युद्धकथा-१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 9:12 pm

युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-३

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

युद्धकथा-१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ४

............‘त्या डच डुक्करांना आता चांगलाच धडा मिळेल. परवाच त्यांनी माझ्या दोन सैनिकांना ठार मारले. हलकटांना तीच शिक्षा योग्य आहे’....
‘पोलंडच्या थंडीने त्यांच्या कारवाया जरा थंड पडतील’ हायड्रीश खिदळत म्हणाला. कर्स्टनने पुढे वाकून कान अधिकच टवकारले.

‘मला आत्ताच त्यांच्या स्थलांतराचे आदेश मिळाले आहेत’

‘तुला लवकरच योजनेचे सवीस्तर आदेश मिळतील. त्या नंतर मात्र आपल्याला जेवायलाही वेळ मिळणार नाही हे ध्यानात ठेव !’

‘काय तारीख ठरली आहे ?’

या प्रश्‍नाचे उत्तर हायड्रीशने कुजबुजत दिले त्यामुळे कर्स्टनला काहीच ऐकू आले नाही. पण त्याने जे काही ऐकले होते त्यावरुन त्याने हॉलंडवर लवकरच कसलेतरी आरीष्ट कोसळणार आहे हे जाणले. त्याच्या मनातील खळबळ लपविण्यास त्याला त्या दिवशी फार कष्ट पडले विशेषत: हिमलरवर उपचार करताना. त्या दिवशी दुपारी कर्स्टनने ब्रान्टची एकांतात भेट मागितली. संध्याकाळी सहा वाजता ब्रान्टच्या ऑफिसमधे त्याने सकाळी काय झाले ते सवीस्तर सांगितले.

‘काय चालले आहे ?’ कर्स्टनने विचारले. ब्रान्टने एक दीर्घ श्वास घेतला व दरवाजाकडे पाहिले.

‘जर कोणी विचारले तर मी उपचाराबद्दल चर्चा करतोय असे सांगेन.’ त्याने टेबलावर नीट लाऊन ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्यातून एक फाईल काढली ज्यावर ‘टॉप सिक्रेट’ असे लिहिले होते. ती फाईल कर्स्टनच्या हातात देत तो म्हणाला,

‘मी तुला काही सांगितले नाही व तू काही पाहिलेले नाही हे लक्षात ठेव’ त्याने खिडकीजवळ जाऊन बाहेर लक्ष देण्यास सुरुवात केल्यावर कर्स्टनने ती फाईल उघडली.

आतले कागद अस्सल कार्यालयीन व अधिकृत होते. डच जनता ही जर्मन वंशाची असल्यामुळे तिचा विरोध हा साधा विरोध नसून देशद्रोह समजला गेला होता. त्यामुळे हिटलरने हॉलंडच्या जनतेचे पोलंडच्या लुब्लिन प्रांतात सक्तीने स्थलांतर करायचे हिमलरला पूर्ण अधिकार दिले होते. तीस लाख माणसांना चालवत तेथे न्यायचे व त्यांच्या कुटुंबियांना समुद्रामार्गे किंवा रेल्वेने हलवायचे अशी योजना होती. ते कागद वाचून संपेपर्यंत कर्स्टनचे हातपाय थरथरायला लागले होते. त्याच्या डोळ्यासमोर चालणारी असंख्य माणसे, चाबकाचे फटके खात चालताना दिसू लागली. त्यांचे आख्खा युरोप पार करताना काय हाल झाले असते ते देवालाच ठाऊक. गाड्यात कोंबलेली बायका, मुले, गुदमरलेली मुले त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली. त्याच्या डोळ्यासमोर तो नरक उभा राहिला.

‘हे सगळे फारच भयानक आहे. आख्खा देश गुलामगिरीत ढकलला जाणार आहे !’ ब्रान्ट म्हणाला.

