मैत्र जिवांचे

रविंद्र गायकवाड's picture
रविंद्र गायकवाड in जनातलं, मनातलं
13 Jan 2010 - 11:38 am

मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?. हे आज नाही मागचे कित्येक दिवस, कित्येक महीने खरंतर काही वर्षे माझी तीच अवस्था होती. मी जास्त बोलत नव्हते. शांत शांत बसायचे. पण आज जरा जास्तच शांत होते.

असं वाटत होतं कुणाला तरी मनाची अस्थिरता सांगावी .. पण काय सांगावं हे कळत नव्हते. आणि सांगावं तरी कुणाला? कुणाला काय कळणार आहे? माझ्या मनात काय चाललंय हे मलाच कळत नाही तर इतर कोण मला समजूण घेणार? कुठं तरी व्यक्त व्हायचंय पण कुठे? एखाद्या मैत्रिणिला सांगावे का? नको.. पण ती आज तिच्या नविन डिझायनर ड्रेस्स मध्ये हरवली आहे तिचा आनंद विभाजित नको करायला. आणि ही तर खेचायच्या मूड मध्ये आहे. नकोच. जाऊ दे. मुखवट्यांच्या गर्दीतून वाट काढत घरी आले. नाश्ता जेवनाचे कर्तव्य पार पाडले. मोठ्या आशेने आई कडे बघितले आई तर आपली खूप जवळची मैत्रिण असते.

"आई"

पोटभर जेवलीस सोनू. अगं आज केलेले लोणचे बघ जरा खाऊन कसे झालंय ते." !

त्या माऊलीने हाताला गट्टे पडेपर्यंत कष्ट करून केलेल्या लोणच्याची चव आपल्या लेकीने सगळ्यात आधी बघावी म्हणून आग्रह केला. बोटावर लोणचे घेऊन त्याचा स्वाद घेतला आणि कृत्रिम कौतुक केले. आईच्या हातचे लोणचे तर नेहमीच अप्रतीम असते पण तरीही माझा शेरा मलाच कृत्रिम भासत होता. खरे तर सगळे माझी खूप काळजी घेत होते. मला दुखावेल असे कोणी काहीच बोलत नव्हते किंवा कृत्य करत नव्हते. मात्र मीच अशी का होते मला काहीच कळत नव्हते. आजही सकाळपासून मी जगातल्या प्रत्येकाला कृत्रिम मुखवटा घातलेले यंत्र समजत होते आणि आतातर मायेच्या सावलीतही मला कृत्रिम सुख भोगल्याचा अपराधी पणा जाणवत होता. मात्र आईच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहून तिला आपल्या आज्ञातचक्रात ओढण्याची हिम्मत झाली नाही. तिचीं माझ्या वर खूपच माया आहे. हे पण एक कारण झाले तिच्या समोर व्यक्त न होण्याचे. आई कितीही जवळची मैत्रिण असली तरी संस्कारांचे पडदे असतातच आणि त्यांचा मानही ठेवावाच लागतो. तिच्या मायेमुळे आपली दुखरी बाजू तिला दाखवता येत नाही. संस्कारांच्या पडद्यामुळे आपणही आपली काळी बाजू तिला दाखवत नाही. वास्तविक काळे आणि पांढरे काहीच नसते पण कुलाचार, रिती रिवाज असतातच. त्या संस्कारांबद्दलही माझी तक्रार नव्ह्ती पण मला काय होतंय हेच मला ही कळत नव्हतं.

