भन्नाट ४

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 1:48 pm

भन्नाट
भन्नाट २
भन्नाट ३

"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यात आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...."

ऐकूनच फिरोज सुन्न झाला. गाडीकडे त्याची पळत येणारी पावले पाहूनच मंदारला पुढच्या स्थितीचा अंदाज आला आणि त्याने ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. "मंदार आपल्याला व्यवस्थित लटकवण्यात आलेले आहे" आपले शरीर गाडीच्या मागच्या सिटवर फेकता फेकता फिरोज म्हणाला. फिरोजकडून संपूर्ण हकिगत ऐकून मंदार आणि दारा देखील सुन्न झाले.

"आता ?" दारा मंदारकडे पाहतं म्हणाला.

"फिरोज कायद्यापासून पळण्यात काही हशील आहे असे वाटत नाही. बेटर वे आपण आधी त्या स्पॉटला जाऊन नक्की प्रेते कोणाची आहेत ते पाहू आणि मग ठरवू." मंदार म्हणाला.

"बरोबर आहे मंदार, पण आता येवढ्या रात्री जामीन मिळणे देखील अशक्य आहे. म्हणजे सुटका व्हायला सकाळ होणार. अशा परिस्थितीत आपल्यातला कोणीतरी एक बाहेर राहणे गरजेचे आहे." दाराने पटतंय अशा थाटात मान डोलवली.

शेवटी फिरोजला पुन्हा कोळीवाड्यापाशी सोडून टॅक्सीने मंदार आणि दारा लॉजकडे निघाले. मंदारला येताना पाहून हवालदार गायतोंडे लगबगीने पुढे झाला. "साहेब, थांबू नका इथं. तुम्हा तिघांच्याभी नावानं वारंट निघाल्यात." त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकून मंदार पुढे सरसावला.

मंदार आणि दाराला पाहताच एक टकल्या इसम जोर जोरात त्या दोघांकडे पाहून हातवारे करत काहीतरी बोलायला लागला आणि संपूर्ण गर्दीचे लक्ष त्यांच्याकडे वेढले गेले. बंदोबस्तावर असलेल्या इन्स्पेक्टर नाईकने लगेच पुढे होऊन मंदारला वाट करून दिली. मात्र त्याने खुणेनेच आपल्याभोवती पोलिसांचे कडे केले आहे हे मंदारच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.

"डोंट वरी ऑफिसर. कायद्यापासून पळायचे असते तर मी इकडे आलोच नसतो. मला फक्त प्रेतं बघायची आहेत, त्यानंतर आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत." झपाझप पुढे होऊन मंदारनी आधी प्रेतं बघितली. त्याच्या चेहर्‍यावरच्या काळजीच्या छटा बर्‍याच कमी झाल्या आणि मनात साठलेली भिती नाहिशी झाली. मेलेल्या दोन्ही स्त्रिया अनोळखी होत्या. रमीची चिंता मात्र आता त्याच्यासाठी दहापटीने वाढली होती. त्याचवेळी कडकडा आवाज होऊन खोलीतला एका खांब दाराच्या ताकदीपुढे शरणागती पत्करून धाराशायी झाला. त्या स्त्रियांच्या प्रेताकडे बघताना दाराच्या चेहर्‍यावरची शीर आन शीर फुगली होती, लाल चेहरा आणि डोळे नुसते आग ओकत होते. शंकाच नाही ती प्रेतं दाराच्या साममधल्या अनेक बहिणींपैकी दोघींची होती. मंदारने पुढे होऊन शांतपणे दाराच्या खांद्यावर हात ठेवला, मात्र पुढच्याच क्षणी मंदारला झटका मारून दारा बाल्कनीतून उडी मारून नाहीसा झाला होता.

क्षणार्धात घडलेल्या त्या प्रसंगाने सगळेच बावरले, मात्र पुढच्याच क्षणी इन्स्पेक्टर नाईकाने सगळ्यात शहाणपणाचे कृत्य केले आणि ते म्हणजे पुढे होऊन मंदारच्या हातात बेड्या अडकवल्या.

