जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ७ : नोम् बाखेंग टेकडीवरचे मंदिर आणि सुर्यास्त

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Mar 2014 - 11:50 pm

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

...अंगकोर वटसाठी केवळ अर्धा दिवस राखून ठेवणार्‍या आमच्या टूर कंपनीचा किती राग आला असेल ते सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर, सहल कंपनीने दिलेल्या अपुर्‍या माहितीमुळे या ठिकाणाची हेलिकॉप्टरची सहल करता आली नाही ही रुखरुख मनात राहिली ते वेगळेच. बाकानच्या उंचीवरून ह्या मंदिराचा परिसर इतका आश्चर्यकारक वाटला तर अधिक उंचीवरून तो एका नजरेच्या टप्प्यात आल्यावर कसा दिसला असता याची केवळ कल्पना करावी लागली. परत केव्हातरी तेथे जायला पाहिजेच अशी प्रबळ इच्छा मनात घेऊनच पुढे निघालो.

अंगकोर वट मधून मोठ्या नाराजीने बाहेर पडून आम्ही तेथून १.५ किमी दूर असलेले नॉम् बाखेंग (Phnom Bakheng) मंदिर पहायला निघालो. नवव्या शतकाच्या शेवटीसम्राट सूर्यवर्मन (इ स ८८९ - ९१०) याने हे शिवमंदिर एका टेकडीच्या माथ्यावर बांधले. अंगकोर वटच्या दोन शतके अगोदर बांधलेले हे मंदिर त्या काळची ख्मेर राजधानी यशोधरापूर मधले मुख्य मंदिर होते. आतापर्यंत टेकडी म्हणजे मेरुपर्वत आणि तिच्या भोवती खंदक म्हणजे दुग्धसागर हे ओळखण्याइतके ख्मेर स्थापत्यतज्ञ तुम्ही झाले असालच ! देवळाची मूळ रचना पिरॅमिडसारख्या उंच होत जाणार्‍या सहा स्तरांची होती आणि त्यांत एकूण १०८ मनोरे होते. सर्वात उंच टोकावर सभोवती चार आणि मध्यभागी सर्वोच्च मनोरा अशी रचना होती. मनोर्‍यांची रचना अशी आहे की सर्वोच्च शिखरावरून कोणत्याही दिशेस बघितले तर एका वेळेस फक्त ३३ मनोरे दिसत असत. ही संख्या ख्मेर परंपरेप्रमाणे मेरू पर्वतावर वस्ती असणार्‍या ३३ देवांचे रूपक आहे; सर्वोच्च मनोर्‍याभोवतीचे १०८ मनोरे प्रत्येकी २७ दिवसांचे चार चंद्रकलासंच दाखवतात; पिरॅमिडचे सहा स्तर आणि टेकडीचा तळ म्हणजे सात स्वर्गांचे रूपक आहे; स्तरांवरचे १२ मनोरे गुरुची १२ वर्षांचे भ्रमण दाखवतात; इ अनेक सिद्धांत पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. University of Chicago च्या Paul Wheatley या शात्रज्ञाने नोम् बाखेंग मंदिराचे वर्णन "दगडाने बांधलेली खगोलशास्त्रिय (किंवा प्रचंड) दिनदर्शिका" ("an astronomical calendar in stone") असे केले आहे.

ह्या धर्म, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांच्या दृष्टीने कठीण असलेल्या कोड्याचा अर्थ समजून त्याचे महत्त्व ध्यानात येण्यास बराच वेळ लागला. त्यातच या मंदिराचे बहुतेक मनोरे आता कमी अधिक प्रमाणात ढासळलेले आहेत. आता आधुनिक थायलंडमध्ये असलेल्या Sdok Kak Thom मंदिरात सापडलेल्या संस्कृत शिलालेखामध्ये नोम् बाखेंगचा "When Sri Yasovardhana became king under the name of Yasovarman, the able Vamasiva continued as his guru. By the king's order, he set up a linga on Sri Yasodharagiri, a mountain equal in beauty to the king of mountains." या अर्थाचा उल्लेख आहे.

