"कोणाचा रे तू?"

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
9 Jul 2012 - 6:04 pm

"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे..

"सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे. जातपात, स्पृश्यास्पृश्यता हे फक्त हिंदू धर्मातच मानल्या जाते, हा सर्वसामान्य समज.. पण नाही. भारतात तरी जवळपास सगळ्याच धर्मांमध्ये ही घाण आहे. स.ज. मध्ये स्टॅलिनने सांगितल्याप्रमाणे "इस्लाम में जातपात नहीं हैं, लेकीन मुसलमानों में हैं..'' आणि ही शिया-सुन्नी वाली जातपात नाहीये, तर व्यवसायावर आधारीत (पिंजारी, रंगारी इ.) आहे. सिख, ख्रिश्चन ह्यांच्यातही जातपात आढळतेच. कदाचित, धर्मांतरीत होतांना सोबत घेवून गेले असावेत बहुतांश लोक.. एवढंच कशाला, ह्या डोक्युमेंटरीत बघाल तर "मला शाळेत वेगळं वागवतात" म्हणणारी मुलेच त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलांशी स्पृश-अस्पृश्यता पाळतात.. :-(

२००५-०६च्या दरम्यान "युथ फॉर इक्वॅलिटी" ह्या युवा-गटाने जातीनिहाय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर धरत आंदोलन केले, आणि त्यानंतर उच्चशिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये होणारा भेदभाव ठळकपणे बाहेर येऊ लागला. (आऊटलूकचा दुवा इथे पहा.) चा "माझ्या पुर्वजांनी केलेल्या अन्यायाची फळे मी का भोगावीत?" हा प्रश्न विचारणार्‍यांना "त्याची फळे आम्ही अजूनही भोगतोय" हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांचा आक्रोश मात्र ऐकू येत नव्हता. पिढ्यानपिढ्या केलेल्या अन्यायाचे परिमार्जन ५०-५५ वर्षांच्या आरक्षणाने मिळालेल्या लाभाने होऊ शकत नाही, हे सिंपल लॉजिक आमच्या लक्षात येत नाहीय. अर्थात, आरक्षणाच्या पॉलिसीमध्ये काहीच सुधारणांची गरज नाही, असे मला म्हणायचे नाहीय. त्याबद्दल बोलूच..

कालच्या भागात एका वृद्ध, माजी आय ए एस अधिकार्‍याची कहाणी ऐकून बर्‍याच जणांना धक्का बसला. "नागरी सेवांमधेही एवढी जातपात पाळल्या जाते." ह्याचं प्रचंड वाईटही वाटलं असेल कित्येकांना (होपफुली ;-))... नाही हो, आय ए एस मध्ये नसेलही पाळल्या जात, पण त्यांच्या बाबतीतही पाळल्या जाते ना, राव.. एक अत्यंत कठीण अशी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन, स्वतःची बौद्धिक क्षमता निर्विवादपणे सिद्ध करुनही माझी लायकी काय, ओळख काय तर "नीच जाती का चांभार !" ह्या विचाराच्या इंगळ्या डसल्या असतील ना त्यांना !! तेही कुणाकडून, तर हाताखाली काम करणार्‍या लोकांकडून..

नागरी सेवांमध्ये निवड होणार्‍या अधिकार्‍यांच्या "पासिंग कट-ऑफ" मध्ये खुल्या आणि आरक्षित वर्गांच्या कट-ऑफ मधील अंतर बरेच कमी असते. त्यातही असे मानल्या जाते की, आरक्षित वर्गाला लिखीत परीक्षेत होणारा थोडाफार फायदा "इंटरव्ह्यु"च्या मार्कमध्ये भरुन निघतो. कारण की, बर्‍याच जणांच्या मते सरासरीप्रमाणे खुल्या वर्गातील परीक्षार्थींना आरक्षित वर्गापेक्षा इंटरव्हयुमधे २०-३० गुण जास्त असतात. (मी ह्याचे श्रेय ह्या मुलांवरील पालकांचे लहानपणापासूनचे लक्ष, प्रोत्साहन आणि त्यामुळे अधिक चांगल्याप्रकारे विकसित होणारे व्यक्तिमत्त्व ह्याला देतो.) (डिस्क्लेमरः वरील विधानांचा विदा माझ्याकडे नाही. इच्छुकांनी गुगलून बघावे..) आता असे जर असेल तर, आरक्षित वर्गाला मिळणारा कटऑफचा फायदा संतूलित होतोयच की. आणि माझ्याच बॅच मध्ये पहील्या २०मधे येणार्‍यांपैकी पाच-सहा जण आरक्षित वर्गातले होते. त्यामुळे "आरक्षणाचा फायदा" ह्याच्यावर गरजेपेक्षा जास्त घसाफोड करत बसायची गरज नाहीय..

आता उपायांवर बोलू.. "सत्यमेव जयते"च्या धाग्यावर चतुरंगने अत्यंत संयत प्रतिसाद दिला आहे. जात ही पिढ्यानपिढ्या आमच्या संस्कारांमध्ये आहे. गावांमध्ये ती वेगवेगळ्या गल्ल्या-मोहल्ल्यांत नांदत असते. शहरांमध्येही वेगवेगळ्या "नगर आणि पेठा" जाती दाखवतात. मात्र आजच्या पिढीला ती जास्त कुठे स्पर्शत, नव्हे टोचत असेल तर आरक्षित आणि अनारक्षित ह्या विभाजनामध्ये.. मला वाटतं की, नुस्त्या आरक्षणापेक्षाही "माझ्यासारखीच किंवा माझ्यापेक्षा चांगली परिस्थिती असतांनाही ह्याला फक्त जातीचा फायदा मिळतोय..." ही खुल्या वर्गाची "दुखती रग" आहे. आर्थिक आधारावर आरक्षण हा थोडा गहन मुद्दा आहे. (सरकारने "शिक्षणाचा अधिकार" अंतर्गत ह्याला सुरवात केली आहे.) सध्याची परिस्थिती अशी आहे की, आरक्षित समाजातही काही विशिष्ट लोकच आरक्षणाचा फायदा घेत आहेत. ही फळी फोडून त्यांच्यातल्याही सगळ्यात गरजू लोकांपर्यंत आरक्षणचे फायदे पोहचायला हवेत. आरक्षित समाजातील गरजू/आर्थिकदृष्ट्या पिडीत लोकांनाच फक्त त्याचा फायदा होईल, हे निर्धारीत करणे गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, माझ्या बॅचमधल्या दोन आय ए एस अधिकार्‍यांचे देतो. पहीला, अत्यंत गरीबीतून वर आलेला.. आई झाडू मारायची. हा स्वतः बालमजूर म्हणून राबलाय. ढाब्यावर जेवण बनवण्याची कामं करुन जिद्दीनं शिकला, आय ए एस झाला. ह्याला आरक्षणाचा फायदा मिळाला, आणि मिळालाच पाहीजे. त्याने शारीरीक, सामाजिक, भावनिक आणि आर्थिक दुर्दशा अनुभवलीय, आणि त्यातून तो वर आलाय.. दुसरा, ह्याचे आई-वडील आय ए एस. त्यांच्या सोबत काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या मते, त्यांच्या भागात ह्यांच्या घराण्याचा राजांचा थाट. बंगला म्हणे, राजवाडा वाटावा इतका मोठा ! लहानपणापासून टॉप स्कुल्समध्ये शिकलेला. स्टिफन्स, IIM (Ahm) मध्ये शिकलेला.. बरं, आडनावावरुन जात कळल्याने त्याचा त्रास झाला असेल, असं म्हणावं, तर आडनाव एकदम राजपूत स्टाईलीतलं भारी.. वरतून ह्याचे आई-वडील अ‍ॅकॅड्मीत होते, त्यामुळे ह्याला रँक सुधारण्यातही फायदा झाला..

