हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 Feb 2010 - 5:36 pm

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

आय टी मध्ये आल्यापासून खूप "जार्गन" ऐकायची सवय झालीये बघा. एकतर आपण स्वस्तात कामं करून देणारे नव्या जमान्याचे "बाबू" आहोत हे मान्य नसणारी (अथवा मान्य करायची इच्छा नसणारी) लोकं रात्रंदिवस शब्दकोष घेऊन आपल्या फुटकळ आत्मसन्मानाला गोंजारण्यासाठी असे जड-जड शब्द शोधून काढतात. प्रोजेक्टवर राबणारा इसम "रिसोर्स" असतो.... तोच बेंच वर गेला की "टॅलेंट" होतो... लोकांना हाकलायचं असेल की त्याला "रीस्ट्रक्चरिंग" म्हणतात. "ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट", "डिलिव्हरिंग वॅल्यू", "इनोवेशन", "कॉर्पोरेट एक्सलन्स", "टॅलेंट मॅनेजमेंट" सारखे शब्द एच.आर. (पूर्वी ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट विभाग असायचा... आता फक्त ह्यूमन रिसोर्स असतो. "डेव्हलपमेंट" गेली) शोधून काढून आपली नोकरी वाचवत असतात. ६ जणांना कामं वाटून एक्सेल स्प्रेडशीट भरणारा कसला डोंबलाचा आलाय "लीडर"? असो! मी माझ्या डायरेक्टरवरचा राग ह्या लेखातून का काढतोय? मुद्दा हा आहे की ह्या अश्या वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दांमुळेच आपल्याला "लीडरशिप" - नेतृत्व ह्या प्रकाराचं खरं महत्त्व तितकं समजत नाही. त्यातून आपली खादीधारी मंडळी नेता ह्या शब्दाचं आपल्या परीनी वाट्टोळं लावत आहेतच!

आता नेता म्हटल्यावर नावं तर अनेक घेता येतील. अगदी श्रीकृष्णापासून शिवबांपर्यंत झाले ते ही नेते आणि आदरणीय शिबू सोरेन पासून "आपल्या वॉर्डाचे धगधगते (म्हणजे नक्की कसकसले ते माहिती नाही) नेतृत्त्व संतोषशेठ (बंटी) लांडगे (वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्चा फेम)" पर्यंत आहेत ते ही नेतेच! पण संप्रति अशी परिस्थिती असली तरी नेत्याचं, त्या दुर्लभ असणार्‍या योजकाचं महत्त्व कमी होतं थोडंच? सांघिक खेळांमध्येतर नेत्याला, कप्तानाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शेवटी

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने | विक्रमार्जितसत्त्वस्य "स्वयमेव मृगेंद्रता" ||

ह्यातली "स्वयमेव" आलेली मृगेंद्रताच खरी. आपले लाडके नेते स्टीव्हरावजी वॉ साहेब ह्यांचे कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन - शुभेच्छूक... वगैरे गोष्टींमुळे का स्टीवरावजी वॉ साहेब वर्ल्डकप उचलतात? "वाढदिवसाच्या शुभेच्छा" फेम कप्तान फारतर महाराजकुमार ऑफ विजयानगरम ऊर्फ विझीसारखा असू शकतो - ८ नंबरला खेळणारा "फलंदाज" आणि गोलंदाजीच्या नावानी शंख..... पण इंग्लंडला त्यांच्याच पंढरीत धूळ चारून लॉर्डसच्या बाल्कनीत अंगातला टीशर्ट काढून फिरवणारा तो दादाच ना शेवटी ! तेथे पाहिजे जातीचे - येर्‍यागबाळ्याचे काम नोहे !

मला तर हा प्रसंग १९८३ मध्ये ह्याच बाल्कनीत एका भारतीय कर्णधारानी विश्वचषक उंचावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. दादाबद्दल पुढे विस्तारानी बोलूयाच !

क्रिकेट हा खरंतर तर केवढा क्लिष्ट खेळ ! ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पॅडला लागला तर काय होतं... स्क्वेअर कट आणि स्क्वेअर ड्राईव्ह ह्यांच्यातलं साम्य वा फरक कोणता... ग्लान्स कुठे संपतो आणि लेट कट कुठे सुरू होतो.... हुक आणि पुल ह्यांना जोडणारा पूल कोणता.... ऑफकटर काय आणि ऑफब्रेक कुठला.... खात्या हातानी टाकणारा तो ऑफस्पिनर आणि धुत्या हातानी टाकणारा "ऑर्थोडोक्स" असा प्रतिगामी विचार कोणी मांडला.... डकवर्थ लुईस ह्यांना काय चावलं होतं म्हणून त्यांनी अशी आकडेमोड केली... एक ना दोन - हजार प्रश्न क्रिकेट समजू इच्छिणार्‍याला (ह्यात बहुतेक क्रिकेटप्रेमी आले) पडतात. आता नियमांतली क्लिष्टता कमी म्हणून की काय हा खेळ ५-५ दिवस खेळतात. खेळपट्टी बदलते, चेंडू बदलतो, परिस्थिती बदलते... इतकंच काय ४०० धावा एखाद्या सामन्यात "म्होप" असतील तरी दुसर्‍या सामन्यात अपूर्‍या पडतात. थोडक्यात काय तर क्रिकेट हा मैदानाइतकाच मैदानाबाहेर खेळला जातो. अगदी मर्यादित षटकांच्या सामन्यांत देखील एखादा 'पॉवर प्ले', 'पिंच हिटर' म्हणून पाठवलेल्या फलंदाजानी १५ चेंडूंत केलेल्या २७ धावा, किंवा अनपेक्षितपणे एखाद्या 'पार्टटाईम' गोलंदानी घेतलेला महत्त्वाचा बळी सामन्याचा नूर पालटू शकतात. तेव्हा क्रिकेटमधल्या योजकाचं - कप्तानाचं महत्त्व अधोरेखित होतं. गेल्या २० एक वर्षांतल्या यशस्वी कप्तानांचा आणि प्रशिक्षकांचा जर वेध घेतला तर असं लक्षात येईल की आजकाल उद्योगांत सर्रास वापरली जाणारी मॅनेजमेंटची आणि लीडरशिपची तत्त्व ह्या लोकांनी साक्षात आचरणात आणली आणि आपल्या संघाच्या उभारणीत आणि यशात असाधारण कामगिरी बजावली.

आधी एका लेखात म्हटल्याप्रमाणे मला आठवणारं सर्वांत जुनं क्रिकेट म्हणजे १९८७ चा विश्वचषक. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधली महासत्ता अजून बनायची होती. त्यांचा कर्णधार अ‍ॅलन बोर्डर हा आताच्या हिशोबानी क्रिकेटपटू कमी आणि पुण्यातल्या कार्यालयातल्या केटररसारखा जास्त वाटायचा. क्षेत्ररक्षकाला सूचना देतानाचा आविर्भाव सुद्धा "इकडे मसालेभात आणि आळूभाजी घे रे" अश्याच थाटाचा.