या मंदिराची बरीच पडझड झाली आहे आणि २००४ पासून World Monuments Fund चे कंबोडियाच्या APSARA या पुरातत्वशास्त्र संस्थेच्या सहकार्याने तेथे पुनस्थापनाचे प्रयत्न चालू आहेत. सद्या हे मंदिर अंगकोरच्या परिसराचे उंचीवरून दर्शन घेण्यासाठी आणि सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या मंदिराला धोका पोहोचू नये यासाठी टेकडीवर एका वेळेस ३०० पेक्षा जास्त पर्यटक जाऊ देत नाही.

असो. चला तर आता या विशेष मंदिराचे उरलेले अवशेष आणि त्यावरून दिसणारा सूर्यास्त बघायला...


अंगकोर वटमधून बाहेर पडताना

दहा पंधरा मिनिटातच गाडीतून पायउतार होऊन आम्ही टेकडी चढू लागलो आणि नोम् बाखेंग मंदिराचे प्रथमदर्शन झाले...


नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

टेकडीवर नेणार्‍या पाहिर्‍यांचे बरेच नुकसान झालेले आहे त्यामुळे अश्या आधुनिक पाहिर्‍यांची मदत घ्यावी लागली. पण त्यांच्या बाजूचे मंदिराची राखण करणारे जंगलचे राजे प्राचीनच आहेत...


नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

बरीच पडझड झालेली असली तरी इमारतींचे जे काही भाग शिल्लक आहेत त्यावरून देवळाच्या भव्यतेची बर्‍यापैकी कल्पना येते...


नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या तळाकडील चौथर्‍याचा एक भाग

.


नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारा रस्ता

.


नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारी इमारत

.


नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील चौथर्‍याचा एक भाग

.


नोम् बाखेंग मंदिर : एक मनोरा

.


नोम् बाखेंग मंदिर : एका मनोर्‍याचे अवशेष

जे काही कोरीवकाम उरलेले आहे त्यावरून मंदिराच्या उत्तम कलाकुसरीचीही कल्पना येते...


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०१

.


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०२

.


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०३

.


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०४

मंदिरमध्याच्या चौथर्‍यावरून फिरून चारी बाजूचे मनोरे आणि इतर परिसराचे दर्शन घेता येते...


नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०१

.


नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०२

.


नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०३

त्यातच दूरवर दिसणारे अंगकोर वट सर्वत्र पसरलेल्या जंगलातूनही आपले अस्तित्व दिमाखाने दाखवताना दिसत होते...


नोम् बाखेंग टेकडीवरून दिसणारे अंगकोर वट

पर्यटक वर सोडणारी व्दारे केव्हाचीच बंद झाली होती आणि आतापर्यंत मंदिरमध्याच्या चौथर्‍यावर बरच मोठा जनसमुदाय जमा झालेला होता...


नोम् बाखेंग टेकडीवर सूर्यास्त बघायला जमलेले पर्यटक

पलीकडे काही पर्यटक गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सर्व परिसर बघत सूर्यास्ताची मजा बघायला आलेले होते...


गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सूर्यास्तदर्शन

दाटून आलेल्या ढगांतून सूर्यास्त दिसेल की नाही हीच चिंता सर्वांच्या मनात होती...


नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०१

.


नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०२

टेकडीवर प्रवेश मर्यादित असल्याने आपला नंबर लागावा म्हणून सूर्यास्ताच्या बरेच अगोदर तिथे आम्ही पोचलो होतो. त्यामुळे मंदिराच्या आवारात सावकाशपणे फिरूनही नंतर इतर करामती करायला वेळ मिळाला...


नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०३

इथल्या पुरातत्त्व विभागाचा दुसरा नियम म्हणजे साडेसहाला टेकडी रिकामी करणे जरूरीचे असते. त्या दिवशी सूर्य ढगांनी झाकलेला असतानाच खाली उतरण्याचा भोंगा वाजला आणि आम्हाला खाली उतरणे सुरू करणे भाग पडले...


नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०१ : शिडीच्या दोन्ही बाजूला बऱ्याचश्या चांगल्या अवस्थेतले मनोरे दिसत आहेत

.


नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२

टेकडी उतरताना मार्गदर्शकाने खालच्या चित्रात दिसणार्‍या मंदिराच्या भागाकडे लक्ष वेधले. तुम्हाला तेथे काही विशेष दिसत आहे का ?...


नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२ : पहुडलेल्या बुद्धाच्या भव्य मूर्तीचे अवशेष

ती पहुडलेल्या बुद्धाची प्रचंड मूर्ती (डावीकडचा चेहर्‍याचा भाग दिसला ना?) या मंदिराच्या स्थापत्यात बुद्धकाळात टाकलेली भर होती. ती मूर्ती पूर्ण होण्याअगोदरच तिचे काम थांबले असावे असे मार्गदर्शक म्हणाला.

शेवटी अर्धी टेकडी उतरून आल्यावर सुर्यराजाने क्षितिजापलीकडे जाण्यापूर्वी ढग थोडेसे दूर सारून डोकावत रंगांची उधळण करत दर्शन दिले...


नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०१

.


नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०२

आणि लगेच परत ढगाआड गेला...


नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०३

पूर्ण सूर्यास्त दिसला नाही तरी टेकडीवरचे देवळावरचे अवशेष त्या भेटीत समाधान देण्याला पुरेसे ठरले होते. अंगकोर वट आणि नोम् बाखेंग या मंदिरांची मनावर ठसलेली चित्रे घोळवित भारावलेल्या मन:स्थितीत आम्ही हॉटेलकडे निघालो.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2014 - 12:42 am | संजय क्षीरसागर

दिलखुष.

खटपट्या's picture

15 Mar 2014 - 3:20 am | खटपट्या

हाही भाग जबरी !!!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2014 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा

छान!

विवेकपटाईत's picture

15 Mar 2014 - 3:48 pm | विवेकपटाईत

मी म्हणेल मुगाम्बो खुश हुआ

माहितगार's picture

15 Mar 2014 - 4:29 pm | माहितगार

समुद्रापार काही शतका पूर्वी पोहोचवली गेलेली संस्कृती आपल्या सफरीतून पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. सफर अप्रतीम आणि सूंदर चालू आहे. आतापर्यंतचे सर्वच लेख (व फोटो) आवडले आणि या लेखातील झाडांच्या मागून दिसणार्‍या सुर्यास्ताचाही.

दुर्गम टेकड्यांवर मंदीरे ही सुद्धा आपल्या संस्कृतीची खासीयत संस्कृतीस दीर्घकाळ जपण्यास मदत करते. आपल्या आगामी प्रवास आणि प्रवास वर्णनांकरता शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

15 Mar 2014 - 8:23 pm | बॅटमॅन

हाही भाग भारीच! आवडला. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2014 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

संजय क्षीरसागर, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, विवेकपटाईत, माहितगार आणि बॅटमॅन : धन्यवाद ! असाच सहभाग असू द्या. अजून बरीच आकर्षक मंदिरे बघायला जायचे आहे.

प्रचेतस's picture

17 Mar 2014 - 9:14 am | प्रचेतस

जबरदस्त झालाय भाग. तरीपण तुमच्या सहल कंपनीने अंगकोर वटला इतका कमी वेळ देणे हे अनाकलनीयच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2014 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या कंपनीने माझ्या अंदाजाप्रमाणे निष्काळजीपणा आणि अज्ञान (यापैकी एक किंवा दोन्ही) यामुळे इंटरनेटवरून त्यांना स्वत:च्या फायद्याचा वाटणारा पर्याय निवडून आमच्या गळ्यात मारला. कंपनी नावाजलेली असल्याने आम्ही विश्वास ठेवला :( . मात्र हा अनुभव अक्कलखाती जमेस टाकल्यामुळे पुढच्या सहलींना त्याचा फायदा होत आहे ! :)

६ आणि ७ दोन्ही भाग आत्ताच वाचले. आ वासलेलाच. अप्रतिम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2014 - 7:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

सुरेख प्रकाशचित्रे. एके काळी सर्व परिसर काय भव्य दिव्य आणि सुरेख दिसत असेल ह्याची कल्पना करु शकतो फक्त! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2014 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !