पडघम २०१४-भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
24 Apr 2014 - 12:04 pm

यापूर्वीचे लेखन

भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ

सुरवातीला महाराष्ट्रात २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

      
महाराष्ट्रलोकसभाविधानसभा २००९ लोकसभा२००९ लोकसभा२००९ विधानसभा
 मते %मते %मतांमधील फरकलोकसभा जागाविधानसभा जागा आघाडीविधानसभा जागा
कॉंग्रेस१९.६%२१.०%१.४%१७७९८२
राष्ट्रवादी१९.३%१६.४%-२.९%८५२६२
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.३%०.९%-०.४%०१ 
भाजप१८.२%१४.०%-४.२%९६१४६
शिवसेना१७.०%१६.३%-०.७%११६१४४
मनसे४.१%५.७%१.६% ८१३
बसपा४.८%२.४%-२.४%   
बहुजन विकास आघाडी०.६%०.५%-०.१%१३२
स्वाभीमानी पक्ष१.३%०.८%-०.५%१४१
इतर१३.८%२२.८%९.०%११९३८

लोकसभा निवडणुकांमध्ये ’इतरांना’ २८८ पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली.यापैकी कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलीक यांना ४ विधानसभा मतदारसंघातून तर सांगलीमधील अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांना ३ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली.वेरूळचे स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून निवडणुक लढवून दोन विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की २००९ मध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी गुंतागुंतीची होती.

२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही. युपीए ने ज्या २५ जागा जिंकल्या त्यापैकी ८ जागा (मुंबईतील उत्तर मध्य मुंबई सोडून अन्य पाच, ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक) मनसेने शिवसेना-भाजपची मते फोडल्यामुळे जिंकल्या होत्या. यावेळी शिवसेना-भाजप बरोबरच रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभीमानी पक्ष तसेच महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष अशी पाच पक्षांची महायुती आहे. यापैकी रिपब्लिकन पक्ष मुंबई आणि विदर्भात तर स्वाभीमानी पक्ष आणि काही प्रमाणात राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्रात युतीसाठी फायदेशीर ठरू शकतो. केंद्रातील युपीएसरकारच्या गेल्या दहा वर्षातील (विशेषत: गेल्या पाच वर्षातील) कारभाराविरूध्द आणि महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील प्रस्थापित सत्तेमुळे राज्यातील जनमत यावेळी युपीए विरूध्द जाईल असे गृहितक आहे. याची सुरवात २००९ मध्येच झाली होती पण त्यावेळी मनसेमुळे युपीए तरली.

आम आदमी पक्षाचा परिणाम
आता यावेळी परिस्थिती कशी असेल याविषयीचा माझा अंदाज व्यक्त करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे. राज्यात आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत त्याचा कितपत परिणाम होईल? जेव्हा निवडणुकीत बऱ्यापैकी नाव आणि सामर्थ्य असलेला नवखा पक्ष येतो तेव्हा पहिल्यांदा तो फ्लोटिंग मते खातो. ही फ्लोटिंग मतांना धक्का पोहोचवल्यानंतर तो ताकदवान असेल तर प्रस्थापित पक्षांना धक्का पोहोचवतो. आता ही फ्लोटिंग मते म्हणजे नक्की काय? ज्या पक्षांचे सामर्थ्य लोकसभेची जागा जिंकता येईल इतके नसते तरीही स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या सामर्थ्यावर किंवा अन्य कारणाने हे पक्ष बऱ्यापैकी मते घेतात यांना मिळालेली मते मी फ्लोटिंग मते म्हणून धरतो. उदाहरणार्थ बहुजन समाज पक्षाला विदर्भात २००९ मध्ये विविध मतदारसंघांमध्ये १० ते १७% मते मिळाली होती. तर मनसेला मुंबईत २०% च्या आसपास तर नाशिकमध्ये ३३% पर्यंत मते मिळाली होती. तसेच महाराष्ट्रात इतरांना २००९ मध्ये तब्बल १३.८% मते मिळाली होती. अशा फ्लोटिंग मतांवर आम आदमी पक्षासारख्या नव्या पक्षाचा हल्ला होईल.यापैकी मनसेची मते सगळ्या मतदारसंघांमध्ये ’फ्लोटिंग’ नक्कीच नाहीत.अशा पक्षाने एखादा तगडा उमेदवार दिल्यास तो उमेदवार लोकसभेची जागा जिंकू शकतो पण अन्यत्र अशी मते नव्या पक्षाकडे काही प्रमाणात जातील ही शक्यता जास्त.

नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो याविषयी या लेखमालेच्या पहिल्या लेखावरील एका प्रतिसादात गुजरात-१९९८ आणि दिल्ली-२०१३ च्या निवडणुकांची आकडेवारी देऊन स्पष्ट केले आहे.

१. मुंबई (६ जागा)
मुंबई उत्तर: या मतदारसंघात भाजपकडून गोपाळ शेट्टी तर कॉंग्रेसकडून संजय निरूपम उमेदवार आहेत. आआपकडून सतीश जैन आहेत. मागच्या वेळी मनसेने मते खाल्ल्यामुळे कॉंग्रेसला ही जागा जिंकता आली.यावेळी मनसे रिंगणात नाही.तसेच गोपाळ शेट्टी हे भाजपचे स्थानिक उमेदवार आहेत.तसेच नरेंद्र मोदींमुळे बोरिवली-मागाठाणे मधील बरीचशी गुजराती मते भाजपला मिळतील असे वाटते.सतीश जैन यांनी वीजघोटाळा बाहेर आणण्यात महत्वाचे काम केले असले तरी ते मेधा पाटकर किंवा मीरा सन्याल यांच्यासारखे ’हाय प्रोफाईल’ उमेदवार नाहीत.तसेच आआपने मोदींना लक्ष्य बनविल्यामुळे त्याचा फटका पक्षाला गुजराती मते दूर जाऊन नक्कीच बसेल असे वाटते. तेव्हा मुंबई उत्तर मधून भाजप जिंकेल हा अंदाज.