दुसर्‍या दिवशी दुपारी कर्स्टन परत हिमलरच्या कार्यालयात हजर झाला. त्याला रात्रभर झोप आली नव्हती. त्याने हिमलरशी या बाबतीत काहीही झाले तरी बोलायचे ठरविल्यावर त्याला झोप लागली. खरे तर त्याला ही गोष्ट माहीत आहे हीच गोष्ट त्याच्या मृत्युसाठी पुरेशी होती. पण त्याने तोही धोका आता पत्करायचा ठरविले होते.

हिमलर नेहमीप्रमाणे त्या दिवाणावर पसरला होता. मसाज करतान त्याने नेहमीच्या ठिकाणे त्याच्या बोटांनी हकेच दाबले आणि एकदम हिमलरला विचारले, ‘डच जनतेचे स्थलांतर किती ताखेला सुरु होणार आहे ?’

‘२० एप्रिल ! त्या दिवशी हिटलरचा वाढदिवस असतो.’ हिमलर गुंगीत म्हणाला. क्षणभर तेथे स्मशान शांतता पसरली. दुसर्‍याच क्षणी हिमलर ताडकन उठून बसला व त्याने तीव्र स्वरात कर्स्टनला विचारले,

‘ही बातमी तुला कुठे कळाली?’ कर्स्टनने त्याने हायड्रीशला व राऊटरला बोलताना कसे ऐकले ते सांगितले.

‘मूर्ख बडबडे ! ‘ हिमलर किंचाळला. पण त्याला आत कुठेतरी त्याच्या डॉक्टरचा यात कसलाही अपराध नाही याचा आनंद झाला होता.

‘ते किती बेपर्वा वागू शकतात याची मला कल्पना आहे. बरे झाले तू मला सांगितलेस !’ कर्स्टनने परत मसाज चालू केला.

‘हे सक्तीचे स्थलांतर तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुक ठरणार आहे हे लक्षात ठेव !’ कर्स्टन म्हणाला.

‘तुला राजकारणातले काही कळत नाही ! फ्युररची ही योजना फार विचार करुन आखली गेली आहे. ऐक ! आम्ही आता पोलंड घेतलेलेच आहे. पण पोलिश जनता आमचा द्वेष करते. तेथे जर्मन वंशाच्या जनतेची वसाहत झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. डच जनता ही जर्मन वंशाची आहे. त्यांची वसाहत तेथे स्थापन झाल्यावर स्थानिक पोलिश जनता त्यांचा द्वेष करायला लागेल व त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होईल. या भांडणात डच जनतेला आमच्याकडेच मदत मागावी लागेल. राहिला प्रश्न हॉलंडचा. तेथे आम्ही तरुण रक्ताचे जर्मन शेतकरी वसवणार आहोत. सांग आता यात काय चूक आहे? हिटलर बुद्धिमान आहे हे मान्यच करायला लागेल !’

‘हे सगळे असे होणे शक्य आहे. कदाचित होईल, होणारही नाही ! पण राईशफ्युरर मी फक्त तुझ्या तब्येतीचा विचार करत होतो. काही दिवसापूर्वी तू मला संगितले होतेस की तुझ्या नेहमीच्या कामाबरोबर हिटलरने तुझ्यावर अजुन एक जबाबदारी टाकली आहे. एस्.एसची ताकद वाढवायची. या उन्हाळ्यापर्यंत तुला त्यांची संख्या दहा लाख करायची आहे. आत्ता ती फक्त एक लाख आहे म्हणजे अजुन नऊ लाख सैनिक तुला भरती करायचे आहे, त्यांचे प्रशिक्षण आहेच. या सगळ्या कामात तुला त्या स्थलांतराच्या कामाची कटकट पाहिजे आहे का ? हा खरा प्रश्न आहे.’

‘माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हा हिटलरचा हुकुम आहे’

‘मला प्रामाणिकपणे उत्तर दे. या दोन योजनांपैकी कुठली महत्वाची आहे ? एस्. एसची ताकद वाढविणे की डचांना पोलंडमधे हाकलणे ?’

‘अर्थातच एस्. एस् ची ताकद वाढविणे’.

