पाचूचे बेट -३

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
13 Apr 2012 - 7:24 pm

२७-०४-२०११
आज प्रभातफेरीनंतर न्याहारी, नंतर गाडीने निघून लाकडी सामानाचा कारखाना पाहाणे, मग हिर्‍यांचा कारखाना पाहाणे, मग शहरात फेरफटका, सायबर कॅफेला भेट, दुपारी फळे घेऊन खोलीवर यायचे, फलाहार करून वामकुक्षी आणि संध्याकाळी आजूबाजूला एक पायी फेरफटका मारून भोजन, मग गप्पा असा निवांत कार्यक्रम होता.

खाजाम आणि जाड्या नियमितपणे व्यायामशाळेत विविध यंत्रांवर जोरदार व्यायाम करणारे. सौ. खाजाम तर आमच्याशी बोलतांना खाजामचा उल्लेख ‘पैलवान’ असाच करते. शेवडेही माफक प्रमाणात पण नियमितपणे यंत्रांवर व्यायाम करतो. प्रभातफेरी करतांना वाटेत एक व्यायामशाळा लागली. परततांना तिघेही व्यायामशाळेत घुसले. मी हॉटेलवर परत आलो. मी घरातच यंत्राशिवाय भारतीय पद्धतीने थोडेसे हातपाय झाडतो. तसे ते झाडले. शुचिर्भूत होऊन तयार झालो. टेबलावरचे साहित्य वापरून एक फक्कडसा चहा मारला. एक फेरफटका मारून यावे की काय याचा विचार करीत होतो. तेवढ्यात बाकीचे परतले. पटापट आवरून न्याहारी करून निघालो.

एक नजर आभाळावर ठेवूनच पदभ्रमण केले. केव्हाही पाऊस पडेल असे वाटत होते. पण पावसाने मेहेरबानी केली. कॅंडी हे फारच सुंदर असे गिरिस्थान - हिल स्टेशन - आहे. पाहावे तिथे, पाहावे तिथून विविध कोनातून निसर्गाचा मनोहर अविष्कार. निसर्गाने श्रीलंकेवर किती घेशिल दोन्ही करांनी असे विचारतच उधळण केलेली दिसते. प्रग्रा (प्रतिमाग्राहक - शब्दसौजन्य: श्री. विनायक रानडे) अर्थात कॅमेरा सरसावला आणि सटासट चुकलो, क्लिकाक्लीट चालवायला सुरुवात केली. फारसे तांत्रिक पर्याय नसलेला माझा प्राचीन वगैरे असा साधासा प्रग्रा स्वयंचलितावर म्हणजे ऑटोवर टाकला. त्यामुळे माझी सुमार दर्जाची प्रकाशचित्रण कला प्रकाशचित्रे फारशी बिघडवू शकली नाही.

ऐटबाज वळणे घेत उतरणारा देखणा घाटवजा रस्ता उतरतांनाच पहिले ठिकाण आले. लाकडी कलावस्तूंचा कारखाना. रस्त्याकडेला डोंगरउतारावरच हिरव्या छपरांच्या शेडमध्ये एक अरुंद पण देखणा जिना उतरत गेलेला. या जिन्याचे छप्पर बघितल्यावर माझ्या मनात आले की आपल्याकडे रेलवे स्टेशनांचे छप्पर अगदी याच पद्धतीने बांधलेले असते. पण हाय रे दुर्दैवा. भारतीय रेलवेला सौंदर्याचे वावडे असावे. मला तर वाटते की अशी साधी उभारणी चुकून देखणी झाली तर भारतीय रेलवेच्या स्थापत्य अभियंत्यांना जबर शिक्षा वगैरे होत असावी. असो.

जिना उतरल्याबरोबर एका सुरेख लाकडी सुंदरीने हात जोडून स्वागत केले. आमच्या मित्ररत्नाने लगेच तिच्या गळ्यात हात टाकला आणि मी तत्परतेने अगोदरच सरसावून ठेवलेल्या प्रग्रा यंत्रात तो क्षण पकडला. ते चित्र इथे टाकले तर तो माझा जीवच घेईल आणि ही धरा एका महान मानवाला मुकेल. म्हणून टाकत नाही.