मुंबई उत्तर पश्चिम: या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, कॉंग्रेसकडून गुरूदास कामत, आआपकडून मायांक गांधी तर मनसेकडून महेश मांजरेकर उमेदवार आहेत. या मतदारसंघात २००९ मध्ये सुमारे ३०% फ्लोटिंग मते होती (अबू आझमी:समाजवादी पक्ष: १२% मते, शालीनी ठाकरे: मनसे: १७.५%).यावेळी समाजवादी पक्षाचा उमेदवार नाही. तेव्हा ती १२% मते आआप, कॉंग्रेस आणि काही प्रमाणावर शिवसेना यात विभागली जातील. कॉंग्रेसचे गुरूदास कामत मुळातले या मतदारसंघातले नाहीत.ते मुंबई उत्तर-पूर्वमधून निवडून येत.याउलट गजानन किर्तीकर मालाडमधून विधानसभेवर निवडून जात.कॉंग्रेसला मुळातच प्रस्थापितविरोधी मतांचा सामना करावा लागत आहे त्यात हा मुद्दा फार सुखावह नक्कीच नाही.मनसेने महेश मांजरेकर हे अराजकीय उमेदवार दिले आहेत. २००९ चा अनुभव लक्षात घेता मतविभागणी होऊन कॉंग्रेस निवडून यायला नको या उद्देशाने आणि विशेषत: नंतर मोदींना पाठिंबा द्यायचे राज ठाकरेंनी जाहिर केले आहे या पार्श्वभूमीवर मांजरेकर मागच्या वेळी शालिनी ठाकरेंनी घेतली होती तितकी मते नक्कीच घेणार नाहीत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना जिंकेल हा अंदाज. कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल तर तिसऱ्या क्रमांकासाठी मनसे आणि आआपमध्ये चुरस असेल हा अंदाज.

मुंबई उत्तर पूर्व: या मतदारसंघात भाजपकडून किरीट सोमय्या, राष्ट्रवादीकडून संजय पाटील तर आआपकडून मेधा पाटकर उमेदवार आहेत.मनसेचा उमेदवार नाही याचा फायदा भाजपला होईल.तसेच मुलुंड-घाटकोपर मधली गुजराती मते मोठ्या प्रमाणावर सोमय्यांना मिळतील.मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनामुळे एकूणच गुजराती समाजात त्यांच्याविषयीचे मत फार चांगले नाही.त्यामुळे त्या स्वत: रिंगणात असल्यामुळे गुजराती मते अधिक प्रमाणावर किरीट सोमय्यांकडे वळतील. या मतदारसंघात मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी रहिवासी आहेत.रिपब्लिकन पक्ष युतीबरोबर आहे आणि मेधा पाटकर यांनी झोपडपट्टी रहिवाशांसाठी केलेल्या चळवळी लक्षात घेता या भागातून मते आआप आणि भाजप यांच्यात मुख्यत्वे विभागली जातील.मुंबई उत्तर पूर्व मधून भाजप नक्की.दुसऱ्या क्रमांकावर मेधा पाटकर येणार की संजय पाटील हेच बघायचे.

मुंबई उत्तर मध्य: या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन, कॉंग्रेसकडून प्रिया दत्त, समाजवादी पक्षाकडून फरहान आझमी तर आआपकडून नानी पालखीवालांचे चिरंजीव फिरोझ पालखीवाला उमेदवार आहेत.हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी सुरक्षित आहे. या मतदारसंघात भाजपकडे चांगला उमेदवार नाही.पूनम महाजन हा काही भाजपचा फार लोकप्रिय चेहरा आहे असे नाही.आमदार पराग आळवणींना उमेदवारी दिली असती तर त्यांनी थोडी चांगली लढत दिली असती असे वाटते.त्यातून पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात कुर्ला आणि कलीना विधानसभा मतदारसंघही आले आहेत.तिथल्या झोपडपट्टीतील काही मते रिपब्लिकन पक्षामुळे पूनम महाजनांना मिळतीलही.पार्ल्यामधूनही त्यांना आघाडी मिळायला हरकत नसावी.तरीही कुर्ला-कलीना,बांद्रा पूर्व आणि पश्चिम येथून मते घेऊन प्रिया दत्त यांना जिंकण्यास फार अडचण येऊ नये. काही प्रमाणात समाजवादी पक्षही मते घेईल पण ती प्रिया दत्त यांना डोकेदुखी निर्माण करतील असे वाटत नाही. आआपने इथून बराच कमजोर उमेदवार दिला आहे.त्याचा फार फरक पडू नये. तेव्हा मुंबई उत्तर मध्य मधून कॉंग्रेस हा अंदाज

मुंबई दक्षिण मध्य: या मतदारसंघात शिवसेनेकडून राहुल शेवाळे, कॉंग्रेसकडून एकनाथ गायकवाड तर मनसेकडून आदित्य शिरोडकर उमेदवार आहेत.२००९ मध्ये मनसेच्या श्वेता परूळेकर यांनी मते खाल्ल्यामुळे एकनाथ गायकवाड जिंकले होते.या मतदारसंघात धारावी,सायन-कोळीवाडा आणि अणुशक्तीनगरमध्ये कॉंग्रेसला आघाडी मिळायला हरकत नसावी. माहिम आणि वडाळा या भागातून शिवसेना आघाडीवर असेल असा अंदाज.चेंबूरमध्ये मागच्या वेळी मनसेने बरीच मते घेतली होती.यावेळी रिपब्लिकन पक्ष युतीबरोबर असल्यामुळे ती मते शिवसेनेकडे जायला हरकत नसावी.या मतदारसंघात मुंबईतील सर्वात चुरशीची निवडणुक होईल असे वाटते. तरीही मनसेने मते खाल्ल्यामुळे शेवटी कॉंग्रेस जिंकेल असे वाटते. तेव्हा मुंबई दक्षिण मध्य मधून कॉंग्रेस हा अंदाज

मुंबई दक्षिण: या मतदारसंघात शिवसेनेकडून अरविंद सावंत, कॉंग्रेसकडून मिलिंद देवरा, मनसेकडून बाळा नांदगावकर तर आआपकडून मीरा सन्याल उमेदवार आहेत.२००९ मध्ये भायखळा आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरांना मोठी आघाडी मिळाली होती.मुंबादेवी मतदारसंघात पुनर्रचनेनंतर नागपाडा आणि आजूबाजूचा अल्पसंख्यांक विभाग सामील झाला आहे.अल्पसंख्याकांमधील आआपची लोकप्रियता लक्षात घेता या मतदारसंघात आआप कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरणार असे वाटते.२००९ मध्ये मिलिंद देवरांना मलबार हिल आणि कुलाबामधूनही आघाडी होती. या भागातून मीरा सन्याल यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्या काही प्रमाणावर मते नक्कीच घेतील असे वाटते.बाकी शिवडी-परळ,वरळी येथून नांदगावकरांना आघाडी मिळायला हरकत नसावी.यावेळी शिवसेनेकडून अरविंद सावंत हा मोहन रावलेंपेक्षा कमी परिचित चेहरा आहे तर मनसेचे मुंबईतील आघाडीच्या नेत्यांपैकी एक बाळा नांदगावकर उमेदवार आहेत.यामुळे शिवसेनेकडून मते काही प्रमाणात मनसेकडे जातील असे वाटते.त्यातून आआप कॉंग्रेसची मते फोडायची शक्यता आहे. त्यातून मुंबई दक्षिणमधून मनसे जिंकेल हा अंदाज

