चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
31 Oct 2012 - 10:06 pm

मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी.

प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला. झांकडून असलेल्या अपेक्षा आणि चित्रपटाचा विषय संवेदनशील, आणि माझ्या जिव्हाळ्याचा. म्हणून दखलपात्र. लिहावेसे वाटले.

नक्षल प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या नातेसंबंधांचा वेध/ वेगवेगळ्या दिशांनी नेणार्‍या विचारांचे वादळ असे काहीतरी दाखवायचे असेल, त्यातील नाट्य रंगवायचे असेल - असे असू शकते. तसेही या सिनेमात ठीक दिसत नाही. नक्षल प्रश्नच साकल्याने दाखवायचा असेल - तर तसेही ठीक दिसून येत नाही. थोडे विस्तारानेच सांगतो. ही दखल अशासाठी, की या असल्या सादरीकरणातून लोकांचे नक्षलवादाविषयी, या समस्येविषयी गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक. या विषयावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे असेही नाही, आणि वारंवार अशा विषयावर चित्रपट/ नाटक निघणेही कमी संभव. त्यामुळे सिनेमातील तृटींचे विवरण आणि सादरीकरणातून दाखवल्या गेलेल्या काही मिसलिडींग गोष्टींवर उजेड टाकणे आवश्यक आहे.

कथानक थोडक्यात असे - "नंदीघाट" नावाच्या "मध्य भारत" राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये प्रोफेसर गोविन्द (आणि अन्य अनेक नावांनी वावरणारा) (ओम पुरी) हा नक्षल आयडॉलोग कार्यरत असतो. कॉम्रेड राजन (मनोज वाजपेयी) आणि त्याचे नक्षल दलम आपल्या ट्रेनिंग सेंटरसहित या भागात आपले अस्तित्व दाखवत रहात असतात. महान्ता ग्रुपला आपला स्टील प्लँट या जिल्ह्यात सुरु करायचा असतो. परंतु नक्षलांच्या वाढत्या वर्चस्वामुळे तिथे काहीच हालचाल करणे सरकारला आणि महान्ता ग्रुपला शक्य होत नसते. नक्षलांचा पाडाव करण्यासाठी सिनियर एस्पी आदिल खान (अर्जुन रामपाल) या डेकोरेटेड आयपीएस अधिकार्‍याची तिथे बदली होते - तोच पोस्टिंग मागून घेतो. त्या भागात जाऊन खेडोपाडी जाऊन लोकांशी संपर्क साधू लागतो. स्थानिक उद्योजक, कंत्राटदारांना समजावतो आणि नक्षलांना खंडणी देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. पण पुरेशा गुप्तचर यंत्रणेअभावी त्याला फारसे यश मिळत नाही. त्याचा कॉलेजमधील मित्र कबीर (अभय देओल) त्याला या दरम्यान भेटतो. हा धाडसी असतो, लहरी असतो, आणि अन्यायाची चीड असणारा आणि त्याविरोधात कुठल्याही टोकाला जाणारा असा विक्षिप्त मनुष्य असतो. तो आदिलला ऑफर देतो की नक्षल कॅडर बनून, त्यांच्यात मिसळून तो आदिलला सर्व गुप्त माहिती पुरवील आणि नक्षलांना संपवील. त्याप्रमाणे घडत जाते, आणि आदिलला यश मिळत जाते. मार्ग मोकळा झाल्याने महान्ता ग्रुप आपला प्लँट नंदीघाटला सुरु करण्यासाठी हालचाल सुरु करतो. प्रोजेक्टसाठी संपादित केलेली गावे मोकळी करुन देण्याची, आणि त्याबदल्यात पैसे देण्याची ऑफर महान्ता एस्पीला करतो. एस्पी त्याला नकार देतो. महान्ता स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरुन जबरदस्तीने गावे जमीनदोस्त करतो. एस्पी यात गुंतलेल्या गुंडांना अटक करतो. गृहमंत्री, डीजीपी त्याच्यावर दबाव आणतात आणि लँड अ‍ॅक्वीझिशनचे काम पाहण्यासाठी अन्य पोलीस अधिकार्‍याची नेमणूक करतात. दरम्यान सरकारची ही जबरदस्ती पाहून आणि गरीब आदिवासींचे हाल पाहून द्रवलेला कबीर आपली भूमीका बदलतो, आणि खराच नक्षल बनतो. शेवटी एका एन्काउंटरमध्ये आपला मित्र आदिल आणि मैत्रीण रिया (आदिलची पत्नी आणि सहकारी पोलीस अधिकारी) यांच्याकडून मारला जातो.

घोर अज्ञानाने भरलेली ही काल्पनिक कथा सांगून झा महाशय सिनेमाच्या शेवटी आपल्याला सांगतात की या नक्षलवादाच्या चक्रव्यूहातून आपण कसे सुटणार? मोजके शंभर परिवार देशातील २५% संपत्ती बाळगून आहेत, आणि ७५% लोकसंख्या दिवसाला २० रुपयांत गुजराण करतेय, इत्यादि.

***********

कसल्यातरी घाईघाईत सिनेमा बनवला आहे असे सतत वाटत राहते. कोणत्याही गोष्टीचा साकल्याने विचार केला आहे असे कुठेच दिसत नाही.

१. राज्याचे राजकारण, सरकार चालवत असलेल्या लोकांची कंपल्शन्स कुठे दिसत नाहीत. कॉर्पोरेटची भूमीका नाही. सरकार आणि कार्पोरेटचे संबंध म्हणजे कॉर्पोरेट सरकारला (पार्टीला) पैसा देणार, आणि त्याबदल्यात सरकार कार्पोरेटला पोलीस पुरवणार असे सरळधोपट आणि दिशाभूल करणारे अतिसुलभीकरण.

२. राजकीय विरोधकांचा पत्ताच नाही. कार्पोरेट विरोधकांचाही पत्ता नाही.

३. केंद्र सरकार, राज्य सरकार यांतील संबंधांचा उल्लेखही नाही. केंद्र सरकार पूर्ण गैरहजर. वास्तवात युद्ध पेटले आहे ते केंद्र सरकार आणि नक्षल यांच्यात. राज्य सरकारे केंद्र सरकारला धरुन काय ते झगडत आहेत. राज्ये यासाठी सर्वस्वी केंद्रावर अवलंबून आहेत. पैसा, माणूसबळ, सगळ्याच बाबतींत.

४. स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.

५. एन्जीओ नाही. फ्रंटल ऑर्गनायझेशन नाही.

६. जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अ‍ॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.

७. इथली लढाई म्हणे आदिवासी करत असतात, आणि हे ओम पुरी, वाजपेयी इत्यादि त्यांना केवळ मदत करत असतात. सिनेमात एकाही आदिवासीने एकदाही तोंड उघडलेले नाही.

८. हे नक्षल पोलीसांना थेट अंगावर घेतात. त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये वगैरे घुसून थेट दे दणादण गोळीबार करतात. पोलीसही नक्षलांना सरळ भिडत असतात. लारा क्रॉफ्ट टूम रेडर मध्ये दाखवल्यासारख्या अगदी आमने सामने गोळागोळी सुरु असते. गुरिला वॉरफेअर नावाला किंवा चवीलाही नाही. अ‍ॅम्बुश नावाचा प्रकार नंदीघाटमध्ये माहीत नसतो.

९. नंदीघाट हा एक मागासलेला भाग असतो, आदिवासी भाग असतो. आणि स्वातंत्र्यानंतर सरकारने तिथे कसलाच विकास केलेला नसतो. (विकास करणे हे सरकारचे काम असते म्हणे. लोकांनी काही करायचे नसते.). पण तिथे खूप मोठ्या संख्येने कंत्राटदार असतात. ते नक्षलांना भरपूर खंडणीपण देत असतात. ते नेमकी कोणती कामे करत असतात त्याचा पत्ता लागत नाही. ती विकासाची कामे नसावीत बहुदा.

