जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ८ : रुलो गटांतील मंदिरमालिका... बाकोंग, लोलेई आणि प्रिह् कोर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
19 Mar 2014 - 12:53 am

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

…पूर्ण सूर्यास्त दिसला नाही तरी टेकडीवरचे देवळावरचे अवशेष त्या भेटीत समाधान देण्याला पुरेसे ठरले होते. अंगकोर वट आणि नोम् बाखेंग या मंदिरांची मनावर ठसलेली चित्रे घोळावीत भारावलेल्या मन:स्थितीत आम्ही हॉटेलकडे निघालो.

पहिल्या दिवसाच्या अनुभवाने अंगकोरमध्ये अंगकोर वट सोडूनही बरेच काही बघण्यासारखे आहे ह्याची खात्री झाली होती. त्यामुळे केवळ मार्केटिंगसाठी इतर अनेक मंदिरांची नावे इटिनेररीत टाकली असावी ह्या समजाला मोठा धक्का बसला होता. सकाळी लवकर उठून न्याहरी करून इटिनेररीतल्या इतर मंदिरांच्या नावांची उजळणी केली. सागरने आंतरजालावरून त्यांची काढलेली माहिती वाचून उत्सुकता अजूनच ताणली जात होती. आता त्या भल्यामोठ्या यादीतील एकही मंदिर नजरचुकीने (अथवा मार्गदर्शकाच्या चलाखीने) बघायचे राहून जाऊ नये असेच वाटत होते.

बाहेर पडलो आणि हे खास ख्मेर आणि आधुनिक शैलींच्या मिश्रणाने बांधलेले घर समोर आले...


ख्मेर शैली आणि आधुनिक शैलींच्या संगमाने बांधलेले एक घर

आज सकाळी रुलो गटातली (Rolous Group) देवळे बघायची होती. रुलो या आधुनिक गावाजवळ असलेल्या हरिहरालय किंवा इंद्रपूर या प्राचीन राजधानीत ही देवळे असल्याने त्या देवळांच्या गटाला हे नाव पडले आहे. ही ख्मेर सम्राटांची नवव्या शतकात बांधलेली ख्मेर संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातली मोठी बांधकामे आहेत. या बांधकामात दगडांबरोबर विटांचाही भरपूर उपयोग केलेला आहे. या गटात बाकोंग, लोलेई आणि प्रीह् कोर ही तीन मुख्य मंदिरे येतात.

बाकोंग मंदिर

पहिला थांबा होता बाकोंग मंदिर. या मंदिराभोवतालचा खंदक अजूनही सुस्थितीत आहे आणि त्याचे सौंदर्य आपले स्वागत करते...


बाकोंग मंदिराचा खंदक

.

कंबोडियाच्या पर्यटन व्यवस्थेत इतर काही देशांसारखा आर्थिक समृद्धीचा भपका नसला तरी सौदर्यदृष्टी, स्वच्छता आणि नीटनेटकेपण मात्र नक्कीच होता...


बाकोंग मंदिराचे आवार

.

आवारातले स्वागतगृहसुद्धा त्या गोष्टीची साक्ष देत होते...


बाकोंग मंदिराचे स्वागतगृह

तेथून थोडे पुढे गेले की बाकोंगचे पूर्ण रूप पुढे येते आणि त्याची भव्यता पाहून हे नवव्या शतकातले (म्हणजे ११०० वर्षांपेक्षा जास्त जुने) बांधकाम आहे यावर विश्वास बसणे कठीण जाते. पंधरा मीटर (साधारण पाच मजली इमारतीइतके) उंच असलेले हे मंदिर ६५० मी X ८५० मी इतक्या क्षेत्रफळांवर बांधलेले आहे. हे मंदिर ख्मेर संस्कृतीतील देवपर्वत रुपी मंदिर या कल्पनेचा पहिला आविष्कार समजला जातो. हे मंदिर पहिल्या इंद्रवर्मनने (इ स ८७७ - ८८९) बांधले असले तरी यात बाराव्या शतकापर्यंत अनेक सम्राटांनी भर घातली आहे. या मंदिरपर्वताला नाग, गरूड, राक्षस, यक्ष आणि सगळ्यात वरचा राजाचा असे एकूण पाच स्तर आहेत. मंदिरासभोवती आठ उपमनोरे आहेत.


बाकोंग मंदिर

मंदिरासमोरचा भग्न नंदी हे शिवमंदिर असल्याची साक्ष देतो. आपण या मंदिरपर्वतावर वर वर जाऊ लागतो तसा जरासा दम लागतो पण मंदिराचे कोरीवकाम दम विसरायला लावते.

