विष्णुगुप्त २

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
1 Jul 2010 - 8:08 pm

(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१)

(मागच्या भागात -

चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.
त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."

इथून पुढे - )

त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक मुद्रा बाहेर काढून त्या द्वारपालाच्या हातावर ठेवली. त्या द्वारपालाने ती मुद्रा उलट-सुलट करून निरखून पाहिली आणि पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने विष्णुकडे पाहिलं. "ही मुद्रा तुझ्याजवळ कुठून आली? तू कुठे...." . "नाही नाही, ही माझी मुद्रा नाही. मला आमच्या राज्यात राजमुद्रा मिळवणंच शक्य नव्हतं. ही मुद्रा मला शंकरशेटींनी दिली. ते आमच्या राज्यात व्यवसायासाठी आले होते. हे पहा त्यांचं पत्र." असं म्हणून विष्णुने झोळीमधून एक पत्र काढून त्याचा हातावर ठेवलं.

शंकरशेटींचं नाव ऐकल्यावर आणि ते पत्र वाचल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्‍यावरचे भाव अचानक पालटले. "तुला शंकरशेटींनी पाठवलं आहे, हे आधीच नाही का सांगायचंस? एवढ्या मान्यवर व्यक्तिकडून तू आला आहेस म्हटल्यावर तू कोण, कुठचा हे प्रश्न आम्ही विचारलेच नसते".
"छे छे! शंकरशेटी तर मला पितृसमान आहेतच, परंतु माझी जन्मदात्री जन्मभूमी ही मला मातेसमान आहे, तिचा प्रथमोल्लेख कसा बरं टाळता येईल? शिवाय माझे गुरू, माझे पिता यांचेही माझ्यावर संस्कार आहेत. आणि त्यांवरूनच तर माणूस ओळखला जातो!"
हे ऐकल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"हसलात का?"
द्वारपाल हसू आवरत म्हणाला, "अरे तू आत्तापासूनच अशी भाषा बोलतो आहेस! तुला इथे येण्याचं प्रयोजनच काय! बरं असो. तुला इथे ही मुद्रा बाळगता येणार नाही. इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यापीठाची अभिज्ञान-मुद्रा असते. ती मी तुला आता देतो, आणि तुझी ही मुद्रा मी माझ्याकडे जमा करून घेतो". असं म्हणून त्या द्वारपालाने ती मुद्रा एका लखोट्यामधे बंद करून ठेवली, आणि त्याच्या कुटीमधे जाऊन एक अभिज्ञान मुद्रा घेऊन आला. त्या बंद लखोट्यावर आता काही एक आकडा लिहिलेला विष्णुने पाहिला. ती अभिज्ञान मुद्रा विष्णुच्या हातावर ठेवत द्वारपाल म्हणाला, "ही मुद्रा आता जपून ठेव. हीच तुझी इथली ओळख. तुला यापुढे कोणत्याही सरकारी कामकाजासाठी ही मुद्रा लागू शकते. कोणाही रक्षकाने तुला सुरक्षेच्या कारणास्तव ओळख विचारल्यास तू ही मुद्रा दाखव, तुझं काम होईल. आता यापुढे तू विद्यालयाच्या प्राचार्यांना भेट आणि त्यांना तुझं हे पत्र दे. ते माझ्या काही कामाचं नाही." त्याने विष्णुच्या हातावर ते पत्र परत दिलं आणि त्याला विद्यालयाची वाट मोकळी केली.

क्षणाचाही विलंब न लावता विष्णुने झपाझप विद्यालयाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. पुढचा मार्ग विचारण्याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. त्याला आता फक्त त्या झाडींमधून पलीकडे दूरवर त्या तिमजली इमारतीचं शिखर दिसत होतं. सकाळच्या उन्हाने त्याचे कळस असे झगमगत होते, जणू काही तेच एक प्रकाशस्रोत बनून गेले होते, आणि दिव्याकडे झेपावणार्‍या पाखराप्रमाणे विष्णु त्या प्रकाशकिरणांच्या दिशेने झेपावत होता. त्याचं संपूर्ण आयुष्यच आता उजळून जाणार होतं.

गेले कित्येक दिवस विष्णु प्रवासच करत होता. मगधापासून बाहेर पडलेल्या लोंढ्यांबरोबर मजल दरमजल करत तो निघाला खरा, पण त्याला इतरांच्या एवढा वेळ कुठे होता. त्यामुळे एखाद्या ठिकाणी त्याच्या बरोबरचा लोंढा विश्रांतीसाठी थांबला, कि तो त्याच ठिकाणी मुक्काम संपवून निघालेल्या दुसर्‍या घोळक्याच्या शोधात फिरे, आणि असा घोळका सापडलाच, कि मग त्यांच्या बरोबर पुढचा मार्ग चालू लागे. मनातली अस्वस्थता, अजूनही फारशा भूतकाळात न गेलेल्या विषण्ण आठवणी आणि भविष्यकाळाची ओढ त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नव्हती. संपूर्ण प्रवासात त्या कटू आठवणी पुन्हा पुन्हा त्याच्या मनामधे पिंगा घालत होत्या. 'काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझ्या वडिलांचं? त्य नीच धनानंदाच्या अन्यायी कारभारात आम्ही मुकाटपणे सगळं सहन करून बसून रहावं की काय! शिक्षक हा समाज घडवतो. त्याच्या कलाकुसरीमधूनच समाजशिल्प अवतरत असतं. पण त्या शिल्पाचा पायाच जर ढासळू लागला, तर त्याला सावरणं हे शिक्षकाचंच कर्तव्य आहे. आणि तेच करायचा प्रयत्न केला माझ्या वडिलांनी. प्रजा ही राजाची गुलाम नाही, तर राजा हा प्रजेचा गुलाम आहे. तोच राज्याच्या प्रति उत्तरदायी आहे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी - नगरजनांना, आणि खुद्द राजाला. पण ज्याची बुद्धी अहंकाराच्या कठीण हृदयाखाली दबून गेली आहे, त्याला कसा पाझर फुटणार? काय करायला हवं होतं त्यांनी? सशस्त्र सेना उभारून राजाला पदावरून खाली खेचायला हवं होतं की काय? पण मग असे आपापसात राज्यपदासाठी लढणारे लोक आहेतच की. असं राज्य हे दुर्बळांचं राज्य होऊन जातं. अश्या राज्याला कोणी वालीच उरत नाही. आणि अश्या राज्याचे टपून बसलेले वैरी अश्या वेळी बरोब्बर बाहेर पडून लचके तोडून घेतात. आमच्या कुटुंबाचे त्या दुष्ट राजाने असेच लचके तोडले. वडिलांना तुरुंगात डांबून ठेवलं. ते जीवंत आहेत की नाहीत ही माहिती कळण्याचीही मुभा ठेवली नाही. राज्यामधून आम्हाला बहिष्कृत केलं. आई आजारी पडल्यावरही मला कोणी भिक्षा दिली नाही. ज्या ज्या माऊलींकडे भिक्षेसाठी हात पसरले, त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात आमच्यासाठी करुणा होती, पण त्यांचे हात राज-भयाने बांधलेले होते'.
असे विचार करत करतच विष्णु मार्गक्रमणा करत असे. अश्यातच त्याला एका घोळक्यामधे शंकरशेटी भेटले. तक्षशिलेमधले ते एक मोठे व्यापारी. त्यांनी विष्णुला स्वतःच्या पालखीमधे बसवून घेतलं, आणि विष्णुचा पुढचा प्रवास सुकर झाला.

"विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!"

- पुष्कर ऊर्फ शंतनु भट

कथावाङ्मयइतिहाससमाजराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

>>>पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १<<<

लिंक हरवली की काय???

बहुगुणी's picture

2 Jul 2010 - 5:31 am | बहुगुणी

विष्णूगुप्त १

पुष्करः
छान लिहिता आहात, पुढचे सर्व भाग वाचायला आवडतील, लवकर लिहा.

अप्पा जोगळेकर's picture

2 Jul 2010 - 9:12 am | अप्पा जोगळेकर

कृपया ती विष्णुगुप्त १ वाली लिंक द्या. छान लिहित आहात. तेदेखील वाचायला आवडेल.

यशोधरा's picture

2 Jul 2010 - 9:24 am | यशोधरा

दोन्ही भाग वाचले.. खूप सुरेख लिहित आहात! मिपावर खूप दिवसांनी काही चांगले वाचले...

पुष्कर's picture

2 Jul 2010 - 11:33 am | पुष्कर

बहुगुणी, पहिल्या भागाचा दुवा दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. काल काही कारणास्तव दुवा देणं जमलं नाही, आज मी तो दिला आहे. तसंच मिलिंद, आप्पा, यशोधरा - सर्वांचा आभारी आहे. पहिला भाग आणि दुसरा भाग यामधे दीड वर्षे वेळ घेतल्यामुळे खंड पडल्यासारखा वाटला, त्याबद्दल क्षमा मागतो. पुढचा भागही अजून तयार नाहीये, पण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करीन.

आपला,
पुष्कर

रेवती's picture

2 Jul 2010 - 9:41 pm | रेवती

दोन्ही भाग आत्ताच वाचले.
अतिशय सुंदर!
तिसरा भाग लवकर लिहा. अजून दिड वर्षं वाट पहायला लावू नका.
चाणक्याबद्दल फारसे माहित नाही पण जे काय थोडेसे माहिती आहे त्याने मी नेहमीच भारावून गेले आहे.
काळ जुना असेल पण त्यांची मते जुनी आहेत असे अजिबात वाटत नाही.
कृपया लवकर लिहा.

रेवती

हर्षद आनंदी's picture

3 Jul 2010 - 1:33 am | हर्षद आनंदी

आनंद झालाय एकदम..
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. दोन्ही भाग वाचले.. ३ र्‍या भागाला फार ऊशीर करु नका.

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

अवलिया's picture

3 Jul 2010 - 11:21 am | अवलिया

सुरेख ! पुढचा भाग लवकर लिहा... :)

-- अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

पुष्कर's picture

6 Jul 2010 - 3:42 pm | पुष्कर

रेवती, हर्षद आनंदी, अवलिया - सगळ्यांचे आभार. चाणक्याबद्दल मलाही फार काही माहित आहे असा दावा मी करत नाही. थोडं फार वाचलेलं आणि चाणक्यावर आधारित मालिके मधे पाहिलेल्या गोष्टींवर माझं ज्ञान आधारित आहे. थोडेफार जे संदर्भ माहित आहेत, त्यांना कल्पनेची जोड देऊन घटना तयार करून लिहित आहे. ह्या लिखाणातलं सगळं खरंच आहे असं कृपया समजू नये. वाचनाचा आनंद मिळाला आणि थोडीफार माहिती मिळाली तर पुरेशी आहे.

पुढचा भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन.
- पुष्कर/शंतनु

गणपा's picture

6 Jul 2010 - 4:18 pm | गणपा

पुलेशु.

गणपा's picture

6 Jul 2010 - 4:19 pm | गणपा

कालच वाचुन संपवल चाणक्य.
पण ते पुस्तक म्हणावी तितकी पकड घेत नाही.
(कदाचीत चाणक्य ही धारावाहिक आधीच पाहिली असल्याने पुस्तका कडुन जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या होत्या.)
तुमचे लेखन आवर्जुन वाचतोय आणि ते आवडतय.
पुलेशु.

जे.पी.मॉर्गन's picture

6 Jul 2010 - 4:16 pm | जे.पी.मॉर्गन

खूपच सुंदर बिल्डअप!! पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत!

जे पी

पुष्कर's picture

8 Jul 2010 - 1:38 pm | पुष्कर

गणपा,
मलाही पुस्तक म्हणावं तितकं पकड घेणारं वाटलं नाही, त्याचं कारण त्यांनी लिहिलेले अर्धवट संवाद, प्रसंगांमधून मारलेल्या उड्या आणि वातावरणनिर्मितीचा अभाव हे असावं. पण त्यांनी कल्पनेमधून अनेक प्रसंग लिहिले आहेत, आणि कादंबरीचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या काळचं चित्रण कल्पना करणं आणि शब्दात मांडणं अत्यंत अवघड काम आहे, त्यामुळे त्या कादंबरीला मी कमी लेखू इच्छित नाही. धारावाहिक तर नि:संदेह 'लई भारी' आहे.
शुभेच्छांबद्दल तुमचे आणि मॉर्गन चे आभार

आळश्यांचा राजा's picture

10 Jul 2010 - 11:56 am | आळश्यांचा राजा

सुरेख!

पहिल्या भागावरच्या प्रतिसादांमध्ये वाचकांनी काही पुस्तके सुचवली आहेत. अजून काही -

ए एल बाशम चं The Wonder That Was India.
(कुणीतरी - बहुतेक ए एन) झा - An Outline of Ancient India ( की Ancient Indian History बरीच वर्षे झाली वाचून. पण थक्क झालो होतो.)

कथेच्या/ कादंबरीच्या अंगानं जाणारं लिहिताय, तेंव्हा इतिहास दुय्यम असणारच.

या पुस्तकांमध्ये चाणक्याविषयी काही नाही, पण काळ आणि घटनांचा कार्यकारणभाव फार चांगला समजतो. मदत व्हायला हरकत नाही. (झांचं पुस्तक तर कमाल आहे. छोटंसं आहे, पण फार काळजीपूर्वक वाचावं लागतं इतकं कण्डेन्स करून लिहिलं आहे. श्रावण मोडकांसारखं.)

छान लिहिताय.

ओ येस्स. अजून एक - कोसंबींची पुस्तकं पण जमलं तर बघून घ्या. रोमिला थापर आणि त्यांच्यात खास फरक नाहीत, तरीपण.

आळश्यांचा राजा

पुष्कर's picture

10 Jul 2010 - 11:58 am | पुष्कर

आळश्यांचा राजा, तुमचा उत्साही प्रतिसाद आवडला. ह्यातली पुस्तके मिळवून वाचण्याचा प्रयत्न करीन.