नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

पाहावे मनाचे's picture
पाहावे मनाचे in जनातलं, मनातलं
16 Jan 2015 - 11:22 am

मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे.

याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील. आम्हाला घोषित करायला अत्यंत आनंद होतोय की दृकश्राव्य कलाकृतींसंबंधित लेखनाला वाहिलेले "पाहावे मनाचे" हे संस्थळ चालू करत आहोत. या संस्थळावर आता कोणत्याही भाषेतल्या चित्रपटांशी, टीव्ही मालिकांशी व नाटकांशी संबंधीत, मराठीतून लिहिलेले लेखन - मुख्यतः परीक्षणे - प्रसिद्ध होतील. या नव्या जमान्यात मराठी प्रेक्षकाची दृकश्राव्य मनोरंजनाची भूक, इतर कोणत्याही प्रेक्षकाइतकीच, विस्तारलेली आहे. नुकताच झालेल्या 'पिफ' (पुणे फिल्म फेस्टिवल) असो किंवा मग नवा वा जुना चित्रपट असो किंवा बॉलीवूड, हॉलिवूड, टॉलिवूड असो, किंवा मराठी चित्रपट असो किंवा अन्य भाषिक जागतिक चित्रपट असो, त्यांच्या विषयी तसेच प्रसंगी नाटक, टीव्ही मालिका यांच्याविषयी मराठीतून केलेले लेखन वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आम्हाला आहे.

विविध माध्यमांतून असे लेखन बरेच वाचायला मिळते हे खरे असले, तरी ते फक्त व्यावसायिक व प्रसिद्ध चित्रपटांचे असते. कधी अश्या लेखनाचा दर्जा आणि मत हे अनेकदा "मिडिया पार्टनर"च्या चष्म्यातूनही बदललेले आहे का? अशीही शंका येऊ लागते. शिवाय चित्रपट परीक्षण हे निव्वळ कथेच्या परीक्षणांपेक्षा बाहेर जाऊन तांत्रिक अंगांसकट पूर्ण चित्रपटाचे परीक्षण असावे अशीही इच्छा असते. यातूनच मनातून थेट उतरलेले आणि चांदण्यांच्या औपचारिकतेपेक्षा दिलखुलास व प्रांजळ मत मांडणारे हे संस्थळ काढत आहोत. या संस्थळावर सध्या लेखक मोजके व निवडक असले, तरी भविष्यात पाहुणे बोलावून अधिकाधिक चित्रपट व नाटकांचा परिचय मराठी प्रेक्षक-वाचकांना करून देण्याचा मानस आम्ही बाळगून आहोत. वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या शैलीत नि वेगवेगळ्या घाटांमध्ये लिहिलेली परीक्षणं, सर्च व्यवस्था आणि शक्य त्या त्या प्रकारे सिनेमाबद्दल लिहिण्याची खुजली - असा सगळा मासला असेल. वाचकांना, त्यांचे काही सोशल नेटवर्किंगचे आयडी वापरून, प्रतिक्रिया द्यायची सोय देखील आहेच.

तर या नव्या संस्थळावर तुमचे स्वागत करण्यासाठी, तुम्हाला हार्दिक आमंत्रण देण्यासाठी हा धागा काढत आहोत. त्याच बरोबर जर तुम्ही एखादा चित्रपट व/वा नाटक पाहिलेत व त्याचे दीर्घ परीक्षण (किमान २०० शब्द) लिहायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. आमचा पत्ता आहे pahawemanache@gmail.com.
नव्या चित्रपटांसोबत, एखाद्या जुन्या परंतू तुमच्या आवडत्या/नावडत्या चित्रपट/नाटकांविषयी लेखनही तुम्ही इथे पाठवू शकता.

तोवर या आमच्या नव्या प्रयोगाला सर्वाधिक गरज तुमच्या शुभेच्छांची आणि प्रतिसादांची आहे. त्याचबरोबर या संस्थळाच्या फेसबुक / ट्विटर पानाला लाईक करून जोडल्यास इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनाची सुचनाही तुमच्यापर्यंत पोचेलच. आशा आहे हा नवा अ-व्यावसायिक प्रयोग तुम्हाला आवडेल व दर आठवड्याला नवनवीन लेखनासाठी "पाहावे मनाचे" हा तुमच्या चित्र-जगताशी जोडणारा दुवा ठरेल!