प्रवेश करताच प्रथम कारखाना लागला. सुतारकामाचा साधासा कारखाना. दरिद्री दिसणारे कळकट कपड्यातले कसबी कामगार वस्तू बनवीत होते. गरीब मध्यमवयीन कामगार. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरची रया गेलेली. दाढीचे काळेपांढरे खुंट वाढलेले. एकही कामगार तरूण नव्हता. उत्साही, स्वप्ने पाहणारे एकदोन तरी खोडकर, तरूण चेहरे असते तरी याच चेहर्‍यांवरचे सार्थकतेचे भाव नजरेला आले असते. उगीचच मला मी मुंबईत नोकरी करीत असे तिथल्या कामगारांचा जिवंतपण आठवला. अभ्यागताकडे हसून पाहून मान झुकवून पुन्हा कामात गर्क होणे, सतत कामात बुडून जाणे नाहीतर कामात गर्क असलेल्यांच्या खोड्या काढणे. काहींची तर सतत टकळी चालू असे. अधूनमधून वात्रट शेरेबाजीमागोमागचे हास्याचे फवारे. कौशल्याची कामे अचूक आणि वेगाने करतांना देखील त्यांना बडबड करणे कसे जमे कोण जाणे. निवडणुकीचे वातावरण असले तर विचारूच नका. असो. इथले कामगार वस्तू बनवीत होते. मुंबईकडची कामाची घाईगर्दी, लगबग, चटपटीतपणा, काळे ग्रीजचे डाग पडलेले पण टापटिपीचे गणवेश किंवा विविध डाग पडलेले, कुठेतरी फाटलेले पण भडक रंगाचे नखरेल कपडे, कुठेच नाही. त्यांचे कसब, चपळाई, हुन्नर त्यांच्या इतर हालचालीत दिसत नव्हते. अर्थात त्यामुळे मन जे उगीचच आतल्या आत उड्या मारीत होते ते उड्या मारायचे कमी झाले नाहीच. एकदोन प्रकाशचित्रे घेतली.


वैशिष्ट्यपूर्ण खुर्ची

विक्रीसाठी वस्तू मांडून ठेवलेल्या दालनात म्हणजे शोरूममध्ये आलो. दालन आकर्षक वस्तूंनी खच्चून भरलेले होते. वस्तू आकर्षक आणि कलाकुसरीच्या असल्या तरी मांडणी मुळीच देखणी वा आकर्षक नव्हती. अक्षरशः मालाचे गुदामच होते ते. माझ्या भोचक मालवणी नजरेला खुपले ते. कारखान्याची जागा तशी प्रशस्तच होती. तरी सुंदर हत्ती आणि इतर कलावस्तू कुठेतरी फरशीवर कशातरी ठेवलेल्या होत्या. एवढ्या मोहक, देखण्या वस्तू अशा कशातरी, कुठेतरी निष्काळजीपणे विखरून टाकतात तरी कशा कोण जाणे. बघूनच जिवावर आले. मांडणी देखणी करायला पैसे पडत नाहीत. फक्त कलासक्त दृष्टी लागते. मनातल्या मनात आपल्याकडच्या मालाची आकर्षक मांडनी करणार्‍या गुजराती दुकानदारांना सलाम केला. इथला मालक पक्का व्यापारी असावा.

लाकडी वस्तूंच्या कारखान्याचे मालक लाकडी हत्तीसमवेत.

