नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Jul 2015 - 6:31 pm

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ६

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पेम्सेल डॉलमानची वाट पहात असतानाच ८४ कोअरने परत एक बातमी पुरविली, ‘छत्रीधारी सैनिक माँटेबोर्ग व मारकौफपाशी उतरले आहेत व आमच्या सैनिकांशी त्यांच्या चकमकी झडत आहेत.’

हा फोन झाल्या झाल्या जनरल पेम्सेलने त्वरित रोमेलचा चिफ ऑफ स्टाफ जनरल डॉ. हॅन्स स्पायडेलला या आक्रमणाची कल्पना दिली. ही आर्मी ‘ग्रुप बी’ जर्मनीची सगळ्यात जास्त ताकदवान सेना होती. या आर्मीला सावधान करणे फार महत्वाचे होते.

पहाटे अडीच वाजता जनरल जोसेफ रायशर्टच्या ७११ डिव्हिजनने त्यांच्या मुख्यालयाला म्हणजे १५व्या आर्मीच्या मुख्यालयाला बातमी दिली की चेबोर्गजवळही असंख्य छत्रिधारी सैनिक उतरले आहेत. १५ च्या आर्मीच्या प्रमुखाने म्हणजे जनरल हॅन्स फॉन सालमुथने रायशर्टला फोन करुन प्रत्यक्ष जागेवरचा अहवाल सादर करण्यास सांगितले, ‘अरे काय चालले आहे तिकडे मला कळेल का काही ?’

उत्तरादाखल रायशर्ट म्हणाला,
‘मला परवानगी दिलीत तर तुम्हाला प्रत्यक्षच ऐकवतो !’ असे म्हणून त्याने तो फोन खिडकी बाहेर धरला ज्यावर मशिनगनचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते.
‘धन्यवाद !’ असे म्हणून सालमुथने फोन खाली आदळला. त्यानेही लगेच ‘आर्मी ग्रुप बी’च्या मुख्यालयाला फोन लावला.

रोमेलच्या मुख्यालयात मोठे विचित्र व गोंधळाचे वातावरण पसरले होते. सगळीकडून परस्परविरोधी बातम्या येत होत्या. लुफ्तवाफच्या पॅरिसमधील मुख्यालयाने सांगितले की शत्रूची ४० ते ६० विमाने चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर येत आहेत व काही छत्रिधारी सैनिक काँच्या आसपास उतरले आहेत. अॅसडमिरल थिओडॉरने ब्रिटिश छत्रिधारी सैनिक उतरले आहेत याला दुजोरा देताना सांगितले की काही ठिकाणी छत्रीला गवताच्या बाहुल्याही बांधलेल्या होत्या. काहीच मिनिटात लुफ्तवाफने बेयूपाशीही सैनिक उतरले असल्याची बातमी दिली. पण तेथे खरे पाहता एकही सैनिक उतरला नव्हता. पण सगळ्या अहवालात छत्रीला लटकणाऱ्या बाहुल्या टाकण्यात आल्या होत्या ही बाब समान होती.

ही बाहुल्यांची गोष्ट मात्र खरी होती. दोस्तांच्या सैन्याने अशा अनेक रबरी बाहुल्या नॉर्मंडीच्या युद्धक्षेत्रात टाकल्या होत्या. या पडल्यानंतर त्यांचा स्फोट व्हायचा व त्यातून मशीनगनचा आवाज यायचा. या बाहुल्या किनार्याच्या विरुद्ध बाजूला जर्मनसेनेच्या पलिकडे टाकण्यात आल्या होत्या जेणेकरुन जनरल मार्क्सला हल्ला पाठीमागून होतो आहे असे वाटेल व तो त्याचे सैन्य त्या दिशेला पाठवेल व किनाऱ्यावर त्याचे सैन्य एकवटणार नाही. या बाहुल्याचे नाव त्यांनी रुपर्ट ठेवले होते.

