आनंद - टोपालोव : सामना ४

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
1 May 2010 - 5:47 am

आनंद - टोपालोव : सामना १
आनंद - टोपालोव : सामना २
आनंद - टोपालोव : सामना ३
-------------------------------------------------------
आधीचे तीन सामने आपण वर बघितले. आज चौथा सामना बघूयात. पटावर चौफेर नजर असणे किती महत्त्वाचे आहे, कोणत्याही खेळीकडे क्षुल्लक म्हणून न पाहणे हे किती आवश्यक आहे अशा गोष्टी आनंद -टोपालोवसारख्या दर्जाच्या खेळाडूंना वेगळ्या सांगायला हव्यात असे नाही, परंतु ह्या सामन्यात आनंदने टोपाच्या एका छोट्याश्या दुर्लक्षाचा किती दूरगामी विचार करुन फायदा घेतला आणि डाव खिशात घातला हे बघितले तर टोपानेही त्याला मनातल्या मनात सलाम केला असेल!
चला नमनाला घडाभर न करता थेट डावच पाहू या!

खाली दिलेल्या दुव्यावर पाहून हा सामना खेळून बघा मग खरी मजा येईल! (काही सदस्यांनी त्यांच्या संगणकावर चेस बोर्ड दिसत नसल्याची तक्रार केली आहे - त्यांना 'जावा' डाऊनलोड करुन घ्यावे लागेल अन्यथा बोर्ड दिसणार नाही.)
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581335

दुसर्‍या डावातल्या कॅटलान ओपनिंगनेच चौथ्या डावाची सुरुवात झाली. पांढर्‍याच्या पहिल्या पाच खेळी तंतोतंत तशाच होत्या. टोपाने मात्र पाचव्या खेळीत दुसर्‍या डावापेक्षा जास्त आक्रमक खेळी स्वीकारली बी बी ४ +
1. d4 Nf6
2. c4 e6
3. Nf3 d5
4. g3 dxc4
5. Bg2 Bb4+ ( 5... a6 )
कंसात दिलेली खेळी ही २ नंबरच्या सामन्यात टोपा खेळला होता आणि त्याने चांगला बचावही केला होता परंतु नंतर पुढे एका चुकीने त्याचा डाव घसरत गेला. ह्या डावात त्याने नवीन प्रयत्न करुन पहायचा ठरवले आहे.
नवव्या खेळीअखेर दोघांचे काळे उंट मारले गेलेत. आनंदकडे एक प्यादे कमी आहे पण त्याचा घोडा आणि वजीर विकसित आहे, उंट फिअनचेट्टो करुन पांढरा कर्ण धरुन बसलाय, उलट टोपाचे सी स्तंभातले प्यादे दुहेरी झाले आहे आणि एक घोडा सोडता बाकी मोहर्‍यांची फौज जैसे थे आहे. एखाद्या युद्धाची तयारी होत असताना सैन्य मोक्याच्या जागा पकडून बसावे तशी रचना होत चालली आहे. ज्या प्रकारे ए, बी आणि सी स्तंभातली प्यादी दोन-दोन घरे उडी मारुन घुसवली त्यावरुन टोपा वजिराच्या बाजूने हल्ला चढवणार हे उघड आहे!