अर्ध्या तासातच मंदारला हेडक्वार्टरला आणण्यात आले. कमिशनर मामा मु़ळे आणि एकूणच त्याच्या नावाच्या दबदब्यामुळे थर्ड डिग्रीची शक्यात बिलकुल नव्हती, मात्र पोलिसांच्या सरबत्तीला तोंड द्यावेच लागणार होते. थोड्याच वेळात मंदारला चौकशीच्या खोलीत हालवण्यात आले. एक छोटेसे टेबल, त्याच्या बाजूला एक मोडकी खुर्ची आणि तीच्या भोवती कडे करून उभे असलेले चार पोलिस. आणि त्या सगळ्यांच्या म्होरक्या इन्स्पेक्टर लाल.

"मंदार, रमीच्या बाबत जे झाले ते दुर्दैवी आहे आणि संपूर्ण खाते तिचा तपास घेतच आहे. मात्र तू आता सर्व प्रश्नांची उत्तरे खरी दिलीस तर त्यांतून आम्हाला पुष्कळ मदत होईल." मंदारने एकदा प्रश्नार्थक नजरेने लाल कडे पाहिले.

"मंदार तुम्ही गफुरला भेटायला कशासाठी गेला होतात ? ह्या सगळ्या प्रकरणात दारा आणि फिरोज काय करत आहे ? आणि प्लीज आता कोण गफुर असे विचारू नकोस... कारण तुम्ही अपंग केलेल्या गफुरच्या सगळ्या माणसांना आम्हीच ऍडमिट केलंय."

मंदारच्या चेहर्‍यावर एक लहानसे हसू फुटले. "इन्स्पेक्टर, आम्ही फक्त काही माहिती मिळवण्यासाठी तिथे गेलो होतो. त्याच्या माकडांशी आमची थोडीची झटापट झाली, मात्र माहिती मिळताच आम्ही तिथून बाहेर पडलो."

"अशी कोणती महत्त्वाची माहिती होती मंदार ज्या साठी तुम्हाला गफुरचा खून करावा लागला? आणि इतर तीन खून कशासाठी मंदार ? साक्षीदार नाहीसे करण्यासाठी ?"

"तुमची चूक होतीये इन्स्पेक्टर, आम्ही तिथून बाहेर पडलो तेव्हा गफुर जिवंत होता, आणि तो दुसरा मेलेला माणूस रघुवीर आहे हे आम्हाला त्याचा खून झाल्यावर समजले. उलट त्यावेळी आम्ही ह्या रघुवीरच्या शोधात बाहेर पडलो होतो. खोटे वाटत असेल तर तुम्ही इन्स्पेक्टर सयगलशी बोलून खात्री करू शकता."

"त्याची गरज नाही आता मंदार. बाय द वे दारा बुलंद का पळाला ? आणि फिरोज कुठे आहे?"

"मला खरंच काही कल्पना नाही "

"डोंट लाय मंदार ! फिरोज पुरावे लपवण्यासाठी मागे राहिला आणि तू दाराला घेऊन एखाद्या मदतगाराच्या सारखा आमच्याकडे आलास. निव्वळ धूळफेक करण्यासाठी."

"तुम्ही काय हवे ते समजा इन्स्पेक्टर, पण हे चारी खून आम्ही केलेले नाहीत. निव्वळ एका खोट्या साक्षीवरून तुम्ही आम्हाला अडकवू शकत नाही."

"चार नाही पाच खून मंदार. तुला चौकशीला आणण्याआधीच फोन आला होता, येवढ्या बंदोबस्तात कुणीतरी मान मोडून लॉजच्या मॅनेजरचा खून केलाय, आणि डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे हे एखाद्या अमानुष ताकद असलेल्या माणसाचे काम आहे." क्षणार्धात मंदार समोर तुटलेला खांब तरळून गेला.