रुपर्ट...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रोमेलच्या मुख्यालयात रोमेलचे अधिकारी हताशपणे नकाशावरील लाल ठिपक्यांचा अभ्यास करीत परिस्थितीचे आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी विचारपूर्वक आक्रमण कुठून होते आहे याचा अंदाज बांधला. जे होत होते त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेला अंदाज खरोखरीच हास्यास्पद होता. जनरल रुनस्टेडच्या हेरखात्याच्या प्रमुखाने, मेजर डोर्टेनबॅकने त्यांना (आर्मी ग्रूप बी) ला दूरध्वनी केला तेव्हा त्याला सांगण्यात आले, ‘चिफ ऑफ स्टाफने सगळ्या बातम्यांची छाननी करुन असा निष्कर्ष काढला आहे की ते छत्रीधारी बहुदा विमानांच्या अपघातातून वाचलेले वैमानिक असावेत.’ पण सातव्या आर्मीला तसे निश्चितच वाटत नव्हते. तीन वाजता पेम्सेलने रोमेलच्या चिफ ऑफ स्टाफला, म्हणजे स्पायडेलला फोन करुन सांगितले की नौदलाच्या चेरबोर्ग येथील यंत्रणेने समुद्रावर नेहमीपेक्षा जास्त आवाज टिपला आहे. स्पायडेलने उत्तर दिले, ‘काहीतरी स्थानिक आवाज असेल. त्याला सध्यातरी आक्रमण म्हणता येणार नाही.’

जनरल पेम्सेल व स्पायडेल बोलत असताना दोस्तांच्या १८००० सैनिकांपैकी शेवटचा पॅराट्रूपर विमानातून बाहेर उडी मरत होता व सत्तर ग्लायडर सैनिक व अवजड युद्धसामग्री घेऊन नॉर्मंडीच्या दिशेने उडत होती तर दोन नौका सैनिक भरुन ओमाहाच्या किनाऱ्यावर उतरण्यासाठी तयार होत्या. हे सैनिक पहिला हल्ला चढविणार होते.

त्या रात्री सगळ्यात गोंधळाची परिस्थिती होती जर्मनीच्या २१व्या पँझर डिव्हिजनच्या १६२०० जवानांमधे. ही डिव्हिजन रोमेलच्या जगप्रसिद्ध आफ्रिका कोअरचा एक भाग होती. हे सैनिक अत्यंत कडवे व युद्धाचा अनुभव असलेले होते.

अनुभवी सैनिक ही कुठल्याही सैन्याची जमेची बाजू असते. कारण रक्त वाहताना पाहण्याची सवय असावी लागते. येरागबाळ्याचे ते काम नव्हे. त्याला त्या अनुभवातुनच जावे लागते. शिवाय हे सैनिक नवीन सैनिकांना ऐन युद्धातही शिकवीत असतात जे त्यांना कुठल्याही प्रशिक्षणात शिकवलेले नसते.

काँपासून २५ मैलांवर भूभागावर असलेल्या प्रत्येक खेडेगावात, जंगलात हे सैन्य व त्यांचे रणगाडे चिलखती गाड्या खचाखच भरल्या होत्या. त्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला होता. रणगाड्यांची इंजिने चालू ठेऊन ते बाहेर पडायचा आदेश मिळण्याची मोठ्या आतुरतेने वाट पहात चडफडत बसले होते.

काही मैलांवर लुफ्तवाफचा कर्नल प्रिलर मद्यपान करुन झोपला होता. फोनच्या आवाजाने महाशयांना अर्धवट जाग आली. दुसऱ्या टोकाला फायटर कोअमधून फोन होता. ‘प्रिलर’ त्याचा ऑपरेशन ऑफिसर म्हणत होता, ‘आक्रमण होणार आहे, किंवा होत आहे अशी बातमी आहे. तू तुझ्या विमानांना व वैमानिकांना सज्ज राहण्यास सांग’ प्रिलरने जे उत्तर दिले ते येथे लिहिण्यासारखे नाही. त्याने सगळ्या लुफ्तवाफच्या हाय कमांडचा शिव्या घालून उद्धार केला व म्हणाला, ‘कोणाला सांगू मी तयार रहायला ? मीच एकटा येथे केव्हाचा सज्ज होऊन बसलो आहे. आणि तुम्हाला हेही चांगले माहीत आहे की येथे फक्त दोनच विमाने आहेत’एवढे बोलून त्याने तो फोन जोरात आपटला.

हे सगळे होईपर्यंत किनाऱ्यावर पहिली कुमक येऊन पोहोचली होती. ब्रिटिशांच्या विभागात ६९ ग्लायडर्स उतरली ज्यातील ४९ रॅनव्हिलेजवळ अचूक ठरलेल्या ठिकाणी उतरली होती. घायाळ सैनिकांची संख्या तुलनेने फारच कमी होती पण त्या जागेवर ग्लायडर्सच्या तुटलेल्या अवशेषांचा खच पडला होता.