दहाव्या खेळीला आनंदने नवीन चाल केली एन ए ३. (अशीच परिस्थिती व्लादिमीर क्रामनिक आणि टोपालोव दरम्यानच्या, २००६ सालच्या, एलीस्टा इथे झालेल्या विश्वविजेतेपदाच्या सामन्यात एका डावात आली होती. त्यावेळी क्रामनिकने ए x बी५ असे काळे प्यादे मारले होते. असो. हे डाव आनंद आणि टोपा दोघांनाही आता आठवत असतात. त्यातल्या चुकांचे विश्लेषण करुन नवीन खेळींचे धागे विकसित करुन त्यातले कंटिन्युएशन त्यांनी सामन्यापूर्वी अभ्यासलेले असते हे विशेष!) आता मोहरी विकसित करत पटाच्या मध्याचा ताबा आपल्याकडे कसा राहीत ह्यासाठी दोघांची धावपळ चालू झाली.
तेराव्या खेळीअखेर दोघांचे राजे किल्लेकोट (कॅसल) करुन बसले होते. डाव विकसित झालेला असला तरी टोपाच्या मोहर्‍यांच्या हालचालींना पायबंद बसला होता, स्वतःच्याच प्याद्यांच्या विचित्र स्थितीमुळे तो कुचंबल्यासारखा झाला होता. शेवटच्या पट्टीत एक घोडा आणि वजीर तसेच होते, हत्तींचा समन्वय साधला गेला नव्हता. उलट आनंदची मोहरी व्यवस्थित फिरु शकत होती. दोन हत्तींचा समन्वय होता. घोडे विकसित होते. पोझिशनल अ‍ॅडवांटेज आनंदने मिळवले होते.
चौदाव्या खेळीला आनंदने हत्ती वजिरापाठी आणून डी स्तंभातून मुसंडी मारायची तयारी चालवली. त्याला पायबंद घालण्यासाठी उंट पुन्हा शेवटच्या पट्टीत गेला कारण त्या स्तंभात काळा वजीर पुढे येणे गरजेचे होते. पंधराव्या खेळीला काळा वजीर सी ५ घरात आला. सी ४ मधल्या प्याद्याच्या जोरावर डी३ ह्या मोक्याच्या घरात ठाण मांडायचं हा काळ्या घोड्याचा उद्देश आहे. तिथून घोडा पांढर्‍याच्या वजीर आणि राजाच्या भागातही नजर ठेवू शकतो. सी ४ मधल्या प्याद्याला जोर रहावा म्हणून तर काळ्याने त्याच्या बी ५ मधल्या प्याद्याने पांढर्‍याचे ए ४ मधले बिनजोरी प्यादे अजून मटकावलेले नाही!
सतराव्या खेळीला आनंदने घोडा ई३ घरात आणून सी ४ मधल्या काळ्या प्याद्यावरचा दबाव वाढवला, जेणेकरुन डी ३ मधे काळा घोडा येण्याची खेळी लांबणीवर पडेल!
एन ८ ए ६ - टोपाने त्याचा शेवटच्या पट्टीतला घोडा पुढे काढलान. हत्ती डी ८ घरात आणून डी ५ मधल्या पांढर्‍या प्याद्याला रोखायचे हा विचार!
आनंदने सी ६ मधले प्यादे मारले. आता टोपासमोर दोन पर्याय होते एकतर उंटाने सी ६ मधले पांढरे प्यादे खायचे किंवा बी ५ ने ए४ मधले खायचे. टोपाने दुसरा पर्याय स्वीकारला (माझ्यामते इथे त्याने पहिला पर्याय घ्यायला हवा होत्या त्यामुळे चार गोष्टी साध्य झाल्या असत्या - ए पट्टीतले दुहेरी प्यादे टळले असते, उंट विकसित झाला असता, हत्तींचा समन्वय साधला गेला असता आणि सर्वात महत्त्वाचे सी ४ मधल्या प्याद्याचा जोर टिकून राहिला असता.
विसाव्या खेळी अखेरीस आनंदने सी ४ चे प्यादे तर खाल्लेच शिवाय सी स्तंभात हत्ती बसवला!

आता स्थिती बघा - दोन घोडे, उंट, एक हत्ती आणि वजीर अशी काळ्याची पाच मोहरी पटाच्या डावीकडे सभा भरवून बसली आहेत. उलट आनंदची मोहरी पटाच्या मध्यावर रोख धरुन आहेत, सी आणि डी अशा दोन मोकळ्या स्तंभात दोन हत्ती आणि वजीर आहेत, घोडे मोक्याच्या जागांवर आहेत. पोझीशनल अ‍ॅडवांटेज नक्कीच आनंदचे आहे.
आता कळीची परिस्थिती आहे. काळ्याचे ए ५ मधले प्यादे फक्त वजिराच्या जोरात आहे. वजिराने पाचवी पट्टी सोडली रे सोडली की घोडा प्यादे खातो. पण परिस्थिती मोकळी करुन पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटेज कमी करण्यासाठी वजीर डावाच्या मध्यात येणे गरजेचे आहे. अशा वेळी महत्त्वाचे काय ह्याचा निर्णय करणे हे समतोल बुद्धीचे लक्षण.

