नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Jul 2015 - 8:25 pm

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर जे छत्रीधारी सैनिक उतरले त्यावरुन जर्मनीच्या अधिकाऱ्यांना आक्रमण सुरु झाले आहे याची कल्पना येण्याची तशी काहीच शक्यता नव्हती पण वस्तुस्थिती तीच होती. ते १२० अमेरिकन छत्रीधारी सैनिक हे रस्ते शोधण्याच्या व सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्याच्या कामगिरीवर उतरविण्यात आले होते.

त्या बिचाऱ्यांचे पहिल्यापासूनच हाल झाले. जर्मनीच्या तोफखान्याने त्यांचे दर्शन होताच आकाशात प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांचे जाळे विणले व त्या प्रकाशात गोळ्यांचा व तोफांचा अतिभयंकर मारा केला. हा मारा इतका स्वैर होता की त्या छत्रीधारी सैनिकांना खाली टाकणारी विमाने पार भरकटली. १२० मधील फक्त अडतीस सैनिक त्यांच्या इप्सित लक्ष्यावर उतरु शकले. उरलेले कित्येक मैल दूरवर उतरले. ते शेतात उतरले, बागेत उतरले काही झऱ्यात तर काही दलदलीत उतरले. काही जण झाडांवर आदळले तर काही घरांच्या छपरावर !

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

उतरल्या उतरल्या या सैनिकांनी त्यांच्या जागा निश्चित करण्यासाठी त्यांचे नकाशे व कंपास उघडले. अंधारात झाडाझुडपातून लपतछपत हे सैनिक मार्गक्रमण करीत होते. त्यांची वाटचाल त्यांच्या पाठीवर असलेल्या ओझ्यांमुळे अवघड झाली होती. बंदुक, सुरुंग, हेल्मेट, प्रकाश फेकणारे दिवे, रडारचे संच व चमकणारे, प्रकाश फेकणारे पत्रे एवढे सामान घेऊन ते आपापल्या लक्ष्याकडे चालले होते. त्यांच्याकडे सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्यासाठी फक्त एक तासाचा अवधी होता. एका तासाने विमानांतून सगळ्या प्रकारचा पुरवठा त्याठिकाणी उतरविण्यात येणार होता.

पन्नास मैल दूर, नॉर्मंडीच्या युद्धभूमीच्या पूर्वेला सहा विमाने व त्यांच्या मागे बांधलेल्या सहा ग्लायडर्सनी किनाऱ्यावरील आकाशात प्रवेश केला. यात ब्रिटिश पॅराट्रुपर व २२-पॅराशुट कंपनीचे सैनिक भरले होते. त्या विमानांतून उड्या मारणाऱ्या सैनिकांचे प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांनी व तोफांनी जोरदार स्वागत केले. त्याच्या खाली जमिनीवर रॅनविले नावाच्या छोट्या गावात अकरा वर्षाच्या अॅसलन डॉईक्सने तो प्रकार पाहिला आणि त्याने त्याच्या आजीला हलवून जागे केले. ‘आजी ऊठ, ऊठ, काहीतरी घडतंय’. त्याच वेळी त्याच्या वडिलांनी त्या खोलीत प्रवेश केला. ‘लवकर कपडे करा. मला वाटते हा हल्ला भयंकर आहे’. त्या पितापुत्रांना खिडकीतून येणारी विमाने स्पष्ट दिसत होती. पण ही विमाने आवाज करत नव्हती. ‘अरेच्चा ! ही तर ग्लायडर आहेत’.