विमानांच्या मागे बांधून आणलेल्या या ग्लायडर्समधे ६-एअरबोर्न डिविजनचा कमांडर मेजर जनरल रिचर्ड गेल त्याच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर नॉर्मंडीवर आला. त्याच्या बरोबर असंख्य सैनिक व युद्धसाहित्य आणले गेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ग्लायडर्समधून रणगाडाविरोधी अस्त्रे आली. ही पँझर रेजिमेंटविरुद्ध अत्यंत आवश्यक होती.

ग्लायडरमधून उतरणाऱ्या सैनिकांना त्यांचे स्वागत धुवांधार गोळीबाराने होईल असे वाटले होते पण त्यांना तेथे एखाद्या शेतात दुपारी शांतता असते तशी शांतता आढळली. या थंड स्वागताने ते आश्चर्यचकितच झाले. एका होर्सा विमानाचा वैमानिक, जॉन हर्टलेला वाटले होते त्यांचे स्वागत तोफांनीच होईल. तो त्याच्या सहवैमानिकाला म्हणाला देखील, ‘जमिनीवर आपटल्या आपटल्या धावत सूट व आडोसा शोध.’ पण तसे काहीच झाले नाही. फक्त दूरवर मशीनगनचा आवाज येत होता. त्या जागेवर आता मोठीच गडबड उडाली. सगळे सैनिक विखुरलेले साहित्य गोळा करुन सुरक्षित जागी नेण्याचा प्रयत्न करीत होते व मुख्य म्हणजे रणगाडाविरोधी तोफा गाड्यांच्या मागे जोडण्यात गर्क होते. काहीजणांच्या चेहऱ्यावर तर ग्लायडरचा प्रवास संपला म्हणून आनंदही दिसत होता. हर्टले आणि त्याच्या विमानातील काही सैनिकांनी विमानाच्या तुटलेल्या एका विमानाच्या केबीनमधे मुक्काम ठोकला व कूच करण्याआधी कॉफी व धुम्रपानाचा आनंद लुटला.

(अमेरिकेचे जे छत्रीधारी सैनिक उतरणार होते त्यांच्याकडे पायदळाच्या सैनिकापेक्षाही जास्त युद्धसाहित्य होते. या प्रत्येक सैनिकाकडे अंगावर उडी मारायचा पोषाख, हेल्मेट, मुख्य पॅराशूट व आणिबाणित लागणारी पॅरॅशूट, बूट, हातमोजे, प्रत्यक्ष लढाईत वापरायचा पोषाख, जीवरक्षक जॅकेट, .४५ कोल्ट पिस्तुल, ब्राऊनिंग स्वयंचलित रायफल, यांना लागणारा दारुगोळा, सुर्‍या, प्रथमोपचाराचे साहित्य, अन्न, ब्लँकेट, मोजे व अंतर्वस्त्रे एवढे सामान होते. पहिल्या कॅनेडियन पॅरॅशूट बटालियनच्या ‘सी’ कंपनीचा कॉर्पोरल डॅन हॅरिंग्टन याने आठवणीत सांगितले,
‘आम्ही नखशिखांत दारुगोळ्यांनी व शस्त्रांनी लगडलेले होतो. काय नव्हते आमच्याकडे ? हातबाँब, गॅमन बाँब, बँगलोर टॉरपेडो, दोन इंची उखळी तोफांचे गोळे, बंदुका व पाण्याच्या बाटल्या. आमचे अंग आम्ही कोळशाने रंगवले होते. आमच्या हेल्मेटवरच्या छद्मावरणाच्या जाळीला चिंध्या लटकवलेल्या होत्या तर हेल्मेटमधे वरच्या बाजूला आम्ही प्लास्टिक बाँब किंवा सिगारेटस कोंबलेल्या होत्या.’)

