घाटवाटा

जिप्सी's picture
जिप्सी in जनातलं, मनातलं
8 Oct 2010 - 9:28 pm

सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांची आणि आपली मैत्री एकदा जुळली की मग हळूहळू घाटवाटांची ओळख व्हायला लागते. पहिल्यांदा आपली त्यांची गाठ पडते ती एका गडावरून दुसर्‍या गडावर जाताना. लांबची,फिरून जाणारी वाट टाळण्यासाठी आपण एखाद्या गावकर्‍याला रस्ता विचारतो आणि तो म्हणतो,त्यो किल्ला व्हय ? हे हित पलीकडल्या अंगाला,ह्यो दांड/घाट उतरला की खायल्या अंगाला ! आणि मग त्यालाच वाटाड्या म्हणून बरोबर घेउन आपण वाटेला लागतो आणि लक्षात येतं की,ते 'पलीकडंचं' अंग येइस्तोवर आपल्याच अंगाला घाम सुटलेला असतो.पण त्या घाटवाटेनं आपल्याला चढताना उतरताना अपार आनंद दिलेला असतो.आणि मग घाटवाटांची चढउतार करायची गोडीच लागून जाते.
आपल्याला जे घाट माहीत असतात ते वाहने जाण्यासाठीचे,पण पूर्वी जेंव्हा हे घाट नव्हते तेंव्हा लोक कसे जात येत? आज आपण मुंबईतून पुण्याला सहज जातो येतो पण २०० वर्षांपूर्वी मुंबईतून पुण्याला लोक कसे जात ? धरमतर खाडीतून सुमारे ५० मैलांचा नागोठण्याला यायचे नंतर आंबा नदीच्या काठाने पालीवरून जांभुळपाड्याला यायचे.तिथून वसुंडे घाटाने मुठा नदीच्या खोर्‍यातून प्रवास करून लोणावळ्याजवळ आज जे अ‍ॅम्बी व्हॅली आहे तिथंल्या कोरीगडाच्या बाजूने सूस्,पाषाणमार्गे,गणेशखिंडीतून पुण्यात असा हा जवळपास ४ दिवसांचा दमवणारा प्रवास असे.
घाटाची २ ओळीत माहीती सांगायची तर असे सांगता येइल की,को़कणातून देशावर येताना/देशावरून कोकणात जाताना ज्या वाटेने जायचे ती वाट. ही वाट सह्याद्रीतल्या डोंगरांच्या मुख्य धारेतून जाते. ही वाट चढायला/उतरायला बरीच बिकट असते.
पूर्वापार काळापासून हे घाट स्थानिक लोकांच्या वहीवाटीत होते.नंतर व्यापारी आणि लष्करीदृष्टया त्यांना महत्व प्राप्त झाले. ईतिहासात जर या घाट्वाटांचा शोध घेतला तर सुमारे २००० वर्षे आधी म्हणजे सातवाहन काळाच्या काही काळ आधीपासून या घाट्वाटा अस्तित्वात होत्या.सातवाहन काळातील सगळ्यात महत्वाचा घाट म्हणजे जुन्नरजवळचा नाणेघाट.नाणेघाटातून व्यापारी आपल्या बैलांचे तांडे घेउन देशावर येत्,दर घोडी/बैली,माणशी रोख स्वरूपात जकात वसूल केली जाई,जकात गोळा करण्यासाठीचा मोठा दगडी रांजण अजूनही नाणेघाटात आहे. येणारे व्यापारी,प्रवासी यांच्यासाठी प्यायला पाणी,विश्रांतीसाठी गुहा अशीही व्यवस्था इथं आहे.कल्याण ते जुन्नर यांना जोडणारा हा तेंव्हाचा महामार्ग. त्याकाळात जुन्नर ही महत्वाची पेठ होती.