बाबा ऑफिसहून आले. त्यांनी ही एक मायेचा कटाक्ष टाकला. दिवस कसा गेला याची तेवढ्याच मायेने आणि कौतुकाने चौकशी केली. पण बाबाच ते. !लहाणपणी त्यांच्याशी बोलताना आईच्या मागे लपुनच बोलायची मी. आता समोर येऊन बोलत असते पण काल्पनीक आई मध्ये उभीच असते. त्यांच्या बद्दल आणि त्यांनाही माझ्या बद्दल प्रेम आहे पण कुठे तरी त्यांच्या शिस्तीची भिती मनात होतीच

कसंतरी करून मनाची समजूत घातली. मनातल्या अप्रगट अगम्य विचारांना हाकलून बाहेर काढले. थोडा वेळ टी व्ही बघून बरे वाटेल असे वाटले. पण तेवढ्यात परिक्षा जवळ आल्याची आठवण आली. प्रोजेक्ट साठी ईंटरनेटवर माहिती शोधायला हवी होती. कॉम्प्यूटर चालू केला. स्टार्टअप मध्ये असलेले सगळे प्रोग्राम चालू झाले. योगायोगाने दोन दिवसापुर्वी ऑर्कुटवर ओळख झालेली एक मैत्रिण ऑनलाईन होती. आमची ओळख इथलीच अगदी जवळची पण नाही. तिला माझ्या बद्दल काय वाटेल अशी भिती नव्हती. म्हणून बिनधास्त बोलत होते.पण तिने बोलायला चालू केले तसे मला माझ्या मनाची काही वेळापुर्वीची अवस्था आठवत होती. मनात आले ते सहज बोलत गेले. मनात एक शंका होतीच की ही तरी काय समजून घेणार आहे?? ती तरी का माझ्यावर विश्वास ठेवेल? पण तिच्याशी बोलता बोलता मला तरी कळेल माझ्या मनात नक्की काय चालतंय ते. मात्र ती शांत पणे ऐकत होती. तिच्या बोलण्यातून ती मला माझे मन मोकळे करण्यास मदत करत होती. जसा जसा माझ्या मनातला गोंधळ कमी होत होता तसं तसं माझं लक्ष तिच्या वर केंद्रित होत होतं. आता हळू हळू मीपण ऐकत होते. जेव्हा माझ्या मनातला गोंधळ पुर्ण शांत झाला तेव्हा मी तिच्या कडे पुर्ण लक्षा देऊ शकले. तिने मला एवढा वेळ सहन केलंय आपण ही थोडंसं ऐकलं पाहिजे. ह्या कृतज्ञतेच्या भावनेतुन मी तिला ऐकू लागले. आता माझं मन पुर्ण शांत होत आता पर्यंत मी तिला ऐकत होते पण समजत नव्हते

आतापर्यंत कृतज्ञतेतून निर्माण झालेली श्रोती फक्त ऐकत होती पण मन शांत झाल्यामुळे थोडे थोडे समजून पण घेत होती. ही तर अगदी माझ्यासारखीच आहे असा विचार मनात येतो न येतो तोच तिने विचारले. "जाऊ का? मला निघायला हवंय ऑफिस आधीच बंद झालंय. घरी माझे हे(यजमान) वाट बघत असतिल" आत्ता कुठं मला ती समजायला लागली होती आणि आता निघाली. तिला थांबवावे का? कसं थांबवू. ठीक आहे पुढच्या वेळी बोलू असं समजून निरोप घेतला. कॉंप्यूटर बंद करून गच्ची वर गेले. शांत मनाने मावळत्या सुर्याला निरोप देत होते. मनःशांती नंतर शांत रवीला निरोप देण्याचं समाधान वाटलं. हाच स्वर्ग आणि हेच स्वर्ग सुख. गच्चीवरून दिसणारी यंत्रे आता सजिव वाटत होती. त्यांच्यातले चैतन्य जणू उफाळून आलंय असा भास होता. काही वेळापुर्वी कृत्रिम भासणारे चेहरे आता भावपुर्ण भासत होते. लक्षयक्षांनी मोरपंख हलवावेत अशी थंड वार्‍याची झूळूक सुखावत होती. उजवी कडे लाखो सुर्यफुले माझ्याबरोबर सुर्याला निरोप देणासाठी रांगेत उभी होती. जवळ एका कुंडीतली ब्रह्मकमळाची कळी बहुतेक आज उमलणार होती. वरती आकाश काळे वस्त्र पांघरू पाहत होते. त्यातल्या रुपेरी नभांना दिनकराने सोनेरी जरीकाठाची शाल दिली होती जणू ह्या थंडीत आभाळाला तो रवी म्हणतोय ’काळजी घे रे लाडक्या ह्या गुलाबी थंडीत तुला माझ्या अपरोक्ष उब कोण देणार?’. मी आणि ती सुर्यफुले इथेच उभे राहून निरोप देत होतो. पण त्या विहंगांना अनावर झालंय दुखः ते झेपावत आहेत त्याला मिठी मारायला. समोरचे तळे त्याने तर सोनेरी चादर पांघरूण घोरायला पण चालू केले. त्याच्या घोरण्याचा(खळखळाण्याचा) आवाजही मधुर आहे. तिकडे सुर्य डोंगराची पल्याड त्याच्या गावी गेला. त्याच्या पाऊलखुणांसारखा अजुनही थोडा उजेड होताच. डोक्या वरच्या शुभ्र ढगांचे काठ आता रुपेरी झाले होते.