पण सगळ्यांच्याच नशिबी असे भाग्य नव्हते. सहाव्या एअरबोर्न डिविजनच्या नवव्या बटालियनवर मशिनगनचा प्रखर मारा झाला. जर्मनीच्या मरव्हिले (स्वोर्डबीच ज्या तोफेच्या माऱ्यात येत होते तो किनारा) येथील तोफखान्याच्या भोवती असलेल्या काटेरी तारा व भूसुरुंगाच्या जाळ्यात हे सैनिक अडकले व तेथे मोठा गंभीर प्रसंग ओढविला. याचा प्रमुख होता ले. कर्नल टेरेन्स ऑटवे. त्याची हल्ल्याची काळजीपूर्वक आखलेली योजना धुळीस मिळाल्यात जमा होती. योजनेप्रमाणे १०० लॅकॅस्टर विमाने त्या तोफखान्याला ४००० पौंडी बाँब टाकून भाजून काढणार होती. मागोमाग ग्लायडरने रणगाडाविरोधी अस्त्रे, तोफा, फ्लेम थ्रोअर्स, अॅ्ल्युमिनियमच्या शिड्या असे साहित्य त्यांच्या येथे पोहोचणार होते. हे साहित्य हातात आल्यावर ऑटवेची माणसे त्या तोफखान्यावर हल्ला चढवून तो ताब्यात घेणार होती. त्याच वेळी काही ग्लायडर्स त्या तोफखान्यावरच उतरणार होती. पण ही योजना होती...कुठलेही विमान आले नाही व कोणीही बाँब टाकले नाहीत. जी ग्लायडर्स अवजड युद्धसाहित्य घेऊन येणार होती ती बेपत्ता झाली. ऑटवेची ७०० सैनिकच इतके विखरुन पडले होते की आत्ता त्याच्याजवळ फक्त त्यातील १५० सैनिकच जमा झाले होते आणि या सैनिकांकडे होत्या फक्त त्यांच्या अॅसॉल्ट रायफल्स. हातबाँब, स्टेनगन, बँगलोर टॉरपेडो असे थोडेफार साहित्यही होते. सगळ्यांमधे मिळून एकच हेवी मशीनगन तेथे पोहोचली होती.

या सगळ्या अडचणींवर मात करत ऑटवेच्या सैनिकांनी त्या तारा कापून जमिनीखाली बँगलोर टॉरपेडोज घुसवले होते तर एका प्लाटूनने पुरलेले भूसुरुंग निकामी करण्यात यश मिळविले. हातापायांवर रांगत, चंद्राच्या प्रकाशात ते हळुहळु त्या तोफांच्या दिशेला सरकत होते. बाँबफेकीमुळे झालेल्या खड्ड्यातून हे दीडशे सैनिक लपून हल्ला चढविण्याच्या आदेशाची आतूरतेने वाट पहात होते.

जी ग्लायडर त्या तोफखान्यावरच उतरणार होती ती त्यांच्या डोक्यावरुन जात होती पण उतरत नव्हती कारण ते खालून जो फ्लेअर उडणार होता त्याची वाट बघत होती. ऑटवेकडे ना तो रंगीत फ्लेअर होता ना तो उडविण्यासाठी उखळी तोफ. बिचारा हताशपणे ती ग्लायडर त्यांच्या डोक्यावरुन उडत जाताना पहात राहिला. वरही त्या ग्लायडरचे वैमानिका खालून उडणाऱ्या खुणेची वाट बघत होते. ती घिरट्या घालत असतानाच जर्मन तोफखाना धडधडू लागला. ज्या मशिनगनच्या माऱ्याने ऑटवेच्या सैनिकांना वर मान काढून दिली नव्हती, त्या आता ग्लायडर्सकडे वळल्या. ग्लायडरच्या कॅनव्हासच्या आवरणामधून गोळ्या व जर्मन ट्रेसर घुसत होते. आत काय होत असेल याची ऑटवेला कल्पना होती. ते बघून त्याच्या सारख्या कसलेल्या सैनिकाच्या डोळ्यातही अश्रू तरळले. पण दुर्दैवाने तो काहीच करु शकत नव्हता. खालून काहीच संदेश न मिळाल्यामुळे ग्लायडर्सने तो नाद सोडला. त्यातील एक चार मैलावर उतरले तर एक इतक्या खाली आले की खाली असलेल्या सैनिकांना आता ते तोफखान्यावर आदळणार असे वाटले. शेवटच्या क्षणी त्या ग्लायडरचे नाक वर करण्यात त्या वैमानिकाला यश मिळाले असावे व जवळच असलेल्या झाडीत कोसळले. ऑटवेला आता कोणाची वाट बघायची नव्हती. त्याने हल्ल्याचा आदेश दिला,

‘चला सैनिकहो या तोफा आपल्याला काबीज करायच्या आहेत ! त्या आपणच घेणार आहोत’आणि त्या दीडशे सैनिकांनी त्या हल्ल्यात स्वत:ला झोकून दिले.