घाटवाटांच्या रक्षणासाठी त्यांच्या आसपास दुर्ग बांधले जात. उदा. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी तर जिवधन्,हडसर्,चावंड अशी ३ मजबूत किल्ल्यांची मजबूत फळीच आहे.या घाटांची सतत दुरुस्ती केली जाई,अवघड जागी पायर्‍या कोरल्या जात. या सगळ्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरनिराळे अधिकारी असत. मुलकी व्यवस्थेत जसे देशपांडे असत तसे इथं घाटपांडे असत. घाटपांडे हे प्रतिष्ठेचे पद होते. त्यांच्या हाताखाली मोढवे(वी),पानसरे,पथकी(पतकी) असतं.मोढवे घाटाची दुरुस्ती,संवर्धन अशी कामं बघतं,पानसरे,पथकी घाटाचे आणि व्यापार्‍यांचे संरक्षण अशी कामगिरी पार पाडत.
तत्कालीन राज्यकर्तेही आपापल्या क्षेत्रातल्या घाटवाटांनी प्रवासी/व्यापारी यावेत म्हणून त्यांना सुविधा देत्,जकातीत सुट देत्,त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत. १६५४ मधल्या एका पत्रात व्यापार्‍यांना सुरक्षेची हमी देताना जवळीचे चंद्रराव मोरे म्हणतात,'तागसडा गमावला तरी सोनेचा करून देउ.'
या घाटवाटांनी त्याकाळात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची कामगिरी केलेली आहे. चौल्,नालासोपारा,दाभोळ ही त्याकाळातली महत्वाची बंदर होती. तिथं देशोदेशीहून माल येई आणि तो जुन्नर्,पैठण्,नाशिक अशा महत्वाच्या बाजारपेठात जाई. प्रत्येक घाटातून नेहमी येणार्‍या जाणार्‍या व्यापार्‍यांची यादी घाटपांड्यांकडे असे त्या व्यापार्‍यांना 'कुळ' असं म्हटलं जाई. यांना जकातीत सुट मिळे,प्रत्येक घाटाच्या देवाच्या व्यवस्थेसाठी काही वेळा जादा कर घेतला जाई. महाबळेश्वराच्या खालच्या बाजूला जो पारघाट आहे तिथं श्रीरामवरदायिनी देवीचे देउळ आहे,तिथं दर बैली १ रुका जादा कर घेतला जायचा.
महाराष्ट्रात सुमारे १२५ घाट आहेत. जशी इंग्रजांच्या काळात रस्त्यांची व्यवस्था झाली तसं तसे या वाटा विस्मृतीत जात गेल्या पण अजूनही,स्थानिक लोक यांचा वापर करतात.जवळ जवळ सगळे घाट थोडे आडबाजूला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहेत.या वाटा चढायला उतरायला अजूनही भारी बिकट आहेत. ज्यांना गडकिल्ल्यांव्यतिरिक्त फिरायची हौस आहे त्यांनी जरूर यांच्या नादी लागावं.पण यांच्या वाटेला जाताना लक्षात ठेवावं की,इथं चढायचं उतरायच तर अंगात रग पाहीजे,मग तुम्ही यांच्या प्रेमातच पडता.पण त्याआधी लक्षात ठेवावे की,
वाटते नागिण ज्याला,खेळण्या साक्षात हवी
त्याने करावा इष्क येथे,छाती हवी,मस्ती हवी.