आता सांगा. लोकशिक्षण, आंतरजातीय विवाह, कायद्याचे ज्ञान इत्यांदींचे जातपात, अस्पृश्यता निवारणातील महत्त्व निर्विवाद आहे. पण, आजच्या तरुण पिढीच्या मनात असलेली "वो साला जात के भरोसे बढ रहा हैं, और हम सड रहे हैं" ही भावना जर काढायची असेल तर आरक्षित समाजानेही थोडे आत्मावलोकन करणे गरजेचे आहे. "क्रिमी-लेयर"चा फंडा जातीनिहाय आरक्षणातही आणावा लागेल, ज्याद्वारे लाभ हा फक्त अरचेवर अड्कून न राहता खालच्या स्तरापर्यंत पोहचू शकेल. शेवटी "शेड्युल्ड" ही शिवी व्हावी का नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे..

संस्कृतीमुक्तकइतिहाससमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पिंगू's picture

9 Jul 2012 - 6:56 pm | पिंगू

दुर्दैवाने माझ्या महाविद्यालयीन जीवनात ह्या व्यवस्थेची जाणीव प्रकर्षाने झाली होती. जे निश्चितच खेदजनक होते.. :(

मृत्युन्जय's picture

9 Jul 2012 - 8:23 pm | मृत्युन्जय

बात निकली है तो थोडा हमारी भी सुनो.

उदा. १

शाळा / कॉलेजमधली एक सहाध्यायी. साधारण बुद्धीमत्ता, घरचे उच्च मध्यमवर्गीय. २ चारचाकी बाळगणारे. एम बी ए प्रवेशासाठी उत्सुक असले आमचे बरेच सहाद्यायी होते. ही त्यातलीच एक. एका हुषार मुलाला नेमके २-३ मार्क्स कमी मिळाले आणि त्याचे पुंबा थोडक्यात चुकले. हिला मात्र पुंबा मिळाले. तिचे मार्क्स कोणालाच माहिती नसल्याने तिने अनपोएक्षितरीत्या यश मिळवले असा आमचा समज झाला. यथावकाश मार्क्स समजले तेव्हा तिने मॅनेजमेंट कोट्यातुन पैसे चारुन अ‍ॅडमिशन मिळवली असेल असे वाटले. बर्‍याच दिवसांनी एका मित्राला पुंबाची अ‍ॅडमिशन लिस्ट मिळाली तेव्हा कळाले की तिला ओबीसी कोट्यातुन अ‍ॅडमिशन मिळाली होती.

उदा. २

बीमसीसी मध्ये १२ वी पास विद्यार्थ्यांची अ‍ॅड्मिशन साठी झुंबड उडालेली. १२ वीत वाणिज्य शाखेत ८०.५% मिळालेला विद्यार्थी स्वतःचे नाव लिष्टेत नसल्याने हिरमुसलेला. त्याचवेळेस ४१% टक्क्याला बीमसीसीत अ‍ॅडमिशन मिळाल्याबद्दल ओली पार्टी करणाचे प्लॅन बनवणारे काही आरक्षित मुले. यथावकाश १ महिना उशिराने काही मुलांनी अ‍ॅडमिशन न घेतल्याने उष्ट्या झालेल्या जागेवर त्या ८०% वाल्याला अखेरीस प्रवेश मिळाला. अर्रे हो त्या वर्षी १२ वी वाणिज्य ची गुणवत्ता यादी ८४.५ ला बंद झाली होती. म्हणजे ८०.५% बर्‍यापैकी जास्त होते.

उदा. ३

रेल्वेत वर्षानुवर्षे काम करणारे एक उच्चजातीय टीसी (काही प्रमोशन्स मिळुन वर चढलेले). त्यांच्या हाताखाली काम करणारा निम्नजातीय केवळ जातीआधरित आरक्षणाच्या बळावर यांच्या डोक्यावर जाउन बसला. काम सगळे यांना विचारुनच व्हायचे कारण स्वत:ला काहिच येत नव्हते. पण मुजोरी मात्र अपरंपार होती. वारंवार ऐकवले जायचे की "तुम्ही *** असेच राहणार. मला बघा २ वर्षात प्रमोशन मिळते की नाही. आरक्षणात पुढचा नंबर माझाच आहे" इथे जातिवाचक अपमान निम्नजातेयाकडुन उच्च वर्णीयाचा होत होता हे नम्रपणे नमूद करु इच्छितो"

उदा. ४

नगर जिल्ह्यातल्या एका तालुक्याचा दमदार निम्नजातीय पुढारी. बहुजन बहुल असलेल्या विभागांतुन सांगत फिरायचा. "मला मत द्या. **** आयाबहिणींना तुमच्याघरी भांडी घासायला लावेन. याच्या स्वत:च्या घरी याने असे लोक शोधुन शोधुन कामाला ठेवले होते. त्यांचा जातिवाचक अपमान नेहमीच व्हायचा. पण यांना अ‍ॅट्रोसिटी लागू नाही.

उदा. ५

नगर जिल्ह्यातलाच एक प्रशासकीय अधिकारी. काही वर्णीयांना नेहमीच शिव्या घालणारा. एकदा हाताखालच्या लिपिकाला खाजगीत विचारत होता उच्च वर्णीय डॉक्टर कुठे मिळेल म्हणुन. नंतर समजले की आरक्षणावर प्रवेश मिळवुन डॉक्टर झालेल्या स्वजातीयांवर याचाच विश्वास नव्हता.

उदा. ६

एका नामांकित शाळेतली घटना. मुख्याध्यापकांशी शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाबद्दल बोलणे चालु होते. तेव्हा सांगण्यात आले " आता परिस्थिती काय आहे माहिती आहे ना तुला? जे शिक्षक सरकारच्या कृपेने येतात ते चालवुन घ्यायला लागतात. काही बोलायची सोय नाही. नाहितर जातीचा बडगा दाखवला जातो. तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करायचे झाले"

या सहाही प्रकरणात मला तरी रिव्हर्स अ‍ॅट्रोसिटी दिसते. मग शहरी जनतेने देशात अजुनही अस्पूश्यता आहे हे का मान्य करावे?

तर करावे. करावेच लागेल. कारण अजुनही या देशात खैरलांजी सारखी प्रकरणे होतात. हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार मध्ये दलित स्त्रियांना जातीय तेढीमुळे नागवले जाते, उच्चाजातीय - निम्नजातीय विवाह खपवुन घेतले जात नाहित.

थोडक्यात काय तर देश सध्या ज्या स्थित्यंतरातुन जात आहे त्याच्यात "जात" दोन्हीकडुन बडवली जाते आहे. आरक्षण ही एक फेल गेलेली व्यवस्था आहे. सत्यमेव जयते. अजुन काय?

इनिगोय's picture

9 Jul 2012 - 9:26 pm | इनिगोय

अतिशय संतुलित प्रतिसाद.

जात हा शब्द जास्त जास्त अधोरेखित करून जातीचे तोटे नाहीसे होणार नाहीत, तर अधिक सबळ होणार आहेत. पण हे राजकारण्यांना स्वतःला समजून घ्यायचं नाही, आणि जनतेला दिसू द्यायचं नाही. जातिनिहाय आरक्षण हा संतुलन साधण्याचा मार्ग असू नाहीच शकत. एकाच्या हातातला सोटा दुसर्‍याच्या हातात देण्याचा प्रकार झालाय हे आरक्षण. मुदलात डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिताना काही वर्षांनी आरक्षण काढूनच टाकावं, अशी सूचना केल्याचं वाचलं आहे. त्या दृष्टीने कधी काही प्रयत्न झाल्याचं ऐकिवात नाही. (जाणकारांनी अधिक तपशील द्यावा, ही विनंती.)