टोपा ह्या ठिकाणी चुकीचा खेळला एच ६? असे त्याने प्यादे पुढे सरकवले.
ह्यातून दृश्य गोष्टी पहा काय आहेत - ही एक प्रकारची वेटिंग मूव आहे पांढरा काय करतोय त्याची वाट बघणे, शिवाय शेवटल्या पट्टीत काही मारामारी होऊन अडचण उद्भवलीच तर राजाला पळायला एक चोरवाट एच ७ घराने निर्माण झाली. खेळीचा उद्देश चांगला आहे पण वेळ चुकली का?
आनंदच्या दृष्टीने मानसिक स्तरावर काय अर्थ निघतात पहा - शेवटल्या पट्टीत मारामारी होईल आणि राजा अडचणीत सापडेल म्हणून सेफ्टी वाल्व असावा असे टोपाला अचानक का वाटले? वजिराच्या बाजूच्या सगळ्या खेळी सोडून एकाएकी राजाच्या बाजूला खेळी करण्याचा उद्देश नेमका काय असावा? अशा विचाराने आनंदने पुढच्या खेळीला ७-८ मिनिटे घेतली.
राजाच्या बाजूला आनंदचे लक्ष नक्कीच इतके गेले नसते ते ह्या खेळीने वेधले गेले आणि पुढे बघा काय झाले -
एन डी ६ - घोड्याने चांगल्या घरात ठाण मांडून वजिराचा परतीचा मार्ग रोखणे आणि काळ्याला एकप्रकारे बेसावध ठेवणे. वजिराला परतवण्याची तातडी काळ्याला एव्हाना लक्षात यायला लागली होतीच म्हणून त्याने क्यू ए ७ असा दुसरा मार्ग स्वीकारला जेणेकरुन वजिराला ई७ ह्या मोक्याच्या घरात परत येता येईल.

आनंदने घोडा खेळला एन जी ४! - एच ६ चे प्यादे खाऊन राजाला शह देऊन घोड्याचा बळी द्यायचा आणि वजिराने पुन्हा तिथले प्यादे खाऊन राजाला संपूर्ण उघड्यावर आणायचे ही धमकी आहे!!

हे लक्षात येऊनही टोपाला परिस्थितीचे गांभीर्य पूर्ण समजलेले नव्हते हे त्याच्या पुढच्या खेळीवरुन लक्षात येईल.
'बुडत्याचा पाय खोलात' म्हणतात तसा टोपा खेळला -
आर ए डी ८?? त्याने ए पट्टीतला हत्ती घोड्यावर आणलान. घोडा वजिराच्या स्तंभात असल्याने हत्ती त्याच्या अंगावर घालून त्याला पिन करता येईल अशा भ्रमात तो अजूनही होता. पण मेख अशी होती की आनंदला तो घोडा हलवायचाच नाहीये!!! (ह्या ऐवजी एन सी ५ ही खेळी टोपालोवसाठी चांगली होती. एकतर पटाच्या कडेला तबेल्यात बसलेला घोडा डावात आला असता. डी ३ घरावर दबाव वाढवून मारामारी करुन वजीर मधे आणता आला असता. असे पर्याय उपलब्ध होते.)