रात्री झेपावणाऱ्या वटवाघुळांप्रमाणे ती सहा ग्लायडर त्या गावाजवळील ऑर्ने नदीवरील पुलाच्या दिशेने चालली होती. त्यात असणाऱ्या १८० सैनिकांवर त्या नदीवरील पूल ताब्यात घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. ते अत्यंत आवश्यक होते कारण जर्मन सैन्याचे प्रतिआक्रमण याच पुलावरुन झाले असते. शिवाय जर्मन सैनिकांनी त्या पुलांवर स्फोटकेही पेरली होती. ती उडवायच्या आत ते पूल त्यांना ताब्यात घ्यायचे होते व यासाठी त्यांनी अत्यंत धाडसी योजना आखली होती. त्या योजनेनुसार चंद्राच्या प्रकाशात ती विमाने त्यांच्या लक्ष्यावर झेपावली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्यातील एका विमानात होता एक ब्रेनगन चालविणारा सैनिक बिल ग्रे. त्याचे विमान उतरणार होते केन कॅनॉलवरील पुलावर. त्याचे विमान जमिनीला धडकणार म्हणून त्याने त्याचे डोळे घट्ट मिटले व पुढे काय वाढून ठेवले आहे त्यासाठी मनाची तयारी केली. विमानात स्मशानशांतता पसरली होती. नशीब त्यांचे, खालून तोफा धडाडत नव्हत्या. ते ग्लायडर हवा कापत वेगाने खाली सूर मारताना आवाज येत होता तेवढाच काय तो आवाज येत होता. ग्रेला आठवते त्याप्रमाणे त्याचा प्लाटून कमांडर डॅनी म्हणाला, ‘चला ! तयार व्हा ’ त्याचवेळी ते ग्लायडर जमिनीला धडकल्याचा प्रचंड आवाज झाला व त्याच्या बुडाच्या चिरफळ्या उडाल्या. कॉकपीटचे तुकडे आत इतस्तत: उडाले. ते ग्लायडर एखाद्या ताबा सुटलेल्या ट्रकप्रमाणे हेलकावे घेत एका तारांच्या कुंपणात घुसले व थांबले. ग्रेला आठवते त्याप्रमाणे ते जवळ जवळ पुलावरच पोहोचले होते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तेवढ्यात कोणीतरी ओरडले ‘ चला उतरा !’ धडपडत ते सगळे सैनिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. काही जणांनी दरवाजे वापरले तर काहींनी पुढच्या बाजूला पडलेले भगदाड. जवळजवळ त्याच वेळी काही अंतरावर अजून दोन ग्लायडर्स जमिनीला घासत उतरली. त्यात उरलले सैनिक होते. त्या सगळ्यांनी आता पुलावर हल्ला चढविला. तो हल्ला बघताच जर्मन सैनिकांना धक्काच बसला. त्यांची तारांबळ उडाली. काही जर्मन सैनिक खंदकात झोपले होती. त्यांच्यावर आता गोळ्यांचा व हातबाँबचा वर्षाव होऊ लागला. ज्यांनी डोळे उघडले त्यांच्यासमोर स्टेनगनच्या नळ्या आ वासून उभ्या होत्या. थोड्याच वेळात जर्मन चौक्या दोस्तांच्या सैनिकांच्या लाटेत वाहून गेल्या. जरी त्यांनी या सैनिकांना प्रखर प्रतिकार केला असता तरीही ते पूल उडवू शकले नसतेच कारण दोस्तांच्या सॅपर्सना आढळले की स्फोटके उडविण्याऱ्या तारांचे जंजाळ तेथे दिसत होते पण त्याला अजून स्फोटके जोडलेली दिसत नव्हती. थोड्याच काळात त्यांना ती शेजारीच असलेल्या एका झोपडीत साठवून ठेवलेली आढळली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काबीज केलेल्या एका पिलबॉक्समधून लान्स कॉर्पोरल एडवर्ड टेपेनडेनने त्या विजयासाठी संदेश प्रसारित केला ‘हॅम अँड जॅम’ हॅम अँड जॅम....हॅम अँड जॅम..... आक्रमणातील पहिली लढाई दोस्तांच्या सैनिकांनी जिंकली होती आणि तीही फक्त पंधरा मिनिटात. पण दुसरीकडे ऑर्ने नदीच्या परिसरात जे ब्रिटिश पथमार्गदर्शक छत्रीने उतरले होते त्यांचे मात्र हाल झाले. एक म्हणजे ते इतके विखरुन पडले की त्यांना एकमेकांशी संपर्क साधण्यास अडचणी येऊ लागल्या. काहीच मैलांवर ज्या अमेरिकन छत्रीधारी सैनिकांनी उड्या टाकल्या होत्या ते मात्र तुलनेने बरेच एकाच ठिकाणी उतरले. ज्या विमानात ब्रिटिश पथदर्शक होते, त्यांच्या मार्गात प्रथमपासूनच विघ्ने आली. एक तर त्यांना खालून होणाऱ्या तोफांच्या माऱ्याला तोंड द्यावे लागत होते व त्याच वेळी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे आकाशात धुके अवतरले. एका विमानातील दहा सैनिकांपैकी फक्त चारच जमिनीवर सुखरुप उतरु शकले. त्यात होता २२-इंडिपेंडंट पॅराशूट रेजिमेंटचा मॉरिसे नावाचा जवान. ते सहाजण त्याच्या डोळ्यासमोर त्या सोसाट्याच्या वाऱ्यात डाईव्ह व्हॅलीच्या दिशेला वाहून गेले. या दरीत जर्मनांनी त्यांच्या संरक्षण योजनेचा भाग म्हणून धरणातील पाणी सोडून कृत्रिम पूर आणला होता. ते सहाजण त्याला परत कधीही दिसले नाहीत.