तो रम्य मनोहर निरोपसोहळा डोळ्यात साठवून पुन्हा रोजच्या जीवन चक्रास शरण येण्यास निघाले. काही

तासांपुर्वीची स्वतःची अवस्था आठवून स्वतःला हसले. घरात येताना आईचे दिवे लावणे चालू होते. शुभंकरोती संपवून मनाचे श्लोक गु्णगुणत होती. स्पष्ट ऐकायला काही येत नव्हते पण लयीवरून ते मनाचे श्लोक आहे हे कळत होते. मनाचं कौतुक करावं की त्याला हसावं हे कळत नव्हतं. आपणही देवापुढे हात जोडावे म्हणून देवघरात जाऊन डोकं टेकवलं. थोरामोठ्यांनी सांगितलं म्हणून देवघरात थोडावेळ शांत बसावं. दिवसभराचा आढावा घ्यावा. पण मी खूप शांत झाले होते. अजून किती शांत होणार. पुन्हा रात्रिभोजनादी कर्तव्ये उरकूण अभ्यासाला बसले.

अरेरे आज मी क्लासमध्ये नोट्स काढल्या नाहीत. हरकत नाही तंत्रज्ञाने एवढी प्रगती केलीय. ती कशासाठी. उचलला फोन लावला मैत्रिणीला (उचलली जीभ... .. .. तसे). तिला विनंती केली

"कशी आहेस. जेवलीस का"

अगं एक सांगायचं राहीलं तु आज एकदम छान दिसत होतीस"

"थँक्यू

"

कुठून घेतलास"
"...."

"...."

"....."

संभाषण संपले. अरेरे ज्या कामासाठी फोन केला ते राहिलेच. मग परत फोन

"

प्लीज जरा आजच्या नोटस स्कॅन करून मला अर्जंट मेल कर ना. "
"

हो नक्की, आत्ता लगेच करते"
"

थॅंन्क्यू"
"

No THanks, NO sorry. we are friends, right??"
संगणक चालू करत करत विचार करत होते. "we are friends, right?" हुम्म म्हणे मैत्रिण! ह्य बाईसाहेबांना स्वतःच्या विश्वातून बाहेर पडले तर वेळ मिळेल ना मैत्रिणीसाठी. मघाशी मला किती त्रास होत होता आणि हीचं लक्षच नव्हतं. पुन्हा स्टार्ट अप मधले सगळे प्रोग्राम चालू झाले. पण मघाशी ऑनलाईन असलेल्या मैत्रिणीचा एक ओळीचा ऑफलाईन मेसेज होता "take care, bye Goodnight" अरेरे म्हणजे मी मघाशी ती जाण्याआधीच चाट बंद केले होते. किती मी स्वार्थी आहे? इकडे दुसर्‍यांना दोष देते की ते नेहमीच स्वतःच्या विश्चात समलेले असतात. आणि मी स्वतः पण तेच करतिये. फक्त स्वतः पुरता विचार करतिये दुसर्‍याचे ऐकून सुद्धा घेत नाही मी. मलाच कधी मैत्री करता आली नाही. मी नेहमी दुसर्‍याला दोष देत राहिले की ते आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि आपल्याला समजून घेत नाहीत. मीच कधी मनमोकळं बोलले नाही कुणाशी. मघाशी तिने माझे म्हणने किती शांतपणे ऐकले. माझ्या वर विश्वास ठेवला. माझं दुखः समजून घेतलं. आणि मी मात्र केवळ कृतज्ञतेची फॉर्मालिटी केली. एवढी कशी मी दुष्ट आणि स्वार्थी? वात्सल्य सिंधू आईशी पण मी कृत्रिमपणे बोलत होते. बाबांच्या बाबतीतही तेच. आईबाबांच्या बाबतीत काही पडदे ठेवावेच लागतात ठीक आहे. पण ह्या मैत्रिणीचा काय दोष. खरंच मला खूप खजिल वाटायला लागलं.

