युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Dec 2013 - 12:01 pm

मित्रहो,
दहा युद्धकथा लिहायचे वचन आज या कथेने पूर्ण होत आहे. आपण वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मी आपले आभार मानतो. अशाच एका प्रतिक्रियेत कोणीतरी फेलिक्स कर्स्टनबद्दल लिहा अशी सूचना केली होती. ती सूचना मान्य करुन या लेखमालिकेतील हे शेवटचे पुष्प गुंफत आहे. मागची आठवी होती. नववी या अगोदरच लिहिली आहे पण ती या मालिकेत घालायची राहिली होती. म्हणून कदाचित ही नववी पाहिजे असे काही जणांचे म्हणणे पडेल म्हणून हा खुलासा... असो......तर ही शेवटची कथाही आपल्याला आवडेल अशी आशा व्यक्त करतो.

या गोष्टीसाठी जोसेफ केसेलच्या द मॅजिक टच या पुस्तकाचा व यु एस् आर्मीच्या काही कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. द मॅजिक टचचा हा स्वैर अनुवाद आहे असे म्हटले तरी चालेल हे ज्या वाचकांना असल्या बाबीत जास्त रस आहे त्यांनी लक्षात घ्यावे...हा इतिहास असल्यामुळे कुठे ना कुठे तरी वाचुनच लिहिला आहे.......मी हे मराठीत लिहिले कारण मराठीत वाचण्यास मजा येते व अनेकांना मराठीतच वाचायला आवडते. (इंटरनेटच्या बाहेरील जगतात)...

युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - १

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

८, प्रिन्स अल्बर्ट स्ट्रास या पत्यावरील इमारत त्या काळातील अनेक जर्मन इमारतींसारखीच होती फक्त ती तिच्या आकारामुळे सगळ्यात उठून दिसत असे. इतर सरकारी इमारतींप्रमाणेच यावरही नाझी झेंडा मोठ्या डौलाने फडकत असे. मद्दड करड्या रंगाच्या त्या इमारतीची जरब मोठी करडी वाटत असे कारण तिच्या प्रवेशद्वारापाशी एखाद्या यंत्रमानवासारखे उभे राहणारे निश्चल बंदुकधारी सैनिक. त्या इमारतीसमोरुन जाताना पादचारी आपल्या पावलांचा मोठा आवाज होणार नाही याची काळजी घेत. मोठ्याने बोलणे तर सोडाच. इकडे तिकडे बघायचे नाही हा अलिखित नियम होता व पादचऱ्याकडून तो कसोशीने पाळला जायचा. तुम्ही विचाराल काय होते त्या इमारतीत एवढे ? थांबा ! ही इमारत म्हणजे स्टुट्झस्टाफेलचे मुख्यालय होती व तिचा प्रमुख होता जनरल हाईनरीश हिमलर. गेस्टापोंचा अनभिषीक्त राजा.......

१९३९ सालातील मार्च महिन्यातील एका दुपारी एका आलिशान गाडीच्या चालकाने या पत्यावर आपल्या गाडीचे ब्रेक दाबले व त्यातून एक अंदाजे चाळीसएक वयाचा जाडा माणूस उतरला. या इमारतीसमोर खाजगी गाडी थांबण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. समोरच्या पादचारीपथावरील माणसांच्या भुवया उंचावल्या. त्या माणसाने सरळ पहाऱ्यावरच्या सैनिकाकडे पावले टाकली व राईशफ्युररची भेट मागितली. राईशफ्युरर ही पदवी खुद्द हिटलरने या महत्वाच्या नाझीला दिली होती. त्या सैनिकाने चेहऱ्यावरचे भाव न बदलता पाहुण्याचे नाव विचारले व तो घाईघाईने आत गेला व त्याच्या अधिकाऱ्याला घेउन आला. त्या काळ्या रंगाच्या गणवेषात असलेल्या रुबाबदार अधिकाऱ्याने त्या पाहुण्यासमोर आल्याआल्या एक कडक नाझी सलाम ठोकला
‘हाईल हिटलर.’ आपल्या पाहुण्याने अदबीने आपली हॅट मस्तकावरुन काढली व त्याला अभिवादन केले,
‘गुड डे ऑफिसर !’
‘कृपया माझ्या मागून या !’ त्याने अदबीने विनंती केली.
ते दोघे त्या दरवाजाआड अदृष्य झाल्यावर त्या पहाऱ्यावरील सैनिकांनी एकामेकांकडे आश्चर्याचा कटाक्ष टाकला व परत समोर नजर वळविली. या इमारतीला भेट देणाऱ्या इतर लोकांच्या तुलनेत हा माणूस एकदम वेगळा होता. नाहीतर या इमारतीला एस्.एस् अधिकारी, पोलिस, गुप्तहेर, खबरे व चौकशीसाठी आणलेली तणावग्रस्त चेहऱ्याची माणसे याशिवाय कोणाचे पाय लागायचे नाहीत. या माणसाच्या चेहऱ्यावर ना घाबरल्याचे भाव होते ना त्याच्या चेहऱ्यावर अधिकाराची गुर्मी होती. तो एक साधासुधा नागरीक वाटत होता.