सगळेच काही एवढे नशिबवान नव्हते....दुर्दैवाने....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खाली अंधार, सोसाट्याचे वारे सुटलेले अशा अवस्थेत फक्त डोळे मिटून खाली उड्या टाकणे एवढेच त्या छत्रीधारी सैनिकांच्या हातात होते. त्यातील दोघांनी विमानाबाहेर उडी मारली आणि ते सरळ जर्मनीच्या ले.जनरल जोसेफ रायशर्टच्या मुख्यालयातील हिरवळीवर उतरले. हे मुख्यालय होते ७११व्या डिव्हिजनचे. हा अधिकारी त्याच्या इतर अधिकाऱ्यांबरोबर पत्ते खेळत होता. वर घरघरणाऱ्या विमानांचा आवाज ऐकून हे सर्व बाहेर आले. त्यांच्या समोरच हे दोन सैनिक त्या हिरवळीवर उतरले. आता हे सैनिक त्यांना बघून दचकले का ते अधिकारी यांना बघून दचकले हे सांगणे कठीण आहे. जनरल रायशर्टने त्या सैनिकांना दरडावून विचारले, ‘कोण आहात तुम्ही? इथे कसे आलात? कुठून आलात? ’ त्यावर बऱ्याच वेळ विचार करुन त्यातील एका सैनिकाने उत्तर दिले, ‘माफ करा ! आम्ही येथे अपघाताने उतरलो आहोत.’

राईशर्ट घाईघाईने त्याच्या मुख्यालयात गेला व त्याने फोन उचलला. ‘मला पंधाराव्या आर्मीचे मुख्यालय जोडून दे !’ त्याच्या दुर्दैवाने तो हे सांगत असतानाच त्याच्या मुख्यालयाजवळ काही ठिकाणी रंगीबेरंगी दिवे आकाशाकडे बघत उघडझाप करीत होते. काही पथदर्शक छत्रीधारीसैनिकांना सामान टाकण्याच्या जागा सापडल्या होत्या व त्यांनी तेथे ते दिवे लावले होते.
सेंट-लोमधे ८४-कोअरच्या मुख्यालयात वेगळाच कार्यक्रम चालला होता. तेथे जनरल एरिक मार्कच्या कार्यालयात त्याचे कनिष्ठ अधिकारी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. जनरल एरिक मार्क एका पायाने लंगडत चालायचा. त्याचा एक पाय त्याने रशियाच्या आघाडीवर गमावला होता व त्याजागी त्याने कृत्रीम पाय लावून घेतला होता. इकडे त्याचे अधिकारी गंभीर चेहऱ्याच्या जनरल मार्कला मद्याचे चषक उंचावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते तर त्याचवेळी फ्रान्सच्या भूमिवर दोस्तांचे असंख्य छत्रीधारी सैनिक उतरत होते.

ज्या ब्रिटिश छत्रीधारी सैनिकांनी या लढाईत भाग घेतला तो दिवस ते कधीच विसरणे शक्य नाही. सहाव्या एअरबोर्न डिव्हिजनचा एक सैनिक, रेमंड बॅटन खाली आल्यावर एका झाडाच्या फांदीला एखाद्या झोक्यावर झोके घ्यावेत तसा जमिनीपासून पंधरा फुटावर हेलकावे घेत लटकला. तो चाकूने पॅराशूटच्या दोऱ्या कापणार तेवढ्यात त्याला पिस्तुलाचे लॉक काढल्याचा आवाज ऐकू आला. त्याची स्टेनगन खाली पडली होती. त्याने मेल्याचे सोंग घेतले. एकाच मिनिटात तेथे एक जमर्न सैनिक अवतीर्ण झाला. त्याने वर रेमंडवर एक नजर टाकली व पुढे गेला. रेमंडच्या ह्रदयाचे ठोके इतक्या मोठ्याने पडत होते की त्याला ते त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होते.

स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेत बॅटन खाली उतरला अणि त्या जंगलाच्या किनाऱ्यावर आला. वाटेत त्याला एक सैनिक छत्री न उघडल्यामुळे मरुन पडलेला दिसला. तेवढ्यात त्याला एक सैनिक वेड्यासारखा ‘त्यांनी त्याला मारले, त्यांनी त्याला मारले’ असे पुटपुटत उलट्या दिशेने पळत होता. धावतपळत त्याने त्यांची ठरलेली जमण्याची जागा गाठली. त्याच्या शेजारीच एक सैनिक बसला होता त्याचीही मानसिक स्थिती गंभीर दिसत होती. त्याने आपली रायफल हातात घट्ट पकडली होती व तो एकटक नजरेने कुठेतरी शुन्यात बघत होता. त्याच्या हातातील रायफल पूर्णपणे मोडली आहे याचे त्या बिचाऱ्याला भानच नव्हते.

त्या रात्री बॅटनसारख्या अनेक सैनिकांचा युद्धाबद्दलचा गैरसमज चांगलाच दूर झाला. स्वत:ला छत्रीपासून सोडविण्याचा प्रयत्न करत असताना लान्स कॉर्पोरल हॅरॉल्ड टेटने त्याच्यासमोर एका डाकोटा जातीच्या विमानाला एक तोफगोळा लागताना पाहिले. त्याच्या डोक्यावरुन ते विमान धूमकेतूप्रमाणे एक मैलावर जाऊन पडले. पडल्यावर तेथे मोठा स्फोट झाला व आगीचा मोठा डोंब उसळलेला त्याने पाहिला.