चर्चेचा रोख बदलू नये, म्हणून इथे इतर तर्‍हांच्या आरक्षणांचा उल्लेख टाळत आहे.

चिगो's picture

9 Jul 2012 - 10:15 pm | चिगो

नेहमीप्रमाणेच अत्यंत संतुलित प्रतिसाद, मृत्युंजय.. क्र.1 मधल्या मुलीने सरळसरळ भ्रष्टाचार केला , आणि दुर्दैवाने अशी उदाहरणे बरीच आहेत.. क्र. 3 बद्दल बोलायचं झालं, तर . लिहीतांना हे विसरलो मी की माझ्यामते प्रमोशन मध्ये आरक्शण हा मुर्खपणा आहे.प्रमोशन गुणवत्तेवरच असावे. कदाचित सुरूवतीच्या काळात ते ठीक होते, पण आजच्या काळात नको. आरक्शणाचा पूर्ण फंडा हा "सामाजिक परीस्थितीमुळे संधी न मिळालेल्यांना समान संधी देणे” हा होता, आणि तोच रहावा.. पाय नसलेल्यांनी कुबडी घेतली तर चालेल. पण कधीकाळी पाय नसलेल्यांनी पाय फुटल्यावरही कुबडी काखेत दाबून ठेवत , आजच्या लंगड्यांना कुबडी नाकारावी, यावर काय बोलावे..

सूड's picture

9 Jul 2012 - 10:47 pm | सूड

उदा १.
मुंबैच्या उपनगरातील एक चाळ. चाळीत दोन-तीन उच्चजातीय, बाकी सर्व दलितांची घरं. ठराविक जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या करता ठणाणा करणारे लाऊडस्पीकर दिवसरात्र या उच्चजातीयांच्या घरासमोर लावले जात. त्या आवाजाने झोपणं ही अशक्य, बरं बोलायची सोय नाही. त्याला वैतागून या जयंत्या-पुण्यतिथ्या उरकेपर्यंत या मोजक्या घरांना कुलपं असायची. ती झोपमोड, डोकेदुखी सहन करण्यापेक्षा त्यांना नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागे आणि असं झालं की या उरलेल्या लोकांना जयंत्या-पुण्यतिथ्या साजर्‍या केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटे.

उदा २.
एका उच्चजातीय घरातला दत्तजयंती उत्सव. कुठल्याश्या पीठातून एका स्वामींना पाचारण. महाप्रसाद वैगरेंचं आयोजन, पण वाढपी ऐनवेळी नाहीत. मग घरातल्या मुलांच्या मित्रमंडळाने वाढपी, पाणक्ये होऊन सोहळा पार पाडला. बरं यात वाढपी पाणक्यांत कोणी दलित नाही पण काही खतावळे (मांसाहारी) मात्र होते. दुसर्‍या दिवशी मित्रमंडळातल्या एकाला ऐकवलं जातं 'अरे, स्वामी जेवलेच नाहीत काल.'
...'का काय झालं?'
'अरे काल सगळं सरभेसळ होतं ना !!'

थोडक्यात "जात" दोन्हीकडुन बडवली जाते आहे.

निशदे's picture

9 Jul 2012 - 11:35 pm | निशदे

उत्तम प्रतिसाद. विषयाची ही दुसरी बाजूही लक्षात घेतली गेली पाहिजे.

रेवती's picture

9 Jul 2012 - 11:42 pm | रेवती

उदा. क्र. १, २, ३ याबद्दल मस्त उदाहरणे आहेत पण इथे दिली तर वादावादी सुरु होईल म्हणून गप्प बसते. तुमच्या प्रतिसादाशी सहमत.
अवांतर: माझे लग्न झाल्यावर अमूक एका गावच्या कोकणस्थांच्या संघात पुजेला गेल्यावरही बायका येऊन विचारायच्या, " तू देशस्थाची का ग? हम्म्म्म, दिसतच आहे ." ;) दोनेक वर्षे गेले अष्टमीच्या पुजेला, नंतर बंद करून टाकलं जाणं. घरूनही मला कोणी जाण्यासाठी आग्रह केला नाही. अगदी मंगळागौरीच्या कोकणस्थांच्या पुजेत आणि देशस्थांच्या पुजेत जो थोडाफार फरक आहे त्यावरून मला पन्नासेक बायकांसमोर फारसा संबंध नसलेल्यांकडून ऐकवले गेल्यावर तर मी जाणेच बंद केले अश्या कार्यक्रमांना. यासाठी मी सासरी परवानगी वगैरे मागितली नाही आणि त्यांनीही मला कधी मनाविरुद्ध "तू जा बै पुजेला!" अशी सक्ती केली नाही. सगळा हौसेचा मामला. :) यावरून मला कोकणस्थांविषयी काही म्हणायचे नाही तर हे एखाद्या कोकणस्थ मुलीला देशस्थांकडून किंवा कर्‍हाड्यांकडूनही ऐकून घ्यावे लागले असेल. मला माहीत नाही आणि मी पडत नाही असल्या चर्चांमध्ये. जातीभेद आपल्याला किती पाळायचा आहे यावर सगळे अवलंबून आहे. नातेवाईकांचे आंतरजातीय संसार सुखात चालू आहेत आणि सासरच्या कोणी त्यांना "ही बामणाची आहे." असे बोलून दाखवत नाही की काही मानत नाहीत हा सुखद अनुभवही आहे. दोन्हीही खरे.

मस्त कलंदर's picture

10 Jul 2012 - 12:36 pm | मस्त कलंदर

पदवी आणि पदव्युत्तर दोन्हीही शिक्षणं सरकारी किंवा पूर्वसरकारी कॉलेजातून घेतल्यानंतर तर हा अनुभव आणखीच आलाय.

तेव्हा इंजिनिअरिंगला ४००० रू ट्यूशनफी असे, आणि आरक्षित वर्गाला रू. १००. तेव्हा संगणकशास्त्राचे खुल्यावर्गाचे प्रवेश ९४% ला बंद झाल्यानंतर आरक्षणामुळे एका ५२% च्या मुलाला प्रवेश मिळाला तेव्हा थोडक्यात प्रवेश हुकलेल्यांचे मित्रमैत्रिणी जाम हळहळले होते. पहिल्या सत्रानंतर त्या मुलाच्या सगळ्या विषयात दांड्या उडाल्या, तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला किमान वर्षाखेरिस मदत म्हणून मिळणारे एकूण मदत ११०००- ट्यूशन फी ४०००=५०००रू मिळाल्याशिवाय कॉलेज सोडू नकोस म्हणून सांगितले होते. आता पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेस माझ्या वर्गातल्या आरक्षित वर्गाला काहीच पैसे भरावे लागले नाहीत आणि ५०% अधिक जनता ही क्रिमीलेयर गटात मोडणारी आणि काही वर्षे नोकरी करून आलेली होती. त्यामुळं एकंदरीत जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक कुवतीवर आरक्षण असावं, आणि तेही कोटेकोरपणे खरोखरीच्या गरजूला मिळावं असं मनापासून वाटतं खरं... पण त्याचवेळेस अजूनही फक्त जाती-धर्माच्या नावावर निवडणूका लढवणारे आपले लोक पाहून हा अगदीच भाबडा आशावाद असंही वाटतं!
सगळीकडच्या चर्चा पाहून एकूणातच सगळ्यांना सोयीस्कररित्या जात हवी असते आणि सोयीचे असेल तेव्हा नको असते या निष्कर्षाप्रत येऊन पोचलेय आता.

