पाचूचे बेट - २

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
9 Mar 2012 - 4:11 pm

२६-४-२०११.
चार लेनचा मध्ये विभाजक असलेला रस्ता प्रशस्त म्हणता येणार एवढा नसला तरी बर्‍यापैकी रुंद होता. पण जेमतेम चारपाच कि.मी. पर्यंत. पुढे मात्र तो आटला. कापड लांबीच्या दिशेत आटते. हा रस्ता रुंदीला आटला होता. दोन लेनचा समोरासमोरून जेमतेम दोन ट्रक जाऊ शकतील असा रस्ता. हाच कँडीला जाणारा हायवे. पण निसर्गसौंदर्य अप्रतिम. तरी परदेशात आहोत असे वाटले नाही. केरळमधल्या गावात असल्यासारखे वाटले. रस्त्यावरच्या, दुकानावरच्या, बसवरच्या पाट्या आंडूगुंडू. पण बर्‍याच ठिकाणी इंग्रजी देखील. मोटारगाड्या जुन्यापुराण्या नसल्या तरी यथातथाच. बहुतेक बसेस खटारा. अविकसित देशाच्या खुणा जाणवू लागल्या. अचानक कालचक्र पंधरा वर्षे मागे सरकल्यासारखे वाटले. आमच्या गप्पा, मजामस्ती चालूच. कमालला कळावे म्हणून आम्ही शक्यतो साहेबाच्या भाषेचा आधार घेतला होता. खाजगी बोलायचे असले तर मराठी.

श्रीलंकेत जायचे तर गिरीस्थानीच राहायचे. म्हणजे हवामान बरे मिळते. श्रीलंकेत अन्यत्र कुठेही मैदानी प्रदेशात गेले तरी प्रचंड उकडते अशी खाजामने माहिती दिली होतीच.

दीडदोन तास गाडी चालल्यावर खाजामला अचानक जाणवले की कमाल सकाळपासून जेवलेला नाही. त्याने इंग्रजीत कमालला सांगितले की एखाद्या हॉटेलाकडे गाडी थांबव आणि जेवून घे. अखेर एके ठिकाणी थांबलो. इराण्याच्या हॉटेलसारखे सेमी-बकाल हॉटेल. ड्रायव्हरने त्याच्यासाठी चिकन रस्सा आणि भात मागवला. मी आणि जाड्याने त्याच्या टेबलावर जाऊन अन्न कसे काय आहे ते पाहिले आणि चवीला कसे असावे याबद्दल तर्क केले. दिसायला तरी तो केरळातला बुटका उकडा तांदूळ आणि केरळसारखाच खोबरेलातला मसालेदार रस्सा असावा असे मला वाटले.

मी बनमस्का आणि मफीन्स खाणार म्हणून जाहीर केले. दोन्ही बरे होते. बाकी बहुतेक पदार्थ बनवून ठेवलेले होते. थंडच असावेत. चहा मात्र मिल्क टी म्हटल्यावर आपल्यासारखाच नुकताच ताजा बनवलेला, दूध घातलेला आणि गरमागरम मिळाला. ताजेतवाने झालो. निघालो. हमरस्त्याला लागून अनेक ठिकाणी फळांचे स्टॉल दिसले. फळे ताजी, रसरशीत आणि आपल्याकडच्या मानाने थोडी मोठी दिसत होती. एके ठिकाणी फलाहार करायला थांबलो. जाड्याने काहीच खाले नव्हते. संध्याकाळचे पाच वाजायला आले होते. रामफळाएवढे सिताफळासारखे फळ दिसले. रंग सिताफळाचा पण सालीवरच्या प्रत्येक उंचवट्यावर अननसाच्या प्रत्येक उंचवट्यावर असते तशी टोकदार शेंडी. मी एक निवडले. कमाल ते विकणार्‍या बाईबरोबर घासाघीस करायला लागला तेव्हा मी तिला पाहिले. ख्रिस्ती गोवेकरीण म्हणून खपून जाईल अशी चाळिशीची स्कर्टब्लाऊज घातलेली प्रौढा. तोपर्यंत कमालने तिच्याशी शहाळ्यांचा भाव पक्का करून एक सोलून जाड्यासमोर धरले पण. ओंजळभर आकाराचे किंवा सोललेल्या नारळाएवढे ते सिताफळ मी फोडले तर आतून रसाचे थेंब पडले. किंचित कच्चे असल्यामुळे जरा जास्त जोर लावावा लागला. पण त्यातून संत्र्यामोसंब्यात असतो तसा रस येत होता. चवीला थोडेसे आंबट पण अतिशय स्वादिष्ट. श्रीलंका के सिताफळ दा जबाब नही.

आमचे इंग्रजी बोलणे ऐकून ती बोलकी महिला आमच्याशी इंग्रजीत बोलायला लागली. ती दुबईत घरकामाला होती. दहापंधरा वर्षे घरकाम करून आता ती घराकडे, मुलाबाळांकडे लक्ष द्यायला घरी आली होती. इतर गप्पाटप्पात त्या सिताफळाचे नाव विचारायला विसरलो आणि हात रसमय झाल्यामुळे फळांचे प्रकाशचित्र काढायचे राहून गेले.

श्रीलंकेतले लोक गरीब असले तरी हसतमुख आणि अगत्यशील आणि शांतिप्रिय आहेत. इथली भाषा दाक्षिणात्य भाषांसारखी अगम्य असली तरी तशी खडखडाटी नाही. नादमधुर आहे. कमालही तस्साच हसतमुख. इंग्रजीत माहिती पुरवून खाजाम मराठीतून म्हणाला, "पण अख्ख्या श्रीलंकेत एकच माणूस जरूर पडली तर आक्रमक होतो आणि भांडायलाच काय मारामारी करायला पण तयार असतो. तो म्हणजे कमाल."

शहाळी चाळीस रुपयांना एक आणि ते सिताफळ अठरा रुपयांना पडले. अर्थात श्रीलंकन रुपये. आपल्याकडले सरासरी सुमारे चाळीस पैसे म्हणजे तेव्हा - गेल्यावर्षी एक श्रीलंकन रुपया. डॉलर श्रीलंकन रुपये वरखाली होईल तसा दर वरखाली होतो.

अखेर घाट चढून कँडीला आलो. हॉटेलकडे जातांना एक सुरेख तलाव लागला. शहरात तलाव असला तर शहराला वेगळेच सौंदर्य लाभते, एक वेगळीच ऐट लाभते असे माझे मत आहे. मग तो तलाव त्या शहराचा केवळ एक भौगोलिक वैशिष्ट्य बनत नाही तर शहराच्या संस्कृतीचा एक भागच बनून जातो. शहरातील बहुतेकांच्या भावजीवनात तो तलाव आणि तलावाभोवतालचा रम्य परिसर महत्त्वाची भर टाकतो. अशा शहरांच्या प्रेमातच पडावे. सावंतवाडी, कोडाईकनाल ही शहरे देखील मला म्हणूनच आवडली. कँडीच्या या तलावात तर एक कारंजे पण होते. थुईथुई असा आवाज मात्र कुठून येत नव्हता. तलावासमोरच झोकदार वळणे घेणार्‍या चढावाच्या रस्त्याने जाऊन एका हॉटेलाच्या पोर्चमध्ये थडकलो. दगडाच्या भिंतीची शैलीदार वास्तू डोंगरउतारावर दिमाखात उभी होती.

मागच्या बाजूच्या जोडइमारतीतल्या म्हणजे ऍनेक्समधल्या तिसर्‍या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या तीन खोल्या दाखव असे खाजामने कमालला सांगितले. कमाल काउंटरवरच्या माणसाशी गुडूगुडू बोलला. हॉटेलचा सेवक चाव्या घेऊन आला, बरोबर आम्ही तिघे आणि कमाल. दगडी जिना चढून वर गेलो. सिमेंटची चारसहा फूट रुंद पण देखणी पाऊलवाट. डाव्या बाजूला भिंतीच्या कुंपणाच्याआत आठदहा फुटांची बाग. बागेत मस्त झाडोरा. त्यापलीकडे डोंगरउतार आणि खाली चित्रवत वाटणारा, दृष्टी खिळवणारा, ऐटदार वळणे घेत गेलेला सुंदर रस्ता. उजव्या बाजूला इमारतीत तळमजल्याला देखणे जेवणघर. जेवणघराला बाहेरच्या बाजूला भिंत नाही. पदपथावरून समोर पोहायचा तलाव, डाव्या बाजूला झोपाळा, तलावापलीकडे कुंपणाची भिंत, भिंतीपलीकडे डोंगरउतारावरून दिसणारा शहराचा देखावा, देखाव्यात केंद्रस्थानी तरणतलाव. भान विसरून पाहात राहावे असे दृश्य. उजवे वळण घेऊन मागील इमारतीत गेलो. जुन्या पद्धतीचे उद्वाहन म्हणजे लिफ्ट. तिसर्‍या मजल्यावर आलो. खोली क्रमांक होते ९०४ वगैरे. तिसर्‍या मजल्यावर नऊशेने सुरू होणारे खोली क्रमांक. गंमतच वाटली. खोली उघडून दाखवली. वातानुकूलन यंत्र चालू केले, चोवीस तास गरम पाणी, टब, शॉवर, उत्कृष्ट स्वच्छता, कपड्यांचे कपाट, टॉवेल साबण वगैरे व्यवस्थित. टेबलावर विजेवरची किटली होती. डिप टीची, कॉफीची, दूधपावडरीची, साखरेची छोटीछोटी पाकिटे वगैरे सरंजाम होता.

समोरचा बंद दरवाजा सेवकाने उघडला आणि काय! खुल जा सिमसिम म्हटल्यावर अलीबाबाला अमाप संपत्ती दिसली होती. आमच्या बंद दरवाजापलीकडे सुंदर बाल्कनी होती. मी विस्मित होऊन पाहातच राहिलो. बाल्कनीतून आम्हाला तो पोहोण्याच्या तलावापलीकडचा तलावासह शहराचा अपूर्व असा विहंगम देखावा दिसत होता.

pic1

नागमोडी रस्ते, वरून दूरवरून खेळण्यातल्या वाटणार्‍या मोटारगाड्या, बसेस आणि नजरबंदी करणारे तलावातले कारंजे. खालच्या बाजूला उजवीकडे दाट झाडोर्‍यात जाऊन अदृश्य होणारी विविध आकाराच्या विविध रंगांच्या लाद्यांचे तुकडे बसवलेली झाडीत जाऊन गडप झालेली देखणी पाऊलवाट.

pic2

खोलीचे भाडे होते यूएस डॉलर्स १०८ प्रतिदिन. चहानाश्ता आणि दोन जेवणे अंतर्भूत. कमाल हा खाजामचा नेहमीचा माणूस. आम्ही आलो ती गाडी कमालची स्वतःची. शिवाय तो श्रीलंका सरकार प्रमाणित पर्यटन सेवक किंवा ट्रॅव्हल एजंट आहे. बहुतेक पर्यटन स्थळी असते तशी इथे देखील या सेवकांना हॉटेल्स दलाली देतात. त्यामुळे हे सेवक हॉटेल्सना चांगला धंदा आणून देतात. या सेवकांची इथे चांगलीच वट असते. शिवाय त्यांना इतर स्थानिक हॉटेलातले दरही ठाऊक असतात. म्हणून खाजामने कमाललाच त्यांच्या भाषेत घासाघीस करून जास्तीत जास्त सवलत = डिस्काऊंट मिळवायला सांगितले. सवलत वजा जाता आम्हाला नव्वद अमेरिकन डॉलर्स प्रति खोली पडले. चहानाश्ता आणि रात्रीचे भोजन. दुपारचे भोजन आम्ही जेवणाच्या वेळी जिथे असू तिथे घेणार होतो. खरे तर दुपारचे जेवण आम्ही टाळतोच. जोरदार न्याहारी केली की दुपारी हलका आहार. नुसती फळे खाल्ली तरी चालते.

थोडा वेळ विश्रांती गपाटप्पा करून ताजेतवाने झालो. आता बाहेर कुठे जायचे नसल्यामुळे कमाल थेट उद्या येणार होता. संध्याकाळी पाऊस नव्हता. हवेत गुलाबी गारवा. मस्त अंघोळ करून तासदीडतास पायी फिरलो. जाड्या आणि खाजाम एका खोलीत आणि मी आणि मास्तर अशी विभागणी झाली. जाड्याच्या खोलीतला आंघोळीचा टब सिमेंटमध्ये पांढर्‍या सॅनिटरी लाद्या बसवून केलेला होता. लाद्या ऍंटी स्किड नव्हत्या. जाड्याने अंघोळ करतांना लोटांगण घातले. त्याचा मेंदू दगडी आहे हे ठाऊक होते. पण हाडे पण दगडी निघाली आणि अजिबात मोडली नाहीत. असो.