मला आता कंटाळा आलाय. किती म्हणून काय काय सांगायचे! या गोष्टी कुठल्याही नक्षल रिलेटेड कथेमध्ये असणे अत्यावश्यक आहे. किमान ओझरता संदर्भ आवश्यक आहे. त्याशिवाय पान रंगणार नाही. आणि निरनिराळ्या बातम्यांची कटिंग्ज एकत्र करुन कथा बनवली तर ती झिरझिरीत कापडतुकड्यांची ठिगळाठिगळांनी बनवलेली गोधडी रंगीत दिसेल, पण ऊब देण्याच्या कामाला यायची नाही. रामायण जर वानरसेनेशिवाय दाखवले तर कोणती कथा निर्माण होईल? तसे झालेले आहे. प्रत्येक फ्रेममध्ये अज्ञान ठासून भरलेले आहे. प्रकाश झांची ही नोट वाचा -

The world looks at India, as a shining nation on the rise. Stories of economic growth, and a newly affluent middle class dot our consciousness. But in the underbelly of the world’s largest democracy,far away from the glitz of the big cities, a war is brewing.

India has been free and independent for over six decades. But go into the heart of the India’s forests and villages, “What freedom?” asks a tribal. “We have lost everything after India became independent.”

The state needs control over the land and the natural resources. But the tribals and villagers who have seen neither development nor compensation for this displacement, have decided to protest. They will not give up their forests, their rivers and their homes.

Young educated citizens from cities are leading the way, helping the tribals protest. But this protest knows only one language – the language of violence. And the State too knows only one language – the language of violence.

I found, as I traveled through beautiful green forests, and lush untouched landscapes that there was fear lurking in every corner. There were gunshots and there was a haunting silence. But there was no development.

I have tried to chronicle this conflict by telling the story of two friends, who eventually find themselves on opposing sides of this conflict. I have made this film to bring this conflict into public focus.

Chakravyuh, the word, implies a war formation from which there is no escape. My film is about this sense of being cornered from all sides. The dilemma of finding yourself in a war from which there is no escape.

ही नोट वाचून तर मला हसावे की रडावे तेच समजेना. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासींचे सर्वस्व हरण झाले; या भागात बंदुकांचे बार आणि भीषण शांतता आहे, पण विकास नाही; विस्थापनाचा मोबदला मिळाला नाही; स्टेटला फक्त हिंसेचीच भाषा समजते; मी हा सिनेमा बनवला तो हा संघर्ष लोकांपर्यंत आणण्यासाठी- ही भूमीका मांडणार्‍या दिग्दर्शकाने आपले हे मुद्दे कथानकात यावेत याची जराही फिकीर करु नये? बरोबर असोत वा चुकीचे असोत, मुद्दे तरी नीट मांडावेत.

केवळ पेपरातील बातम्या वाचून आणि एखाददुसरे नक्षलांची भलावण करणारे पुस्तक वाचून काढण्यात आलेला हा सिनेमा आहे यात मला शंका नाही. ऋणनिर्देश म्हणून सिनेमात सुरुवातीला काही आयपीएस अधिकार्‍यांची नावे आली आहेत. पण ती काही कन्सल्टन्सीसाठी असावीत असे म्हणवत नाही. त्यांना कन्सल्ट करुनही जर व्यवस्थेविषयीचे आणि त्याविरोधातील शक्तींविषयीचे, त्यांच्यातील संघर्षाचे असले अज्ञानी प्रदर्शन होत असेल तर दिग्दर्शकाची करावी तेवढी कीव थोडीच.

तर कुणाला या नक्षलवादाच्या प्रश्नात आस्था असेल, आणि हा सिनेमा पाहिलाच तर त्यावर चर्चा करता येईल. व्यक्तीशः मला हसू आलेले आहे, कीव आलेली आहे, चीडही आलेली आहे. ज्याप्रकारे नक्षॅलिझमला ट्रिव्हियलाइझ केलेले आहे, आणि एकूणच प्रश्नाला अत्यंत बेजबाबदार रीतीने हाताळले आहे ते चीड आणणारे आहे. अंकुर आणि निशांतमध्ये बेनेगलांनी या समस्येला अतिशय भेदकपणे तोंड फोडलेले आहे. त्याला नाव त्यांनी दिले नसेल नक्षलवाद, पण अतिशय मार्मिकपणे समस्या उलगडली आहे. झांकडून तेवढ्या टॅलेंटची अपेक्षा नसली तर माणूस अगदीच ढ नसावा असे वाटत होते. अपेक्षाभंग झालेला आहे. आणि जवळच्या काही मंडळींना सिनेमा आवडलाय असे दिसल्यामुळे काळजी वाटली. (आणि हे लिहीण्यात वेळ घालवला!)