‘मग डचांचे हे स्थलांतर या युद्धात विजय मिळेपर्यंत लांबणीवर टाकावे हे बरे. ते त्यानंतरही करता येईल. ही दोन्ही कामे करण्याइतकी शक्ती मी तुला देऊ शकत नाही’.

‘अशक्य ! ते शक्य नाही करण हिटलरला ते आत्ताच हवे आहे !’

मसाज पूर्ण झाला व हिमलर परत नेहमीप्रमाणे वागू लागला. अर्थात कर्स्टनला पहिल्या फेरीत विजय अपेक्षित नव्हताच. पण आजचे यश बर्‍यापैकी होते. मुख्य म्हणजे ही बातमी कर्स्टनला कळाली आहे ही बाब हिमलरने बर्‍यापैकी शांतपणे स्वीकारली होती. तेवढ्यात त्याच्या मनात एक भयंकर विचार आला. हे काम हिमलरने नाकारले व हिटलरने ते हायड्रिशसारख्या कडव्या नाझीवर टाकली तर ...........

‘हे काम करण्यासाठी फक्त तुच आहेस का ? अजून कोणी ही जबाबदारी घेऊ शकत नाही का ?’

‘या एवढ्या महत्वाच्या कामगिरीसाठी हिटलर फक्त माझ्यावरच विश्वास टाकू शकतो. दुसर्‍या कोणावरही तो ही जबाबदारी टाकणार नाही’.

आठवडे उलटले तरी हिमलरने कर्स्टनला दाद दिली नाही. कर्स्टनने त्याची स्तुती करुन बघितली, विनवण्या करुन बघितल्या, त्याला त्याची तब्येत ढासळेल ही भीतीही दाखवली, त्याने केलेल्या उपचारांची आठवणही देऊन बघितली पण हिमलर कशालाही बधला नाही व वेळ तर कमी उरला होता. हिमलरच्या दुसर्‍या बाजुला मातब्बर प्रतिस्पर्धी उभा होता. खुद्द हिटलर. त्याचा हिमलरवरचा प्रभाव पुसणे हे साधेसुधे काम नव्हते. बुद्धिबळापेक्षाही या खेळाचे आव्हान जहरी होते. हिमलरचे एकच उत्तर ठरलेले होते, ‘ठरल्याप्रमाणे ही योजना पार पडेल’ ही उत्तरे ऐकत दिवस कमी उरले आहेत याची जाणीव कर्स्टनला बेचैन करत होती.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एक अघटित घटना घडली. कर्स्टनने ते मुद्दाम केले की खरेच तसे झाले हे समजायला जागा नाही. पण दोन वर्षात पहिल्यांदाच कर्स्टनची जादू चालेनाशी झाली. नंतर त्याने जी मुलाखत दिली त्याने त्याने म्हटले की त्याच्या बेचैन अवस्थेत त्याच्या एकाग्रतेवर विपरीत परिणाम झाला होता व त्याला स्वत:ला ते जाणवत होते. हिमलरवर त्याच्या मसाजचा परिणाम होईनासा झाला. हिमलर तर वेदनेने तडफडत होता.

‘मी तुला आधिच ताकीद दिली होती की तू ही दोन्ही कामे एकदम पार पाडू शकणार नाहीस. तू माझे ऐकले नाहीस. तुला कमी महत्वाचे काम नाकारावेच लागेल. मी तुला खात्री देतो की तुझे दुखणे परत कमी होईल.’

‘अशक्य. परत प्रयत्न कर ! परत !’

‘मी प्रयत्न करतो पण मला खात्री आहे त्याचा उपयोग होणार नाही’

१९४१ मधे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जर्मनीच्या फौजांनी युगोस्लाव्हियावर आक्रमण केले व हिटलरने त्याचे मुख्यालय युद्धभूमीजवळ उभारले. अर्थातच हिमलरलाही त्याच्याबरोबर जावे लागले. या काळात हिमलर जवळजवळ मरायलाच टेकला. त्याच्या खाजगी खास आगगाडीतील अंथरुण त्याने कधी सोडलेच नाही. हिटलरचे बोलाविणे आले की तो तेवढ्यापुरता उठायचा व काम झाले की परत विश्रांतीसाठी झोपायचा. कर्स्टन दिवसरात्र त्याच्या सेवेत मग्न होता.