बुटक्या तांदळाचा दोनतीन प्रकारचा भात, नूडल्स, उकडलेली अंडी, एकदोन प्रकारचे मटन/चिकन रस्से, एक माशांची आमटी, खेकड्यांची आमटी, वगैरे आशियाई, कॉन्टिनेंटल, अमेरिकन वगैरे मिळून चाळीसपन्नास पदार्थ होते. गोड पदार्थ आणखी पंचवीसेक. शाकाहारींसाठी इथे मसालेदार उकडलेली तूरडाळ होती. परंतु आमटी म्हणता येणार नाही एवढी, शिर्‍यासारखी घट्ट. बटाट्याच्या चकत्या पण होत्या. त्यामुळे माझ्यासारखा अट्टल शाकाहारी उपासमारीने दगावला नाही. माफक खाऊन मग गोड पदार्थांवर ताव मारला. दोनतीन प्रकारची फ्रूट सॅलड्स, कस्टर्ड, पुडिंग, पेस्ट्रीज वगैरे गोड पदार्थ पण पंधरावीस होते. प्रसन्न करणारे वातावरण, सुंदर डायनिंग हॉल, तेवढेच देखणे आणि स्वादिष्ट जेवण जेवून तृप्त झालो आणि एका गॅलरीत खुर्च्या टाकून समोरचे विहंगम दृश्य पाहात गप्पा मारत बसलो. उद्या कुठे फिरायचे यावर चर्चा केली. श्रीलंकेत गिरीस्थाने सोडली तर सगळीकडे प्रचंड उकडते. त्यामुळे सिग्रिया रद्द केले. सगळे सागरकिनारे वगळले. ऐतिहासिक राजधानी अनुराधापूर गाळले. राहाता राहिले रंबुडा फॉल्स, नुवारा एलिया - श्रीलंकेतले सर्वात उंच शिखर, डेव्हन फॉल्स, हटन, आणि परतीच्या प्रवासात कोलंबो. गप्पा करता करता पेंगुळलो आणि मग झोपी गेलो.

क्रमशः

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

इरसाल's picture

9 Mar 2012 - 5:02 pm | इरसाल

सुंदर.......
पण मला फोटो दिसत नाही आहेत. (मे बी गणेशा-मुद्रा )

सुकामेवा's picture

9 Mar 2012 - 6:05 pm | सुकामेवा

पुढचे भाग लवकर टाका

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2012 - 6:47 pm | सुधीर कांदळकर

चढवता येत नाहीत. तशी खास नाहीत. पण चढवता आली नाहीत हे खरे.

पैसा's picture

9 Mar 2012 - 11:05 pm | पैसा

हा पण भाग आवडला.

फोटो कसे चिकटवावेत यासाठी ही मदत घ्या. http://www.misalpav.com/node/13573

मोदक's picture

10 Mar 2012 - 6:05 am | मोदक

वाचतोय.. :-)

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2012 - 6:33 am | सुधीर कांदळकर

धन्यवाद. प्रकाशचित्रे दृश्यमय करणारा/रीस एक जाधा धन्यवाद. बहुधा पुढील भागात प्रकाशचित्रे चढवायला जमेल.

हॉटेलकडे जातांना एक सुरेख तलाव लागला. शहरात तलाव असला तर शहराला वेगळेच सौंदर्य लाभते, एक वेगळीच ऐट लाभते असे माझे मत आहे. मग तो तलाव त्या शहराचा केवळ एक भौगोलिक वैशिष्ट्य बनत नाही तर शहराच्या संस्कृतीचा एक भागच बनून जातो. शहरातील बहुतेकांच्या भावजीवनात तो तलाव आणि तलावाभोवतालचा रम्य परिसर महत्त्वाची भर टाकतो. अशा शहरांच्या प्रेमातच पडावे

हे वाचताना मलाही सावंतवाडी आठवली, पाहिले तर तुम्हीही पुढल्याच वाज्यात वाडीचा उल्लेख केलाय! :) हा भागही सुरेख.

यशोधरा's picture

1 Dec 2018 - 8:37 pm | यशोधरा

वाक्यात*