हवेतल्या गोष्टी - २ : ती

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
17 Aug 2011 - 9:25 am

फ्लाईट लेट किंवा रद्द होणं हां नेहेमीचा कार्यक्रम, यात मला तसं नवीन काहीच नाही. पूर्वी असं काही झालं की मी एअरलाईन स्टाफवर आरडाओरडा करून माझा राग, फ्रस्ट्रेशन काढत असे, आता तसं करावसं वाटत नाही.

पण यावेळची गोष्ट खरंच निराळी होती.

मी गेले सतत २८ दिवस घराबाहेर होतो. घरून निघालो तेव्हा अवघ्या सहा दिवसाचा प्लान होता, पण पुढे प्रवास वाढतच गेला. गेल्या अठ्ठावीस दिवसात चार शहरं आणि आठ फ्लाईट झाल्या होत्या. त्यातही गेले १० दिवस तर घराची ओढ खुपच अस्वस्थ करत होती. मला अगदी डेस्परेटली घरी जायचं होतं. एक क्षणभरही आपल्या माणसांपासून दूर रहायला नको वाटत होतं, जीव कासावीस झाला होता घरट्यात जाण्यासाठी.

खरं तर मी एवढा होमसिक वगैरे नाही, पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती, मनस्थिती वेगळी होती. कधी एकदा घराची बेल वाजवतोय आणि बायकोचा हसरा चेहेरा डोळे भरून पाहतोय, असं झालं होतं. शुक्रवारी काम आटोक्यात आलं. मी रात्रीची फ्लाईट बुक करायला सांगितली. ऐनवेळेला ती फ्लाईट मिळाली नाहीच. शनिवारी पहाटे सहा वाजताच्या फ्लाईटचं तिकीट मिळालं.

रात्रभर जागाच होतो. पहाटे तीन वाजताच हॉटेलातून उठून बेंगलोर विमानतळावर पोचलो. चेकइन करून किंगफिशर लाउंजमधेही न बसता अधीरपणे बोर्डिंगगेटजवळच जाऊन बसलो. बरोब्बर साडेपाच वाजता फ्लाईट स्टेटस चेंज झालं, “scheduled” वरून नुसतंच “delayed”. हरामखोर साले. नेमकं आजच..

बोर्डिंगगेटच्या टेबलापाशी एकदम गलका झाला, लोक आपला संताप त्या चारपाच पोरापोरींवर काढू लागले. ते बिचारे सगळ्यांना समजावून सांगत होते, “तांत्रिक बिघाड आहे”, “फ्लाईट इंजिनिअरने विमान सुरक्षित घोषित केल्याशिवाय फ्लाईट सोडता येत नाही”, “तुमच्याच जीवाला धोका आहे” वगैरे वगैरे. माझ्या बुद्धीला ही सगळी तांत्रिक कारण पटत होती, पण मनाचं काय...

अनुभवानं हेही माहीत होतं की या प्रकारच्या बिघाडामुळे फ्लाईट रद्द होण्याची शक्यताच जास्त होती. काही समजत नव्हतं काय करावं ते. हताश होऊन लाउंजच्या दिशेने पाय ओढत चालू लागलो. लाउंजच्या रिसेप्शन काउंटरला बसलेल्या सगळ्या पोरी एकजात उर्मट आणि इतक्या आखडू का असतात कुणास ठाऊक. आपल्याच तोऱ्यात असतात. आपल्याला एअरलाईननं नोकरीला ठेवलंय म्हणजे, सगळ्या प्रवाशांसमोर मान ताठ करून, उर्मटपणानं हनुवट्या उडवून, नाक फेंदारून दाखवलंच पाहिजे असा दंडकच आहे जणू.

एका फटाकड्या पोरीनं मला तोऱ्यात मेंबरशीप कार्ड मागितलं, मी जरा नाखुशीनेच कार्ड आणि बोर्डिंग पास काढून दिला. तिनं अत्यंत उर्मट हसून सांगितलं, की “सर, तुम्ही आता लाउंज मधे वेळ घालवलात तर तुम्हाला बोर्डिंगला उशीर होईल”.

झालं, इतका वेळ आवरून ठेवलेला संताप बाहेर पडला, त्या दोन फटाकड्या पोरींना मी झाड झाड झाडलं. एकतर त्यांच्या सारखं खोटंखोटं तोंडदेखल हसण्याचा प्रचंड रागराग होत होता आणि त्यात त्या मला नियम समजावून सांगत होत्या. माझा आरडाओरडा ऐकून बिचाऱ्या तोंड पाडून बसल्या. एव्हाना फ्लाईट डीले झाल्याचं त्याना बहुतेक कळालं होतं.