वर्गमैत्रिणीने अद्यात मेल पण पाठवली होती. मेल उघडली. पण मला नोट्स पेक्षा मघाशी काय चाट केला ह्याची जास्त उत्सुकता होती. मघाशी माझ्या मनात नक्की काय होतं ती ऑर्कुटमैत्रिण काय म्हणत होती हे मला पुन्हा बघायचे होत्ते. पुन्हा तो चाट वाचायला घेतला. ती मला किती समजून घेत होती? ती ही माझ्यासारखीच होरपळलेली होती. पण मी तिला ऐकलेच नाही. तिने माझ्या मनातला गुंता पुर्ण उकलला पण मी मात्र केवळ ऐकण्याची फॉर्मालिटी केली. तिला खरं तर खूप बोलायचं होतं माझ्याशी. पण मीच कमी पडले.पुन्हा पुन्हा तो चाट अर्काईव वाचला. आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता मी कर्तव्य म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून करत नव्हते. मलाच तिची गरज होती. मीच निष्ठूरपणे तिने पुढे केलेला मैत्रिचा हात बघितला नाही. हीच खंत मनात ठेऊन आपल्या खोलीत झोपायला गेले. मनातून खंत जात नव्हती. स्वतःवर चीड यायला लागली होती. पण थोड्या उशीराने का होईना शरिराने त्याचा धर्म पाळला आणि झोपी गेले.

दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच रुटीन. आजही मी शांत होते पण आजची शांतता आणि कालपर्यंतची शांतता खूप वेगळी होती. आज मला माझाच शोध लागला होता. पण स्वतःच्या कृत्रिम कृतज्ञता घेणार्‍या कृतघ्नतेची चीड होती. आपल्या अज्ञानाची खंत होती. आपल्या अविश्वासाचा वीट आला होता पण अद्याप मी सर्वांवर विश्वास ठेऊ शकत नव्हते. आणि जिच्या वर माझा खूप विश्वास बसलाय विश्वास हा शब्दही खूप कमजोर आहे जिच्यावर माझी श्रद्धा आहे तिला मी ओळखू शकले नाही. तिने पुढे केलेला मैत्रिचा हात मला दिसला सुद्धा नाही. मन पोखरूण गेलं आजपर्यंत नव्हतं इतकं खिन्न झालं. आज वर्गातून घरी जाताना ते खोटे मुखवटे घातलेले चेहरे खरे भासत होते. त्यांच्यातले चैतन्य ही खरे होते पण आज ते माझ्यावर हसत होते. त्या रस्त्याकडेच्या भिकार्‍याची कधीकधी मला दया यायची पण आज त्यालाच माझी दया येते आहे असे वाटायला लागले.

