मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
12 Mar 2008 - 8:40 pm

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)

पहिल्या पाच रुबायात मदिरेची 'तोंड'ओळख झाली आहे!:)
कवि स्वहस्ते मद्य निर्मून ते रसिकाला पिलवणार आहे आणि हा मदिरेचा साठा अक्षय आहे ह्याबद्दलचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगाच आहे!
स्वतःच्या कल्पक निर्मितीमधून तो रसिकाला काय देणार आहे ते तो जाहीरपणे सांगतोय.
--------------------------------------------------------
इथून पुढे आपण नंतरच्या पाच रुबाया (क्र. ६ ते १०) पाहूयात.

मदिरेसाठी तू कुठे जावेस? रसिकाला ह्याची खरी जाण फक्त मीच देऊ शकेन हे कवीचे सांगणे आहे असा एक अर्थ तर ह्यातून निघतोच पण अधिक सूक्ष्म विचारांती आपण अंतर्मुख व्हायला लागतो.
जीवनाच्या प्रवासात लागणारी वेगवेगळी ठिकाणे हाच अंतिम मुक्कम आहे असे आपल्याला कैक वेळा वाटत असते आणि ते गंतव्य स्थल नाही हे समजले की आपण निराश होतो, खचून जातो. वाटेतली वेगवेगळी माणसे वेगवेगळे सल्ले देत असतात त्यांना समजेल ते आणि समजेल तसे सांगत असतात आणि तरीही कोणालाच खरा मार्ग माहिती नसतो!
इथे कवी रसिकाला तो मार्ग शोधायला मदत करतो आहे पण कशी? तर त्याचे मनोबल वाढवून - त्याची वाट बदलायला लावून नाही; कारण हा मार्ग ज्याचा त्याने धुंडाळायचा असतो आणि तो तसा का ह्याचे कारण ती गुंग करून टाकणारी जीवनरुपी सुराच आहे!!
हे जीवनातले वास्तव हरिवंशराय यांनी किती समर्पक शब्दात मांडले आहे पहा -

मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवाला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।

चलने ही चलने में कितना जीवन, हाय, बिता डाला!
'दूर अभी है', पर, कहता है हर पथ बतलानेवाला,
हिम्मत है न बढूँ आगे को साहस है न फिरुँ पीछे,
किंकर्तव्यविमूढ़ मुझे कर दूर खड़ी है मधुशाला।।७।

मुख से तू अविरत कहता जा मधु, मदिरा, मादक हाला,
हाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला,
ध्यान किए जा मन में सुमधुर सुखकर, सुंदर साकी का,
और बढ़ा चल, पथिक, न तुझको दूर लगेगी मधुशाला।।८।

मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।।९।

सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।।१०||
-----------------------------------------------
भावानुवाद -

मद्य सेवण्या मदिरालयि हा निघे प्रवासी आसुसला,
कोण पथी मी जावे आता? जीव असे हा बावरला,
वेगवेगळ्या दिशास फिरशी, जरी पुसे ना वाट मला,
मीच सांगतो वाट तुला तव जाई घेउनी मधुशाला ||६||

व्यर्थ जातसे किती हे जीवन, चालचालुनी जाण्याला,
'अजुनि दूर जा' सांगति सगळे वाट पुसशि जरि कोणाला,
धीर नसे तव जाण्या पुढती, नसे साहसहि फिरण्याला,
दिग्मूढ होतसा उभा राहि परि दूर दिसे ती मधुशाला ||७||

जप तू अविरत मद्य, मदिरा अन मादक त्या वारुणिला,
कल्पुन हाती तुझ्या जणू तो ललित एक असे प्याला,
आठव सुंदर, सुमधुर, सुखकर मनमोहक त्या साकीला,
आणिक पुढती चाल गड्या तू, नसे दूर ती मधुशाला ||८||

अभिलाषा ही मद्य पिण्याची जाउन मिळते मदिरेला,
अधरचि तव ते आतुर जे, का भासती ते हा मधु प्याला?
वसे ध्यानि-मनि मदिरा ही तव, रुप घेतसे मधुबाला,
राहि न मदिरा, प्याला, साकी, तुवा मिळो ती मधुशाला ||९||

झरझर, सरसर, सुरईमधुनी ऐक येत त्या मदिरेला,
किणकिण, रिमझिम सर्वांमधुनी ऐक भरतसे 'ती' प्याला,
फार नाहि हे अंतर आता, चार पावले चालशि ती
गुंजन करिती ऐक मद्यपी, गंधित झाली मधुशाला ||१०||

चतुरंग

हे ठिकाण

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

12 Mar 2008 - 8:48 pm | केशवसुमार

चतुरंगशेठ,
उत्तम सुरु आहे.. असच चलू द्या..
रोज एक पेग..म्हणजे ५ रुबाया चे रतिब चालू ठेवा म्हणजे कसे..
रसिकांना कोरड नाही पडणार..
केशवसुमार..

चतुरंग's picture

13 Mar 2008 - 11:36 pm | चतुरंग

'रोज एक पेग = ५ रुबाया' हे समीकरण आवडले.
तसा सध्या मि.पा. वर बर्‍याच गोष्टींचा ष्टाक आहे त्यात तुमची 'पहिल्या धारेची' विडंबने ही आहेतच त्यामुळे रसिकांना कोरड अजिबात पडणार नाही!;)
तिसरा पेग लवकरच सादर करेन.

चतुरंग

स्वाती राजेश's picture

13 Mar 2008 - 11:57 pm | स्वाती राजेश

हा भागही उत्तम जमला आहे.
मधुशाला कधी तरी पुर्वी वाचले होते आता लक्षात पण नाही याचे खरे तर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. तुमच्यामुळे आम्हाला अर्थासहीत वाचायला मिळाले..
छानच उपक्रम आहे पण यात खंड पाडू देऊ नका कुणी प्रतिसाद देवो अगर न देवो..

प्राजु's picture

14 Mar 2008 - 12:39 am | प्राजु

झरझर, सरसर, सुरईमधुनी ऐक येत त्या मदिरेला,
किणकिण, रिमझिम सर्वांमधुनी ऐक भरतसे 'ती' प्याला,
फार नाहि हे अंतर आता, चार पावले चालशि ती
गुंजन करिती ऐक मद्यपी, गंधित झाली मधुशाला ||१०||

हे तर अगदिच सुंदर....
मी वाटच पहात होते या पुढच्या भागाची... आता या पुढचाही लवकर येऊदे.

- (सर्वव्यापी)प्राजु