युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Dec 2013 - 10:12 am

युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

.......ज्या इस्पितळात कर्स्टन त्याचे प्रशिक्षण घेत होता तेथे हेलसिंकीचा प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. कोलँडर नियमीत येत असे. कर्स्टनच्या हातात जादू आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही व लवकरच डॉ. कोलँडरने त्याला आपल्या छत्राखाली घेतले......

दोन वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमानंतर व शरीराचे पूर्ण ज्ञान झाल्यावर कर्स्टनला मसाजीस्ट म्हणून पदवी मिळाली. लवकरच पुढील शिक्षणासाठी कर्स्टन बर्लिनला रवाना झाला. बर्लिनमधे एका जेवणाच्या सभारंभात त्याची गाठ अजून एका डॉक्टरशी पडली. त्याचे नाव होते डॉ. को. चेहर्‍यावर सुरकुत्या पडलेला हा म्हातारा डॉक्टर चिनी होता पण तो वाढला होता एका तिबेटियन बौद्ध मठात. तेथेच तो लामाही झाला. लहानपणापासून त्याला त्या मठात तिबेटियन उपचार पद्धतीचे शिक्षण देण्यात आले होते आणि त्यात त्याचे मसाजचेही शिक्षण झाले होते. तब्बल वीस वर्षे शिकून झाल्यावर व अ‍ॅलोपाथीचा डॉक्टर झाल्यावर एक चिनी डॉक्टर म्हणून त्याने पश्‍चिमेची वाट धरली. पहिल्यांदा लंडन व आता बर्लिनमधे त्याने त्याचा दवाखाना उघडला होता. वैद्यकीय शाखेतील पदवी असताना तो त्याच्या रुग्णांवर त्याला तिबेटमधे शिकविण्यात आलेल्या मसाज पद्धतीनेही उपचार करत असे.

याच कार्यक्रमात डॉ. कोने कर्स्टनशी गप्पा मारताना त्याला घरी येण्याचे आमंत्रण दिले व फिनलँडमधे तो काय शिकला याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सांगितले. ते बघितल्यावर डॉ. को निराशेने मान हलवत, त्यांच्या मिचमिच्या डोळ्यातून कर्स्टनकडे पहात म्हणाला, ‘तरुण मित्रा, दुर्दैवाने तुला काहीच येत नाही, काहीच नाही. पण मी तुझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करेन’. पुढची तीन वर्षे कर्स्टनने त्याचे प्रत्येक मिनीट त्या लामा डॉक्टरबरोबर घालवले. त्याच्या उपचार पद्धतींनी तो अवाक झाला. डॉ. को सगळे रोग बरे करु शकतो असा दावा कधीच करत नसे पण तो जी दुखणी बरी करे त्याचा आवाका एवढा मोठा होता की सामान्य माणसाला त्याची कल्पनाच करता येणार नाही.
डॉ. कोच्या तिबेटियन शास्त्राप्रमाणे प्रत्येक मसाजिस्टला त्याच्या रुग्णाच्या दु:खाचे मुळ कारण कळणे अत्यंत आवश्यक असते. तसेच त्याचे उगमस्थानही त्याला कळायला पाहिजे. डॉ. को कधीही रुग्ण काय सांगतोय यावर विश्‍वास ठेवत नसत. त्यांचा फक्त त्यांच्या बोटांवर विश्‍वास होता. त्याचा वापर करुन तो कुठल्या स्नायुंना दुखापत झाली आहे, आत कुठे सुज आली आहे एवढेच काय कुठला मज्जातंतु दुखावला गेला आहे हे ओळखायचा. हे असे १९२५ सालापर्यंत चालले होते. अखेरीस एक दिवस डॉ. कोने कर्स्टनला बोलावून सांगितले, ‘माझ्याकडे तुला शिकविण्यासारखे अजून काही आहे असे आता मला वाटत नाही’ असे म्हणून त्या लामाने त्याचा दवाखाना व रुग्ण कर्स्टनकडे सुपूर्त केले व मागे वळून न बघता तिबेटची वाट धरली. डॉ. कोबद्दल परत काही ऐकू आले नाही.