वीस वर्षाच्या कॉलिन पॉवेलच्या युद्धाची सुरवात वेदनेने विव्हळण्याच्या आवाजाने झाली. तो उतरला तेव्हा त्याला एक मध्यमवयीन आयरिश सैनिक जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला प्रथमोपचार करताना तो त्याला हात जोडून सारखा विनवत होता, ‘मला ठार मार. ऐक, गोळी मार मला’ अर्थात तो असे काही करु शकला नाही. त्याने त्याला नीट बसते केले व त्याला लवकरच मदत पाठवतो असे सांगून त्याने त्याचा रस्ता धरला.

एक सैनिक एका घराच्या काचेच्या छपरावर कोसळला व खाली गेला. वरुन फुटलेल्या काचांचा वर्षाव होत होता. तो वर्षाव थांबण्याआधीच तो बाहेर रस्त्यावर होता. अजून एक पॅराट्रूपर नेम धरुन उतरल्यासारखा एका विहिरीत उतरला. त्याने शांतपणे आपले पॅराशूट फाडले व एकत्र जमायच्या ठिकाणी रवाना झाला. गॉडफ्रे मॅडिसन नावाचा एक सैनिक काटेरी तारांच्या कुंपणात कोसळला. तो त्या तारांमधे फरफटत इतका गुंतला की त्याला पायही हलविता येणे अशक्य झाले. शिवाय त्याच्या पाठीवर ८५ पौंडाचे वजनही होते. त्याला जर कोणी पाहिले असते तर सहज गोळी घालू शकले असते. काही क्षण तो तसाच स्तब्ध राहिला. मग त्याने स्वत:ला सोडविण्याचे कष्टप्रद काम सुरु केले.

दोस्तांच्या छत्रीधारी सैनिकांना जर्मन सैनिकांची नव्हे तर निसर्गाची जास्त भीती वाटत होती. रोमेलने छत्रीधारी सैनिक उतरु नयेत म्हणून ज्या युक्त्या वापरल्या होत्या त्याचा फायदा लगेचच दिसून आला. डाईव्हच्या दरीत सगळीकडे पूर आला होता व दलदली माजल्या होत्या. यात बुडून किती सैनिक ठार झाले याचा खरा आकडा कधीच कळणार नाही पण जे वाचले त्यांनी हे लिहून ठेवले आहे की या दलदलींमधे खाली अत्यंत चिकट असा चिखल माजला होता व वजनदार सैनिक त्यात पडले की वर येत नसत. काही सैनिक अशा दलदलीच्या काठापासून काही फुटावर वर येण्याच्या प्रयत्नात मेलेले आढळून आले.

ओमाहाच्या किनाऱ्यावर मेजर प्लुस्काट त्या बंकरमधून अजुनही समुद्रावर टेहळणी करत होता. त्याला मनोमन काहीतरी चुकते आहे असे अजूनही वाटत होते. तो बंकरमधे पोहोचल्यानंतर त्याच्या डोक्यावरुन असंख्य विमाने उडत गेली होती. आक्रमण सुरु झाले आहे असा फोन कुठल्याही क्षणी येईल असे त्याला तीव्रतेने वाटत होते पण फोन शांत होता. त्याला आता डोक्यावर परत एकदा विमानांचा खर्जातील आवाज ऐकू आला. तो आवाज विमानांचा होता हे निश्चित. अनुभवी प्लुस्काट त्याबाबतीत चूक करणे अशक्यच होते. त्याने परत एकदा आपली दुर्बिण समुद्रावर रोखली. समुद्रावर तरी त्याला कसलीही हालचाल दिसली नाही.

प्लुस्काटच्या डाव्या बाजूला से. मेरे-इग्लिस या गावावरच्या बाँबवर्षावाचा आवाज अगदी जवळ ऐकू येत होता. त्या गावचा मेयर अलेक्स रेनॉडला पायाखालची जमीन हादरत असल्याचे जाणवत होते. जवळच असलेल्या जर्मन तोफखान्यांचा ती विमाने समाचार घेत असावीत असे अलेक्सला वाटले. त्याने घाईघाईने त्याच्या बायकोला आणि तीन मुलांना बाँबहल्ल्यांपासून रक्षण करणाऱ्या तळघरात हलविले. तेव्हा दुपारचा एक वाजला होता. तेवढ्यात त्याला कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. त्याने प्रथम त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण तो आवाज काही थांबेना. पुढे जाऊन त्याने तो दरवाजा उघडल्यावर त्याला उघड्या दरवाजातून रस्त्याच्या पलिकडे असलेला अलिशान बंगला धगधत असलेला दिसला. त्याच्यासमोर अग्निशामकदलाचा अधिकारी त्याच्याकडे जमावबंदी उठविण्याची मागणी करत होता, ‘सर, जमाव बंदी उठवावी लागेल म्हणजे मला ती आग विझविण्यासाठी माणसे गोळा करता येतील. मेयर रेनॉडने जवळच्याच जर्मन ठाण्यात धाव घेतली व कशीबशी परवानगी मिळवली. त्यानंतर त्यांनी दिसेल त्या घराचे दरवाजे ठोठावण्यास सुरवात केली व लोकांना बाहेर येऊन मदत करायचे आवाहन केले. लवकरच तेथे शंभर एक माणसे कामाला लागली. त्यांनी दोन रांगा केल्या. एक भरलेल्या बादल्यांसाठी व एक रिकाम्या बादल्यांसाठी. त्याही परिस्थितीत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास पस्तीस जर्मन सैनिक त्यांच्यावर बंदुका रोखून उभे होते.

