पाचूचे बेट - ४

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
14 Apr 2012 - 6:32 am

२९-०४-२०११.
नेहमीप्रमाणे सकाळी लौकर उठलो. चहा घेतला. तासदीडतास तिघे पायी फिरून आलो. खाजाम झोपून राहिला. गिरीस्थानी पायी फिरायला जास्त मजा येते यावर तिघांचे एकमत झाले. आज निघायचे होते. कार्यक्रमाची आखणी वगैरे करायची नव्हतीच. येईपर्यंत खाजाम उठून आन्हिके उरकून तयार होता. न्याहारी करून तयार झालो. न्याहारी करता करता कमाल आला. गुडमॉर्निंग झाले. आंघोळी करून तयार झालो. बिल तयार होईपर्यंत तलाव आणि कारंजाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांची प्रकाशचित्रे घेतली. खाजाम म्हणाला अरे घाई नको. आपल्याकडे उशीर झाला तर रहदारी वाढेल म्हणून आपण लौकर निघतो. तसे इथे नाही. रस्त्यावर एरवीसुद्धा फारशी रहदारी नसतेच. हॉटेलचे पैसे दिले. निघालो.

थिरूअनंतपुरम ते कन्याकुमारी प्रवासासारखा प्रवास. तसाच रस्ता, तसेच निसर्गसौंदर्य. रहदारी मात्र इथे जवळजवळ नाहीच. पण इथे गिरीस्थान असल्यामुळे साधारण थंड हवा. आकाशातले ढग सोबतीला होतेच. नुकताच जानेवारी फेब्रुवारीतच मी दक्षिण सफर करून आलो होतो. थंडी वगैरे जानेवारीतही तिथे नव्हतीच. हवा गरम नव्हती एवढेच. तिथल्या पूव्हर बॅकवॉटरच्या आठवणी सोबत्यांना ऐकवल्या. आम्ही एकत्र कुमरकोम आणि अलेप्पीचे बॅकवॉटर पाहिले होते. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा. सौंदर्य आगळे. श्रीलंकेतलाही काही कमी नव्हता. वाटेत एके ठिकाणी ‘ट्री ऑफ लाईफ’ हे जपानी ‘पर्यावरण हॉटेल’ लागले. तशी घाई नव्हतीच. गाडी आत घेतली, उतरलो आणि हॉटेल पाहिले.

प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूंचे जे सुबक खांब आहेत त्यातल्या रेषा खूप जाड होत्या. वेगळेच लाकूड. रंग नव्हताच. कसले लाकूड अंदाज येईना. चारपाच जणांना मी इंग्रजीतून विचारले की ते कोणत्या झाडाचे आहेत. एकदोघांना इंग्रजीच कळले नाही. मला लाकडातले काही कळत नाहीच, तर इंग्रजी देखील येत नाही असे माझ्या तीन सोबत्यांचे मत पडले आणि त्यांची करमणूक झाली. करमणूक काय उकळ्याच फुटत होत्या. त्यांच्या दुर्दैवाने एका माणसाला ठाऊक होते. आणि इंग्रजी देखील येत होते. कोकोनट पाम म्हणजे माडाचे आहेत म्हणाला. जलरोधक प्रक्रिया करून वर रासायनिक तकाकी दिलेले म्हणजे पॉलिश केलेले. जपान्यांच्या योजकतेला, कलात्मकतेला आणि सौंदर्यदृष्टीला दाद दिली.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="सुरेख खांब" />

आवाराचा विस्तार काहीतरीच प्रचंड होता. शेकडो एकर असावा. आवारातल्या झाडांची, हिरवळीची निगा, फुलझाडांची मांडणी, झुडुपांना कापून दिलेले आकार, प्रत्येक गोष्ट सौंदर्यपूर्ण. मला पुण्याच्या पु. ल. देशपांडे उद्यान आठवले. जपान्यांच्या सहकार्याने निगा राखलेले. खरेच पर्यावरण उत्कृष्ट राखले होते. आवारातून फेरफटका मारतांना जोरदार पाऊस सुरू झला. मग त्यांची माहितीपत्रके, टॅरीफ वगैरे घेऊन फारसा वेळ न घालवता निघालो. तोपर्यंत पाऊस काहीसा कमी झाला होता. निघालो.