आत्तापर्यंत निष्कांचन अवस्थेत राहणार्‍या कर्स्टनचे नशीब एका रात्रीत फळफळले. ज्याला दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी व शिक्षणासाठी संध्याकाळी एखादे हलके काम करायला लागत असे तो आता चांगलाच गबर झाला. समाजातील वजनदार व्यक्ती आता त्याच्याकडे हेलपाटे मारु लागल्या व तो जर्मनीभर प्रसिद्ध झाला. १९२८ साली तर त्याला नेदरलँडच्या राणीच्या नवर्‍याच्या आजारासाठी बोलाविण्यात आले. तो देश त्याला इतका आवडला की त्याने बर्लिन सोडून हेगमधे आपले बस्तान हलविले. अर्थात बर्लिनमधे त्याने स्वत:साठी एक छोटे घर ठेवले. नंतर कमाविलेला पैसा त्याने बर्लिन शहराबाहेर एका फार्महाउस मधे गुंतवला. लवकरच त्याचे लग्नही झाले. त्याच्या सुविद्य पत्नीचे नाव होते इर्मागार्ड. ही बाई स्वयंपाक करण्यात अत्यंत तरबेज होती व कर्स्टनलाही चांगले खाण्याची आवड होती. लवकरच त्यांना एक मुलगाही झाला. कर्स्टन आता हेग, बर्लिन व रोम एवढ्या ठिकाणी दवाखाने चालवू लागला. एकंदरीत सुखाची कमी नव्हती सगळे कसे मजेत चालले होते.

हिटलरने ऑस्ट्रीया घशात घातले त्याच सुमारास कर्स्टनचे लग्न झाले. त्याला मुलगा झाला त्याच काळात हिटलरने चेकॉस्लोव्हाकिया घशात घातला. पण कर्स्टनने त्याचे डॉळे झाकून घेतले होते. त्याच्या घराच्या सोन्याच्या भिंतीत त्याला असल्या गोष्टींची फिकीर करायचे कारण नव्हते. त्याने सोयिस्करपणे या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. सगळे चांगले चालले असताना याकडे कोण लक्ष देतो ? राजकारणाकडे तर मुळीच नाही.....

......पहिल्या दोन आठवड्यातच कर्स्टनच्या उपचारांचा हिमलरवर आश्‍चर्यकारक परिणाम दिसू लागला. खरे तर या दोन आठवड्यात हिमलरवर ज्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या त्यात प्रचंड शारीरिक व मानसिक कष्ट होते. त्यातील दोन रात्री तर त्याला झोपण्यासही मिळाले नव्हते. प्रत्येकाकडे संशयाने पहाणे हा त्याच्या जबाबदारीचाच एक भाग होता. पण कर्स्टनच्या जादुई हातांनी त्याच्या मनावरचे ताण खुपच कमी झाले. कर्स्टन त्याच्यावर उपचार करत असे तेव्हा दर पाच मिनिटांनी त्याला पाच मिनिटे विश्रांती देत असे आणि याच विश्रांतीच्या काळात राईशफ्युरर त्याच्याशी गप्पा मारे.

गप्पांची सुरवात त्याच्या आजारपणाबद्दल बोलून झाली. नंतर नंतर त्याने कर्स्टनला श्रेष्ठ जर्मन वंशाबद्दल एक लंबे चौडे भाषण ठोकले. एस्. एसचे सैनिक तो स्वत: भरती करत असे हेही सांगून झाले. एस्.एसमधे ज्यांची भरती करायची ते जर्मनवंशाच्या कसोटीवर उतरले तरच त्यांची निवड व्हायची. तो माणूस उंच पाहिजे, एखाद्या धावपटूसारखी त्याची शरीरयष्टी पाहिजे त्याचे केस सोनेरी, व डोळे निळे पाहिजेत अशी साधारणत: अपेक्षा ठेवण्यात आली होती. शेवटी मात्र जेव्हा तो हिटलरविषयी बोले तेव्हा मात्र तो भरभरुन बोले. त्याच्या मते असा बुद्धिमान माणूस हजार वर्षात एखादाच होतो. परमेश्‍वराइतकेच सामर्थ्य हिटलरकडे आहे. उज्वल भवितव्यासाठी जर्मन जनतेला फक्त हिटलरमागून चालायचे आहे बस्स !

