पाचूचे बेट - १

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
9 Mar 2012 - 4:01 pm

दि. १७ एप्रिल, २०११. जवळजवळ एक वर्ष झाले. शेवडे मास्तरांकडे जाऊन आलो, जेवलो आणि मस्त झोप काढली. उठून चहा वगैरे घेतला आणि इडियट बॉक्स बघत बसलो. पुणे वॉरिअर्स वि. दिल्ली असा आय पी एल सामना चालू होता. कंटाळून चॅनल सर्फिंग करायला लागलो. सव्वासहा साडेसहाचा सुमार. भ्रमणध्वनी टाहो फोडू लागला. खरे तर माझे लक्षच नव्हते. मला वाटले आवाज चित्रवाणीतून म्हणजे टीव्हीतून येतोय. अर्धांगाने माझ्या पुढ्यात उभे राहून (स्वतःच्याच) कमरेवर हात ठेऊन डोळे वटारल्यावर कळले की माझाच भ्रध्व केकाटतोय. पाहातो तर शेवडे मास्तर. फोन उचलून खोलीत पळालो.

"खाजामचा मेल आलाय. तुला फॉरवर्ड केला आहे. श्रीलंकेला येतो काय म्हणून विचारतो आहे. येणार का तू?"

शेवडे हा सद्गृहस्थ प्राचीन काळी भारत सुंदरीच्या म्हणजे मिस इंडियाच्या नवर्‍याच्या मिलमध्ये अर्थात बॉंबे डाईंग मध्ये वस्त्र अभिअयंता होता. तेथील कामगार बंधू याला मास्तर म्हणत. म्हणून हा मास्तर. गेली दोन वर्षे खाजामचे लंकालंका करून चालले होते. पण खाजाम पडला आंतर्राष्ट्रीय व्यापारी. ऐन वेळी त्याचे काही काम निघे आणि बेत बारगळे. असे दोनतीन वेळा झाले होते. श्रीलंकेला जायची खुमखुमी पण खाजामलाच होती. त्यामुळे त्याला न घेता जाण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नव्हते. आमच्या कंपूत तशी एकेकाला एकेक खुमखुमी येते. कोणाला काय वाटेल ते सांगता येणार नाही. सध्या शेवडेला हिमाचलला तसेच पोर्तुगालला जायची तर मला तंजावर कारने आणि ग्रीक बेटे सागरी मार्गाने बघायची खुमखुमी आहे. तंजावरचा तर आराखडा देखील जय्यत तयार होता. फक्त दिवस १, २, ३, ... रात्र १, २, ३, ... ऐवजी तारखा घालायच्या बाकी आहेत. शेवडे मी आणि जाड्या आम्ही तर काही तासांच्या सूचनेवर सहलीला निघण्यात पटाईत. मला तर आठवते की १९९७ मध्ये तर १५ ऑगस्टला मला सकाळी साडेनऊला जाड्याने सहलीसाठी विचारले आणि मी चिरंजीवांच्या शाळेतला झेंडावंदनाचा आणि बक्षिससमारंभाचा कार्यक्रम आटोपून आम्ही चक्क सकाळी साडेअकरा बाराला निघालो पण. असो.

"मी ९९ टक्के येणार पण उद्या सकाळी नक्की काय ते सांगतो." मी उत्तर दिले.

"अरे लौकर कळव. जेवढा उशीर करशील तेवढे तिकीट महाग पडेल." मास्तर.

"घरी बोलतो तर खरे. मी पण तिकिटाची चौकशी करतो. तू पण चौकशी कर. जिथे स्वस्त पडेल तिथे तिकीट घेऊ. तिकीट जितके स्वस्त पडेल तितकी जास्त मजा करता येईल. काही झाले तरी उद्या सकाळीच तुझ्याकडे येतो. दोघे एकत्र असलो तर निर्णय पट्कन घेता येईल. फोनाफोनीत वेळ जाणार नाही. तिकीट काढूनच टाकू. तू मोकळा आहेस का पण उद्या सकाळी?" मी.

"तू येणार असशील तर घरीच राहातो. जाड्याचे काय? तू पण त्याच्याशी बोल. बघतो, मग सांगतो वगैरे म्हणाला. फारसा उत्साह दाखवला नाही." मास्तर.

"बोलतो जाड्याशी. पण उद्या सकाळी नक्की येतो." मी.

"पासपोर्टची कॉपी घेऊन ये. तिकिटासाठी लागेल. तू तिकिटे काढलीस तर लागेल म्हणून माझा पासपोर्ट नंबर आता लगेच एस एम एस करतो."

