कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 Mar 2015 - 7:37 pm

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला!

अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.

B- ब्ल्याक = (०)
B- ब्राउन =1
R- रेड =2
O- ऑरेंज =3
Y- यलो =4
G- ग्रीन =5
B- ब्लू =6
V- व्हायोलेट =7
G- ग्रे = 8
W- व्हाईट = 9
गोल्डन /सिल्व्हर

त्याकाळी बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही रेझिस्टन्स वर अश्या वरीलप्रमाणे रंगांच्या रेषा असत. गोल्डन /सिल्व्हर (५% किंवा १०%) यावरून त्याचा दिलेल्या मुल्या पेक्षा उणे किंवा अधिक फरक (टोलरन्स ) कळत असे. रंगपट्टे असण्याचं कारण म्हणजे या काम्पोनंट्सचा आकार. इतका छोटा आणि गोलाकार की त्यावर काही छापणे कठीण, त्यापेक्षा सांकेतिक रंगात पट्टे रंगवणे सोपे.

उदाहरणार्थ-
लाल/ लाल/ केशरी /सोनेरी असे पट्टे असतील तर २२ x (१०००) = २२k ओहम +/- ५%
(पहिला- दुसरा- मग तिसरा मल्टीप्लायर/ दहाचा घात - शेवटी टोलरन्स)
म्हणजे तिसरा रंग काळा (x दहा ) असेल तर तो एक किलोओहम पेक्षां कमी. किंवा तपकिरी ( x शंभर) म्हणजे कितीतरी ‘शे’ ओहम, आणि तो लाल असेल तर काहीतरी पूर्णांक काहीतरी के! याशिवाय काही कंपन्या पाच पट्टे देऊन अधिक माहिती पण देत. शिवाय मोठ्या पॉवरचे रेझिस्टन्स इतके मोठे असत की त्यावर सरळ माहिती छापली जाई.

१. एक्सिअल
a

२.एक्सिअल
b

आता हे लक्षात कसं ठेवायचं?
सरांनी सांगितलं, ”बी बी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन ह्याज गॉट अ व्हेरी गुड वाईफ” ( B B ROY of Great Britain has got a Very Good Wife) हे लक्षात ठेवा! त्या क्रमाने शुन्य ते नऊ रंग लक्षात ठेवा . पण का? कशाचा कशाला संबंध नाही, पण लक्षात ठेवायला म्हणे हेच सोपंय.

आम्ही शंका काढलीच - हे तीनदा B येतात त्याचं काय? कुठला B कुठल्या रंगाचा? तर सर म्हणाले ते सरावानं येईल, आत्ता फक्त पाठ करा.
मग सरावानं काय, सगळंच येईल ना राव!
मग सरांनी एक पुस्तक आणून दाखवलं. कुठल्याश्या भारतीय लेखकाचंच. त्यात पण तसंच लिहिलेलं. पण छापील मजकूर पाहून आम्ही पण ते स्वीकारलं. फारसे प्रातिप्रश्न न करण्याचा तो काळ ! मास्तरांकडे प्रात्यक्षिकाचे गुण असत. आजही असतात पण काळ बदलला आहे.

पुढे सरांनी एक खोके भरून रेझिस्टन्स टेबलावर उपडे केले आणि सांगितले, ''या ढिगातून १-२-३ किलोओहम अशा श्रेणीमूल्या प्रमाणे वेगळे ढीग करा''. हेच पाहिलं प्रात्यक्षिक. मग काय, शेकडो कंपोनंटस ओळखल्यावर सरावानं ते पाठ झालं आणि आम्ही सगळे त्या 'बी बी रॉय ' साहेबाला विसरून गेलो.

तंत्रज्ञान अपेक्षेपेक्षा भरभर बदलत गेलं. कंपनीत नोकरी करताना याचा काही संबंध आलाच नाही. पुढे पुण्यात काहीकाळ प्राध्यापकाच्या भूमिकेत गेलो तेव्हा हा विषय शिकवायला मिळाला. पण तोपर्यंत विषयाचा अवाका आणि अभ्यासक्रम इतका वाढला होता कि अशा लहान सहान गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायची गरज उरली नव्हती. इंटरनेटमुळे संदर्भ ढिगाने उपलब्ध झाले होते. प्रात्यक्षिकाच्या वेळी मात्र मुलांना निव्वळ गम्मत म्हणून हे ‘बी बी रॉय’ प्रकरण सांगत असे. त्याच बरोबर आता तंत्र बदलत असल्याने फार काळ हे भाग पाहायला मिळणार नाहीत हेही सांगत असे. तेही दहा वर्षापूर्वी .
आता इलेक्ट्रोनिक भागांचे आकार, प्याकेज बदलले आणि रंगपट्टे पण निघून गेले. सगळे काही छोटे झाले. सूक्ष्म असे सरफेस माउनटेड डिव्हायसेस (SMD) आले. पण अजूनही कोड्स तसेच आहेत, पण रंगाऐवजी फक्त अंक- संख्या रहातील. म्हणजे वरील उदाहरणातील लाल/लाल/ केशरी ऐवजी नुसतेच - २२३ !

३.एसेम्डी कंपोनंट

c

गेली कांही वर्षं इंग्लंडला काम करत असताना अचानक कधीतरी हा रॉयसाहेब आठवला. हे कलर कोडस इंग्लंड मध्ये कसे शिकवत असतील ही उत्सुकता होती. म्हणून माझ्यापेक्षा सिनियर असलेल्या इंग्लिश इंजीनियराना विचारलं तेव्हा त्याना बी बी रॉय असे कांही प्रकरण माहीतच नव्हते.

नोकरी करत असलो तरी हौस म्हणून स्वतः काही सर्किट्स तयार करून ती आपले प्रॉडक्ट म्हणून बाजारात आणणे हे भारतात आणि बाहेरही केले जाते. पूर्वी मीही करत असे. इकडे पश्चिमेकडे त्यालाच गराज किंवा हॉबी वर्कशॉप म्हणतात. असे अनेक लोक घरीच लहान प्रमाणात काहीबाही बनवत असतात. पूर्वी पी सी बी स्वतः बनवणे, मग सुटे भाग आणून सोल्डर करणे, त्याला सुसंगत असा बॉक्स, त्यावर स्टीकर, एल ई डी इंडीकेशन आणि स्वीचेस लावणे, असा मोठा प्रवास असे. आता एक्सिअल भाग मिळणे कमी होत जाईल, जे हाताळायला सोपे होते, आता लहान आकारामुळे छोटेसे - सूक्ष्म एसेमटी भाग वापरणे अपरिहार्य बनलेय. घरच्या घरी काही तयार करणे सोपे राहिले नाहीय. नव्या चतुर्भुज प्याकेजमधले मायक्रोकंट्रोलर्स हाताने जोडणे अशक्य झाले. त्यामुळे पूर्वी घरीच पी सी बी वर जोडण्या करणारे लघुद्योजक आपले उत्पादन आता बाहेरून करवून घेतात. तशी कंत्राटी उत्पादन सुविधा उपलब्ध आहे पण त्याला किमान काम बरेच जास्त असावे लागते, तरच परवडते. छोट्या उद्योगाची मोजमापंच गेल्या दशकात बदलून गेली.

असो. जुन्या गोष्टी कालबाह्य होणे हा निसर्गनियम उद्योगालाही लागू आहेच.
आमचा अकरावीतला ”बी बी रॉय” आता असाच कालबाह्य झाला आहे!

* (सर्व चित्रे जालावरून साभार)

मांडणीइतिहासतंत्रविज्ञानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

26 Mar 2015 - 7:42 pm | आदूबाळ

क्या बात! काय छान लेख!

एक शंका - एखादा मनुष्य रंगांधळा असेल तर त्याने काय करावं?

खेडूत's picture

26 Mar 2015 - 8:38 pm | खेडूत

कंपनीत वापरताना ते असे निवडूनच ठेवलेले असतात. त्यामुळे ओळखावे लागत नाहीत.

d

लवकरच हेही कालबाह्य होऊन माणसाला असेम्ब्ली करावीच लागणार नाही! :)

यसवायजी's picture

26 Mar 2015 - 10:39 pm | यसवायजी

मग मल्टीमीटर वापरायचे.
आता आठवत नाही, बहुतेक ओहममीटर सुद्धा असायचे.च्यायला विसरलो की समदं.

जुने इलेक्ट्रॉनिक्सचे दिवस आठवले. हळवं केलंत साहेब!!!!!! आमच्या एकूणच आयुष्यातले मोजके मोरपंखी दिवस नेमके याच कालखंडात होते. त्यांच्या आठवणीने अं.ह. झालो.

मोहनराव's picture

26 Mar 2015 - 7:52 pm | मोहनराव

+१ हेच म्हणतो

सांगलीचा भडंग's picture

26 Mar 2015 - 8:11 pm | सांगलीचा भडंग

एकदम मस्त लेख .
सांगलीला गणपती पेठ मध्ये कोर्नर ला एक दुकान होते ।तिथे असले सगळे सुट्टे पार्ट मिळायचे रेझीसस्टर , डायोड आणि छोटे ट्रान्सफोरमर. आणि सर्वात भारी आवडणारे काम म्हणजे सोल्डरिंग करायची गन आणि त्याचे मेटल . . फार काय तर भारी करतोय असे वाटायचे

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 8:56 pm | बॅटमॅन

नवतरंग बद्दल बोलताय का?

सांगलीचा भडंग's picture

27 Mar 2015 - 3:21 pm | सांगलीचा भडंग

होय बहुतेक तेच नाव होते . आठवत नाही नक्की

गवि's picture

27 Mar 2015 - 4:01 pm | गवि

..येस सर. नवतरंगच ते.

त्याचप्रमाणे चेमिस्ट्रीमधले "All altruists gladly make gum in gallon tanks" हेही आठवून तोंड गोड झाले.

खेडूत's picture

27 Mar 2015 - 4:36 pm | खेडूत

...

अजून एखादं वर्ष तिथेच शिकवत राहिलो असतो तर तुलाही शिकवायला आलो असतो !

त्यापूर्वीच्या तीनही वर्षी- दोन्ही तुकड्यांना हा विषय शिकवला आहे!

बाकी आमचीही ती एक्सटेन्डेड मोरपंखी वर्षं होती !

जिथे शिकलो तिथेच शिकवायला मजा आली. तो बोट क्लब आणि जुन्या इमारती!

असो! पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी . :)

बॅटमॅन's picture

27 Mar 2015 - 5:12 pm | बॅटमॅन

नमस्कार खेडूत साहेब. सीओईपीबद्दल बोलत नैये, अकरावी-बारावीबद्दल बोलतोय. :) सीओईपीपेक्षा ती वर्षे जास्त मोरपंखी होती. त्यातही अकरावी अंमळ जास्तच. असो, आता जुन्या आठवणींनी अधिक हळवे नको व्हायला.

खेडूत's picture

27 Mar 2015 - 6:21 pm | खेडूत

अरेच्च्या !
ही शक्यता लक्षातच नाय आली!(स्वारी)

बाकी अकरावी-बारावी बद्दल सहमत! :)

आमच्या ही आठवणी जाग्या झाल्या, बीसीएस ला इलेक्टॉनिक्स होते अआणि माझे प्रचंड आवडीचा विषय होता हा.
प्रॅक्टीकल ला पैकीच्या पैकी आणि.

अवांतर :
असो ते बी बी रॉय पेक्षा आम्ही सोप्पे वाक्य लक्षात ठेवले होते. कदाचीत सर्वांना ते माहित असेन ही.

वॉल्टर व्हाईट's picture

26 Mar 2015 - 8:39 pm | वॉल्टर व्हाईट

ओह्ह, म्हणजे आता असे कलर कोडेड रेझिस्टर्स बाजारात मिळत नाहीत ?
इंजिनिअरिंग करतांना थाटलेला इमर्जन्सी लाईट बनवुन विकायचा बिझनेस ( ;-) ) म्हणजे हॉबी वर्कशॉप होते हे कळाले.
लेख आवडला.

हुप्प्या's picture

26 Mar 2015 - 8:44 pm | हुप्प्या

१. रेसिस्टरच्या अंगाचा रंग हाही अर्थपूर्ण असतो का? निळा म्हणजे मेटल फिल्म तंत्रज्ञान वापरलेला असा काही नियम आहे का? त्याविषयी फार कळू शकले नाही.

२. इतक्या काटेकोर मोजमापाचे रेझिस्टर प्रचंड संख्येने कसे बनवत असतील? प्रत्येकावर योग्य त्या रंगाच्या पट्ट्या मारणे हे ऑटोमॅटिक यंत्राने कसे करत असतील? गेले निदान ४०-५० वर्षे तरी रेझिस्टर बनवले जात आहेत. त्यामुळे आधुनिक संगणक वगैरे वापरत नसणार. आणि ह्याची किंमतही फार नसते.

खेडूत's picture

26 Mar 2015 - 9:14 pm | खेडूत

१. असे काही नसते.
२. रेझिस्टन्स उद्योग शंभर वर्षांहून जुना आहे. तीस सालच्या रेडीओ आणि पंचेचाळीस साली टीव्ही मध्ये कलर कोडेड रेजिस्टन्सेस वापरले जात. अलीकडे चाळीस वर्षात प्रगत यंत्रं आली. त्यापूर्वी वायर वाउंड काळात हाताने करत असावेत.

रेजिस्टर्स कसे बनतात याची इथे साधारण कल्पना येईल. प्रत्यक्ष व्हीडीओ लगेच मिळाला नाही.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2015 - 9:06 pm | मुक्त विहारि

आम्ही "बी.बी.रॉय" पाठ करायचा प्रयत्न केला पण नाही जमले....पण मग त्या "बी.बी.रॉय"च्या ऐवजी "बॅड बॉइज....." ३-४ वेळा म्हटले, लगेच पाठ झाले.