वाटेत एक सुरेख मशीद दिसली. आगळीच वास्तुकला होती.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="मशीद" />

आतून बाहेर येणार्‍यांकडे खाजामने नमाज किती वाजता आहे, दुसरी मशीद कोठे आहे वगैरे चौकशी केली. नमाजाला भरपूर वेळ होता. आमच्या रस्त्यावर पन्नासेक किमी.वर दुसरी मशीद आहे तिथे नमाज मिळेल म्हणाला. कमालला कुठे ते सांगितले. बारापर्यंत पोहोचलो तर बाराचा नमाज मिळेल. वीस मिनिटे चालतो. कमाल म्हणाला सहज पोहोचू. हे ठीक होते. कमालला देणे आवश्यक असलेला विसावा मिळेल, पाऊस नसेल तर आमचे पाय पण मोकळे होतील. मी ऍव्होगाडो (नाहीतर अव्होकाडो असेल) खाणार म्हणून जाहीर केले. परवा फळवाल्याकडे दिसले तेव्हा ते ऍव्होगाडो आहेत आणि वाईट लागतात, तू अजिबात खाणार नाहीस असे खाजाम म्हणाला तेव्हापासून मला ते खायचे होते. अरे ते बेकार लागते, कुठलीच चव नसते त्यामुळे घेशील तेवढी सगळी तुलाच खावी लागतील म्हणून खाजामने आणि जाड्याने बजावून सांगितले. म्हणजे फारच मोठा धोका होता. रसाळ असते का कसे ते मला ठाऊकच नव्हते. त्यामुळे उरलेले घरी न्यावे म्हटले आणि बॅगेत रस सांडला तर काय, अशी मला भिती होती. फळाच्या स्वादाबद्दलचे कुतूहल त्या भितीवर मात करू शकले नाही. त्यामुळे एकच घेऊन आवडले तर खायचे नाही तर टाकायचे असा माझा विचार होता. काल फळे घेतली त्याच्याकडे फारच मोठी होती. मला छोटे हवे होते. टिंगल करायला तिघे टपलेले होतेच. ऍव्होगाडो विकत घेऊन न खाता टाकणारे सावज केव्हा मिळते याच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन नरभक्षकांच्या तावडीत होतो.

वाटेत एक चहाचा मळा लागला. रॉथ्सचाईल्ड टी इस्टेट. तिथे प्रकाशचित्रे घेतली. ती घेता घेता चहा वेचणार्‍या कामकरी स्त्रिया आल्या. म्हातार्‍याच होत्या. चेटकिणी, राक्षसिणी दिसणार्‍या. सीता लंकेतल्या अशोकवनात असतांना बहुधा त्यांनीच तिच्याभोवती पहारा दिला असावा. त्यांची पण प्रकाशचित्रे घेतली. त्यांनी पैसे मागितले. एकेकीला श्रीलंकेचे दहादहा रुपये दिले. आणखी मागितले. आणखी तेवढेच दिले. त्यांना आणखी हवे होते. नक्कीच राक्षसिणी असणार. पण आम्हाला खायला विसरल्या. मग मात्र पुढे निघालो.

मधेच एक छोटासा धबधबा लागला. त्याची प्रकाशचित्रे घेतली. दोन तास केव्हा गेले कळले नाही. मशीद आली. घाट सुरूच झाला होता. छान ठिकाण होते. जरा पुढे मारुती मंदिराजवळ पण थोडे वर धबधबा आहे असे कमाल म्हणाला. मशिदीजवळ सावलीत सुरक्षित पार्किंग होते म्हणून गाडी तिथेच ठेवली. आम्ही तिघांनी थोडे पायी फिरायचे ठरवले. घाट चढत थोडे पुढे गेल्यावर वळणावर उजव्या बाजूला एक दक्षिण भारतीय हिंदु मंदीर लागले. बहुधा मुरुगन म्हणजे गणेशभ्राता कार्तिकेय. मंदिराची प्रकाशचित्रे काढली. आणखी जरा पुढे मारुती मंदिराजवळ पण थोडे वर धबधबा आहे असे कमाल म्हणाला होता. वाटेत एकदोन दुकाने लागली. किराणा मालापासून कांदेबटाटे आणि सुक्या मासळीपर्यंत बर्‍याच वस्तू होत्या. फळे मात्र मिळाली नाहीत. अंडी होती. मी ऍव्होगाडोची चौकशी केली. त्याला इंग्रजी धड येत नव्हते. त्याला माझा प्रश्नच कळला नाही. दोन नरभक्षकांची करमणूक झाली. सिंहलीत त्या फळाला वेगळे नाव असावे. ऍव्होगाडोपेक्षा अंडी चांगली असा प्रेमळ सल्ला दोघांनी दिला. उकडलेली अंडी खायची टूम निघाली. बॉईल्ड एग्ग हे मात्र त्याला कळले. ती उकडेपर्यंत जाड्याने एक अंडे कच्चेच खाल्ले. खरे म्हणजे अंड्याला पेनने भोक पाडून प्याला तर जास्त बरोबर होईल. दुकानदार गमतीने पाहात होता. बहुधा कच्चे अंडे खाणारा त्याने पाहिलेला पहिलाच महामानव. तेवढ्यात तिथे मुलांना शाळेत नेणारी एक रिक्षा आली. आपल्याकडे असतात तश्शीच रिक्षात मुले कोंबलेली. पोरे शेंबडी होती, पण बुजरी देखील होती. मला पाहून गप्प झाली. लंकेत आल्यावर मी पण राक्षसासारखा दिसायला लागलो की काय कळेना. हाय हलो केले. थोडी सैलावली. त्यांचे प्रकाशचित्र घेतले.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="रिक्षातून शाळेत" />