मला प्रचंड राग आला होता. खूप असहाय्य वाटंत होतं. मला कुठल्याही परिस्थितीत पुण्याला पोहोचायचं होतं. मी माझं फ्रीक्वेंट फ्लायर कार्ड वापरून, माझ्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला सांगणार होतो. ते अधिकार ड्युटी मॅनेजरला असतात. मी ओरडूनंच ड्युटी मॅनेजरला घेऊन यायला सांगितलं. कारण मला परत “आमाला पावर नाय” हे ऐकायचं नव्हतं (आठवा: म्हैस). त्यातली एक सुंदरा बिळात उंदीर पळावा तशी पळाली.

दोनच मिनिटात ड्युटी म्यानेजर माझ्या समोर उभी राहिली. माझं बोलणंच खुंटलं. सुंदर, नाजूक, २६-२७ वर्षाची एक युवती लाल-काळ्या रंगाच्या पायघोळ ड्रेसमधे माझ्यासमोर उभी होती.

हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून...

मी तिलाच बसायला सांगितलं. ती समजून मंद हसली. मग तिला बयाजवार सांगितलं, काय झालंय ते. मला इतक्या डेस्परेटली घरी का जायचंय याचं खरं कारण मला तिला सांगावसं वाटलं, मी ते सांगितलंही. ती पुन्हा एकदा खूप मोहक, आश्वासक हसली. “येस सर, आय कॅन अंडरस्टँड, आय विल ट्राय माय बेस्ट”

तिनं संगणकावर पटापट काही काम करायला सुरुवात केली. काही क्षणातच मला सांगितलं, की पुण्याला जाणारी पुढची किंगफिशर फ्लाईट संध्याकाळी सात वाजता आहे. हे सांगताना तिचा स्वर नकळत हलका झाला होता. आवाजातली निराशा, सहानुभूती लपत नव्हती. एव्हाना माझाही राग निवळला होता. ती मला वेगवेगळे पर्याय सुचवू लागली.

वास्तविक फ्लाईट लेट झाल्यावर, तिची जबाबदारी फक्त पुढची फ्लाईट कधीची आहे हे सांगायची होती, निर्णय मलाच घ्यायचा होता. उर्मटपणानं सॉरी म्हणली असती आपल्या कामाला लागली असती तरी फार काही बिघडलं नसतं... पण ही खरंच निराळी होती... शेवटी खूप उस्तवारी करून तिनं माझ्यासाठी एक बेंगलोर-मुंबई फ्लाईट शोधून काढली. मुंबईहून त्यांची गाडी पुण्यापर्यंत अरेंज केली.

मी तिची ठामपणे होणारी हालचाल, फोनवरून सगळ्या एअरलाईन कडे चौकशी करण्याची लगबग, प्रत्येक नकारानंतरची चेहेऱ्यावरची न लपणारी निराशेची छटा, निर्णय घेण्यातली तत्परता. हे सगळं मी मोठ्या कौतुकानं पाहात होतो. माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुन्हा एकदा ते मंतरलेलं हास्य फेकत ती म्हणाली “इट्स माय ड्युटी सर”.

तिनं जाताना मला हात हलवून ‘बाय’ केलं. मी शेवटी वेळेवर घरी पोचणार होतो, पण याचा आनंद मला तिच्याच बोलक्या डोळ्यांमध्ये जास्त दिसत होता.. आता खोटंखोटं हसायची पाळी माझ्यावर होती. थँक्यू म्हणायलाही माझा आवाज फुटत नव्हता. डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. आणि मनात मर्ढेकरांची कविता नव्याने उलगडत होती.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
होता पायातही वारा
कालपरवापावेतो

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोटय़ा जिवाची साखळी

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माउली
तीर्थ पायांचे घेईतो

ता. क. -
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार..

ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती.
काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता.

मुक्तकसमाजजीवनमानप्रवासशुभेच्छा

प्रतिक्रिया

समीरसूर's picture

17 Aug 2011 - 9:39 am | समीरसूर

फारच सुंदर लिखाण. अगदी खिळवून ठेवणारे. आवडले.

