ए टेल ऑफ टू सिस्टर्स

Primary tabs

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
16 Aug 2011 - 1:54 pm

द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले. हॉरर चित्रपटांची आवड असणार्‍या लोकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी आहेच पण सायकोलॉजीकल थ्रिलरची विशेष आवड असणार्‍या रसिकांना हा चित्रपट एक वेगळाच अनुभव देऊन जातो. चित्रपट पाहून काही काळ आपण खरेच सुन्न होऊन जातो. ह्यातले काही काही शॉट किंवा अचानक कथेला कलाटणी देणारे क्षण आपण बर्‍याच हिंदी, इंग्रजी चित्रपटात नक्की पाहिले असतील. मात्र हे सगळे शॉट आणि ही वळणे एकाच चित्रपटात पाहण्याची मजाच वेगळी.

सू-मी ह्या मुलीला एका मानसोपचार तज्ज्ञासमोर आणले जाते इथून पुढे तिच्याकडून तिची स्वतःची, तिच्या कुटुंबाची आणि एकूणच चित्रपटाची एक रहस्यरंजक आणि खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी उलगडत जाते.

सू-मी आपल्या सू-येओन* ह्या लहान बहिणीसमवेत आपल्या घरी परत आलेली असते. ह्यावेळी तिच्या स्वागताला तिचे वडील आणि नवीन सावत्र आई दोघेही हजर असतात. सावत्र आई विषयी दोन्ही मुलींच्या मनात अढी असतेच त्यात आता आपली सावत्र आई काहीतरी विचित्र आणि गूढ वागते आहे ह्या अनुभवाने तिच्याविषयी अधिकच संताप दाटू लागतो. आल्या दिवशी पहिल्याच रात्री सू-येओनला आपल्या खोलीत कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे असा भास होतो आणि ती घाबरून आपल्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपते. आपल्या लहान बहिणीला असे घाबरवण्यामागे आपल्या सावत्र आईचाच हात आहे ह्याबद्दल सू-मी ला मात्र शंका नसते.

दोन्ही मुली घरी परत येतात आणि अचानक बर्‍याच चित्रविचित्र घटना घडायला लागतात. त्याच रात्री सू-मी ला देखील एका भयानक स्वप्नाला सामोरे जावे लागते ज्यात तीच्या खर्‍या आईसारखी दिसणारी एक विचित्र भितीदायक स्त्री तिच्या बेडवर रांगत रांगत चढते. घाबरलेली सू-मी दचकून जागी होते आणि ह्या घरात नक्की काहीतरी विचित्र चालले आहे ह्याची तिला खात्री पटते. सावत्र आईच्या पाहुण्या येणार्‍या भावाबरोबर आणि त्याच्या बायकोबरोबर जेवण करायला दोघीही नकार देतात आणि सावत्र आईच्या रागात अजूनच भर पडते. जेवता जेवता सावत्र आईच्या वहिनीला अचानक फिट येते. फिट येऊन ती वळवळत असतानाच अचानक पडल्या पडल्या तिचे लक्ष सिंक च्या खाली जाते आणि भितीने थरारुन उठते. परत जाताना आपल्या नवर्‍याला ती आपण सिंक खाली एक जळालेली मुलगी पाहिल्याचे सांगते.

इकडे सावत्र आईला आपल्या आवडत्या पक्षांपैकी एक मेलेला आढळतो तर दुसरा मेलेला पक्षी सू-येओन च्या बिछान्यात सापडतो आणि तिच्या रागाचा स्फोट होतो. ती रागारागाने तिला अंधार्‍या कपाटात बंद करून ठेवते. इकडे अचानक काही आवाजाने जाग आलेली सू-मी आपल्या बहिणीच्या खोलीत येते. तिथे बहिणीला नसलेले पाहून ती काळजीत पडते, पण शेवटी ते आपल्या बहिणीला शोधून काढतेच. दोघी एकमेकींना मिठ्या मारून अश्रूंना वाट करून देतात. काही वेळाने दूसर्‍या पक्षाला व्यवस्थित पुरून त्यांचे वडील परत येतात तेव्हा सू-मी आपला सगळा संताप त्यांच्या समोर व्यक्त करते. शेवटी चिडलेले वडील सू-मी वर खेकसतात आणि "हे सगळे प्रकार तू कधी बंद करणार आहेस ? तुला बरी व्हायचे नाही आहे का?" असे विचारतात. सू-मी त्यावर आपली सावत्र आई लहान बहिणीवर सतत कसे अत्याचार करत असते ह्याचा पाढाच वाचते. आता मात्र संतापलेले वडील सू-मी वार खेकसतात आणि म्हणतात "ह्या सगळ्यातून बाहेर ये, प्लीज. सू-येओन मेलीये. ती कधीच मेली आहे, आत तरी ह्या सत्याचा स्वीकारा कर." हा शॉट संपतो आणि कथा एक वेगळेच वळण घेऊन आपल्याला गुंगवून टाकते.