समाजराजकारणचित्रपटविचारसमीक्षावाद

प्रतिक्रिया

प्रकाश झांविषयी चार चांगले शब्द ऐकून होतो. त्या पार्श्वभूमीवर एका जाणकाराकडून इतकं निगेटिव्ह विश्लेषण वाचल्यानंतर हा चित्रपट शोधून काढून पाहीन असं अजिबात वाटत नाही. पण एक नक्की वाटलं की 'आळश्यांच्या राजे'साहेबांसारख्या या प्रश्नावर नेहेमीच लक्षणीय आणि चांगलं लिखाण करणार्‍यांनी स्वतःच एक चित्रपटकथा लिहून नक्षलवादाचं वास्तव नेमकं काय आहे ते सामान्यांपुढे आणायला हवं.

चिगो's picture

31 Oct 2012 - 11:09 pm | चिगो

खरेतर ह्याचित्रपटावर आणि एकंदरीतच ह्या विषयावर तुमच्यापेक्षा जास्त अधिकाराने दुसरा कोणी लिहू शकणार नाही,मिपावर तरी.. आणि म्हणूनच तुमच्या परीक्षणाची वाट बघत होतो. मलाही चित्रपट बघतांना बर्‍याच गोष्टी खटकल्या. नक्षलवाद्यांचे "ग्लोरीफिकेशन" आणि प्रशासन / पोलिसयंत्रणा किती असंवेदनशील आहे, हे दाखवण्याचा अवास्तव खटाटोप आहे हा चित्रपट म्हणजे..

स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.

जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अ‍ॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.

हे आणि तुमचे बाकी मुद्दे लाजवाब.. इतउप्पर, नक्षलवादी म्हणजे न्यायाची प्रचंड चाड असलेले लोक जणू. त्यांच्याद्वारे आदिवाश्यांवर होणार्‍या अन्याय / अत्याचाराचा शष्प उल्लेख नाही. चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या नक्षल-चळवळीची निष्फळता, त्यांच्यामुळे आदिवास्यांची होणारी ससेहोलपट, प्रशासनाद्वारे आदिवास्यांच्या विकासासाठी करण्यात येणारे प्रयत्न ह्यावर कुठेही भाष्य नाही. आणि बरेच काही.. शेवटी, पुर्वी दिलेल्या चित्रपटांवरुन पुढच्या चित्रपटांबद्दल अपेक्षा बाळगून अर्थ नाही, हेच झांनी दाखवून दिलंय..

आता हा सिनेमा पाहणार नाही. लेखन पटले. प्रकाश झांकडून वेगळी अपेक्षा असते नेहमी.

या चित्रपटावर तुम्हिच लिहावं ही अपेक्षा होती, पुर्ण केलीत धन्यवाद.

प्रचेतस's picture

1 Nov 2012 - 8:45 am | प्रचेतस

सहमत.

चौकटराजा's picture

1 Nov 2012 - 8:50 am | चौकटराजा

आता हे " शिनेप्रिक्षान" वाचल्यावर थेटरला पिच्चर बघायचा ब्येत क्यानसल ! प्रकाश झा साठी टीव्ही वर आल्यावर नजर टाकेन म्हन्तो ! धनेवाद आरा साहेब !

छोटा डॉन's picture

1 Nov 2012 - 11:06 am | छोटा डॉन

नेहमीप्रमाणे मुद्देसुद आणि वस्तुनिष्ठ परिक्षण, लेख कम चित्रपटाची ओळख आवडली आहे.
सिनेमाचे ट्रेलर्स पाहुनच पिक्चर गंडला आहे ह्याची शंका आली होती. अ‍ॅक्च्युअली 'नक्षलवाद, अंडरवर्ल्ड, कॉर्पोरेट वर्ल्ड' वगैरे बाबी खुणावणार्‍या असल्या तरी त्यातली गुंतागुंत आणि जे आहे ते आहे तसे मांडता येण्याचे आव्हान प्रत्यक्षात चित्रपट बनवताना पेलता येईलच ह्याची खात्री नाही. प्रकाश झा अर्थातच चांगले दिग्दर्शक आहेत पण हा चित्रपट गंडला असेल असे वाटलेच होते.
कास्टिंगही फारशी आवडली नव्हतीच ...