बँगलोर टॉरपेडोंचे कानठळ्या बसविणारे आवाज झाले आणि त्या तारांच्या कुंपणांना ठिकठिकाणी भगदाडे पडली तर काही ठिकाणी त्या तारा चक्क वितळल्या. ते बघून ले. डॉउलिंग ओरडला, ‘चला, चला पुढे चला !’ ऑटवेच्या जवानांनी त्या गुदमरवण्याऱ्या धुरातून व तुटलेल्या तारांतून पुढे धाव घेतली. त्यांच्यापुढे त्या कुंपणाच्या आत सुरुंग पेरलेले होते, काही मशीनगनची ठाणी होती. ते त्या रिकाम्या जागेत धाव घेणार तेवढ्यात आकाशात लाल रंग पसरला व पुढे असलेल्या सैनिकांवर मशीनगनच्या फैरी आदळल्या. काहीजण जागेवरच गारद झाले. उरलेल्यांनी परत धाव घेतली. सुरुंगांचे स्फोट होत होते व सैनिकांच्या चिंध्या आकाशात उडत होत्या. त्यातच धावणाऱ्या मॉवर नावाच्या सैनिकाला कोणीतरी ओरडले, ‘थांबा ! थांबा ! सगळीकडे सुरुंग पेरलेले आहेत !’.

मॉवरच्या उजव्या बाजूला एक जखमी झालेला कॉर्पोरल जोरजोरात एका सैनिकावर ओरडत होता, ‘माझ्या जवळ येऊ नकोस ! माझ्या जवळ येऊ नकोस !’ आरडाओरडा व किंकाळ्यांनी वातावरण भरुन गेले होते. खंदका खंदाकातून हातघाईची लढाई पेटली होती. संगिनी व चाकू मुक्त हस्ते चालवले जात होते.

लंडनचा एक सैनिक ज्याचे नाव होते सिडने कॅपॉन, त्याने असाच एका खंदकावर हल्ला चढविला. अचानक त्याच्यासमोर दोन जर्मन सैनिक उभे ठाकले. त्याच्यातील एकाने प्रथमोपचाराच्या पेटीसकट हात वर केले. त्यावरची लाल फुली कॅपॉनला अजुनही आठवते. त्यांनी शरण जाण्याची याचना केली. त्याला त्यांचे काय करावे ते कळेना. तेवढ्यात त्याला काही सैनिक युद्धकैद्यांना घेऊन जाताना दिसले. त्या दोघांना त्यांच्या ताब्यात देऊन त्याने परत आपल्या लक्ष्यावर धाव घेतली. त्या तेथे ऑटवे व ले. डॉउलिंग व त्याचे चाळीस एक सैनिक जर्मनांचा प्रखर विरोध मोडून काढत होते. जे सैनिक खंदकातून आता बाहेर पडले होते ते त्या बंकरच्या भोवती घिरट्या घालत होते व जेथे झरोके दिसतील त्यात हातबाँब फेकत होते.

स्टेनगननेही त्यांनी बरेच जर्मन सैनिक यमसदनात पाठविले पण खरे नुकसान हातबाँबनेच झाले. फारच भयंकर दृष्य होते ते. सगळ्यांनाच युद्धौन्माद चढला होता. मॉवर, हॉकिन्स नावाचा एक सैनिक व एक ब्रेनगनर यांनी त्या गोळ्यांच्या वर्षावात त्या बंकरच्या एका बाजूला धाव घेतली तर त्यांना तेथे एक दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत उड्या मारल्यावर त्यांना तेथे एक जर्मन सैनिक मरुन पडलेला दिसला. तेथेच एका कट्ट्यावर एक तोफ शांत पडली होती व शेजारीच त्याचा दारुगोळा पडला होता. आता बाकी कोणीच नव्हते. त्या तिघांनी तो बंकर उडवून द्यायचा विचारविनिमय केला पण त्यांच्यावर ती वेळ आली नाही कारण तेवढ्यात एक जबरदस्त स्फोट झाला. तो ब्रेनगनर जागेवरच ठार झाला. हॉकिन्सच्या पोटात छर्रे शिरले तर मॉवरच्या पाठीत. त्याला त्याची पाठ कोणीतरी सोलते आहे असा भास झाला. त्याचा त्याच्या पायावर ताबा राहिला नाही. ते लटपटायला लागले. तो आता मरणार याची त्याला खात्री वाटू लागली पण त्याला मरायचे नव्हते. तो मदतीसाठी धावा करु लागला. काही हाका त्याने चक्क त्याच्या आईला मारल्या.