२. मुंबई परिसर आणि कोकण (६ जागा)
ठाणे: या मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे, राष्ट्रवादीकडून संजीव नाईक, मनसेकडून अभिजीत पानसे तर आआपकडून संजीव साने उमेदवार आहेत. या मतदारसंघात ऐरोली आणि बेलापूरमधून राष्ट्रवादीला आघाडी मिळायला काहीच हरकत नसावी. २००९ मध्ये ठाणे शहरातून शिवसेना पहिल्या क्रमांकावर तर मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती.शिवसेनेला निसटती आघाडी मिळाली होती. २००९ मध्ये शिवसेना उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फटका पक्षाला बसला.यावेळी राजन विचारे हा परिचित चेहरा शिवसेनेने दिला आहे.त्याचा फायदा शिवसेनेला व्हायला हवा.तेव्हा ठाणे शहर आणि कोपरी-पाचपाखाडीमधून शिवसेनेला चांगली आघाडी मिळेल असे वाटते.ओवळा-माजीवडा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेने मते फोडल्यामुळे राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती.यावेळी मनसेने शिवसेनेतून आयत्या वेळी आलेल्या अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे.२००९ चा अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसविरोधी मते शिवसेनेकडे जास्त प्रमाणावर जातील हे गृहित धरतो त्यामुळे ओवळा-माजीवाडा आणि मीरा-भाईंदरमधून शिवसेनेला आघाडी मिळेल असे वाटते.तेव्हा ठाण्यातून शिवसेना हा अंदाज

कल्याण: या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर मनसेकडून प्रमोद पाटील उमेदवार आहेत.२००९ मध्ये कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीला आघाडी चांगली मिळाली होती.यावेळी काही प्रमाणावर अल्पसंख्यांकांची मते आआपकडे जातील.तसेच २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे उमेदवार होते.ते त्या भागात नक्कीच लोकप्रिय आहेत.पण ती लोकप्रियता आनंद परांजपे यांची नक्कीच नाही.कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमधून शिवसेनेला आघाडी नक्की. त्या आघाडीच्या जोरावर श्रीकांत शिंदे जिंकतील असे वाटते. तेव्हा कल्याणमधून शिवसेना हा अंदाज

भिवंडी: या मतदारसंघात कॉंग्रेसकडून विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले कपिल पाटील भाजपचे उमेदवार म्हणून, आआपकडून जलालुद्दिन अन्सारी तर मनसेकडून सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत. २००९ मध्ये विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती आणि भिवंडी (ग्रामीण) आणि शाहपूर मधून आघाडी मिळवली होती.यावेळी ते कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.भाजपकडे स्वत:चा उमेदवार नव्हता अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आयात केलेल्या उमेदवाराला तिकिट द्यावे लागले.भाजपला कल्याण (पश्चिम) मध्ये संधी नक्कीच आहे पण तिथे मनसे उमेदवार किती मते फोडतो यावर बरेच काही अवलंबून आहे. आआप भिवंडी शहरातील दोन विधानसभा मतदारसंघातून काही प्रमाणावर अल्पसंख्याकांची मते घेईल पण ती कॉंग्रेसला डोकेदुखी निर्माण करतील इतक्या प्रमाणावर असतील असे वाटत नाही. तेव्हा भिवंडीमधून कॉंग्रेस हा अंदाज

रायगड: या मतदारसंघात शिवसेनेकडून अनंत गीते, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे तर शेकापकडून भाई कदम उमेदवार आहेत. २००९ मध्ये शिवसेना आणि शेकापची युती होती.त्याचा फायदा शिवसेनेला झाला.यावेळी शेकापने स्वत:चा उमेदवार उभा केला आहे तेव्हा शिवसेनेला त्याचा फटका बसेल. राष्ट्रवादीकडून मंत्री सुनील तटकरे उमेदवार आहेत याचा काही प्रमाणात त्यांना फटका बसेल असे वाटते.राष्ट्रवादीचा मंत्री (आणि तो पण भुजबळांसारखा तगडा नाही) हा एक मायनस पॉईंट नक्कीच आहे.तेव्हा शेकाप नुसती शिवसेनेचीच नाही तर राष्ट्रवादीचीही मते खाईल.शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागरमधून आघाडी मिळायला हरकत नसावी.या मतदारसंघाविषयीचा माझा अंदाज असा की शिवसेना जिंकेल आणि दुसऱ्या क्रमांकासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होईल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग: हा मतदारसंघ इंटरेस्टिंग आहे.या मतदारसंघातून शिवसेनेकडून विनायक राऊत तर कॉंग्रेसकडून नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे उमेदवार आहेत. २००९ मध्ये नीलेश राणे यांनी सुरेश प्रभूंचा ७% ने पराभव केला होता. नीलेश राणे यांनी कणकवली आणि कुडाळमधून चांगली आघाडी घेतली आणि त्या जोरावर ते निवडून आले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रत्नागिरी मध्ये नीलेश राणे यांना ५% पेक्षा कमी आघाडी होती तर राजापूरमधून सुरेश प्रभूंना निसटती आघाडी होती. सावंतवाडीमध्ये नीलेश राणे यांना २% पेक्षा कमी आघाडी होती.यावेळी राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही. नारायण राणेंचा बालेकिल्ला कणकवली आणि कुडाळमध्ये नीलेश राणे किती आघाडी घेतात यावर निकाल ठरेल.त्यात नीलेश राणेंची डोकेदुखी वाढवायला राष्ट्रवादी त्यांना मनापासून साथ देत आहे असे चित्र नाही.या मतदारसंघात नारायण राणेंना धक्का देत शिवसेना विजयी होईल असे मला वाटते.