‘तू वेडा आहेस राईशफ्युरर ! ‘ प्रत्येकवेळी कर्स्टन म्हणत असे. ‘सगळी कामे कोणीच एकाच वेळेस करु शकत नाही. एक काम पुढे ढकल. ते स्थलांतर थांबू शकते.’

‘ते मला शक्य नाही. मी माझे जीवन हिटलरला अर्पण केले आहे’

२० एप्रिलला आठ दहा दिवस उरले असताना एके दिवशी पहाटे दोन वाजता कर्स्टनला हिमलरचे बोलावणे आले. हिमलर त्याच्या बिछान्यावर तळमळत पडला होता. खुर्ची ओढत कर्स्टन अधिकारवाणीने म्हणाला,

‘राईशफ्युरर मी तुला मित्रत्वाचा सल्ला देतो आहे. मला तुझी काळजी वाटते. हे स्थलांतराचे काम लांबणीवर टाक. ही भानगड उपटली आणि तुझे दुखणे वाढले आहे. त्या अगोदर माझ्या उपचारांनी तुला बरे वाटायचे हे तुला आठवते आहे की नाही ? परत तसे होईल पण तू हिटलरला भेट आणि ही स्थलांतराची मोहीम पुढे ढकलायची परवानगी माग.’
वेदनेने पिळवटलेल्या चेहर्‍यावर उसने हसू आणून हिमलरने कर्स्टनचा हात पकडला,

‘मला पटतय रे तुझे म्हणणे पण मी हिटलरला काय कारण देऊ......?’

‘ही दोन्ही कामे एकदम होणे अशक्य आहे हे त्याला सांग. बोटींची कमतरता, अरुंद गजबजलेले रस्त्यांमुळे हे लवकर न संपणारे काम आहे हे त्याला पटवून दे. शेवटी तुझ्या तब्येतीबद्दल त्याला कल्पना दे व सद्य परिस्थितीत प्रकृतीमुळे दोन्ही कामे एकाच वेळी जमणे जर अशक्य वाटतय असेही त्याला सांग व एस् एसचे काम किती महत्वाचे आहे याचीही त्याला कल्पना दे..’

‘ठीक आहे ! ठीक आहे ! पण डॉक्टर तेवढी तरी शक्ती मला दे !’ ते ऐकून कर्स्टनचा आत्मविश्‍वास वाढला, त्याच्या मनावरचे मळभ दूर झाले व आश्‍चर्य म्हणजे हिमलरलाही बरे वाटू लागले. कर्स्टन शांतपणे त्याचे काम करत होता. मसाज संपल्यावर हिमलरचे दुखणे नाहीसे झाले होते. ज्याला श्वासही घेता येत नव्हता तो हिमलर आता उठून बसला.

‘आता बरे वाटतय...बरे वाटतय’ तो सारखा पुटपुटत होता.

‘मी माझा नेहमीचाच मसाज करत होतो. तू हिटलरला भेटायचे ठरविल्यामुळे तुला बरे वाटते आहे. बाकी काही नाही.’

तेवढ्यात फोन वाजला. हिमलरने तो फोन घेतला. न बोलता तो नुसता ऐकत होता. शेवटी पलिकडून फोन ठेवल्याचा आवाज आल्यावर त्याने कर्स्टनला सांगितले, ‘युगोस्लाव्हिया आम्ही जिंकला आहे. हिटलरने तिकडे जाण्यासाठी बर्लिन सोडले आहे. मला तिकडे जाण्याचा हुकुम आहे. माझी आगगाडी तयार असेलच !’ आता बरे वाटू लागल्यावर त्याच्या आवाजातील अगतिकपणा नाहीसा होऊन त्याची जागा आधिकारवाणीने घेतली होती. आवाज रुक्ष व करारी झाला होता. कर्स्टनला भीती वाटू लागली की त्याने त्याला फारच लवकर बरे केले की काय....पण त्याचे नशीब जोरावर होते. त्याच प्रवासात हिमलरला परत वेदनेचा झटका आला. यावेळीस मात्र कर्स्टनने त्याचे उपचार जास्त वेळ चालू रहातील याची काळजी घेतली. ते बर्लिनला पोहोचेपर्यंत हिमलरला काही स्वास्थ्य लाभले नाही.