"हो."

खरे म्हणजे या जाड्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरी अजून एकत्र येतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे या ओळी ज्याला सुचल्या असतील त्या याला पाहूनच सुचल्या याबद्दल आम्हाला तिळमात्रहि शंका नाही. अविवाहिततेचे अनंत फायदे पाहा. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफाट. हजरजबाबी तसाच. कोणाची फिरकी केव्हा कशी घेईल याचा कांही नेम नाही. याचे बरेच मोठे गुण आहेत. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. खाण्याबाबतीत एकेकाळी बकासूर देखील लाजला असता. आता जरा कमी झाले. बकासुराचे नाही काही, या महाशयांचे. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फार लोकप्रिय. फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर सौ. गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचे जिव्हानृत्य दूध्ववर चालू आहे. आमच्यातील एकाचे, किशोरचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा एकदा याचा फोन गेला. संक्रांतीचा दिवस होता. १९८२ च्या सुमाराची गोष्ट. "पुरणपोळ्या केल्या की नाहीत? खायला येतो." ती बावचळून म्हणाली "आता कुठे? होळीला करतात." हे महाशय म्हणाले "मागच्या होळीच्या दिवशी तर किशोर म्हणाला की संक्रांतीला करतात." बिचारा किशोर होळीच्या दिवशी दुपारीच जाड्याच्या हपिसात पुरणपोळ्यांचा डबा घेऊन हजर. तर असे हे आमचे जाडे मित्ररत्न. पार्ट्या व पिकनिक्स याचे हवन याच पठ्ठ्याने अविरत चालू ठेवले. वर्षाला दोनपांच पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. गेली पंधराएक वर्षे वर्षाला पाचसहा सहली असतात. हल्ली फोनाफोनीमुळे व मेलामेलीमुळे तसेच गुजगोष्टी म्हणजे चॅटमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गप्पा होतात. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या मोठ्ठ्या अशा तीनचार सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे अजूनहि वाटते एवढ्या ताज्या आहेत. लिप्टन चहाएवढ्या. चुकलो! आता दिलमाह चहा म्हणायला पाहिजे.

ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनी लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी ऑन लाईन तिकिटे काढली. आता विम्याची जबाबदारी माझ्याकडे आली. माझ्या सेवानिवृत्तीनंतरही नेहमीच्या गृहस्थांनी - रईसाहेबांनी - अगत्याने सेवा दिली. माझ्या मागे लागूनच दोघांचे सगळे तपशील फॅक्स करायला लावून स्वतःच्या खिशातले रोख पैसे भरून त्याच दिवशी पॉलिसीज मला कूरिअर केल्या.

नंतर बरेच आढेवेढे घेऊन, भरपूर भाव खाऊन, माझ्याशी कर्कश खडाष्टक आणि संगीत मानापमान करून आणि खाजामकडून भरपूर मस्का लावून घेऊन स्वतःच्या अनंत अडचणींवर मात करून अखेर जाडेमहाराज तयार झाले. चार दिवसांच्या दिरंगाईनंतर जास्तीचे पाचसाडेपाचशे रुपये मोजून अखेर आमच्याच उड्डाणाची म्हणजे फ्लाईटची तिकिटे काढली. आमची विमाकंपनी सरकारी असल्यामुळे शनिवारी जाड्याचा विमा होऊं शकला नाही. पण नवीन आलेल्या खाजगी कंपन्या मात्र करतात. त्यांच्याचकडून करून घ्या असा रईसाहेबांनी सल्ला दिला. जाड्याने त्याप्रमाणे ज्याच्याकडून तिकीट काढले त्याच्याचकडून विमा पण काढून घेतला. श्रीलंकेला भारतीयांसाठी तरी व्हिसा अगोदर काढावा लागत नाही. विनाशुल्क ऑन अरायव्हल व्हिसा असल्यामुळे तापाला डोके नव्हते. ताज्या बातमीनुसार डिसेंबर २०११ नंतर भारतीयांना देखील व्हिसा भारतातून निघण्यापूर्वी काढावा लागेल.

