छंदोमयीतील भावनर्तन!

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 2:36 pm

'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे.

परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर!

आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद. येथे तो कसा प्रकट होतो बघा -

मातीपण मिटता मिटत नाही
आकाशपण हटता हटत नाही
आकाशमातीच्या या संघर्षात
माझं जखमांचं देणं
फिटता फिटत नाही

परंतु कवी आपली मुसाफिराची भूमिका अजूनही सोडावयास तयार नाही. सूर्य या कवितेत ते म्हणतात,

प्रकाश दाता जीवन दाता
चिरसांगाती, या एकाकी मुसाफिराचा!

या मुसाफिराची युगायुगांची जीवनरेषा जोडून देणारा जगजेठीही हा सूर्यच आहे आणि ज्या रात्रीने तळ्यात फेकून दिले होते त्यातून काढून दिगंत आणि रती देणाराही हा सूर्यच आहे. 'ना कुठे जेऊन जासी, ना इथेही ठेवसी' अशी या जीवनप्रवासाच्या दलदलीच्या मार्गावरून प्रवास करणार्‍या मुसाफिराची अवस्था होते. तो कधी पहाट पक्ष्यांच्या कूजनात तर कधी मध्यरात्रीच्या चांदण्यात आपले ध्येय आणि इप्सित शोधू बघतो. पण स्वप्न आणि वास्तव याची सांगड कशी घातली जाणार?

सांध्यसावल्यात एक भावगीत हरपले
शोधतो घनाघनात सूर मी तयातले
या रितेपणात रात ये घनांध भोवती
काळजात थेंब थेंब गोठती तमातले

अशी ही थोडी भयातूर, भावचिंब अवस्था भावकाहूर निर्माण करून जाते. हा सूर्य मला काळाच्या करवती चाकावर भिरकावून देत आहे असा एक पाशबद्ध हताश झालेल्या, खचलेल्या मनस्वी मनाचा अनुभव कुसुमाग्रज व्यक्त करतात.

क्षणाक्षणांनी कातलेला मी
अनेक स्थळांनी गिळलेला मी
असंख्य घटनांनी तोडलेला मी
किती शिल्लक राहिलो आहे, सूर्यच जाणे!

अशी मनाला घेरून टाकणारी विषण्णता व तीतून व्यक्त होणारे जीवनभान हेच या काव्यसंग्रहाचे महत्वाचे वैशिष्ठ्य ठरते असे मला वाटते. चिंतनशीलतेकडे झुकू बघणारे, जीवनाचा अन्वयार्थ लावणारे आणि सायंकालीन धूसरतेने खिन्न झालेले कविमन येथे प्रगट होते. उदा -

चारसहा कोकिळा पहाटवेळी गातात
किनखापी स्वरांचा एकमेणा बांधतात
मरणाच्या वेशीवर उनाडणार्‍या मला
मेण्यामध्ये घालून पृथ्वीवर आणतात!

आर्ततेने भरून आलेली आणि विरहाने कातर झालेली भावांदलोने ही या कवितांतून व्यक्त होतात. उदा -

वाट पाहून पाहून
माझे शेवाळले डोळे
पाय भयभित वळे नदीकडे

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही

असे मिर्झा गालिबसारखे उद्गारही ते काढतात. नाट्यपूर्ण कथात्मपद्धतीच्याही काही कविता आहेत. गोदावरीच्या महापुरात घर वाहून गेल्यावरही कणा न मोडलेला विद्यार्थी म्हणतो-

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा

कुसुमाग्रजांच्या कवितेला अशी गूढ गंभीर, घनतिमिराप्रमाणे विराट, मानसाशयाला व्यापणारी विषण्णता आणि अनाम वेदना ठाऊक नव्हती ती या संग्रहात मात्र फार वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त झालेली आहे असे मला वाटते. येथे आंग्ल कवी शेलेशी त्यांचे नाते जोडले जाते. शेलेचे अमर उद्गार आहेत -

"Our sweetest songs are those
that tell us of saddest thoughts."

-- अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयसाहित्यिकविचारआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 4:24 pm | विसोबा खेचर

गोडबोलेसाहेब,

अतिशय सुरेख रसग्रहण व विवेचन...!

आपली भाषा फार सुरेख आहे...

अजूनही येऊ द्या!

तात्या.

संदीप चित्रे's picture

11 Jul 2008 - 6:27 pm | संदीप चित्रे

खूप सुरेख रसग्रहण .

माझ्याकडे 'छंदोमयी' आहे :)
कविता आवडणार्‍यांनी 'छंदोमयी' नक्की वाचावं.
तसंच हिंदी कविता आवडणार्‍यांनी 'मधुशाला' आणि 'भस्मांकुर' (खंडकाव्य) :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com