आत गेल्यावर त्या अधिकाऱ्याने आपल्या पाहुण्याला घेउन सैनिकांनी गजबजलेले दोन हॉल पार केले. रुंद पायऱ्यांचे दोन जिने चढून गेल्यावर एक दरवाजा तो उघडणार तेवढ्यात तो दरवाजाच उघडला. हिमलर त्याचीच वाट बघत होता. अरुंद खांदे, मिशा असणाऱ्या हिमलरने एस्.एस् जनरलचा गणवेष परिधान केला होता. डोळ्यावर राखाडी रंगाची फ्रेम असलेल्या चष्म्यातून त्याचे डोळे समोरच्या माणसाच्या काळजाचा ठाव घेत असत. त्याची गालफाडे चांगलीच वर आलेली होती व त्याच्या मेणासारख्या रंगकांतीला शोभा देत होती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
आपल्या हडकुळ्या हाताने त्याने आपल्या पाहुण्याचा गुबगुबीत हात हलकेच आपल्या हातात घेतला व हळुवारपणे त्याला आत घेतले,
‘बरे झाले आपण आलात डॉक्टर. मी तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. माझ्या पोटाच्या व्याधीतून तुम्ही माझी सुटका कराल अशी मला आशा वाटते आहे. ही पोटदुखी मला ना बसू देत ना धडपणे चालू देते.’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर वेदना उठून गेली व त्याचा अनाकर्षक चेहरा अधिकच पिळवटून निघाला.
‘जर्मनीतील एकाही डॉक्टरला माझे हे दुखणे बरे करता आलेले नाही. पण तुम्ही ते करु शकाल अशी मला खात्री दिली गेली आहे. तुम्हाला काय वाटते? करु शकाल का तुम्ही मला बरे ?’’

उत्तर न देता डॉ. फेलिक्स कर्स्टनने हिमलरच्या मंगोल वळणाच्या गालावर, विरळ केसांवर व खाली उतरणाऱ्या हनुवटीवर एक नजर टाकली. याच माणसाने सुसंस्कृत जर्मन समाजाची पार वाट लावली होती, त्यांच्यावर अत्याचार करायलाही त्याने मागे पुढे बघितले नव्हते, त्यांना छळछावण्यात डांबले होते, त्यांच्या सामुहिक कत्तली घडवून आणल्या होत्या. त्याच्या मना घृणा दाटून आली. काय बोलावे ते त्याला कळेना. तेवढ्यात समोरच्या कृरकर्म्यात त्याला वेदना सहन करणारा रुग्ण दिसला आणि त्याच्यातील डॉक्टर जागा झाला. त्याने त्या खोलीत नजर टाकली. तेथे विशेष काही फर्निचर नव्हते. एक कागदांनी भरलेले मोठे टेबल, त्याच्या समोरच्या खुर्च्या व एक लांब लचक दिवाण एवढेच होते त्या खोलीत.
‘राईशफ्युरर, तुम्ही कृपा करुन शर्ट काढून त्या दिवाणावर पाठीवर सरळ झोपाल का ?’ त्याने विनंती केली.

हिमलरने ताबडतोब त्याची विनंती ऐकली. ज्या प्रकारे तो घाईघाईने त्या दिवाणावर जाउन झोपला त्यावरुन त्याचे दुखणे विकोपाला गेलेले दिसत होते. कर्स्टनने एक खुर्ची ओढली आणि त्याने त्या दिवाणावर पडलेल्या त्याच्या रुग्णाच्या शरीरावर त्याचे हात फिरवले. कर्स्टनचे हात गुबगुबीत तर होतेच पण त्याच्या बोटांच्या प्रत्येक नखाखाली मांसल उंचवटा होता जो सहजा इतरांमधे आढळत नाही. जसे त्या डॉक्टरचे हात हिमलरच्या शरीराला तपासत होते तसे त्याचा चेहरा भराभर बदलत गेला. त्याच्या चेहऱ्यावरील रेषा पुसल्या गेल्या. शेवटी त्याचे डोळे मिटले व हा हॉलंडमधील एका गावाचा पूर्वीचा मेयर, बुद्धासारखा दिसू लागला.

त्याची बोटे हिमलरच्या शरिरावर फिरत होती. गळ्यावर, छातीवर, ह्रदयावरुन व पोटावरुन फिरताना त्याच्या बोटांचा दाब वाढत होता. त्याची बोटे त्याच्या शरिराच्या अंतर्भागाचा वेध घेत होती. कान तीक्ष्णपणे आवाज ऐकत होते....हिमलरच्या तोंडातून एकदम एक किंकाळी बाहेर पडली. कर्स्टनने हिमलरच्या पोटावर एका ठिकाणी जोरात दाबले होते त्याच जागेवरुन एक जोरदार कळ त्याच्या मस्तकातून विजेसारखी पसरली.
‘ठीक आहे. असेच पडून रहा.’ कर्स्टन हळुवारपणे म्हणाला. वेदना त्याच तीव्रतेने लवलवत पसरत होत्या. त्या सहन न होउन हिमलरने त्याचे ओठ घट्ट मिटून घेतले.
‘फार दुखतय का ?’ कर्स्टनने विचारले.
‘हो ! फारच !’ हिमलरने आवळलेल्या ओठातून उत्तर दिले.
अखेरीस कर्स्टनने त्याचे डोळे उघडले व त्याचे हात त्याच्या गुडघ्यावर ठेवले.
‘पोटातच गडबड आहे हे निश्चित पण त्याला कारण मज्जारज्जू आहे. त्याशिवाय तुम्हाला एवढ्या वेदना होणार नाहीत.’
‘मला बरे वाटेल ना ?’ हिमलरने जवळजवळ गयावया करत विचारले.
‘आपण लगेचच त्यावरचे औषध शोधणार आहोत’

यावेळी मात्र त्याने पोट न तपासता त्याच्या पोटात खोलवर एका विवक्षित ठिकाणी बोटे खुपसली व हातात आलेला मासाचा गोळा हळूहळू चोळला व शेवटी जोरात पिरगळला. त्याच्या बोटांच्या प्रत्येक हालचालींबरोबर हिमलरच्या वेदना वाढत होत्या व हिमलर हताशपणे काय चालले आहे ते पहात होता.
काही मिनिटांनी कर्स्टनने ते सगळे सोडले व एखाद्या दमलेल्या कुस्तीगिरासारखा तो त्याच्या खुर्चीत कोसळला.
‘पहिल्याच वेळेस हे एवढे पुरेसे आहे ! पण आपल्याला आता कसे वाटत आहे ?’
राईशफ्युररने एक दीर्घ श्वास घेतला जणूकाही तो त्याच्या शरिरात कुठे वेदना होत आहेत का याची चाचपणी करत होता, ऐकत होता. अडखळत तो म्हणाला,
‘अं ऽऽऽऽऽऽ बरेऽऽऽ वाटतयना ! आश्चर्यच आहे. मला पहिल्यापेक्षा खुपच बरे वाटत आहे.’ एवढे म्हणून तो अत्यंत काळजीपुर्वक उठला. उठताना त्या मरणीय वेदना परत जागृत होतील अशी भीती बहुदा त्याला वाटत असावी. पण तसे काही झाले नाही.
‘ आत्तापर्यंत कुठल्याच औषधाची मात्रा चालली नाही अगदी मॉर्फिनसुद्धा. आणि आत्ता काही मिनिटातच...........कोणाला सांगितले तर त्याचा विश्वासच बसणार नाही. माझाही बसला नसता. डॉक्टर मला तुला माझ्या जवळच ठेवले पाहिजे. मी तुझी आत्ताच्या आत्ता एस्.एस मधे कर्नलच्या हुद्यावर नेमणूक केली आहे’.

कर्स्टनला या अचाट कल्पनेबद्दल विचार करण्यास जरा वेळ लागला. शेवटी गंभीरपणे त्याने उत्तर दिले, ‘हर राईशफ्युरर आपल्या या औदार्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण मी ही नोकरी स्वीकारु शकत नाही.’ मग त्याने त्याला कारणांची यादी सादर केली. एकतर तो हॉलंडमधे रहात होता. तेथे त्याची बायका मुले व संसार होता आणि मुख्य म्हणजे असंख्य रुग्ण तेथे त्याच्याकडून उपचार करुन घेत होते आणि त्यांचे उपचार असे अर्धवट सोडणे हे नैतिकतेला धरुन झाले नसते.
‘हा ! पण राईशफ्युरर आपणास मी वचन देतो की आपल्याला जरुर पडल्यास मी हजर होईन. मी पुढील दोन आठवडे येथेच बर्लिनमधे माझ्या रुग्णांसाठी थांबणार आहे.’
‘माझेही नाव त्यांच्या यादीत घाला! आपण येथे रोज यावे ! ही एवढी भीक मला घालच !’ हिमलरने अगतिक होउन त्याची विनवणी केली. हे बोलत असतानाचा त्याने एक बटन दाबले. त्या घंटेचा कर्कश्य आवाज बाहेरुनही आत ऐकू आला. एक अधिकारी आत आला व त्याने हिमलरला सॅल्युट मारला.
‘डॉ. कर्स्टन यापुढे येथे केंव्हाही येतील ! सगळ्यांना हे कळवा. यात चूक व्हायला नको. !’

पुढचे दोन आठवडे दररोज सकाळी कर्स्टन हिमलरच्या मुख्यालयात त्याच्या नावडत्या रुग्णावर उपचार करण्यास जाऊ लागला. खरे तर ती जबाबदारी त्याने त्याच्या मनाविरुद्ध, अनिच्छेने स्वीकारली होती. त्याचा एक जुना रुग्ण व जिवलग मित्र ऑगस्ट डीन याच्यामुळे तो या भानगडीत पडला. ऑगस्ट डीन हा एक जर्मन उद्योगपती १९३८ मधे कर्स्टनकडे आला व त्याने
‘तू हिमलरवर उपचार करशील का’ असे विचारले होते. कर्स्टनने ताबडतोब या विनंतीला नकार दिला.
‘मी या नाझींपासून दूर रहाणेच पसंत करतो, त्यांच्यातील सगळ्यात क्रुर माणसाशी तर मला कसलाही संबंध नकोय !’ पण ऑगस्टने त्याचा प्रयत्न सोडला नाही.
‘डॉक्टर मी आजवर तुझ्याकडून काहीही मागितले नाही हे तुला मान्य असेल. पण ही विनंती मी माझ्या उद्योगबांधवांसाठी करतोय. अर्थात मलाही त्याचा फायदा होणार आहे हे मी नाकारत नाही. हिमलरच्या डोक्यात जर्मनीचा पोटॅश उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्याचे घोळतंय. त्यात पहिला बळी माझ्या कारखान्यांचा जाणार हे निश्चित. तुझा तुझ्या रुग्णांवर किती प्रभाव पडतो हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो. एकदा तू त्याला बरे केलेस की............’ त्याने ते वाक्य शरमेने अर्धवट सोडले.

भिडस्त स्वभावाच्या कर्स्टनने ती विनंती मान्य केली. त्याचा हा होकार हजारो निरुपद्रवी माणसांचे प्राण वाचविणार होता.
फेलिक्स कर्स्टन हा काही शिकलेला ॲलोपाथीचा डॉक्टर नव्हता. तो एक व्यावसायीक मसाजीस्ट होता पण देवाने त्याला जादूचे हात दिले होते असे म्हणायला हरकत नाही.