खाजाम म्हणजे खालीदखान जाफरखान महाडीक या नावाची आद्याक्षरे. आमच्या कॉलेजातील जाड्याच्या वर्गातला मित्र रौफ पोत्रिक हा खेडजवळच्या कोंडिवली गावातला. १९७८ साली बिचार्‍या रौफचे लग्न झाले. त्या लग्नात आम्हाला भरणा नाक्यावरच्या खाजामच्या घरी उतरवले होते. खाजामचे अम्मीपप्पा, बंधूभगिनी, भाभी वगैरे एकूण कुटुंबच अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ. तेव्हा त्या कुटुंबाशी आमची जी नाळ जुळली ती आजतागायत. नंतर हा खाजाम नोकरीनिमित्त दुबईला गेला. त्याने नंतर तिथेच आपला व्यवसाय थाटला. आता तिथे तो एक यशस्वी व्यापारी आहे.

भरणा नाक्यावरील त्या ऐसपैस घरातल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही चारेकजण एस टी ने भरणा नाक्यावर उतरलो. रौफ स्वागताला होताच. त्याची मावशी म्हणजे खाजामची अम्मी. दात घासता घासता कपबशांचा हवाहवासा वाटणारा किणकिणाट ऐकू आला. मी आणि जाड्याने एकमेकांकडे सूचकपणे पाहिले. खाद्यपदार्थांचे हवेहवेसे वाटणारे गंध रुचकर बातमी घेऊन आले. आम्लेट, गोड शिरा आणि चहाचा नाश्ता. जोडीला खेडच्या मधुर बोलीतून केलेली आस्थेवाईक चौकशी. काय करतोस, घरी कोण असते वगैरे वगैरे. या मधुर बोलीतल्या प्रेमळ चौकशीने आमची मने कायमची जिंकून घेतली. जन्मजन्मांतरीचे अनुबंध कधी जमले कळलेच नाही. तिथे गेलो की जेवणानंतर चांदण्या रात्री अंगणात खुर्च्या टाकून गप्पांचा मस्त फड जमत असे. घरातील लहानमोठे, बायकापुरूष झाऽऽडून साऽऽरे जमत असत. कोणाची टोपी केव्हा उडेल त्याचा काही नेम नाही.

खेडची बोली कशी काय आहे याचे एक वानगीदाखल उदाहरणच देतो. एकदा असेच डिसेंबर जानेवारी महिन्यात तिकडे गेलो होतो. दोन दिवसांपूर्वीच तेव्हा कोकणात जोरदार वादळ येऊन गेले होते.

"काल वायंदाल आलां आनि घराची सऽऽगली कौलां उरून गेली. सप्पर साकारायला मानूस पन मिलत नाय हल्ली." अम्मी.

"या जार्‍याला चरव मग सपरावर! त्याला काय काम आहे?" पप्पा.

असो. तर असा हा खाजाम आणि असे आमचे हे लंकादौर्‍यावरचे मित्रमंडळ. गेल्याच महिन्यात अम्मी दीर्घ आजारानंतर अल्लाला प्यार्‍या झाल्या.

उडाणक्रमांक आणि दिनांक खाजामला कळवला. तो आमच्या आधी जाऊन सर्व व्यवस्था करणार होता. चेन्नई कोलंबो विमानातच इमिग्रेशन फॉर्म मिळाला. कोणतेही विघ्न न येता कोलंबो विमानतळावर पोहोचलो. पाचदहा मिनिटातच इमिग्रेशनमधून सुटलो. बाहेर भरपूर उकडत असणार. किती त्याची झलक चेन्नईला विमान बदलतांना मिळाली होती. त्यामुळे आतच वातानुकूल कक्षात बसावे असे मनात आले. पण खाजाम बाहेर वाट बघत असेल तर? म्हणून मग बाहेर वाट पाहायचे ठरले. पण नुकताच पाऊस पडून गेला होता आणि जूनमध्ये मुंबईत जेवढे उकडते तेवढेच तिथे एप्रिलमध्ये उकडत होते. मास्तर एके ठिकाणी आमच्या तिघांच्या सामानासह विठ्ठलासारखा उभा राहिला. मी डाव्या बाजूला आणि जाड्या उजव्या बाजूला फेरी टाकून खाजाम दिसतो का ते पाहून आलो. पंधरावीस मिनिटे निघून गेली. अजून एक फेरी टाकून आलो आणि जरा उभे राहातो न राहातो तो खाजाम आणि एक माणूस आला.

"काय म्हणते मुंबई? सगली कशी हायत? काय म्हणतो कालू? कसं काय रिटायर्ड लाईफ ऍट पूना?" खाजाम.

"सगली बेस हायत. इथे कोलंबोत मुंबईसारखीच हवा आहे. चेन्नईला काय गरम होतं रे!" जाड्या.

"अरे आत्ताच पाऊस येऊन गेला म्हणून. पण आपण आता इथे कोलंबोला राहायचच नाही आहे! इथे काय आहे? गरम नि गरम! आता सरळ हिल स्टेशनला. कॅंडीला. हा कमाल. कमाल बांदर." बरोबर आलेल्या माणसाकडे खाजामने निर्देश केला.

"वेलकम टु श्री लंका." असे म्हणून कमालने एकेकाशी हात मिळवला. पाच फूट दोनतीन इंच, गहू वर्ण, सडपातळ पण बळकट शरीरयष्टी.

"सुहास शेवडे" आम्ही एकेकाने हात मिळवता मिळवता आपली ओळख करून दिली.

"विवेक वैद्य अलियास जाड्या."

"सुधीर."

"अरे हा अतरंगी माणूस गेली दहा वर्षे अस्साच दिसतो आहे. याचे वय वाढलेले दिसतच नाही. याची एकेक गंमत हळूहळू तुम्हाला कळेलच" खाजाम मराठीतून.

डिकीत सामान टाकून गाडीत स्थानापन्न झालो. अर्थातच वजनदार मास्तर पुढे आणि आम्ही तिघे मागे. खाजाम अर्थातच दोघांशीही बोलता यावे म्हणून आमच्या मध्ये. गाडी वातानुकूलित होती त्यामुळे बरे वाटले.

"काय म्हणते तुझी कंपनी जाड्या? व्ही आर एस घेतलीस ना?" खाजाम.

"कंपनीत असतांना बरेच नातेवाईक मारले होते. आता कंपनी मेली आणि ते सगळे जिवंत झाले." जाड्या.

दौर्‍याला नेहमीप्रमाणे एकदम झकास, जोरदार सुरुवात झाली.

क्रमशः

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

इरसाल's picture

9 Mar 2012 - 4:55 pm | इरसाल

मजा येतेय.....स्वतःच्या मित्रांची आठवण येतेय......

पैसा's picture

9 Mar 2012 - 10:40 pm | पैसा

छान वेगळंच प्रवासवर्णन झालंय!

आयबोवेन मेहेंदळ्यांनी लेख वर काढून दिलाय. २०१२मध्ये मिपावर नवीनच होतो म्हणून हा लेख वाचला गेला नाही. पण नंतरचे ओडिशा वाचून नक्की केलेले ते जमेल. लेखनसंवाद बरे असतात वाचायला. मजा वाटते.
खेडबोली मस्तच. कधीतरी या बोलीतच राजकीय किंवा इतर प्रतिसाद लिहा. निवडणुका जवळ येतातच आहेत.

सुधीर कांदळकर's picture

1 Dec 2018 - 7:26 pm | सुधीर कांदळकर

कंजूससाहेब आणि
धन्यवाद मेहेंदळेजी

सुधीर कांदळकर's picture

1 Dec 2018 - 7:29 pm | सुधीर कांदळकर

डॉ. सुहास म्हात्रेंची श्रीलंकेविषयक लेखमाला अप्रतिम आहे. चुकवूं नका.

हे कसे काय सुटले वाचनातून? भारी लिहिलं आहे!
मग तंजावर कार ने आणि ग्रीक बेटे सागरी मार्गाने बघून झालीत का?

माझ्याही मिपावर अवतीर्ण होण्या पूर्वीची मालिका असल्याने वाचनातून निसटली होती. मस्त लिहिलंय, आता सवडीने पुढचेही भाग वाचून काढतो,

डॉ. सुहास म्हात्रेंची श्रीलंकेविषयक लेखमाला अप्रतिम आहे. चुकवूं नका.

ह्या माहिती साठी धन्यवाद, त्यांच्या अमेरिका वारी बद्दलही वाचायचे बाकी आहे, तसेच अनिंद्य ह्यांच्या मालिकाही राहिल्यात पूर्ण वाचायच्या.

केवळ न्युयॅार्कवर छप्पन भाग असतील म्हात्रेसरांचे. चुकवणे कठीणच. श्री लंकाही आहेच. परदेशातली ठिकाणं इतकी की ते कधीतरी मायदेशीची तब्येत पाहायला येत असावेत.

शाळेत असताना भुगोातला प्रश्न गाळलेल्या जागा भरा नेहमी घोळ करायचा कारण सर्व पाठ केलेले असायचे.
हिराकुड/येराकुड ?
कोकणातली/देशावरची घरे उतरत्या छपराची/धाब्याची असतात का?
केरळातले लोक लुंगी लावतात?
तमिळ लोक भात खातात?