त्यांना दाखवले. पोरे खूष. होऽऽऽऽ केले आणि टाळ्या वाजवल्या. पंधरा मिनिटे चालल्यावर आणखी एक मंदीर लागले. पण रस्त्याच्या डाव्या बाजूला. आम्ही उजव्या बाजूने वाहने समोरून येणार्‍या दिशेने चालत होतो. रहदारी जवळजवळ नाही. दोनतीन मिनिटांनी एखादे वाहान जात किंवा येत होते. ते होते छोटेखानी गणपती मंदीर आणि जरासे पुढे मारुती मंदिराची पाटी आणि वरच्या दिशेला पायवाटेच्या शेजारी दिशादर्शक बाण.

From SRI LANKA 2011" width="600" height="400" alt="मंदीर" />

खाली पाण्याचा नळ. मस्त थंडगार पाणी. आम्ही तोंड धुतले. बरे वाटले. एक सायकलवाला तिथे थांबून पाणी पिऊन गेला. म्हणून मी पण प्यालो. आता मला पोटाचे रोग होणार म्हणून दोघांनी चिडवायला सुरुवात केली. मला चिडवायला सोबतच्या बाटलीतले उन्हाने गरम झालेले पाणी पण प्याले. समोर रस्त्यापलीकडे झाडाखाली गर्द सावलीत एक बंद लाकडाची टपरी होती. बाजूला लाकडाचाच चारपाच पायर्‍यांचा जिना होता. त्यावर जाऊन बसावे असे तिघांनाही वाटले. बसलो. आणि अहो आश्चर्यम! तिथे दोन हिरवेगार ऍव्होगाडो पडले होते. दर्शन न घेतलेल्या मुरुगननेच माझ्यासाठी ठेवले होते. तो जिना नसून ती फळवाल्याची फळे मांडायची मांडणी होती हे आता आमच्या ध्यानात आले. मी लगेच एक समोरून धुवून आणला. बहुतेक वाचकांनी खाल्ले असेल. पण नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आकार पेरूपासून पपनसाएवढा केवढाही असू शकतो. आकार साधारण गोलच. साल हिरवी. कच्चे का पिके माझ्यासारख्या नवख्याला कळत नाही. साल डाळिंबाची सहज निघते तशी पण थोडी जाड पण डाळिंबासारखे आतमध्ये कप्पे नाहीत. साल सलग, सैल आणि पटकन निघणारी. सालीना न चिकटणारा गर शहाळ्याचा असतो तसा अर्धपारदर्शक पांढरा. चव थोडीशी खोबर्‍यासारखी पण जवळजवळ बेचव. दोन नरभक्षक माझ्या तोंडाकडे मी ते केव्हा टाकतो या आशेने पाहात होते. पण कोणतीही वाईट चव नसल्यामुळे मी ते पूर्ण खाल्ले आणि चविष्ट होते म्हणून खोटी पावती देऊन विजयी हास्य केले. नरभक्षकांची निराशा झाली. एकतर फळ इतके सहज, विनासायास आणि फुकटच मिळाले, त्यातून मी ते सगळे खाल्ले. विकत घेऊन जरासे खाऊन टाकले असते तर त्यांनी मला पिडून होळी साजरी केली असती. फळ पण विकत घेऊन नुसतेच खाण्याच्या लायकीचे नक्कीच नव्हते. हे विकत का घेतात कोण जाणे. सलाड नाहीतर भाजीबिजी करीत असावेत. दुसरे देखील खा म्हणाले. पण पहिलेच मी जेमतेम संपवू शकलो. घड्याळाकडे पाहिले. तासभर उलटला होता. कळलेच नाही. खाजाम यायची वेळ होऊन अर्धा तास उलटला होता. आम्ही रस्त्यापासून दूर धबधब्याकडे असणार म्हणून तो गाडी घेऊन पुढे आला नसणार. पुन्हा पाणी पिऊन तोंड धुवून परत फिरलो. उतारावरून भरभर चालत पंधरा मिनिटात गाडीकडे पोहोचलो तर खाजाम तयारच होता. पहिली त्याला ऍव्होगाडोची गोष्ट मी विजयी मुद्रेने सांगितली. अशा गमतीजमती आमच्या सहलीचा आनंद अपार वाढवतात. अगोदर पोटभर हसून घेतले आणि मगच आम्ही गाडीत बसलो. अर्थातच या इशूमाध्ये कमाल पण नरभक्षकांच्या बाजूने सामील होता.