या गोंधळात सगळ्यांना एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. त्यांनी वर पाहिले तर असंख्य विमाने त्यांच्या डोक्यावरुन उडत होती. त्यांच्यावर एकामागून एक तोफखाने मारा करत होते. थोड्याच क्षणात ती इतकी खालून उडायला लागली की त्यांच्या सावलीत त्यांना त्यातील लाल दिवे स्पष्ट दिसू लागले. एकामागून एक असे विमानांचे जथ्थे त्यांच्या डोक्यावरुन उडत होते. आत्तापर्यंतच्या इतिहासातील विमानांनी उतरविण्यात येणाऱ्या सगळ्यात मोठ्या सैन्याचा तो एक भाग होता. ८८२ विमाने १३,००० सैनिकांना त्यांच्या इप्सित ठिकाणांवर टाकण्यासाठी त्या गावावर आली होती. एकूण सहा जागा यासाठी ठरविण्यात आल्या होत्या. उड्या मारल्यानंतर काही सैनिक जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जेथे आग लागली होती तेथे तरंगत आले.

हजारो सैनिक त्या गावाच्या वायव्य दिशेला असलेल्या एका ठिकाणी उतरण्यासाठी विमानातून धडधड उड्या मारत होते. या जागा उताहचा किनारा व गावाच्या साधारणत: मधे पडत होत्या. यांच्यावर उताहवरच्या हल्ल्याची जबाबदारी होती. दोस्तांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जी काही उपाययोजना जनरल रोमेलने आखली होती त्यानुसार त्याच्या अभियंत्यांनी सगळी जमीन कृत्रिमरित्या जलमय केली होती. त्यांनी त्या खोलगट भागात इतके पाणी सोडले होते की पूर येऊन चेरबोर्ग नॉर्मंडीपासून विलग झाले होते. पूर्वेला किनारपट्टीपासून मागे जवळजवळ बारा मैल भूमी त्यांनी जलमय करुन टाकली होती. उताहच्या किनाऱ्यावरुन ते पुराचे पाणी पार करुन मुख्य भूमिवर येण्यासाठी आता फक्त पाच छोटे अरुंद पूल उरले होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला जर्मनीच्या तोफा शत्रूचा समाचार घेण्यास सज्ज होत्या.

जर्मन सेनेच्या या कडेकोट बंदोबस्तात उतरुन हे मार्ग मोकळे करुन तेथे आघाडी स्थापन करण्याचे अत्यंत अवघड कामगिरी मे. जनरल मॅक्सवेल टेलरच्या १०१-एअरबोर्न डिव्हिजन आणि जनरल मॅथ्यु रिजवेच्या रेजिमेंटवर टाकण्यात आली होती. त्यांनी हे रस्ते मोकळे केल्यावर दोस्तांच्या चौथ्या आर्मीचा आत जायचा मार्ग मोकळा होणार होता. हा भूभाग साधारणत: १२ मैल लांब व सात मैल रुंद होता. १३००० सैनिकांपैकी जे काही वाचणार होते त्यांच्यासाठी हा भूभाग खूपच मोठा होता त्यांना तो पाच तासात काबीज करायचा होता आणि समुद्रावरुन सैन्य येईपर्यंत राखायचा होता. त्यांच्या प्रत्येक सैनिकाला तीन जर्मन सैनिक त्या भूभागावर हजर होते.