मते सर्वथा माध्यमांच्या भरोसे
चोखंदळा कौतुक क्रिटीकाचे
फसवता न येई रे ऐशा रसिका
ऐकूनी जनांचे ठरवितो मनाचे

तया पाहू वाटे सिनेमा झकास
पहाया न मिळता वाटे भकास
सकाळचा शो? बहु द्रव्य वाचे!
तेही न जमता, टोरेण्टच खास

नसे वावडे रे तयाला कशाचे
मनी पाडिले ना कसलेही साचे
शाहरुख अपुला तसा ब्रॅड पिटही
तयाच्या मनी प्रेम ते अस्सलाचे

फिल्मी चक्चकाटास भुलणार नाही
रिव्ह्यूची तयाला तमा फार नाही
अश्या रसिकाचे असे घोषवाक्य
ऐकूनि जनांचे पाहावे मनाचे!

पुनश्च स्वागत!

कलानाट्यचित्रपटमाध्यमवेधबातमीसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

16 Jan 2015 - 11:38 am | कलंत्री

प्रयोग / उपक्रम यशस्वी होवो.

खूप छान वाटले आपले संकेतस्थळ !!
शुभेच्छा !!

राजाभाउ's picture

16 Jan 2015 - 11:57 am | राजाभाउ

पाहुन आलो मस्त आहे.
शुभेच्छा !!

पियुशा's picture

16 Jan 2015 - 12:18 pm | पियुशा

शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

शुभेच्छा !

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jan 2015 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते

शुभेच्छा! नवीन आणि उत्तम काही तरी वाचायला मिळावे हीच अपेक्षा.

सविता००१'s picture

16 Jan 2015 - 12:41 pm | सविता००१

शुभेच्छा !
बिकांशी बाडिस

सौंदाळा's picture

16 Jan 2015 - 1:00 pm | सौंदाळा

इकडेही लिहित रहा
सदस्यकाळ : २ दिवस ४ तास
फक्त नविन संस्थळाची जाहिरात करण्यासाठी मिपाखाते काढले नसावे ही अपेक्षा.
नविन संस्थळास शुभेच्छा

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 1:07 pm | धर्मराजमुटके

पाहिले. संस्थळावर सभासद बनून थेट लिखाण करण्याची सुविधा नसल्यामुळे सध्यातरी पास. मात्र नजर ठेवली जाईल.

अजया's picture

16 Jan 2015 - 1:47 pm | अजया

शुभेच्छा!

नाखु's picture

16 Jan 2015 - 2:02 pm | नाखु

पाहावे मनाचे | वाचावे मिपाचे |
आस्वादा दोन्हीकडे | किर्ती (वाढो) चोहिकडे !

विशाखा पाटील's picture

16 Jan 2015 - 2:12 pm | विशाखा पाटील

शुभेच्छा! comment करण्याची सुविधा दिसतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2015 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा

शुभेच्छा! :HAPPY:

पिंपातला उंदीर's picture

16 Jan 2015 - 3:02 pm | पिंपातला उंदीर

शुभेच्छा ! मराठीत दृकश्राव्य कलाकृतीं या विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळाची खूप आवश्यकता होती . अगदी योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय .

अनुप ढेरे's picture

16 Jan 2015 - 8:34 pm | अनुप ढेरे

मराठीत दृकश्राव्य कलाकृतीं

अंहं
कोणत्याही भाषेतल्या चित्रपटांशी, टीव्ही मालिकांशी व नाटकांशी संबंधीत

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2015 - 3:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

शुभेच्छा...छान कल्पना आहे.

ते ठीकाय, पण नाव जरा अजून चांगलं नै का सुचलं हो? *mosking*

चेतन677's picture

16 Jan 2015 - 6:21 pm | चेतन677

खुप शुभेच्छा!!!!

साधा मुलगा's picture

16 Jan 2015 - 6:39 pm | साधा मुलगा

चांगला उपक्रम आहे.शुभेच्छा!!!

मुक्त विहारि's picture

16 Jan 2015 - 6:46 pm | मुक्त विहारि

शुभेच्छा!!!

शिद's picture

16 Jan 2015 - 6:53 pm | शिद

शुभेच्छा!!!

विकास's picture

16 Jan 2015 - 7:42 pm | विकास

प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा!

सौन्दर्य's picture

16 Jan 2015 - 8:29 pm | सौन्दर्य

सुंदर कल्पना, खूप खूप शुभेच्छा.

भाकरी's picture

16 Jan 2015 - 9:27 pm | भाकरी

तुमच्या सायटईवर? नाय तर आमी नाय जा येणार तिथे.

नवीन संस्थळ पाहिले. छान आहे. आवडले. शुभेच्छा!

