जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ६ : महामंदिर अंगकोर वट

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
12 Mar 2014 - 7:06 pm

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================
...मनातल्या मनात ख्मेर सम्राट बनून विजयी सैन्याची राजवंदना स्वीकारून भारावलेल्या अवस्थेत असताना मार्गदर्शकाने... "चला, आता अंगकोर वट बघायला जाऊया" असं म्हणून भानावर आणले. उत्सुकतेची परिसीमा कशीबशी सांभाळत आम्ही जगातले सर्वात मोठे धार्मिक स्थान असलेल्या जगप्रसिद्ध राजमंदिराकडे निघालो.

अंगकोर वट आकारमान, शिल्पकला आणि कोरीवकामाच्या दृष्टीने खरोखरच महामंदिर आहे. हे मंदिर कंबोज स्थापत्यशैलीचा अत्युच्च नमुना समजला जातो. त्याच्या या शैलीला कंबोडियन अंगकोर वट शैली हे नाव दिले गेले आहे. हे मंदिर आधुनिक कंबोडियाची ओळख बनलेले आहे. त्यामुळेच केवळ कंबोडियाच्या पर्यटनातच नव्हे तर त्याच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनाच्या नोटांवरही या मंदिराच्या चित्राने मानाचे स्थान पटकावले आहे. १९९२ पासून ते युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थान झालेले आहे.

या राजमंदिराची उभारणी सम्राट दुसरा सूर्यवर्मन (इ स १११३ - ११५०) याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात केली. हे विष्णूमंदिर "वराह विष्णुलोक" या नावाने बांधले गेले. सोळाव्या शतकात बदलत्या राजधर्माबरोबर तेथे बुद्ध उपासना सुरू झाली. जगातील सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या या बांधकामावर अंदाजे ५०,००० लोकांनी ३० वर्षे काम केले. याच्या सर्वात बाहेर १५०० मी X १३०० मी आकाराची चौकोनी संरक्षक भिंत आहे. त्या भिंतीबाहेर सर्व बाजूंनी २०० मीटर रुंदीचा खंदक आहे. परिघाकडून केंद्राकडे जाताना उंच होत जाणार्‍या तीन समकेंद्रीत चौकोनी सज्जा (galleries) आहेत. त्या सज्जांना जोडणार्‍या पूर्वपश्चिम आणि उत्तरदक्षिण अश्या अक्षाकृती सज्जा आहेत. जेथे सज्जे एकमेकाला छेदतात त्या दर ठिकाणी गोपुरे आहेत. द्रविड शैलीचा प्रभाव असलेल्या उंच मध्यावर चार टोकांना चार आणि मध्यभागी एक अशी पाच शिखरे आहेत. मधले शिखर ६५ मीटर (साधारण २२ मजली इमारतीइतके) उंच आहे. शिखरे कमळाच्या कळ्यांच्या आकाराची आहेत. सर्वात मध्यभागी ख्मेरमध्ये बाकान (Bakan) या नावाचा चौरस आकाराचा मंदिराचा केंद्रीय भाग आहे. तेथे जाण्यासाठी उभ्या चढाच्या पाहिर्‍या आहेत.

संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे.

या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ ८२०,००० चौ मीटर (२०३ एकर) आहे. अंगकोर पद्धतीप्रमाणे देऊळ सोडून इतर इमारती लाकडाच्या असत त्यामुळे अर्थातच त्या आतापर्यंत नष्ट झाल्या आहेत. तसेच मंदिरातील सुवर्ण, रौप्य, हिरे-माणके इ मध्यकाळात झालेल्या लुटालुटीत नाहीसे झालेले आहे. केवळ उरलेल्या दगडी इमारतीच्या स्थापत्याने आणि त्यातील कोरीवकामाने अंगकोर वटचे इतके नाव झाले आहे तर मग सर्व वैभवासह असलेले हे मंदिर कसे असेल त्याची कल्पना करणेही कठीण आहे.


अंगकोर वट : विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याची प्रतिकृती (जालावरून साभार)

या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातली काही महत्वाची खालील प्रमाणे:

१. या अगोदरच्या शैव राजमंदिरांच्या ख्मेर परंपरेला छेद देऊन बांधलेले हे पाहिले वैष्णव राजमंदिर आहे.

२. त्याच्या खंदकाचे, भिंतींचे आणि सज्जांचे मोठे आकारमान.