जाता जाता: मी जन्माने जरी खुल्या प्रवर्गात मोडत असले तरी माझ्या आडनावावरून स्वतःला उच्चवर्णीय किंवा निम्नवर्णीय समजणार्‍या दोन्ही गटांत मोडत नाही. पदवी शिक्षण घेतलं तेव्हा याचा चांगलाच तोटा झाला. दोन्ही गटांकडून आमचा मृदंग तर व्हायचाच आणि दोन्हीकडून आपापल्या गटाच्या लोकांना कधी कधी लायकी नसूनही तोंडी परिक्षेत भरभरून मार्क्स मिळायचे. आम्ही ती कसर मग लेखी परिक्षेत भरून काढायचो. :-)

हा प्रतिसाद आणि त्याच्या सर्व उपप्रतिसादांशी प्रचंड सहमत.

मृगनयनी's picture

13 Jul 2012 - 2:12 pm | मृगनयनी

ह्म्म.. सहमत टू मृत्यूंजय!

अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट बदलायची आता खरंच गरज आहे!

___________________________________

अर्धवटराव's picture

9 Jul 2012 - 11:19 pm | अर्धवटराव

आज जे जातीव्यवस्थेचं उग्र वगैरे रूप दिसतय.. ते केवळ ट्रेलर आहे. अजुन पूर्ण ३ तासाचा शो बाके आहे... क्लायमेक्स सकट. हि समस्या सोडवायची संधी केव्हाच निघुन गेली आहे. कारण आता ति एक सामाजीक समस्या न राहाता सत्ताकारण-अर्थकारणाचा राजमार्ग झालाय. आणि याची ९९% जबाबदारी ( सो कॉल्ड ) उच्चवर्णीयांवर आहे (खरं तर १००% टक्के म्हणणार होतो, पण १% सुट दिली ;) ). गंमत अशी, कि या संघर्षाला फार विचित्र परिमाणं लाभणार आहेत. एकीकडे संख्येच्या आधारावर राजकारण, दुसरीकडे संख्येला फार कमी महत्व देणारं अर्थकारण, या दोघांचे एकमेकांवर असलेले अवलं बित्व, आणि दिवसेंदिवस अधीकाधीक गोंधळात पडणारे समाजकारण... शिवाय धर्मकारणाची लुडबुड.
यावर एकच उपाय आहे, तो ही व्यवस्था-आधारीत नाहि तर व्यक्ती आधारीत. एक गोष्ट वाचली होती कुठेतरी... कि एक चढाव चढण्याची बेडकांची शर्यत लागते. खुप कठीण चढाव असतो. एक एक करुन स्पर्धक बेडुक खाली पडायला लागतो. प्रेक्षकवर्ग शिट्ट्या मारणे, टाळ्या वाजवणे, प्रोत्साहन देणे, हतोत्स्ताही करणे असे सर्व सोपस्कार करण्यात दंग असतात. शेवटी एक बेडुक अगदी शेवटच्या टप्प्यात येते. प्रेक्षकांकडुन "आता कठीण आहे", "हा खाली पडलाच बघा" वगैरे शेरेबाजी जोर धरते. पण तो बेडुक वर पोचतोच. शेवटी कळतं कि तो बहिरा असतो.
असाच एखादा बहिरा अर्थतज्ञ नेता हि जातीसमस्या सोडवेल.

अर्धवटराव

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 8:39 am | मराठमोळा

>>आज जे जातीव्यवस्थेचं उग्र वगैरे रूप दिसतय.. ते केवळ ट्रेलर आहे. अजुन पूर्ण ३ तासाचा शो बाके आहे... क्लायमेक्स सकट. हि समस्या सोडवायची संधी केव्हाच निघुन गेली आहे. कारण आता ति एक सामाजीक समस्या न राहाता सत्ताकारण-अर्थकारणाचा राजमार्ग झालाय.

अर्धवटरावांशी सहमत.

>>असाच एखादा बहिरा अर्थतज्ञ नेता हि जातीसमस्या सोडवेल.
काय राव.. तुम्ही पण चमत्कार होतात यावर विश्वास ठेवू लकाय्?त की काय?
पहले मराठी संस्थळांवरची कंपूबाजी समस्या सोडवून दाखवा ;)

(जात, धर्म, कम्युनिटी हे सगळे कधीही न संपणारे कटु सत्य आहे हे मानणारा)

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 11:04 am | अर्धवटराव

कंपुबाजीची समस्या सोडवणं अशक्य आहे... त्याच्या तुलनेत एक पॉझीटीव्ह नोट म्हणुन बहिरा नेता उभा केला इतकच ;)

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 11:48 am | नाना चेंगट

प्रतिसादाशी बराचसा सहमत.

>>>असाच एखादा बहिरा अर्थतज्ञ नेता हि जातीसमस्या सोडवेल.

अर्थतज्ञ नेता आर्थिक समस्या सोडवू शकणार नाही तर ही काय सुटणार? तेव्हा या वाक्याशी असहमत. :)

कुणीतरी धार्मिक, अध्यात्मिक वलय असलेलाच जातीविरुद्ध उभा राहिला तर होईल.

मो.क. गांधींना संधी होती त्यांनी घालवली. त्यांच्या सारखा दुसरा नेता सध्या तरी दिसत नाही. भविष्याचा वेध मला तरी घेता येत नाही.

शिल्पा ब's picture

11 Jul 2012 - 11:50 am | शिल्पा ब

गांधींनी कसली संधी घालवली म्हणे? हरीजन उद्धार वगैरे काय काय केलं की!! जरा सविस्तर लिहा.

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 11:57 am | नाना चेंगट

हरीजन उद्धार केला, पण हरीजन असे वेगळेपण शाबूत ठेवूनच ना ? लेबलं बदललं पण वेगळेपण दाखवतच राहिले ना? त्याचाच पुढे हरीजन लेबल जाऊन दलित लेबल लावले गेले तेव्हा वेगळेपण शिल्लकच राहिले. वेगळेपण दाखवण्याच्या तर्‍हा बदलल्या पण मनातुन भेद नष्ट झाला नाही.

शिल्पा ब's picture

11 Jul 2012 - 12:44 pm | शिल्पा ब

तुमचं म्हणणं बरोबर आहे.
पण एक गोष्ट आहे की नावं, प्रथा बदलल्या तरी भेदभाव राहणारंच नाही असं सांगता येत नाही. मानवजातीसाठी दुर्दैवी आहे पण आहे हे खरं.

केवळ अन केवळ माणुसकीच हा धर्म असणे खुप अवघड आहे. कोणत्या ना कोणत्या फायद्यासाठी शासक असं होउ देणार नाहीत अन त्यांचे चेले आंधळेपणानं किंवा स्वतःला दोन पैसे सुटतील म्हणुन पाठींबा देतील. मिपावरसुद्धा तुम्ही असे लोक पाहीलेच असतील.