पालघर: या मतदारसंघात भाजपकडून चिंतामण वनगा, बहुजन विकास आघाडीकरून बळीराम जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून लडक्या खर्पडे तर आआपकडून पांडुरंग पारधी हे उमेदवार आहेत.आपण जिंकू शकणार नाही असे गृहित धरून कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.वास्तविकपणे हा निर्णय काहीसा आश्चर्यकारक आहे.या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा, राष्ट्रवादीचे शंकर नम हे नेते असतानाही आपण निवडून येणार नाही म्हणून आधीच शस्त्रे म्यान करणे अनाकलनीय आहे. २००९ मध्ये भाजपच्या चिंतामण वनगांचा १२ हजार मतांनी पराभव झाला होता.भाजपला विक्रमगड आणि पालघरमधून आघाडी होती, बहुजन विकास आघाडीला वसई, नालासोपारा आणि बोईसरमधून आघाडी होती तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला डहाणूमधून आघाडी होती. कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला म्हणून सगळी कॉंग्रेसची मते त्या आघाडीला जातील असे नक्कीच नाही.विशेषत: हितेन्द्र ठाकूर या फारसा चांगला चेहरा नसलेला बविआचा नेता असताना.त्यातील बरीच मते भाजपकडे वळतील असे वाटते.मुंबईच्या इतर भागात भाजप-सेना युतीला अनुकूल वातावरण लक्षात घेता विशेषत: वसई-विरार आणि नालासोपारा या मुंबईचाच भाग बनलेल्या भागातून बहुजन विकास आघाडीला निवडणुक २००९ इतकी सोपी जाऊ नये. २००९ मध्ये बळीराम जाधव यांना नालासोपारामधून ३० हजारांची तर वसई आणि बोईसरमधून ६ हजारांची आघाडी मिळाली होती.यात वसईमध्ये बळीराम जाधव यांना बऱ्यापैकी आघाडी नक्कीच मिळेल. नालासोपारामध्ये भाजप नक्कीच कडवी लढत देईल. विक्रमगड आणि पालघरमध्येही वनगांना आघाडी मिळायला कठिण जाऊ नये. डहाणूमध्ये कम्युनिस्टांचा जोर असतो. तिथे बविआ त्यामानाने कमजोर आहे.तेव्हा डहाणूमध्ये कम्युनिस्ट आणि भाजप यांच्यात कडवी लढत होईल असे वाटते.या सगळ्यांचा परिणाम म्हणून या मतदारसंघात बरीच चुरशीची निवडणुक होईल असे वाटते.२००९ मध्ये वनगा थोडक्यात हरले होते.यावेळी ते थोडक्यात जिंकतील असे वाटते.त्यातून वसई आणि नालासोपारामध्ये भाजपला मला वाटते तितकी मते मिळाली नाहीत तर बहुजन आघाडी नाहीतर भाजप अशी परिस्थिती असेल. तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.

प्रतिक्रिया

मस्त व अपेक्षित अदांज. पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.

क्लिंटन's picture

24 Apr 2014 - 5:03 pm | क्लिंटन

पण आमच्या पालघर मतदार संघाला का वगळले? त्याचे पण विश्लेषण येउ द्या.

अरे हो. पालघर राहिलेच की. लेख संपादित करून पालघरचा समावेश केला आहे.

(हल्ली लेखकालाच लेख संपादित करता येऊ लागले आहेत का? तसे वाटत आहे खरे)

धन्यवाद क्लिंटन, माझ्या विनंतीचा मान राखुन पालघर मतदारसंघाचे अंदाज व्यक्त केल्याबद्दल. :)

कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

ह्या मागे फार मोठे अर्थकारण झाले आहे बविआ व कॉंग्रेस मध्ये.

या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा,

ह्या वेळी दामू शिंगडा ह्यांना कॉंग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज होवुन त्यांनी त्यांच्या मुलाला सचिन शिंगडा ह्यांना अपक्ष म्हणून रींगणात आणले आहे.

तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.

तुमचा हा अंदाज खरा ठरावा ही आकाशातल्या बापाकडे मनापासुन प्रार्थना. वसई-विरारकर बविआ'च्या घाणेरड्या राजकारणाला पिचले आहेत.

अवांतरः खालील ओळी ह्या अश्याच टिपी म्हणुन माझ्या बविआ समर्थक मित्रांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वर खरडल्या होत्या.

तुम्ही काही म्हणा पण विरार ची खूप प्रगती झाली आहे...
मनवेलपडा ला संध्याकाळी जायला रिक्षा मिळत नाही म्हणून काय झाले...
अंडर ग्राउंड समोर २४ तास वाहतूक कोंडी असली म्हणून काय झाले...
बिना लायसन्स रिक्षावाले मोकाट सुटले म्हणून काय झाले....
दिवसा ढवळ्या सोन्याची चेन खेचली म्हणून काय झाले...
फेरीवाले कुठे हि ठाण मांडून बसले म्हणून काय झाले....
थोडे फार खड्डे रस्त्यांत असले म्हणून काय झाले....
गरज नसताना स्काय वॉक बांधला म्हणून काय झाले....
गरज असताना ओवर ब्रिज चे काम थांबून ठेवले म्हणून काय झाले...
युपी बिहार च्या मस्तवाल लोकांना व बांगलादेशी देशाद्रोहींना राहायला जागा वीज पाणी ची सोय करून दिली म्हणून काय झाले....
कोण म्हणतोय कि विरार ची प्रगती झाली नाही म्हणून...हीच तर खरी आदर्श प्रगती.

शिवसेना ठाणे( राजन विचारे), कल्याण(डॉ श्रीकांत शिंदे), रायगड(अनंत गीते), रत्नागिरी-सिंधूदुर्ग(विनायक राउत) इथे जिंकेलच. पण मुंबई मध्ये गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत विजयी होतील. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांना उमेदवारी दिल्याने सामान्य शिवसैनिक आणि सेनचा पारंपारिक मतदार समाधानी आहे तिथे गुजराती समाज पण मोदींमुळे सेनेला मत देईल.नांदगावकर यंदा नाखुशीने मैदानात उतरले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत बाळा नांदगावकरांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वार्डात सेनेने मनसेचा पार धुव्वा उडवला होता. अरविंद सावंतांना तिथे चांगली संधी आहे. तसेच दक्षिण मध्य मध्ये सेनेचे राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात जोरात चुरस आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे कमीत की २ (जास्तीत जास्त तिन्ही) उमेदवार जिंकतील. मुंबई मध्ये भाजप २ जागा जिंकेल, भाजपला पालघर मध्ये पण चांगली संधी आहे मात्र भिवंडी कॉंग्रेसकडे जाइल असा माझा अंदाज आहे.

पैसा's picture

24 Apr 2014 - 1:53 pm | पैसा

पण महाराष्ट्राच्या बाबतीत एक मोठ्ठा ढिस्क्लेमर आहे. मतदान यंत्रातील घोटाळे आणि गायब झालेली ६० लाख नावे (६० लाख म्हणजे ४/५ मतदारसंघ झाले.) यांचा नेमका काय परिणाम होईल हे ती नावे गायब करणारी कंपनीच जाणे. रत्नागिरीतील बरीच नावे गायब झाल्याचे ऐकले आहे.

दुश्यन्त's picture

24 Apr 2014 - 2:02 pm | दुश्यन्त

६० लाख नावे गायब वगैरे कितपत खरे असेल माहित नाही.बरीच नावे एका जागेहून दुसरीकडे टाकली (स्थलांतरित झाल्याने) तरी लोक वगळली म्हणत आहेत.तरीदेखील प्रशासकीय घोळामुले काही नवे नक्कीच गायब आहेत. फक्त आकडा ६० लाख खरा वाटत नाही आणि नावे वगळली गेली तरी सर्वच पक्षांना त्याचा थोड्या फार प्रमाणात सारखाच फटका बसणार आहे.पुण्यात कोथरूड वगैरे भागात बरीच नावे गायब झाली तिथे महायुतीचे मतदार जास्त हे जर वेळ मान्य केले तरी बाकी ठिकाणी तसे नाही. नावे वगळली जाणे याचा सर्वच पक्षांना सारखाच फटका बसेल.