तर चला करूया या मंदिराची एक चित्रमय सफर...

 ...
बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०१ व ०२

.


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०३

.

दक्षिणेकडील दरवाज्याच्या तोरणावर दक्षिणाधिपती यम आहे...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०४ : यम असलेले दक्षिण दरवाज्यावरील तोरण

.

पश्चिमेकडील दरवाज्याच्या तोरणावर पश्चिमाधिपती वरूण आहे आणि त्याच्या खाली नाग आहेत...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०५ : वरूण असलेले पश्चिम दरवाज्यावरील तोरण

.


मंदिराचे सर्वोच्च मध्यशिखर

.


मंदिरातून दिसणारे मागचे आवार

.


मंदिरातून दिसणारे पुढचे आवार

.

बाकोंगमधून बाहेर पडलो आणि इतिहासातील काळ्या कालखंडाचा कंबोडियाच्या वर्तमानावर अजूनही कायम असलेला ठसा असा समोर आला...


भूसुरूंगाने पाय गमावलेले कंबोज नागरिक

भूसुरूंगाने सर्वात जास्त जीवितहानी आणि अपंगत्व झालेल्या देशांत कंबोडियाचा जगात पहिला क्रमांक आहे. तिसहून अधिक वर्षांच्या अंतर्गत यादवीच्या काळात ख्मेर रूज, हेंग सामारिन आणि हून सेन यांच्या कारकीर्दीत कंबोडियामध्ये पेरल्या गेलेल्या भूसुरुंगांपैकी ४० ते ६०,००,००० (चाळीस ते साठ लाख) भूसुरूंग अजूनही भूमीतच आहेत. मुख्य म्हणजे ते इतक्या विस्कळीतपणे पेरले गेले की त्यांची स्थाने कोणालाच नक्की माहीत नाहीत. त्यांच्या स्फोटांमुळे अपंगत्व आलेल्यांची सर्वसामान्य नागरिकांची संख्या ४०,००० पेक्षा जास्त मोठी झाली आहे. ती संख्या इ स २००५ पर्यंत दरवर्षी ८५० ने वाढत होती. हे भूसुरुंग निकामी करण्यासाठी दर वर्षाला तीन कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करूनही अजूनही जखमींची वार्षिक संख्या दोनशेच्या आसपास आहे. त्यातच अधिक दु:खदायक गोष्ट अशी की यातली एक त्रितियांश संख्या लहान मुलांची आहे. भूसुरुंगांमुळे दळणवळणावर व शेतकामावर आलेल्या बंधनांमुळे आणि मोठ्या मृत / जखमी लोकसंखेमुळे पडणार्‍या ताणामुळे कंबोडियाच्या आधीच नाजूक असणार्‍या अर्थव्यवस्थेवर बराच ताण पडत आहे.

कंबोडियाच्या आणि इतर देशांच्या अनुभवांवरून बोध घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने १९९९ मध्ये Ottawa Treaty उर्फ Mine Ban Treaty पास केली आहे. त्यानुसार भूसुरूंग आणि विशेषतः मानवविरोधी भूसुरूंग (Anti-Personnel Mines) तयार करणे, साठवणे, वाहून नेणे आणि दुसर्‍या देशाला देणे यावर कडक निर्बंध लावलेले आहेत.

.

लोलेई मंदिर

तिथून पुढे निघून आम्ही लोलेई मंदिराकडे निघालो. इंद्रवर्मनचा मुलगा यशोवर्मनने (इ स ८८९ - ९१५) हे मंदिर एका मानवनिर्मित तळ्यात (baray) सहा मनोर्‍यांच्या स्वरूपात बांधायला सुरुवात केली गेली पण काही कारणाने फक्त चारच मनोरेच बांधले गेले...


चार मनोर्‍यांचे लोलेई मंदिर

.

आता तळे मातीने भरल्याने तेथे पाणी नाही. मंदिर जरी ख्मेर परंपरेप्रमाणे भव्य नसले तरी त्यावरील कोरीव काम बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये असेच आहे...


लोलेई मंदिर : कोरीवकाम ०१ : हत्तीवर आरूढ इंद्र असलेले तोरण

.

 ......
लोलेई मंदिर : कोरीवकाम ०२ (स्त्रीरक्षक) आणि ०३ (आभासी दरवाजा)

वरचा आभासी दरवाजा म्हणजे खरा दरवाजा नसून मनोर्‍याच्या एका बाजूच्या भिंतीवर एकाच शिलेवर केलेले दरवाज्याचा आभास निर्माण करणारे कोरीवकाम आहे.