अर्धवटराव's picture

11 Jul 2012 - 11:00 pm | अर्धवटराव

नानाजी,
या युगात "अर्थ" हा एकमेव धागा असा आहे कि जो लोकांना एकत्र बांधुन ठेऊ शकेल. जुन्या सामाजीक रुढीं-परंपरांमधुन समाज बाहेर पडेलही. जातीभेदाचा विषवृक्ष या जुन्या सामाजीक साच्यातुन फार काळ खत-पाणि मिळवु शकत नाहि. जातीभेदाची लढाई आर्थीक हितसंबंधांना मारक ठरतेय, आणि म्हणुनच ति फोफावेल. आरक्षण वगैरे समस्यांच हेच परिमाण आहे. अर्थकारणाच्या माध्यमातुन परिश्रमांना महत्व, कर्तुत्वाला स्कोप, दुर्बळ घटकाला बळ/संधी, हे सगळं हाताळता येतं. सर्वात महत्वाचं म्हणजे, समाजात स्थैर्याच्या, प्रगतीच्या बाबतीत जे एक प्रकारचं आश्वासक वातावरण असावं लागतं ते अर्थकारणातुनच मिळु शकतं. ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, मुसलमान... हे सगळे रायगडावर भगव्या जरिपटक्याखाली एकत्र आले ते याच सुबत्तेच्या आश्वासनाने. रिकाम्या हाताला, मेंदुला सकारात्मक इंधन मिळणं आणि जे प्राप्त करायचय त्याकरता झाडुन सर्वांची मदत आवश्यक आहे याची प्रचिती येणं यासाठी अर्थकारणासारखा उपाय नाहि.
बाकी धार्मीक, सामाजीक नेत्यांचे समाज जागृतीचे प्रयत्न देखील आवश्यक आहेच. पण ते निर्णायक नाहित.

अर्धवटराव

सोत्रि's picture

9 Jul 2012 - 10:54 pm | सोत्रि

कारण आता ति एक सामाजीक समस्या न राहाता सत्ताकारण-अर्थकारणाचा राजमार्ग झालाय

हेच अंतिम सत्य आहे, बाकी सर्व मोहमाया आणि मिथ्या आहे!

- (बहिरा) सोकाजी

कुंदन's picture

9 Jul 2012 - 11:26 pm | कुंदन

मिपा धुरीणी नान्या अन पर्‍या यांचे प्रतिसाद वाचायला उत्सुक !

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2012 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या पुरता तरी आम्ही हा प्रश्न सोडवून टाकला आहे. त्यामुळे वांझोट्या* चर्चेत रस नाही. (सदर शब्दाबद्दल लेखक आणि प्रामाणिक प्रतिसादक ह्यांची माफी.)

आम्ही आजवर जात-पात-आडनाव बघून मैत्री केली नाही, आणि अशी करण्याची इच्छा असणार्‍यांना (भले तो स्वाजातीय असला तरी) फाट्यावरती मारल्या शिवाय सोडले नाही.

बाकी कधी तरी कुठेतरी वाचले होते :- ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्याकडे अधिकार नाही आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीत.

बाकी चालू द्या..

चिगो's picture

13 Jul 2012 - 2:31 pm | चिगो

आक्षी बरुबर, परा..

आमच्या पुरता तरी आम्ही हा प्रश्न सोडवून टाकला आहे.

प्रश्न तर मलाही नाही, भाऊ..

त्यामुळे वांझोट्या* चर्चेत रस नाही. (सदर शब्दाबद्दल लेखक आणि प्रामाणिक प्रतिसादक ह्यांची माफी.)

बरोबर.. पण वैचारीक खाज/कंडू शमवावा म्हटलं.. ;-)

आम्ही आजवर जात-पात-आडनाव बघून मैत्री केली नाही, आणि अशी करण्याची इच्छा असणार्‍यांना (भले तो स्वाजातीय असला तरी) फाट्यावरती मारल्या शिवाय सोडले नाही.

ज्जे ब्बात.. मिलाओ हाथ, दोस्त.. रुम, जेवण, कपडे आणि बर्‍याच गोष्टी दोस्तांसोबत शेअर केल्याहेत, जात-पात-आडनाव काहीही न बघता.. सिर्फ दोस्ती ! आणि "प्राऊड टू बी...." वाल्यांना फाट्यावर मारले आहे, जेव्हा जेव्हा ह्या गोष्टींचा आधार घेवून जवळीक केलीय तेव्हा..

बाकी कधी तरी कुठेतरी वाचले होते :- ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्याकडे अधिकार नाही आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीत.

कडक वाक्य..

आपला लेख आवडला.. अगदी प्रत्येक मुद्द्याशी सहमत.. पण बऱ्याचदा चर्चांमध्ये हा तुम्ही लिहिलेल्या या मुद्द्याचा उल्लेख असतो..

पिढ्यानपिढ्या केलेल्या अन्यायाचे परिमार्जन ५०-५५ वर्षांच्या आरक्षणाने मिळालेल्या लाभाने होऊ शकत नाही, हे सिंपल लॉजिक आमच्या लक्षात येत नाहीय. अर्थात, आरक्षणाच्या पॉलिसीमध्ये काहीच सुधारणांची गरज नाही, असे मला म्हणायचे नाहीय. त्याबद्दल बोलूच..

आपण सहमत आहात का याच्याशी? पिढ्या न पिढ्या केलेला अन्याय म्हणजे कोणी केलेला अन्याय.. कोणावर केलेला अन्याय.. परिमार्जन कोणी करावे..? आणि नक्की किती पिढ्यांनी करावे? हजार वर्षात झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल आणि गेल्या पन्नास वर्षात झालेले बदल यांची तुलना करता येयील का? म्हणजे की हजार वर्षात लोकं भाले तलवारीच्या पुढे नाही गेल, आज गेल्या वर्षीचा मोबाईल पण out of date होतोय..

या अशा वेळेस मुलांना जातीच्या नावाखाली नवा भेदभाव कोण शिकवतय.. आजकाल आधी कधी न जाणवलेली जात पण आरक्षणाद्वारे दहावी बारावीनंतर जातीची मुद्दाम ओळख का करून दिली जाते मुलांना ...

गरजूंना मदत हवी, आरक्षण पण हवेच पण आमचेच सुस्थितीतील भाऊबंद करत नसतील तर इतरांना ऐकवून उपयोग नाही.. आणि अजून हजार वर्षे पण जात ठेवून ही दरी दूर होणार नाही..

पिढ्या न पिढ्या केलेला अन्याय म्हणजे कोणी केलेला अन्याय.. कोणावर केलेला अन्याय..

ह्यावर काही बोलायची गरज आहे का?

हजार वर्षात झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल आणि गेल्या पन्नास वर्षात झालेले बदल यांची तुलना करता येयील का? म्हणजे की हजार वर्षात लोकं भाले तलवारीच्या पुढे नाही गेल, आज गेल्या वर्षीचा मोबाईल पण out of date होतोय..

बरोबर.. म्हणजे हजारों वर्षे दलितांचे जीवन हलाखीचे होते. त्यांना मिळणारी वागणूक अमान्वीय होती.. आता मात्र ६० वर्षांमध्ये सगळ्यांचीच परीस्थिती चांगली झालीय, असे मानायचे का? आरक्षणाला विरोध हा आरक्षण सुरु झाल्या झाल्याच सुरु झाला होता.. आणि मी कुठेही म्हणत नाहीये, की हे असेच सुरु राहू द्या..

गरजूंना मदत हवी, आरक्षण पण हवेच पण आमचेच सुस्थितीतील भाऊबंद करत नसतील तर इतरांना ऐकवून उपयोग नाही..

हेच तर म्हणतोय ना, राव..