३. पूर्वाभिमुख मंदिरांच्या ख्मेर परंपरेला सोडून हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. याचे कारण बहुदा याच्या पश्चिम गोपुराचा सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष खगोलशास्त्रिय उच्चतम आणि नीचतम अवस्थेशी असलेला संबंध आहे (western gopura brackets the rising sun's position between the summer and winter solstices).

४. सज्जांच्या भिंतींवर असलेली उठावचित्रांची (bas-reliefs) रचना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पहावी अश्या रितीने केलेली आहे. याचे कारण खगोलशास्त्रिय आहे असे एलेनॉर मनिक्का (Eleanor Mannikka) या शास्त्रज्ञाचे मत आहे. या सिद्धान्ताप्रमाणे:
अ) वसंत ऋतूतील समदिवसरात्रकाल (spring equinox) होणार्‍या पूर्व दिशेला समुद्रमंथनाची चित्रे म्हणजे सर्व जगाची सुरुवात;
आ) त्यानंतर सूर्य उच्चतम अवस्थेत (summer solistice) जातो त्या उत्तर दिशेला मेरुपर्वत आणि देवदानवांची युद्धे;
इ) त्यानंतर शरद ऋतूतील समदिवसरात्रकाल (autumn equinox) होणार्‍या पश्चिम दिशेला कुरुक्षेत्रावरचे महाभारत युद्ध आणि त्याने सुरू केलेला युग-बद्दल;
ई) आणि शेवटी सूर्य नीचतम अवस्थेत (winter solistice) जातो त्या दक्षिण दिशेला यमलोक आणि नरक, वगैरे;
हा सिद्धांत सर्व पुरातत्व संशोधकांना मान्य नसला तरी अंगकोर वटच्या रचनेत अनेक खगोलशास्त्रिय रहस्ये दडलेली आहेत याबाबत सर्वांचे एकमत आहे.

सज्जांवरच्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय आणि रोजच्या जीवनाची दृश्ये असलेल्या उठावचित्रांमध्ये एकही पुनरावृत्ती नाही. येथे खास कंबोडियन असलेल्या अप्सरांची २,००० पेक्षा जास्त चित्रे आहेत, त्यांच्या आकारमान अथवा भावदर्शनामध्येही अजिबात पुनरावृत्ती नाही ! बहुतेक सगळी उठावचित्रे सुर्यवर्मनच्या कारकीर्दीत बनविली गेली. मात्र त्यात नंतर, मुख्यतः सोळाव्या शतकात राजा आंग चानच्या कारकीर्दीत थोडी भर घातली गेली.


अंगकोर वट : सज्जांवरील उठावचित्रांच्या मालिकांचे स्थान दाखवणारा नकाशा
(http://www.art-and-archaeology.com/ वरून साभार)

चला तर या मंदिरात आपण अर्थातच पश्चिमेकडून प्रवेश करू या. यासाठी आपल्याला मंदिरासभोवतालचा खंदक पार करण्यासाठी असलेल्या २०० मीटर लांबीच्या आणि पाच-सहा लेनचा रस्ता होईल इतक्या रुंद बंधार्‍यावरून चालत जावे लागते...

 अंगकोर वट : खंदक ओलांडून पश्चिम गोपुराकडे नेणारा बंधारा

बाहेरच्या भिंतीच्या गोपुराच्या मनोर्‍यांची पडझड झालेली आहे. पण तरीही त्यांच्या अवशेषांची भव्यता मन मोहून घेते...

 अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०१

.

 अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०२

गोपुरापर्यंत पोचेपर्यंत मुख्य मंदिर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. पण गोपुरापासून दोन्ही बाजूंच्या गोपुराला जोडणारे सज्जे पावलांना थबकवतात. न संपणार्‍या लहान लहान होत जाण्यार्‍या दरवाज्यांच्या मालिकेसारख्या दिसणार्‍या सज्जातून पूर्ण परिक्रमा करणे पुरेश्या वेळेच्या अभावामुळे शक्य नव्हते. तरीसुद्धा दोन्ही बाजूला काही पावले गेल्याशिवाय राहवत नाही...

 अंगकोर वट : पश्चिम गोपुराला इतर गोपुराशी जोडणार्‍या सज्जाचा एक भाग

गोपुर ओलांडून आत गेल्यावर ध्यानात येते की "दिल्ली अजून बरीच दूर आहे." कारण पुढे गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा ३५० मीटर लांबीचा, काही मीटर उंचीचा बंधारा (causeway) समोर येतो...