या कारखान्यात एक खास वस्तू होती. एका फूटभर लांबीच्या दोनअडीच इंच व्यासाच्या लाकडी पाईपाच्या एका टोकाला एक पातळ, लवचिक पण चिवट असा गोल पडदा पक्का बसवला होता. या पडद्याच्या मध्यावर पाव इंच व्यासाची दोनएक फूट लांब स्प्रिंग भक्कमपणे बसवलेली होती. ही स्प्रिंग विविध प्रकारे ताणून त्या स्प्रिंगवर वेगवेगळ्या पद्धतीने आघात करून विजेच्या कडकडाटापासून वासुदेवाच्या छोट्या डमरूपर्यंतचे इतक्या विविध प्रकारचे ध्वनि तेथील विक्रेत्याने काढून दाखवले की आश्चर्याने (स्वतःच्याच) तोंडात बोटे घालावीत. ढोल आणि गिटार यांचे आवाज पण या एकाच वस्तूतून. एखाद्या चित्रपटाला स्पेशल सांऊंड इफेक्टस अगदी या एकाच वस्तूतून देता यावेत. मी तर या खेळण्याच्या मोहात पडलो. साध्याच मालापासून किती कल्पक वस्तू बनवली होती. किंमत विचारली. तीन हजार रुपये. म्हणजे आपले बाराशे रुपये. लंकेतली आठवण म्हणून मी घेणारच होतो. पण जाड्या म्हणाला अरे तुझ्या घरासाठी त्या वस्तूचा उपयोग शून्य. म्हणून घरी पोहोचल्यावर शालजोडीतले मिळतील. त्यातून ती वस्तू कपड्यांच्या पिशवीत मोडली अगर निकामी झाली तर विचारू नका. असा माझ्याच कुटुंबाचा बागुलबोवा त्याने मलाच दाखवला. त्याहीपेक्षा मोठा धोका होता तो हे तीन चांडाळ आम्ही परत पोहोचेपर्यंत मी कसा मूर्ख आहे हे मला ऐकवत राहतील आणि माझी मोरू म्हणून तिखटमीठ लावून टवाळी करतील त्याचा. शेवटी मी ती वस्तू घेतली नाहीच हे सूज्ञांच्या ध्यानात आले असेलच.

हिर्‍यांचा कारखाना जसा असावा तसा होता. कारखान्यात आमच्यासाठी आकर्षक असे काहीच नव्हते. विक्री दालन मात्र झकपक आणि देखणे होते. +, *, वगैरे विविध आकारात चमकणारे वेगवेगळ्या रंगांचे बटणासारखे आकर्षक खडे मी तरी प्रथमच पाहिले. पण स्त्रियांसाठी कितीही आकर्षक असले तरी माझे कुतूहल चाळवण्यापलीकडे आम्हाला त्यात काही वाटले नाही. चतुर विक्रेत्यांनी खड्यांची नवग्रहांशी सांगड चलाखीने घातलेली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए. इथल्या सुहास्यवदना विक्रेतीने पण ते खडे घातले तर कसा फायदा होतो ते आम्हाला टोपीकराच्या भाषेतून समजावले. पण आम्ही काही बधलो नाही. खरे तर खड्यांपेक्षा ती शेलाटी, कमनीय विक्रेती आणि तिच्या विलोभनीय मुखचंद्रावरचे विभ्रमच जास्त आकर्षक आणि बघणीय होते.

नंतर सायबर कॅफेत एकदोनतास गेले. थोडेसे पायी देखील फिरलो. काळसर ढगांतून फिकट ऊन झिरपत होते. उकडत होतेच. एका खेळण्याच्या दुकानात गेलो. जाड्याने एका छोट्या मैत्रिणीसाठी बाहुली घेतली. मला एक प्लॅस्टीकचा भोवरा दिसला. फिरवल्यावर आतले एलईडीचे दिवे चमकणारा. चिनी बनावटीचा होता. घेतला. किंमत ८५ रुपये. आपल्या चौतीस रुपयांना काही वाईट नाही. आपल्याकडे ५० रुपयांना रस्त्यावर फेरीवाल्यांकडे पण मिळतो. घरी येणार्‍या एका छोट्या मित्राला द्यायला घेतला.

नंतर कँडी शहरात थोडी पायी भटकंती केली.


कॅंडीच्या बाजारात धान्य वगैरेंच्या दुकानात इतर सामानाबरोबर सुके मासे वजनावर मिळतात.


सेनानायके चिल्ड्रन्स लायब्ररीच्या कुंपणाच्या भिंतीतले सुरेख अर्धस्तंभ - पिलॅस्टर.

बाजारात जाऊन काही फळे विकत घेतली. मॉलमध्ये आणि सुपर शॉपीमध्ये मध आणि दही घेतले. इथे दह्याचे अर्धा किलो, एक किलो, दीड किलोचे मडके मिळते. त्यावर उत्पादन दिनांक असतो. फळे, मडक्यातले दही आणि मध हे मिश्रण हा एक अप्रतिम आणि चविष्ट आहार आहे. त्यातून तिथली अननसे तर फारच रसाळ आणि स्वादिष्ट असतात. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली नव्हेत बरे का.