सुटलो आणि पाचदहाच मिनिटात रंबुडा धबधबा आला. धबधब्यासमोरच एक सुबक रेस्तरॉ.

From SRI LANKA 2011" width="600" height="400" alt="रंबुडाचे रेस्तरॉं" />

धबधब्याचे दृश्य मनात साठवतच खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा. जोडीला आपले पूर्वज मोठ्या संख्येने. काही दिले तर खातात. त्यांना द्यायला फळे विकत घेता यावीत म्हणून फळे, ऊस आणि शेंगा विक्रेत्यांची पण सोय आहे. भेटवस्तू, टी शर्ट वगैरेंची पण दुकाने हारीने लागलेली. आम्ही पुढे खाणार होतो. धबधब्याची प्रकाशचित्रे काढली. खाजामला पूर्वज आवडले. त्यांच्याबरोबर फोटो काढ म्हणाला. काढले. मग थोडी फळे खाऊन पुढे निघालो.

आणखी एक चहाचा मळा लागला. कारखाना पण होता. डोळ्याचे पारणे फिटावे असा चित्रवत सुंदर परिसर. कारखान्यातून घेतलेले रेस्तरॉंचे प्रकाशचित्र.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="चहाकारखान्याचे रेस्तरॉं आणि परिसर" />

तो पाहाणे आमच्या कार्यक्रमात होते. तिथे तिकीट घेतले. दहापंधरा जण जमल्यावर कारखान्याची गाईड आली. कल्याणी नावाची एक काळीसावळी पण हसतमुख आणि बारीक, साधारणसे इंग्रजी बोलणारी, चपळ, तरतरीत, विशीची मुलगी. कारखान्यात आत गेल्यावर एक माणूस दूरध्वनीवर प्रचंड मोठ्याने खडखडाटी भाषेत बोलत होता. कोणावर तरी खेकसत असावा. हा तमिळ असणार म्हणून खाजामने तर्क केला आणि नंतर तो खरा असल्याचे कल्याणीकडून कळले. सिंहली लोक हळुवार आवाजात बोलतात. सहसा मोठ्याने बोलत नाहीत. असो. तिथे १०० वर्षापेक्षा जास्त जुनी यंत्रे होती.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="शतकाहून पुराणी यंत्रसामुग्री" />

रेस्तोरॉं आतून देखील देखणे होते. एक पितळी कर्णा असलेला हॅंडल मारून चावी द्यायचा पन्नाससाठ वर्षाहून जुना ग्रामोफोन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शोभेला ठेवला होता.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="ग्रामोफोन" />

एक पाणी तापवायचा तांब्याचा बंब पण होता.

From SRI LANKA 2011" width="640" height="640" alt="पाणी तापवायचा बंब" />

इथे अल्पोपहार घेऊन निघालो. रस्ता सतत घाटाचाच. निसर्गसौंदर्याने डोळे निवले. जवळजवळ दीडदोन तासांनी गाव आले असे वाटले. थोडीफार घरे दिसायला लागली. मग एक तलाव आला. तलाव पाहून मी हरखून गेलो. हेच खाजामचे नूर अली. श्रीलंकेतले सर्वात उंच शिखर. सिंहली भाषेत नुवारा एलिया म्हणून मी महाजालावरून माहिती काढली होती. कल्पनातीत रम्य ठिकाण. रस्त्याच्या डाव्याबाजूला चढणीवरचे एक ऐटबाज वळण घेऊन गाडी थांबली. उतरलो आणि समोर पाहातो काय! समोरच काय ते पुढच्या भागात.