 अंगकोर वट : पश्चिम गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा बंधारा

सगळ्यात बाहेरची संरक्षक भिंत आणि मुख्य मंदिराच्या इमारतीच्या मधल्या भागात प्राचीन काळी लाकडी घरांची वस्ती होती. आता तेथे थोडी मोकळी जागा आणि इतर ठिकाणी जंगल वाढलेले आहे. बंधार्‍यावरून काही अंतर चालल्यावर परत मागे वळून गोपुराकडे पाहण्याचा मोह होतोच...

 अंगकोर वट : मदिराच्या बाजूने पश्चिम गोपुर

बंधार्‍याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन विशाल प्राचीन वाचनालयाच्या इमारती आहेत. त्या इमारतींचा आकार आणि बांधणी पाहून ख्मेर साम्राज्यात ज्ञानाची किती आदर केला जात असावा याचा अंदाज येतो...

 अंगकोर वट : डावीकडचे वाचनालय

.

 अंगकोर वट : उजवीकडचे वाचनालय

जसजसे आपण अंगकोर वटचे प्रतीक म्हणून वापरलेल्या देखाव्याच्या जवळ येऊ लागलो तसे इमारतीच्या खर्‍या भव्यतेची कल्पना येऊ लागते आणि ध्यानात येते की प्रतिकचिन्ह संपूर्ण मंदिराला पुरेसा न्याय देउ शकलेले नाही. मूळ इमारत अधिक भव्य, अधिक आकर्षक वाटते...

 अंगकोर वट : प्रतिकचिन्ह दर्शन ०१

आम्ही भेट दिली तेव्हा दुसर्‍या पश्चिम गोपूराच्या मुख्य व्दाराच्या पुनस्थापनेचे काम चालू होते. त्यामुळे आम्हाला त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपदरवाज्यांपैकी एकाने आत जावे लागले. मध्यमार्गापेक्षा लहान असलेल्या पुर्णाकृती सिंहमूर्तींनी सजवलेल्या या उपमार्गालाही लहान म्हणणे कठीण आहे...

 अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०२

.

 अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०३

.

 अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०४

मध्यमार्गाच्या पाहिर्‍या चढून आल्यावर एक प्रशस्त स्वागतक आहे. तो स्वागतकक्ष मंदिराच्या सज्जात उघडतो तर उपमार्गांच्या पाहिर्‍या आपल्याला तडक सज्जात नेवून सोडतात...

 अंगकोर वट : दुसर्‍या पश्चिम गोपुराच्या डाव्या उपव्दारातून झालेले मुख्यव्दाराचे दर्शन

.

 अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर आणि इतर गोपूरांना जोडणारा सज्जा

हे गोपुर ओलांडून आत गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य इमारतीत प्रवेश करतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या सज्जाला जोडणार्‍या मार्गाच्या प्रत्येक बाजूला दोन अशी दगडी बांधकाम असलेली एकूण चार चौरस आकाराची कुंडे आहेत. आता कोरडी असली तरी देऊळ वापरात असताना ती सतत पाण्याने भरलेली असत...

 अंगकोर वट : पाण्याचे कुंड

कुंडांच्या आजूबाजूचे आणि इतर सर्व सज्जे कोरीवकामाने सजलेले आहेत. आतापर्यंत सज्जांची भव्यता, सज्जातील कोरीव उठावचित्रे, एकूण इमारतीची लांबी-रुंदी-भव्यता व सज्जांचे जाळे यांच्यात काय बघू आणि काय नको होउन प्रचंड गडबड होत होती. सर्वच भिंती आणि खांबांचे पृष्ठभाग उठावचित्रांनी सजवलेले आहेत. काहीच मनासारखे बघितले जात नाही असे वारंवार वाटत होते...


अंगकोर वट : अप्सरा

.


अंगकोर वट : उठावचित्रे

पण उठावचित्रे शांतपणे बघण्याअगोदर प्रथम बाकान म्हणजे मंदिराचा सर्वोच्च मध्यभाग बघून घेऊ असे मार्गदर्शक म्हणाला म्हणून आम्ही पुढे निघालो. बाकानला मध्यभाग म्हणत असले तरी केवळ हा भाग म्हणजे मानवनिर्मित दगडी टेकडीवरचे एक पूर्ण मंदिरच आहे...


अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०१

.


अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०२

.

 ...
अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०३ व ०४

.


अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरील अप्सरा

.


अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरचे कोरीवकाम

.


अंगकोर वट : बाकानचे प्रवेशव्दार

.


अंगकोर वट : बाकानच्या प्रवेशव्दारावरील नक्षी

मंदिराच्या इमारतींच्या खिडक्या आणि छपरे दगडी आहेत. खिडक्यांना कोरीव दगडाच्या सळया आहेत. छपरांची रचना आणि कोरीवकाम जणू ते छप्पर झाडांच्या फांद्यांनी शाकारलेले दिसावे असे आहे...


अंगकोर वट : सज्जाचे बाहेरच्या बाजूने घेतलेले चित्र

.


अंगकोर वट : छप्पर

सर्व भिंती कोरीवकामाने भरलेल्या आहेत...


अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०१

.

 ...
अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०२ व ०३

मंदिरातून फिरताना एका सज्जातून दुसर्‍या सज्जात फिरताना चारी बाजूला असलेल्या भीती, खांब आणि खिडक्यांमुळे बरेच चाललो आहे हे कळत असले तरीसुद्धा बाकानच्या उंचीवरून मंदिराच्या मध्य आवाराच्या चारी बाजूंचे दर्शन घेतल्यावरच त्याच्या भव्यतेची खरी ओळख पटते...


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०१

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०२

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०३

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०४

.


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०५

.


अंगकोर वट : बाकानचा मध्यभाग

.


अंगकोर वट : बाकानच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे बाकानचे मध्यशिखर

तेथून खाली उतरून आम्ही परत सज्जांच्या जाळ्यात गुरफटून घ्यायला सुरुवात केली आणि आता जरा भानावर येउन त्यांच्या भव्यतेची नीट कल्पना येऊ लागली...


अंगकोर वट : सज्जा ०१

.

 ...
अंगकोर वट : सज्जा ०२ व ०३

.

 ...
अंगकोर वट : सज्जा ०४ व ०५

.


अंगकोर वट : सज्जा ०६

बाहेर येत येत सरतेशेवटी आम्ही खास उठावचित्रांकरता जगप्रसिद्ध असलेल्या सज्जात आलो. तेथे आल्यावर ध्यानात आले की ह्या १८७ मी X २१५ मी आकाराच्या सज्जाच्या एकूण ८०४ मीटर परिघातली सगळी उठावचित्रे नीट पहायची तर दोन पूर्ण दिवसही कमी पडतील, धावत धावत बघायला सहा तास तरी सहज लागतील...


अंगकोर वट : उठावचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या सज्जाच्या एका दिशेच्या अर्ध्या भागाची झलक

या वरच्या चित्रात दिसणार्‍या संपूर्ण भागात साधारण ९० मी X ३ मी आकाराचे महाभारत युद्धाचे एकच उठावचित्र आहे ! या सज्जात तशीच प्रचंड आकाराची इतर अनेक उठावचित्रे आहेत. त्या चित्रांच्या जागा दाखवणारा नकाशा सुरुवातीसच दिला आहेच.

उठावचित्रे पाहण्यात गुंतलेले डोळे पायांना त्या सज्जाबाहेर जाउ देण्यास तयार नव्हते. पण "सूर्यास्ताकरता प्रसिद्ध असलेल्या एका मंदिरावर जायचे आहे" असे सांगून आमचा मार्गदर्शक घाई करत होता. नाईलाजाने जेवढी मिळतील तेवढी उठावचित्रे धावत धावत बघितली आणि जमतील तेवढी चित्रे काढून घेतली...

.

.

.

.

.

.

.


अंगकोर वट : सहस्त्रबाहू रावण

.

.

.

शेवटी मार्गदर्शकाने "सुरक्षेसाठी पुरातत्वखात्याने केलेल्या नियमाप्रमाणे सुर्यास्त सोहळा बघण्याच्या मंदिरावर एका वेळेस ३०० माणसे जमा झाली की प्रवेश बंद होतो" असा निर्वाणीचा दिला तेव्हा चडफडत का होईना पण तेथून निघणे भाग पडले.