धन्यवाद आरा. आता चित्रपट थेट्रात बघण्याचा विचार सोडुन दिला आहे, मात्र घरी चित्रपट नक्की बघेन असे वाटते.

- छोटा डॉन

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Nov 2012 - 4:16 pm | निनाद मुक्काम प...

प्रकाश झा हे हल्ली गल्यावर लक्ष ठेवून शिनेमे काढतात आणि त्यांना म्हणे गल्ला पेटी व कलेचे नाते जोडणारा शिनेमा काढायचा असतो.
आरक्षण , राजनीती व आता चक्रव्यूह हे सिनेमे पाहतांना हा प्रत्यय येतो.
मूळ मुद्याला बगल देऊन त्याचा मुलामा देत फिल्मी कथा सादर करत कलेच्या नावावर धंदा करणाऱ्या पेक्षा
निव्वळ मनोरंजन ह्या मुद्याभोवती फिरणारे सल्लूचे शिनेमे निदान त्यांच्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करत नाहीत.
सादर सिनेमा अर्धवट पहिला.
आणि ही समीक्षा वाचून त्याबद्दल खेद वाटेनासा झाला आहे.

प्रदीप's picture

1 Nov 2012 - 6:33 pm | प्रदीप

आवडले.

वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे, ह्या विषयावर तुमच्या इतके माहितीपूर्ण फारच थोड्या व्यक्ति लिहू शकतील.चित्रपट पाहिला नाही, पण तुमच्या जज्मेंटवर विश्वास आहे, तेव्हा आता तो पाहीन असे वाटत नाही.

तरीही ह्या चित्रपटाचे आंतररराष्ट्रीय फिल्म- फेस्टिव्हल्स सर्किटवर प्रचंड स्वागत होईल, झा (बहुधा दाढी वाढवून, व झोळी लटकवून) जिथेतिथे जातील, भाषणे ठोकतील, हारतुरे स्वीकारतील, असा अंदाज आहे. विकसनशील देशांच्या असल्या स्टोरीज ह्या सर्किट्सवर चांगल्या खपाव्यात.

अन्या दातार's picture

1 Nov 2012 - 7:10 pm | अन्या दातार

हे वाचून पिक्चर बघायचा बेत रद्द!

अमोल खरे's picture

3 Nov 2012 - 8:07 pm | अमोल खरे

"रावण" पिक्चर पण असाच होता. नक्षलवादी ग्रेट आणि पोलिस म्हणजे अत्याचारी अशी सरळसोप्पी व्याख्या त्यात होती. हाईट म्हणजे अनेक लोकांना आजही नक्षलवाद्यांबद्दल सहानुभुती असते. व्यक्तिशः मलातरी नक्षलवादी आणि दहशतवादी ह्यांत काहीच फरक वाटत नाही.

आळश्यांचा राजा's picture

3 Nov 2012 - 11:55 pm | आळश्यांचा राजा

नक्षलांविषयी सहानुभूती वाटणे काही लोकांसाठी सहजपणे येते. भ्रष्टाचाराने मातलेल्या आणि न्याय न देणार्‍या व्यवस्थेचे उद्वेगजनक अनुभव आलेल्यांना नक्षलांविषयी सहानुभूती वाटू शकते.

दहशतवादी या शब्दाचा प्रचलित अर्थ पाहिला तर साधारणपणे पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेले प्रॉक्सी वॉर मनात येते. त्या अर्थाने दहशतवादी हा शब्द घेतला तर नक्षलवादी आणि दहशतवादी यांच्यात बराच फरक आहे. नक्षलवादी हे राजकीय लढाई करत असले तरी त्यांचा (सध्या तरी) रोख हा सामाजिक मुद्द्यांवरच आहे; दहशतवादी हे स्थूल राजकीय - आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दंगा करताना दिसतात.