एअरपोर्ट, लाऊंज, त्या फटकड्या चटाचटा चालणार्‍या पोरी, त्यांच्यापैकीच 'ती' एक पण निराळी, सुंदर, सालस, आतिथ्याचा नीट धडा घेतलेली, मदत करण्याची मनापासून इच्छा आणि तयारी असणारी...वा वा अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र...मजा आ गया!

बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता?

पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... :-(

अत्रुप्त आत्मा's picture

17 Aug 2011 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

+१००००००००००....

बाकी सुंदर मुली जर सालसही असतील तर जिंदगी का मजा ही और हो...काय म्हणता?

पण हे म्हणजे अस्सल वर्‍हाडी ठेच्यात गुलाबजामाचा गोडवा शोधण्यासारखे आहे...माहिती आहे मला... ''पूर्ण सहमत"

सविता००१'s picture

17 Aug 2011 - 9:49 am | सविता००१

मस्त सुरुवात झाली. आता फटाफट पुढचे भाग येउद्या.

सविता००१'s picture

18 Aug 2011 - 9:51 am | सविता००१

केलेला लेख वाचला. खरच ती मुलगअभिनंदनास पात्र आहे.

मी-सौरभ's picture

17 Aug 2011 - 10:00 am | मी-सौरभ

अवांतरः तेवढा तुमचा आय डी बदला की वो....शोभत नाय तुमच्या 'परिपक्व' लिखाणाला... :(

बहुगुणी's picture

17 Aug 2011 - 9:46 pm | बहुगुणी

एकदम सहमत! असं सुंदर लिखाण आणि 'अर्धवट' आय डी, यांचा काही मेळ बसत नाही :-)
आणखी किस्से येऊ द्यात, अर्धवटराव!

किसन शिंदे's picture

17 Aug 2011 - 10:08 am | किसन शिंदे

जबरा..!!
मागच्याप्रमाणे हि गोष्टही आवडली.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माउली
तीर्थ पायांचे घेईतो

मर्ढेकरांच्या कवितेतल्या या ओळीही खुप सुंदर आहेत.

श्रावण मोडक's picture

17 Aug 2011 - 10:10 am | श्रावण मोडक

तरीच. तेव्हापासून तू पुण्यात फारसा दिसत नाहीस. सारखा प्रवासात असतोस. समजू शकतो. ;)
मुख्य प्रतिसाद - लेखन छान. पुलेशु.

मस्त लिखाण, असे अनुभव आलेले नाहीत पण तुमच्या लिखाणातुन जगतोय ते, अतिशय सुंदर लिहिलंय..

प्रास's picture

17 Aug 2011 - 8:05 pm | प्रास

अर्धवटराव,

तुम्ही या लेखमालेची मस्त सुरूवात केली आहे. तुमचे पुढले अनुभव वाचण्यास उत्सुक.

बाकी

हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून..

माझंही अगदी अगदी अस्संच झालं असतं :-)

प्रशांत's picture

17 Aug 2011 - 10:30 am | प्रशांत

छान लेखन पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

जाई.'s picture

17 Aug 2011 - 10:41 am | जाई.

+१

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 10:39 am | शैलेन्द्र

खुप सुंदर लिखान... अपेक्षा खुप वाढल्यात..

पाषाणभेद's picture

17 Aug 2011 - 10:42 am | पाषाणभेद

सुंदर झालाय पहिला भाग. लवकर लिहा

मिहिर's picture

17 Aug 2011 - 10:50 am | मिहिर

असेच म्हणतो.

विजुभाऊ's picture

17 Aug 2011 - 10:43 am | विजुभाऊ

मस्त लिहितोस रे.
मला घरात असूनदेखील होम सिक व्हायला झालं

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 10:45 am | नगरीनिरंजन

खूप छान लेख. अजून येऊ द्या.

विजय नरवडे's picture

17 Aug 2011 - 10:50 am | विजय नरवडे

सुंदर लेखन

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2011 - 11:00 am | इंटरनेटस्नेही

मुलीने सुंदर असण्यासोबत 'सालस' असणे किती महत्त्वाचे ते यातुन दिसुन येते!

सविता's picture

17 Aug 2011 - 3:29 pm | सविता

बरं!!!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Aug 2011 - 7:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला ;-)

इंटरनेटस्नेही's picture

19 Aug 2011 - 8:50 pm | इंटरनेटस्नेही

त्यातून ती स्वजातीय, उच्चशिक्षित आणि कमावणारी असेल तर कित्ती बरे नाही, प्रेमात पडायला

हॅ हॅ हॅ!

