टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!

ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात.
शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.

संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.

स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड"पाशी येऊन थांबलाय
तिथं देशद्रोह्याना मिळणार्‍या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.

तुम्ही लिहिलंत गीतारहस्य
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत
कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू- कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत, कुठल्याच द्रौपदीपर्यंत

टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला
डरकाळ्या फोडणार्‍या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.

तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे दिवसेदिवस
प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत

इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप
सारंच परकं होईल त्यांना
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय

एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

-अविनाश ओगले

लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

ओगलेशेठ,
जळजळीत सत्य..
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक

काय बोलणार ह्याच्या पुढे..

टिळकांना विनम्र श्रद्धांजली!

........आणि असलं जळजळीत सत्य लिहीण्याचं कष्ट घेणारी सुद्धा ही कदाचीत शेवटचीच पिढी :(

[अवांतरः टिळक, तुमच्या नावावर मतं मिळणार नाहीत सध्या तसेच तुमच्या नावावर कुठल्याही संस्थेचं पद किंवा एखादं ग्रामपंचायतीचं तिकीट सुद्धा नाही मिळणार, त्यामुळे तुम्हाला विनम्र श्रद्धांजली देणारे मोठ-मोठाले होर्डिंग्ज, अर्ध्या/पुर्ण पानाच्या जाहिराती देणे शक्य नाही. कृपया क्षमा करावे ]

कटू तरीही सत्याचे लेखन आहे.

पु.ल. नी आपल्या "खिल्ली " ह्या पुस्तकात लेख लेख लिहिला आहे . तो केसरीच्या घसरलेल्या दर्जा चे विनोदाने वाभाडे काढणारा आहे. त्याची आठवण करून दिलीत. ( नाव विसरलो. जाणकार आहेतच )
छान प्रकटन .

एक विचार माझाही : म. गांधी लोकमान्य टिळकां चा अत्यंत आदर करत असत .गोख्ल्यांप्रमाणे लोकमान्य सुध्धा गांधी चे गुरू होते.

हे मात्र खरे "एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक "

समाजाचे अधोगतीला लागला आहे, थोरा-मोठ्यांच्या उज्ज्वल परंपरेचा लोकांना विसर पडू लागला आहे वगैरे थाटाचे लेखन नेहमीच वाचण्यात येते. या लेखाबाबतही असेच म्हणावेसे वाटते. 'एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक' हे तर हास्यास्पद आहे.

हे टाळ्याखाऊ लेख निरर्थक आहेत.

एक तर "त्या" काळात सगळे मोठे समाजपुरुष होते हे पटण्यासारखे नाही. त्या काळातले बहुतेक समाज-कापुरुष विस्मृतीत गेले आहेत, इतकेच.

दुसरे म्हणजे या काळात सर्वच समाजनेते निकृष्ट आहेत असेही नाही. टिळकांना जीवनकाळात हिणकस नेता अशी संभावना ऐकावी लागली (तेल्यातांबोळ्यांचा नेता असे काही ब्राह्मणांकडूनच), आणि भ्रष्ट-आचाराचे बालंटही सहन करावे लागले (ताईमहाराज प्रकरण). ते खोडण्यासाठी दीर्घ इतिहास लागला. त्याच प्रमाणे आजचे निकृष्ट नेते उद्याच्या इतिहासात विसरले जातील, आणि काही उत्कृष्ट नेत्यांवरील खोटे आरोप बाजूला होतील.

आताच्या काळात टिळकांनी वापरलेले राजकारण/समाजकारण वापरता येणार नाही. (राजकारण! हो तर! टिळक इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद होते.) त्या काळातल्या शक्तिहीन विधानसभा आज नाहीत. त्या काळची बहुसंख्य-अशिक्षित आणि परदेशाधीन समाजव्यवस्था आज नाही.

आजही वेगवेगळे लोक आजसाठी उपयुक्त असे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. त्या लोकांचे नाव "टिळक" नाही. त्यांचे मुखपत्र "केसरी" नाही. त्यांचे गार्‍हाणे वंगभंगविरोध नाही. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असे ठणकावणार्‍या अग्रलेखांचा रतीब आजकाल दर आठवड्याला प्रत्येक वर्तमानपत्र घालते.

त्यासाठी "टिळक" लागत नाहीत आणि "केसरी" लागत नाही. काळाची गरज वेगळी आहे, आणि काळाचे अध्वर्यू वेगळे आहेत.
"हा हंत हन्त हन्-त,
जसे काल होते
नसे आज कोणी
संत सन्त सन्-त"
म्हणत वर्तमान-भविष्यावर अश्रुपाताचे पाणी सोडणे म्हणजे आंधळेपणाची आणि आत्मतिरस्काराची पराकोटी होय.

हे विलापक १९०५ काळात जिवंत असता तर टिळकांना रडत-रडत शिव्या घालणार्‍यांपैकी हेसुद्धा असते.

ज्वलंत पराक्रमी पेशवे गेल्यानंतर महाराष्ट्रभूमी निर्वीर झाली असे लोक त्या काळात म्हणत. (त्या लोकांना डोळ्यासमोरचे टिळक दिसले नाहीत!) या विचारधारेची माहिती लोकहितवादी देतात. असल्या विलापाची लोकहितवादी निर्भर्त्सना करतात. आपणही आज होत असलेल्या असल्या विलापास दूर केले पाहिजे.

क्रेमर आणि धनंजय यांच्याशी सहमत आहे.

वरील दोन प्रतिक्रिया वाचुन लेखात टिळकांची (त्याच प्रमाणे त्या काळातील इतर थोर नेत्यांची) समाजाला जी विस्मृती झालिय/होतेय ति अधोरेखित झालि.
कालप्रवाहात सगळीच नावे गुडुप होतात. ते नैसर्गिक आहे. पण करंटेपणाने आपल्याच समाजपुरुषांच्या चारित्र्याचा र्‍हास करुन आपलि विद्वत्ता मिरवायचि हि अवलक्षणे बघुन त्रास होतो. अर्थात, त्याला इलाज नाहि.

(महाअवलक्षणि) अर्धवटराव

वरच्या उपप्रतिसादातून काय दिसते? दुसर्‍यांच्या कौतुकातही ऊठसूट अपमान बघायचा आणि मग त्यांना अपमानाबद्दल झोडायचे, असा कांगावेखोरपणा अपेक्षित असला पाहिजे.

माझ्या प्रतिसादात टिळकांचा काय अपमान दिसला या उपप्रतिसादकर्त्याला? नुसता अपमान नाही तर एकदम चरित्राचा र्‍हास दिसला! स्वतःची टिळकभक्ती वरचढ शाबित करण्यासाठी "धनंजय टिळकांच्या चरित्राचा र्‍हास करतो" असे खोटे बोलल्याबद्दल थोडी जनाची लाज वाटून घ्यावी. अपमान झालेला नाही हे जन स्वतः वाचून बघू शकतील. का अशी अपेक्षा आहे, की एकदा "कानफाटक्या" म्हटले, तर लोक कान न तपासता "कानफाटक्या" मानायला लागतील.

अशी मनोवृत्ती असल्यास मनाची लाज नाहीच वाटून घेणार. स्वतःच्या उच्च टिळकभक्तीबद्दल इतका दुर्दम्य आत्मविश्वास असावा, की आपण कोणाबद्दल खोटे बोललो, हे खिजगणतीतही नसणार. इलाज नाही.

अपमान झालेला नाही हे जन स्वतः वाचून बघू शकतील.

उर्वरित प्रतिसादाबद्दल काही बोलत नाही, पण या वाक्यामागील आशावाद भारी आहे.

(बहुतांश) जन स्वतः कधी काही वाचून बघतात काय?

सलमान रश्दीचे काय झाले?

फार कशाला, जेम्स लेन प्रकरण एवढ्यातच विसरलात काय?

सलमान रश्दीचे काय झाले?फार कशाला, जेम्स लेन प्रकरण एवढ्यातच विसरलात काय?

हे जन भारताच्या भौगोलिक सीमेतच राहणारे असावेत असे श्री पंगा यांना अपेक्षित आहे काय?

असे असण्याचे काही कारण दिसत नाही.

तसे असल्यास सलमान रश्दीचे पुस्तक बार्न्स अँड नोबल मध्ये उपलब्ध आहे. तसेच लेनचे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर. जगातील बहूसंख्य जनांनी (विदा उपलब्ध नाही) ही पुस्तके अपमानास्पद आहेत असे ठरवलेले दिसत नाही.

मिसळपावावरील जनांमध्ये न वाचताच अर्धवटपणाने प्रतिसाद देणारे काही आयडी असू शकतील पण मिपावरील बहूसंख्य जन तसे वागतात असे वाटत नाही.

तसे असल्यास सलमान रश्दीचे पुस्तक बार्न्स अँड नोबल मध्ये उपलब्ध आहे. तसेच लेनचे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर. जगातील बहूसंख्य जनांनी (विदा उपलब्ध नाही) ही पुस्तके अपमानास्पद आहेत असे ठरवलेले दिसत नाही.

प्रश्न किती जणांनी हे पुस्तक अपमानास्पद ठरवलेले नाही हा नसून, ज्यांनी हे पुस्तक अपमानास्पद आहे असे ठरवलेले आहे, त्यांपैकी किती जणांनी ते तसे आहे किंवा नाही हे पडताळून पाहिलेले आहे, हा आहे.

पुस्तकाच्या उपलब्धतेशी याचा संबंध असलाच, तर मर्यादित असावा.

(महाराष्ट्रातसुद्धा पुस्तक मुळापासून उपलब्ध नसण्याचे काही कारण नव्हते. 'अपमानास्पद आहे' या कल्पनेतून झालेल्या गदारोळामुळे आणि विरोधामुळे ते उपलब्ध होण्यापासून रोखले गेले. विरोधकांपैकी किती जणांनी 'खरोखर अपमान झाला' हे पडताळून पाहिले होते, हा प्रश्न आहे.)

(१) या पुस्तकात ज्यांना रस नाही, आणि/किंवा (२) या पुस्तकात काही अपमानास्पद आहे किंवा नाही याच्याशी ज्यांना देणेघेणे नाही, आणि/किंवा (३) या पुस्तकात काही अपमानास्पद आहे असे जरी यदाकदाचित वाचनाअंती आढळले, तरी ज्यांना त्यामुळे फरक पडण्याचे काही कारण नाही, अशा व्यक्तींना, मग त्यांना पुस्तक उपलब्ध असो वा नसो, आणि ते त्यांनी वाचलेले असो वा नसो, विदासंचात घेण्याचे मला काही कारण दिसत नाही.

फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशियामध्ये किंवा टुवालूमध्ये जेम्स लेनच्या पुस्तकास विरोध झाल्याचे ऐकिवात नाही. तेथे हे पुस्तक स्थानिक अप्पा बळवंत चौकांत उपलब्ध नसेलही कदाचित, पण तेवढीच खाज असल्यास थोडी अधिक किंमत मोजून मागवणे अशक्य नसावे. तो मुद्दा नाही. तेथे जरी सगळ्यांनी ते विकत घेतले, नव्हे, तेथील समस्त जनतेत ते फुकट जरी वाटले, तरी ते वाचण्यात किती जणांना रस असेल? त्यातील शिवाजीबद्दलच्या तथाकथित अपमानास्पद उल्लेखाने किती जणांना फरक पडेल? त्यात पुन्हा यात महाराष्ट्रातल्या कोण्या शिवाजीबद्दल काही अपमानास्पद आहे किंवा नाही, याचा मुद्दाम शोध घेत पुस्तक भिंगाखाली घालण्याची किती जणांना हौस असेल? का असावी? आणि अशांची गणना आपण विदासंचात का करावी?