दुसर्‍या दिवशी आपली बहीण पुन्हा नाहिशी झाल्याचे सू-मी च्या लक्षात येते आणि आपण राहून राहून आपल्या आईला एक रक्ताळलेले पोते ओढून नेताना पाहिल्याचे तिला आठवत राहते. आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी ती धावते मात्र पुन्हा सावत्र आई मध्ये पडते आणि त्यांच्यात जोरदार झटापट होते. थोड्या वेळाने तिचे वडील परत येतात मात्र तोवर सगळे अस्ताव्यस्त घर अगदी व्यवस्थित दिसत असते. मग नक्की त्या घरात घडलेले तरी काय असते आणि घडत तरी काय असते ?

कथा ह्यापुढे अनेक वळणे आणि फ्लॅशबॅक घेत जाते आणि आपल्याला थक्क करून सोडते. दोन्ही बहिणींचा सावत्र आई ही त्यांच्या वडिलांची एकेकाळची सहकारी असते आणि त्यांच्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी घरी राहतं असते हे सत्य फ्लॅशबॅक मधून समोर येते. आणि त्याच वेळी त्यांची खरी आई आणि लहान बहिणीबद्दल काय घडले हे देखील सामोरे येते.

सू-मी खरंच वेडी असते, आणि ह्या सगळ्या कल्पना रचत असते ? का खरंच त्यांच्या सावत्र आईने लहान बहिणीची हत्या केलेली असते ? सिंक खाली जळालेली आणि रांगत हिंडणारी मुलगी नक्की कोण असते ? सू-मी ची खरी आई भूत होऊन त्यांच्या घरात वावरत असते का ? का ह्या सगळ्या भूमिका एकटी सू-मी स्वतःच जगत असते ? ह्या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे कशी मिळत जातात ते चित्रपटातच बघण्यात खरी मजा आहे.

चित्रपट सगळ्याच अंगांनी सुंदर बनवलेला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो सतत धक्के देणारी कथा आणि कॅमेर्‍याच्या अतिशय सुरेख केलेला वापर. चित्रपटाबरोबर उपलब्ध असणारी सबटायटल्स देखील उत्तम. अर्थात सबटायटल्स शिवाय हा चित्रपट कळण्याची सुतराम शक्यता नाही हे मात्र खरे. भयानक चेहरे, कर्णकर्कश्य संगीत आणि उगाच अंधारी दृश्ये ह्या शिवाय देखील एक अतिशय थरारक चित्रपट आपल्या मनात भिती कशी उत्पन्न करू शकतो ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.

मौजमजाचित्रपटमाध्यमवेधआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Aug 2011 - 2:05 pm | प्रचेतस

चित्रपटाचे परीक्षण नेहमीसारखेच सुरेख आणि चित्रपट बघण्यास प्रवृत्त करणारे.

उत्तम परीक्षण..
लगे हात.. टोर्रांत ची लिंक पण देणे ;)

बद्दु's picture

16 Aug 2011 - 5:02 pm | बद्दु

टोरेन्ट नसेल तर कुठुन डाउन्लोड करावे याचेही थोडे मार्गदर्शन करावे.

निनाद's picture

16 Aug 2011 - 2:08 pm | निनाद

मस्त परिक्षण परा! वेगळ्या भाषेतल्या चित्रपटांकडे वळल्याबद्दल अभिनंदन....