बिचाऱ्या अमेरिकन सैनिकांना बिकट परिस्थितीशी सामना करावा लागला. एक तर त्यांचे सैनिक त्या भागात विखरुन पडले होते. त्यांची फक्त एकच रेजिमेंट....५०५ वी रेजिमेंट त्यांच्या इप्सित ठिकाणी उतरली होती. त्यांच्या युद्धसाहित्यापैकी जवळजवळ साठ टक्के साहित्य हरवले होते आणि दुर्दैवाने त्यात रेडिओ, तोफा व दारुगोळा याचा अंतर्भाव होता. सगळ्यात भयंकर म्हणजे बरेच सैनिक बेपत्ता होते. विमानांचा प्रवास त्या द्विपकल्पावरुन पश्चिमेकडून पूर्वेला होत होता. तो पार करण्यास विमानांना फक्त १२ मिनिटे लागणार होती. कित्येक सैनिकांनी थोड्या आधी विमानातून उड्या मारल्या व ते खाली असलेल्या दलदलीत बुडाले. त्यांना त्यांच्या पाठीवर असलेल्या वजनामुळे दलदलीतून बाहेर येणे शक्यच झाले नाही. ही कथा झाली ज्यांनी अगोदर उड्या मारल्या त्यांची. ज्यांनी थोडे उशीरा उड्या मारल्या ते भरकटत इंग्लिश चॅनेलवर गेले. तेथे अर्थातच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. त्या रात्री जर्मन सैनिक आणि हे छत्रीधारी सैनिक अनेकवेळा अचानक समोरासमोर आले. मेजर लॉरेन्स लेगेरे त्याच्या सैनिकांना घेऊन ठरलेल्या जागेच्या दिशेने जात असताना त्यांना जर्मन सैनिकांनी हटकले. अंधारात कोणीच कोणाला दिसत नव्हते. त्याला जर्मन भाषा येत नव्हती पण फ्रेंच भाषा येत होती. त्याने फ्रेंच भाषेत तो त्याच्या मैत्रिणीची वाट बघतोय असे सांगत त्या एका हाताने हातबाँबची क्लिप काढली व दुसऱ्याच क्षणी तो त्या दिशेला फेकला ज्यात ते तीन जर्मन सैनिक ठार झाले.

सगळीकडे अशा कहाण्यांना तोटा नव्हता. कित्येक पलटणींचे अधिकारी बेपत्ता होते तर कित्येक पलटणींचे साहित्य त्या गोंधळात कुठे पडले होते कोणास ठाऊक. मेजर जनरल टेलरकडे मात्र याच्या उलट परिस्थिती होती. त्याचे सर्व अधिकारी त्याच्या जवळ होते पण त्यांच्या हाताखाली फक्त तीन सैनिक होते. तो नंतर गंमतीने म्हणाला, ‘जगातील ही पहिलीच पलटण असेल ज्यात एवढ्या कमी सैनिकांवर एवढे अधिकारी नेमले गेले असतील.’

ही अशी होती दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाची सुरुवात. नॉर्मंडीवर हल्ल्यासाठी पहिले पाऊल ठेवले त्या १८००० सैनिकांनी ज्यात अमेरिकन, ब्रिटिश, कॅनडाच्या सैनिकांनी भाग घेतला. हे त्या पाच किनाऱ्यांच्या दोन्ही बाजूला उतरले होते. समोर समुद्रामधे क्षितिजावर कुठेतरी ५००० जहाजांचा ताफा एखाद्या अस्मानी संकटासारखा जर्मन सैन्याकडे सरकत होता.
एवढे सगळे होत असताना नॉर्मंडीमधे जर्मन सैन्याला याचा सुगावा लागला नव्हता. अर्थात त्याला अनेक कारणे देता येतील. मुख्य म्हणजे हवामान, हवाई टेहळणीसाठी विमाने उपलब्ध नसणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर आक्रमण झालेच तर पॅ-द-कॅलेवर होणार अशी दोस्तांनी त्यांची पद्धशीरपणे करुन दिलेली खात्री. त्या दिवशी जर्मन सैन्याच्या दृष्टीने वेळच वाईट होती हे खरे. त्यांच्या रडार यंत्रणेनेही त्या दिवशी दगा दिला. एकच यंत्रणा चालू होती आणि तिने समुद्रावर काही वेगळी हालचाल नसल्याचा निर्वाळा दिला होता.

पॅ-द्-कॅलेवरच हल्ला होणार आहे हा जर्मनीचा गैरसमज मोठ्या अक्कल हुषारीने व गंभीरपणे करण्यात आला होता. युद्धशास्त्रातील हा एक महत्वाचा धडा समजला जातो.

(जर्मनीमधे एक माणूस मात्र असा होता की ज्याला दोस्तांचे सैन्य नॉर्मंडीमधे उतरणार याची खात्री प्रथमपासून होती. तो होता स्वत: हिटलर ! त्याने जनरल रुनस्टेडला अनेक वेळा इशारा दिला होता, ‘नॉर्मंडीकडे लक्ष ठेवा’. युद्ध संपल्यावर स्वत: रुनस्टेड व त्याचा चिफ ऑफ स्टाफ जनरल ब्लुमेंट्रीट या दोघांनीही इतिहासकार लिडेल हार्ट याच्याजवळ ही कबुली दिली. ब्लुमेंट्रीटने आठवणीत सांगितले की रुनस्टेडला हिटलरच्या कार्यालयातून सतत हा इशारा मिळत होता ‘फ्युररला नॉर्मंडीची काळजी वाटत आहे.’ हिटलरला असे का वाटत होते किंवा हिटलरने हा निष्कर्ष कशावरुन काढला होता हे त्या माणसांना कळत नव्हते पण लिडेल हार्ट म्हणतो तसे ‘या वेळेस हिटलरच्या अंत:प्रेरणेने सेनाधिकार्यांपेक्षाही अचूक भविष्य वर्तविले असे म्हणावे लागेल. त्याच्या या अंत:प्रेरणेचा नाहीतर सगळीकडे उपहासच होत असे.’