कर्स्टन घराणे हॉलंडमधे फ्लेमिश लिनन बनवत असे. हॉलंडमधे १४०० साली जो ऐतिहासिक पूर आला त्या काळात आपल्या वाचलेल्या यंत्रासहीत या कुटुंबाने जर्मनीमधे गॉटिंगेन या गावात आसरा घेतला. हे कुटुंब तेथे चांगलेच स्थिरस्थावर झाले कारण त्यांच्यातील एक, अँन्ड्र्यु कर्स्टन त्या गावाच्या नगरपालिकेचा सभासदही झाला. जर्मनीच्या पाचव्या चार्ल्सने १५४४ मधे या कुटुंबाला छोटी का होईना सरदारकी बहाल केली. दिडशे वर्षांनंतर या कुटुंबावर अजून एक संकट कोसळले. त्यांचा कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला. नशीबने राजघराण्याची १०० हेक्टर जमीन कसायचे काम त्यांना मिळाल्यावर त्यांची परिस्थिती परत सुधारली.त्या काळात त्या घराण्याचा आधारस्तंभ फर्डिनंड कर्स्टनचा उधळलेल्या बैलाने ठार मारल्यावर हे सुखाचे दिवस एकदम संपुष्टात आले. त्याच्या शेंडेफळाने म्हणजे फ्रेडरिक कर्स्टनने रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या बाल्कन राज्यामधे प्रशासकीय सेवेमधे नोकरी पत्करली. तो रहात असे युरेव्ह नावाच्या गावात. त्या गावातील पोस्टमास्तरच्या ओल्गा नावाच्या मुलीशी सूत जुळल्यामुळे त्याने तिच्याशी लग्न केले. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे ही ओल्गा त्या भागात तिच्या मसाजसाठी प्रसिद्ध होती. हे तिचे गुण तिच्या मुलात उतरणार होते. त्या मुलाचे नाव होते फेलिक्स कर्स्टन.याला लहानपणीच मसाज म्हणजे काय हे चांगलेच माहीत झाले असणार हे निश्चित. याचा जन्म १८९८ साली इस्टोनियामधील डॉरपॅट नावाच्या गावात झाला. शाळेत फेलिक्स हा एक सामान्य बुद्धिचा विद्यार्थी म्हणूनच ओळखला जायचा. त्याला खाण्याची मात्र भयंकर आवड होती जी शेवटपर्यंत राहिली.

त्या काळात सरहद्दीवर राहणाऱ्या बाल्टीक कुटुंबाकडे रशियात संशयानेच पाहिले जायचे. त्यामुळे अशा कुटुंबांना रशियाच्या दुसऱ्या टोकाला हलविले गेले त्यात हे कुटुंबही कॅस्पियन समुद्राच्या किनारी एका गावात रहायला गेले. त्या काळात फेलिक्स जर्मनीमधे गनफेल्ड येथे एका शेतकी महाविद्यालयात त्याचे शिक्षण घेत होता. १९१४ मधे पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले आणि कर्स्टनचा त्याच्या कुटुंबियांशी संबंध तुटला. या विद्यार्थीदशेत कर्स्टनचे फार हाल झाले. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात खडतर असा हा काळ होता. दोन वेळच्या घासासाठीही झगडावे लागते हे त्याला त्यावेळेस कळाले. युद्ध सुरु झाल्यावर त्याला जर्मन समजून कैसरच्या सेनेत भरती केले गेले पण तेथे त्याचे मन रमले नाही. त्याच काळात जर्मनीमधे आसरा घेतलेल्या फिनलंडच्या नागरिकांची एक सेना तयार करण्यात आली होती जिचे काम रशियन सेनेविरुद्ध लढण्याचे होते. कर्स्टन दगडापेक्षा वीट मऊ असा विचार करुन त्या सेनेत भरती झाला. या संघर्षात केलेल्या कामगिरीमुळे त्याला फिनलंडचे नागरिकत्व बहाल करण्यात आले.