आता राजाच्या बाजूला जे रणकंदन होणार होते त्यातला पहिला सणसणीत घाव आनंदने घातला एन x एच ६!! घोड्याचा बळी दिला! अप्रतिम खेळी!! (लक्षात घ्या स्पर्धा विश्वविजेतेपदाची सुरु आहे, काय आत्मविश्वास असेल आनंदचा!!)
(आता इथे आनंदच्या डोक्याची कमाल वाटते. त्याने एकविसाव्या एन डी ६ खेळीच्या वेळीच तब्बल वीस मिनिटे विचार करुन किती वेगवेगळे आडाखे पक्के केले असतील हे पुढे लक्षात येईलच. पुढल्या १० खेळ्या त्याला इथेच स्पष्ट झालेल्या होत्या!! त्यातला एकजरी अंदाज चुकला असता तरी त्याची धडगत नव्हती. मी म्हणतोय त्यात जराही अतिशयोक्ती नाहीये हे पुढच्या खेळ्या बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच.)
जी xएच ६
क्यू x एच ६ - पांढरा वजीर काळ्या राजाशी सलगी करायला आलाय!
एफ६ -आता मधले प्यादे सरकवले की काम फत्ते - काळा वजीर राजाच्या मदतीला आणायचा आणि पांढर्‍याची ई ५ ही संभाव्य खेळी थोपवायची की झाले, हा टोपाचा आडाखा! (पांढर्‍याची ई५ खेळी रोखणे महत्त्वाचे, कारण ई ५ ने कर्णातला उंट मोकळा होतो आणि सी स्तंभातल्या हत्तीच्या साथीने सी ६ मधल्या काळ्या उंटाला धमकावतो).
आनंद टोपाचे बारसे जेवलाय! तो तरीही खेळतो ई५!!
आता मात्र टोपालोव हबकलाय!! एकीकडे उंट आणि हत्तीच्या कात्रीत सापडलेला उंट आणि दुसरीकडे पडायला आलेले एफ६ प्यादे अशा दुविधेत तो सापडलाय.
बी x जी २ - पांढरा उंट मारण्याखेरीज पर्याय नाही!
इथेही आनंदचा संयम बघा. त्याने राजाने उंट मारला नाही कारण त्यामुळे टोपाला वजीर काळ्या राजाजवळ आणायची संधी मिळाली असती आणि आवळत चाललेली पकड ढिली पडली असती! एका श्वासाचीही उसंत द्यायला तो तयार नाहीये!
ई x एफ ६ - आता क्यू जी ६ + शह आणि त्यानंतर आर सी ४ असा हत्ती आणून आर एच ४# मात अशी धमकी आहे!!
आर x डी ६ - टोपाने घोडा मारला
आर x डी ६ - हत्ती मारला आनंदने
बी ई ४ - उंट सोडवून घेतलान टोपाने तो तरी मदतीला येईल एच ७ घरात ह्या आशेने!
आर x ई ६ - प्यादं खाऊन हत्ती उंटावर चालून आला
एन डी ३ - काळ्या वजिराने ह्या घोड्याच्या जोरात एफ २ हे प्यादे मारुन शह मात असा शेवटचा प्रयत्न!
आर सी २ - शांतपणे एफ २ प्याद्याला जोर लावतो हत्ती
क्यू एच ७ - वजीराने उंटाला जोर दिला आणि तो राजाच्या जवळ येऊन बसला. आता तरी काही चमत्कार होऊ शकेल!
एफ ७ + शह! आनंदचे कॅलक्यूलेशन पक्के आहे!
क्यू x एफ ७ - जबरदस्तीची खेळी. पर्यायच नाहीये. (हत्तीने प्यादे मारले तर दोन पांढर्‍या हत्तींपैकी कोणीही शेवटच्या पट्टीत जाऊन शह देतो आणि त्यानंतर मात आहे!)
उंटाचा जोर गेला आता आर x ई ४ करुन उंट खाल्लान. आता आर जी ४ + शह आणि मग मात अशी धमकी आहे!!
काय कमाल आहे बघा. एखाद्या शल्यविशारदाच्या कुशलतेने आनंद एकेक खेळी करतोय आणि डाव हवा तसा नेतोय!
क्यू एफ ५ - जी ४ घर दाबायचा एकमेव मार्ग!
आर ई ७!! पुढच्या खेळीत अटळ मात! खलास, डाव संपला!!!

ही खेळी आहे ३२ वी! म्हणजे मी जे म्हणत होतो तशी २१ - २२ व्या खेळीपासून ही स्कीम सुरु होती!!
एकजरी आडाखा फसता तरी डाव गडगडत गेला असता. चँपियन्स गेम!!

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

अगोचर's picture

2 May 2010 - 2:31 am | अगोचर

http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581335

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

चतुरंग's picture

2 May 2010 - 5:11 am | चतुरंग

गडबडीत डावाचा दुवा द्यायचाच राहिला होता. धन्यवाद अगोचर!
(आता लेखात दुवा दिला आहे.)

चतुरंग

टारझन's picture

2 May 2010 - 2:37 am | टारझन

च्यामारी !! काय खतरणाक म्याटर आहे हा ?
जबरा हो रंगाशेट ! आनंद जियो :)

- टारझन प्यादे

राजेश घासकडवी's picture

2 May 2010 - 5:17 am | राजेश घासकडवी

जबरदस्त खेळाचं तितकंच सुंदर वर्णन. हा गेम मी पुन्हा पुन्हा पाहिला. पण विश्वविजेता व त्याच्या स्थानावर हक्क मागणारा यांमध्ये हा खेळ चाललाय असं वाटलंच नाही. पहिल्या वीस खेळींमध्ये पद्धतशीरपणे वजीराच्या बाजूची मोहरी अक्षरश: ढकलून डाव्या ओळीमध्ये केविलवाण्यासारखी उभी करून ठेवली. आणि पुढच्या दहा-बारा मूव्ह्जमध्ये राजाच्या बाजूला दाणादाण उडवून लावली. त्यासाठी घोड्याचा बळी, उंटाचा बळी, प्याद्याचा बळी देऊन सर्व बचाव मोडीत काढले.

(अवांतर : सोफाया रूल्स व त्यावरून झालेल्या गमतींविषयीही दोन शब्द लिहावे अशी विनंती)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2010 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहारदार विश्लेषण.
कॅसल= किल्लेकोट, व्वा...!

अवांतर : रंगासेठ थेट स्पर्धा कोणत्या दुव्यावर पाहता येते ?