स्पंदना's picture

10 Jul 2012 - 7:19 am | स्पंदना

वाचते आहे, प्रतिसादांची प्रतिक्षा.
माझ्या गावी एक निम्न जातीय मुलगा अतिशय हलाकीच्या स्थितीत साधारण शिकला, दोन वर्ष काय शिक्षक झाला, ते लगेच बढती, आता शिक्षण अधिकारी होउन अतिशय व्यवस्थीत रहातो. गावातील बाकिच्या त्याच्या बरोबरच्या मुलांनी तो एव्हढ यश कमवुन आला म्हणुन त्याचा सत्कार करायचा ठरवल, उत्तर नाही...का? आम्ही आता हाय्क्लास आहोत.
याच्या शिक्षणाला, घरी खायला नसेल तेंव्हा याची आई कधी दारी आली, तर तिच्या जिद्दीला पाहुन(वडिल नव्हते) कायम खाण्याची वा पैशाची मदत निदान आमच्या घरुन तरी होती. तसाच हलाखीत शिकणारा गावातला आणखी एक तरुण बी,कॉम होउनही परत शेतावर आला. आम्ही करत असलेले हिशोब त्यान एकदा पडताळुअन पाहिले होते, पण त्यात एव्हढी अरेरावी नव्हती. त्या शिक्षण अधिकार्‍याची मात्र गावाला काडीभरही मदत नाही. अन आमच्या गावी जरी जातपात असली तरी तेव्हध्या पुरतीच, आधीच चार माणसांच गाव, जातीन आणि कुठ फोडायचा? असच सार्‍यांचा विचार. हा पण रोटीचा व्यवहार असला तरी बेटी पर्यंत नाही पोहोचला. अन त्याची गरजही नाही.

नगरीनिरंजन's picture

10 Jul 2012 - 7:35 am | नगरीनिरंजन

जात सांगू नका, विचारू नका. जातिवाचक नावं बदलून टाका.
कोणाचा, कुठला अशा प्रश्नांना उत्तरे देऊ नका. वगैरे वगैरे सगळं केलं तरी हा रोग जाईलच याची खात्री नाही.

शिक्षणाव्यतिरिक्त इतर आरक्षण बंद केले पाहिजे आणि शिक्षणातही क्रिमी लेयर काटेकोरपणे तपासला गेला पाहिजे याच्याशी सहमत.
कायद्याने दिलेले आरक्षण सहज बंद करता येऊ शकते पण त्यानंतरही उच्चवर्णीयांचे अनधिकृत आरक्षण बंद होईल याची कोणतीही खात्री नसल्याने ते चालूच ठेवले जात आहे.
मुळात फोडा आणि झोडा हे राजकारण्यांच्या पथ्यावर पडत असल्याने कोणतीही खरी सामाजिक सुधारणा करण्याच्या मनस्थितीत कोणीही नाही.
त्यामुळे काही उच्चवर्णीयांमधल्या मूर्खांचे तर काही दलित मूर्खांचे किस्से या धाग्यावर लिहिण्याव्यतिरिक्त काही होईल असे वाटत नाही.

- आपलाच पण कोणाच्याही 'आपल्यातला' नसलेला.

अमितसांगली's picture

10 Jul 2012 - 7:48 am | अमितसांगली

आरक्षण हि एक गरज होती, आत्ताही आहे पण ज्यांच्यांसाठी आहे ते लोक याचा फायदा घेत नाहीत. शिकलेले, श्रीमंत लोकच याचा जास्त फायदा घेतात. त्यांच्यासाठी वयाची अटही फार शिथिल असते.

त्याबद्दलही मला वाईट वाटत नाही पण जर प्रवेश घेताना एखाद्या कोट्यातील जागा शिल्लक राहिल्या तर तिथेही सर्वसाधारण गटातील मुलांना प्रवेश दिला जात नाही. त्या विशिष्ट जातीचे विद्यार्थी मिळाले नाहीत तर त्या जागा तशाच सडतात. त्यामुळे कितीतरी हुशार मुलांचे नुकसान होते.

५० फक्त's picture

10 Jul 2012 - 11:10 am | ५० फक्त

अजुन तरी उत्तम मार्गानं चालली आहे चर्चा, अशीच रहावी ही अपेक्षा.

बाकी, या विषयावर मत द्यावं एवढी माझी तरी लायकी नाही.

सुहास..'s picture

10 Jul 2012 - 11:25 am | सुहास..

कोणीतरी विषय घेणार हे ठावुक होते...असो ..सविस्तर टकंतोच आहे थोड्या वेळात...मी रहातो, उठतो बसतो सर्वच समाजात..

एक अनुभव सांगतो आंजावर चा ...एका कट्ट्याला पुनम ला गेलो होतो ...एका अनोळखी व्यक्तीने माझा नाव सांगुन झाल्यावर मला आडनाव विचारले..मी नकार दिला सांगायला..(तेव्हा सही ही घेतली होती तशी) .त्यांचे मी विचारले नव्हते..पण आयडी नाव + आडनाव असल्याने ते उच्चवर्णीय होते याबद्दल शंका घ्यायला जागाच नव्हती..गृहस्थ पेशाने डॉक्टर आहेत. ज्या व्यक्तीला सायंटिफिक रित्या रक्ता-रक्तात फरक नसतो ( चार ग्रुप सोडुन) हे माहीत असुन हा प्रश्न विचारला ...हुश्शार !!..तीन वेळा विचारले हे विषेश ! आज ही हे मला टाळतात..मी कट्ट्याला येणार असेल तर पत्ता नसतो यांचा...असो ..

ते महाशय नेमक्या कुठल्या कारणाने तुमच्या अडणावात इंटरेस्टेड आहेत माहित नाहि... पण केवळ जातीभेद-अस्पृष्यता मानण्याच्या पलिकडे गेलय हे प्रकरण. (दोन्ही बाजुच्या मंडळींकडुन) एकमेकांचे चेहरे न पाहाणे, संपर्क न ठेवणे, भावना शेअर न करणे, बाय डिफॉल्ट वैरभाव बाळगणे, यांच्यामुळे माझं नुकसान होतय/झालय अशी अढी मनात असणे... अश्या आधुनीक छटा घेऊन हि समस्या उभी ठाकली आहे. (मी स्वतः हे सर्व अनेकदा अनुभवलं आहे)

अर्धवटराव

पण आडनाव बर्याचदा विचारतात. नेहमीच जात जाणून घ्यायचा उद्देश असेल असे नाही. अर्थात एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टिकोन वेगळा असतो. पण मला आपलं असं वाटतं की <३५ वयाचे लोक फक्त identity म्हणुन आडनाव विचारतात...

सुहास..'s picture

10 Jul 2012 - 12:03 pm | सुहास..

रावा,

थॅन्क्स टु अन्डरस्टॅन्ड, प्रश्न नुसता नुकसान आणि अढी चा नाही...परंपरा चालविताना जात-पात, देव मध्ये घालायची ( हे ** घालायची या चालीवर वाचावे) सवय पडली आहे लोकांना (क्षमस्व पण सभ्य भाषेत समजावयची पण लिमीट झाली आहे ) ...आमच्या एका मित्राला घडलेली आजपासुन वर्षभरापुर्वीची गोष्ट ...मित्रवर्य देशस्थ आहेत ..लग्न केले आहे आंध्र मुलीशी..हापुस बांधुन घेत होते कोथरुडात एका आज्जीबाईकडुन ( याच आजीबाई दोन चार दिवस अगोदर मित्र एकटा गेला होता तेव्हा आमच्या मुला साठी मुलगी बघा, पण आम्हाला देशस्थ च हवी आहे असे म्हणाल्या होत्या.) ..बायको सोबत होती...आज्जी बाईंना मुलीकडे पाहुन शंका आली ..लगेच आंब्याचा बॉक्स हातात न देता खाली ठेवला.. आणि पैसै पण खाली ठेवा म्हणाल्या ...आता बोला !

बॅटमॅन's picture

10 Jul 2012 - 12:16 pm | बॅटमॅन

काय वायझेडपणा आहे हा......ही असली थेरडी अजूनही जिवंत आहेत हे परम दुर्भाग्य. त्या थेरडीवरती अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच लावायला पाहिजे होता खरे तर.