बस्स खूप झाले. रोजरोजचे यंत्रा सारखे जगणे सोडून द्यायचे. आपल्या चुका आपणच दुरुस्त करायच्या. सर्वात आधी त्या ऑर्कुट मैत्रिणीची माफी मागायची. ती मला नक्की समजून घेईल. घरी आल्या आल्या मी कॉम्प्यूटर चालू केले. पण आज ती ऑनलाईन नव्हती. रागावली तर नसेल माझ्यावर? किती मी कर्मदरिद्री? एक चांगली मैत्रिण मी गमावून बसले. पण छे असं हिम्मत सोडून चालणार नाही. चुक केली तर माफ़ी मागितलीच पाहिजे. मनाची समजूत काढून तिला एक स्क्रॅप पाठवला. तिची मनपुर्वक माफी मागितली. आणि पुन्हा ठरलेल्या वेळी गच्चीवर जाऊन सुर्याला निरोप द्यायला पोचले. पण ती सुर्यफुले आज मला ओळखत नव्हती. यक्षांनी मोरफंखाची थंड हवा दिली पण त्यातही त्यांची केवळ कर्तव्यपालनाची भावना दिसली कालच्या सारखी ओळखीची आणि मैत्रीची थंडी आज जाणवलीच नाही. तो रवी ही आज माझ्याशी बोलत नव्हता. त्या सगळ्यांत मी विना आमंत्रण गेले असे मला वाटायला लागले. हताश होऊन पुन्हा घरी आले. पुन्हा कर्त्यव्यांचे ओझे वाहिले. आज एक वर्गमैत्रिण घरी अभ्यासाला आली होती. म्हणून ते पण कर्तव्य करायला घेतले. इंटरनेट वर संदर्भ शोधण्यासाठी संगणक चालु केले.

एव्हाना त्या ऑर्कुट मैत्रिनीचा स्क्रॅप आला होता. "अगं वेडे. मनावर घेऊ नकोस. होतं असं कधी कधी. आज माझी तब्ब्येत जरा बरी नाही म्हणून ऑफिसला गेले नव्हते म्हणून ऑनलाईन नव्हते. तू समज अगर समजू नकोस पण तू माझी खुप चांगली आणि जवळअगं एवढ्या लवकर विसरलीस. तुच म्हणत होतीस ना की मी अगदी तुझ्यासारखीच आहे. मी तुझ्यासारखी विचारात गुंतले असते तर कदाचीत माझ्याकडूनही हीच चूक झाली असती. पण खरं सांगू का. तू खूप थोर आहेस. तुला माफी मागता येते. मला नाही जमत कधी कधी माफी मागायला. उद्याचं पण नाही सांगता येत. मी ऑनलाईन असेल की नाही. तुला कधीही फोन करता यावा म्हणून माझा मोबाईल नंबर दिला असता पण इथे ते सुरक्षीत नाही."

तिच्या त्या चार ओळींनी माझी निराशा जळून गेली. किती लवकर तिने माझ्या हृदयात स्थान निर्माण केले होते. ती मला समजून घेते. अगदी मी म्हणजे तीच किंवा तीच मी होऊन जाते. माझी चूक पोटात तर घेतेच पण मला धीरही देते. एवढे असूनही माझेच कौतुक करते. आणि तिचा हात सदैव मदती साठी पुढे आहे. हीच माझी खरे जिवाभावाची मैत्रिण होऊ शकते. काल संध्याकाळपासूनची सगळी खिन्नता गळून गेली. उत्साहाचे उधान आले. आता ह्या मैत्रिणीला कधीही दूर होऊ द्यायचे नाही. पुन्हा तिचे आभार मानावेसे वाटले पण आभाराची फॉर्मालिटी करून तिचा अपमानही करायचा नव्हता. तिला स्क्रॅप करून उत्तर दिले आणि कोड लॅंग्वेज मध्ये माझा नंबर कळवला. आणि तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एवढे दुखः उरात बाळगून सुद्धा किती खट्याळ आहे. हीच मला आयुष्य जगायला शिकवू शकते. यंत्रांना सुद्धा मन असते हे शिकवणारी मैत्रिण मिळायला खुप भाग्य लागते.