कर्स्टन त्याच्या या मतांचा प्रतिवाद करायच्या भानगडीत पडला नाही. शक्यतो राजकारणाच्या भानगडीत पडायचे नाही व हिमलरला हाताच्या अंतरावर ठेउन त्याच्यावर फक्त उपचार करणे एवढाच संबंध ठेवायचा असे त्याचे अगोदरच ठरले होते. पण एक दिवस त्याला धक्काच बसला. समोरच्या कोचावर आरामात बसताना हिमलर म्हणाला, ‘लवकरच आम्ही युद्ध घोषित करणार......’
‘युद्ध ? अरे देवा ! का? युद्ध का ?’
‘युद्ध होणार आहे कारण हिटलरला युद्ध हवय ! युद्धामुळे युवकांची पिढी कणखर होते...व कुठल्याही संकटाला ते सामोरे जाऊ शकतात.’
हिमलर परत दिवाणावर पसरला व ठामपणे त्याने त्याचे बोलणे पूर्ण केले.
‘अर्थात हे युद्ध लवकर संपेल. सगळ्या लोकशाहीवादी देशातील लोकशाहीचा गाभा कुजलेला आहे. ते सर्व देश लवकरच आमच्यासमोर गुडघे टेकतील.
कर्स्टन जेव्हा हॉलंडला परतला तेव्हा हिमलरचे दुखणे थांबले होते. कर्स्टनचा निरोप घेताना हिमलरला अगदी भरुन आले होते. तो वारंवार कर्स्टनचे आभार मानत होता. कर्स्टनला तो आता जादुगारच समजायला लागला होता. जवळजवळ तीन महिन्यांनंतर कर्स्टन परत बर्लिनला आला व दुखणे वाढल्यामुळे हिमलरवरचे उपचार परत चालू झाले. मधल्या पाच मिनिटातील गप्पाही परत चालू झाल्या. हिटलरला युद्ध का पाहिजे याचाही उहापोह चालू झाला. तोपर्यंत हिटलरने उरलेला चेकॉस्लोव्हाकियाही घशात घातला होता पण जगातील ताकदवान देशांनी अजून त्याकडे दुर्लक्ष केले होते. हिमलर म्हणाला,
‘युद्धाच्या यज्ञातून निघालेली शांतता ही चिरकाळ टिकणारी व आनंदायी असेल याबद्दल मला खात्री आहे.’
हिमलरच्या आजवरच्या भाषणबाजीला कर्स्टनने प्रतिउत्तर दिले नव्हते. पण हिमलर जे म्हणतो आहे त्याला आपली मूकसंमती आहे असे वाटू नये म्हणून तोही आता त्याचा प्रतिवाद करु लागला.
‘हे युद्ध मानवतेविरुद्ध असेल’
‘पण हिटलर म्हणतो............’ हिमलर परत त्याच्या पालुपदावर येत असे.