मैत्र's picture

10 Jul 2012 - 3:03 pm | मैत्र

थोडी सुधारणा.
आज्जीबाई कोकणस्थ होत्या.

आंबे घ्यायला गेल्यावर किती डझनाची पेटी हे जेव्हा सांगितलं तेव्हा सुमारे तीन वेळा एकच प्रश्न विचारला -
"आडनाव कसं?"
दस्तुरखुद्द परत त्या घरात गेले नाहीयेत.

दोन्ही टोकाचे अनुभव आहेत: जसा या आज्जींचा तसं आमचं महाविद्यालय पूर्णतः एका विशिष्ट ब्राम्हणेतर उच्च जातीय गटाच्या हातातलं. असंख्य वेळा केवळ एका जातीत आहे म्हणून अत्यंत कुत्सित आणि खराब वागणूक मिळाली आहे. अभियांत्रिकी शिकण्याइतके आणि पुढे अजून परदेशात उच्च शिक्षण घेण्याइतके झाले म्हणजे सुशिक्षित आणि आर्थिक उच्च वर्गीय तरिही जातीचा दृष्टिकोन बदलत नाही.

अजून एक नुकताच पाहिलेला किस्सा. शिवाजी नगर भागातल्या एका जुन्या आणि नामवंत शाळेत मुलांची यादी त्यांच्या पूर्ण जाती / पोटजाती सह लावली आहे!
पंधरा वीस वर्षांपूर्वी ठराविक पुणेरी वळणाच्या एका सुप्रसिद्ध शाळेत सुद्धा आमच्या मित्रांच्या जाती कोणाला माहीत नव्हत्या. तथाकथित उच्च जातीय असून सुद्धा आमच्यापैकी बहुतेकांना एकत्र शिकताना, घरी जाताना, घरी किंवा शाळेत 'हल्ला बोल' पद्धतिने डब्यातलं खाताना कधी जात विचारायची गरज वाटली नाही.
आणि आत्ता इंग्रजी माध्यमात जातीची यादी लावणं हा अशक्य प्रकार वाटला.

काही इतर जातीय शिक्षक जे शिकवायला चांगले होते ते सर्व मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. आणि कधीच जात आड आली नाही. पण नंतर जे सरकारी अनुदानाबरोबर आले ते नेहमी स्वतःच्या खराब शिकवण्यापुढे जातीची ढाल वापरत राहिले. काही वर्षातच शाळेचे वैभव कमी झाले.

शाळेच्या यादीत असं करणं किती हलक्या दर्जाचा प्रकार आहे!!
मलाही माझ्या शाळकरी सोबत्यांच्या जातींचा विचार अजूनही मनात येत नाही. आणि आज शालेय वयापासूनच मुलांना अशा वातावरणात वावरावं लागत असेल, तर पुढची आशा ही धूसरच आहे म्हणायची.

काही इतर जातीय शिक्षक जे शिकवायला चांगले होते ते सर्व मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. आणि कधीच जात आड आली नाही. पण नंतर जे सरकारी अनुदानाबरोबर आले ते नेहमी स्वतःच्या खराब शिकवण्यापुढे जातीची ढाल वापरत राहिले. काही वर्षातच शाळेचे वैभव कमी झाले.

हे तर मराठी माध्यमाच्या बर्‍याच नावाजलेल्या शाळांच्या बाबतीत घडत असल्याचं दिसतंय.

माझ्या शाळेतला इतर जातीय शिक्षिकेचा एक अनुभव आठवला, चौथीत असताना मराठी विषयात जोडशब्द शिकवताना बाईंनी 'जेवण-खावण' असा शब्द शिकवला. तो चुकीचा आहे, असं मी सांगितलेलं त्यांनी मान्य केलं नाही. म्हणून मग पालक भेटायला आले. त्या बाई, मुख्याध्यापिका बाई आणि आणखी एक बाई यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत शेवटी माझ्या बाईंनी मान्य केलं, की हा प्रमाण मराठीतला शब्द नाही, त्यांच्या बोलीत बोलला जाणारा आहे. (त्यांची जात कोणती हे इथे उल्लेखणं अनावश्यक वाटत असल्याने नमूद करत नाही. पण त्यांनी चूक मान्य करण्यात ती किंवा तत्सम बाबी मध्ये आणल्या नाहीत.)

आज असं घडलं तर शिक्षिकेशी चर्चा करणं नेहमीच शक्य होईल काय? की बोलीतला शब्द शिकवण्याची चूक मान्य न करता, जी माझ्या बाईंनी केली, तिचं समर्थन केलं जाईल?

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 7:39 pm | अर्धवटराव

हे सगळं लचांड मी पण फार जवळुन अनुभवलं आहे रे मित्रा. हि समस्या जुन्या पिढीतल्या लोकांमध्ये बुरसटलेल्या विचारांचे लेबल लाऊन होती, आणि आज ति नफा-तोटा तत्वाचे लेबल लाऊन आहे... आणि हे जास्त भयंकर आहे.

अर्धवटराव

स्पा's picture

10 Jul 2012 - 12:15 pm | स्पा

चालुद्या ...आणि झालं कि प्यारे काकांना सांगा

प्यारे१'s picture

10 Jul 2012 - 12:25 pm | प्यारे१

हा हा हा!
ह्याच्यासाठी 'नेहमीचंच वेगळं' आहे.
नेहमीचाच विषय घेऊन नेहमीचेच यशस्वी कलाकार नि नेहमीचंच यशस्वी नाटक ...!

बाकी, 'घाण काढण्याचं ' काम करायला कधीही आवडेलच. :)

नेहमीचाच विषय घेऊन नेहमीचेच यशस्वी कलाकार नि नेहमीचंच यशस्वी नाटक ...! >>>

हसा हसा लेको ;) ...पण " घुसमट " ही काढत जा बाहेर, नायतर कढत रहाशीला ;)

प्यारे१'s picture

10 Jul 2012 - 12:40 pm | प्यारे१

'कोणाचा रे तू??? ' ;)
ह. घे.

बाकी वर्गवारी / वर्णवारी संपू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे! नावं वेगवेगळी असतील मात्र एका समान पातळीवर पूर्ण समाज राहू शकत नाही, राहणार नाही.
श्रीमंत गरीब, उच्च- नीच, बहुसंख्य-अल्पसंख्य, स्त्री पुरुष, वर कुणी म्हटल्याप्रमाणं दलित (बहुसंख्य)- अदलित (अल्प)
हे चक्र सुरु राहीलच.

सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवा, कायदा पास करुन घ्या, जमत नसेल तर जे लोक फायदा करुन घेतात त्यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा (दोन्ही बाजू) स्वतःची तशी क्षमता निर्माण करा.
वस्तुस्थिती स्वीकारा, पुढे चला. सिंपल.

कुंदन's picture

10 Jul 2012 - 12:47 pm | कुंदन

>>सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवा, कायदा पास करुन घ्या, जमत नसेल तर जे लोक फायदा करुन घेतात त्यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा (दोन्ही बाजू) स्वतःची तशी क्षमता निर्माण करा.
वस्तुस्थिती स्वीकारा, पुढे चला. सिंपल.

प्यारे१ काकांशी सहमत.

सुहास..'s picture

10 Jul 2012 - 12:59 pm | सुहास..

तुच घे हलके ;)

हे चक्र सुरु राहीलच. >>

विषय संपला !

वत्सा, चक्र चालवुन घेतो म्हणुन चालल्या जाते.

( आधी ही सांगीतल्या प्रमाणे) मेरा काम नहीं हे के फसाद खडा करू, बस, कुछ सच्चाईंयो से वाफिक कराना चाहता हूं.