"तुम्हाला काय म्हणायच इन्स्पेक्टर?"

"मला काहीच म्हणायचे नाहीये मंदार. आता जे बोलायचे ते कोर्ट बोलेल."

"पण तुम्ही मला असे अडकवून ठेवू शकत नाही ! तुमच्याकडे ह्या सगळ्याचा काही पुरावा आहे?"

"पुरावा, साक्षीदार सगळे हजर आहेत मंदार." येवढे बोलून लाल बाहेर निघाला. पण काहीतरी विचार करून तो पुन्हा मागे वळला. "अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे."

लाल बाहेर पडला तेव्हा मंदारच्या डोळ्यासमोरचा अंधार गडद होत चालला होता.

"बॅरिस्टर दीक्षित, मला ह्या केसमध्ये एकही लूप होलं नकोय ! मंदार माझा भाचा असला तरी तो गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पोलिस खात्याची इज्जत वेशीला टांगली गेलीये" कमिशनर साहेब गरजले.

"चार तारखांत संपवतो मी हि केस. सगळे पुरावे हजर आहेत, ब्रम्हदेव जरी खाली आला तरी आरोपी सुटणे शक्यच नाहीत !"

"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे."

कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले.

(क्रमशः)

कथासाहित्यिकमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

27 Jan 2011 - 1:54 pm | नन्दादीप

सही एंट्री टाकलीत राव बॅरिस्टर अमर विश्वासची.

मज्जा येणार आता.....

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 2:00 pm | स्वाती दिनेश

अब आगे क्या...?
लवकर लिही रे..
स्वाती

टारझन's picture

27 Jan 2011 - 2:02 pm | टारझन

मस्त रे पर्‍या ... क्रमश: असलं तरी चालु राहु देत मालिका ...

ओ परा भाऊ

असे नानू भाग का हो लिवता तुम्ही....

वाचायला सुरुवात केल्यावरच भाग संपला ....
एवढ्या दिवसांचा ब्रेक घेताय तर जरा जास्त लिवा...

बाकी हा भाग पण जबराट :)

इतक्या दिवसांचा ब्रेक?????
आता आधीचे भाग परत चाळावे लागणार आधी.

प्रचेतस's picture

27 Jan 2011 - 2:15 pm | प्रचेतस

पुढचे भाग पटापट लिही. उगा उत्सुकता ताणून धरू नकोस.

गणेशा's picture

27 Jan 2011 - 2:24 pm | गणेशा

अतिशय सुंदर लिहित आहात, मस्त

लिहित रहा ... वाचत आहे

खलास..

म्हणजे आता पुढे कोर्टातल्या सीन्सची मेजवानीही मिळणार अशी आशा जागी झाली..हा आमचा अत्यंत आवडता भाग..

पराभौ..मानलं तुम्हाला..फक्कड जमत चाललीय कथेची रेसिपी..

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 3:03 pm | कच्ची कैरी

माझ्यासाठी तर हाच पहिला भाग आहे मी याआधीचे वाचलेले नाही ,आता वाचावे लागतील.

ढब्बू पैसा's picture

27 Jan 2011 - 3:38 pm | ढब्बू पैसा

पराशेठ, अमर विश्वासची एंट्री फक्कड! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. थोडं पटापट लिवा की!

असुर's picture

27 Jan 2011 - 4:07 pm | असुर

परावळकर,
सही चाललीये गाडी!!! पुलेशु!!!

--असुर

मस्त रे.... पुढच्या भागासाठी एवढा वेळ लावु नको राव.

- सूर्य.