‘तुझ्या डोक्यात अजुनही ते स्थलांतर आहे. बरोबर ना ! तुला बरे वाटण्यास वेळ लागू लागला की मला ते कळते. मी अजुनही तुला सांगतो, ते डोक्यातून काढून टाक’

‘मी तुला वचन देतो कर्स्टन मी याबाबतीत हिटलरशी बोलेन’

बर्लिनला पोहोचल्यावर हिमलर सरळ हिटलरला जाऊन भेटला. दोन तासांनंतर त्याने कर्स्टनला फोन केला.
‘फ्युरर उदार आहे. डच स्थलांतर पुढे ढकलले गेले आहे. माझ्या हातात अधिकृत हुकुम पडलाय.’

ते ऐकल्यावर कर्स्टनने मोठ्या कष्टाने आपल्या भावनांवर ताबा मिळवला......
या सगळ्या प्रकरणात हिमलरला कर्स्टनच्या हेतूविषयी कसलीही शंका आली नव्हती. डॉक्टरने दिलेला एक सल्ला असेच तो या सगळ्याकडे पहात होता. पण हायड्रीशचे तसे नव्हते. एके दिवशी गेस्टापोच्या या प्रमुखाने कर्स्टनला बोलाविणे पाठविले. हिमलर व ब्रान्ट काही तातडीच्या कामासाठी हॅम्बुर्गला गेले होते. कर्स्टन हिमलरच्या ऑफिसवर गेला व तेथील रक्षकाला त्याला हायड्रीशने बोलाविले आहे व तो तेथे जात आहे हे हिमलरला फोन करुन सांगायला सांगितले. जेव्हा कर्स्टन हायड्रीशला भेटला तेव्हा त्याने त्याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केले. याचा अर्थ कर्स्टनला चांगलाच माहीत होता.

‘मला माफ कर पण मी तुला अटक करणार आहे. हिमलरने योजनांमधे जे काही बदल केला ते तुझ्या प्रभावामुळे हे मला चांगलेच माहीत आहे.’

‘तू मला फारच महत्व देतो आहेस असे नाही तुला वाटत ? हिमलरवर मी कुठला प्रभाव पाडू शकेन उलट त्याचाच प्रभाव माझ्यावर पडला आहे’. कर्स्टन म्हणाला.

त्याने सावकाशपणे आपला उजवा हात केसातून फिरवला व मंद हसत तो म्हणाला, ‘हॉलंडच्या राजदरबार्‍यांचा डॉक्टर आमचा मित्र आहे असे कोणी मला पटवू शकेल असे मला वाटत नाही.’

‘मला वाटते याचे उत्तर हिमलरच चांगल्या प्रकारे देऊ शकेल.’ तेवढ्यात शेजारच्या खोलीत फोन खणखणला. हायड्रीश तो घेण्यास बाहेर गेला. कर्स्टनला अंधुकशी आशा वाटू लागली. हिमलरने तर फोन केला नसेल ना .......
हायड्रीश परत आला व परत खुर्चीवर बसला. त्याने एक सिगरेट पेटवली व हसून म्हणाला,

‘हंऽऽऽऽ कुठे होतो आपण....मला आश्‍चर्य वाटतय हॉलंडमधे काय चालले आहे याची एवढी खबरबात तुला कशी काय असते? तुझ्या माहितीचा स्त्रोत मला सांग !’ कर्स्टन मोठ्याने हसला. (खरेतर त्याने आपली भीती त्या हास्यात लपविण्याचा प्रयत्न चालवला होता.) ‘कदाचित माझ्याकडे त्याची जादू असेल.’