पण गंमत म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष हा हल्ला झाला तेव्हा मात्र हिटलर म्हणत होता की हे खरे खुरे आक्रमण नव्हे तर लक्ष दुसरीकडे वेधण्याचाच प्रयत्न आहे.

आपल्या हेतूंबद्दल शत्रूच्या मनात शंका उत्पन्न करणे, त्यांना त्याबाबतीत गोंधळात टाकणे, आपल्या ताकदीविषयी त्यांचा गैरसमज करुन देणे हे फार जुने डावपेच आहेत. प्राचीन काळातील चीनी युद्धनीतीतज्ञ सन् त्झूने त्या काळातच म्हटले होते, ‘सर्व युद्धे ही फसवणुकीवर (गनिमीकाव्यावर )आधारीत असतात.’ दोस्तांच्या सैन्याने डी-डेच्या काहीच महिने अगोदर ऑपरेशन फॉरटिट्युड नॉर्थ आणि फॉरटिट्युड साऊथ या दोन कारवायांनी हिटलरला फसवले असे म्हटले पाहिजे. या ऑपरेशनमुळे हिटलर नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम व पॅ-दे-कॅली येथे असलेले त्याचे लाखो सैनिक तेथून हलवून नॉर्मंडीला तैनात करु शकला नाही. या दोन आघाड्या म्हणजे युद्धातील गनिमीकाव्याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. या दोन आघाड्या दोस्तांनी अत्यंत विचारपूर्वक याच कारणासाठी काही महिन्यापूर्वीच उघडल्या होत्या. या आघाड्यांवर नॉर्मंडीपेक्षाही युद्धाची जास्त धामधूम उडवून देण्यात आली. या आघाडीवर आक्रमणाचा देखावा उभा करण्यासाठी एक आर्मी स्थापन करण्यात आली ज्याचे नेतृत्व जनरल पॅटनकडे देण्यात आले होते. या नाटकाचा देखावा परिपूर्ण करण्यासाठी रबराचे खोटे रणगाडे, खोटी कार्यालये, किनाऱ्यावर सैनिक उतरावयाच्या खोट्या बोटी, मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहेत हे भासविण्यासाठी धूर ओकणारी खोटी धुराडी असे अनेक प्रयोग राबविण्यात आले व त्यासाठी चित्रपटसृष्टीची मदत घेण्यात आली. जनरल पॅटनसारखा महत्वाचा सेनाधिकारी असल्या कामाला लावला जाईल यावर जर्मनीचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. खरे तर स्वत: पॅटनचाही यावर विश्वास बसला नव्हता.

रबरी रणगाडे.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर्मनीच्या गुप्तहेरखात्याने असा अंदाज केला होता की ब्रिटनमधे आक्रमणासाठी ७९ डिव्हिजन सैन्य तयार ठेवण्यात आले आहे पण वास्तवात ते फक्त ४७ डिव्हिजन एवढेच होते. बिनतारी संदेश दळणवळणाच्या मार्गांवर चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली तर टेम्स नदीच्या किनार्‍यावर सैनिक उतरवण्याच्या असंख्य खोट्या बोटी जमविण्यात आल्या. एवढेच काय, जनरल माँटगोमेरीसारखा दिसणारा एक नट माँटगोमेरीचा तोतया म्हणून जिब्राल्टरला पाठविण्यात आला. याला हुबेहूब माँटगोमेरीचे रुप देण्यात आले होते व त्यात इतके बारकाईने लक्ष घालण्यात आले होते की त्याच्या खाकी रुमालावर माँटगोमेरीची असायची तशी आद्याक्षरेही लिहिलेली होती. या नटाने माँटगोमेरीच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास केला होता. या अभ्यासादरम्यान त्यालाही हा जनरल किती नाटकी आहे हे कळून चुकले ती गोष्ट वेगळी. (अॅयक्सिस राष्ट्रांच्या जिब्राल्टरमधील गुप्तहेरांनी जर या तोतयाला नीट पाहिले असते तर त्याच्या डाव्या हाताला मधले बोट नव्हते हे त्यांना कळले असते). आक्रमणाच्या दिवशी ‘विंडो’ नावाच्या अॅलल्युमिनियमच्या तरंगणाऱ्या, चमकणाऱ्या पट्ट्या पॅ-द-कॅलिवर अशा रितीने टाकण्यात आल्या की जर्मनीच्या रडारवर तेथे किनाऱ्याच्या दिशेने मोठे आरमार येते आहे असे वाटावे. या प्रकारच्या अनेक विचित्र वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवून शत्रूला फसविण्यात आले ज्यामुळे हजारो सैनिकांचे प्राण वाचले.)