त्या वर्षीच हिटलरने त्याची एक बाजू सुरक्षित करण्यासाठी पोलंडवर आक्रमण केले पण हिमलरला जे वाटत होते तसे काही न होता फ्रान्स आणि इग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धामुळे कर्स्टनची स्थिती फार विचित्र झाली. ऑक्टोबरमधे हिमलरकडून येण्याबाबत तातडीचा निरोप आल्यावर त्याने फिनलंडच्या राजनैतिक कार्यालयाचा सल्ला घेतला कारण जरी तो क्वचित फिनलंडला जात असला तरी तो अजुनही फिनलंडचा नागरीक होता व त्यांच्या राखीव सैन्यदलाच्या पटावर त्याचे नाव अजुनही होते. त्याने फिनलँडच्या दुतावासातील महत्वाच्या अधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या व तो हिमलरवर अनेक दिवसांपासून उपचार करतो आहे हे त्यांच्या कानावर घातले. त्याने पुढे त्यांना हेही सांगितले की या उपचारादरम्यान हिमलर बर्‍याच गोपनीय बाबींबद्दल बोलतो. हे उपचार चालू ठेवावेत की नाही याबद्दलही त्याने त्यांचा सल्ला मागितला. त्याला त्वरित सांगण्यात आले की त्याने असला विचारही मनात आणू नये व हिमलरवरचे उपचार चालू ठेवावेत. ते त्याचे कर्तव्यच आहे. त्याचा विश्‍वास वाढण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्याला सांगण्यात आले. कर्स्टनने तो शक्य तेवढे प्रयत्न करेल असे आश्‍वासनही देऊन टाकले.

१९४० च्या मे महिन्यात कर्स्टनची परिस्थिती फारच बिकट झाली. १९१९ मधे इस्टोनियामधे तो प्रस्थापित राज्याविरुद्ध लढल्यामुळे तेथे त्याला देशद्रोहाबद्दल फाशी जाहीर झाली होती. इस्टोनिया आता रशियाने घशात घातला होता. हॉलंड जेथे त्याने घर घेतले होता तो आता हिटलरने जिंकला होता व हॉलंडमधील नाझी त्याच्या मागे होते. त्यांना त्याला ठार मारायचे होते कारण त्यांना तो राणी विल्हेमिनाच्या दरबाराशी फार जवळ होता असा त्यांचा आरोप होता. त्यामानाने फिनलँडबद्दल त्याला आत्मयिता वाटत असे कारण त्या देशाच्या अधिकार्‍यांनी त्याला आधार दिला होता. पण जेव्हा हिटलरने हॉलंडवर आक्रमण केले तेव्हा जर्मनीमधे त्याच्या हालचालींवर बरेच निर्बंध टाकण्यात आले. तो त्याच्या फार्महाउसवर जवळजवळ स्थानबद्धच होता असे म्हणायला हरकत नाही. मे महिन्यात हिमलरची भाषा बदलली. या वेळी त्याला उपचारासाठी हुकुम देण्यात आला. विनवण्या आता इतिहास जमा झाल्या. हिमलरने त्याच वेळी त्याला त्याच्याबरोबर त्याच्या खास आगगाडीने युद्धआघाडीवर येण्याची आज्ञा केली.

जर्मन सेनेचे रणगाडे प्रचंड वेगाने लोण्यातून तापलेली सुरी फिरावी तसे फ्रान्समधून घुसत होते. हिमलरची ती खाजगी आगगाडी आता हिमलरचे कार्यालयच झाले होते. या कार्यालयात त्याच्या सर्व विभागांची म्हणजे एस् एस्, गेस्टापो, गुप्तहेर खाते, घातपाती दल, जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था बघणारा विभाग या सगळ्यांची कार्यालये होती. जे जे मार्गात येईल त्या सर्वाचा विध्वंस करत, भीती, भूक, उपासमार व मृत्यूचा अंमल बसवत ही आगगाडी धडधडत चालली होती.