पैसा's picture

24 Apr 2014 - 2:44 pm | पैसा

इलेक्शन कमिशनचे महाराष्ट्रातील अधिकारी नितीन गद्रे यांनीच हा आकडा दिला आहे. तसेच ती नावे "वगळली" असेही ते म्हणत आहेत.
http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-n...
एका जिल्ह्यातली एक लाख नावे दुसर्‍या जिल्ह्यात आपोआप दाखवली गेली हा तर अगदीच विचित्र प्रकार ऐकायला येतो आहे.

ऋषिकेश's picture

24 Apr 2014 - 2:32 pm | ऋषिकेश

मुंबई दक्षिण, उत्तर पूर्व व काही प्रमाणात भिवंडी इथे आआपला बरेच अंडर एस्टिमेट केले आहे असे वाटते. भिवंडीला आआप जिंकणार नक्की नाही पण निकालांवर जाणवणेबल परिणाम करेलसे वाटते. मुंबई दक्षिण व उत्तर पूर्व यात आअपचा अंडरकरंट असण्याची शक्यता आहे.

रायगड मध्ये तटकरेंना हरवणे इतके सोपे जाऊ नये. शेकाप वेगळी झाली आहेच, दुसरे असे की शेकापचा पारंपरिक मतदार हो पनवेल, उरण, कर्जत भागात होता तो भाग आता मावळ मतदारसंघात आहे. यातील शहरी भागात (पनवेल वगैरे)शिवसेनाही मजबुत होती. तटकरेंचा मतदार मात्र एकसंध अजुनही शाबुत आहे. या मतदारसंघात मोठी चुरस व्हायची शक्यता आहे.

मुंबई दक्षिण मध्य सर्वात चुरशीचा होईल याच्याशी सहमत!

क्लिंटन-२००९ च्या लोकसभेतही महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आघाडीविरोधी जनमत होते हे मात्र पटले.तुम्ही लिहील तसं मुंबईतील ६ पैकी ५ मतदार संघ, तसेच ठाणे, भिवंडी, नाशिक, पुण्यात मनसेमुळे कॉंग्रेस-एनसीपी निवडून यायला मदत झाली. मुंबई आणि ठाणे जिल्हा मिळून १० जागा लोकसभेच्या आहेत.पैकी २००९ला केवळ कल्याण युतीकडे आले होते बाकी नऊ जागी कॉंग्रेस, एनसीपी आणि पालघरला ब. वि. आघाडी आली होती. मात्र एवढे होवूनही उर्वरित महाराष्ट्रात युतीने (तेव्हा महायुती झाली नव्हती) ३८ पैकि १९ जागा जिंकल्या होत्या, कोल्हापुरात अपक्ष मंडलिक तर हातकनंगले मध्ये राजू शेट्टी हे दोघे कॉंग्रेस- एनसीपीला हरवून विजयी झाले होते. २००९ला मनसेमुळे झालेले विरोधी मतांचे विभाजन होवून कॉंग्रेस- एनसीपीला फायदा झाला होता.अर्थात बाकीही काही मुद्दे नक्कीच होते मात्र हा एक महत्वाचा मिद्द होता. यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.तसेच सेना-भाजप बरोबर आर पी आय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे तेव्हा राज्यात महायुतीला चांगला फायदा होईल असे दिसत आहे.

क्लिंटन's picture

24 Apr 2014 - 5:08 pm | क्लिंटन

यंदा मनसेचा करिष्मा ओसरलाय हे लक्षात येतंय, मनसेला मत= कॉंग्रेस आघाडीला फायदा हे समीकरण लोकांच्या लक्षात आल आहे.

हो माझे पण हे गृहितक आहेच. दक्षिण मुंबईतून मनसे तरीही जिंकेल असे मला वाटते कारण आआप मिलिंद देवरांची बरीच मते खाईल. तसेच शिवसेनेचा उमेदवार मोहन रावलेंइतका सुपरिचित आहे असे वाटत नाही.आणि मधल्या काळात मोहन रावले पक्षाबाहेर जाणे (ते परत आले असले तरी) यामुळे शिवसेनेला थोडेफार नुकसान होईलच. महापालिकेत मनसेचा त्या भागातून पराभव झाला होता हे मान्य.पण तरीही महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुद्दे नक्कीच वेगळे असतात. प्रत्यक्षात काय होते हे १६ मे रोजीच कळेल :)

मोदी जेव्हा प्रथम मुंबईत आले होते तेव्हा, दक्षिण मुंबईतल्या व्यापारी बंधुंनी मिलिंद देवरा आणि मोदींना एकाच स्टेजवर आणले होते. त्याच्या मतानुसार, आमचा खासदार मिलिंद देवरा, पण सत्ता मोदींची. त्यामुळे काँग्रेसची मत फुटणार नाहीतसे वाटते. शिवाय, आदी गोदरेज आणि दीपक पारेख यांनी देवरांना पसंती दिली आहे. त्याचा नाही म्हणायला "इन्फ्लुअंस" पडतोच. काँग्रेसची मत फुटलीच तर ती भेंडीबाजार/मशिद बंदर मधली फुटतील. देवरांच्या रॅली मध्ये याही एरीयात जोर होता हे मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची ही सिट पक्की असावी. आआप फक्त काँग्रेसचीच मत खातील अस मला वाटत नाही. बघू निकाल काय येतोय ते.

दुश्यन्त's picture

24 Apr 2014 - 2:47 pm | दुश्यन्त

ऋषिकेश- भिवंडी बद्दल माहित नाही मात्र मुंबई मध्ये 'आप' ईशान्य मुंबई (मेधा पाटकर) चांगल्यापैकी आणि दक्षिण मुंबईमध्ये (मीरा सन्याल) बर्यापैकी मते घेईल.दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल. ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे.सुरुवातीपासून तिथे आपने आणखी जोर लावला असता तर कदाचित मेधाताई तिथे जिंकल्या सुद्धा असत्या.

क्लिंटन's picture

24 Apr 2014 - 5:11 pm | क्लिंटन

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गात आणि मुस्लिमांत आपचा झाडू जेवढा चालेल तेवढा कॉंग्रेसला तोटा आणि महायुतीला फायदा होईल.

+१. म्हणूनच कधीकधी वाटते की १६ मे रोजी आआपला भाजपची बी टिम असे म्हटले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटू नये :)

ईशान्य मुंबईत तर मेधाताई पाटकर या किरीट सोमय्या विरुद्ध संजय दिना पाटलाना मागे टाकून दुसरे स्थान घेतील अशी शक्यता आहे

हो म्हणूनच मुळातल्या लेखात दुसर्‍या स्थानासाठी मेधा पाटकर आणि संजय पाटील यांच्यात लढत होईल असे म्हटले आहे :)

क्लिंटन- महायुतीला मनसे बेजार करत असेल तर तसच काहीस आप आणि सपा कॉंग्रेस आघाडीला ताप देवू शकतात.
उर्वरित महाराष्ट्राबद्दलचे अंदाज पण लवकरच येवू देत. :)

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2014 - 5:34 pm | श्रीगुरुजी

उत्तम विश्लेषण! तुमचे बहुतेक सर्व अंदाज बरोबर येतील असे वाटते.

दुश्यन्त's picture

24 Apr 2014 - 7:30 pm | दुश्यन्त

चल मतदान तर संपल आता १६ मेला काय ते स्पष्ट होईल. मुंबईमध्ये अंदाजे ५३% तर राज्यात बाकी ठिकाणी सरासरी अंदाजे ५६% अस मतदान झाल्याच समजतंय. अधिकृत आकडे येतीलच. मुंबईमध्ये २००९ल ४१% च्या आसपास मतदान झाल होत म्हणजे यंदा त्यात वाढ झाली आहे. मात्र अपेक्षा आणखी मतदानाची होती.बर्याच लोकांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आल नाही.रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे ६०% मतदान झाल आहे. मात्र सगळ्यात कमी मतदान कल्याण (४२%), भिवंडी (४३%) आहे ठाणे (५२%).

मी-सौरभ's picture

24 Apr 2014 - 8:47 pm | मी-सौरभ

निकालाबद्दल आता उत्सुकता आहे.

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2014 - 8:57 pm | राजेश घासकडवी

छान विश्लेषण. घोडा मैदान जवळच आहे.

२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही.

हे विधान फार व्यापक वाटतं.

साल कॉंग्रेस+एनसीपी भाजपा+शिवसेना
२००४ ४२%(जागा २२) ४३%(जागा २५)
२००९ ३९%(जागा २५) ३७%(जागा २०)

२००९ साली शिवसेनेची मतं २% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली आणि जागा फक्त एकच कमी झाली. याउलट भाजपाची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट)नी कमी झाली आणि जागा ४ गेल्या. मनसेमुळे मतं कमी झाली हे उघडच आहे. पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.

नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो

याही विधानाचा वरच्या आकडेवारीनुरूप पुनर्विचार व्हायला हवा. मनसेसारख्या नवीन पक्षाने भाजपा आणि कॉंग्रेसची मतं खाल्ली. तशीच ती इतर फ्लोटिंग लोकांनीही खाल्ली. टक्केवारीत तोटा राष्ट्रीय पक्षांचा मोठा झाला - दोघांचे मिळून ८% पॉइंट्स! आणि मनसेला ५% मतंच मिळालेली असल्यामुळे इतरांनाही त्यातली काही गेली.

क्लिंटन's picture

24 Apr 2014 - 10:37 pm | क्लिंटन

पण मनसेचा तोटा शिवसेनेला अधिक व्हायला हवा, भाजपाला कमी. तसं चित्र दिसत नाही. याउलट कॉंग्रेसची मतं ४% (पर्सेंटेज पॉइंट) नी कमी झाली. आणि एनसीपीची मतं १% ने वाढली. या चार पक्षांत मिळून सुमारे ९% (पर्सेंटेज पॉइंट) ने मतं कमी झाली. आणि ती मनसेसारख्या लोकल पक्षांना वाटली गेली. तेव्हा यूपीएविरुद्ध जितका कौल होता तितकाच भाजपाविरुद्धही होता. किंबहुना आपल्याला इथे राष्ट्रीय पक्षांची मतं कमी होऊन स्थानिक पक्षांसाठी वाढलेली मतं दिसतात.

पूर्ण राज्यपातळीवरील मते एकत्र केली तर असे चित्र दिसेल.पण ते चित्र पूर्णपणे परिस्थितीशी मिळतेजुळते आहे असे नाही. सर्वप्रथम २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण राज्यपातळीवर पुढीलप्रमाणे चित्र होते:

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%१९.६%-४.२%
राष्ट्रवादी१८.३%१९.३%१.०%
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.०%१.३%०.३%
जोगेन्द्र कवाडे (चिमूर)०.७% -०.७%
बच्चू कडू (अमरावती)०.६% -०.६%
हरीभाऊ महाले (मालेगाव)०.६% -०.६%
एकूण युपीए४५.०%४०.२%-४.८%
शिवसेना२०.१%१७.०%-३.१%
भाजप२२.६%१८.२%-४.४%
अजित घोरपडे (सांगली) ०.९%०.९%
एकूण एन.डी.ए४२.७%३६.१%-६.६%
मनसे ४.१%४.१%
बसपा३.१%४.८%१.७%
सपा०.८%१.०%०.२%
इतर८.४%१३.८%५.४%

मी म्हणतो की राज्यपातळीवरील कल बघितला तर तो परिस्थितीचे नक्की चित्र उभे करत नाही याचे कारण जो मनसेचा इफेक्ट आपण विचारात घेत आहोत तो पूर्णपणे स्थानिक एफेक्ट होता. मुंबई-ठाणे परिसरातील ९ लोकसभा जागांच्या परिसरात (मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण आणि भिवंडी) २००४ आणि २००९ मध्ये चित्र पुढीलप्रमाणे होते.

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
मुंबई-ठाणे ९ जागा  
 २००४२००९मतांमधील फरक
कॉंग्रेस३५.०%२६.४%-८.६%
राष्ट्रवादी१३.६%१२.०%-१.६%
एकूण युपीए४८.६%३८.४%-१०.२%
शिवसेना२५.६%१७.२%-८.४%
भाजप१९.७%१२.८%-६.९%
एकूण एन.डी.ए४५.३%३०.०%-१५.३%
मनसे २०.७%२०.७%
इतर६.१%१०.९%४.८%

यातून कळते की या ९ जागांच्या परिसरात मनसेने तब्बल २०.७% मते मिळवली. भाजप-शिवसेना युतीने १५.३% मते गमावली तर युपीएने १०.२%. मनसे २००९ मध्ये पहिल्यांदा आली तेव्हा या भागात मुळात फ्लोटिंग मते ६.१% म्हणजे त्या मानाने खूप जास्त नव्हती. तसेच मनसे आणि शिवसेना यांच्यातील व्होटबॅंकमधील समानता लक्षात घेता मनसेला ही मते पहिल्यांदा हल्ला करायला नव्हती. त्यामुळे मनसेचा पहिला थेट हल्ला शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर पडला असे म्हणायला हरकत नसावी.

(फ्लोटिंग मतेसुध्दा २००४ ते २००९ या काळात ४.८% ने वाढलेली दिसतात. या वाढलेल्या ४.८% पैकी किमान २.७% मते दोन तगड्या उमेदवारांमुळे वाढलेली होती. मुंबई उत्तर मध्यमधून समाजवादी पक्षाचे अबु आझमी आणि भिवंडीमधून विश्वनाथ पाटील यांनी तितकी मते घेतली. लेखमालेच्या पहिल्या भागात लहान राज्यांमध्ये तगडे उमेदवार--उदाहरणार्थ छत्तिसगडमधील ताराचंद साहू असतील तर ते लहान पक्ष/फ्लोटिंग मते वाढवू शकतात. छत्तिसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहेत.मुंबई-ठाणे परिसर हे वेगळे राज्य असे समजले तर या लहान राज्यात स्थानिक तगडे उमेदवार तोच परिणाम साधू शकतात. इथे तेच झाले आहे असे दिसते.)

हे विश्लेषण मी मुंबई-ठाणे परिसराविषयी केले आहे. मनसेने पुणे आणि नाशिकमध्येही युतीचे असेच नुकसान केले होते. बाकी मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागासाठीचे विश्लेषण करून बघितलेले नाही.प्रायमा फॅसी असे वाटते की युपीएचे अनेक मतदारसंघ क्षेत्रांमध्ये बरेच नुकसान झाले आणि त्यामानाने कमी मतदारसंघ क्षेत्रांमध्ये थोडा फायदा झाला तरी मनसे फॅक्टरमुळे २००४ पेक्षा २००९ मध्ये २ जागा युपीएने जास्त मिळवल्या. २००४ आणि २००९ मध्ये मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा वेगळ्या होत्या त्यामुळे हे विश्लेषण मतदारसंघनिहाय करता येऊ शकले नाही.तसे केल्यास मला म्हणायचे आहे तो मुद्दा अधिक स्पष्ट झाला असता.

१९९८ मध्ये वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाला मिळालेली मते आणि त्याचा परिणाम याविषयी पहिल्या भागात लिहिले आहे. तिथेही राज्य पातळीवरील मते लक्षात घेतली तर वाघेलांच्या पक्षाने भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नुकसान केले नाही असे दिसते.पण मतदारसंघनिहाय विश्लेषण केल्यास अनेक ठिकाणी वाघेलांच्या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान अधिक केले असे दिसते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे अनेकदा हे कल राज्य पातळीवर थोडे कॅमोफ्लॅज होतात.त्यापेक्षा लहान पातळीवर विश्लेषण केल्यास ते अधिक स्पष्ट होतील.

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2014 - 11:28 pm | राजेश घासकडवी

तुम्ही दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई-ठाणे परिसरातही कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांची २५ टक्के (पॉइंट) नी कमी झाली, आणि मनसेला २१ (पॉइंट) टक्के मिळाली असं चित्र आहे. मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.

तेव्हा आआप कोणाची मतं कुठे खाईल हे जागानिहाय ठरेल. सरसकट 'फ्लोटर्सचा आधी तोटा, नंतर मोठ्या पक्षांचा' असं म्हणता येणार नाही. मला वाटतं मोठ्या पक्षांना ज्यांनी नाइलाजाने मत दिलेलं आहे असा एक मोठा मतदार वर्ग असतो. नवीन पर्याय उपलब्ध झाला की ते लोक उत्साहाने आणि आशेने त्यांना मतदान करतात. या परिणामाला मी अॅंटि-एस्टॅब्लिशमेंट म्हणेन. ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. तसं झालं तर काय होईल सांगणं कठीण वाटतं आहे. पण गेल्या वेळी राज्यपातळीवर मनसेमुळे हेच झालं आणि त्याची परिणती युपीएच्या जागा वाढण्यात झाली. तेच आत्ता होईल असं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की काहीही होऊ शकतं.

दुसरा एक मुद्दा (यावर एक स्वतंत्र लेख यावा अशी विनंती). दर निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार मोठ्या संख्येने असतो. सध्याच्या एकूण मतदारांपैकी सुमारे १५-२०% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असतील (आकड्याबद्दल खात्री नाही). तसंच जुने वयस्क मतदार जे बहुतेक वेळा पक्षांचे हक्काचे मतदार असतात ते गेल्या पाच वर्षांत मृत्यू किंवा आजार यामुळे मतदानातून कायमचे बाहेर पडतात. एक फ्लुइडिटी येते. तेव्हा या नवीन तरुण मतदारवर्गाची मतं कोणाला जातील? सर्वसाधारणपणे कोणाला जातात? त्यामुळे आत्तापर्यंत निकालांत कसा फरक पडलेला आहे? जातीनिहाय, धर्मनिहाय वगैरे मतदान होतं तसं वयोगटाप्रमाणेही वेगवेगळं मतदान होतं का? तरुण लोक अधिक राष्ट्रवादी असतात, आशावादी असतात, की सेक्युलर असतात? पुन्हा एकदा, या प्रश्नांबाबत एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.

करे़क्ट. आम्ही याच वर्गात मोडत होतो. पण नव्या पर्यायाने जुन्यापेक्षाही जास्त निराशा केल्यामुळे आम्ही परत जुन्या आणि मोठ्या पक्षाच्या वर्गात.
सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते ! या चालीवर.

क्लिंटन's picture

25 Apr 2014 - 10:34 am | क्लिंटन

मनसेसारख्या नव्या पक्षाने फ्लोटर्सची मतं खाल्ली नसून मोठ्या पक्षांचीच खाल्लेली आहेत.

याचे कारण २००४ च्या बेसचा विचार केला तर त्यावेळी मुंबई आणि परिसरात फ्लोटिंग मते केवळ ६% होती.तसेच अबू आझमी, भिवंडीतील विश्वनाथ पाटील यांच्यासारख्या स्थानिक तगड्या उमेदवारांमुळे ही फ्लोटिंग मते २००९ मध्ये वाढलेली दिसतात (२००४ मधील ताराचंद साहूंना समकक्ष परिणाम).तेव्हा पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का ही परिस्थिती यायला मुळात तितक्या प्रमाणात फ्लोटिंग मतांचा बेसच मनसेला उपलब्ध नव्हता.त्यामुळे मनसेचा धक्का युती आणि आघाडी या दोन्ही प्रस्थापितांना बसला.त्यातही तो युतीला आघाडीपेक्षा खूपच जास्त बसला.

नवा पक्ष फ्लोटिंग मते कशी खातो याची दोन उदाहरणे पहिल्या भागातील http://misalpav.com/comment/564049#comment-564049 या प्रतिसादात दिली आहेत. दिल्लीमध्ये आआपला डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांमध्ये २९.५% मते मिळाली त्यापैकी कुठल्या पक्षाची किती टक्के मते होती हे त्या तक्त्यात कळेल. तरीही यावरून एक गोष्ट कळते की आआपने बसपा, अपक्ष आणि इतरांची २००८ च्या तुलनेत जवळपास ४९% मते खाल्ली तर काँग्रेसची ३९% मते खाल्ली. मुळात काँग्रेसच्या मतांचा बेस २००८ मध्ये ४०% इतका मोठा होता त्यामुळे पक्षाला तोटाही जास्त झाला.पण आआपने जास्त मते बसपा, अपक्ष आणि इतर या फ्लोटिंग मतांमधून जास्त खाल्ली. तीच गोष्ट शंकरसिंग वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची गुजरातमध्ये १९९८ च्या निवडणुकांमध्ये.