अंगकोर वटसाठी केवळ अर्धा दिवस राखून ठेवणार्‍या आमच्या टूर कंपनीचा किती राग आला असेल ते सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर, सहल कंपनीने दिलेल्या अपुर्‍या माहितीमुळे या ठिकाणाची हेलिकॉप्टरची सहल करता आली नाही ही रुखरुख मनात राहिली ते वेगळेच. बाकानच्या उंचीवरून ह्या मंदिराचा परिसर इतका आश्चर्यकारक वाटला तर अधिक उंचीवरून तो एका नजरेच्या टप्प्यात आल्यावर कसा दिसला असता याची केवळ कल्पना करावी लागली. परत केव्हातरी तेथे जायला पाहिजेच अशी प्रबळ इच्छा मनात घेउनच पुढे निघालो.

अंगकोरमधली बरीच चित्रे या दुव्यावर पहायला मिळतिल.

खालच्या दुव्यातील अंगकोर वटची चित्रफीत पाहता येईल...

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

12 Mar 2014 - 7:20 pm | विवेकपटाईत

मस्त. तुमच्या लेखात खरोखर फिरण्याचा आनंद मिळतो आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या लेखात खरोखर फिरण्याचा आनंद मिळतो आहे. ++++++++१११११११११११

उठावचित्रं आणि शेवटचा व्हिडिओ __/\__

आणि पु भा प्र...

संपुर्ण लेखमाला संपल्यानंतर सविस्तर प्रतिसाद देणार होतो पण हा भाग बघुन राहवले नाही... मस्तचं हो एक्का सर... जाम भारी वाटतेय एक-एक भाग वाचताना.

पु.भा.प्र. आणि पु.ले.शु.

प्रत्येक भागात प्रतिसाद देत नसलो तरी प्रत्येक भाग वाचतोय. पुभाप्र.

बॅटमॅन's picture

12 Mar 2014 - 8:36 pm | बॅटमॅन

आई शप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पथ!!!!!!!!!!!!!!!!!!

पारणे फिटले.

खटपट्या's picture

12 Mar 2014 - 9:32 pm | खटपट्या

+११११११११

प्रचेतस's picture

12 Mar 2014 - 8:59 pm | प्रचेतस

खरोखरच महामंदिर आहे.
निव्वळ अद्भूत.
गजारूढ इन्द्र ओळखू आला. रावणकैलासउत्थापन मूर्तीची शैली थोडी वेगळी आहे. आपल्याकडील शैलीत नेहमीच रावणाच्या पाठीचा भाग दर्शकाच्या समोर असतो. तर इकडे मात्र रावण दर्शकाच्या समोरच तोंड करून म्हणजे उलट्या दिशेने कैलास उचलण्याच्या प्रयत्न करतोय.

त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 10:01 am | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या सहल कंपनीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे म्हणा पण ह्या मंदिरातील सगळी चित्रं बघता आली नाही ही रुखरूख आहेच. हिंदू संस्कृतीचा प्रबळ प्रभाव असला तरी ख्मेर साम्राज्याचा मोठा आवाका आणि राजकिय व आर्थिक ताकद बघता त्यांच्या चालिरिती, स्थापत्य आणि कलाकृतींमध्ये स्थानिक प्रभाव असणे सहाजिकच होते. मात्र मूळ पौराणीक कथांना फारसा धक्का लागलेला दिसत नाही. शिवाय १३ व्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू होऊन आणि १५व्या शतकापासून जवळ जवळ १००% बौद्ध जनता असूनही सर्वसामान्य लोकांची हिंदू धर्माबद्दल आस्थाच दिसली. मुख्य म्हणजे हिंदू (विशेषतः महाभारत आणि रामायण) आणि बौद्ध प्रथा एकमेकात नैसर्गिकपणे मिसळून गेल्या आहेत, त्यांत सर्वसामान्य कंबोडियन माणसाला काही विशेष वाटत नाही.

त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात? काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्‍यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्‍या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्‍या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 10:43 am | प्रचेतस

धन्यवाद.

अंगकोर वटच्या अतिभव्य मंदिरासाठी फक्त अर्धा दिवसच दिला म्हणजे रूखरूख वाटणारच. :(
स्थानिक प्रभाव तर अवश्य असणारच. पौराणिक कथांचा गाभा तसाच राहून काही प्रसंग, शैली तिकडच्या पद्धतीने आल्या असाव्यात. शिल्पांची चेहरेपट्टी तर तिकडील लोकांशी मिळतीजुळती आहेच.