(बॅड बॉय) मुवि

खटपट्या's picture

26 Mar 2015 - 9:50 pm | खटपट्या

जुने दिवस आठवले. अजुनही असे रेजीस्टर मिळतात. प्रिंटेड सर्कीट बोर्डही मिळतात. मजा येते काम करायला.

छान लेख! त्या निमित्ताने जुने दिवस आठवले.

मधुरा देशपांडे's picture

26 Mar 2015 - 10:04 pm | मधुरा देशपांडे

लेख आवडला. मधल्या काही वर्षात संबंधच आला नाही या प्रकारांशी. एवढ्यातच मात्र परत याच्याशी गाठ पडली, पण वर प्रतिसादात आलंय त्याप्रमाणे ते निवडुन ठेवलेले असल्याने ओळखावे लागत नाहीत. लेखाच्या निमित्ताने बर्‍याच आठवणींना उजाळा मिळाला.

हेमन्त वाघे's picture

26 Mar 2015 - 11:10 pm | हेमन्त वाघे

Mechanical Engineering मध्ये असाच येक फोर्मुला होता
Theory of simple bending equation
M/ I = F/Y = E/R
M - Maximum bending moment I - Moment of inertia F - Maximum stress induced Y - Distance from the neutral axis E - Young’s modulus R - Constant.
हा लक्षात ठेवायची क्लुप्ती ..
May I F*** You Elizabeth R*** …
M/ I = F/Y = E/R
जाणकारांनी फुलल्या भरून काढाव्या.

यसवायजी's picture

26 Mar 2015 - 11:30 pm | यसवायजी

लाईक्ड

बरीच वर्षे झाली त्यामुळे रंगपट्टे गेले हे माहीत नव्हते.

पण ११ वी आणि १२ वीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातल्या त्यात पहिल्या सहा महिन्यांच्या. दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले. अकरावीत अचानक सगळं इंग्रजीत! बाकी विषय जमले. पण इलेक्ट्रोनिक्स मध्ये बरेच शब्द नवीन होते. लेखी परीक्षेत अक्षरशः पानेच्या पाने रट्टा मारुन लिहिली. नंतर जमले मात्र. प्रात्यक्षिक करताना मात्र मजा यायची.

अभिजीत अवलिया's picture

27 Mar 2015 - 2:41 am | अभिजीत अवलिया

जुने दिवस आठवले खेडुत साहेब. सगळे विसरुनच गेलो होतो.

पान्डू हवालदार's picture

27 Mar 2015 - 4:49 am | पान्डू हवालदार

My Very Educated Mother JUst Served Me Nine Pizzas
Mercury
Venus
Earth
Mars
Jupiter
Uranus
Saturn
Neptune
Pluto

चिगो's picture

27 Mar 2015 - 12:22 pm | चिगो

मला माहीत असलेलं, My Very Enthusiastic Mother Just Showed Us Nine Planets असं होतं.. आता जरी प्लुटो गायब झाला असला तरी तुम्ही सांगितलेला क्रम चुकला आहे, हे नम्रपणे दर्शवू इच्छितो. (गुरु i.e. Jupiter नंतर शनि i.e. Saturn येतो) नात्यातल्या एका लहान मुलीने सहज सांगितलेल्या ह्या मंत्राचा स्पर्धापरीक्षेत फायदा झाला होता एकदा.. :-)

मराठी_माणूस's picture

27 Mar 2015 - 10:59 am | मराठी_माणूस

बोरकर ह्या लेखकाचे "you too can do " आठवले

कापूसकोन्ड्या's picture

27 Mar 2015 - 11:28 am | कापूसकोन्ड्या

..
आन्ध्र प्रदेश से ट्रेन न्यू दिल्ली पहुंची
Andhra
Pradesh
Se
Train
New
Delhi
Pahuchi.

अद्द्या's picture

27 Mar 2015 - 11:49 am | अद्द्या

OSI Table . .

जुने दिवस . तो क्लास . . आणि क्लास मधले मित्र . .

सिरुसेरि's picture

27 Mar 2015 - 4:14 pm | सिरुसेरि

सुंदर लेख . या आठवणींवरुन जाणवते की तुमचाही कल हा इलेक्टॉनिक्स कडेच होता . बरेचदा बरेचजण पुढील शाखा कोणती निवडायची याबाबत साशंक असतात .

खेडूत's picture

27 Mar 2015 - 4:37 pm | खेडूत

खरंय .

कल तर होता, पण विचारात स्पष्टता नव्हती. चार हजार वस्तीच्या खेडेगावांत मार्गदर्शन पण नव्हतं. पण डॉक्टर असलेल्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि निर्णय बरोबर ठरला !