मला तरी बोर्डरचा खेळ असा विशेष बघायला नाही मिळाला. ८७चा वर्ल्डकप उंचावणारा बोर्डर आणि ९२ च्या वर्ल्डकपमध्ये त्याचा लाँगऑफवरून पुढे पळत येऊन अफलातून झेल घेणारा अजय जडेजा ह्याच काय त्या बोर्डरच्या आठवणी. बोर्डरच्या नेतृत्त्वात काय, फलंदाजीत काय किंवा एकंदरच व्यक्तिमत्त्वात काय - आकर्षक असं काहीच नव्हतं. तज्ञ म्हणतात की बोर्डरनी त्याच्या ११,१७४ कसोटी धावा ईन मीन तीन फटक्यांवर कमावल्या. एरवी डावखुर्‍या फलंदाजाची खासियत असलेली शैली बोर्डर मध्ये शोधायला जाल तर कतरीना कैफ मध्ये अभिनयकौशल्य शोधण्यासारखं होईल! पण ह्याच बोर्डरनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वर्चस्वाची खर्‍या अर्थाने पायाभरणी केली होती. पोराला बाईक घ्यायला बापानी बसचे पैसे वाचवावेत तसा अनुभव मिळवण्यासाठी पोरांना पुढे पाठवून बोर्डर नेहेमी ५-६ नंबरला फलंदाजी करत राहिला. वेळीप्रसंगी बापासारखाच खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहिला. शक्य तेव्हा बॅटबरोबरच बॉलनी सुद्धा संघाच्या यशात योगदान देत राहिला. पॅकर सर्कस नंतर शुन्यातून संघबांधणी करून सिंप्सन आणि बोर्डरनी ऑस्ट्रेलियाला विश्वविजयी संघ बनवलं. ५०च्या सरासरीनी १५६ कसोटींमध्ये काढलेली २७ कसोटी शतकं बोर्डरच्या कर्तृत्त्वाची साक्ष देतात. त्याची परदेशातली सरासरी ऑस्ट्रेलियातल्या सरासरीपेक्षा तब्बल १० नी जास्त होती.... ८ शतकं दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलिया पिछाडीवर असताना काढलेली होती आणि १० पैकी ९ बोटांची हाडं कधी ना कधीतरी मोडलेली होती! चॅनेल नाईन दर वर्षी करार केलेल्या खेळाडूंची माहिती प्रकाशित करते. अनेक वर्ष बोर्डरच्या "प्लेयर प्रोफाईल" मध्ये दोन उत्तरं कधीच बदलली नाहीत - Likes? "Being part of the Australian cricket team." आणि Dislikes? "Losing."

बोर्डरमध्ये तसं पाहिलं तर नैसर्गिक नेतृत्त्वगुण नव्हते. पण वरच्या दोनच गोष्टी त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व करायला आणि कितीही प्रतिकूल परिस्थितीतून संघाला विजयी करायला पुरेश्या होत्या. बाकी बोटं मोडंणं वगैरे गोष्टी होत रहातात हो !

तर असा हा बोर्डर. आणि आपला दुसरा कप्तान तर नेता म्हणूनच जन्माला आला. क्रिकेटच काय त्याने आयुष्यात काहीही केलं असतं तरी तो नेताच झाला असता - आणि तसा तो झालाही. संघबांधणी (team building), संघाला प्रेरणा देणं, बिकट प्रसंगी प्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन संघाला मार्ग दाखवणं (leadership in crisis situations), आपल्या कामगिरीचा आदर्श घालून देणं (leading by example), संघाला सर्वोत्तम खेळ करायला प्रवृत्त करण (bringing the best out of your team)..... असं कुठलं leadership principle आहे जे इम्रान खाननी ९२च्या विश्वचषकात दाखवून नाही दिलं? इम्रान महान ऑलराऊंडर होता.... शैलीदार फलंदाज, अप्रतीम गोलंदाज आणि शिवाय एक महान कप्तान ! ९२ मध्ये त्याच्या साथीला जावेद मियांदाद सारखा लढवय्या, रमीज राजा, सलीम मलिक सारखे अनुभवी साथीदार, अक्रम - इंझीसारखे तरुण तुर्क. सगळे घटक होते, पण त्याचबरोबर पाकिस्तानला नेहेमी भेडसावणारा शापही होता... सातत्याच्या अभावाचा. पाकिस्तानची सुरुवातही वाईट झाली होती. पहिल्या ५ सामन्यांत एकच विजय मिळवता आला होता. पुढचे ३ सामने जिंकूनही त्यांची धावगती ऑस्ट्रेलियापेक्षा वाईट होती. इंग्लंडविरुद्ध ७४ धावांत खुर्दा उडाल्यावर पाऊस आला नसता तर पाकिस्तानला पुढचं विमान पकडावं लागलं असतं. त्या सामन्यात मिळालेल्या एका गुणावर पाकिस्तान उपांत्य फेरीत गेलं. And the rest, as they say, is history!

नंतरच्या सामन्यांत इम्रान स्वत: ३ नंबरला खेळला... प्रत्येक डावाला आकार दिला. गोलंदाजीतले बदल जमून येऊ लागले. तिथेही तो स्वतः खूप मोठी जबाबदारी पार पाडत होता. न्यूझीलंडविरुद्ध इंझी आणि जावेदनी स्वप्नवत विजय मिळवून दिल्यावर अंतिम सामन्यात २ बाद २४ अश्या परिस्थितीत इम्रान आणि जावेद एकत्र आले आणि त्या दडपणाखाली आपलं "मेटल" दाखवून देत जावेदबरोबर १३९ धावांची अमूल्य भागीदारी केली. अक्रमच्या फटकेबाजीने २५० चं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवलं आणि मग अक्रमनीच बोथम आणि स्ट्युअर्टला बाद करून त्यांचा हवा काढून घेतली. इम्राननी त्याच्या वयाच्या ३९ व्या वर्षी विश्वचषक उंचावणं हा एका महान खेळाडू आणि एका महान नेत्याला मिळालेला सर्वांत मोठा सन्मान होता.

नेतृत्त्वाबद्दल बोललो आणि dimple cheeks captain cool अर्जुना रणतुंगाचा उल्लेख झाला नाही असं होईल का? ड्वाइट आइझेनहॉवर म्हणाला होता "Leadership is the art of getting someone else to do something you want done because he wants to do it". १९९६चा विश्वचषक हे रणतुंगाच्या नेतृत्त्वगुणांचं शोकेस होतं. तेव्हा एकतर खेळाडू आजच्याइतके आक्रमक नव्हते (विशेषतः खेळाबाहेर). तेव्हा मुरलीला चेंडू फेकण्याबद्दल नो बॉल दिलेल्या डॅरेल हेअरशी वाद घालणारा रणतुंगा निश्चितच अपवाद होता.