पहिला छत्रीधारी सैनिक नॉर्मंडीवर उतरल्याला आता दोन तास उलटून गेले होते. आताशी कुठे नॉर्मडीमधील जर्मन अधिकाऱ्यांना काहीतरी भयंकर आपत्ती कोसळते आहे याची जाणीव होऊ लागली होती. सगळीकडून या आधिकाऱ्यांना आक्रमणाचे अहवाल मिळू लागले. ८४-आर्मी कोअरचा कमांडर जनरल एरिक माक्स अजूनही त्याच्या वाढदिवसाच्या मेजवानीत गर्क होता. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. तेथे असलेल्या त्याच्या हेरखात्याच्या मेजर फ्रेडरिकला अजूनही तो प्रसंग स्पष्ट आठवतो.‘पलिकडील माणसाचे बोलणे ऐकत असताना जनरलचे अंग एकदम ताठरले.’ पलिकडे बोलणारा ७१६-डिव्हिजनचा कमांडर विलहेम राईश्टर होता. काँच्या वरच्या किनाऱ्याचे रक्षण याची सेना करीत होती. ‘ऑर्नेच्या पूर्वेला शत्रूचे छत्रीधारी सैनिक उतरले आहेत...बहुदा ब्रेव्हिले व रॅनव्हिलेच्या जवळपास हे सैनिक उतरले असण्याची शक्यता आहे.’ शत्रूच्या आक्रमणाची ही बातमी अशी पहिल्यांदा जर्मनीच्या मुख्यालयात पोहोचली. वेळ होती पहाटेची २ वाजून ११ मिनिटे.

जनरल मार्क्सने ताबडतोब ब्रिगेडियर जनरल मॅक्स पेम्सेलला फोन लावला. हा सातव्या आर्मीचा चिफ-ऑफ-स्टाफ होता. पेम्सेलने त्याच्या कमांडींग ऑफिसरला उठविले. याचे नाव होते कर्नल जनरल डोलमान. ‘जनरल मला वाटते शत्रूचे आक्रमण सुरु झाले आहे. तू ताबडतोब इकडे ये !’ जनरल पेम्सेलला फोन खाली ठेवताना काहीतरी अचानक आठवले. त्याच्या कासाब्लँकामधील एका गुप्तहेराचा अहवाल त्याच्या टेबलावर मागच्या आठवड्यात येऊन पडला होता. तो त्याने आजच दुपारी वाचला होता.

त्यात त्याने दोस्तांच्या आक्रमणाची तारीख स्पष्टपणे सुचविली होती ‘६ जून व जागाही लिहिली होती........ नॉर्मंडी’....

क्रमश:
जयंत कुलकर्णी.
सर्व छायाचित्रे इंटरनेट व काही पुस्तकातून साभार.....

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ६

इतिहासकथालेख

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Jul 2015 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं. पुभाप्र.

आता हे सैनिक त्यांना बघून दचकले का ते अधिकारी यांना बघून दचकले हे सांगणे कठीण आहे.

लोल!

लॉर्ड लोव्हाट आणि पायपर बिलच्या भन्नाट कहाणीच्या प्रतीक्षेत आहे.

एस's picture

3 Jul 2015 - 9:41 pm | एस

वा! थरारक!

मुक्त विहारि's picture

3 Jul 2015 - 9:44 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

श्रीरंग_जोशी's picture

4 Jul 2015 - 4:43 am | श्रीरंग_जोशी

जबरदस्त वर्णन आहे. अजुन प्रत्यक्ष चकमकींची सुरुवात झालेली नाही. तेव्हा काय होणार ते वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सौंदाळा's picture

6 Jul 2015 - 6:14 pm | सौंदाळा

+१ हेच म्हणतो.
त्या एका दिवसातच किती लोकांचे पुढचे आयुष्य कशाप्रकारे बदलुन गेले असेल याची कल्पनापण करु शकत नाही.

जुइ's picture

5 Jul 2015 - 3:37 am | जुइ

खूपच थरारक आणि उत्कंठावर्धक मालिका झाली आहे आतापर्यंत.

बोका-ए-आझम's picture

5 Jul 2015 - 10:10 am | बोका-ए-आझम

काका, संदर्भग्रंथ कुठले वापरलेत? फारच तपशीलवार आणि anecdotal वर्णन आहे. पुभाप्र!

जयंत कुलकर्णी's picture

5 Jul 2015 - 1:09 pm | जयंत कुलकर्णी

पहिल्या भागात लिहिले आहेना...रायन म्हणून....

इशा१२३'s picture

5 Jul 2015 - 3:46 pm | इशा१२३

जबरदस्त मालिका...उत्कठा वाढतीये ...पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त !

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

5 Jul 2015 - 11:53 pm | अरवीन्द नरहर जोशि.

अतिशय उत्कंठा वर्धक युध्धकथा आहे.

पैसा's picture

16 Jul 2015 - 2:04 pm | पैसा

जबरदस्त!