अगदी याच कथेवर बेतलेला (कार्बन कॉपी म्हण हव तर) इंग्रजी सिनेमा पाहिल्याचे आठवते.
नाव आठवत नाहीये आत्ता.
चित्रपटाची थोडक्यात ओळख करुन देउन समोरच्याला तो बघण्यास प्रवृत्त करणारी तुझी लेखन शैली आवडते. :)
आठवला : The Uninvited (२००९)

स्पा's picture

16 Aug 2011 - 2:23 pm | स्पा

असेच म्हणतो....

त्यातली हिरवीण पण मस्तच होती दिसायला

योगी९००'s picture

16 Aug 2011 - 2:56 pm | योगी९००

परा साहेब..

तुम्ही लिहीलेल्या परिक्षणामुळे मी "ट्रॉय" चित्रपट पाहिला आणि तो नंतर माझ्या आवडीचा चित्रपट बनला. तुमच्या परिक्षणानंतर तो चित्रपट मी किमान ६-७ वेळा पाहीला असेन..त्यातला २ वेळा तर टिव्हीवर (डायलॉग म्हणत) पाहिला.

ह्या चित्रपटाबाबत तेच होईल असे वाटते...जास्तच भितीदायक असेल तर एकदाच पाहीन..

परिक्षण आवडले हे वे.सां.नको.

प्रियाली's picture

16 Aug 2011 - 2:56 pm | प्रियाली

काही टॉप हॉरर मूवीजच्या यादीत या चित्रपटाचे नाव आणि परीक्षण वाचले होते पण बघायचा योग आला नव्हता. आता पुन्हा आठवण झालीच आहे तर बघून घ्यावं म्हणते.

धन्यवाद! :)

भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे.

अगदी अगदी! त्यांच्या कल्पना जाम भन्नाट असतात.

मन१'s picture

16 Aug 2011 - 3:07 pm | मन१

मनोविकारासंदरभात कथा असावी असे वाटते.
भारतीय चित्रपटांपैकी "रात्र आरंभ"(मराठी), आणि "अपरिचित"(डब-दाक्षिणात्य) आणि काही प्रमाणात "दीवानगी" (हिंदी) ह्यांची आठवण झाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Aug 2011 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

विनायक प्रभू's picture

17 Aug 2011 - 6:50 pm | विनायक प्रभू

_/\__/|\_

सहज's picture

16 Aug 2011 - 3:30 pm | सहज

इथे समाजाला मुली का नको यावर गंभीर चर्चा चालू आहे आणी तुम्ही लोकांना घाबरवताय!

मेंदुचा भुगा करणारी स्टोरी आहे तर!

यकु's picture

16 Aug 2011 - 4:37 pm | यकु

आता बघावाच लागणार पराशेठ..
मस्त परिक्षण नेहमीप्रमाणे :)

प्राजक्ता पवार's picture

16 Aug 2011 - 4:48 pm | प्राजक्ता पवार

उत्तम चित्रपट परिक्षण .

जाई.'s picture

16 Aug 2011 - 5:01 pm | जाई.

+१

मृत्युन्जय's picture

16 Aug 2011 - 4:55 pm | मृत्युन्जय

चित्रपट परीक्षण चांगले आहे. पण आपल्याला हॉरर चित्रपट पहायला आवडत नसल्याने नाही बघणार.

समीरसूर's picture

16 Aug 2011 - 5:40 pm | समीरसूर

मला जाम आवडतात हॉरर आणि रहस्यमय चित्रपट बघायला.

इतक्या सुंदर परीक्षणानंतर हा तर पाहिलाच पाहिजे.. नक्की बघणार..

--समीर

जमलं तर आजच बघतो.

परिक्षण छानच लिहिले आहे.
आता शिनेमा बघायची गरज नाही.

शुचि's picture

16 Aug 2011 - 7:07 pm | शुचि

बाप रे! सिनेमा भीतीदायक आहे पण.

प्रभो's picture

16 Aug 2011 - 7:27 pm | प्रभो

मस्त परिक्षण रे!!

चित्रा's picture

16 Aug 2011 - 7:54 pm | चित्रा

काय भयानक स्टोरी आहे. :)

हे असे लहान मुलांना घेऊन काढलेले भयपट बघितलेले आहेत पण अंगावर येतात.

मात्र भयपटांमध्ये पक्षी मारणे अजिबात नावीन्यपूर्ण नाही. असा अजून निदान एक चित्रपट पाहिलेला आहे.

मुक्तसुनीत's picture

16 Aug 2011 - 8:10 pm | मुक्तसुनीत

उत्तम परीक्षण. चित्रपट पहायच्या यादीत टाकलेला आहे.

निमिष ध.'s picture

16 Aug 2011 - 8:21 pm | निमिष ध.

माझ्या आवडत्या हिरोयीनीच्या पिक्चर ची ओळख करून दिल्याबद्दल प रा ला धन्यवाद. मून गून-योंग अत्यंत सुंदर पण तितकाच चांगला अभिनय करणारी अभिनेत्री आहे. आम्ही पाहिलेला पहिला कोरियन चित्रपट सिटी प्राईड कोथरूड मध्ये तिचाच होता.

मध्यंतरी तिची नवीन मालिका पाहण्यात आली. (हो आम्ही हल्ली कोरियन मालिका पाहतो) मालिकेचे नाव सिंड्रेला उन्नी (सिंड्रेलाची मोठी बहिण). खूप सुंदर अभिनय केला आहे त्यात सुद्धा तिने. एका लहानपणी दुखावल्या गेलेल्या मुलीची कहाणी.

अरे लिहायला पाहिजे कोरियन मालिकांबद्दल. मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्या संपतात !!!! .. वर्षानुवर्षे नुसत्या चालू राहत नाहीत.

जरा वेळ मिळाल्यावर नक्की टाकेन परीक्षण तिच्या अजून चित्रपटांचे आणि मालिकांचे.

धन्या's picture

16 Aug 2011 - 8:28 pm | धन्या

मस्त चित्रपट परीक्षण पराशेठ.

एक शंका: तू परकीय भाषेतील चित्रपट भाषेचं काय करतो? प्रत्येक वेळी इंग्रजी सबटायटल मिळतातच असे नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2011 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा

नक्कीच पाहिला जाइल...

स्मिता.'s picture

16 Aug 2011 - 9:12 pm | स्मिता.

परिक्षण आवडलं. मी सहसा भयचित्रपट बघणे टाळते (मला भीती वाटते) पण हे परिक्षण वाचून नक्की रहस्य काय असेल याची उत्सुकता वाटतेय.

रहस्यभेद खरडवहीत/ व्यनिने केलास तर बरं होईल ;)

स्पंदना's picture

17 Aug 2011 - 7:02 am | स्पंदना

मस्त हो परा भाउ! पण मी नाही पाहणार. साधा कॅस्टर पाहताना माझी काय अवस्था झाली काय सांगु?
पण कोरियन पिक्चर मला आव्डतात. मी बाकिचे सिनेमा पहाते.

मागे एकदा कुठेतरी असे वाचले होते की "डिप्लोमॅटिक व्यक्ती" म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला एवढे सुंदर कन्विंस करते कि तुम्ही नरकात जायला देखिल अतिशय उत्साहाने तयार होता. :)

परा चे हे परिक्षण वाचून क्षणभर मनात हाच विचार आला. हे परिक्षण एवढे छान झाले आहे कि मंडळी अतिशय उत्साहाने हा भयपट पहावयला तयार होतील. ;)

ह्या चित्रपटाचा काहि भाग मागे एकदा टिव्हिच्या एका वाहिनीवर पाहिल्याचे स्मरते. तेंव्हापासून ह्या चित्रपटाचे नाव शोधत होतो. पराशेठ तुम्ही डोन्लोड मारला असेल तर आमच्या करीता एक प्रत काढून ठेवाल का?

अभिज्ञ.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2011 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

सर्वांचे धन्यवाद.

@अभिज्ञ :- प्रत आहे माझ्याकडे. कॅफेवर येउन कधीपण घेऊन जा मालक.

@ धवा :- सहसा जालावर इतर भाषातले (इंग्रजी सोडून) चित्रपट अपलोड झालेच तर ते सबटायटल्स बरोबरच होतात. अन्यथा ते डाऊनलोड कोण करणार ? इतर भाषीक दर्शक सबटायटल्स नसतील तर फाईल डाऊनलोडच करत नाहीत. त्यातून एखाद्या चित्रपटा बरोबर सबटायटल्स नसतीलच तर :-

१) ओपनसबटायटल्स

२) सबसेन्स

३) मूव्हीसबटायटल्स

४) ऑलसब्स

सारख्या संस्थळांवर हव्या त्या भाषेतली सबटायटल्स मिळुन जातात.

मिडीया प्लेयर क्लासिक सारखा मूव्ही प्लेयर वापरला, तर तो तर जालावरुन स्वतःच सबटायटल्स शोधून प्ले करतो.

@ भयकथा म्हणून चित्रपट बघायला तयार नसलेले :- हा चित्रपट आवर्जून बघाच. ही भयकथा आहे पण अंगावर येणारे सिन्स किंवा अगदी रक्ताचे पाट वगैरे ह्यात काही नाही. भयकथा म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी तरी हा चित्रपट बघाच.

स्वाती दिनेश's picture

17 Aug 2011 - 2:06 pm | स्वाती दिनेश

परा, परीक्षण आवडले, नेहमीप्रमाणेच!
चित्रपट नक्कीच बघावासा वाटतो आहे,
स्वाती

विनीत संखे's picture

17 Aug 2011 - 2:36 pm | विनीत संखे

पाहिलाय. मनोरहस्यरंजन देणारा एक अप्रतिम चित्रपट असं माझं मत आहे. शेवट थोडा चकवून अन चक्रावून जातो पण संपूर्ण चित्रपट आपल्या कथेस असंबद्धाची जोड देऊन खिळवून ठेवतो.

स्वतन्त्र's picture

17 Aug 2011 - 4:06 pm | स्वतन्त्र

परीक्षण मस्तच.
उत्सुकता लागून राहिली आहे...असे चित्रपट तुमच्या हाती कसे लागतात हो ?
आता हा भयपट बघणारच.
जमल्यास टोर्रेंट चा दुवा देण्याचा प्रयत्न करा !

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2011 - 5:01 am | राजेश घासकडवी

परीक्षण खूप आवडलं. मीदेखील हॉरर सिनेमांच्या भानगडीत पडत नाहीत. कारण त्यात विकृत चेहरे, ओंगळवाण्या कृती अंगावर येतात. तसली शॉक ट्रीटमेंट मला आवडत नाही. याउलट साध्या प्रसंगांतून काहीही बीभत्स न दाखवताही भीती हळूहळू वाढवत जाता येते. हिचकॉकच्या बर्ड्स सिनेमामध्ये झाडावर पक्षी येऊन बसतात. त्यांची संख्या वाढत जाते. एवढ्यामधून काहीतरी अभद्र घडणार हे जाणवायला लागतं.

वरचा सिनेमा तसाच संयम बाळगून कथावस्तूतून भीती निर्माण करणारा आहेसं दिसतं. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 6:47 pm | प्रियाली

ओंगळवाणं आणि बीभत्स म्हणजे भीती नाही. ओंगळवाणं आणि बीभत्स म्हणजे किळस. किळस माणसाला डोळे बंद करून घेण्यास भाग पाडते कारण त्याला ती सहन होत नाही. भीतीचा त्याच्याशी दूरान्वये संबंध लागतो इतकेच. हिचकॉकला हे नक्की माहित असावं. माणसाला ज्या अनेक गोष्टींची भीती वाटते उदा. उंचीची भीती, काळोखाची भीती, बंद जागेची भीती, अनपेक्षिताची भीती या अनेक प्रकारच्या भीतीत काहीही ओंगळ आणि किळसवाणं नसतं. खुद्द हिचकॉकला अंड्याची प्रचंड भीती वाटत असे. (हिचकॉक स्वतःचा तुळतुळीत गोटा आरशात बघतच नसावा बहुधा ;) )

कोणतेही किळसवाणे प्रकार न दाखवता अतिशय भीतीदायक चित्रपट, कथा तयार करता येतात.

आपली,
(भीती-स्पेशालिस्ट) भयाली.