थोडी विश्रांती घेऊन त्यांच्या पारंपरिक नृत्याच्या कार्यक्रमाला गेलो. एकच सरसकट दर. तिकीट दर फारसे महाग नव्हते. गेल्याबरोबर हातात पुढच्या नृत्यांची ओळख करून देणारी इंग्रजी पत्रके मिळाली. पण इंग्रजी लिपीतले इंग्रजी समजून घेतलेले पत्रक भलत्याच भाषेतले निघाले. मग दुसरे घेतले. पत्रके जर्मन आणि डच भाषेत पण उपलब्ध होती. नृत्याला सिंहली भाषेत बहुधा नतुमा असे म्हणतात. साडेसहाच्या कार्यक्रमाला सहाच्या दरम्यान पोहोचलो. त्यामुळे जागा चांगली पटकावता आली. ‘पुणे टाईम’ नाही तर ‘मुंबई टाईम’ ठीक साडेसहाला सुरुवात दिवे घेतलेल्या स्त्रियांच्या देखण्या ‘पूजा नतुमा’ या देखण्या नृत्याने झाली. प्रत्येक प्रकार दहावीस मिनिटे चालला. त्यामुळे कंटाळा आला नाही.


पूजा नतुमा

दुसर्‍या एका नृत्यात त्रिशूळासारख्या उभ्या पण पंचशूळी, सप्तशूळी लाकडी काठीवर तबकडीच्या आकाराच्या पाचसात टोपल्या विष्णूच्या सुदर्शनचक्रासारख्या आडव्या फिरवणारे पुरुष कलाकार होते.


फिरत्या तबकड्या

आणखी एका नृत्यात प्रचंड वेगाने एकापाठोपाठ एक अशा सलग पाचदहा कोलांट्या उड्या पुढील तसेच मागील दिशेने वेगाने मारणारे कलाकारही होते.


कोलांट्या उड्या

आपल्याकडील ‘अजून एनर्जी पाहिजे’ म्हणून नवीन पिढीच्या नर्तकांना सतत सल्ला देणार्‍या ‘महागुरूं’ची आठवण झाली. या कसरतपटूंनी चुकलो, नर्तकांनी शंभर सव्वाशे टक्के गुण मिळवले असते.

सुपे हातात घेऊन केलेले सुगीचे लोकनृत्यही होते.


सुगीचे नृत्य

भरतनाट्यम, कथ्थकली, मणिपुरी इ. भारतीय नृत्यशैलीचा भरपूर प्रभाव जाणवला. जोडीला मृदंगासारखे तालवाद्य. वादन अत्यंत जोरदार आणि द्रुत लयीतले. वादनात मॉड्यूलेशन, कलात्मकता, लयीशी खेळणे अजिबात नाही. बोलांची विविधता माफक प्रमाणात होती. पण सम स्पष्टपणे दाखवणारे रेखीव ताल. बहुतेक वेळा ‘सम’ आणि ‘खाली’ ‘तुम्म’ या अक्षराने दिसत होती. पण वादनात, नृत्यात सूक्ष्म कलात्मकतेचा अभाव. सुगीचे नृत्य मात्र कलात्मक आणि उत्कृष्ट होते. आसामकडील वगैरे वाटले. सुपेही नाजुक बनावटीची, कलात्मक चित्रांनी नटलेली होती. इतर नृत्यातले पुरुष नर्तकांचे नृत्य काहीसे कसरतीकडे झुकणारे त्यामुळे किंचित भडक वाटणारे. कलात्मकतेचा अभाव चित्तवेधकतेने भरून काढला होता. वेषभूषेवर ईशान्य भारताचा बराचसा प्रभाव आढळला. अशा रीतीने एकाच वेळी भडक रंगातली चित्तवेधक वेषभूषा, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, जादूचे प्रयोग, डोंबार्‍याचा खेळ, जिमनॅस्टीक्स यांची चित्तवेधक सरमिसळ नृत्य नावाच्या प्रकारात पॅकेज करून रंगमंचावर सादर केली होती. काहीही असले तरी नाविन्यपूर्ण आणि चित्तवेधक असलेल्या नृत्यामुळे आठसाडेआठपर्यंत वेळ बरा गेला.