‘माझ्याकडेही ती जादू आहे. लवकरच तुझ्या खबर्‍यांची यादी आम्हाला मिळेल. तू कोण आहेस हेही मला समजू लागले आहे. लवकरच मी त्याचा पुरावा सादर करेन मग बघू आपण !’ हायड्रीश शांतपणे कर्स्टनकडे थंड क्रूर नजरेने बघत म्हणाला.

‘तू जाऊ शकतोस. आत्ता जो फोन आला होता तो हिमलरचा होता. तुला सोडून द्यायचा मला हुकुम आहे पण लवकरच आपली परत भेट होईल.’

पण ते दोघांच्याही नशिबात नव्हते.
१९४१ मधे सप्टेंबरमधे हायड्रीशची झेक बंडखोरांनी प्रागमधे हत्या केली. त्याच्या जागेवर अर्न्स्ट काल्टेनब्रुनरची नेमणूक झाली.
अर्न्स्ट काल्टेनब्रुनर...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९४१ मधे २१ जून रोजी हिटलरने त्याचे आत्तापर्यंतचे यश पणाला लाऊन रशियामधे आपल्या फौजा घुसवल्या. हिमलरची आगगाडीही आघाडीवर जाण्यास निघाली. राईशफ्युररला कर्स्टन त्या आगगाडीवर नेहमीप्रमाणे पाहिजे होता. पूर्व प्रशियामधे त्या युद्धआघाडीचे चालते फिरते मुख्यालय स्थापन करण्यात आले. दररोज हिमलरची गाडी त्याला ठरवून दिलेल्या सायडिंगला लागली की हिमलरच्या माणसांचे काम चालू व्हायचे. हेरगिरी, अटकसत्रे, छळछावण्यांची उभारणी, कत्तली अशी अनेक कामे त्यांची वाट बघत असत. दररोज रात्री हिमलर हिटलरची गाठ घेत असे कारण त्याचे मुख्यालय फार अंतरावर नव्हते.

कर्स्टन त्या गाडीत हिमलरच्या इतर अधिकार्‍यांबरोबर जेवत असे. त्या सर्व अधिकार्‍यांना रशियाविरुद्ध मिळवलेल्या प्राथमिक विजयांनी उन्माद चढला होता. त्यांना त्यांच्या अंतीम विजयाची खात्री होतीच एवढेच नव्हे तर रशियातील जमिनीची वाटणीही त्यांनी केली होती. ‘प्रत्येक सैनिकाला उरलमधे जमीन मिळणार असे त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले होते व त्यांच्या वरिष्ठांना हिटलरने. उरल प्रदेश जर्मनीचा स्वर्गच असेल अशा जोरदार चर्चा झडत होत्या.

जर्मन फौजांचा झंझावात असाच तीन महिने चालू होता. जिंकलेल्या प्रदेशात हिमलरलाही बरेच काम असायचे त्यामुळे कर्स्टनला सोडण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी जेव्हा कर्स्टन बर्लिनला परत आला तेव्हा ऑक्टोबर उजाडला व थंडीची सुरवात झाली होती. रशियामधे जर्मन फौजांचे थंडीमुळे भयंकर हाल चालू होते व त्यांची आगेकूच ठप्प झाली होती.

याच थंडीत एके दिवशी कर्स्टन हिमलरच्या उपचारासाठी त्याच्याकडे गेलेला असताना त्याला तो फारच बेचैन भासला. तो कशामुळे एवढा अस्वस्थ आहे याची चौकशी केल्यावर हिमलर म्हणाला,
‘मी फक्त तुझ्याशीच मोकळेपणाने बोलू शकतो, तुला सगळे सांगू शकतो. फ्रान्सच्या पडावानंतर हिटलरने ब्रिटनला शांततेचे अनेक प्रस्ताव पाठवले पण ज्यूंनी ते सगळे फेटाळले आहेत. तो देश ज्यूच चालवतात हे तुला माहिती असेलच. ब्रिटन आणि जर्मनीमधे युद्ध पेटले तर भयंकर संहार होईल. हिटलर म्हणतो जो पर्यंत ज्यू या पृथ्वीतलावर आहेत तो पर्यंत येथे शांतता नांदणे कठीण आहे....’