या मंदिराच्या भिंतीवर एक संस्कृत व पाली भाषेतला शिलालेख आहे. त्याची लिपी ख्मेर आहे. आम्ही भारतीय आहोत म्हणजे संस्कृत आणि पाली फाड फाड वाचणार अशी आमच्या मार्गदर्शकाची (गैर)समजूत होती. आमच्या ती दूर करण्याच्या प्रयत्नाचे त्याला बरेच आश्चर्य वाटले!...


लोलेई मंदिर : संस्कृत आणि पाली भाषेतला ख्मेर लिपीत लिहीलेला शिलालेख

.

प्रीह् कोर मंदिर

इ स ८८० मध्ये बांधलेले हे मंदिर इंद्रवर्मनने बांधलेले पहिले मंदिर आहे. हे मंदिर राजाने त्याच्या देवस्वरूप पूर्वजांच्या स्मरणार्थ बांधले आहे. त्यातला मंदिरमध्य ख्मेर साम्राज्याचा संस्थापक दुसरा जयवर्मन याच्या शिव-परमेश्वर या नावे उभारला आहे. मागचे तीन मनोरे मुख्य तीन राण्यांच्या नावे आहेत.

या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. त्याच्या काही शिल्पांची चित्रे....


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०१ : मंदिराचे रक्षण करणारे सिंह

.


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०२ : व्दारपाल

.


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०३ : तोरण

या तोरणावर वरच्या भागात घोडेस्वार आहेत. तर खालच्या भागात नागांवर आरूढ सैनिक आहेत. दोन्ही बाजूस मगरीवरच्या स्वाराला हत्तीचे डोके आणि सिंहाचे शरीर व आयाळ आहेत.

इतकी भटकंती होईपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. त्वरित रेस्तराँच्या दिशेने कूच केले. अजून मंदिरांची बरीच मोठी यादी बाकी होती. त्यासाठी पळापळ करायला बर्‍याच ऊर्जेची सोय करणेही भाग होते.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

19 Mar 2014 - 1:53 am | राघवेंद्र

आता लेख वाचतो.

राघवेंद्र's picture

19 Mar 2014 - 2:01 am | राघवेंद्र

खुपच सुरेख कोरिवकाम. खरच कंबोडियाला भेट देण्याची इच्छा होत आहे.
सुंदर प्रवास वर्णन. पु. भा. प्र.

राघवेंद्र

बॅटमॅन's picture

19 Mar 2014 - 3:58 pm | बॅटमॅन

हा भाग आवडला. शिलालेख, स्वागतगृह अन मंदिर सगळेच एकदम नेटके अन देखणे आहे. पहिलाच फोटो एकदम कोकणाची आठवण करून देतो. :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2014 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा

+१ :)

प्रचेतस's picture

19 Mar 2014 - 4:47 pm | प्रचेतस

सुरेख आहेत ही मंदिरे पण.
ख्मेर लिपी ही द्राविडियन लिप्यांना खूपच जवळची दिसत आहे.
मंदिरांचे रक्षण करणारे सिंह बघून धुमार आणि घारापुरी लेणीची आठवण झाली.

केदार-मिसळपाव's picture

19 Mar 2014 - 4:52 pm | केदार-मिसळपाव

सु रे ख

विवेकपटाईत's picture

19 Mar 2014 - 6:59 pm | विवेकपटाईत

युद्धात होरपळलेल्या देशाने ही आपला इतिहास इतका सुंदर रीतीने जपून ठेवला आहे. आणि आपण आपल्या ऐतिहासिक वारसाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो. आता खरोखरच कम्बोडियाला जाव लागेल.

आत्मशून्य's picture

20 Mar 2014 - 11:47 am | आत्मशून्य

मस्त लेखमाला.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 7:13 pm | पिलीयन रायडर

किती छान आणि नीट नेटका लेख.. फोटो साईझ एकदम व्यवस्थित.. क्लिअर आणि मोठे मोठे फोटो.. सेन्ट्रली अलाइन्ड लेबल्स.. वाचताना मजा येते त्यामुळे..!

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2014 - 8:17 pm | सुधीर कांदळकर

पहिल्या आणि चौथ्या चित्रातल्या आधुनिक इमारतीचे सौंदर्य छान टिपले आहे. दुसरे चित्र कोकणातले, केरळमधले म्हणून सहज खपेल. या चित्रांमुळे वैविध्यात भर पडली आहे. प्रवासवर्णनाची खुमारी वाढते आहेच. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2014 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

राघव८२, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, वल्ली, केदार-मिसळपाव, विवेकपटाईत, पिलीयन रायडर आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !