मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
23 Apr 2008 - 3:33 am

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)
---------------------------------------
मृत्यू आणि त्याचे थैमान ह्याबद्दल बोलताबोलता निसर्गातली वेगवेगळी प्रतिके घेऊन आपल्याला 'मधुशालेची' महती सांगणार्‍या कवीची आपल्याला ओळख झाली आहेच.

आता पुढच्या रुबायात अचानकपणे कवितेतल्या भावनांचा सांधेबदल झाला आहे असे मला जाणवले - तुम्हालाही जाणवेल.
एखादे दु:खी मूल एकदम हसरे आणि खेळकर होऊन घरभर नाचू बागडू लागावे तसाच कवीच्या मानसिकतेत झालेला बदल आपल्याला जाणवतो ह्या पुढच्या रुबाया वाचताना.
ह्यातली रुपके वाचत जाताना बालकवींची निसर्गकविता तर वाचत नाहीये ना इतका मी अचंबित होऊन गेलो!
एकाएकी असा बदल होण्याचे कारण काय असावे?
संपूर्ण मधुशालेचा एक काव्य म्हणून अधिक विचार करता मला असे जाणवले की संपूर्ण काव्य हा एक जीवनालेखच आहे. आणि त्यात माणसाच्या एकूण जन्मापासूनच्या प्रवासात घेतलेला हा एक लहानवयातला टप्पा तर नसेल? लहान असताना बालकाच्या निष्पाप नजरेत सगळं जग असंच तर असतं की? सगळ्याच गोष्टींचं एक अपार कुतुहल असतं, सगळंच सुंदर आणि अचंबित करुन टाकणारं भासत असतं. सगळंच देवाचं देणं असतं!
(अवांतर - मुले एखाद्या गोष्टीत जेवढी तल्लीन होतात तसा मी एक दिवस जरी होऊ शकलो तरी तो दिवस अत्यंत समाधानाचा, आत्मानंद देणारा जातो:)

चला घेऊयात आस्वाद - रुबाया ३१ ते ३५ -
---------------------------------------
मधुशाला -

तारक मणियों से सज्जित नभ बन जाए मधु का प्याला,
सीधा करके भर दी जाए उसमें सागरजल हाला,
मत्त समीरण साकी बनकर अधरों पर छलका जाए,
फैले हों जो सागर तट से विश्व बने यह मधुशाला।।३१।

अधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला,
भाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला,
हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती,
आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला।।३२।

पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,
भरी हुई है जिसके अंदर पिरमल-मधु-सुरिभत हाला,
माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं,
झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला!।३३।

प्रति रसाल तरू साकी सा है, प्रति मंजरिका है प्याला,
छलक रही है जिसके बाहर मादक सौरभ की हाला,
छक जिसको मतवाली कोयल कूक रही डाली डाली
हर मधुऋतु में अमराई में जग उठती है मधुशाला।।३४।

मंद झकोरों के प्यालों में मधुऋतु सौरभ की हाला
भर भरकर है अनिल पिलाता बनकर मधु-मद-मतवाला,
हरे हरे नव पल्लव, तरूगण, नूतन डालें, वल्लरियाँ,
छक छक, झुक झुक झूम रही हैं, मधुबन में है मधुशाला।।३५।

भावानुवाद -

नक्षत्रांच्या नभांगणाचा बनुन जाउदे मधु प्याला,
करुन सरल तो त्यात भरुया सिंधूजलाच्या मदिरेला
हिंदोळे अधरावर तिजला, धुंद साकी जणु वायूही,
अथांग तीरावरी सागरी, विश्वचि बनुदे मधुशाला ||३१||

अधरांवरि जरि रस कुठलाही, भासे मदिरा रसनेला,
पात्रहि कुठले धरता हाती , दिसे जणू करि मधु प्याला,
बदलुन जाती चेहरे सगळे बनती सारे साकीचे
काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला ||३२||

वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला,
अंतरात ती घेउन बसती परिमल गंधित मद्याला,
सततच मागति भ्रमरदले मधु मदिरा करण्या प्राशनही,
मंदचि होती, झिंगुन जाती, उपवन जणु हे मधुशाला ||३३||

रसभरित तरुही साकी असती, पुष्पमंजिरी जणु प्याला,
हिंदोळती मग तेच आतुनी मंद सुगंधित मद्याला,
लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे,
वसंतऋतु हा घेउन येई, आमराई जणु मधुशाला ||३४||

भरुनी अंतरी झुळुक येतसे वसंतसौरभ मद्याला,
धुंदच होउन पुन्हा पुन्हा तो अनिल भरितसे प्यालाला,
हरित पल्लवी आणिक तरुगण, शाखा नूतन वल्लरिही
पिउनी छुमछुम डोलत राही, मधुबनि आहे मधुशाला ||३५||

चतुरंग

हे ठिकाणआस्वादप्रतिभाभाषांतर

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

23 Apr 2008 - 12:55 pm | अभिज्ञ

मागिल सर्वच भागांप्रमाणे हा हि अनुवाद छान झालाय.
आवडला.

बाकि.
अवांतर - मुले एखाद्या गोष्टीत जेवढी तल्लीन होतात तसा मी एक दिवस जरी होऊ शकलो तरी तो दिवस अत्यंत समाधानाचा, आत्मानंद देणारा जातो:
वा, क्या बात है. अगदि मनातले बोललात.

अबब

विसोबा खेचर's picture

23 Apr 2008 - 3:38 pm | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख अनुवाद!

ह्यातली रुपके वाचत जाताना बालकवींची निसर्गकविता तर वाचत नाहीये ना इतका मी अचंबित होऊन गेलो!

अगदी सहमत आहे..! एक एक ओळ अगदी अप्रतीम उतरली आहे रे रंगा!

जियो..!

आपला,
(मधुशालाप्रेमी!)

अवांतर - इतक्या सुंदर भाषांतरीत काव्याला इतके कमी प्रतिसाद मिळावेत याची एक मिपाकर म्हणून मला शरम वाटते!

आपला,
(उदास!) तात्या.

अजय's picture

23 Apr 2008 - 7:39 pm | अजय

अधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला,
भाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला,
हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती,
आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला।।३२।

---
अधरांवरि जरि रस कुठलाही, भासे मदिरा रसनेला,
पात्रहि कुठले धरता हाती , दिसे जणू करि मधु प्याला,
बदलुन जाती चेहरे सगळे बनती सारे साकीचे
काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला

सुन्दर भावानुवाद!!!!!!!

आपला,
(मधुशालाप्रेमी!)

धनंजय's picture

23 Apr 2008 - 8:47 pm | धनंजय

प्रत्येक हप्ता बढियाच बढिया.

काही बदल सुचवतो -

(३१)
मत्त समीरण साकी बनकर अधरों पर छलका जाए,
येथे माझ्या मते साकी ओठांवर छलकत नसून साकी ओठांवर मदिरेला छलकवत आहे
म्हणून :
हिंदोळे अधरावर बनुनी, धुंद साकी जणु वायूही,
ऐवजी
हिंदोळे अधरावर तिजला, धुंद साकी जणु वायूही,
असे चालेल का? "तिजला" म्हणजे सिंधुजलाच्या मदिरेला.

(३२)
आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला
याचा तुमचा भावानुवाद आहे
काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला
हे मला फार आवडले आहे, आणि तुमचा मौलिक विचार आहे. (नयनां"मध्ये" मधुशाला, आणि नयनां"मधून" मधुशाला या कल्पनांत बराच मोठा फरक आहे. पहिली बच्चन यांची, दुसरी तुमची - दोन्ही कल्पना मोठ्या रम्य आहेत.) बच्चनांचे रूपक ठेवण्यासाठी असे करता येईल का?
काहि असो तरि नजरेपुढती, नयनीं वसते मधुशाला
तुमचे नवे रूपकही फार आवडले, हे पुन्हा सांगतो.

(३३)
पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,
याचा तुमचा भावानुवाद आहे
वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला,
"ले ले" चे दोन अर्थ होऊ शकतात "१. घेऊन-घेऊन" किंवा "२. तू घेऊन टाक"
तुम्ही दुसरा अर्थ मानला असला तरीही, माझ्या मते मधुशालेच्या रूपकात प्रथम अर्थ अधिक चांगला बसतो.
मद्य = फुलांचा सुगंध
प्याला=फूल
साकी=फुलझाडे
पीणारे=भुंगे
मधुशाला=बगीचा
मग इथे हा "तू" कोण चोंबडा रूपक बिघडवतो आहे :-) "ले ले" चा पहिला अर्थ वापरावा, असे करता येईल का? (तुमचा अर्थ चूक आहे, असे म्हणत नाही. तुम्हाला पटत असेल तर तसाच ठेवा.)

(३४)
छक जिसको मतवाली कोयल कूक रही डाली डाली
याचा तुमचा भावानुवाद आहे
लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे,
येथे मुळातल्या रूपकात कोकिळ (कोकीळा म्हणा) पिणारा मतवाला आहे, हे स्पष्ट रूपक आहे. पण तुमच्या भावानुवादात कोकिलकूजन लुब्ध आहे, त्यामुळे रूपकात मतवाला कोण आहे ते जरा अस्पष्ट आहे. असे काही चालेल का?:
चाखुनी त्याला कोकिल करिती आम्रतरुंवर कूजनही

(३५)
येथे मुळात रूपक असे आहे :
मद्य = मधुऋतु-सौरभ
प्याला=झकोर
साकी=अनिल
पीणारे=मधु-मद (झिंग चढलेल्या वनस्पती)
मधुशाला=मधुवन
हे जितके स्पष्ट दिसते तितके भावानुवादात दिसत नाही.
मंद झुळुक जणु भरुनी आणिते वसंतसौरभ मद्याला,
धुंदच होउन पुन्हा पुन्हा तो वायू भरितसे प्यालाला,
हरित पल्लवी आणिक तरुगण, शाखा नूतन वल्लरिही
छमछम छुमछुम डोलत राही, मधुबनि आहे मधुशाला ||३५||

प्याला म्हणजे नेमके काय? पिणारे नेमके कोण? हे रूपक नीट समजून येत नाही. काहीतरी बारीकसारीक बदल करावा लागेल असे वाटते.

मी भावानुवादाची प्रगती आनंदाने वाचत आहे. या कस्पटासारख्या शंका-कुशंका ओसांडणार्‍या कौतुकाच्या पुरात वाहाणारा केवळ पाचोळा आहे, असे समजा.

चतुरंग's picture

26 Apr 2008 - 6:30 pm | चतुरंग

तुम्ही सुचविलेल्या बदलांपैकी मला ३१ आणि ३५ मधले बदल भावले त्याप्रमाणे अगदी थोडासा बदल करुन अर्थात अधिक सुस्पष्टता आली आहे.
रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा आभार.

चतुरंग

प्राजु's picture

23 Apr 2008 - 8:53 pm | प्राजु

पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,
भरी हुई है जिसके अंदर पिरमल-मधु-सुरिभत हाला,
माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं,
झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला!।३३।

वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला,
अंतरात ती घेउन बसती परिमल गंधित मद्याला,
सततच मागति भ्रमरदले मधु मदिरा करण्या प्राशनही,
मंदचि होती, झिंगुन जाती, उपवन जणु हे मधुशाला ||३३||

क्या बात है...!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रसभरित तरुही साकी असती, पुष्पमंजिरी जणु प्याला,
हिंदोळती मग तेच आतुनी मंद सुगंधित मद्याला,
लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे,
वसंतऋतु हा घेउन येई, आमराई जणु मधुशाला

सुरेख.....

(वसंत प्रेमी)
मदनबाण

(सर्व मि.पा.करांच्या प्रोत्साहनामुळे हा भावानुवादाची प्रगती सुरु आहे! धन्यवाद!!)
चतुरंग