‘मग ?’

‘मग काय ? आता हिटलरने जर्मनीच्या ताब्यातील सर्व प्रदेशांतून ज्यूंचा नायनाट करण्याचा हुकुम दिला आहे. हा वंशच नष्ट केला पाहिजे’

‘पण तू असले काही करु शकत नाही. जगाचे जर्मनीबद्दल काय मत होईल याचा विचार कर !’

‘इतिहास घडविणार्‍यांना प्रेतांवरुनच चालावे लागते ही त्यांची शोकांतिका आहे’ हिमलर म्हणाला. असे म्हणून हिमलरचा चेहरा परत चिंताग्रस्त झाला.

‘तुला हे मनापासून पटलेले नाही. बरोबर ना? नाहीतर तू एवढा अस्वस्थ झाला नसतास.’ हिमलरने आश्‍चर्याने कर्स्टनकडे पाहिले.

‘तसे नाही. जेव्हा हिटलरने हे सगळे सांगितले तेव्हा मी मुर्खासारखा वागलो. मी त्याला म्हटले की एस् एस् त्याच्यासाठी प्राण देण्यास तयार आहे पण हे काम आम्हाला सांगू नका’. हिमलरने एक दीर्घ श्वास घेतला व काय झाले ते सांगितले. हिमलरचे ते वाक्य ऐकल्याबरोबर हिटलरचा तोल सुटला व त्याने हिमलरवर झेप घेतली व त्याची कॉलर पकडली व किंचाळला,

‘आत्ता तू जो काही आहेस तो माझ्यामुळे आहेस कळले ना ? तू माझी अवज्ञा करतो आहेस. तू विश्वासघातकी आहेस. माझ्याशी विश्वासघात म्हणजेच जर्मनीशी विश्वासघात.’ ते ऐकल्यावर स्वत:ची सुटका करुन घेत हिमलर म्हणाला,

‘मी तू म्हणशील ते करायला तयार आहे. पण मला विश्‍वासघातकी म्हणू नकोस.’ पण हिटलर काही शांत झाला नाही. तो वारंवार हिमलरवर डाफरत होता.

‘लवकरच युद्ध संपेल आणि मी जगाला शब्द दिलाय की युद्धानंतर या जगात एकही ज्यू शिल्लक राहणार नाही. आपल्याला लवकर पाऊले उचलली पाहिजेत. तू ते करु शकशील असे मला वाटत नाही.’ हे सगळे सांगून झाल्यावर हिमलरने कर्स्टनकडे असाहय्य नजरेने पाहिले,
‘कळलं का मी का अस्वस्थ आहे ते ?’

कर्स्टनला आता सगळे नीट कळले होते. हिमलरला कोट्यावधी ज्यूंच्या हत्याकांडाचे काही घेणं पडले नव्हते. त्याला हिटलरचा त्याच्यावर पूर्ण विश्वास उरला नाही ही कल्पनाच छळत होती. भयंकर !
१९४२ च्या थंडीत हिमलरने एका दिवशी एक प्रश्न विचारुन धक्काच दिला.
‘तू एका माणसावर उपचार करु शकतोस का? त्याला डोकेदुखी, चक्कर येणे व इन्सोम्नियाचा त्रास आहे’

'त्याला बघितल्याशिवाय असे सांगणे अशक्य आहे. मुख्य म्हणजे हे सगळे कशामुळे होते आहे हे शोधल्याशिवाय उपचार कसे करणार ?’