१९१९ साली त्याला सांधेदुखीचा भयंकर त्रास सुरु झाला व त्याला इस्पितळात भरती व्हावे लागले. त्या काळात त्याला फिजिओथेरपी घ्यावी लागली. त्यामुळे त्याला जो आराम पडला त्यामुळे त्याने तोच व्यवसाय स्वीकारायचे ठरविले व तो डॉ. कोलँडरच्या मदतीने बर्लिनला मसाजच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाला. पुढे तेथेच त्याचे लग्न झाले......व त्याच्या आयुष्यात हिमलर आला ते आपण पाहिलेच......

क्रमशः
जयंत कुलकर्णी

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

2 Dec 2013 - 1:24 pm | कपिलमुनी

मस्तच !

पुभाप्र..

सौंदाळा's picture

2 Dec 2013 - 1:37 pm | सौंदाळा

अनोखी युद्धकथा.
क्रमशः बघुन बरे वाटले. मेजवानी अजुन बाकी आहे.

चिर्कुट's picture

2 Dec 2013 - 3:01 pm | चिर्कुट

हाच शब्द आला मनात :)

पटापट येऊदेत पुढचे भाग..

सोनल कर्णिक वायकुळ's picture

2 Dec 2013 - 3:14 pm | सोनल कर्णिक वायकुळ

याचा जन्म १९९८ साली इस्टोनियामधील डॉरपॅट नावाच्या गावात झाला

१८९८ म्हणायचय का?

जयंत कुलकर्णी's picture

2 Dec 2013 - 3:16 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! दुरुस्ती करुन घेत आहे.....

जेपी's picture

2 Dec 2013 - 3:22 pm | जेपी

आवडल .

अनुप ढेरे's picture

2 Dec 2013 - 3:49 pm | अनुप ढेरे

मला पण आवडलं.

लाल टोपी's picture

2 Dec 2013 - 3:59 pm | लाल टोपी

जयंतजींच्या नेहमीच्याच दर्जाला साजेसा लेख आवडला. क्र्मशः वाचून आनंद वाटला +१

राही's picture

2 Dec 2013 - 4:48 pm | राही

हेच म्हणायचे होते..'क्रमशः वाचून आनंद वाटला..'

प्रचेतस's picture

2 Dec 2013 - 9:44 pm | प्रचेतस

खूपच सुरेख.

मुक्त विहारि's picture

2 Dec 2013 - 11:37 pm | मुक्त विहारि

क्रमशः बघुन बरे वाटले.

खटपट्या's picture

3 Dec 2013 - 1:26 am | खटपट्या

मस्तच !!!

चावटमेला's picture

3 Dec 2013 - 4:16 pm | चावटमेला

नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेख. पुभाप्र

मृत्युन्जय's picture

3 Dec 2013 - 4:26 pm | मृत्युन्जय

पुभाप्र.

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 4:33 pm | प्यारे१

वाचतोय. अ‍ॅज युज्वल मस्त.

सुधीर कांदळकर's picture

3 Dec 2013 - 6:41 pm | सुधीर कांदळकर

आवडले.

पुभाप्र

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Dec 2013 - 7:32 pm | डॉ.प्रसाद दाढे

आणखी येऊ द्या.. वाट पाहात आहे..

सोनल कर्णिक वायकुळ's picture

4 Dec 2013 - 3:23 pm | सोनल कर्णिक वायकुळ

भाग २ येवु दे आता...

पैसा's picture

4 Dec 2013 - 3:34 pm | पैसा

उत्कंठावर्धक आणि जरा वेगळीच युद्धकथा! नेमकं काय घडलं हे आता लगेच पुढच्या भागात वाचणार आहे!

वसईचे किल्लेदार's picture

4 Dec 2013 - 5:14 pm | वसईचे किल्लेदार

धन्यवाद

कवितानागेश's picture

4 Dec 2013 - 10:49 pm | कवितानागेश

वाचतेय. इन्ट्रेस्टिन्ग गोष्टी आहेत.
पुढचा भाग?

सुधीर कांदळकर's picture

5 Dec 2013 - 1:59 pm | सुधीर कांदळकर

हाही भाग आवडला.

शिव्शक्तिकुमर's picture

20 Dec 2013 - 5:45 pm | शिव्शक्तिकुमर

मला पण आवडलं

डश's picture

24 Dec 2013 - 11:00 am | डश

दर्जेदार लेख !!