रणतुंगा केवळ आपल्या सहकार्‍यांपाठी खंबीर उभा रहायचा असं नाही तर निश्चित कामं वाटून देऊन (delegation) एकदिलानी खेळून विजय मिळवण्यासाठी संघाला स्फूर्ती द्यायचा (motivation). उपखंडातला ९६ चा विश्वचषक सर्वोत्तम फलंदाजी करणारा संघ जिंकणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. त्याबाबतीत श्रीलंकेचं होमवर्क चोख होतं (market sizing). रणतुंगाची रणनीती बिनतोड होती. बिनीला जयसूर्याबरोबर नवोदित कालुविथरणा होता. दोघांनाही मारामारीचं लायसन्स दिलेलं होतं. त्यात पहिला वार कालुविथरणाचा. त्यानी म्हणजे हेल्मेटबरोबर डोकंही काढून ठवल्यागत हाणामारी करायची. जर पहिली विकेट लवकर पडलीच तर असंका गुरुसिंघेनी बूच लावायचं काम करायचं होतं. मधली फळी सांभाळायला अरविंदा डिसिल्व्हासारखा खंदा वीर होता. हवं तेव्हा अभेद्य बचावाची तटबंदी उभारून हवं तेव्हा तुटून पडणारा. आणि खालच्या फळीत तिलकरत्ने आणि महानामाबरोबर स्वतः अर्जुना परिस्थितीनुरूप damage control किंवा final offensive करायचा. गोलंदाजीत समोरच्या फलंदाजाला सुरुवातीला जखडायचं काम वाझचं होतं आणि मधल्या षटकांमध्ये धावा आटवायला मुरली होता. प्रत्येकाला आपलं काम नेमून दिलेलं होतं आणि त्या एका मालिकेत ही भट्टी झकास जमून आली. कुठल्याही संघाला जराशीही संधी न देता रणतुंगानी जेव्हा बेनझीर बुट्टोंच्या हस्ते विश्वचषक उंचावला तेव्हाच अर्जुना रणतुंगा हे नाव क्रिकेटच्या सर्वकाळच्या सर्वोत्तम कप्तानांमध्ये नोंदलं गेलं.

उडप्याच्या हाटेलातल्या गल्ल्यावरच्या "अन्ना" सारखा पोट सुटलेला, तिरकी हेल्मेट घालणारा रणतुंगा हा लेझी एलेगन्स मध्ये इंझीचा वडील भाऊ होता.

पण मैदानातल्या रिकाम्या जागांत बॉल मारून रन "चालण्याची" त्याची हातोटी केवळ लाजवाब. हलक्या हातानी त्यानी चेंडू मारला आणि डीप मधला फील्डर येऊन बॉल अडवून परत फेकेपर्यंत बागेत भेळेच्या स्टॉलवरून ज्यूसबारकडे जात असल्यागत हा पठ्ठ्या छद्मीपणे हसत निवांत विकेटसमध्ये चालायचा. तेव्हा मला खात्री आहे की समोरच्या कर्णाधाराला तिथल्या स्टंपनी भोसकून घेऊन आत्महत्या करावीशी वाटत असेल. पण रणतुंगा अटीतटीच्या वेळी मागे हटणारा मुळीच नव्हता. मॅक्ग्रा, फ्लेमिंग, वॉर्नला अंतिम सामन्यात त्यानं ज्या पद्धतीनी हाताळलं ती त्याच्या नेतृत्त्वगुणांची पावती. वॉर्नच्या "बीमर" वर पुलचा चौकार मारल्यानंतरचा रणतुंगाचा चेहरा आठवा..... "तुझी जागा तीच आहे" असं सांगणारा. जणू काही त्याच वर्षी मुरलीवर झालेल्या (कथित) अन्यायाचा झाडा अर्जुना त्याच्या पद्धतीनी घेत होता. एरवी कसोटी आणि वनडे दोन्हीमध्ये ३५ च्या सरासरीनी धावा काढणारा रणतुंगा हा तितक्या सातत्यानी यशस्वी ठरला नाही. पण त्या एका स्पर्धेत डिसिल्व्हा, जयसूर्या आणि इतर सवंगड्यांच्या साथीनं रणतुंगानी जो विजय मिळवला तो मात्र अविस्मरणीय !

ह्या मांदियाळीत एका नावाचा राहून राहून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे हॅन्सी क्रोनएचा. बॉब वूल्मरसह त्यानी १९९४-९५ ते १९९९ पर्यंत क्रिकेटमध्ये जे काही नवीन पायंडे (चांगल्या अर्थानी) पाडले ते क्रिकेट बदलणारे होते. पॅट सिमकॉक्सला "पिंच हिटर" म्हणून वापरणं असो, क्लूसनर, कॅलिस, मॅक्मिलन, पोलॉक, स्वतः अशी ऑलराऊंडर्सची फौज तयार करणं असो, यष्टीरक्षकानी स्टंप्समागे उभं राहून "थ्रो" घेण्यापेक्षा स्टंप्सपुढे उभं राहून चेंडूला दिशा देऊन रनआऊट करण्याची कल्पना असो, बोलर (नकळत) मध्ये आला म्हणून रनआऊट दिलेल्या प्रभाकरला परत बोलावणं असो, वा इंग्लंडविरुद्ध २ डाव "फोरफिट" करून कसोटी निकाली ठरवण्याचा केलेला प्रयत्न असो (आफ्रिका ती कसोटी हारली होती).... एक काळ असा होता की आम्ही क्रोनएच्या कप्तानीच्या आणि वूल्मरच्या "लॅपटॉप स्मार्ट" रणनीतीच्या प्रेमात पडलो होतो. पण प्रेयसीचा भूतकाळ काळाकभिन्न निघावा आणि स्वप्नांचा चक्कचूर व्हावा तसं त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यावर वाटलं होतं. क्रोनए आणि वूल्मर दोघांचा जो हृदयद्रावक अंत झाला तो काव्यात्म न्याय (poetic justice) तर नव्हता?

असो ! वूल्मर आणि क्रोनए ह्या जोडगोळीनं क्रिकेट एका अर्थी खूप आकर्षक बनवलं. एका नेत्याचा महत्त्वाचा गुण innovation त्यांनी पुरेपूर रुजवला ह्यात मात्र शंका नाही.

आता पुढच्या कर्णधाराकडे वळण्या आधी हा प्रसंग आठवा. १९९९ च्या वर्ल्डकपचा उपांत्य सामना. आफ्रिका ९ बाद २०५. शेवटच्या षटकात ९ धावांची गरज आणि एकच विकेट हातात.... पण "मॅन ऑफ द सीरीज" लान्स क्लूसनर खेळतोय... ते ही १२ चेंडूंत २३ धावा काढून..... फ्लेमिंगचा सामना करतोय. पहिले २ चेंडू त्याने सीमेपार धाडले... एक कव्हर्स तर दुसरा वाईड लाँगऑफला ! संपलाच की खेळ ४ चेंडू आणि एकच धाव जिंकायला.... आता नक्की लॉर्डसवर पाकिस्तान आणि आफ्रिका झुंजणार ! ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फक्त आपल्या लोकांना दोन्ही हातांच्या पहिल्या बोटांनी "आत या" अशी खूण करतो.... त्याचा चेहरा नेहेमीसारखाच निर्विकार.... आत चालू असलेल्या वादळाची पुसटशी कल्पना देखील येऊ नये कोणाला इतका.... ९ क्षेत्ररक्षक ती १ धाव अडवण्यासाठी वाघासारखे टपलेले.... फ्लेमिंगचा पुढचा चेंडू डॉट पडतो.... ३ चेंडू १ धाव.... तरीही आवाक्यातच.... पण क्लूसनर पुढचा चेंडू मिडऑफला मार्क वॉ कडे मारून पळत सुटतो... डोनाल्ड हालत नाही...फ्लेमिंग गिलख्रिस्टकडे चेंडू टाकतो आणि डोनाल्ड धावबाद होऊन क्रिकेटची एक नवी कंपनी जन्माला येते "ऑस्ट्रेलियन क्रिकेट इन्कॉर्पोरेटेड" ! सीईओ - स्टीवन रॉजर वॉ ! आणि अर्थात जॉन बुकानन !