परत हॉटेलवर गेल्यावर ताजेतवाने होऊन भोजनाला गेलो. कालपासून पाहात होतो पण आता एक लक्षात आले. आमच्या हॉटेलातले आणि रेस्तोरॉतले वेटर्स सारे पुरुष. श्यामलवर्णीय, नम्र, मृदुभाषी आणि सुहास्यवदन पुरुष वेटर्सचा गणवेष अस्सल श्रीलंकन आणि आकर्षक होता. केशरी लुंगी आणि पांढरा सदरा किंवा कुडता. बहुतेक जण अनवाणी. त्यांची प्रकाशचित्रे काढायची राहून गेली. नंतर देखील सगळीकडे पुरुष वेटर्सच आढळले. वेट्रेसेस किंवा हाऊसकीपिंग करणार्‍या मुली नंतर देखील कुठे दिसल्याच नाहीत. सगळा सेवकवर्ग पुरूषच. असो. काळे सूट घातलेल्या चार गायकांचा समूह भोजनालयात गात फिरत होता. तिघांच्या हातात गिटार, एकाच्या गळ्यात बॉंगोसदृश तालवाद्य. चौघेही रंगून तालासुरात इंग्रजी गाणी गात होते. सत्तर ऐशीच्या दशकातले कंट्री म्यूझिक. आवाजही चांगले होते. एकेकाकडे जाऊन एकेक गाणे म्हणून पुढच्या गाण्याची फर्माईश विचारीत होते. फर्माईश केलेले गाणे म्हटल्यावर काही दिले तर घेत होते. नाही दिले तरी गाणे ऐकल्याबद्दल दुवा देऊन जात होते. त्यांच्या अंगावरचे कोटही तसे जुनेपुराणेच होते. कर्क डग्लसचे ‘एव्हरीबडी कुंग फू फायटिंग’ म्हटले व पुढची फर्माईश विचारली. मी ‘हॉटेल कॅलीफोर्निया’ ची फर्माईश केली. मस्त म्हटले. भारतीय चलन चालेल का विचारले. चालेल म्हणाले. मी शंभर भारतीय रुपये दिले. खाजामनेही तीनसाडेतीनशे श्रीलंकेचे रुपये दिले. पुढच्या टेबलावर जाऊन ‘आय ऍम अ रॅन्सम कॉऊबॉय’ चालू केले. मन एकदम चाळीस वर्षे मागे गेले. मला सत्तर सालचा ग्लेन कॅम्पबेलचा तो रांगडा, जाडाभरडा पण सुरेल, वजनदार आवाज आठवला. यांचे आवाज वेगळे होते आणि एका वेळी सगळे तल्लीन होऊन तालासुरात गात होते. पण संध्याकाळ्चे जेवण अविस्मरणीय करून गेले. ते मंतरलेले, जादूभरे क्षण अजूनही मनांत ताजेतवाने आहेत.


हॉटेलमधले गायक

खोलीवर परतून आठवणी जागवीतच झोपी गेलो.

क्रमशः
प्रकाशचित्रे काही तांत्रिक कारणाने दिसत नाहीत. क्षमस्व

प्रतिक्रिया

आवडलं. आधिचे भाग माहीत नाहीत म्हणुन त्यांच्या लिंका प्रत्येक भागात देत चला.

सुधीर कांदळकर's picture

14 Apr 2012 - 6:40 am | सुधीर कांदळकर

पाचूचे बेट - १

पाचूचे बेट - २

सुधीर कांदळकर's picture

14 Apr 2012 - 6:42 am | सुधीर कांदळकर

पाचूचे बेट - १ http://misalpav.com/node/20963

पाचूचे बेट - २ http://misalpav.com/node/20964

सर्वसाक्षी's picture

14 Apr 2012 - 9:06 am | सर्वसाक्षी

झकास सफर..
चांगले वर्णन. चित्रे अधिक असती तर आणखी आवडले असते.

मुक्त विहारि's picture

14 Apr 2012 - 2:22 pm | मुक्त विहारि

आधीचे भाग पण वाचले...

प्रतिसाद सगळ्यात शेवटचा भाग आला की देईन....

यशोधरा's picture

1 Dec 2018 - 8:46 pm | यशोधरा

मस्त झालाय हा पण भाग!