या विध्वंसाचे थैमान बघायला लागू नये म्हणून त्या चालत्या कार्यालयातील वाचनालयात कर्स्टन मुक्काम ठोकू लागला. त्यातील पुस्तके बघून त्याला आश्‍चर्य वाटले. हिंदूंचे वेद, ओल्ड टेस्टामेंट, गॉस्पेल्स, कुराण, धर्मशास्त्रांवरची चर्चची अनेक पुस्तके, त्या खाजगी वाचनालयात भरली होती. एक दिवस न रहावून त्याने हिमलरला विचारले, ‘खर्‍या नाझीला धर्म नसतो असे म्हणाला होतास ना ?’
‘बरोबर आहे !’ त्या पुस्तकांच्या मांडणीकडे बोट दाखवून त्याने विचारले, ‘मग हे काय आहे ?’
‘माझा बाप्तिस्मा झालेला नाही. ती पुस्तके माझ्या कामाचा भाग आहेत !’ त्याच्या चेहर्‍यावर हे म्हटल्यावर जे भाव उमटले त्यावरुन कर्स्टनने ओळखले की आता त्याच्या दैवताची म्हणजे हिटलरचे कौतुक चालू होणार.
‘हिटलरने नाझींचे बायबल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे’.
‘नाझींचे बायबल? समजले नाही’
‘तिसर्‍या राईशच्या विजयानंतर हिटलर ख्रिश्‍चन धर्म हद्दपार करुन जर्मन धर्म स्थापन करणार आहे. परमेश्‍वर ही संकल्पना तशीच ठेवली जाईल पण त्याचे स्वरुप संदिग्ध असेल. येशूची ‘मुक्तीदाता’ ही प्रतिमा जनमानसातून पुसली जाईल. कोट्यावधी जनता त्यांच्या प्रार्थनेत फक्त परमेश्‍वर व हिटलरचेच नाव घेतील म्हणजे हिटलरचेच. 100 वर्षांनंतर फक्त हाच धर्म अस्तित्वात राहील.’
आपल्या चेहर्‍यावरील रागीट भाव दिसू नयेत म्हणून कर्स्टनने मान झुकवून हिमलरची ही दर्पोक्ती ऐकली.
‘आता हा नवीन धर्म स्थापन करायचा म्हणजे मला अभ्यास करावाच लागणार. मी त्या नवीन धर्माचे ग्रंथ लिहायला या ग्रंथांचा आधार घेतो आहे.’

त्या गाडीला जोडण्यात आलेल्या जेवणाच्या डब्यात त्या दिवशी नाझी अधिकारी फ्रान्सवरील विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. खाण्यापिण्याची आवड असलेल्या कर्स्टनच्या मात्र घशाखाली अन्न उतरत नव्हते. त्याची देहबोली बघून ते नाझी अधिकारी त्याच्याशी अधिकच शत्रुत्वाने वागू लागले. अगोदरच त्यांना त्याच्या भयंकर मत्सर वाटत असे ‘हा साधा कोण कुठला डॉक्टर, याला हिमलरला केव्हाही भेटता येते. आपल्याला हजारो कटकटीतून गेल्यावर त्याची गाठ घेता येते.’

या अधिकार्‍यांमधे मात्र एक अधिकारी असा होता ज्याला कर्स्टनचा मत्स्सर वाटत नव्हता व त्याच्याबद्दल सुडबुद्धीही नव्हती. अर्थात तो ही कर्स्टनसारखा एक सामान्य नागरीक होता व हिमलरचा खाजगी सचीव म्हणून काम करत होता. हाही एक शांतताप्रिय, प्रेमळ असा सद्गृहस्थ होता. जेव्हा नाझींनी सत्ता हस्तगत केली तेव्हा हिमलरला एका सचिवाची गरज भासली. त्याच्या माणसांनी रुडॉल्फ ब्रांटची निवड केली. ब्रांटची अर्थात नकार द्यायची हिंमत नव्हतीच. याच्याकडे कायद्यातील डॉक्टरेट होती व या अगोदर तो सरकारी नोकरीत होता. (सेक्रेटरी पद) ब्रान्टलाही नाझींबद्दल कसलीही सहानभुती नव्हती. त्याचे ज्ञान, शांतपणा, व बुद्धी याने लवकरच हिमलरचे मन जिंकले. या ब्रान्टलाही पोटदुखीचा त्रास होता. साहजिकच हिमलरने कर्स्टनला त्याच्यावरही उपचार करायला सांगितले होते. त्यामुळे हे दोघेही बर्‍याच काळ एकत्र येऊ लागले व गप्पा मारु लागले. सुरवातीला दोघेही एकमेकांकडे संशयाने बघत व जपून आपले विचार मांडत पण लवकरच दोघांनाही हे उमगले की मानवता व त्याची काळजी या दोन गोष्टी त्यांच्यात समान होत्या.
ब्रान्ट...........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