मंदार कात्रे's picture

17 Jan 2015 - 5:39 pm | मंदार कात्रे

लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचे या सन्स्थळावर असलेले परीक्षण आक्ष्व्पार्ह आहे

साती's picture

18 Jan 2015 - 11:37 pm | साती

संस्थळाचे स्वरूप आवडले.
लेख अजून वाचायचे आहेत.
प्रकल्पाला शुभेच्छा!

समिर२०'s picture

18 Jan 2015 - 11:42 pm | समिर२०

शुभेच्छा!!!

पाहावे मनाचे's picture

20 Jan 2015 - 9:37 am | पाहावे मनाचे

सर्व मिपाकरांचे शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.
लवकर अधिक चित्रपटांची परिक्षणे येत रहातील. विविध प्रकारची, शैलीतील, लेखकांची नानातर्‍हेची नी हरतर्‍हेची परिक्षणे, चित्रपट/नाट्य/टिव्ही मालिका यांसबंधित प्रांजळ व थेट मनातून आलेले लेखन वाचकांना मराठीतून वाचायला मिळावे या भुमिकेतुन आमचे प्रयत्न चालु रहातीलच.

या निमित्ताने हे ही सांगणे अगत्याचे आहे की मिसळपाव (व ऐसीअक्षरे) या संस्थळांवरील "पाहावे मनाचे" हा आयडी केवळ या संस्थळासंबंधीत लेखनासाठी घेतलेला आयडी आहे. आम्हाला तसा आयडी घेऊ दिल्याबद्दल व या धाग्याद्वारे नव्या मराठी संस्थळाची घोषणा येथे ठेवल्याबद्दल मिसळपावच्या संपादक मंडळाचे व नीलकांतचे मनःपूर्वक आभार!

सर्व मिपाकरांचा असाच लोभ असावा किमान क्षोभ नसावा :) ही विनंती!

प्रोत्साहन, सुचना व शुभेच्छांबद्दल पुनश्च आभार!

कपिलमुनी's picture

20 Jan 2015 - 11:49 am | कपिलमुनी

परीक्षण म्हणजे ओकार्‍या नाही ओ !
दर्जा सुधारा !

माफ करा , काही परीक्षणे वाचली आत्तापर्यंत, दर्जा अतिशय सामान्य वाटला,
\
जमल्यास घरचा अभ्यास म्हणून येथील परा, फारेंड,समीरसूर यांची परीक्षणे वाचा

सूड's picture

20 Jan 2015 - 3:06 pm | सूड

घरचा अभ्यास

विशाल कुलकर्णी's picture

20 Jan 2015 - 4:45 pm | विशाल कुलकर्णी

'स्पा'साहेबांशी सहमत आहे. मला आधी वाटले कदाचित 'लोकमान्य' खूपच नावडला असेल, म्हणून मग इतरही काही परि़क्षणे वाचून पाहिली. पण बहुतांशी सगळी परि़क्षणे "फक्त" 'मला असे वाटते' या प्रकारातली वाटली. असो.
शुभेच्छा !

psajid's picture

20 Jan 2015 - 11:30 am | psajid

शुभेच्छा !

मराठीमध्ये चांगले चित्रपट येत आहे. त्याला पुरक आणि प्रेरक म्हणून चित्रपट संस्कृती वाढली(च) पाहिजे. अशी संस्थळे हे कार्य सोपे करतील अशी अपेक्षा आहे.

बर्‍याच वर्तमानपत्रात चित्रपटाविषयी भरभरुन येत असते. त्याच्याही संकलनासाठी येथे वाव असावा.

पदम's picture

20 Jan 2015 - 6:46 pm | पदम

मनापासुन शुभेच्छा!

पैसा's picture

20 Jan 2015 - 10:18 pm | पैसा

एक लेख आदिजोशीमुळे वाचला. काही वरवर चाळले. लिखाणाच्या शैलीवरून काही लेखकांबद्दल अंदाज आला. पण आंतरजालावरील आपली नेहमीची ओळख लपवायची वेळ या मंडळींवर का आली हे कळले नाही.

विशाल कुलकर्णी's picture

21 Jan 2015 - 1:10 pm | विशाल कुलकर्णी

;)

मृत्युन्जय's picture

21 Jan 2015 - 1:34 pm | मृत्युन्जय

नव्या संस्थळाला शुभेच्छा. संकल्पना आवडली. अश्या एका संस्थळाची गरजच होती. परंतु लेखकांना सदस्यत्व घेण्याची आणि परीक्षण स्वतः लिहिण्याची सोय अस्सावी असे वाटते.