हिमलरने बारीक नजरेन त्याच्याकडे पाहिले, ‘मी आता तुला जे सांगणार आहे हे तुझ्यामाझ्यातच राहिले पाहिजे. तसे मला वचन दे’

‘राईशफ्युरर, वैद्यकीय पेशात ती शपथ आम्ही घेतलेलीच असते’

‘ते ठीक आहे पण मी तुला जे सांगणार आहे....’ असे म्हणून हिमलरने त्याची तिजोरी उघडली व कर्स्टनच्या हातात एक फाईल ठेवली. हे करताना त्याला होणारे कष्ट व भीती स्पष्ट जाणवत होती.

‘वाच ! हिटलरवर तयार झालेली अत्यंत गोपनीय फाईल आहे ती !’......................

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

जेपी's picture

8 Dec 2013 - 9:27 pm | जेपी

अप्रतिम .
शब्द नाहित बोलायला माझ्यकाडे .

सचिन कुलकर्णी's picture

8 Dec 2013 - 9:47 pm | सचिन कुलकर्णी

सोमवारऐवजी आजच पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद.
अत्यंत रंजक आणि श्वास रोखायला लावणारा घटनाक्रम

जानु's picture

8 Dec 2013 - 9:50 pm | जानु

सुरेख!!!!!!!!!

सुहासदवन's picture

8 Dec 2013 - 10:35 pm | सुहासदवन

खरोखरच टीवीवरील तद्दन टीनपाट मालिका आणि इतर अशा अनेक बाजारु कथांच्या काना़खाली सणसणीत हाणणारी अतिशय सुंदर आणि थरारक कथा मालिका.

मानवी मन किती अथांग आणि विचित्र आहे त्याचा सुंदर परिपाठ.

चालू द्या.

कपिलमुनी's picture

8 Dec 2013 - 10:49 pm | कपिलमुनी

हा भाग अशा टप्प्यावर संपला आहे .. कि चैन पडत नाही..
लौकर लिहा प्लीज..

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2013 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! दर भागामागे उत्सुकता वाढत चाललीय !

कवितानागेश's picture

8 Dec 2013 - 10:57 pm | कवितानागेश

थरारक!

अर्धवटराव's picture

8 Dec 2013 - 11:11 pm | अर्धवटराव

आयला.. आता हिटलरवर उपचार करणार का हे साहेब? उपचार डोकेदुखी आणि मेंदुचा देखील??

वसईचे किल्लेदार's picture

8 Dec 2013 - 11:18 pm | वसईचे किल्लेदार

दिवसभरातला निवडणुकांचा (निकालांचा) गोंधळ अनुभवल्यानंतर निवांत वाटले. परत एकदा धन्यवाद!

भटक्य आणि उनाड's picture

8 Dec 2013 - 11:49 pm | भटक्य आणि उनाड

हेच म्हणतो... झक्कास...

मुक्त विहारि's picture

8 Dec 2013 - 11:59 pm | मुक्त विहारि

बघुन बरे वाटले.

खटपट्या's picture

9 Dec 2013 - 3:12 am | खटपट्या

सुरेख

केवळ भन्नाट...
जबरा मजा येतेय

अनुप ढेरे's picture

9 Dec 2013 - 9:58 am | अनुप ढेरे

भारी... मस्त जमलाय हा भाग.

इरसाल's picture

9 Dec 2013 - 10:17 am | इरसाल

भेदक !!!!!!!

विटेकर's picture

9 Dec 2013 - 10:31 am | विटेकर

क्लास च ! लिहा पटपट .. काय ऐन्वेळी भाग तोडलाय हो.

तूर्तास दंडवत स्वीकारा... !

सुधीर कांदळकर's picture

9 Dec 2013 - 10:38 am | सुधीर कांदळकर

हाही भाग आवडला.

अनिरुद्ध प's picture

9 Dec 2013 - 12:38 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

हिस्टरी रिडिस्कव्हर्ड!

मस्तच!

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Dec 2013 - 7:07 pm | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान चालले आहे.. अतिशय उत्कंठावर्धक आणि सुरस..!!