फ्रान्स पडल्यावर हिमलर परत जर्मनीमधे परतला व कर्स्टनचे सामान्य आयुष्य परत रुळावर आले. पण हे वरवर होते. त्याची त्याच्या कुटुंबाशी गाठ पडली, मित्र मैत्रिणी भेटल्या व त्याचे त्याच्या फार्महाऊसवरचे जिवन परत एकदा सुरळीत चालू झाले. मुख्य म्हणजे त्या युद्धभूमीतून बाहेर पडल्यावर त्याला नियमीत भूक लागू लागली व तो परत एकदा चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ लागला. असे सगळे सुरळीत चाललेले असताना ऑगस्टमधे अशी एक घटना घडली की ज्याने त्याचे नाव दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासात कायमचे कोरले जाणार होते.
कर्स्टनचे कुटुंब........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्याचवेळी हिमलरला पेटक्यांचा झटका आला व तो त्या वेदनांनी अक्षरश: गडाबड लोळू लागला. नेहमीप्रमाणे कर्स्टनला बोलाविणे गेले व कर्स्टनने मसाज करुन त्याचे दुखणे थांबविले. अत्यंत म्लान अवस्थेत तसाच पडून राहिलेल्या हिमलरच्या मनात बहुदा कर्स्टनबद्दलच विचार चालले होते. तो कर्स्टनला म्हणाल, ‘ तुझे माझ्यावर अगणित उपकार आहेत. तू नसतास तर मी काय केले असते आणि माझे काय झाले असते हे परमेश्‍वरालाच ठाऊक ! पण मला माझे मन मला खाते आहे. या तुझ्या उपकाराची फेड करण्यासाठी मी काहीच केले नाही. तुला मी साधा मोबदलाही देऊ केला नाही आजवर !’ चाणाक्ष कर्स्टनच्या लगेचच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जर त्याने पैसे घेतले तर हिमलरच्या अनेक नोकरांपैकी तो एक गणला जाईल. त्याला हेही माहीत होते की हिमलरचे उत्पन्न तुलनेने तुटपुंजे होते कारण तो एक जहाल नाझी असला तरीही अत्यंत प्रामाणिक व भ्रष्टाचारापासून दूर होता. इतर नाझी पुढार्‍यांप्रमाणे त्याने संपत्ती गोळा केली नव्हती. त्याच्या अंदाजे 2000 डॉईश मार्क पगारावर तो त्याची बायको, मुलगी अशा कुटुंबाचा गाडा ओढत असे. शिवाय त्याने एक बाई ठेवली होती ती व तिची दोन मुले होतीच. ती बाईही सारखी आजारी असायची.

कर्स्टनने शक्य तेवढ्या नम्रपणे उत्तर दिले, ‘हर राईशफ्युरर तुला हे चांगले माहीत आहे की माझा रुग्ण पूर्ण बरा झाल्याशिवाय मी त्याच्याकडून पैसे घेत नाही. अत्यंत नम्रपणे मी तुझ्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की मी तुझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. व आत्ता मला तुझ्या पैशाची गरज वाटत नाही.’
‘असशील तू माझ्याहून श्रीमंत पण मला तुला काहीतरी द्यायचेच आहे. कर्स्टन काय करु ते सांग’
कर्स्टनला अचानक आठवले की त्याच एक जुना रुग्ण, ऑगस्ट रोस्टर्ग, त्याच्याकडे एक विनंती घेऊन आला होता. ऑगस्ट रोस्टर्ग एक अत्यंत बलाढ्य औद्योगिक संस्थानाचा मालक असला तरी काही बाबतीत त्याचे काही चालत नसे. त्याच्या एका कारखान्यातील एका सभ्य, वयस्कर पर्यवेक्षकाला छळछावणीत डांबण्यात आले होते व तो त्याच्या सुटकेचे प्रयत्न करुन थकला होता. त्या माणसाचा एकच गुन्हा होता तो म्हणजे तो समाजवादी पक्षाचा सदस्य होता. ऑगस्ट रोस्टर्ग या माणसाला तुरुंगातून सोडून देण्यासाठी कर्स्टनने हिमलरपाशी शब्द टाकावा अशी विनंती करत होता. अर्थात त्यावेळेस कर्स्टनने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की त्याचा हिमलरवर कसलाही प्रभाव नाही पण त्याने दिलेला अर्ज मात्र त्याच्या आग्रहास बळी पडून त्याने ठेऊन घेतला होता. त्याने उस्फुर्तपणे तो अर्ज त्याच्या बॅगेतून काढला व हिमलरच्या हातात ठेवला.
"हर राईशफ्युरर हे माझे बिल ! या माणसाची तुरुंगातून सुटका करता येते का ते बघा. तो निर्दोष आहे.’

हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली. कर्स्टनवर तीक्ष्ण नजर रोखून त्याने हाक मारली ‘ब्रान्ट’.........
तो आवाज ऐकून कर्स्टनचे काळीज धडधडू लागले............

क्रमशः
जयंत कुलकर्णी

इतिहासलेखभाषांतर

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

4 Dec 2013 - 10:36 am | खटपट्या

सर
दुसरा भाग त्वरित दिल्याबद्दल धन्यवाद

मुक्त विहारि's picture

4 Dec 2013 - 10:47 am | मुक्त विहारि

"क्रमशः"

हा जास्त आवडला....

चला अजून एक उत्तम लेख वाचायला मिळणार....

खटपट्या's picture

4 Dec 2013 - 10:59 am | खटपट्या

अतिशय उत्कंठावर्धक

Dhananjay Borgaonkar's picture

4 Dec 2013 - 10:59 am | Dhananjay Borgaonkar

प्रचंड उत्सुकता वाढली आहे. काय होईल कर्स्ट्नचे पुढे? तो हिमलरला मारायचा कट रचेल का? त्यात त्याचे काय होईल्?तो पकडला जाईल का? त्याच्या कुटूंबाचे काय होईल?
फार भारी लेखमाला आहे..

मृत्युन्जय's picture

4 Dec 2013 - 11:27 am | मृत्युन्जय

सुंदर. पुभाप्र.

जेपी's picture

4 Dec 2013 - 11:30 am | जेपी

पुढचाभाग हि याच वेगात येऊद्या .

लाल टोपी's picture

4 Dec 2013 - 12:56 pm | लाल टोपी

जबरदस्त उत्सुकता वाटत आहे पुढे काय?... अर्थातच जयंतजी फार वाट पहायला लावणार नाहीत.

चावटमेला's picture

4 Dec 2013 - 2:09 pm | चावटमेला

ही कर्स्टन मालिका छान चालली आहे. पुभाप्र.

हरिप्रिया_'s picture

4 Dec 2013 - 2:42 pm | हरिप्रिया_

मस्तच
पुभाप्र

ƒƒƒ

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 4:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

उत्कंठावर्धक..पुलेशु

विशाल चंदाले's picture

4 Dec 2013 - 6:33 pm | विशाल चंदाले

अतिशय उत्कंठावर्धक >> +1

प्यारे१'s picture

4 Dec 2013 - 6:41 pm | प्यारे१

पु भा वा उत्सुक

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Dec 2013 - 7:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान लिहिता आहात.. लवकर पुढचा भाग येऊ दे..

राही's picture

4 Dec 2013 - 7:41 pm | राही

हिट्लर एक नवीन धर्म, तोही येशूविरहित, स्थापण्याच्या खटपटीत होता ही माहिती कुतूहलजनक वाटली. यासंबंधी अधिक माहिती कुठे मिळेल?

ऐक शुन्य शुन्य's picture

4 Dec 2013 - 9:41 pm | ऐक शुन्य शुन्य

धन्यवाद... दुसया महायुद्धात ज्यांनी माणुसकी दाखविली, जेव्हा ते स्वत: सगळ्यात मोठया धोक्यात होते त्यांना सलाम....

विटेकर's picture

5 Dec 2013 - 6:42 pm | विटेकर

प्लीज .. ताणू न का
काय लिहलयं... जबर्या