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Aug 2011 - 11:12 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं.

स्पा's picture

17 Aug 2011 - 1:36 pm | स्पा

मस्त..
आवडलं

मेघवेडा's picture

17 Aug 2011 - 1:55 pm | मेघवेडा

छान रे. पण सेहवागच्या स्टॅण्डर्डनं ५० रन्स इन ५० बॉल्स इज ए डेली रूटीन यू सी! पुलेशु. :)

प्रीत-मोहर's picture

17 Aug 2011 - 2:06 pm | प्रीत-मोहर

मेवेरामशी बाडिस

पैसा's picture

21 Aug 2011 - 11:52 pm | पैसा

सध्या वीरूला दृष्ट लागल्ये. अर्धवटच्या लेखनाला कोणाची दृष्ट लागू नये! फार सुंदर लिहिलंय नेहमीसारखंच.

स्वाती दिनेश's picture

17 Aug 2011 - 1:57 pm | स्वाती दिनेश

दोन्ही भाग आत्ताच वाचले, फार छान लिहिलं आहे,
पुढच्या अनुभवाची वाट पहायला सुरुवात केली आहे.
स्वाती

"निर्णय घेण्यातली तत्परता" हे तिला शोभणारे सर्वात महत्वाची गोष्ट सांगितल्याने छान वाटले.
लिखान आवडले.

सहज's picture

17 Aug 2011 - 3:15 pm | सहज

छान लेख.

मस्त !!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
आमचे गवि कुठे दिसत नाहीत ते? ;-)

अर्धवटराव तुम्ही लिहिता बाकी छानच हो.
आवडले हे वेगळे सांगावयास नको.
सुन्दर्यांवर तेवढं कावू नका राव.

धमाल मुलगा's picture

17 Aug 2011 - 5:13 pm | धमाल मुलगा

लेखनकौशल्याबाबत आम्ही पामरांनी काय बोलायचं?
किस्साही छान सांगितलास हों!

बाकी, देशी विमानकंपन्यांपैकी इतरांपेक्षा किंगफिशरच्या स्टाफची वागणुक बरीच प्रेमळ आणि आपुलकीची असायची हों आमच्याकाळी. ;) (हल्लीचे बदल काही ठाऊक नाहीत बुवा.)

- धमाल मल्ल्या.

योगी९००'s picture

17 Aug 2011 - 5:37 pm | योगी९००

मस्त अनुभव कथन...पुढील भाग केव्हा?

हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून...

किंगफिशर कंपनीचे पण कौतूक करावे वाटते..कारण चिडलेल्या लोकांना (स्पेशली पुरुषांना) कसे शांत करावे हे त्यांना चांगलेच समजले आहे. मी सुद्दा एकेकाळी एका प्रथितयश कंपनीत मार्केटींग मध्ये होतो. आम्ही पण हीच strategy वापरायचो. जेव्हा जेव्हा कंपनीचे कोठेतरी exhibition असायचे..त्यावेळी अशा सुंदर (व चेहर्‍याने सालस) दिसण्यार्‍या मुलींना आम्ही पुढे पुढे ठेवायचो. (अशा मुली exhibition च्या काळात टेंपररी hire कराव्या लागत..on contract basis..) . जो नेहमी चिडणारा ग्राहक असेल किंवा जो ग्राहक कंपनीच्या products मुळे तितकासा खुष नाही अश्या ग्राहकाने तेथे गोंधळ घालू नये म्हणून या मुलीचा मुख्य वापर व्हायचा..कारण त्या बरोबर असल्याने ग्राहक (कितीही म्हातारा असला तरी ) शांतपणेच बोलायचा...

वरील प्रतिसाद सर्वांनी हलकेच घेणे..कारण बर्‍याच कंपन्या exhibition च्या काळात हेच करतात...

अर्धवट's picture

17 Aug 2011 - 5:44 pm | अर्धवट

सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार..

ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती.
काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता

धमाल मुलगा's picture

17 Aug 2011 - 6:17 pm | धमाल मुलगा

नाय लक्षात राव तू हे सांगेपर्यंत. त्यामुळंच बहुतेक मर्ढेकरांच्या कवितेचा संदर्भ उमजत नव्हता.
आता कळलं. तिला तुझी पिडा खरी 'कळली' . त्यामुळंच तीनं एव्हढ्या आपुलकीनं मदत केली असणार.

आता तुझ्या कथेचा खरा अर्थ कळतोयसं वाटतंय. :)

अश्या या सालस ललना तुमच्या नशीबी येतात हे पाहुन हेवा वाटला राव. :)
बाकी ते विमानतळावरच वातावरण निर्मिती वगैरे झक्कास.
लेख आवडला आहे. :)
पुगोप्र.

सर्वसाक्षी's picture

17 Aug 2011 - 6:43 pm | सर्वसाक्षी

उत्तम कथन.

रडार बोंबलल्यामुळे उड्डाणे रखडल्यावर बंगलोर विमानतळावर मलाही जेटच्या चारुमती नामे कर्तव्यदक्ष मुलीचा असाच अनुभव आला होता. ती जेट कर्मचारी असूनही तिने जाताना होणार्‍या विलंबाखातर परतीचे माझे किंगफिशरचे कमी दराचे तिकिट बदलुन मला अधिक किंमतीचे उशीराच्या उड्डाणाचे तिकिट आणुन दिले होते. याहुन अधिक भावले ते एकही अधिकारी तिथे फिरकत नसताना अत्यंत संयमाने व सोशिकपणाने प्रवाशांना एकहाती सांभाळणे व तेही आपल्या बेजाबदार अधिकार्‍यांची तक्रार न करता.

श्रावण मोडक's picture

17 Aug 2011 - 7:04 pm | श्रावण मोडक

खरी प्रतिक्रिया हीच.
साक्षीबुवा, हे लेखन तुमचेच ना? ;)

योगी९००'s picture

17 Aug 2011 - 8:23 pm | योगी९००

श्रावण मोडक यांचे आभार की त्यांनी मनोगतवरील दुवा दिला..

तो लेख आणि प्रतिक्रिया वाचून खुपच करमणूक झाली...:)

मितभाषी's picture

27 Aug 2011 - 3:07 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

त्याबरोबर हे काव्यही आवडले.

मस्त रे!!! नेक्स्ट टाईम मला घेऊन जा तुझ्यासोबत...त्या ललनेशी ओळख करून घेतो.. :)

रेवती's picture

19 Aug 2011 - 6:14 am | रेवती

...त्या ललनेशी ओळख करून घेतो..
ती लगेच तुझा मामा करून बाळ सांभाळायला देईल.;)

प्राजु's picture

17 Aug 2011 - 9:29 pm | प्राजु

सुंदर लिखाण.

चतुरंग's picture

17 Aug 2011 - 9:49 pm | चतुरंग

अनुभव अतिशय सुरेख मांडला आहे.

मर्ढेकरांची कविताही आवडली! :)

-रंगा

रेवती's picture

18 Aug 2011 - 12:29 am | रेवती

लेखन आवडले.

निनाद's picture

18 Aug 2011 - 11:38 am | निनाद

चित्र उभी करण्याची ताकद आहे तुमच्या लेखनात. खिळवलेत. भावानांमधून करवलेला प्रवासही आवडला. पुढील भागाची प्रतीक्षा असेलच. शेवटी कविता गुंफण्याची कल्पना छानच.

जातीवंत भटका's picture

18 Aug 2011 - 5:11 pm | जातीवंत भटका

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत ....
--
जातीवंत वाचक ...

विलासराव's picture

19 Aug 2011 - 12:35 am | विलासराव

करता की घटना आपल्यासमोर घडतेय असं वाटत रहातं.

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2011 - 1:25 am | पिवळा डांबिस

कथानक आवडलं!
माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी.
पुढल्या वेळी प्रत्यक्षात शब्दांत तोंडभरून आभार मानून बघा, माझी खात्री आहे दुधात साखर पडेल...
:)

सोत्रि's picture

20 Aug 2011 - 10:52 am | सोत्रि

अवांतरः तेवढा तुमचा आय डी बदला की वो....शोभत नाय तुमच्या 'परिपक्व' लिखाणाला...

दहा लाख वेळा सहमत.

नितांत सुंदर लेखन! _/\_

- (किंगफिशरनेच हवेशी गोष्टी करणारा) सोकाजी

इनिगोय's picture

5 Nov 2014 - 10:54 pm | इनिगोय

हाही आवडला!

प्रसंग आणि कविता गुंफण्याची कल्पना चपखल..