प्रवासदेशांतरइतिहासजीवनमानभूगोलअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मस्तच! खूप अभ्यासपूर्ण लेख आहे.
आणि रोचकही.

जिप्सी's picture

8 Oct 2010 - 9:59 pm | जिप्सी

गोप्या घाट(राजगडावरून/तोरण्यावरून कोकणात उतरण्यासाठी) हा शिवथरघळीवरून महाडकडे जातो.

नाणेघाटातील जकात गोळा करायचा दगडी रांजण

जीवधन

त्या रांजणात म्हणे " तूपही" गोळा केले जायचे

जिप्सी's picture

9 Oct 2010 - 11:33 pm | जिप्सी

नाही त्या रांजणात तूप गोळा केले जायचे नाही,जकातच गोळा केली जायची,जमा केलेली जकात जीवधन किल्ल्यावर पाठवली जायची.

तूप गोळा करण्यासाठी गडांवर विहिरी असत्,पन्हाळा,पावनगड अशा किल्ल्यांवर तुपाच्या विहिरी आहेत. जूने तूप औषध म्हणून जखमांवर लावले जायचे.

अवांतर :- शेवटचा निजाम मुर्तजा जीवधनवरच कैदेत होता,त्याला पेमगिरी गडावर गादीवर बसवून शहाजीमहाराजांनी काही काळ वझीरी आपल्या हाती घेतली आणि शहाजहान व आदिलशहाशी लढत दिली.

स्पा's picture

10 Oct 2010 - 8:42 am | स्पा

जिप्सी................

खूपच सुंदर माहिती..........

प्रभो's picture

8 Oct 2010 - 10:00 pm | प्रभो

मस्त माहिती आणी फोटू..

मेघवेडा's picture

9 Oct 2010 - 12:17 am | मेघवेडा

असेच म्हणतो. छान माहिती नि फोटो!

हेम's picture

8 Oct 2010 - 10:41 pm | हेम

महाराष्ट्रात सुमारे १२५ घाट आहेत.
श्री. आनंद पाळंदेंच्या 'डोंगरयात्रा' मध्ये जवळपास २२० घाटवाटांची यादी दिलेली आहे.

अप्पा जोगळेकर's picture

9 Oct 2010 - 8:44 am | अप्पा जोगळेकर

हेच म्हणणार होतो. २२० घाट आहेत.

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 11:13 pm | श्रावण मोडक

छान. हात आखडता घेऊ नये. :)

जिप्सी's picture

8 Oct 2010 - 11:44 pm | जिप्सी

महाराष्ट्रात सुमारे १२५ घाट आहेत.
श्री. आनंद पाळंदेंच्या 'डोंगरयात्रा' मध्ये जवळपास २२० घाटवाटांची यादी दिलेली आहे. >>>> ऐतिहासिक दस्तावेजातून त्यातल्या फक्त १२५ घाटांचीच नोंद आढळते.भारत ईतिहास संशोधक मंडळाचे एक त्रैमासिक फक्त घाट या विषयावर आहे त्यात शं.ना.जोशींनी १२५ घाट्च ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असे म्हटले आहे. पाळंदे घाट्वाटा मोजतात्,कधी कधी एकाच घाटवाटेला फाटे फुटून त्या २/जास्त गावात उतरतात.तसेच त्यात पाळंदे घाट्वाटांबरोबरच खिंडी,बारी,पाजा,दांड हे सुध्हा त्यातच मोजतात.

घाट २२० पेक्षाही जास्त असावेत,त्यातले आता कितीतरी आता विस्मृतीत गेलेले असावेत.

अर्धवटराव's picture

9 Oct 2010 - 1:38 am | अर्धवटराव

हे आहे मराठी मुलुकाचे असली वैभव. आणि जिप्सी सारखे वेडे पीर या वैभवाचे भोक्ते.

हात आखडता घेउ नका. येउ देत आणखी लेख या विषयी.

(देशावरचा) अर्धवटराव

पाषाणभेद's picture

9 Oct 2010 - 6:02 am | पाषाणभेद

इतिहासाची मौल्यवान माहीती दिलीत. अशाच वेगळ्या विषयांना स्पर्श करा.

सहज's picture

9 Oct 2010 - 6:23 am | सहज

माहीतीपूर्ण लेख. अजुन येउ द्या.

प्रचेतस's picture

9 Oct 2010 - 9:03 am | प्रचेतस

यातील बर्‍याचच्या महत्वाच्या घाटवाटांना घाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी गणेशाचे, बहीरोबाचे मंदीरही (उघड्यावरील मूर्ती)आढळते. तसेच मध्ये मध्ये पाण्याची टाकीही आढळतात. अर्थात कोकणातून घाटावर येणे वा वरून खाली उतरणे म्हणजेच किमान ३५०० फूट तीव्र चढउतारांची पायपीट करणे आलेच.

सह्याद्रीत घाट उतरताना बरेच वेळा सुरुवातीचा तीव्र उताराचा पट्टा, नंतर बारीक आडवी वाट, मधल्या पट्ट्यातील दाट सदाहरीत जंगल परत थोडा तीव्र उतार व नंतर शेवटी पदरात पोचल्यानंतर सौम्य उतार व घनदाट झाडी असे बरेच निसर्गविभ्रम पाहावयास मिळतात.

हा एक असाच तीव्र उताराचा कोकणदरवाजा घाट- राजमाची ते कोंदीवडे(कर्जत)

नाणेघाटातील सुरुवातीच्या तीव्र उताराची बांधीव पायवाट

पैसा's picture

9 Oct 2010 - 10:22 am | पैसा

शक्य तेवढ्या घाटवाटांवर येऊ द्या असेच लेख!

अवांतरः

धरमतर खाडीतून सुमारे ५० मैलांचा नागोठण्याला यायचे नंतर

इथे एखादा शब्द गहाळ झालाय काय?

जिप्सी's picture

9 Oct 2010 - 10:27 am | जिप्सी

व्हय की गा ! प्रवास करून हा शब्द राहीलाय ! सावरून घ्या,माफी द्या एक डाव.

हर्षद आनंदी's picture

9 Oct 2010 - 10:07 pm | हर्षद आनंदी

मस्त रे भावा..

पुल टु धमाल फोटू आणी माहीतीपुर्ण लेख.

लिहीत रहा आणि अश्याच घाटाच्या प्रवासाला जाशील तेव्हा न विसरता E-Mail टाक.

सध्या विकांत फक्त सह्याद्रीसाठी राखुन ठेवलाय.. लवकर मोहीम आख!!

शहराजाद's picture

10 Oct 2010 - 5:48 am | शहराजाद

लेख आवडला

स्वाती२'s picture

10 Oct 2010 - 4:58 pm | स्वाती२

लेख आवडला आणि वल्लींचा प्रतिसादही.

लेख अतिशय आवडला.
अवांतरः मी आधी दिलेला प्रतिसाद दुरपाळाने खाल्ला का? :( का?

अवलिया's picture

11 Oct 2010 - 2:41 pm | अवलिया

वा ! मस्त !!

जिप्सी's picture

11 Oct 2010 - 3:32 pm | जिप्सी

घाटवाटा २ प्रकारच्या असतात,१) माणसांसाठीच्या आणि २) जनावरांसाठी. माणसे कड्यातून सरळ चढू उतरू शकतात्,त्यामुळं या वाटा जवळच्या असतात्,पण जनावरं सरळ कड्यावरून चढू उतरू शकत नाहीत(अपवाद शेळ्यांचा) त्यामुळ त्यांच्या वाटा वळणाच्या आणि लांबच्या असतात.पण जर तुमच्या पाठीवर ओझं असेल तर तुम्ही या जनावरांसाठीच्या वाटेचा उपयोग करणं चांगल असतं,पण सवयीचे ट्रेकर मात्र कड्यातल्या सरळ्सोट वाटेवरूनही चढू उतरू शकतात्,पण यात प्रचंड कष्ट पडतातं.
या घाटांची नावंही निरनिराळ्या कारणांवरून्/प्रसंगांवरून पडतात,उदा. तानाजी मालुसरेंच शव केळद घाटानं राजगडावरून उमरठ्याला नेण्यात आलं म्हणून केळदघाटाच नावं मढे घाट असं पडलं,तसेच पेशवाईतले थोर मुत्सदी सखारामबापू(बोकिल) यांची पत्नी तैलबैल्याच्या घाटात वारली,म्हणून या घाटाचं नाव सवाष्णीचा घाट असं झालं.

ही अशी माहितीही देत जा मधून मधून.

गणेशा's picture

11 Oct 2010 - 11:12 pm | गणेशा

संपुर्ण थ्रेड आवडला ..

महाराष्ट्रातील किल्ले - घाट -- सह्याद्री या सगळीकदे तुम्ही फिरावे .. हि हिम्मत - ताकद तुमच्याकडे कायम राहो ही मनापासुन इच्छा ..

लिहित रहा -- वाचत आहे