अमोल खरे's picture

4 Nov 2012 - 9:21 pm | अमोल खरे

तुमच्या इतका स्टडी माझा नाही, पण जो भारताविरुद्ध उभा राहतो, जो भारताच्या पोलिसांवर, लष्करावर हल्ला करतो तो दहशतवादी अशी माझी सरळसोप्पी व्याख्या आहे. त्या लोकांवर अन्याय झालाही असेल पण म्हणुन त्यांनी पोलिसांना गोळ्या घालायच्या ? आता मुंबईत लोकल्स वाढवत नाहीत, रिक्षावाले, बेस्ट बस वाले कधीही संपावर जातात, भाववाढ होते हा पण अन्यायच आहे, पण म्हणुन मुंबईत पण लोकांनी बंदुका हाती घ्यायच्या का ? जो कोणी देशाविरुद्ध उठेल त्याला ठार करायलाच हवा. मग तो दहशतवादी असो कि नक्षलवादी. साधा सरळ हिशोब आहे. आणि नक्षलवादी आत्ता ईंटर्नल प्रश्नावर बोलतात. उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर हे तेवढ्या काळापुरत्या आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीज थांबवणार आहेत का ? नक्कीच नाही. त्यामुळे सहानुभुती न दाखवता जो कोणी भारताच्या विरुद्ध आहे त्याला संपवायलाच हवं. आत्ता इग्नोर केलं तर अजुन काही वर्षांनी हीच लोकं मोठ्या शहरांमध्ये हल्ले करतील आणि तेव्हा त्यांना आवरणे खुप कठीण होईल.

सहज's picture

2 Nov 2012 - 6:53 am | सहज

आरा तुमच्या भावना पोहोचल्य पण जाउ द्या. सिनेमा हा धंदा आहे, कलेची सेवा बिवा काही खास नाही काहीतरी मनोरंजनात्मक काढून पैसे कमावणे मुख्य ध्येय.

सिनेमा खरे किती, खोटे किती मग तिला माहीतीपट का म्हणु नये वगैरे वगैरे आहेच [जितका बंडल सिनेमा तितकी फारएन्ड यांची एक से एक अफलातून परीक्षण वाचायला मिळतात हा फायदा आहेच.]
पण याहून महत्वाची गोष्ट मेडीया, वृत्तपत्र माध्यम हाच किती मोठा धंदा झाला आहे, सोयीच्या बातम्या, सोयीचे राजकारण, खरे व खोटे याची प्रचंड सरमिसळ, त्याकडे बघून जनतेला हसू, कीव, चीड यायला हवी व ती येतही असेल पण बदलाचे काय? अभी देश उबल रहा है म्हणायचे व आपल्याने जितके जमेल तितके करत रहायचे. बाकी काय?

झा बिचारा पोटापाण्यासाठी करतो असले काहीबाही जाउ द्या... बाकी ज्याची त्याची समज ज्याची त्याची जाण...

भडकमकर मास्तर's picture

2 Nov 2012 - 1:44 pm | भडकमकर मास्तर

आम्ही नै "झा"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2012 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण चित्रपटाबद्दल लिहिलंय आपल्याकडुनच अशा चित्रपटांबद्दल समजुन घेतले पाहिजे. चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल आभार. चित्रपटाकडुन फार अपेक्षा दिसत नाही, शेवटी तो चित्रपट आहे असे समजून सोडावे लागेल. चित्रपट पाहिलेला नसल्यामुळे अधिक उणे आपल्याकडुनच कळते. झा आता बॉक्स ऑफिसवर लक्ष ठेवून असतात, प्रतिसादात वर काही चित्रपटांचे उल्लेख आलेच आहेत. चित्रपटाचे कथानक नंदीग्रामवर आधारित आहे. चित्रपटात ते नंदीघाट म्हणुन आले आहे. जमीन अधिग्रहणाचा विषय सविस्तर माहिती नसल्यामुळे हा चित्रपट रसिकांना कुठे घेऊन जातो माहिती नाही. आपण उणिवा असलेल्या गोष्टींबद्दल उल्लेख केलाच आहे. नक्षलवाद्यांच्या बाजुने विचार करणारे, सरकारच्या बाजुने विचार करणारे, पोलिसांच्या बाजुने विचार करणारे, आदिवासींच्या बाजुने विचार करणार्‍या अशा सर्वच चक्रव्यूहात अडकलेल्यांना चित्रपट कुठे घेऊन जातो आपण लिहिलेच आहे, चित्रपट नक्कीच पाहीन.