अमेरिकेतसुद्धा, जे या पुस्तकाकडे 'या पुस्तकात शिवाजीचा कदाचित अपमान झालेला असू शकतो (आणि झाला असल्यास यह बात हरगिज़ नहीं चल सकती!)' या दृष्टिकोनातून पाहत नाहीयेत, त्यांनी हे पुस्तक वाचले काय किंवा नाही वाचले काय, विदा म्हणून प्रस्तुत संदर्भात त्याचे महत्त्व काय? त्यांची कोणत्याही बाजूने गणना करण्याचे काही कारण मला दिसत नाही.

या पूर्वदृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहणार्‍यांपैकी किती जणांनी ते पुस्तक नंतर (कोणत्याही तर्‍हेने मिळवून) वाचले, किती जणांनी ते वाचले नाही, किती जण पुस्तक वाचल्यानंतर ते अपमानास्पद आहे या निर्णयाप्रत आले, किती जण पुस्तक वाचल्यानंतर ते अपमानास्पद नाही या निर्णयाप्रत आले, आणि किती जण पुस्तक न वाचताच ते अपमानास्पद आहे या निष्कर्षाप्रत आले, याचा विदा तपासावा लागेल. (पुस्तक न वाचताच ते अपमानास्पद नाही या निष्कर्षाप्रत येणारे, हे 'या पुस्तकात असा अपमान झालेला असू शकतो, आणि तसे असल्यास ते चालण्यासारखे नाही, या पूर्वदृष्टिकोनातून या पुस्तकाकडे बघणारे' या विदासंचाच्या व्याख्येप्रमाणे आपोआप विदासंचातून वगळले जावेत.)

थोडक्यात, माझी रेलेवंट विदासंचाची व्याख्या काहीशी 'पुस्तकात अपमान झालेला असण्याची शक्यता आहे, आणि झालेला असल्यास चालण्यासारखे नाही, अशा पूर्वदृष्टिकोनातून पुस्तकाकडे बघणारे, मग त्यानंतर ते पुस्तक प्रत्यक्षात वाचोत अथवा न वाचोत' अशी आहे. (यातसुद्धा 'पुस्तक वाचल्यानंतर भ्रमनिरास होऊन पुस्तकात काहीही अपमानास्पद नाही या निष्कर्षाप्रत आलेले' या उपसंचाचे कितपत महत्त्व आहे याबद्दल साशंक आहे, पण तूर्तास त्यांना विदासंचात धरू.)

आपली रेलेवंट विदासंचाची व्याख्या यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. (ती मला पटलेली नाही.) आपल्या विदासंचाच्या मला कळलेल्या व्याख्येप्रमाणे त्यात पुस्तक न विकत घेतलेल्यांचा अथवा ते न वाचलेल्यांचा समावेश आहे असे वाटत नाही. (माझ्या व्याख्येत तो इतर निकष पूर्ण झाल्यास होऊ शकतो. किंबहुना रेलेवंट विदासंचाच्या माझ्या व्याख्येत पुस्तक वाचलेले असणे अथवा नसणे हा पृथक्करणाचा निकष होऊ शकतो, पण समावेशाचा निकष होऊ शकत नाही. आपल्या व्याख्येत पुस्तक वाचलेले असणे हा समावेशाचा निकष आहे असे वाटते - चूभूद्याघ्या.) तसेच 'या पुस्तकातून अपमान झालेला असू शकतो आणि झाला असल्यास ही बाब चालण्यासारखी नाही' या पूर्वदृष्टिकोनाचा आपल्या व्याख्येत विचार झालेला नाही, जो मला वाटते महत्त्वाचा आहे. असा पूर्वदृष्टिकोन नसलेल्या व्यक्ती माझ्या रेलेवंट विदासंचाच्या व्याख्येत बसू शकत नाहीत. आपल्या विदासंचात हा पूर्वदृष्टिकोन असण्यानसण्याने काहीही फरक पडत नाही. (हा पूर्वदृष्टिकोन माझ्या व्याख्येत समावेशाचा निकष आहे, आपल्या व्याख्येत तो कशाचाच निकष नाही. किंबहुना आपल्या व्याख्येत अशा प्रकारच्या किंवा याविरुद्धच्या दृष्टिकोनाचा काही संबंध असलाच, तर तो पश्चाद्दृष्टिकोन म्हणून आहे, पूर्वदृष्टिकोन म्हणून नाही.)

तेव्हा, रेलेवंट विदासंचाच्या आपल्या दोघांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, आणि आपली व्याख्या मला पटलेली नाही. तरी माझ्या विचारांच्या दिशेत काही चूक होत असल्यास कृपया कळवावे.
===============================================================

त्यापुढे, माझ्या व्याख्येप्रमाणे असलेल्या रेलेवंट विदासंचाच्या संदर्भात जागतिक स्तरावर माझ्याकडे कोणताही विदा नाही. परंतु या विदासंचात बसू शकणार्‍या भारतातील व्यक्तीची प्रोफाइल आणि या विदासंचात बसू शकणार्‍या भारताबाहेरच्या (किंवा महाराष्ट्राबाहेरच्या) व्यक्तीची प्रोफाइल यांच्यात फारसा फरक असण्याचे काही कारण मला दिसत नाही. त्यापुढे जाऊन, या बाबतीत भारतीय स्तरावर किंवा महाराष्ट्रीय स्तरावरदेखील माझ्याकडे विदा नाही. परंतु रेलेवंट विदासंचाच्या माझ्या व्याख्येत बसू शकणार्‍या बहुसंख्य महाराष्ट्रीय किंवा भारतीय जनांनी ते वाचले असावे, असे मला वाटत किंवा 'दिसत' नाही. (रेलेवंट विदासंचाच्या आपल्या व्याख्येत बसू शकणार्‍या बहुसंख्य जनांनी हे पुस्तक अपमानास्पद असल्याचे ठरवल्याचे आपल्याला (विदा उपलब्ध नसला, तरी) 'दिसत' नाही, त्याचप्रमाणे.) कदाचित हा माझा पूर्वग्रह असू शकेल. किंवा, असे निकष पूर्ण करणार्‍या बहुतांश महाराष्ट्रीय किंवा भारतीय जनांनी ते वाचलेले असण्याबद्दल मी साशंक आहे, असेही म्हणता येईल. (अर्थात, माझी शंका तथ्यास धरून न निघाल्यास, आणि हा केवळ माझा पूर्वग्रह असल्यास, आनंदच आहे. तसा काही विदा असल्यास जरूर कळवावे. विचार करता येईल.)

मिसळपावावरील जनांमध्ये न वाचताच अर्धवटपणाने प्रतिसाद देणारे काही आयडी असू शकतील पण मिपावरील बहूसंख्य जन तसे वागतात असे वाटत नाही.

कल्पना नाही. याचा फारसा विचार केलेला नाही. बहुधा आपले निरीक्षण योग्य असावे.

मात्र, 'मिपावरील बहुसंख्य जन तसे वागत नाहीत' हे जरी ग्राह्य धरले (आणि बहुधा तसे ते असावेही), तरी अशा 'तशा न वागणारां'पैकी (१) ज्यांचा 'या पुस्तकात अपमान झालेला असू शकेल' असा पूर्वदृष्टिकोन नाही, आणि (२) उर्वरितांपैकी, 'असा अपमान झालेला असल्यास ही चालवून घेण्यासारखी गोष्ट नाही' असा ज्यांचा पूर्वदृष्टिकोन नाही (थोडक्यात, 'यदाकदाचित अपमान झाला असला तरी ही दखल घेण्याच्या लायकीची गोष्ट नाही' असे ज्यांना वाटते), अशा सर्वांना विदासंचातून वगळून, केवळ उरलेल्यांचा विचार करावा लागेल, असे वाटते.

अशा उरलेल्यांचे प्रमाण किती आहे, याबद्दल मला कल्पना नाही. (असे काही सर्वेक्षण झालेले असल्याचेही मला माहीत नाही.) मात्र, अशा संचाकरितासुद्धा आपले निरीक्षण जर योग्य असेल (आणि आपल्याला जर मधुमेह नसेल), तर आपल्या तोंडात साखर पडो.

प्रश्न किती जणांनी हे पुस्तक अपमानास्पद ठरवलेले नाही हा नसून, ज्यांनी हे पुस्तक अपमानास्पद आहे असे ठरवलेले आहे, त्यांपैकी किती जणांनी ते तसे आहे किंवा नाही हे पडताळून पाहिलेले आहे, हा आहे.

असा प्रश्न नसावा. असा प्रश्न असला तरी आपल्या पहिल्या उपप्रतिसादातून असा अर्थ ध्वनित झाला नाही. 'अपमान झालेला नाही हे जन स्वतः वाचून बघू शकतील.' या धनंजय यांच्या वाक्यास उद्धृत करून आपण म्हणता '(बहुतांश) जन स्वतः कधी काही वाचून बघतात काय?'

धनंजय यांनी प्रतिसादांतून कोण्या व्यक्तिचा अवमान केलेला आहे असा दावा श्री अर्धवटराव यांनी केलेला आहे. हा दावा इतका धादांत चूकीचा आहे की जन सहजपणे वाचून श्री अर्धवटरावांच्या दाव्यातील सत्यासत्यता ठरवू शकतील. (जसे तो दावा पूर्णपणे निराधार असल्याचे मी ठरवले आहे.) श्री अर्धवटरावांचा उपप्रतिसाद वाचण्यापूर्वी बहूतांश वाचकांना धनंजय यांचा प्रतिसाद दिसेल. त्यानंतर श्री अर्धवटरावांचा उपप्रतिसाद दिसू शकेल. (वाचक पूर्वग्रहदूषित होण्यासाठी श्री अर्धवटरावांच्या प्रतिसादाला श्री धनंजय यांच्या प्रतिसादाआधी वाचायला हवे. जे घडण्याची शक्यता शून्य नसली तरी कमी आहे.) त्यांच्या दाव्यातील ढळढळीत निरर्थकता सामान्य मिपा वाचकास जाणवेल, असे मला वाटते. 'जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी' अशी काहीशी म्हण मराठीत आहे. काही लोकांना जन निंदा करतील अशी भीती नसली तरी वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण केल्यानंतर केलेल्या कृत्यांबद्दल लाज वाटू शकण्याची परिस्थिती असल्यास तशी ती वाटू द्यावी, असा सामान्य अर्थ त्या म्हणीचा असावा. श्री धनंजय यांनी या म्हणीचाच चपखल वापर केला आहे. (काही लोकांना काही परिस्थितींत वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करणे शक्य नसते. अशा लोकांनी कमीत कमी जनांची लाज बाळगून एखादी धडधडीत अयोग्य कृती करण्याबाबत पुनर्विचार करावा.)

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जन अशा ढळढळीत असत्य दाव्यास पडताळून पाहतात काय? माझ्या मते होय. लोक अशा धादांत चूकीच्या दाव्यांना पडताळून पाहतात. तसे नसते तर कुठलाही सोम्यागोम्या कुठल्याही व्यक्तिने लिहिलेले लिखाण हे या पपू व्यक्तिमत्त्वाचा अनादर करणारे आहे असा दावा करेल व लोक त्यावर विश्वास ठेवतील.

या पार्श्वभुमीवर आपण दिलेली लेन व रश्दी यांची उदाहरणे विसंगत वाटली. (त्यांच्या लेखनावर केलेल्या आरोपांत तथ्य आहे किंवा या वादात न पडता झालेले आरोप धादांत खोटे आहेत हे सहजपणे दाखवता येत नाही.)

बहूसंख्य जन म्हणजे पूर्वग्रहदूषित लोक हे आपल्या (अभावानेच आढळणार्‍या) संक्षिप्त प्रतिसादांतून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित विदासंच व मी अपेक्षिलेला विदासंच भिन्न असावेत.

धनंजय यांनी प्रतिसादांतून कोण्या व्यक्तिचा अवमान केलेला आहे असा दावा श्री अर्धवटराव यांनी केलेला आहे. हा दावा इतका धादांत चूकीचा आहे की जन सहजपणे वाचून श्री अर्धवटरावांच्या दाव्यातील सत्यासत्यता ठरवू शकतील. (जसे तो दावा पूर्णपणे निराधार असल्याचे मी ठरवले आहे.)

हा दावा धादान्त चुकीचा आहे हे आपण कशाच्या आधारावर ठरवलेत? धनंजय यांचा मूळ प्रतिसाद वाचून, बरोबर?

म्हणजेच, जनांनी दाव्याची सत्यासत्यता ठरवण्यासाठी मुळात जनांस धनंजय यांचा मूळ प्रतिसाद वाचणे आवश्यक आहे, हे आपणास मान्य व्हावे.

आता, धाग्याच्या विषयात किंवा दाव्याची सत्यासत्यता (आणि म्हणूनच धनंजय यांचे दोषित्व किंवा निर्दोषित्व) काहीही करून सिद्ध करण्यात विशेष वैयक्तिक रस ज्यांना नाही अशांपैकी (म्हणजेच, हा धागा केवळ वरवर वाचणारांपैकी), आणि त्यातसुद्धा धनंजय यांच्या (किंवा इतर कोणाच्याही) नावाला बट्टा (सकारण किंवा विनाकारण) लागण्या-न लागण्याने ज्यांचे व्यक्तिशः विशेष काही बिघडत नाही अशांपैकी, किती जण विनाकारण इतके लंबे-चौडे आणि अनेकदा अगम्य किंवा निदान चटकन न समजणारे प्रतिसाद (मग ते धनंजय यांचे असोत किंवा माझे असोत किंवा अन्य कोणाचे असोत) वाचत बसण्याचे कष्ट घेतील, याबद्दल निदान मी तरी साशंक आहे.

त्या तुलनेत, उच्चरवाने केलेले आरोप (मग ते कितीही धादान्त खोटे असले तरी) चटकन डोळ्यात भरतात आणि चांगले लक्षात राहतात. विशेषतः ते जर कळायला सोप्या, सुटसुटीत आणि कमी लांबीच्या मजकुरात असतील तर.

लहान, सोपी, सुटसुटीत वाक्ये लिहिणे आणि आपले म्हणणे थोडक्यात मांडणे ही एक कला आहे. दुर्दैवाने ती मला नेहमी - किंबहुना बहुतांश वेळा - जमतेच, असे नाही. पण उलटपक्षी, माझे प्रतिसाद विशेष कोणी वाचत असेल ही अपेक्षाही मी ठेवत नाही (अनेकदा तर केवळ लिहिण्याची खाज म्हणून वाचणार्‍या-न-वाचणार्‍याची पर्वा न करता शाब्दिक जुलाब झाल्यासारखे लिहीत जातो), आणि त्याचमुळे मी लिहिलेले वाचून, अर्धवट वाचून किंवा न वाचता माझ्या लेखनावर किंवा माझ्यावर बिनबुडाचे किंवा धादान्त खोटे (किंवा क्वचित्प्रसंगी खरेसुद्धा) आरोप झाले, तरी आरोपकर्ता, आरोपाचे स्वरूप आणि आरोपामागील हेतू यांबद्दल काही आडाखे बांधून अशा आरोपांकडे एक तर पूर्ण दुर्लक्ष करणे किंवा त्यांना समर्पक प्रत्युत्तर देणे मला बहुतांश वेळा सोपे जाते. (शेवटी आपल्यावर आरोप कोण करत आहे आणि त्याने आपल्या आयुष्यावर नेमका किती फरक पडतो हे योग्य पर्स्पेक्टिवमध्ये आपणच ठेवावे, नाही का? आणि आपणच न ठेवल्यास आपल्यासाठी ते कोण ठेवणार?)

धनंजय यांच्याविरुद्धचे आरोप धादान्त खोटे होते हे मला पटते. याचे कारण मी धनंजय यांचा मूळ प्रतिसाद निदान वरवर तरी चाळण्याचे कष्ट यावेळी (निव्वळ योगायोगाने) घेतले होते म्हणून. अनेकदा माझ्याजवळ इतका पेशन्स नसतो. विशेषतः जेव्हा धाग्याच्या विषयात मला विशेष रस नसतो, आणि मी धागे किंवा प्रतिसाद केवळ वरवर चाळत असतो तेव्हा. माझ्यासारखे करणारे अनेक असतील. त्यातल्या कित्येकांना धनंजय यांचा मूळ प्रतिसाद वाचण्यात रस नसेल. त्यांच्यावर आरोप करणारा प्रतिसाद वाचण्यातही नसेल. पण आरोपाचे वाक्य नजर फिरवताना डोळ्यात चटकन भरू शकेल. ते तसे डोळ्यात भरल्याने कदाचित काहींना फरक पडेल, त्यामुळे धनंजय यांच्याबद्दल काही मत बनूही शकेल. अनेकांना काही फरक पडणारही नाही. पण फरक पडो अथवा न पडो, यांपैकी बहुतांश जण धनंजय यांचा मूळ प्रतिसाद नेमका काय होता, ते वाचून आरोपामागील तथ्य तपासून पाहण्याच्या भानगडीत पडतील, आणि तेही खास करून मूळ चर्चेत यत्किंचितही रस नसताना (किंवा अगदी वरवरचा रस असताना), याबद्दल निदान मी तरी प्रचंड साशंक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, 'पब्लिक को क्या पड़ी है, यार? Either ways?'

(तसेही, मिसळपावावर काय किंवा एकंदरच मराठी संकेतस्थळांवर काय (सगळी इकडून तिकडून सारखीच!), उद्या (hypothetical situation) समजा, समजा जर मला कोणी राष्ट्रद्रोही, वायझेड, छिनाल नाटकी, मनुवादी किंवा 'अभागी शाकाहारी समाजातला' म्हटले. (अशा प्रकारच्या विशेषणांचे आदानप्रदान मराठी संकेतस्थळांवर नवीन किंवा अगदीच अनपेक्षित नसावे.) त्याचा मी माझ्यावर किती परिणाम होऊ द्यावा? इथे माझ्यावर झालेल्या आरोपांनी, चिखलफेकीने माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कितीसा फरक पडतो? इथे मला कोण विचारतो, आणि, मुख्य म्हणजे, इथे मी कोणाला विचारतो? मी इथला एक आयडीधारक आणि इतरही इथले आयडीधारक, यापलीकडे माझा आणि इतरांचा संबंध काय? जेऊ घालतात ते मला? की पगार देतात? आणि उद्या जेऊ घातलेनीत जरी, तरी हवेय कुणाला यांचे जेवण? तसेही इथला 'सैपाक' आजकाल बदनाम आहे. आणि पगार - हे कोण मला पगार देणारे? किंवा, फॉर द्याट म्याटर, माझा पगार काढणारे?

मग मी यांच्या आरोपांची, काहीबाही बोलण्याची, कशाही वागण्याची पर्वा का करावी? यांचे बोलणेवागणे मनाला का लावून घ्यावे? कोण लागून गेले हे माझे? आरोप केला, दुर्लक्ष करावे, नाहीतर उलट उत्तर द्यावे. काहीबाही बोलले, आपण दुप्पट काहीबाही बोलावे. अती होऊ लागले, बोलणे बंद करावे नाहीतर सरळ काढता पाय घ्यावा. बंद करून टाकावे सगळे. फालतू गोष्टींसाठी डोके आणि वैयक्तिक आयुष्य कोण खराब करून घेतो?

धनंजय यांनी तरी काहीबाही आरोपांना एवढे महत्त्व का द्यावे? Chill, man! Life is certainly a lot bigger than the sum total of all the Marathi websites in the world put together. मराठी सायटी काय, येतात नि जातात. आयुष्य एकदाच येते, ते त्यापायी कशासाठी खराब करायचे? दोन घ्याव्या, बदल्यात एकच द्यावी, आणि मग शांतपणे झोपून जावे.

असो. हे फारच अवांतर झाले. आवरावे म्हणतो.)

श्री अर्धवटरावांचा उपप्रतिसाद वाचण्यापूर्वी बहूतांश वाचकांना धनंजय यांचा प्रतिसाद दिसेल. त्यानंतर श्री अर्धवटरावांचा उपप्रतिसाद दिसू शकेल.

वर दर्शवल्याप्रमाणे, आख्खा धागा आणि सर्व प्रतिसाद नीट एकापाठोपाठ रस घेऊन वाचणारास तसे दिसेल, मान्य. धागा वरवर चाळणारास त्या क्रमात दिसेलच, असे सांगता येत नाही. धनंजय यांच्या प्रतिसादाकडे पूर्ण दुर्लक्ष होणे, आणि उलटपक्षी त्यावरील उपप्रतिसाद चटकन डोळ्यात भरणे हेही शक्य आहे. अनेक धागे आणि त्यांवरील प्रतिसाद हे अनेकदा रँडम अ‍ॅक्सेस पद्धतीने वाचले जाऊ शकतात.

(वाचक पूर्वग्रहदूषित होण्यासाठी श्री अर्धवटरावांच्या प्रतिसादाला श्री धनंजय यांच्या प्रतिसादाआधी वाचायला हवे. जे घडण्याची शक्यता शून्य नसली तरी कमी आहे.)

शक्यता तितकीही कमी वाटत नाही. धागाविषयावरील रसावर बर्‍याच अंशी अवलंबून राहील असे वाटते. असो.

लोक अशा धादांत चूकीच्या दाव्यांना पडताळून पाहतात. तसे नसते तर कुठलाही सोम्यागोम्या कुठल्याही व्यक्तिने लिहिलेले लिखाण हे या पपू व्यक्तिमत्त्वाचा अनादर करणारे आहे असा दावा करेल व लोक त्यावर विश्वास ठेवतील.

पहिल्या विधानाप्रमाणे किती प्रमाणात प्रत्यक्षात घडत असावे याबाबत साशंक आहे. उर्वरित विधानांबद्दल, असे अनेकदा घडत असावे असा भीतीयुक्त कयास व्यक्त करतो. (विदा उपलब्ध नाही.)

असो. या विषयावर माझा पूर्णविराम.

सार्वजनिक व्यासपीठांवर केल्या जाणार्‍या विधानांबाबत प्रत्येकजण आपल्याप्रमाणेच उदासिन असावा ही अपेक्षा मला गैरवाजवी वाटते. तेव्हा कोणत्या आरोपाकडे लक्ष द्यावे किंवा लक्ष देऊ नये हे मी व्यक्तिगत निर्णयस्वातंत्र्य मानतो. याबाबत काही मार्गदर्शक सूचना असावी असे मला वाटत नाही. अवमानकारक विशेषणांच्या आदानप्रदानाने संवाद भरकटतो. तेव्हा अशी विशेषणे वापरली जाऊ नयेत हे मला पटते. थोडक्यात अशा विशेषणांनी तसेच खोट्या आरोपांनी फरक पडू शकतो असे मल वाटते. म्हणून धनंजय यांनी उपप्रतिसादातून श्री अर्धवटरावांच्या आरोपाचे (त्यांच्या निर्णयस्वातंत्र्याचा भाग म्हणून व संवाद भरकटू नये म्हणून) खंडन करणे मला योग्य वाटते.

मिसळपावावर वावरत असतांना वाचकांचा काही एक पॅटर्न लक्षात येतो. त्यावरून रँडम अ‍ॅक्सेस पद्धतीने लेख व प्रतिसाद वाचले जातात असे वाटत नाही. लेखाचे/ प्रतिसादाचे शीर्षक, लिहिणार्‍या सदस्याचे नाव, लेखकाविषयी वाचकाचे सर्वसाधारण मत असा काहीसा सिस्टमॅटिक बायस सहज ध्यानी येतो. वाचक सुरूवातीचे प्रतिसाद वाचण्याची शक्यता अधिक असते. हे आपणासही ठाऊक असावे असे दिसते. (या प्रतिसादात अपण स्वत:च 'सर्वप्रथम, हा प्रतिसाद हा (या धाग्याकरिता दिलेला प्रतिसाद असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादास थेट उपप्रतिसाद नाही, किंवा (या धाग्याशी संबंधित असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाशी थेट संबंधितही नाही. केवळ आपला प्रतिसाद वर आणून लिंबुप्रकाशात - लाइमलाइटात - दाखल करण्यासाठी वापरलेली ही एक हीन आणि हिडीस ट्रिक आहे.' असे स्पष्टीकरण दिलेले आहे.)

विद्याच्या बायलॅटरल अनुपलब्धतेमुळे इतर बाबींवर चर्चा करणे कठीण दिसते. पूर्णविरामालाच तात्पुरते (माझ्या बाजूने विदा उपलब्ध होईपर्यंत) मुक्कामाचे ठिकाण बनविण्याच्या आपल्या निर्णयाशी सहमती दर्शवून आवरते घेतो.

"दुसर्‍यांच्या कौतुकातही ऊठसूट अपमान बघायचा आणि मग त्यांना अपमानाबद्दल झोडायचे, असा कांगावेखोरपणा अपेक्षित असला पाहिजे."
अजिबात नाहि. मुळात टिळकांसारख्या विभूतींचे नाव वापरुन काहि लिहायचि आमचि लायकीच नाहि हो. कांगावेखोरपणा करायला त्या दर्जाचे विषय निवडुना आम्ही. एकतर मी दोन प्रतीसादांना एकत्र प्रतिक्रीया दिली आहे. बर !! त्यातिल तुमच्या प्रतिक्रियेला दिलेल्या प्रतिसादाचा भाग उलगडुन दाखवतो.

समाजाला टिळकांसारख्या लोकांचि विस्मृती होते, हे तुम्ही सुद्धा म्हणाताय... आणि ते नैसर्गिक आहे. मी हे विधान केले त्याबद्द्ल तुमचा आक्षेप नसावा.

आता मी जे चारित्र्याचा र्‍हास वगैरे शब्द वापरले, ते तुम्हि फार पर्सनली घेतलेत. माझि प्रतिक्रीया मी परत वाचली, आणि तुम्हाला असे वाटणे स्वाभावीक आहे असे जाणवले. पण विश्वास ठेवा, तुमच्या प्रतिक्रियेला दिलेली ति उपप्रतिक्रीया नाहि. काहि दिवसांपुर्वी त्या लेन प्रकरणावरुन जातिभेदाचे फार उग्र रुप मि.पा. वर वाचले. थोडक्यात सांगायचे, तर महापुरुषांचे कर्तुत्व न बघता ते केवळ एका विशिष्ट जातीचे होते म्हणुन त्यांना उगाच बदनाम करण्याचे उद्योग बघितले. माझि प्रतिक्रिया, थोर लोकांनि केलेले कार्य-> काळाच्या ओघात त्याचि होणारि (घातक) विस्मृती-> केवळ विस्मृतीच नव्हे तर हीन भावनेनि, उथळ राजकारणाकरता केलेली त्यांची बदनामि, या अनुशंगाने होति. तुम्ही असलं काहि केलय असं मला म्हणायचं नव्हतं. तुम्हाला तसं वाटल (तस वाटणं सहाजीक आहे, हे मलादेखिल माझि प्रतिक्रीया वाचुन पटलं) या बद्दल मी दिलगीर आहे.

बाकि तुम्ही ते लाज बिज काय लिहीलं ते डोक्यावरुन गेलं. आरामात वाचुन समजुन घ्यायचा प्रयत्न करेल

(चुका करणारा) अर्धवटराव

धनंजय राव, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. टिळक जाऊन ९० वर्ष झाली पण त्यांचे कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. शरद पवार जाऊन ९०० वर्षे झाली तरी त्यांनी केलेल्या करामती लोक नाही विसरणार असे दिसते. अहो २० रु ला साखर निर्यात करून काही महिन्यांनी ३२ ला आयात करणे टिळकांना कुठे जमले होते हो? आपल्या पुढच्या पिढीतील विलापक असेच लेख लिहील मायावती आणि जयललीताच्या नावाने. फुले दाम्पत्याच्या नावाने आपल्याला जितका अभिमान वाटतो तितकाच भावी पिढीला लालू-राबडी च्या नावाने वाटेल. मौलाना आझाद ची जागा जामा मशिदीचा इमाम घेईल. सावरकरांच्या नावाने आपण गहिवरतो तसे ते अडवाणी-तोगडिया-ठाकरे यांच्या नावाने गहीवरतील. तोगडिया मार्सेलिस ला जाणार आहेत म्हणे. तिथल्या एका तरणतलावात काठावरून उडी मारणार आहेत. अडवाणींनी काही नाटके लिहायला घेतली आहेत आणि ठाकरे "महाराष्ट्रातील १० सोनेरी पाने" यावर काम करत आहेत. पण हां, तेव्हाही गांधींजींना मात्र पर्याय नसेल हो, कॉंग्रेस कुणाच्या नावाने गळे काढेल नाहीतर?

बाकी असा विलाप करू नये हे ज्याअर्थी लोकहितवादी म्हणतात त्याअर्थी ते स्थलकालातीत सत्य असले पाहिजे.

दशपत्रकारी लोक-अहित-वादी
(हे पाहिले पत्र. अजून बाकीची ९ पत्रे नाही लिहिली )

धनंजय राव ,
प्रतिसाद प्रदीर्घ आहे . काही मुद्दे पटले . काही नाही पटले .

१.हे टाळ्याखाऊ लेख निरर्थक आहेत : तुमच्या मताशी सहमत नही , पण तुम्च्या मताचा आदर आहे.

२.एक तर "त्या" काळात सगळे मोठे समाजपुरुष होते हे पटण्यासारखे नाही :
१०० % सहमत. काही ठराविकच "काळाचा" ओघ बदलण्याचा विचार करणारे होते. लोकमान्य त्या पैकी एक होते असे लेखकाला वाटते . ते त्याने मांडले आहे.

दुसरे म्हणजे या काळात सर्वच समाजनेते निकृष्ट आहेत असेही नाही :
१०० % सहमत.

३.टिळकांना जीवनकाळात हिणकस नेता अशी संभावना ऐकावी लागली (तेल्यातांबोळ्यांचा नेता असे काही ब्राह्मणांकडूनच), आणि भ्रष्ट-आचाराचे बालंटही सहन करावे लागले (ताईमहाराज प्रकरण). ते खोडण्यासाठी दीर्घ इतिहास लागला :

ह्या वर मात करून त्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला , म्हणून पुण्यस्मरण.

४.आताच्या काळात टिळकांनी वापरलेले राजकारण/समाजकारण वापरता येणार नाही. (राजकारण! हो तर! टिळक इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद होते.) त्या काळातल्या शक्तिहीन विधानसभा आज नाहीत. त्या काळची बहुसंख्य-अशिक्षित आणि परदेशाधीन समाजव्यवस्था आज नाही
: इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद असूनही टिळकांनी " होमरुल " ची मागणी लावून धरली होती .

५.आजही वेगवेगळे लोक आजसाठी उपयुक्त असे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. त्या लोकांचे नाव "टिळक" नाही. त्यांचे मुखपत्र "केसरी" नाही. त्यांचे गार्‍हाणे वंगभंगविरोध नाही. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असे ठणकावणार्‍या अग्रलेखांचा रतीब आजकाल दर आठवड्याला प्रत्येक वर्तमानपत्र घालते :
सहमत . जो पर्यन्त "जनता " सुखी आहे आणि देश प्रगती करतो आहे तो पर्यन्त नाव / आडनाव / मुखपत्र कोण्तेही असो .

६.त्यासाठी "टिळक" लागत नाहीत आणि "केसरी" लागत नाही. काळाची गरज वेगळी आहे, आणि काळाचे अध्वर्यू वेगळे आहेत :
सहमत. (असे अध्वर्यू "वॉर्डा वॉर्डा " तयार होत आहेत की काय ? )

७.हे विलापक १९०५ काळात जिवंत असता तर टिळकांना रडत-रडत शिव्या घालणार्‍यांपैकी हेसुद्धा असते : केवळ कल्पना विलास .तुमच्य कल्पनाशक्ती चा मामला आहे .

८.ज्वलंत पराक्रमी पेशवे गेल्यानंतर महाराष्ट्रभूमी निर्वीर झाली असे लोक त्या काळात म्हणत. (त्या लोकांना डोळ्यासमोरचे टिळक दिसले नाहीत!) या विचारधारेची माहिती लोकहितवादी देतात. असल्या विलापाची लोकहितवादी निर्भर्त्सना करतात :
लोकहित वादी शी सहमत. फक्त लोकहित वादीचे विचार (नासिक पुरते ?) मर्यादित राहीले . लोकहित वादीची शतपत्रे ही विस्मुतीत जाणार ?

९.आपणही आज होत असलेल्या असल्या विलापास दूर केले पाहिजे : असहमत व परन्तु आपणास शुभेच्छा.

धन्यवाद - असहमती ठीक आहे, किंवा कदाचित फारशी असहमती नाही.

टिळकांचे पुण्यस्मरण योग्यच आहे. फक्त "आज टिळक नाही, शक्य नाही" असे न म्हणता आजच्या काळात आजच्या समस्यांसाठी स्फूर्ती घेऊया असे पुण्यस्मरण भावले असते.

टिळकांनी होमरूलचा मुद्दा मांडला, हे योग्यच. आज होमरूलचा मुद्दा मांडता येणार नाही, वेगळे मुद्दे कालानुरूप मांडावे लागतील. राज्य-अधिकार्‍यांना जाब विचारण्याचा हक्क, पारदर्शकता, वगैरे. (यात बहुधा तुमची सहमतीच सांगितलेली आहे.)

असे अध्वर्यू "वॉर्डा वॉर्डा " तयार होत आहेत की काय ?

(मुद्द्याचा संबंध कळला नाही. वॉर्डा-वॉर्डात टिळकांच्या काळातही अध्वर्यू नव्हते. आजही नाहीत. त्या काळीसुद्धा वॉर्डा-वॉर्डात अध्वर्यू असते, तर बरे झाले असते. आजही वॉर्डा-वॉर्डात अध्वर्यू असतील तर बरे होईल. पण बहुधा वॉर्डा-वॉर्डात होणार नाहीत, त्यापेक्षा बरेच कमी होतील. बहुधा येथे कुठला असहमतीचा मुद्दाच नाही.

हे विलापक १९०५ काळात जिवंत असता तर टिळकांना रडत-रडत शिव्या घालणार्‍यांपैकी हेसुद्धा असते : केवळ कल्पना विलास .तुमच्य कल्पनाशक्ती चा मामला आहे .

भूतकाळाबद्दल "जर असते तर" हा कल्पनाशक्तीचा मामला आहे, हे खरे.
म्हणायचे असे आहे : त्या काळात काही लोकांनी पेशव्यांचे स्मरण करून "किती हे भयाण निराश युग" असे म्हटले. त्याकडे त्या काळाबद्दल आशावाद बाळगणार्‍यांनी दुर्लक्ष केले. आजही काही लोक टिळकांच्या काळाचे स्मरण करून म्हणतात "आजचे युग भयाण आणि आशा करण्यालायक नाही". आपल्या काळात आशावाद बाळगणार्‍यांनी आजही अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे. (आता भूतकाळाविषयी कल्पनाविलासाचा अलंकार दूर करून वर्तमानासाठी मनाची भूमिका अनलंकृत रीत्या सांगितली आहे.)

९.आपणही आज होत असलेल्या असल्या विलापास दूर केले पाहिजे : असहमत व परन्तु आपणास शुभेच्छा.

समजले नाही. लोकहितवादींशी (पेशव्यांनंतर फक्त रुदन करणार्‍यांची निर्भर्त्सना याबद्दल) तुमची सहमती काय आहे, आणि त्या सहमती असल्यास येथे लगेच असहमती कसली आहे?

(लोकहितवादी वगैरे कालांतराने कमीकमी वाचले जातील. नवीन मराठी लेखन जोवर होत राहील, तोवर नवीन लेखनासाठी जुने लेखन उदारपणे जागा करून देईलच. लोकहितवादींचे लेखन त्या काळात प्रसिद्ध झाले, तसे त्यापूर्वीचे लेखनही थोडे मागे सरलेच ना? याबद्दलही दु:ख नको. ऐतिहासिक काळातील मते कळण्यासाठी ते लिखाण उपलब्ध असले, नाश पावले नाही, तरी पुरे. विधवांच्या केशवपनाबद्दल विरोध आता ऐतिहासिक मोलाचा म्हणून स्तुत्य आहे. पुन्हा ताजा म्हणून वाचण्यालायक नाही. जुने लेखन सगळे वाचायला आयुष्य पुरणार नाही. ते पूर्वीइतकेच वाचले जावे, असे आपण म्हणू लागलो, तर मराठी नवनिर्मिती ठप्पच होईल!)

धनंजयांशी पुर्ण सहमत !!!

वरील मूळ लेख हा थोडाफार निबंध वाटला आणि त्यात काहीशी भावना विवशता दिसली तरी मूळ उद्देश टिळकांचे स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्मरण करणे असेच वाटले. टिळकांचीच कशाला कुठल्याच स्वातंत्र्य चळवळीतील नेत्याची तुलना ही आजच्या कुठल्याच नेत्याशी होईल असे वाटत नाही. मी तर पुढे जाऊन असेही म्हणेन की एखाद्या नेत्याला जर आपण, "तुम्ही अगदी टिळक/गांधी/सावरकर/नेहरू/पटेल वगैरेंसारखे आहात", असे म्हणले तर ते घाबरतीलच कारण यांच्यातील कुणासारखेही आपण योगदान करत आहोत का अर्थात आपले "खाणे" कमी पडत आहे अशी भिती वाटू शकेल. असो. हे शेवटचे वाक्य अतिशयोक्तीपूर्ण आहे हे समजले असेलच. नाहीतर लिहीले आहे, त्यावर चर्चा नको म्हणून. ;)

धनंजयच्या काही मुद्यांबाबतः

टिळकांनी होमरूलचा मुद्दा मांडला, हे योग्यच. आज होमरूलचा मुद्दा मांडता येणार नाही, वेगळे मुद्दे कालानुरूप मांडावे लागतील.

अर्थातच. शिवाजीची आठवण काढली जाते तेंव्हा घोड्यावर आजकाल कोणी बसत कुणाचा कोथळा काढत नाही म्हणून खेद व्यक्त केला जात नाही. "शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप" हाच उद्देश असतो, असला पाहीजे. ज्यांचा नसतो, त्यांचा कसलाच नसतो.

राजकारण! हो तर! टिळक इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद होते.

हे वाक्य ज्यांना इतिहास माहीत नाही अथवा आत्ता लक्षात नाही त्यांच्यासाठी थोडे दिशाभूल करणारे वाटते. मग तसा उद्देश असो अथवा नसो. म्हणजे जणू काही टिळक हे इंग्रजांच्या बाजूचे होते अथवा इंग्रजी व्यवस्था त्यांनीच वापरली, "हो तर!.." वाचताना असे वाटते. त्यांच्या बरोबर/मागे-पुढे त्याच सभांमध्ये गोखले, तेलंग, फिरोजशहा मेहता आदी अनेकजण होते. शिवाय अडीच वर्षात त्यांनी या सभेचा त्याग केला हा अजून एक वेगळा भाग ज्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.

टिळकांना जीवनकाळात हिणकस नेता अशी संभावना ऐकावी लागली (तेल्यातांबोळ्यांचा नेता असे काही ब्राह्मणांकडूनच), आणि भ्रष्ट-आचाराचे बालंटही सहन करावे लागले (ताईमहाराज प्रकरण). ते खोडण्यासाठी दीर्घ इतिहास लागला.

(कॉमेंट आहे, प्रत्येक गोष्टीशी असहमत / सहमत हा स्टँड नाही ;) )टिळकांच्या बाबतीत असंतोषाचे जनक ही शिवी म्हणून चिरोलने वापरली होती. त्याच्या विरोधात टिळक खटला लढले आणि हरले देखील. पण हेच पुढे त्यांचे बिरूद ठरले. तेलातांबोळ्यांचे पुढारी हे कोणी हिणावण्यासाठी म्हणले असे मी ऐकलेले/वाचलेले नाही. त्यांनी ज्या पद्धतीने त्याकाळासाठी समाजाला एकत्र केले होते त्या संदर्भात त्यांना कौतुकाने म्हणले जायचे. धनंजयला उलट काही माहीती असल्यास त्यांनी अवश्य सांगावी. ताई महाराज खटल्यासंदर्भात जे काही वाचलेले आठवते त्याप्रमाणे, प्रथम लोकांना नक्की काय झाले अशी शंका आली. पण ज्या पद्धतीने खट्ला वळण घेऊ लागला त्यावरून ब्रिटीशांचा हेतू आणि त्याला असलेली ताईमहाराजांची साथ लक्षात आली. त्यात वेळ गेला. अर्थात हे बालंट जाण्यासाठी १९०२ पासून २१ जुलै १९२० (मृत्यू आधी केवळ दहा दिवस) इतका काळ गेला. त्या काळात अर्थात टिळकांचे नाव वाढतच गेले.

आताच्या काळात टिळकांनी वापरलेले राजकारण/समाजकारण वापरता येणार नाही.
तसे साक्षात टिळक आले तरी देखील वापरणार नाहीत ;). अथवा वर म्हणल्याप्रमाणे शिवाजी घोड्यावरून पुणे-सातारा कूच करणार नाही... तेच इतर अनेक थोर नेत्यांसंदर्भात. त्यांच्यासारखे वागावे म्हणजे नक्कल करायची नसते. तसे पगडी आणि पंचा घालणारे भरपूर होऊन गेले आहेत आणि डोक्यावर पदर घेऊन तारसप्तकात जनतेला आदर्श करणार्‍या आजही होत आहेत...

हा विषय टिळकांच्या संदर्भात आहे म्हणून केवळ त्यांच्याकडून काय घ्यावे हे मला वाटते इतकेच मर्यादीत ठेवत आहे:

  1. सर्वप्रथम अभ्यासू वृत्ती
  2. स्वजनांबद्दल आणि स्वराष्ट्राबद्दल प्रेम आणि जाज्वल्य अभिमान. हा अभिमान जास्त करून परकीयांना हाकलण्यासाठी होता असे वाटते. आजच्या काळात तसाच अभिमान ठेवला असता असे वाटत नाही.
  3. आपल्या जनतेला एकत्र ठेवण्याची कला. त्यातूनच त्यांना प्रच्छन्न सुधारक असे विशेषण (की हेटाळणी?) मिळाले.
  4. निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप तसेच अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव, पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता । हे गीतेत दैवी संपत्ती म्हणून सांगितलेले गूण त्यांच्याकडे होते आणि सतत वापरले गेले.
  5. लोकसंग्रहाची हातोटी - हा गूण असलेले सुदैवाने अजून बरेच नेते भारतात होऊन गेलेत. याचा अनुनय करणे कुणालाही सहज शक्य आहे, पण आज आपण त्या गुणाचे महत्व विसरलो आहोत असे वाटते....
  6. सगळ्यात शेवटी - ताई महाराजांचा खटला, त्याच्या मागे-पुढे इतर अनेक बालंट लागलेले असताना, स्वतःचा मुलगा प्लेग मधे गेलेला, अशा वेळेस देखील आर्क्टीक होम इन वेदाज हा ग्रंथ लिहीला, अनेक जनसामान्यांना कायदा आणि इतर गोष्टींसाठी मदत केली आणि राजकारण देखील केले. तेच मंडालेत असताना गीता रहस्य लिहीले, कर्मठ लोकांशी त्यावरून वाद घातला, ब्रिटीशांनी ताब्यात दिले नसते तर "माझे डोके घेतले नाही" म्हणत परत लिहायची तयारी दाखवली आणि बाहेर पडल्यावर परत होमरूल आणि इतर कृतींनी स्वराज्य लढ्यात उतरले. थोडक्यात भावनेच्या आहारी न जाता स्वतःतील गुणांनी देशासाठी, स्वजनांसाठी आणि ज्ञानपुर्तीसाठी सातत्याने स्वाचरणाने जगलेला कर्मयोग.

विकास यांचे मुद्दे नेहमीच विचारार्ह असतात.

स्मृतिदिनाबद्दल आणि स्फूर्तीबद्दल वेगळे मत काय असू शकणार आहे - सहमतीच आहे.

टिळकांचीच कशाला कुठल्याच स्वातंत्र्य चळवळीतील नेत्याची तुलना ही आजच्या कुठल्याच नेत्याशी होईल असे वाटत नाही. मी तर पुढे जाऊन असेही म्हणेन की एखाद्या नेत्याला जर आपण, "तुम्ही अगदी टिळक/गांधी/सावरकर/नेहरू/पटेल वगैरेंसारखे आहात", असे म्हणले तर ते घाबरतीलच कारण यांच्यातील कुणासारखेही आपण योगदान करत आहोत का अर्थात आपले "खाणे" कमी पडत आहे अशी भिती वाटू शकेल.

याबाबत असहमती किंवा सहमती काय सांगावी याबद्दल मला काहीच कळत नाही. जर त्यांचे म्हणणे कमालीचे निराशाजनक नसेल (म्हणजे जग हे पिढीपिढीने पूर्वीपेक्षा हीन बनत चालले आहे, असे नसेल) तोवर त्यांच्याशी सहमत आहे. पण मग "कोणीच कोणाशीशी अंततोगत्वा तुलनीय नसते" या निरर्थक आणि पूर्ण सत्याशिवाय हे काय आहे?

आणि जर त्यांचे मत आहे की जगात पूर्वीसारखे नेते कोणीच असू शकत नाहीत त्यामुळे जग सदाकरिता दरिद्री आहे, तर मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटते. ते त्यांच्या सुखाचे शतक चुकले, आणि या शतकात त्यांना दु:खाशिवाय पर्याय नाही. ते असे निराशावादी नाहीत, असे त्यांच्या पूर्वीच्या लेखनावरून माहीत आहे. मग आजकालचा माणूस (नेता हा सद्गुण-अवगुण असलेल्या माणसाचाच प्रतिनिधी ना?) हा पूर्वीच्या कुठल्याच माणसाइतका उदात्त नाही, (भ्रष्टाचारी "खाणारा"च आहे, पूर्वीच्या माणसांपेक्षा कमी योगदान देणारा आहे) असे ते कसे काय म्हणत आहेत. ही केवळ अलंकारिक भाषा आहे काय? अलंकारिक भाषेची देणगी ते निराशा पसरवण्यासाठी का म्हणून वापरत आहेत?

हे वाक्य ज्यांना इतिहास माहीत नाही अथवा आत्ता लक्षात नाही त्यांच्यासाठी थोडे दिशाभूल करणारे वाटते.

नव्हे. दिशाभूल करणारे नव्हे. मागच्या काळचे पुढारी लेजिस्लेटिव्ह कौंसिलात होते, म्हणजे त्यांना "हॉर्स ट्रेडिंग", मतविभाजन, धोरणी मतबदलणी, वगैरे करावे लागत होतेच. "हॉर्स ट्रेडिंग" वगैरे गोष्टी हल्लीच होऊ लागले आहे ("मतपेट्यांचे राजकारण") हा भाबडा समज पुष्कळदा दिसतो. मात्र मते घेणार्‍या सभा असतात, तिथे असले सौदे करणे भागच आहे. आणखी असा काही विचित्र समज आहे (हा भाबडा असला तरी धोकादायक आहे) की मते जमवण्यातला धोरणीपणा म्हणजे नेहमीच पापी असतो. हा धोरणीपणा तेव्हाही पापी नव्हता आणि आजही नाही. फिरोजशहा मेहता वगैरे लोक काय जाऊन आपली मते धोरणाने खेळत नसत काय? मुंबईमध्ये पारशांची एकगठ्ठा मतपेटी त्या काळात धोरणाने वापरली जात असे. (एका जुन्या राजकीय व्यंग्यात मुंबईची "पारसीस्तान" म्हणून संभावना झालेली मी वाचलेली आहे. या व्यंग्याचा रोख पारशी समाजाच्या संम्ख्येपेक्षा अधिक असलेल्या राजकीय-एकजूटीबाबत होता.)

"तेल्यातांबोळ्यांचा पुढारी", एकोपा हे आपल्यासाठी भूषण आहे. त्या काळातल्या पुण्यातल्या ब्राह्मणांसाठी नव्हते. ताईमहाराजांच्या बाबतीत "आधी शंका होती, मग ब्रिटिशांचा डाव लक्षात आला" हे काही लोकांना. नुसती शंका नव्हती, बालंट होते. ते खोटे आहे, ते आपल्याला "हाइंडसाईट २०-२०"ने माहीत आहे.

साक्षात टिळक आता काय डावपेच वापरतील? तुम्हाला काय वाटते? लेजिस्लेटिव्ह कौन्सिलात गेले, तसे कदाचित विधानसभेत जातील. विधानसभेत त्यांचे एक मत असेल. बाकीच्या लोकांच्या जातीचे पक्षपात चाणाक्षपणे ओळखतील. कोणाचे पैसे/वारसहक्क कुठे अडकले होते ते ओळखून तसे दबाव आणतील. जर सरकार-पक्षात पोचलेच नाहीत तर "'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असे संपादकीय लिहितील. सरकार-पक्षात पोचले, तर त्यांना असे लिहिण्याचा हक्क तरी येतो का? नव्हे. पक्षाच्या अन्य विधायकांशी संगनमत करून विधायके पारित करतील. कुणी (पुढे फितणार्‍या) जिनासारख्याशी मिळून राजकीय आघाडी बनवतील.

हे सर्व कल्पनाविश्व आहे. तुमच्या कल्पनाविश्वात आज टिळक काय करतील? विधानसभेत जातील की नाही? कुण्या (गो.कृ.) गोखल्यांना शह देत कुण्या जिनांशी सकारात्मक आघाडी उघडतील की नाही. (मग जिना पुढे [किंवा मनातल्या मनात] काही का विचार करेनात.

राजकारण (घाणेरडे) आणि समाजकारण (उदात्त) असा काही निराशावादी विचार मला ऐकायला मिळतो, तो मला लोकशाहीविरोधी, आणि माणूसघाणा वाटतो. स्खलनशील माणसांच्या समाजामध्ये पूर्वीसुद्धा आशावादी प्रगतिशील माणसे होती, आजही आहेत. ज्यांना आजच्या समाजात भूतकाळाची सर कधीच येणार नाही म्हणून दु:खी राहायचे असेल, त्यांनी खुशाल दु:खी राहावे.

मात्र "भविष्यकाळातील चांगल्या गोष्टीं"बद्दल आशा ठेवून, आजच्या घडीतच प्रगती करायची आहे, तितपत मनुष्य-सद्गुण जिवंत आहे, असे जे म्हणतात, त्यांच्यावर कुरघोडी करू नये.

विकास यांच्या शेवटच्या "काय घ्यावे" मुद्द्यांमध्ये अशा प्रकारचा स्फूर्तिदायक आशावाद दिसतो. मात्र तो आशावाद आणि "कुठलेच नेते खाता-खाता काही योगदान करूच शकणार नाहीत" या निराशेमुळे कसा काय कार्यक्षम होईल, ते मला कळत नाही.

याबाबत असहमती किंवा सहमती काय सांगावी याबद्दल मला काहीच कळत नाही.

अशा वेळेस "whatever!", असे म्हणावे ;). टिळक अथवा इतर अनेक स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची तुलना आजच्या नेत्यांशी होऊ शकत नाही असे म्हणतो, तेंव्हा ते माझे माझ्यापुरते निरीक्षण असते. त्यात निराशावाद वगैरे नाही. आत्ताची माझ्यालेखी वस्तुस्थिती आहे. कदाचीत इतरांना पटेल अथवा पटणार नाही. बरं ही तुलना कशी करायची तर जे कालातीत गूण असतात ते कालानुरूप कसे वापरले जातात. त्या व्यतिरीक्त त्यांच्याबद्दल असलेले आदरयुक्त प्रेम असू शकेल, त्यांच्यातील गुणांचे आकर्षण असू शकेल. अत्रे जेंव्हा म्हणायचे की अमूक एक व्यक्ती गेल्या दहा हज्जार वर्षात झाली आणि पुढल्या दहा हज्जार वर्षात होणार नाही, तेंव्हा त्यात निराशावाद नसायचा तर एक म्हणण्याची पद्धत आणि त्या व्यक्तीच्या गुणांचे केलेले appreciation इतकेच असायचे. मी काही अत्रे नाही (कारण ते देखील अजून दहा हज्जार वर्षात होणार नाहीत!) पण त्याच पद्धतीत म्हणले असे समजा फार तर...

"तेल्यातांबोळ्यांचा पुढारी", एकोपा हे आपल्यासाठी भूषण आहे. त्या काळातल्या पुण्यातल्या ब्राह्मणांसाठी नव्हते.
असे तुम्ही कुठे वाचले आहेत का की त्या वेळच्या ब्राम्हणांनी त्यावरून टिळकांना त्रास दिला असे? माझ्या वाचनात तसे नाही. असल्यास सांगावे. जाती-धर्माचा संबंधच आणायचा तर, ब्राम्हणांनी टिळक आणि रानडे यांच्यावर केवळ पाद्र्याच्या बागेत चहा प्यायला म्हणून (चहा ग्रामण्य) बहीष्कार घातला होता. रानड्यांनी (सुधारक असूनही) प्रायश्चित्त घेतले तर टि़ळक म्हणाले घाला बहीष्कार. सगळे कुटूंब बहीष्कृत झाले. मुलाची श्रावणी करायची तर त्यासाठी स्वतःच "बाळंभट" म्हणत भटजी झाले. स्वत:च्या कृतीतून ते लोकांना हळू हळू विचार करायला लावत होते की आपला धर्म इतका लेचापेचा आहे का? म्हणूनच त्यांना प्रच्छन्न सुधारक म्हणत. अशी अनेक उदाहरणे आहेत..

मागच्या काळचे पुढारी लेजिस्लेटिव्ह कौंसिलात होते, म्हणजे त्यांना "हॉर्स ट्रेडिंग", मतविभाजन, धोरणी मतबदलणी, वगैरे करावे लागत होतेच.
यातील "हॉर्स ट्रेडींग" हा शब्द तेंव्हाच्या (म्हणजे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलच्या संदर्भात) सर्वच राजकारणी-स्वातंत्र्यचळवळीच्या नेत्यांच्या संदर्भात जरा जास्तच वाटत आहे. "हॉर्स ट्रेडींग"चा राजकारणातील अर्थ हा पैसे देऊन मते घेणे/देणे. तुम्ही कधी कुणाबद्दल हे ऐकले आहेत का की त्यांनी कोणीच असे "हॉर्स ट्रेडींग" केले आहे म्हणून? त्यामुळे हा शब्द पटत नाही. शिवाय तेंव्हा मतदान इतके सरळ नव्हते, सरकारला कोणी तेथे जावे या संदर्भात बरेच अधिकार होते हा अजून एक भाग. काँग्रेस आणि १९३० सालानंतरच्या प्रांतिक निवडणूकांच्या वेळेस हॉर्स ट्रेडींग ह्या प्रकाराची सुरवात झाली असे वाटते. तरी देखील ते आत्तासारखे हिन पातळीवर नक्कीच नव्हते.

तुमच्या कल्पनाविश्वात आज टिळक काय करतील? विधानसभेत जातील की नाही?

माझ्या कल्पनाविश्वाचा प्रश्न नाही. टिळक स्वतःच म्हणायचे की स्वतंत्र भारतात मला प्राध्यापक होऊन गणितावर संशोधन करायला आवडेल म्हणून. यात उत्तर आले.

मात्र आज जर टिळकांसारखे एखादे व्यक्तीमत्व असले तर त्याने आत्ताच्या घडीस काय केले असते हा नक्कीच प्रश्न असू शकतो. त्याला उत्तर परत टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील मुत्सद्दीपणाला जाते. टिळक म्हणत की, "सरकारकडून जे काही मिळत आहे ते पदरात पाडून घ्या आणि मग अधिक गोष्टींसाठी भांडा". आपला शत्रू नक्की कोण आहे याचा विचार करा. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश होते. स्वातंत्र्योत्तर काळात कदाचीत आपल्यामधील दारीद्र्य, अज्ञान असेल तसेच अधुनिक जगात राष्ट्र म्हणून वावरताना काय आणि कसा स्टँड घ्यावा हे असे असेल, एक ना अनेक...

राजकारण (घाणेरडे) आणि समाजकारण (उदात्त) असा काही निराशावादी विचार मला ऐकायला मिळतो, तो मला लोकशाहीविरोधी, आणि माणूसघाणा वाटतो.

पूर्ण सहमत.

विकास यांच्या शेवटच्या "काय घ्यावे" मुद्द्यांमध्ये अशा प्रकारचा स्फूर्तिदायक आशावाद दिसतो. मात्र तो आशावाद आणि "कुठलेच नेते खाता-खाता काही योगदान करूच शकणार नाहीत" या निराशेमुळे कसा काय कार्यक्षम होईल, ते मला कळत नाही.

ते "स्फूर्तिदायक आशावाद" म्हणून लिहीले नव्हते. ती एक प्रकारची चेकलीस्ट आहे. कुणाकडून काय घेता येईल या संदर्भात आपण (म्हणजे तुम्ही आणि मी, सर्वच) टिळकांचे स्मरण करत असताना त्यांच्याकडून काय घ्यावे हे लिहीले होते. नुसतेच स्मरण करण्यापेक्षा "एक तरी ओवी अनुभवावी" प्रमाणेच "एक तरी गूण जाणून अंगिकारावा" असे माझे म्हणणे आहे.

टिळकांनी मिशनमध्ये चहा घेतला होता म्हणून त्यांना प्रायश्चित्त करण्यास भाग पाडायचा प्रयत्न होता. (त्या बाजूचे नेते "नातू" पूर्ण नाव आठवत नाही.)

टिळक बधले नाहीत. त्यांच्या विरोधात धर्मन्यायालय बसले. नातूंनी अई केस मांडली. टिळकांनी उत्तम. (हे काही पाप नाही, अशी.) निकाल टिळकांच्या बाजूने लागला.

पुण्यातल्या ब्राह्मणांमध्ये लोकमान्यत्व मिळवण्यापूर्वी टिळकांना पुराणमतवाद्यांकडून त्रास झाला. (लोकमान्यत्व घडेपर्यंत "संभोगासाठी संमतिवय कायद्या"चा विरोध टिळकांनी उचललेला होता. पुराणमतवाद्यांना धरून लोकसंग्रह करण्यासाठी असले तह करावे लागतात.)

बाकी चर्चा चालूच राहील. इथे आवरते घेतो.

टिळकांनी मिशनमध्ये चहा घेतला होता म्हणून त्यांना प्रायश्चित्त करण्यास भाग पाडायचा प्रयत्न होता. (त्या बाजूचे नेते "नातू" पूर्ण नाव आठवत नाही.)

नातू हे नाव मला देखील पुसट आठवत आहे, पण माझ्या आठवणीप्रमाणे हा खोडसाळपणा गोपाळराव जोशी (आनंदीबाई जोशींचे पती) यांनी घडवून आणला होता. रानड्यांनी तेंव्हा सुधारकवृत्तीस प्रामाणिकपणे जागून पाद्र्याच्या हातून चहा पिताना खळखळ केली नाही. टिळक त्यांच्या "सनातनी" वृत्तीस जागत म्हणाले की मी तसा चहा पिणार नाही. त्यावर गोपाळरावांनी त्यांच्या भावाला चहा आणून दे म्हणले. मग त्याच्या हातून चहा टिळकांनी प्यायला. तरी देखील दोन नेत्यांनी पाद्र्याच्या बागे मधे चहा पिऊन धर्म भ्रष्ट केला म्हणून आवई उठवली!

धर्मन्यायलाय बसण्याआधी टिळक काशीला गेले असताना सर्व ज्ञातअज्ञात पापक्षालनार्थ गंगेत बुडी मारून एक काशीच्या धर्मपिठाकडूने सर्टीफिकेट घेऊन आले. धर्मसभेत ते अचानक दाखवल्यावर सगळ्यांची गडबड झाली. हो म्हणावे तर माघार घेतली नाही म्हणले तर काशीच्या धर्मपिठाचे महत्व धुडकारले!

गंमत म्हणजे हेच गोपाळराव जोशी (ऐ़कीव माहीतीप्रमाणे) एकदा एका मिशनर्‍याचे सर्व ऐकून ख्रिश्चन झाले. पाद्री खुष झाला. मात्र दुसर्‍याच क्षणाला सगळे फेकून त्याला म्हणाले की असे नुसते पाणी उडवून का कुणाचा धर्म बदलतो?

असो. हे सगळे घडणारे गाव आणि गावकरी कुठले हे वेगळे सांगणे न लगे. ;)

दुसर्‍याच क्षणाला
माझ्या माहितीप्रमाणे दुसर्‍या दिवशी. अर्थात, हे तितके महत्त्वाचे नाही!

हे सगळे घडणारे गाव आणि गावकरी कुठले हे वेगळे सांगणे न लगे
माझ्या माहितीप्रमाणे गोपाळराव जोशी मूळचे नाशिकचे. अर्थात, हेदेखिल फारसे महत्त्वाचे नाही!

म्हणजे ही गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणता तसे दुसर्‍या दिवशी असू शकेल.

बाकी गोपाळराव जोशी मूळचे नाशिकचे असतीलही पण जसे नॅचरलाईझ्ड सिटीझन होता येते तसे काहीसे असावे. ;)

गोष्ट खरी आहे हे खरे!

जसे नॅचरलाईझ्ड सिटीझन होता येते तसे
नॅचरलाईस्ड सिटिझन कागदोपत्री होता आले तरी त्यात मूळ देशीयांचा "अर्क" उतरतोच असे नाही! अमेरिकन झाली तरी योघर्टऐवजी विरजण आवडणारी मंडळी असतात तशी!!

अमेरिकन झाली तरी योघर्टऐवजी विरजण आवडणारी मंडळी असतात तशी!!

योगर्टचा आणि अमेरिकनपणाचा संबंध काय?

मांसाहाराने 'अभागी शाकाहारी समाजाचे सदस्य'त्व (किंवा गोमांसभक्षणाने हिंदुत्व) नाहीसे होत नाही, तसेच विरजणाने भारतीयत्व चिकटूनही राहू नये, नाही का?

(बाय द वे, अमेरिकन नागरिकत्व घेतल्यावर कितीही विरजण घातले तरी भारतीयत्व चिकटून राहू शकत नाही. भारत सरकार याची व्यवस्थित काळजी घेते.)

बाय द वे, अमेरिकन नागरिकत्व घेतल्यावर कितीही विरजण घातले तरी भारतीयत्व चिकटून राहू शकत नाही. भारत सरकार याची व्यवस्थित काळजी घेते.
+१००००. खरोखरच तशी काळजी घेतली जात असेल तर ते योग्यच आहे.
भारतीयांना योगर्ट आवडूच नये किंवा अमेरिकन नागरिकांना दही आवडूच नये असे नाही.

"नातू" म्हणजे "सरदार नातू". यानीच प्रायश्चिताचा आग्रह धरला होता जो गोपाळराव जोशी व तत्सम धर्मधार्जिण्यांनी कसास लावून प्रकरण अगदे शंकराचार्यांपर्यंत नेले.

"पंच हौद मिशन टी पार्टी" या नावाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील ते बरेच चर्चित प्रकरण आहे. (मला वाटते टिळक, रानडे यांच्यासमवेत त्या मिशन चहापानात "गोखले" देखील उपस्थित होते. खात्री नाही.)

मला असं वाटतंय की विकास यांनी दिलेला प्रतिसाद या धाग्यावरील अंतिम प्रतिसाद ठरु शकेल इतका तो परफेक्ट वाटला. तरीदेखील राहवत नाही म्हणून लिहित आहे. जनसामान्यांनी भावविवश पणे काही गोष्टी मांडल्या की ताबडतोब खूप अभ्यास असल्याच्या थाटात त्यांची चिरफाड करु नये अशी विनंती आहे.

राजकारण! हो तर! टिळक इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद होते.

टिळकांचं राजकारण लेजिस्लेटिव्ह सभेपुरतंच मर्यादित होतं असं म्हणायचं आहे का ?

टिळकांना जीवनकाळात हिणकस नेता अशी संभावना ऐकावी लागली (तेल्यातांबोळ्यांचा नेता असे काही ब्राह्मणांकडूनच).
तेल्यातांबोळ्यांचा नेता म्हणून गणले जाणे ही संभावना नाही ती एक गौरवार्ह बाब आहे. त्या काळात सुद्धा समाजातल्या सगळ्यात खालच्या थरापर्यंत त्यांनी चळवळ नेली त्याचं हे द्योतक आहे.

यात टिळकांचा कुठला अपमान दिसला?
अपमान दिसला नाही. पण टिळकांचं कौतुक चालू आहे हे तुम्हाला खटकतं आहे असं वाटलं. तुम्ही मोठ्या कौशल्याने प्रतिसाद लिहिला आहे त्यामुळे तुमच्यावर थेट आरोप झाला तर तो सहज खोडून काढता येइल अशी तुम्ही काळजी घेतली आहे.

जनसामान्यांनी भावविवश पणे काही गोष्टी मांडल्या की ताबडतोब खूप अभ्यास असल्याच्या थाटात त्यांची चिरफाड करु नये अशी विनंती आहे.

:-)

राजकारण! हो तर! टिळक इंग्रजांनी स्थापलेल्या लेजिस्लेटिव्ह सभेत सभासद होते.
टिळकांचं राजकारण लेजिस्लेटिव्ह सभेपुरतंच मर्यादित होतं असं म्हणायचं आहे का ?

नाही.

तेल्यातांबोळ्यांचा नेता म्हणून गणले जाणे ही संभावना नाही ती एक गौरवार्ह बाब आहे.

आज गौरवार्ह बाब आहे. माझ्या लेखी तर आहेच. त्या काळी नव्हती. ज्याला आजकाल "खालच्या थरात "सवंग" लोकप्रियता मिळवणे म्हणतात, तसे त्या काळचे उच्चभ्रू मानत.

अपमान दिसला नाही.

धन्यवाद.

पण टिळकांचं कौतुक चालू आहे हे तुम्हाला खटकतं आहे असं वाटलं.

निराशावादी कौतूक खटकते, स्फूर्ती आणि आशावादी जोम असला तर आवडला असता, असे खुद्दच म्हटले आहे. "जे चालू आहे" ते खटकत नाही. फक्त "निराशाजनक" तितके खटकते. इतपत तुम्हाला वाटत असेल तर मान्य. स्फूर्ती-आशाजनक कौतूकही खटकते असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे वाटणे चुकलेले आहे.

तुम्ही मोठ्या कौशल्याने प्रतिसाद लिहिला आहे त्यामुळे तुमच्यावर थेट आरोप झाला तर तो सहज खोडून काढता येइल अशी तुम्ही काळजी घेतली आहे.

येथे "अभ्यासाचा थाट"च नाही, तर आता "कुशल आणि थेट नसलेला अपमान" तुम्हाला दिसतो आहे. हा तुमचा पूर्वदूषितग्रह आहे. नाहीतर "अपमान नाही" असे समजताच म्हणण्याचा योग्य अर्थ तुम्ही घेतला असता. अपमान नसला तरी कुशल-वाकडा अपमान आहेच, असे समजून घेतले नसते. पुन्हा विचार करून योग्य अर्थ घ्याल अशी आशा आहे.

आणि होय. कोणाची निराशावादी भावविवशता माझ्या वर्तमान आणि भविष्यकालीन जगाची, आशांची चीरफाड करत असेल, तर त्यांनी तसल्या भावविवशतेची फारशी कदर होणार नाही अशी त्यांनी अपेक्षा ठेवावी. भूतकालीन भावविवशतेसाठी सद्भाव हवा असेल, तर वर्तमान-भविष्याबद्दल आशावादी सद्भाव दाखवण्याइतके सौजन्य दाखवावे. दुहेरी मार्गी रस्ता आहे.

अविनाशशेठ,
कविता खरोखरच छान. पटले.
कदाचित ही शेवटचीच पिढी असेल टिळकांचे पुण्यस्मरण करणारी.

बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतीस वंदन!

एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक

हे मात्र दुर्दैवाने खरे ठरत आहे.
आज एक ऑगष्ट हा फ्रेन्डशिप डे म्हणूनच आठवला जातो. तद्दन बाजारू कंपन्यानी घडवलेला सण.
नशीब अजून राखीपौर्णीमा दिवाळी भाऊबीज सुरक्षीत आहेत.

काही ख्रिस्ती लोकांमध्ये अशी समजूत, दृढ विश्वास आहे :
ख्रिस्तानंतर काही शतके बरे चालले होते, तेव्हापासून जगात पापी लोक बोकाळत आहेत. शैतानाकडून प्रतिख्रिस्त येत आहे. ख्रिस्ताचा देवदूत आताच कधीतरी येऊन तुतारी वाजवणार आहे, आणि सगळे पुण्यवान लोक स्वर्गात जातील. पापी लोक येथेच राहातील, युद्धांत भरडले जातील, खितपत राहातील. शेवटी जगाचा नाश होईल.

माझी ख्रिस्तापाशी प्रार्थना आहे, की ख्रिस्ता! लवकर तुझ्या देवदूतांना तुतारी वाजवायला पाठव. हे "गेले ते पूर्वीचे पुण्यवान दिवस+जगबुडी येणार" म्हणणारे लोक लवकरात लवकर जाउंदेत स्वर्गाला. आम्ही पापी लोक एकमेकांत झगडू आणि वेदनेने विव्हळू. पण या अतिपुण्यवान लोकांच्या सदानकदा तक्रारींपासून तर आमची सुटका होईल!

(सारांश : लोकांना "पापी-पापी" म्हणत राहिले आणि "फार पूर्वीच पुण्यवान लोक होते, आता होणारच नाहीत" म्हणत राहिले, तर लोकांना तुमचा त्रास होतो, सुधारायची आशा काहीच नाही.)

लेख व त्यावरील चर्चा उच्च दर्जाची.. सार्‍यांचेच अभिनंदन.. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला अतिशय अभ्यासपुर्ण माहीती मिळाली..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतीस वंदन

हा लेख जयंत राव..दिपक राव व राहुल यांना समोर ठेवुन तर लिहिला नाहि ना???/अविनाश राव

मला वाटतं या लेखात सामान्य माणसाची सध्याच्या परिस्थितिबद्दल वाटणारी चीड डोकावत आहे. या मागे एक महत्वाचे गृहितक आहे आणि ते म्हणजे चांगले आणि वाईट याच्यामधला फरक कालसापेक्ष नाही. विशेषतः माणसांमधला. म्हणजे असे की वाईट माणसाची व्याख्या कालही तीच होती आणि चांगल्या माणसाची व्याख्या आजही तीच आहे. ( नशीब आपले)
त्यामूळे टिळक हा माणूस थोर होता आणि कलमाडी हा माणूस चोर आहे असे सामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक आहे. तसे वाटण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

लोकमान्य हे राजकारणी होते त्यामुळे त्यावेळेचे राजकारणी आणि आत्ताचे राजकारणी यांची मनात तुलना होणे अपरिहार्य आहे. तसे झाल्यास काय होते ? सध्याच्या राजकारण्यांची लायकी बघता मनात थोडेसे निराशावादी विचार येणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. या विचारानंतर आपण जर या नालायक राजकारण्यांना काही शिक्षा देऊ शकत नसलो की मग चिडचिड होणेही स्वाभाविक आहे. आता ही तुलना करायची का ? त्याचा फायदा काय हा वेगळा मुद्दा आहे. पण असे करणे मानवी स्वभाव आहे.

हा लेख याचा resultant समजावा.

अजून एक महत्वाचे म्हणजे टक्केवारी. सध्या किती टक्के टिळक ( प्रवृत्ती ) आहेत आणि किती टक्के कलमाड ी(प्रवृत्ती) आहेत ? त्याची जास्त काळजी केली तर असे (लेखकाने मांडलेले) विचार सामान्य माणसाच्या मनात येणार. ते मला वाटते इथे कागदावर ( पडद्यावर) उतरले आहेत.

याचेच एक उदा. म्हणजे एका स्वातंत्र्य्सैनिकाला त्याला मिळनार्‍या पेन्शन्साठी अजून झगडायला लागत आहे. तो वैतागाने एका मुलाखतीत म्हणाला "ज्यांच्या विरुध्द आम्ही लढलो त्यांचे राज्य या पेक्षा बरे होते."

या लेखाकडे या दृष्टीकोनातून बघितले तर मला वाटते बरेच प्रश्न सुटतील.

धनंजय यांचा मुद्दा कोणाच्या लक्षातच आलेला दिसत नाही.

टिळक चांगले होते की नाही याबाबत काही टिपण्णी धनंजय यांनी केलेली नाही. त्याकाळचे 'सगळेच' पुढारी चांगले होते आणि आताचे सगळेच पुढारी वाईट होते या भावनेवर टिपण्णी केली आहे.

त्याही वेळी 'सगळे'च पुढारी चांगले नव्हते आणि आताही 'सगळे' पुढारी वाईट नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
त्याकाळचे सगळे पुढारी चांगले होते असे असते तर टिळकांचे कशाला महत्त्व राहिले असते?

असो.
पूर्वीसारखे काही राहिले नाही ही भावना बहुधा सर्व मानवसमाजांत सर्वकाळ असतेच असे आजवरच्या एकूण वाचनातून वाटते आहे. (सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची जेनेटिक मेमरी असेल का?)

म्हणून तर टक्केवारी !

हे धऩंजय, पंगा वगेरे लोक काय म्हणतात ते काय कळलं नाही.

आम्हाला तिसरीत थोरांची ओळख असे पुस्तक होते. त्यात टिळकांवरचा धडा होता. म्हणजे टिळक थोर होतेच ना?

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणार्‍या टिळकाना प्रणाम.

हिंदुराव

थोर होते असेच म्हणतो.
+ निराशा नको असेही म्हणतो.

असेच म्हणतो.

शेवटचे पिढीवाले (टिळकांचे पुण्यस्मरण करणारी शेवटची पिढी असे म्हणणारे) कमीत कमी स्वत:च्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांचे कर्तृत्त्व पोचवू शकतील असे वाटते. दहा वर्षाच्या माझ्या भाच्याच्या शाळेत टिळक पुण्यतिथी साजरी केली गेल्याचे कळले. त्याला तरी टिळक थोर होते हे कळल्यासारखे वाटले.

एखाद्याच्या वाक्यांना मोडून तोडून त्याचे भलतेच अर्थ काढून कसा अनर्थ होऊ शकतो ह्याची हे चर्चा म्हणजे उत्कृष्ट उदाहरण. वरती धनंजय ह्यांनी थोडा वेगळा सूर लावला.(मागील पिढ्यातले) टिळक हे थोर आहेतच पण म्हणून आजची पिढी अगदी नालायक असे म्हणणे सयुक्तिक नाही इतका साधा त्यांचा प्रतिसाद . त्यावर अर्धवट प्रतिसाद देणार्‍यांनी मात्र ते टिळकांची थोरवीच नाकारत आहेत असे वातावरण निर्मिले. मूळ प्रतिसाद जसाच्या तसा इथे अजून असुनही बिचारे धनंजय सगळ्यांना "टिळक थोर आहेत" असे टाहो फोडून सांगत आहेत. पण त्यांचा मूळचा प्रतिसाद नीट वाचून चूक सुधारायची कुणाचीही इच्छा नाही.

शिवाजी ग्रेटच होता. पण गुन्ह्याची शिक्षा म्हणून हातपाय तोडणे वगैरे बार्बारिक शिक्षा आजच्या काळाच्या संदर्भात अमलात आणणे आजच्या प्रगत समजात खुळेपणाचे ठरेल. असे एखाद्याने म्हंटल्यास लगेच, "तुम्ही शिवाजीला बार्बारीक म्हणता? त्याची थोरवी नाकारता? जय भवानी.."जाळा तुमचे घर! असे स्तोम माजववण्यासारखे आहे.

जेम्स लेन वगैरे प्रकरणात हेच होत असावे. समाज नावाची गुंतगुंताची गोष्ट कशी वाट लावते ह्याचे उत्तम उदाहरण.

एखाद्याच्या वाक्यांना मोडून तोडून त्याचे भलतेच अर्थ काढून कसा अनर्थ होऊ शकतो ह्याची हे चर्चा म्हणजे उत्कृष्ट उदाहरण. वरती धनंजय ह्यांनी थोडा वेगळा सूर लावला.(मागील पिढ्यातले) टिळक हे थोर आहेतच पण म्हणून आजची पिढी अगदी नालायक असे म्हणणे सयुक्तिक नाही इतका साधा त्यांचा प्रतिसाद . त्यावर अर्धवट प्रतिसाद देणार्‍यांनी मात्र ते टिळकांची थोरवीच नाकारत आहेत असे वातावरण निर्मिले. मूळ प्रतिसाद जसाच्या तसा इथे अजून असुनही बिचारे धनंजय सगळ्यांना "टिळक थोर आहेत" असे टाहो फोडून सांगत आहेत. पण त्यांचा मूळचा प्रतिसाद नीट वाचून चूक सुधारायची कुणाचीही इच्छा नाही.

धन्यवाद.

हेच दाखवून द्यायचे होते.

श्री.धनंजयराव यांची भूमिका मान्य आहेच, पण श्री.अर्धवटरावांनी त्यांना दिलेल्या प्रत्युतरामुळे जे काही गढूळ वातावरण झाल्याचे दिसले त्यावर त्यानीच आज आता दिलगिरीही व्यक्त केली असल्याने तो विषय संपुष्टात आणावा. हे लिहिण्याचे कारण म्हणजे पुनश्च तो "लेन" इथे येण्यास उत्सुक आहे असे वातावरण निर्माण होत आहे. ती भूतभीती पुन्हा मिपावर नको.

चान चान !
अशा उदबोधक चर्चा करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक.

च्यायला काय दिवस आलेत, शिवाजी राजे / टिळक ह्यासारखे महापुरुष थोर होते का नाही ह्याला आता महत्व उरले नसून त्यांच्या विषयी कोणाचे काय मत आहे ह्यालाच जास्ती महत्व आलेले आहे. मला टिळक थोर वाटतात मग उद्या एखाद्याने टिळक थोर न्हवते असे म्हणले तर मला राग का यावा ? नसेल समोरच्याला तसे वाटत. (अर्थात इथे असा सूर कोणीही लावलेला नाहिये, हे एक उदाहरण म्हणून घेतले आहे)