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

2 May 2010 - 10:20 am | चतुरंग

http://www.anand-topalov.com/
ह्या दुव्यावर थेट प्रक्षेपण असते. दुवा उघडलात की पहिलाच टॉपिक 'लाईव कवरेज' असा आहे तिथे लिंक दिलेली असते.
सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी बरोबर साडेपाच वाजता चालू होईल आणि साधारण साडेतीन-चार तास चालेल. लुटा लुत्फ! ;)

चतुरंग

श्रावण मोडक's picture

2 May 2010 - 9:44 am | श्रावण मोडक

परत एकदा डाव पाहणार आहे. दोनदा पाहिला, त्यासोबत लेख वाचला. लेखाचा आनंद एऱवीही मिळाला. पण डावासोबत समजून घ्यायचा आहे म्हणून खटाटोप. एकच प्रयत्न आणखी करेन. नाही जमलं तर 'हे भविष्यात' असं म्हणून पुढच्या लेखाची वाट पाहीन.

विश्लेषणात संदिग्धता असणे असे वाटत असेल तर जरुर कळवा. त्याप्रमाणे सुधारणा करायचा प्रयत्न राहील.

चतुरंग

श्रावण मोडक's picture

2 May 2010 - 1:22 pm | श्रावण मोडक

नाही गुरूजी. तुम्ही लिहिता आहात त्यात कसर काहीच नाही. कसर आहे ती बुद्धीबळ हा खेळ समजण्यात माझ्या डोक्याची. तो चिरंतन संघर्ष आहे. बुद्धीबळं खेळायचो तेव्हापासूनचा. तेव्हा ते मनावर घेऊ नका. मला लिखणाचा आनंद मिळतो आहेच. मी म्हटलं तसं तो आनंद अधिक समृद्ध करण्याचा खटाटोप चाललाय, पण त्यासाठी खेळ चांगला कळणं महत्त्वाचं. त्याविषयीची ती खंत आहे!!!

मस्त कलंदर's picture

2 May 2010 - 10:40 pm | मस्त कलंदर

WPTA!!!

कुणीतरी समदु:खी आहे म्हणायचं.. मला पण खेळ समजून घ्यायचाय नि चांगलं खेळायलाही शिकायचंय....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राघव's picture

2 May 2010 - 12:27 pm | राघव

आनंदनं टोपाची शुद्ध-सरळ भाषेत वाट लावलीन्..
मेंदीच्या हिरव्या फोकानं मारतोय असं वाटत होतं (शाळेतले दिवस आठवलेत एकदम!! :D ).
टोपा पेटून उठला नाही तरच नवल.. पुढचे २ गेम्स ड्रॉ झालेत म्हणून म्हटले ;)

वाट बघतोय पुढच्या लेखाची.

राघव

प्रभो's picture

2 May 2010 - 10:46 pm | प्रभो

जबरदस्त!

ऋषिकेश's picture

2 May 2010 - 11:56 pm | ऋषिकेश

एका अप्रतिम मॅचचे तितक्याच ताकदीचे समालोचन!
पुढच्या बरोबरीच्या सामन्याच्या समालोचनाची वाट पाहत आहोतच

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

धनंजय's picture

3 May 2010 - 12:37 am | धनंजय

चतुरंग सांगतात तसे थोडेथोडे समजते आहे. धन्यवाद!

एक's picture

3 May 2010 - 10:20 am | एक

याच रसग्रहणाची वाट बघत होतो.

आनंदच्या खेळीपुढे टोपाचे डिफेन्स म्हणजे (माझा एक मित्र म्हणायचा तसे) ४-४ आण्याचे ट्रॅप वाटतात.

अजून येऊ द्या.. खेळ समजायला खूप मदत मिळते आहे.

-एक

विशाल कुलकर्णी's picture

3 May 2010 - 11:30 am | विशाल कुलकर्णी

जबरा वो रंगासेठ... खेळून पाहील्यावर कळते हा माणूस खरोखर महासंगणक आहे ते :-) धंकू बर्का देवा !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आनंद's picture

3 May 2010 - 6:10 pm | आनंद

आजचा (७वा)live सामना पाहतय का कोणी? आनंदची परिस्थीती कठीण वाटतिय.

केशवसुमार's picture

4 May 2010 - 8:05 am | केशवसुमार

मस्त लेखमाला..
तुमचे फरमास वर्णन आणि सोबतीला चेसगेम.कॉम वरच्या चाली..
एकदम झकास..
(ई १)केशवसुमार