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

3 Nov 2012 - 11:42 pm | सुहास..

अंकुर आणि निशांतमध्ये बेनेगलांनी या समस्येला अतिशय भेदकपणे तोंड फोडलेले आहे >>>>

अंकुर ??

शबानाचाच ना शेठ ??

आळश्यांचा राजा's picture

4 Nov 2012 - 12:03 am | आळश्यांचा राजा

होय. शबाना - अनंत नाग यांचा पहिला सिनेमा. अंकुर आणि निशांत हे दोन्ही सिनेमे साधारणपणे एकाच कथेचा भाग असावेत इतक्या समांतर पार्श्वभूमीवर बेतलेले आहेत. तेलंगणाचा जमीनदारांच्या प्रभुत्वाखाली असलेला भाग. नक्षलवादाचा जन्म बंगालात झालेला असला तरी मुख्य करुन तो फोफावला या भागात. आजही नक्षलांचे मुख्य नेतृत्व हे तेलुगूच आहे. अंकुर आणि निशांतमध्ये या सामाजिक बंडाची पार्श्वभूमी बेनेगलांनी मांडलेली आहे. दाबून ठेवलेले सामाजिक घटक काहीच वाट मिळत नसेल तर अचानक बंड करुन उठतात आणि हिंसक बनतात. निशांतमध्ये हिंसा व्यक्त झालेली दिसते. अंकुरमध्ये हिंसेचा/ बंडाचा "अंकुर" दिसतो. एरवी असहायपणे जमीनदाराच्या लहरी लीला पाहणारे लोक त्याला तोंडावर उलट बोलतात; लहान मुलगा दगड फेकून जमीनदाराच्या घराची काच फोडतो - हा तो अंकुर.

आरा , म्हणजे मी शेवट नीट नाही पाहिला बहुधा ...डुकरांच्या सवे नाला क्रॉस करून शबाना मुलाला ( त्यांच्याच सोबत ) जन्म देते तोच ना भाऊ ...मग अंकुर हा काहीसा प्रेमपट होता की मी च्यामायला लहान होतो नक्षलवाद समजायला :(

आळश्यांचा राजा's picture

4 Nov 2012 - 12:26 am | आळश्यांचा राजा

डुकरे वगैरे काही नाहीत हो शेवटात. आणि तो शबानाच्या पोटातला अंकुरही बाहेर नाही आलेला. एक पोरगं दगड मारुन काच फोडतं आणि पळत सुटतं. एवढंच आहे. त्यानंतर पडदा लाल होतो आणि सिनेमा संपतो. आता बेनेगलांनी तो पडदा शेवटी लाल का केलाय ते त्यांना ठाऊक. नक्षलवाद दाखवण्यासाठी की लाल रंग आपला बाय डिफॉल्ट एडिटरनं टाकला हे तेच जाणोत.

सुहास..'s picture

4 Nov 2012 - 12:29 am | सुहास..

आरा ,

माझ्या कडे जी कॉपी आहे अंकुर ची ती पाठवितो मित्रा !

( याच मिपावर कोणीतरी लिहीले देखील आहे अंकुर विषयी, तेव्हा लोड केली होती, दुर्दैवाने तो लॅपी चार्ज होत नसल्याने बंद आहे !! लिंक सुध्दा !! :( )

आळश्यांचा राजा's picture

4 Nov 2012 - 12:37 am | आळश्यांचा राजा

इंटरेस्टिंग! असू शकेल. पण मी हे लिहिताना पुन्हा शेवट माझ्याकडच्या कॉपीत पाहून घेतला. डुकरं शंभर टक्के नाहीत! असो. ते महत्वाचं नाहीये. डुकरं दाखवली असतील तर उलट परिणाम अधिकच साधेल.
http://www.youtube.com/watch?v=on-0oCBerOk

इथे शेवट कन्फर्म करुन घेता येईल.