१९९७ मध्ये एकदिवसीय आणि १९९९ मध्ये कसोटी संघाचं नेतृत्त्व हाती आल्यावर स्टीव वॉने क्रिकेटची अनेक समीकरणं बदलली. सातत्य, अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी सतत करणे (delivering beyond expectations), क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलणे (redifining the business), हाती असलेल्या सहकार्यांच्या गुणांचा पुरेपूर उपयोग (maximum utilisation of available resources), स्वतःसह सहकार्यांच्या कौशल्याला पैलू पाडणे (talent management), सर्वोत्तमतेचा ध्यास घेणे (pursuit of excellence), पुनःपुन्हा स्वतःचेच विक्रम मोडणे असे अनेक आयाम स्टीव वॉनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दिले. पाँटिंग, मार्क वॉ, हेडन, गिलख्रिस्ट, मॅक्ग्रा, वॉर्न असे दिग्गज खेळाडू संघात असताना ऑस्ट्रेलिया एक दिग्गज संघ बनला नसता तरच नवल होतं. पण पुन्हा तिथे "योजकस्तत्र दुर्लभः" आहेच ! स्टीव वॉ च्या नेतृत्त्वाने एका अत्युकृष्ट संघाला एक महान संघ बनवलं ! २-४ नाही तर सलग १६ कसोटींत ह्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. वॉ खेळलेल्या १६८ कसोटींतल्या ५७ मध्ये तो कर्णधार होता. त्यांपैकी ४१ सामन्यांत त्याने विजय मिळवला. आणि केवळ ९ सामन्यांत पराभवाचा सामना केला.

पाँटिंगनी त्याची परंपरा पुढे चालवली आणि वाढवली ह्यात वादच नाही. पण हेन्री फोर्ड नंतर फोर्डच्या सीईओ कोण झाला हे कोणाला माहितिये?? चंद्रावर पहिला उतरणारा आर्मस्ट्राँग..... दुसर्‍या एडविन आल्ड्रिनबद्दल कोणाला उत्सुकता असणार? पुन्हा मैदानावरच्या काही कृत्त्यांमुळे पाँटिंग क्रिकेटप्रेमींच्या "ऑल टाईम फेव्हरिट" कप्तानांच्या यादीतून वगळला गेला.... निदान माझ्या तरी.

आमचा सर्वांत आवडता कर्णधार म्हणजे ऑफ कोर्स द प्रिन्स ऑफ कलकत्ता ! सौरव चंडीदास गांगुली..... परवाच आय पी एल च्या एका जाहिरातीत "दादानेंभी आपको मिस किया" म्हणणारा दादा बघितला आणि काय सांगू.... आपल्या "क्रश" नी "मलाही तू आवडतोस" म्हणावं असा आनंद झाला ! समजा कोणाचा एक मुलगा डॉक्टर आणि एक इंजीनियर आहे...ते आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेतच... तिसर्‍याकडे तशी "डिग्री" नाहीये.... पण पोरगा खूप धडपड्या आहे...चुणचुणीत आहे..... एक दिवस नक्की नाव काढील असा बापाला विश्वास वाटतो ना तसा तमाम भारतीयांना दादाबद्दल वाटायचा. दादा आहे म्हणजे तो नक्की काहीतरी युक्ती करून मॅच जिंकून देईल ! बॅटिंग मध्ये नाही तर कॅप्टनसीनी.... दादा आहे म्हणजे काहीतरी चमत्कार घडवेल अशीच मुळी धारणा होती.

आणि आमचा दादा होताही तसाच हो ! तो "क्रिकेटचा देव"ही नव्हता आणि अपार कष्ट करून "भारताची भिंत" होण्याचीही त्याची कुवत नव्हती. कोणी म्हणे की त्याला आखुड टप्प्याचा चेंडू खेळता येत नाही. कोणी त्याच्या "अ‍ॅटिट्यूड" वर टीका केली... कोणी त्याच्या फील्डिंगची चेष्टा केली.... पण त्याच वेळी कोणी त्याला ऑफसाईडचा देव म्हणायचे... कोणी त्याच्या संघबांधणीच्या कौशल्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायचे... कोणी आपल्या यशाचं श्रेय त्यानी टाकलेल्या विश्वासाला द्यायचे ! दादा "दादा" होता ! लक्ष्मणसारख्या ज्येष्ठ खेळाडूनी मौक्याच्या क्षणी मिसफील्ड केल्यावर भर मैदानात त्याला "क्या *^ मरा रहा है क्या?" म्हणून ओरडणारा दादा.... नवोदित गोलंदाजाला तीन चौकार बसले तर त्याच्या खांद्याभोवती हात टाकून त्याला धीर देणारा दादा.... स्टीव्ह वॉला टॉस साठी थांबायला लावणारा दादा.... त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणार्‍या पोलॉकला पुढे येऊन आडव्या बॅटीनी कव्हर्सवरून भिरकवणारा दादा.... विकेट मिळाल्यावर धावत जाऊन जल्लोष करणारा दादा (ह्या वेगात तो रन काढताना पळत असता तर???) ...स्पिनर्सची पिसं काढणारा दादा..... मैदानाबाहेर षटकार खेचणारा दादा.... लॉर्डसच्या बाल्कनीत ३२४ धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर शर्ट फिरवत उघड्या अंगानी इंग्लंडला त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा दादा !

दादा कर्णधार होण्याआधी बीसीसीआय ने जाहिरात दिली होती म्हणे...

पाहिजे: एक तारणहार

पात्रता: समुद्रातून मार्ग काढण्याची क्षमता... पाण्यावर चालता येत असल्यास प्राधान्य !

कामाचे स्वरूप: तुमच्या पसंतीशी सुतराम संबंध नसलेल्या, अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या, थोड्याफार कुशल, अजिबात "बॅक-अप" नसलेल्या संघाला ताबडतोब जिंकायला शिकवणे !

कार्यकाळ: चेष्टा करताय काय? तुम्ही टिकाल तोपर्यंत

पुरस्कारः :)))))))))))

अश्या परिस्थितीत दादा कर्णधार झाला. दादा काही फार मोठा मुत्सद्दी होता असं नाही. काहीतरी अफलातून डावपेच लढवून त्याने सामने जिंकले असंही नाही. पण त्यानी एका "टीम ऑफ चँपियन्स" ला एक "चँपियन टीम" बनवलं... निदान ती वृत्ती.. ती जिगर तर रुजवलीच रुजवली. सच्या बाद झाल्यावर गुमानपणे टीव्ही बंद करून आपापल्या कामाला लागण्याच्या सवयीतून आपल्याला बाहेर काढलं ते दादानीच. युवी, सेहवाग, भज्जी, धोनी, रैना, झहीर अश्या गुणी खेळाडूंना पंखांखाली घेऊन दादानी एक मजबूत संघ घडवला. टॅलेंटपेक्षा महत्त्वाची असते ती जिंकण्याची तीव्र इच्छा.. संघभावना... देशासाठी खेळण्याचा अभिमान...लढाऊ वृत्ती.... शेवटपर्यंत हार न मानणं....१००% प्रयत्न करणं. आणि हेच गुण दादानी भारतीय क्रिकेटमध्ये रुजवले. पूर्णपणे "परिणामकेंद्रित" (result oriented) कार्यशैली हे दादाचं वैशिष्ट्य. आपले खेळाडू समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून... त्यांना खुन्नस देऊन खेळायला शिकले ते दादामुळे. "आपण कुठेही कोणाहीविरुद्ध जिंकू शकतो" हा विश्वास निर्माण केला तो दादानीच. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणं हा खरंतर काटेरी मुकुटच. पण दादानी तो सांभाळलाच नाही तर तो अभिमानाने मिरवला !

दादाच्या काळात भारतीय संघ आक्रमक झाला होता खरा... पण तरीही अपेक्षित स्थैर्य आणि सातत्य ह्यांचा अभावच होता. पहिला ट्वेंन्टी-२० वर्ल्डकप जेव्हा धोनीनी उंचावला तेव्हा खरंतर हा झारखंडचा झिपर्‍या भारतीय क्रिकेटला शिखरावर घेऊन जाईल असं वाटलं नव्हतं.

पण २००६ सालीच ग्रेग चॅपल किरण मोरेला म्हणाला होता "He has such a fantastic reading of the game. He is a future captain". क्रिकेटच्या सर्वांत झटपट प्रकारात धोनी सारख्या नवोदित कर्णधाराला काही संधी आहे असं मानायला कोणीच तयार नव्हतं. त्यात सचिन, सौरव, राहुल सारख्या दिग्गजांनी आधीच माघार घेतलेली. गंभीर, रॉबिन उथाप्पा, रोहित शर्मा, यूसुफ पठाण, जोगिंदर शर्मा... सगळीच नावं नवी होती. पण धोनीनी प्रत्येक मौक्याच्या वेळी "क्रिटिकल" खेळी खेळण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित केलं. मग तो युवराजनी ब्रॉडवर केलेला अत्याचार असो, गंभीर, उथाप्पा, रोहित शर्माची अर्धशतकं असोत, श्रीशांतचं अत्यंत महत्त्वाच्या वेळी हेडनला टाकलेलं निर्धाव षटक असो वा कळास म्हणजे अंतिम सामन्यात शेवटचं षटक जोगिंदर शर्माला देणं असो.... प्रत्येकात धोनीचा येन केन प्रकारेण सहभाग होताच. नाहीतर त्या ओव्हरच्या आधी (आणि नंतरही खरंतर) जोगिंदर शर्मा कोण होता???

पण धोनीचं वेगळेपण ह्यात नाही... सामन्यानंतर धोनी जाहीरपणे म्हणाला " wanted Harbhajan (Singh) to bowl the last over. But he wasn’t confident that he could do it. Joginder said he would do it. He had the confidence. I gave him the ball." कुठला भारतीय कर्णधार सगळ्यांसमोर इतक्या खुलेपणानी बोलला असता? धोनीच्या कप्तान म्हणून आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयानंतर (तेव्हा तो प्रभारी कर्णधार होता) करंडक घेण्यासाठी तो स्वतः गेला नाही... त्याने कर्णधार अनिल कुंबळेला पाठवलं ! हा प्रसंग धोनीची नम्रता नव्हे तर आत्मविश्वास दाखवणारा होता. आपल्या पहिल्या कसोटी विजयाचं श्रेय त्याने ज्येष्ठ खेळाडूला घेऊ दिलं ह्याचं कारण त्याला आत्मविश्वास होता की करंडक उंचावण्याचे असे अनेक प्रसंग त्याला पुढे मिळणार आहेत ! म्हणूनच आमच्या मॅनेजमेंट गुरूंमधलं नवं कोरं करकरीत नाव - महेंद्रसिह धोनी !

मध्ये एका लेखात वाचलं होतं... अमिताभच्या "मैं आज भी फेंके हुए पैसे नही उठाता सेठ" नं मनात स्वाभिमान रुजवल्याचं... अहो आम्ही पण हापिसात दादाचं नाव घेतो आणि डायरेक्टरला बिनधास्त सांगतो "तू दिलेली टार्गेट्स unrealistic आहेत". एखाद्या नवीन पोराला समजावताना कुठेतरी इम्रान डोक्यात असतो.... टीमला कामं वाटून देताना कुठेतरी रणतुंगाचे संस्कार झालेले असतात... ऐन स्प्रिंटच्या मध्ये काही गोची झाली तरी थोरल्या वॉसाहेबांचं स्मरण करतो..... सेल्समध्ये सतत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा कुठेतरी क्रोनएनी दिलेली असते.... आणि माहीला बघूनच पहिल्या डीलवर प्रॉडक्ट मॅनेजरला सही करू द्यायची कल्पना सुचलेली असते ! आणि तुम्ही काय म्हणता राव... की क्रिकेट फक्त एक खेळ आहे?

(सर्व छायाचित्रे जालावरून साभार)

क्रीडामौजमजाविचारसद्भावनाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

15 Feb 2010 - 5:46 pm | शुचि

मॉर्गन, मला क्रिकेट मधलं काही कळत नाही पण माणसामधली पॅशन (मराठी शब्द?) कळते. आपल्या या क्रिकेट्च्या पॅशन ला माझा सलाम :)
मला पुढील वाक्य खूप मजेशीर वाटलं -
>>त्यांचा कर्णधार अ‍ॅलन बोर्डर हा आताच्या हिशोबानी क्रिकेटपटू कमी आणि पुण्यातल्या कार्यालयातल्या केटररसारखा जास्त वाटायचा. क्षेत्ररक्षकाला सूचना देतानाचा आविर्भाव सुद्धा "इकडे मसालेभात आणि आळूभाजी घे रे" अश्याच थाटाचा. >> =)) =)) =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

जे.पी.मॉर्गन's picture

15 Feb 2010 - 6:14 pm | जे.पी.मॉर्गन

धन्यवाद शुचि ! क्रिकेटच्या बाबतीत मी बर्‍यापैकी 'गॉन केस' आहे हे खरंय :) ह्या खेळानी खूप काही दिलंय बघा !

पुनश्च धन्यवाद!

जे पी

भडकमकर मास्तर's picture

15 Feb 2010 - 5:55 pm | भडकमकर मास्तर

मध्ये एका लेखात वाचलं होतं... अमिताभच्या "मैं आज भी फेंके हुए पैसे नही उठाता सेठ" नं मनात स्वाभिमान रुजवल्याचं... अहो आम्ही पण हापिसात दादाचं नाव घेतो आणि डायरेक्टरला बिनधास्त सांगतो "तू दिलेली टार्गेट्स unrealistic आहेत". एखाद्या नवीन पोराला समजावताना कुठेतरी इम्रान डोक्यात असतो.... टीमला कामं वाटून देताना कुठेतरी रणतुंगाचे संस्कार झालेले असतात... ऐन स्प्रिंटच्या मध्ये काही गोची झाली तरी थोरल्या वॉसाहेबांचं स्मरण करतो..... सेल्समध्ये सतत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा कुठेतरी क्रोनएनी दिलेली असते.... आणि माहीला बघूनच पहिल्या डीलवर प्रॉडक्ट मॅनेजरला सही करू द्यायची कल्पना सुचलेली असते ! आणि तुम्ही काय म्हणता राव... की क्रिकेट फक्त एक खेळ आहे?

अहाहा.. १ नंबर...

श्रावण मोडक's picture

15 Feb 2010 - 7:55 pm | श्रावण मोडक

सहमत!

संदीप चित्रे's picture

16 Feb 2010 - 5:56 am | संदीप चित्रे

सगळा लेख आणि विशेषतः शेवटचा परिच्छेद खासच !