सन्जयखान्डेकर's picture

10 Jul 2012 - 12:51 pm | सन्जयखान्डेकर

आज सर्व क्षेत्रात आरक्षण आहे, परंतु राजकारणात आरक्षण नाही.
त्यासाठी कायदा करुन विधानसभा व लोकसभेत ५०% आरक्षण हवे. अर्थात यासाठी ५% राजकारण्यांचे देखील एकमत होणार नाही, आज आपापल्या जातीच्या आरक्षणासाठी भांडणारे सार्वमताने विरोध करतील.
खरेतर जन्मापासुन, शाळाप्रवेश व नोकरीपर्यंत सगळ्या अर्जातील जात व धर्म हा कॉलमच कायमचा पुसुन टाकला पाहीजे तर काही वर्षांनंतर कदाचित प्रश्न सुटु शकेल.

योगप्रभू's picture

10 Jul 2012 - 5:08 pm | योगप्रभू

जात ही सहजासहजी जाणार नाही. उगाच व्यर्थ चीडचीड करुन काय उपयोग?

शिल्पा ब's picture

11 Jul 2012 - 1:23 pm | शिल्पा ब

आताच सत्यमेव जयते चा भाग पाहीला. भयानक!!!
आताच्या जगात लोकांना असं जगायला लावणारे लोक आहेत हे पाहुन प्रचंड धक्का बसला. महाराष्ट्रात असं कुठे पाहीलं नाही...असेलंही कदाचित.

मैला प्रथा पाहुन, ऐकुन तर शिसारी आली. लोकं इतरांशी असं वागुच कसं शकतात?
साधे झाडु कामगार आहेत त्यांनासुद्धा हातानेच काम करावं लागतं... ग्लव्ह्ज नाहीत. :(

मी स्वतः गावी असताना महारवाड्यात राहणार्‍या मैत्रीणींच्या घरी जेवलेय...कालेजात वडारी इ.इ. समाजाच्या मित्र मैत्रीणींच्या घरी गेलेले आहे....ते माझ्या घरी येउन खाउन गेलेत. आम्हाला तर काहीच फरक नाही जाणवला..इतरांना काय जाणवतं असावं?

केवळ जात, रंग वेगळा म्हणुन अमानवीय वागणुक देणार्‍या लोकांचा संताप येतो.

अगदी.
मीही अनेक मैत्रिणींच्या घरी जेवलीये, त्याही जेवायला यायच्या पण असलं काही मनात आलं नव्हतं.............नंतर एका मैत्रिणीच्या काकूने सगळ्यांदेखत पूर्वी ब्राह्मणांनी कसे आम्हाला कमी लेखले, आता मी तरी मी तुला जेवायला वाढतिये असे सांगेपर्यंत. सतरा वर्षांचे वय असल्याने पोटात भूक पेटली होती, तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आधी जेवून घेतले म्हणून त्या काकूला आणखी राग आला. निर्लज्जपणे त्या मैत्रिणीकडे जातच राहिले. ;) मला काय करायचे आहे त्या म्हातार्‍या काकूशी? जर राग येतोच आहे एवढा तर त्याच जातीच्या आधारावर अमूक एका पक्षाचे कार्य काकांना करायला लावून दोनेक एजन्स्या कश्याला पदरात पाडून घेतल्या? जाऊ दे मेलं, ज्याचं त्याच्यापाशी.

पैसा's picture

12 Jul 2012 - 12:07 am | पैसा

संतुलित लेख आणि उत्तम चर्चा. या लेखाचा पुढचा भाग म्हणजे "आरक्षण धोरणात सुधारणा आणि आर्थिक निकषांवर शिक्षणात आरक्षण" याबद्दल चिन्मय साहेबांकडून लेख कधी येतो याच्या प्रतीक्षेत.

नगरीनिरंजन's picture

13 Jul 2012 - 3:07 pm | नगरीनिरंजन

आडनावाचा अभिमान तथाकथित उच्चवर्णीयांना जास्त असतो आणि त्यामुळे ते विचारणार्‍यात तथाकथित उच्चवर्णीयांचे प्रमाण जास्त आहे.
तथाकथित उच्चवर्णीयांचा स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयी, क्षमतेविषयी एक गैरसमज असतो. जरी तो पूर्णपणे निराधार असला तरी समाजात सतत असे बोलून, दाखवून त्याचा इतर लोकांवर विपरीत परिणाम होतो आणि त्याचे पर्यावसान एकूणच कार्यक्षमतेवर आणि आर्थिक प्रगतीवर होते.
नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ श्री. जोसेफ स्टिगलिट्झ यांच्या We Have Been Brainwashed या लेखातला हा उतारा उद्बोधक ठरावा.

Even perceptions of race, caste, and gender identities can have significant effects on productivity. In a brilliant set of experiments in India, low- and high-caste children were asked to solve puzzles, with monetary rewards for success. When they were asked to do so anonymously, there was no caste difference in performance. But when the low caste and high caste were in a mixed group where the low-caste individuals were known to be low caste (they knew it, and they knew that others knew it), low-caste performance was much lower than that of the high caste. The experiment highlighted the importance of social perceptions: low-caste individuals somehow absorbed into their own reality the belief that lower-caste individuals were inferior—but only so in the presence of those who held that belief.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Jul 2012 - 8:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आडनावाचा अभिमान तथाकथित उच्चवर्णीयांना जास्त असतो आणि त्यामुळे ते विचारणार्‍यात तथाकथित उच्चवर्णीयांचे प्रमाण जास्त आहे.

हे कुणी सांगितले बुवा ??

चिगो's picture

13 Jul 2012 - 3:13 pm | चिगो

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.. मृत्युन्जय, इनिगोय, अर्धवटराव, सुहास, शिल्पातै, प्यारे, सुड, ममो, रेवतीआज्जी आणि इतरांनीही चर्चेत रंगत आणली आणि तिचा समतोलही राखला..

या लेखाचा पुढचा भाग म्हणजे "आरक्षण धोरणात सुधारणा आणि आर्थिक निकषांवर शिक्षणात आरक्षण" याबद्दल चिन्मय साहेबांकडून लेख कधी येतो याच्या प्रतीक्षेत.

"साहेब" म्हणून अपमान केल्याबद्दल ज्योतितैचा निषेध.. "आरक्षण धोरणात सुधारणा" ह्यावर माझे जे विचार आहेत, ते मी इथे मांडलेच आहेत. नागरी सेवांसाठी तयारी करतांना, माझ्या दलित मित्रांशी मी ह्यावर चर्चा करायचो. (त्यांच्याशी "वेगळे" म्हणून नाही, तर अश्या धोरणांचा प्रभाव त्यांच्यावरच सगळ्यात जास्त पडेल म्हणून..) बर्‍याचदा ते "क्रिमीलेयर" च्या मुद्द्याशी सहमत दिसले. माझं म्हणणं हे, की जर एकदम झटका देणे राजकारण्यांना शक्य नसेल तर कमीत कमी टप्प्याटप्प्याने ह्याकडे जावं लागेल.. पण जावेच..

"आर्थिक निकषांवर शिक्षणात आरक्षण" ह्याबाबतीत सरकारने "शिक्षणाचा अधिकार" ह्याअंतर्गत पावलं उचलली आहेत. भारतीय संविधानाच्या कलम २१अ अंतर्गत "वयाच्या १४व्या वर्षापर्यंत शिक्षण" हा आता मुलभूत अधिकार आहे. त्यानुसार, आता प्रायव्हेट शाळांना त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीतील "आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या" मुलांसाठी २५% जागा ठेवाव्या लागतील. ह्यांचा खर्च सरकार त्या शाळांना देईल.. अधिक माहिती इथे वाचा..

पुन्हा, सगळ्यांचे धन्यवाद..