तोफखान्याच्या आसपास असलेल्या शिबंदीतून जर्मन सैनिक मुंग्या जशा वारुळातून बाहेर येतात तसे एकमेकाला ढकलत हात डोक्यावर घेऊन बाहेर येत होते. त्यांची शरणागती पत्करावी म्हणून ते अक्षरश: भीक मागत होते. डॉउलिंगच्या तुकडीने स्फोट घडवून सगळ्यात मोठ्या तोफेच्या चिरफाळ्या उडविल्या व इतर दोन नादुरुस्त केल्या. ती महत्वाची कामगिरी पार पडल्यावर ले. डॉउलिंगने कर्नल ऑटवेला शोधून काढले. त्याला एक सॅल्युट मारुन त्याने त्याच्या कामगिरीचा अहवाल दिला, ‘आदेशानुसार तोफा ताब्यात घेण्या आल्या आहेत ! कामगिरी फत्ते !’ हे सांगतान त्याने त्याचा रिकामा हात त्याच्या छातीवर दाबून धरला होता. हा अहवाल देऊन तो परत पुढच्या कामगिरीवर रवाना झाला. काही वेळाने कर्नल ऑटवेला डॉउलिंगचा मृतदेह सापडला. अहवाल देतानाच तो मरणार आहे हे त्याच्या लक्षात आले असणार.

ऑटवेने दमछाक झालेल्या त्याच्या सैनिकांना त्या तोफखान्याच्या भागातून पुढे नेले. त्याच्या सैनिकांपैकी निम्मे गारद झाले होते तर जर्मनीच्या एकूण २०० सैनिकांपैकी १७८ गारद झाले होते. गंमत म्हणजे ज्या तोफांसाठी या सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले होते त्या तोफा बऱ्याच कमी ताकदीच्या होत्या. जर्मन सेना त्या चार दिवसांनी काबीज करुन परत चालूही करणार होते. पण आत्ता तरी त्यांचा आवाज बंद करण्यात ऑटवेच्या सैनिकांना यश मिळाले होते.

जे जखमी झाले होते त्यांना तेथेच ठेऊन पुढे जाणे क्रमप्राप्त होते कारण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑटवेकडे औषधेच नव्हती ना वाहतुकीची साधने. मॉवरला एका फळीवरुन युद्धभूमीवरुन हलविण्यात आले. हॉकिन्सची परिस्थिती फारच गंभीर असल्यामुळे त्याला हलविण्याचा प्रश्नच नव्हता. मॉवरच्या शरिरात सत्तावन्न छर्रे शिरले होते. मॉवरने नंतर आठवणीत सांगितले की जेव्हा त्याला हलवित होते तेव्हा त्याला हॉकिन्सच्या करुण हाका ऐकू येत होत्या, ‘मला सोडून जाऊ नका. मला सोडून जाऊ नका !’नंतर तो आवाज अस्पष्ट होत गेला कारण त्याचीच शुद्ध हळुहळु हरपत होती.

पहाट फटफटली. १८००० सैनिकांपैकी जे वाचले होते ते या पहाटेची आतुरतेने वाट पहात होते. उतरल्यापासून पाच तासाच्या आत त्यांनी त्यांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य केले होते. त्यांनी शत्रूच्या सैन्यात गोंधळाचे वातावरण पसरवले, त्यांची दळणवळण व्यवस्था मोडकळीस आणली होती व नॉर्मंडीच्या दोन्हीबाजूला कब्जा मिळवून शत्रूच्या सैन्याला कुमक मिळणे अवघड केले होते. जनरल आयसेनहॉव्हरने दिलेली कामगिरी त्यांनी पार पाडली होती असेच म्हणावे लागेल.

त्या रात्री सव्वाबाराला स्टाफ सार्जंट जिम वॉलवर्कने त्याचे होर्सा ग्लायडर काँ कॅनॉलवर असलेल्या पेगासस पुलापासून पन्नास यार्डावर उतरवले. त्या ठिकाणापासून ५०० यार्डावर ऑहन नदीवर अजून एक महत्वाचा पूल होता. हे दोन्ही पूल महत्वाचे होते कारण जर्मनीच्या सेनेला पूर्वेकडून हल्ला करण्यासाठी हे दोन पूल पार करावे लागणार होते तसेच फ्रान्समधे घुसण्यासाठी दोस्तांच्या सैन्याला हे दोन पूल इकडून पार करावे लागणार होते.