आता २०१४ च्या निवडणुकांचा विचार करता मुंबईत मागच्या वेळी मनसेला मिळालेली मते हा मोठा फ्लोटिंग मतांचा मोठा बेस आआपला उपलब्ध आहे.हा बेस २००९ मध्ये मनसेला उपलब्ध असलेल्या बेसपेक्षा बराच जास्त आहे. त्यामुळे मला वाटते की पहिल्यांदा फ्लोटिंग मतांवर हल्ला आणि मग प्रस्थापित पक्षांची मते खाणे हा प्रकार आआप मुंबईत करेल (जसे दिल्लीत झाले).

नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेणे आणि मग प्रस्थापित मतांवर हल्ला करणे असे का होत असावे याविषयी मला वाटते की एक कारण आहे. ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही.मुळात लोक फ्लोटिंग पक्षांना मते का देतात? त्यांची प्रस्थापित पक्षांकडून निराशा झालेली असते आणि अशांना मोठ्या पक्षांना मत द्यायचे नसते त्यामुळे आपले मत फुकट जायची शक्यता आहे याची कल्पना असतानाही लोक लहान पक्ष/फ्लोटिंग पक्ष यांना मते देतात (लोकसभेपेक्षा विधानसभेत हे प्रमाण जास्त असते हे आपण पहिल्या भागात बघितले आहे). जेव्हा नवा पर्याय येतो तेव्हा हा नवा पर्याय या फ्लोटिंग मतदारांना अधिक अपीलिंग ठरतो.असे मतदार विचार करतात की एवीतेवी आपले मत प्रस्थापित पक्षाला जाणार नाही मग त्यातही नवा पर्याय असेल त्याला का देऊ नये? यातून सुरवातीला अशा नव्या पक्षाचा बेस वाढत जातो.हे निरीक्षण बरोबर आहे का हे एखाद्या पोलिटिकल सायन्सवाल्याला मला विचारायचे आहे.

ही मतं सर्वच मोठ्या पक्षांतून आपकडे जातील. त्यामुळे सगळ्यांचीच घटलेली मतं आणि आपला वाढलेली मतं असं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही.

तसे दिल्लीमध्ये झाले.दिल्लीमध्ये भाजप-अकाली दलाची सुमारे ८% मते आआपकडे वळली पण काँग्रेसची मात्र जवळपास ४०% मते आआपकडे वळली हे आपण बघितलेच आहे. त्यातही भाजप-अकाली दलाची मते आआपकडे का वळली असावीत? विधानसभेच्या वेळी केजरीवालांनी केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले होते आणि भाजप,मोदी किंवा तथाकथित जातीयवाद/धर्मनिरपेक्षता इत्यादी गोष्टींवर काहीही भाष्य केले नव्हते.त्यामुळे अन्यथा भाजपला ज्या मतदारांनी मत दिले असते त्यापैकी काही मतदारांनी विधानसभेत नव्या पक्षाला संधी देऊन बघू या उद्देशाने आआपला मत दिले असेल असे वाटते. पण आता केजरीवाल काँग्रेसपेक्षा मोदींना टार्गेट करत आहेत हे दिसत आहेच.त्यामुळे यावेळी भाजप समर्थक आआपला मते देतील ही शक्यता फारच थोडी.(डिसेंबरमध्ये मिपावरच आआपला भाजपसमर्थकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आता मिळणारा पाठिंबा यात बराच फरक आहे हे दिसतेच.) त्यातूनही दिल्लीमध्ये अण्णांच्या उपोषणांना मिळालेला प्रतिसाद आणि त्यावेळच्या वातावरणात केजरीवाल हा ओळखीचा चेहरा दिल्लीवाल्यांसाठी होता.मुंबईत मात्र तितक्या प्रमाणात कोणताही ओळखीचा चेहरा आआप यशस्वी झालेला नाही.काही प्रमाणात मेधा पाटकर हा तो चेहरा आहे पण त्यांना पाठिंब्याऐवजी विरोध करणारेच जास्त आहेत. अर्थातच एकही भाजप समर्थकाचे मत आआपला जाणार नाही असे नक्कीच नाही.पण काँग्रेसकडून युतीकडे वळलेली मते त्यापेक्षा जास्त असतील आणि एकूण परिणाम युतीची मते वाढणे आणि आघाडीची कमी होणे हा असेल असे वाटते. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे १६ मे रोजीच कळेल.

विकास's picture

24 Apr 2014 - 10:46 pm | विकास

मस्त लेखन आणि अंदाज! तरी देखील मतदार याद्यांमधील घोळामुळे कितपत फरक जाणवेल ते बघायचे. आज मुंबईत गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त मतदान झाले आहे. त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळणार का नाही हे बघायचे आहे.

विकास's picture

25 Apr 2014 - 12:14 am | विकास

पुण्याचे काय ते पण सांगा हो!

ऋषिकेश's picture

25 Apr 2014 - 9:33 am | ऋषिकेश

काल मतदान फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. (म्हणजे १०% वाढ आहे, पण बदलासाठी जी लाट येते, अचानक २०% वगैरे मतदानात वाढ होते तसे नाही - जे मुंबईत फारसे कधी होतही नाही म्हणा!) इशान्य मुंबईत, मानखुर्द, भांडूप, विक्रोळी भागात मतदान किती झाले व घाटकोपर, मुलुंड भागात किती झाले यावर मेधाताई जिंकतील की नाही हे ठरावे. ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान टक्केवारी कुठे मिळेल?

दक्षिण मुंबईचेही तेच!

अवांतरः या निवडणूकीत तु महाराष्ट्रातील कोणत्याही अशा एका उमेदवाराचं नाव घे त्याला मी जिंकला असे घोषित करतो अशी ऑफर मला निवडणूक आयुक्तांनी दिली तर मी मेधाताईंचं नाव घेईन.

सार्थबोध's picture

25 Apr 2014 - 10:24 am | सार्थबोध

फारच छान आणि विस्तृत लिहिले आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2014 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे

@ क्लिंटनः

एवढा मोठा डेटा गोळा करणे व त्यातली इनफायनाईट व्हेरिएबल्स जमेस धरून त्याचे विश्लेषण करणे आणि परत ते सोप्या भाषेत सरळ लिहीणे या सगळ्यासाठी लागणार्‍या अचाट श्रम, चिकाटी, आवड आणि बुद्धीचे प्रचंड कौतूक आहे ! ___/\___ .

सुहास झेले's picture

25 Apr 2014 - 2:24 pm | सुहास झेले

मस्त आणि अपेक्षित अंदाज... आता १६ मे ची वाट पाहू :)

प्रसाद१९७१'s picture

25 Apr 2014 - 2:35 pm | प्रसाद१९७१

कुठलेही बटन दाबा मत सत्ताधार्‍यांना च