क्रमशः

पाचूचे बेट - १

पाचूचे बेट - २

पाचूचे बेट - ३

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

14 Apr 2012 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

अतिशय सुंदर वर्णन. तपशिल जरा अधिक आहेत पण लेखन शैली खुमासदार आहे. छायाचित्रे मस्तच आहेत. धबधब्याचे छायाचित्र असेल असे वाटले होते पण निराशा झाली. असो. अभिनंदन.

सुधीर कांदळकर's picture

14 Apr 2012 - 6:07 pm | सुधीर कांदळकर

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="रंबुडा धबधबा" />

From SRI LANKA 2011" width="480" height="640" alt="रंबुडा धबधबा २" />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="रंबुडा धबधबा ३" />

टाकली आहेत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

14 Apr 2012 - 6:51 pm | प्रभाकर पेठकर

व्वा..काय सुंदर छायाचित्रे आहेत. डोळे निवले. धन्यवाद.

खेडूत's picture

14 Apr 2012 - 12:05 pm | खेडूत

छान... सहसा फिरायला श्रीलंकेचा विचार केला जात नाही, पण आता जायला आवडेल.
मस्त प्रवास घडवताय, धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

14 Apr 2012 - 2:28 pm | मुक्त विहारि

मस्तच...

छान आहे. ते लिंक देताना नेहमी फुल एच टी एम एल असं असतं तिथे टीचकी मारा म्हणजे लिंक दिसेल.

अव्हाकाडो खरंतर चवीला वाईट नसतं. सँडविच मधे घालुन, डीप म्हणुन, सॅलड मधे वगैरे मस्त लागतं अन खुप आरोग्यवर्धक (हेल्दी) पण असतं. इतर फळांसारखंच योग्य प्रमाणात पिकलेलं खाल्लं तर निराशा होणार नाही.

सुधीर कांदळकर's picture

15 Apr 2012 - 5:31 am | सुधीर कांदळकर

१. @ खेडूत - सहसा फिरायला श्रीलंकेचा विचार केला जात नाही, पण आता जायला आवडेल.
अगदी खरे. आम्ही पण खाजाम म्हणाला म्हणूनच गेलो. २०११ मध्ये मी पाच सफरी केल्या. पण हे वेगळे कोणी फारसे जात नसलेले ठिकाण, म्हणून लिहिले. धन्यवाद.

२.@ शिल्पाताई, अमूल्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

सर्वांना धन्यवाद.

प्राजु's picture

15 Apr 2012 - 7:21 am | प्राजु

अ‍ॅव्होकाडो हे मुख्यतः मेक्सिकन डिप म्हणजेच ग्वाकामॉली बनवायला वापरतात.
ते नीट पिकलेलं खाल्लं तर चांगलं लागतं चवीला. आणि शिल्पा म्हणते तसे खूप हेल्दी असतं.
असं म्हणतात (माझ्या मैत्रिणी) पूर्णपणे पिकलेल्या अ‍ॅव्होकाडोच्या गरामध्ये कणिक मळली तर पोळीला तेल- तूप लावण्याची गरजच पडत नाही आणि पोळी अतिशय मऊ होते.
बाकी वर्णन आणि छायाचित्रे सुंदर.

सुधीर कांदळकर's picture

16 Apr 2012 - 6:42 am | सुधीर कांदळकर

कुतूहल चाळवलेत प्राजुताई. लगेच गुगलून गुआकामोल ची पाकृ पाहिली. गोव्यात राममा १७ ला लागून 'डॉन पेद्रो'ज रेस्तराँ मध्ये एकदाच एक मेक्सिकन पदार्थ खाल्ला होता त्याची आठवण झाली. बहुधा २००४ साल होते ते. तिथे एक वृद्ध गृहस्थ उत्कृष्ट बार टेंडर होता आणि त्याने बनवलेल्या टोमॅटो ज्यूसमधल्या वोदका ची चव अद्याप जिभेवर आहे. नंतर एकदा गोव्यात गेलो तेव्हा ते रेस्तरॉ बंद झाले होते. पुन्हा चालू झाले की नाही ठाऊक नाही.

पियुशा's picture

16 Apr 2012 - 11:38 am | पियुशा

वॉव सर्व फोटो सही !!!!
पण कारखान्यातून घेतलेले रेस्तरॉंचे प्रकाशचित्र प्रचंड आवडले :)

सुधीर कांदळकर's picture

16 Apr 2012 - 4:51 pm | सुधीर कांदळकर

माझेही तेच सर्वात आवडते आहे.

पैसा's picture

16 Apr 2012 - 8:41 pm | पैसा

वर्णन आणि फोटो फारच छान आलेत!

यशोधरा's picture

1 Dec 2018 - 8:52 pm | यशोधरा

मस्त!