या विमानात असलेल्या एका सैनिकाने म्हटले, ‘ उंच झाडांच्या शेंड्यांना स्पर्श करत आमचे होर्सा जमिनीवर कानठळ्या बसविणारा आवाज करत, आमची हाडे खिळखिळी करत जमिनीवर उतरले.’ एकच मिनिटाने दुसरे ग्लायडर उतरले, त्यानंतर एक मिनिटाने अजून एक. यांना मार्गदर्शन करणाऱ्या विमानांनी काळ्याकुट्ट अंधारात या ग्लायडर विमानांना फ्रान्सच्या भूमिगत संघटनेच्या सैनिकांनी सांगितलेल्या जागेवर अचूक उतरवले. या विमानातून उतरलेल्या ऑक्सफर्ड व बकिंगहॅमशायर लाईट इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या नव्वद सैनिकांनी मेजर हॉवर्ड यांच्या आधिपत्याखाली ग्लायडरमधून उड्या मारल्या व जर्मनीच्या सैनिकांना प्रतिकार करायला अवधी न देता पेगासस पूल सहज जिंकला. या सैनिकांनी त्या पुलाचे संरक्षण लॉर्ड लॉव्हेटचे कमांडो तेथे येतोपर्यंत केले व आपली जबाबदारी पार पाडली.

हे कमांडो किनाऱ्यापासून त्या कॅनॉलच्या काठाकाठाने चालत आले होते व त्यांच्या सोबत होती लोव्हॅटच्या पाईपर वाजवत असलेली धून. या वादक सैनिकाचे नाव होते बिल मिलिन आणि हा पठ्ठ्या त्या ऐन युद्धात त्याच्या बॅगपाईपवर ‘ब्लोईंग अवे फॉर ऑल ही वॉज वर्थ’ ही धून वाजवत कूच करत होता. नंतर एका जर्मन सैनिकाने त्याच्या आठवणीत सांगितले की आम्ही त्याला टिपले नाही कारण आम्हाला वाटले त्याला वेड लागले आहे.

बिल मिलीन....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बिल मिलीन युद्धानंतर...म्हातारपणी...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अमेरिकेच्या ८२ व १०१ एअरबोर्न डिव्हजनच्या सैनिकांना मात्र त्यांच्या लक्षावर अचूक उतरण्यात अपयश आले. त्यांच्या काही तुकड्या लक्षापासून जवळजवळ पस्तीस मैल दूर उतरल्या. या छत्रीधारी सैनिकांबरोबर प्रचंड संख्येने छत्रीने बाहुल्याही टाकण्यात आल्या होत्या. याने जर्मनीच्या सैन्याचा गोंधळ उडाला व एक लाख सैनिक आकाशातून उतरले असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी बांधला पण प्रत्यक्षात त्यांची संख्या फक्त २५००० होती. पण वैमानिकांनी बरेचसे सैनिक ठरलेल्या जागांवर अचूक उतरवले व अशा सैनिकांनी या आक्रमणात बहुमूल्य कामगिरी पार पाडली.

ब्रिटिशांच्या विभागात ग्लायडरने उतरलेल्या सैनिकांनी अत्यंत महत्वाच्या काँ व ऑर्ने पुलांवर ताबा मिळविला होता व छत्रीधारी सैनिकांनी उंचावरील जागा काबीज केल्या. त्यांना आता येथून त्या पुलांवर चांगली नजर ठेवता येत होती. पहाटेपर्यंत या विभागातील जर्मन सेनेच्या ताब्यातील पाच पूल नष्ट करण्यात येणार होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्रिटिश सेनेनेही त्यांचे उद्दिष्ट पार पाडले होते व जर्मन सेनेने प्रतिहल्ला चढविलाच तर त्यांना अडथळा होईल किंवा तो थांबविता येऊ शकेल अशी तयारी पूर्ण झाली होती. ज्या पाच किनाऱ्यांवर अमेरिकन सैन्य आक्रमण करणार होते तेथेही अमेरिकन सैन्याने चांगली कामगिरी बजाविली होती.