बाकी तुम्ही धाग्यात म्हणालात तसे

संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे.

हे पंचायतन स्वरूपाचे मंदिर आहे का? म्हणजे त्या बाजूच्या चार शिखरांत उपदेवतांची स्थापना केली आहे का ती फक्त नुसतीच शिखरे आहेत?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता ते बुद्धमंदिर झालेले असल्याने विष्णू किंवा इतर हिंदू देवतांच्या पूजेसाठी ठेवलेल्या मूर्ती नाहीत. काही सज्जांमध्ये साध्या बुद्धमूर्ती आहेत. मंदिरमध्यात ही मूर्ती होती पण ती प्राचीन नसावी असे समजते...

जालावर खालच्या चित्रातली विष्णूची मूर्ती अंगकोर वट मधिल असल्याचे वाचले. पण सद्या ती कोठे आहे ते माहित नाही...

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 2:36 pm | प्रचेतस

धन्यवाद.

ती आडवी झोपलेली बुद्ध मूर्ती टिपिकल अनंतशयनी विष्णूच्या शैलीत कोरलेली दिसतेय.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 2:49 pm | बॅटमॅन

एक खुस्पट.

त्या पोजमध्ये पैल्यांदा विष्णूची मूर्ती कोरली जात असे की बुद्धाची? की एकावरून दुसरा असे कै नै? हा प्रश्न फक्त या अंगकोर वटबद्दल नाही, इन जण्रल आहे.

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 2:57 pm | प्रचेतस

माझ्या माहितीप्रमाणे तरी विष्णूची.
बुद्धाची तशा प्रकारची मूर्ती माझ्या पाहण्यात नाही. बुद्धमूर्ती कायम उभ्या अथवा ध्यानमग्न अवस्थेत बसलेल्या आढळतात. अपवाद म्हणजे अजिंठा आणि नाशिकलेणीतील महायानकालीन महापरिनिर्वाण मूर्तीचा पण हे महापरिनिर्वाण असल्याने शैली अत्यंत भिन्न आहे याउलट अनंतशयनी मूर्ती अगदी निवांतपणे डोके उंचावून झोपलेल्या अवस्थेत दिसते. ह्या अजिंठ्याच्या महायानमूर्तीच्या आधीच्या गुप्त काळातील कित्येक मूर्ती अनंतशयनी विष्णूच्या आहेत.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 3:01 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद फॉर द क्ल्यारिफिकेषण!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहुडलेला बुद्ध (reclining Buddha) ही कल्पना पहुडलेल्या विष्णूवरून आली असावी.

पहुडलेल्या बुद्धाचे डोळे बंद असले तर त्याच्या पायांच्या अवस्थेप्रमाणे दोन अर्थ होऊ शकतात:

(अ) पाय पुढेमागे असल्यास ती निद्रावस्थेतील मूर्ती...

(आ) पाय एकमेकाला समांतर असले तर ती निर्वाणावस्थेतील मूर्ती...

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 3:13 pm | प्रचेतस

फॅण्टास्टिक.
ह्या भव्य मूर्ती कुठल्या देशातल्या आहेत?
तुमच्याच आधीच्या लेखनात हे बघितल्यासारखे वाटतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाही. या जालावरच्या आहेत. चुकून जालावरून साभार असे टाकायचे राहीले :(

या बुद्धमूर्ती ब्रम्हदेशातल्या आहेत... अजून बघायच्या राहिल्या आहेत (पण सहलिंच्या यादीतल्या आहेत ;) ).

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 3:22 pm | प्रचेतस

ओह्ह. ओके.
या निमित्ताने ब्रह्मदेशाची एक सहल होऊन जाऊ द्या आता.
आपल्या शेजारचाच तरीही खूप अपरिचित.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 3:28 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो.

भारी बुद्धमूर्ती.

संजय क्षीरसागर's picture

12 Mar 2014 - 10:04 pm | संजय क्षीरसागर

थक्कं झालो. इक्कानां मनःपूर्वक धन्यवाद!

आत्मशून्य's picture

13 Mar 2014 - 12:14 am | आत्मशून्य

जबरदस्त.

