगळा उलगडा झाला.
कारण एका पुस्तकात मी असे वाचले होते, कि रोमेलच्या driver ने चुकून त्याची गाडी दोस्त सैन्याच्या तळावर नेली आणि रोमेल दोस्तांच्या हाती लागला , त्यामुळे रोमेल वि. montgomeri हि लढत जगाला बघयला मिळाली नाही. आणि त्यामुळेच पुढे जर्मन सैन्य आफ्रिकेत हरले नाहीतर दोस्तांचा रोमेल द डेसर्ट फोक्स समोर निकाल लागला असता.
असो, रोमेल सारखा सेनानी नॉर्मंडीत असून देखील दोस्त सैन्य जिंकले याचे अप्रूप वाटते, अर्थात त्यांना तेवढी किंमतही मोजावी लागली.

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 11:52 am | जयंत कुलकर्णी

///दोस्तांचा रोमेल द डेसर्ट फोक्स समोर निकाल लागला असता//////
हे अशक्य होते.

प्रसाद१९७१'s picture

24 Jun 2015 - 11:24 am | प्रसाद१९७१

जयंत साहेब - एक कोडे कायमच पडलेले. आफ्रीके मधुन युरोप आणि जर्मनीवर आक्रमण करणे जास्त सोप्पे आणि नक्कीच कमी मनुष्यहानीचे असताना, अमेरिका आणि इंग्लंड नी नॉर्मंडीवरुन का सुरुवात केली?

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 3:08 pm | पद्मावति

मित्र राष्ट्रांमधे इंग्लेंड आणि अमेरिकेत नेमके याच गोष्टीवर आधी एकमत नव्हते. इंग्लेंड ला तुम्ही म्हणता तसेच नॉर्थ आफ्रिकेतूनच हल्ला करायचा होता. हिटलर च्या अट्लॅंटिक वॉल ने स्पेन च्या सीमेपासून सबंध कॉंटिनेंटल युरोप आणि scandenevia जवळजवळ अभेद्य करून टाकला होता. खासकरून फ्रॅन्स चा समुद्र किनारा. अशावेळी फ्रॅन्स मधून हमला करणे जरा अती धाडसाचे काम होते. कुणी असा विचार करणे पण अशक्य होते. आणि नेमका हाच विचार अमेरिकेने केला. Element of surprise साधून सराळसरळ अक्रॉस ते चॅनेल हल्ला करण्याचा प्लान ठरवीला गेला.
अजुन एक विचार असाही होता की जर दूरवरून म्हणजे स्पेन, आफ्रिकेतून हा हमला केला असता तर जेवढे भौगोलिक अंतर अधिक तेवढेच प्लान, जहाजं डिटेक्ट होण्याची शक्यता अधिक.
नॉर्मंडी इंग्लेंड च्या जवळ असल्यामुळे सैन्याच्या mobilization च्या दृष्टीने पण सोयीचे. तसेच माघार घ्यावी लागली तर ती यशस्वी माघार ठरण्याची संभावता जास्ती कारण पुन्हा तेच, भौगोलिक proximity.

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 11:29 am | जयंत कुलकर्णी

तुम्ही मला हा प्रश्न मागेही एकदा विचारला होता. काही लोकांचे म्हणणे असे आहे हे खरेच. कित्येक जपानी युद्धनिती तज्ञांचेही असे म्हणणे होते, पण त्याविसयी परत कधीतरी.....

पहिला राजा's picture

24 Jun 2015 - 2:54 pm | पहिला राजा

जयंत साहेब - मस्त लेखमाला , कृपया पहिल्या धाग्याचा दुवा द्या

मधुरा देशपांडे's picture

24 Jun 2015 - 3:09 pm | मधुरा देशपांडे

पहिल्या भागाचा दुवा लेखात दिला आहे.

पैसा's picture

8 Jul 2015 - 9:18 am | पैसा

थरारक प्रकरण!