दोस्तांच्या एअरबोर्न लष्कराने युरोपमधे पाय रोवून पुढील आक्रमणाचा मार्ग मोकळा केला. सगळीकडे पसरलेले हे सैनिक पहाटे समुद्रमार्गाने येणाऱ्या सैन्यदलाची आतूरतेने वाट पहात होते. तोपर्यंत त्यांना त्यांनी काबीज केलेला भूभाग ताब्यात ठेवायचा होता. अर्थात हेही काम तेवढेच अवघड होते.

हे सगळे होईपर्यंत जनरल रोमेल आणि रुनस्टेडच्या मुख्यालयात येणार्‍या अहवालांनी तेथील वातावरण अत्यंत गंभीर झाले होते. अॅबडमिरल क्रांकेच्या नौदलाच्या ठाण्यांनी जहाजांचा आवाज टिपला होता फक्त यावेळेस तो आवाज किती जहाजांचा आहे हे ते सांगू शकत नव्हते. दर तासाला अहवालांची थप्पी वाढत होती. अखेरीस पहाटे ५ वाजता ब्रि. जनरल पेम्सेलने रोमेलच्या चिफ ऑफ स्टाफला म्हणजे मे. जनरल स्पायडेलला फोन केला, ‘शत्रूची असंख्य जहाजे ऑर्ने व विहाच्या मुखापाशी जमा झाल्या आहेत. नॉर्मंडीवरचा हल्ला अटळ आहे..........’

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jul 2015 - 6:46 pm | प्रचेतस

युद्धस्य कथा रम्य:

कपिलमुनी's picture

6 Jul 2015 - 6:47 pm | कपिलमुनी

यावेळी या मालिकेकडे दुर्लक्ष झाले , पण आज घरी जाउन सर्व भाग एकत्र वाचणार .

युद्ध म्हणजे मानवी क्षमतेचा, चिवटपणाचा आणि सामर्थ्याचा प्रचंड आविष्कार असतो. हे वाचताना इतके रोमांचित व्हायला होत आहे तर प्रत्यक्ष युद्धात लढणार्‍यांची मनःस्थिती कशी असेल याची कल्पनादेखिल करवत नाही!

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

7 Jul 2015 - 6:09 am | अरवीन्द नरहर जोशि.

उत्कंठवर्धक कथा . फारच उत्तम .

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 8:55 am | श्रीरंग_जोशी

प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या घडामोडींचे जबरदस्त वर्णन.

अवांतरः युद्धभूमीवर शरणागती पत्करण्याबाबत श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानात ऐकलेली एक गोष्ट. धर्माधिकारी यांनी भारतीय लष्करात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या त्यांच्या एका मित्राला विचारले होते की भारतीय युद्धकैद्यांना पाकीस्तानी लष्कर अमानवी यातना देत असतं. असं असूनही याउलटच्या बातम्या कधी कळत नाही. किंबहुना बांग्लादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळी हजारो पाकीस्तानी सैनिकांना भारताने सोडून दिले होते.

यावर त्या अधिकार्‍याचे उत्तर होते. जेव्हाही दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या तुकड्यांमध्ये अटीतटीची लढाई होत असते तेव्हा पाकिस्तानी सैनिक सहजपणे शरण येतात. याउलट भारतीय सैनिक शत्रुच्या गोळीने मरण येईपर्यंत शत्रुचे नुकसान करत राहतात.

विशाल कुलकर्णी's picture

7 Jul 2015 - 5:14 pm | विशाल कुलकर्णी

‘चला सैनिकहो या तोफा आपल्याला काबीज करायच्या आहेत ! त्या आपणच घेणार आहोत’आणि त्या दीडशे सैनिकांनी त्या हल्ल्यात स्वत:ला झोकून दिले.

जबरदस्त ! मी ठरवले होते की लेखमाला पूर्ण झाल्यावरच सविस्तर प्रतिसाद द्यायचा. पण या लेखातल्या वरच्या ओळी वाचल्या आणि अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहीले. आता प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झालीये, त्यामुळे आतुरतेने पुढील भागांची वाट पाहतोय.

जुइ's picture

8 Jul 2015 - 5:22 am | जुइ

अतिशय सोप्या शैलीत युद्धभुमीवरील वर्णन केले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

17 Jul 2015 - 5:29 pm | पैसा

अत्यंत थरारक!