सारा आलम's picture

27 Jan 2011 - 4:45 pm | सारा आलम

सुहास शिरवळकर हा माझा अत्‍यंत आवडता लेखक. जेव्‍हा खूप काम करुन कंटाळा आलेला असेल किंवा फ्रेश व्‍हायचे असेल तेव्‍हा मी सुशि ची कुठलीही कादंबरी घेते आणि वाचूनच परत ठेवते. तुम्‍ही एकत्र आणलेले सर्वच नायक आपापल्‍या वैशिष्‍टयांसकट वेगळे आणि तरीही ते एकत्र आलेले प्रचंड आवडले. सहजच चाळता चाळता ही कथा वाचली आणि एकदम युरेका असा गलका करावसा वाटला. मग रोजच पुढचा भाग टाकलाय का हे बघण्‍याची सवयच लागली. सगळेच भाग वाचलेत आणि सगळेच्‍या सगळे जमलेत अगदी सुशि स्‍टाइल. हा ही भाग मस्‍तच. आता अमर विश्‍वास ची एंट्री म्‍हणजे मग दीक्षितांचे काही खरे नाही. पुढच्‍या भागासाठी शुभेच्‍छा आणि प्रतीक्षेत.

मस्तच, पुढचा भाग लवकर टा़का परु शेठ..........

धमाल मजा येते आहे, लिहा लिहा पुढचा भाग लवकर आणि मोठा.

पुलेशु.

स्वाती२'s picture

27 Jan 2011 - 10:24 pm | स्वाती२

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

चिगो's picture

27 Jan 2011 - 10:40 pm | चिगो

टपल्या टपल्या... आला रे आला, अमर आला !!
येकच लंबर, पराशेठ...

>>"अरे हो मंदार, तुला सांगायचेच राहिले. आमच्या गस्ती पथकाने कोळीवाड्याच्या जवळ फिरोजला अटक केलीये. त्याच्या गाडीत चारी खुनांसाठी वापरलेले पिस्तूल देखील सापडले आहे आणि गंमत म्हणजे त्याने खुनांची कबुली देखील दिली आहे."

आयचा घो, हे काय इपरीत? :-(

>>"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे."

कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले.

अर्रा ब्वॉ, झ्यॅन्ग फटॅन्ग... :-)

स्वानन्द's picture

27 Jan 2011 - 10:47 pm | स्वानन्द

आला रे आला... अमर विश्वास पण आला!!!

प्राजु's picture

28 Jan 2011 - 12:14 am | प्राजु

पुढे??

अवलिया's picture

28 Jan 2011 - 1:17 pm | अवलिया

पुढे ?

sneharani's picture

29 Jan 2011 - 3:01 pm | sneharani

पुढे?
जास्त वेळ लावू नकोस्..पटापट लिही पुढचा भाग!

मस्तानी's picture

28 Jan 2011 - 7:08 pm | मस्तानी

तुमची ही कथा वाचून आता सुशि यांच्या मूळ कथा वाचण्याची इच्छा निर्माण झालीये ! पुढचा भाग थोडा लवकर लिहा ... भाग ३ आणि ४ मध्ये बराच वेळ गेला तसं नका करू.
आणि हो ... वाढदिवसाच्या आणि पुढील लिखाणास शुभेच्छा !

शहराजाद's picture

31 Jan 2011 - 3:32 am | शहराजाद

पुढचे भाग लवकर टाका बुवा.

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 5:52 am | गुंडोपंत

"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." जबरी रे!
वाचतो आहे. पुढील भाग लवकर यावा...

सुहास..'s picture

31 Jan 2011 - 12:54 pm | सुहास..

झ्याक रे परा !!

प्राजक्ता पवार's picture

1 Feb 2011 - 5:20 pm | प्राजक्ता पवार

सह्ही ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Feb 2011 - 3:35 pm | निनाद मुक्काम प...

तुमची विश्रांती क्षणभर नव्हती .
भरपूर दिवस आम्हाला वाट पाहायला लावून कथेचा इतकासा भाग अडकवला आहे ( ये दिल मांगे मोर ).
निदान पुढच्या भागात संपूर्ण कोर्ट रूम ड्रामा येउदे .

आणि अजूनही टकलावर खारका मारतात की नाही?