वेल्लाभट's picture

13 Mar 2014 - 6:50 am | वेल्लाभट

स्पेक्टॅक्युलर ! ! थक्क करणारं आहे हे. डिस्काव्हरीवरून ठाऊक होतं... पण.... सुरेख वर्णन आणि फोटो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 10:14 am | डॉ सुहास म्हात्रे

विवेकपटाईत, अत्रुप्त आत्मा, शिद, सूड, बॅटमॅन, खटपट्या, संजय क्षीरसागर, आत्मशून्य आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !

खरं तर त्या देवळाची भव्यता आणि सौंदर्य दाखवण्यात माझे शब्द आणि फोटो तुटपुंजे ठरले आहेत. हा विनय नाही, हे प्रत्यक्ष तेथे गेल्यावर काही मिनीटातच लक्षात येईल !

अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी आनंद देउन आश्चर्यचकीत करणारी ठिकाणे बघितली आहेत... पण याबाबतीत अंगकोरच्या तोडीस येणारे ठिकाण अजून तरी पाहिले नाही.

अजून तेथिल आश्चर्ये संपली नाहीत :) ती पुढच्या भागांत येतीलच.

फक्त एव्हढेच म्हणतो... तुम्ही नशिबवान आहात ! :)

सौंदाळा's picture

13 Mar 2014 - 2:11 pm | सौंदाळा

ज ह ब ह रा ट
डोळ्याचे पारणे फिटले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मदनबाण's picture

13 Mar 2014 - 10:18 pm | मदनबाण

भाग १ मधे तुम्ही दिलेला बोरोबुदूर स्तुपाचा फोटो, आणि त्यामुळे आलेला मंडलाचा संदर्भ मग भाग ३ मधे तुम्ही दिलेला अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा त्यातच माझ्या प्रतिसादातली सॅटेलाईट इमेज आणि आजच्या या धाग्यातले संदर्भासाठी दिलेले फोटो यांचा विचार केला.
या धाग्यातले पहिले ४ फोटो यावरुन मंडल रचनेतील Square Grid लक्षात आली आहे,खरं तर पाण्याच्या चौकोनाच्या बाजुला भुपुराचे काही संदर्भ दिसत आहेत का ते मला या वरील सर्व फोटोतुन पहायचे आणि समजुन घ्यायचे होते, कारण एकंदर रचना ही एखाद्या यंत्राप्रमाणेच भासत / दिसत आहे,एकंदर यंत्रांमधे मध्य बिंदुला फार महत्व असते.परंतु याच्या फक्त दोनच बाजुला बाहेरच्या बाजुस जाणारे मार्ग दिसतात {म्हणजे पाण्यातुन बाहेरच्या बाजुला जाणारे, परंतु मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र जे चित्र आहे ते बरेचसे भूपुराच्या जवळपास जाणारे प्रथमदर्शनी वाटते. ४ दिशांना ४ दारे असे भूपुराचे डिझाइन असते. { मला यातली नक्की आणि संपूर्ण माहिती नाही. }
असो... या संदर्भात एक दुवा देतो :- Maṇḍalas and Yantras यात navapadmamanḍ ̣चे डिझाइन पहा मग भाग ३ मधली सॅटेलाइट इमेज पहा पाण्यात {जास्त करुन उजवीकडेच} काही रेषा दिसतात,परंतु त्या कमळाकॄती नसुन वेगळ्याच दिसत आहेत. { हा माझा एकंदर अंदाजच आहे, जो या डिझाइच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो.}

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2014 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंडल आणि यंत्र याबाबत माझा स्वतःचा काहीच अभ्यास नाही. जे काही लिहीले आहे ते संदर्भांतून वाचले तसे लिहिले आहे. अंगकोर वट बद्दल वाचताना त्याच्या स्थापत्यात खगोलशास्त्राचा संबद्ध असल्याचे उल्लेख येतात. मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील.

अंगकोर वट हे राजधानीचे ठिकाण असल्याने पाण्याच्या संरक्षक खंदकावर दोनापेक्षा जास्त बंधारे नसणे ही संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था असावी असे वाटते.

मात्र मंडल / मंत्र याबाबतचे खास संदर्भ दिसले नाहीत. पण काही विश्वासू संदर्भ सापडले तर वाचायला आवडतील.
हो मला देखील सापडले तर आवडेलच.बाकी वरचा फक्त अंदाजच होता. :)

सुरेख आणि भव्यदिव्य आहे सगळे!