स्वाती दिनेश's picture

17 Feb 2010 - 6:05 pm | स्वाती दिनेश

मास्तरांशी अगदी सहमत..
लेख खूप म्हणजे खूपच आवडला.
स्वाती

गणपा's picture

15 Feb 2010 - 6:14 pm | गणपा

एकदम
क आणि ड आणि क
लेख.
जियो मॉर्गनसाहेब.

अनिल हटेला's picture

15 Feb 2010 - 8:51 pm | अनिल हटेला

सहमत !!

!! क ड क !!

(क्रिकेटप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

मेघवेडा's picture

15 Feb 2010 - 6:55 pm | मेघवेडा

शब्द संपले राव!! न बोलणेच बरे!! वाक्यावाक्याला टाळ्या!! आणि शेवट म्हणजे कळस आहे अगदी!!!
खरंच अगदी क आणि ड आणि क

असेच लिहीत असा साहेब! मजा येते वाचायला!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

बहुगुणी's picture

15 Feb 2010 - 7:31 pm | बहुगुणी

सहावा भाग पहिल्या पाचांइतकाच उत्तम जमलाय.

फक्त या नेत्यांच्या यादीत १९७४ ते १९८५ अशी जवळजवळ सलग ११ वर्षं वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणारा क्लाईव्ह लॉईड हवा होता असं वाटून गेलं.१९७५ आणि १९७९ चे विश्वचषक जिंकणारा हा कप्तान माणूस म्हणूनही उत्तुंग होता, सहकार्‍यांची कायम काळजी घ्यायचा असं आठवतंय. त्रिनिदादच्या एका कसोटीत त्याच्या hip bone ला वेदना होत असतांना, व्हिव रिचर्ड्स ने "मी आधी जातो हवं तर" असं म्हंटलं असतांनाही, हा पठ्ठा हाडात इंजेक्शन घेऊन चांगली खेळी करून गेल्याचं आठवतंय.

जे.पी.मॉर्गन's picture

16 Feb 2010 - 11:18 am | जे.पी.मॉर्गन

बहुगुणी! लॉईड काय, कपिल काय अगदी डग्लस जार्डीन, ब्रेअर्ली, बॉब सिंप्सन, ब्रायन क्लोज, मार्टिन क्रो... सगळेच भन्नाट कॅप्टन्स होते. पण दुर्दैवानी मला त्यांचा खेळ बघायला मिळाला नाही. मी लेखात म्हटल्याप्रमाणे ८७ च वर्ल्डकपसुद्धा मला अगदी पुसट आठवतो. ह्या मालिकेतही "मी पाहिलेल्या" खेळाडू - पंच - समालोचकांबद्दलच लिहीले आहे. मधुबाला सुंदर होतीच हो..... पण आमच्या स्वप्नांत आधी माधुरी आणि मग ऐश्वर्या आली त्याला कोण काय करणार? ;)

"माझं प्रेम" शब्दांत व्यक्त करता यावं म्हणून मला आठवणारेच खेळाडू निवडलेत ! लॉईडबद्दल आणि इतरांबद्दल वाचायला मात्र नक्की आवडेल!

मनःपूर्वक धन्यवाद

जे पी

सुमीत's picture

15 Feb 2010 - 9:36 pm | सुमीत

मला हा भाग फारच आवडला जेपी, खूप सुंदर लिहिले आहेस अगदी निर्विवाद

चतुरंग's picture

15 Feb 2010 - 10:32 pm | चतुरंग

हा लेखही आवडला रे जेपी!
संपूर्ण लेखात चारोळ्या, बदाम, काजू, पिस्ते, आक्रोड अशा ड्राय फ्रूट्सची रेलचेल आहे त्यामुळे नेमकं एकच काय आवडलं असं सांगणं अवघड आहे!
शेवटचा पॅरा म्हणजे लेखाचं 'सिनॉप्सिस' आहे! ;)

(हाताखाली नसलेल्या लोकांकडूनही कामे करुन घेणारा)चतुरंग

मदनबाण's picture

16 Feb 2010 - 3:31 am | मदनबाण

मॉर्गनराव लयं वाट पहायला लावलीत हो...

दादा "दादा" होता !
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स... :)

बाकी लेख भारी झालाय हे काय नव्याने सांगितल पाहिजे काय ??? ;)

जाता जाता :--- शेवटचा पॅरा सॉलिट्ट्ट्ट् हाय !!! ;)

(आयटी मधलाच पेड स्लेव्ह.)
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विसोबा खेचर's picture

15 Feb 2010 - 11:25 pm | विसोबा खेचर

जबरा लेख रे जेपी!

जियो..

(सचिनप्रेमी) तात्या.

आशिष सुर्वे's picture

16 Feb 2010 - 12:07 am | आशिष सुर्वे

तुमच्या शब्दांमध्ये 'मार्क वॉ'च्या खेळाची नजाकता आहे!!

अप्रतिम!!

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

सुमीत भातखंडे's picture

16 Feb 2010 - 3:17 am | सुमीत भातखंडे

मस्त लेख. एकदम कडक!!!

चंडोल's picture

16 Feb 2010 - 6:42 am | चंडोल

सुंदर लेख,

पण आपल्या कपिलला विसरलात मालक, लोकांना प्रेरणा देत अन स्वतःही मोलची खेळी करायची या बाबतीत कपिल इम्रानाच्याच तोडीचा होता.

जे.पी.मॉर्गन's picture

16 Feb 2010 - 11:35 am | जे.पी.मॉर्गन

विसरलो नाही चंडोल... मी आधीही म्हटल्याप्रमाणे मी पाहिलेल्या खेळाडूंबद्दलच मी ह्या मालिकेत लिहीलंय. आणि माझ्या आठवणीतला कपिल (दुर्दैवाने) ४३२ विकेट्सच्या पलिकडे ढकलण्यासाठी असलेलं ओझं होता.... कपिलची माझी आठवण म्हणजे त्यानी "रडीचा डाव" खेळून पीटर कर्स्टनला आऊट केलेलं. आता माझं चूकही असेल, पण समहाऊ तो तडाखेबंद, जोगरबाज कपिल मला कधी बघायलाच नाही मिळाला. आणि वैयक्तिकरित्या विचाराल तर मला लॉर्डसवर वर्ल्डकप ऊंचावणार्‍या कपिलपेक्षा तिथेच शर्ट काढून विरवणारा गांगुली जास्त भावतो.

कपिलच्या महानतेबद्दल शंकाच नाही पण दुर्दैवानी मला "तो" कपिल बघायला नाही मिळाला. मधुबाला, वैजयंतीमाला, वहीदा रहमान भारी होत्याच हो... पण आमच्या खोलीत पहिलं पोस्टर माधुरीचं लागलं :(

प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद

जे पी

मॉर्गनभाऊ,हे पूर्णसत्य नाही आहे.
त्या कसोटी सामन्यात आदल्या दिवशीच कपिलने कर्स्टनला वॉर्निंग दिली होती.म्हणजे तो क्रिझबाहेर आहेस हे त्याच्या नजरेस आणुन दिले होते व खिलाडुवृत्ती पूर्णपणे दाखवली होती.तिच चुक कर्स्टनने दुसर्या दिवशी केली and then Kirsten was punished...!!!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

जे.पी.मॉर्गन's picture

16 Feb 2010 - 12:08 pm | जे.पी.मॉर्गन

योगेश... तो कसोटी नाही तर एकदिवसीय सामना होता. कपिलच्या रिअ‍ॅक्शन वरून असं दिसतं की त्याने कर्स्टनला आधी तीन वेळा वॉर्निंग दिली होती.. .पण त्या चित्रफितीत असं दिसून येईल की कर्स्टन रन घेण्यासाठी क्रीझ सोडून बाहेर आला नव्हता तर केवळ त्याची बॅट क्रीजच्या किंचित बाहेर होती.

कानडाऊ योगेशु's picture

16 Feb 2010 - 12:07 pm | कानडाऊ योगेशु

तो कपिल कदाचित भारत झिंबाव्वे सामना पाहणार्या प्रेक्षकांशिवाय कोणालाच पाहायला मिळाला नाही.
कल्पना करा ५ बाद १७ असा स्कोअर असताना तळाच्या फलंदाजांना हाताशी घेवुन विक्रमी १७५ धावा काढणे व तो सामना जिंकुन देणे हे नुसते वाचले तरीही अंगावर रोमांच उभे राहतात..
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चंडोल's picture

17 Feb 2010 - 7:30 am | चंडोल

सहमत ..

'दादागिरी' हा गांगुलीचा गुण माझ्याही विशेष आवडीचा. असं म्हणतात कि जिंकण्यावर प्रेम असण्या पेक्षा हरण्या बद्दल घृणा असणं महत्वाचं. दादाने ही मनोवृत्ती भारतीय संघात रुजवली जी अतिशय उपयोगी ठरताना दिसत आहे. गांगुलीचा हा शट 'लॉर्डस' वर जतन करण्यात आला आहे आणि त्याचा फोटो मी जतन केला आहे :

प्रभो's picture

16 Feb 2010 - 6:57 am | प्रभो

मस्त

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

अमोल केळकर's picture

16 Feb 2010 - 9:37 am | अमोल केळकर

मस्त माहिती.

अवांतर : ' हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ' हे सुनील साहेबांचे गाणे नेटवर कुठे मिळेल ?

अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

baba's picture

16 Feb 2010 - 9:51 am | baba

एकदम जबरा!! अजून लिहा...

..बाबा

कानडाऊ योगेशु's picture

16 Feb 2010 - 12:12 pm | कानडाऊ योगेशु

फार सुंदर लेख लिहिला आहे.
क्रिकेटकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन आवडला.
क्रिकेट मधुनही व्यक्तिमत्व विकास साधता येतो हे तुम्ही दाखवुन दिले आहे.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

पाषाणभेद's picture

16 Feb 2010 - 12:39 pm | पाषाणभेद

अतिशय पिळदार अन बांधेसूद लेखन.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

उपास's picture

16 Feb 2010 - 9:18 pm | उपास

कय लिवलय! कय लिवलय!
मॆनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सचा खेळाच्या दृष्टीकोनातून विचार मस्तच जमलाय. हर्ष भोगलेला पाठवायला हवाय हा लेख.
कपिलविषयी म्हटलेलं आहेच वरच्या प्रतिसादात आणि १९८७ च्या नंतरचा कालखंड विचारात घेतल्याचे म्हटलेय तुम्ही हे ही बरोबर पण अगदीच राहावत नाही म्हणून..
पाकिस्तानसाठी इम्रान तसा आपल्यासाठी कपिल. ८३ च्या वर्ल्ड कप मध्ये झिंबावे बरोबरची कॆप्टन्स इनिंग्ज असूं दे की रीचर्ड्सचा फायनल मधे उलटा धावत जाऊन घेतलेला कॆच. लिडींग फ्रॊम फ्रंटचं उत्तम उदाहरण. समोरच्यावर बिनधास्त चाल करुन जाण्याची वृत्ती आम्हाला शिकवली कपिलनेच. एरवी श्रिकांत आणि कपिल दोघेही बिनडोक्याचे गदाधारी पण कपिलची बातच न्यारी. आठवा शेवटचा खेळाडू समोरच्या एन्डला असताना चार चेंडूत चार सिक्सर मारून कपिलने टाळलेला फॊलोऒन.. समोरच्याला संपवायचा तो माईंडसेट आपल्याला पूर्वी दिसलाच नाही कुठे.. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जगात सर्वश्रेष्ठ ठरु शकतो हा त्याने पूर्ण भारताला दिलेला आत्मविश्व्वास. भारताची अर्थव्यवस्था मुक्त नव्हती आणि जगात भारताचा ठसा उमटू शकेल इतकं काही थोर होत नव्हतच. भारतातल्या एका पूर्ण पिढीला कपिलच्या वर्ल्ड कप उंचावणाया फोटॊने एक आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती दिलेय हे विसरता येणार नाहीच.

उपास मार आणि उपासमार

चतुरंग's picture

16 Feb 2010 - 10:11 pm | चतुरंग

'माहीच्या' लढाऊ पोरांनी आणि त्याही आधी 'दादाने' जी लढवय्या संघाची पायाभरणी केली त्या इमारतीचा पाया मुळात खोदला होता 'कपिलपाजीनं'!
हा कणखर जाट त्याच्या रक्तातल्या लढाऊ वृत्तीला साजेसा खेळायचा.
मैदानावर खुन्नस घेऊनच खेळावं लागतं तिथं उगीच दयामाया दाखवून चालत नाही हे कपिलनं ओळखलं होतं. शारीरिक तंदुरुस्तीत सुद्धा त्यानं एक आदर्श घालून दिलान, गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊनही तो एकही कसोटी किंवा एकदिवस सामना शारीरिक दुखापतीने खेळला नाही असं झालं नाही!
१९८३ चा वर्ल्डकप मला आठवतोय. रंगीत दूरदर्शनचं नुकतंच आगमन झालं होतं आणि त्याची ती अफलातून १७५ धावांची खेळी बघता आली होती. आणि त्यानंतरच्या सामन्यात जिंकलेला कपही. रिचर्डसचा अफलातून झेल घेतला तिथेच विंडिज गळफटले आणि पुढे लॉइडचा झेल घेतला त्यावेळी तर फक्त किती वेळात जिंकतात एवढाच प्रश्न होता! विंडिजला अतिआत्मविश्वास नडला!

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

17 Feb 2010 - 12:10 am | मिसळभोक्ता

रंगीत दूरदर्शनचं नुकतंच आगमन झालं होतं आणि त्याची ती अफलातून १७५ धावांची खेळी बघता आली होती.

रंगाशेट, कैच्या कैच बोलू नका !

झिंबाब्वे-भारत हा १९८३ च्या प्रुडेन्शियल कपातला सामना चित्रफीतीवर उपलब्ध नाही ! त्याच वेळी ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज सामना होता, त्यामुळे ह्या दोन्ही लिंबू-टिंबू सामन्यासाठी एकही व्हिडियोग्राफर हजर नव्हता. तुम्ही कसे टीव्हीवर बघणार ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

17 Feb 2010 - 12:45 am | चतुरंग

बरोबर असावं, आत्ताच मी तो विडिओ शोधायचा प्रयत्न केला तर एकही दुवा हाती लागत नाही, फायनल मॅच मात्र सगळी यू ट्यूबवर दिसते आहे.
माझ्या आठवणीत काहीतरी घोळ आहे.
चुकीबद्दल क्षमस्व!

चतुरंग

sujay's picture

17 Feb 2010 - 12:59 am | sujay

माझ्या माहिती प्रमाणे त्या दिवशी ब्रॉडकास्टर्सचा का क्यामेरामन लोकांचा संप होता, त्यामुळे त्या सामन्याच चित्रण कुठेच उपलब्ध नाही.

मेघवेडा's picture

17 Feb 2010 - 1:10 am | मेघवेडा

असेच म्हणतो. माझे बाबा जेव्हा मला क्रिकेटच्या रंजक गोष्टी सांगत तेव्हा या सामन्याचा उल्लेख नेहमीच व्हायचा आणि "कपिलच्या त्या अजरामर खेळीची चित्रफीत नाही, आम्ही आपले ऐकले ते तुम्हाला सांगतो" असे माझ्या बाबांनी मला कित्येकदा सांगितल्याचे स्मरते.
तो सामना झाला होता 'टनब्रिज वेल्स' या केंट मधल्या छोट्याशा गावात 'नेव्हिल ग्राऊंड'वर. मैदान फार लहान होते (आहे) आणि सामनाही दोन हलक्या संघांचा होता त्यामुळे अधिकृत कॅमेरा क्रू तिथं गेलाच नाही. मी गेल्या ऑक्टोबरमधे त्या मैदानावर जाऊन आलो. बाबांनीच सांगितलं गावाचं नाव मला. आजही त्या मैदानात दोन पॅव्हेलिअन्स सोडली तर एकही छत नाही, स्टेडियम तर सोडाच. 'टनब्रिज वेल्स क्रिकेट क्लब'चाही 'केंट काउंटी डिव्हिजन' मधला परफॉर्मन्स काही खास नाही आणि या मैदानापेक्षा कित्येक चांगली चांगली मैदाने इंग्लंडमधे आहेत. याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या मैदानांवर तर मी सुद्धा खेळलोय. :D (मस्करी नाही, खरंच) तेव्हा हे मैदान पाहून, या मैदानावर विश्वचषकाची मॅच खेळवली गेली याचं फार आश्चर्य वाटलं.

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

संग्राम's picture

16 Feb 2010 - 10:29 pm | संग्राम

जबरदस्त ... कोणत्या वाक्याला ">>" लिहून दाद देवू आणि कोणत्या नको हे कळेना ...
अगदी वाचता वाचता डोळ्यासमोर जिवंत झालं सगळं....

नितिन थत्ते's picture

16 Feb 2010 - 10:56 pm | नितिन थत्ते

Great leaders are those who extract superlative performance from ordinary team.

आपण वर्ल्डकप जिंकला तेव्हाची टीम आठवा.
गावसकर- याला वनडेचा प्लेअर कुणी म्हणणार नाही.
श्रीकांत, संदीप पाटील आणि स्वतः कपिलदेव हे त्यातले उत्तम खेळाडू.
वेंगसरकर बरा, मोहिंदर सो सो आणि किरमाणी विकेटकीपर म्हणून उत्तम पण वनडेचा खंदा खेळाडू नव्हे.
बाकी मदनलाल, कीर्ती आझाद, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी*, बलविंदर संधू... नावं सुद्धा आठवत नाहीत.
अशा खेळाडूंकडून वर्ल्ड कप जिंकवणे म्हणजे थोर कार्य.
*रॉजर बिन्नीने त्या वर्ल्डकप मध्ये १८ विकेट काढून अव्वल परफॉर्मन्स दिला. त्याच्याच मुळे आपण वर्ल्डकप (आणि १९८५ ची ऑस्ट्रेलियातली बेन्सन हेजेस स्पर्धा) जिंकलो असे मी म्हणेन.
कपिलला नाहीच वगळू शकत.

नितिन थत्ते

मिसळभोक्ता's picture

17 Feb 2010 - 12:18 am | मिसळभोक्ता

बलविंदर संधूने ग्रीनिजचा त्रिफळा उडवून सुरुवात केली होती.

आणि ८३ चा हीरो बिन्नी नाही (अर्थात, माझ्या मते), तो खरा मोहिंदर अमरनाथ !

८५ चा हीरो नक्कीच रवी शास्त्री (आणि शिवरामकृष्णन).

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

जे.पी.मॉर्गन's picture

17 Feb 2010 - 5:21 pm | जे.पी.मॉर्गन

>>कपिलला नाहीच वगळू शकत.<<

अगदी बरोबर रे दादा... कपिलच्या नेतृत्त्वगुणांबद्दल अथवा एक महान ऑलराऊंडर म्हणून त्याच्या खेळाबद्दल दुमत असूच शकत नाही. पण मी आधी म्हटलंय तसं...मी फक्त मी पाहिलेल्या कालखंडातीलच खेळाडू विचारात घेतले आहेत.

आणि मी पाहिलेला कपिल "अ‍ॅसेट" कमी आणि "लायबिलिटी" जास्त होता.

बहुगुणी's picture

17 Feb 2010 - 2:34 am | बहुगुणी

दोन भागांतले हायलाईट्स इथे पहायला मिळतील.

कपिलने घेतलेला रिचर्ड्सचा कॅच part 2 च्या ८.२०-८.३० या कालावधीत.

राजकारणी's picture

17 Feb 2010 - 6:25 pm | राजकारणी

लइ भारी लेख आहे ... नाद खुळा ....

>>परवाच आय पी एल च्या एका जाहिरातीत "दादानेंभी आपको मिस किया" म्हणणारा दादा बघितला आणि काय सांगू.... आपल्या "क्रश" नी "मलाही तू आवडतोस" म्हणावं असा आनंद झाला ! <<
आगदी मनातल बोल्ला राव ....

दादागिरी फोरेवर !!! (आन्ग्ल भाषेतील Dadagiri Forever !!!)

राजकारणी's picture

17 Feb 2010 - 6:26 pm | राजकारणी

लइ भारी लेख आहे ... नाद खुळा ....

>>परवाच आय पी एल च्या एका जाहिरातीत "दादानेंभी आपको मिस किया" म्हणणारा दादा बघितला आणि काय सांगू.... आपल्या "क्रश" नी "मलाही तू आवडतोस" म्हणावं असा आनंद झाला ! <<
आगदी मनातल बोल्ला राव ....

दादागिरी फोरेवर !!! (आन्ग्ल भाषेतील Dadagiri Forever !!!)

राघव's picture

4 Jul 2016 - 1:27 am | राघव

संपूर्ण लेखमालाच अतिशय सुंदर. काही काही मला आवडणारे खास म्हणजे -

सचिनचा जमिनीला चिकटून जाणारा "ग्लोरीयस" कव्हरड्राईव्ह..
द्रविडचा ऑफस्पिनला खाली बसून कव्हर्सच्या डोक्यावरून मारलेला लॉफ्टेड सिक्सर..
कुंबळेचा अनप्लेयेबल फ्लीपर..
मॅग्राचा डवखुर्‍या बॅट्समनला राऊंड-दी-विकेट बॉलिंग करताना सारख्याच अचूकतेने टाकलेला ईनस्विंगर[बॅट्समनला बाहेर जाणार]..
सकलेनचा अशक्य ड्रिफ्टर..
रिचर्ड्सनं २ यॉर्करवर लागोपाठ मारलेले फ्लिकचे २ सिक्स..
असे बरेच काही.. :-)

बाकी माहीचा कुंबळेला ट्रॉफी घेवू देण्याचा किस्सा लाजवाब! त्यावरून आठवलं दादाच्या शेवटच्या मॅचला शेवटचे काही तास कॅप्टन्सी करायला देण्यातला आदरही फार भावला होता..!

इतक्या सुंदर लेखमालेबद्दल पुन्हा धन्यवाद! :-)

राघव