इतक्य वर्षांची काजळी धुऊन निघाली आणि पारदर्शकता जाणवू लागली. मनातली अनामिक गुंतागुत सुटली. इथे जवळ असणार्‍या वर्गमैत्रिणीला काहीच कळाले नाही. की अचानक मी का उत्साहाने ओथंबून वाहू लागले. सगळी कामे आता कर्तव्य म्हणून न करता मना पासून करू लागले. सगळी जळमटे निघाली असली तरी थोडाफार मानसीक आळस राहिलाच होता. तिच्याशी संभाषण करत करत हळूहळू तोही निघून गेला. आता मी एक ऍक्टीव आणि हसत मुख मुलगी झाले होते. माझ्यातला बदल आईबाबांना आणि वर्गमैत्रिणींना पण जाणवत होता. ऑर्कुटवरची मैत्रीण तर मला स्वीटहार्टच वाटत होती. नेहमी तिच्या जवळ राहता येईल अशा अनेक कल्पना केल्या. तिचा मुलगा माझ्या पेक्षा लहान होता नाहीतर मी तिला सासूच करून टाकले असते. असे मनापासून वाटायला लागले. आता आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फोनवर बोलू लागलो. आईबाबांना पण माझी ती मैत्रिण खूप आवडू लागली. कारण तिच्या मुळेच मी बोलू लागले होते. तिच्या मुळेच मी आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले. तीही जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करते आहे. पण फक्त प्रयत्नच. दुखः तिचा पाठलाग सोडतच नाही. माझं दुखः म्हणावं तर मला दुखः नव्हतंच कधी. मला तिचं खुप कौतुक वाटते आणि काळजी पण.

मी आयुष्य जगायला शिकले अभ्यासतही रमले. शेड्यूल बदलले ऑनलाईन भेटी कमी झाल्या. हळू हळू फोण्न करण्याची फ़्रिक्वेन्सी कमी झाली. तीपण तिच्या रूटीन मध्ये बिझी आणि मी पण. पण तिने शिकवल्या प्रमाणे आणि आणि तिच्या म्हणन्या प्रमाणे मी जीवनाचा आनंद घेत होते. आज मी एका शाळेच्या(कॉलेजच्या) एका कार्यक्रमाला आले आहे. तिथे एक माजी विद्यार्थीनी आणि एक शिक्षिका ज्या आता खूप जवळच्या आणि जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. मला त्यांचे खूप कौतुक वाटले. त्यांच्या मैत्रीबद्दल जाणून घेतले.

ती विद्यार्थीनी ही माझासारखीच आणि ति शिक्षिका ही माझ्या ऑर्कुट मैत्रिणी सारखीच. त्यांना ही एकमेकींशिवाय करमत नव्हते. त्यांनीही कित्येक वर्षांचा विरह सहन केलाय. आणि आज भेटल्यात. पण माझी ऑर्कुटमैत्रिण मला कधीच भेटली नाही. तिने मला आईची माया दिली. गुरू आणि वडिलांसारखे मार्गदर्शन केले. भावासारखे संरक्षण केले. खट्याळ मैत्रिणीसारखी मस्ती केली. त्या वात्सल्यसिंधू मैत्रीणीच्या मायेचा प्रत्यक्षानुभव कधीच घेतला नाही. ती मैत्रिण मला प्रत्यक्ष कधी भेटेल. फॉर्मालिटी नाही पण मला खरंच त्या मैत्रिणीचे आभार मानायचे आहेत. प्रेमाच्या सगळ्या नात्यांना नाव असते हेही नाते प्रेमाचेच पण त्याला केवळ मैत्री हे नाव कधीच पुरेसे नाही. पण ही अशी हृदयात स्थान केलेली नाती आपल्याला आयुष्यभर का साथ देत नाहीत?. का सामाजीक किंवा कौटूंबिक कर्त्यव्यांच्या राड्यात ही नाती मिसळून टाकायची?

रविंद्र भालचंद्र गायकवाड.(९ जाने २०१०

कथामुक्तकप्रकटनविचारसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2010 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी तरी म्हटले आहे की, ''मैत्री ही श्रावनातल्या पावसासारखी असते, ऊन-पाऊस असणारच तेव्हा विचलित होऊ नका. याही खेळाचा आनंद घ्या...!''

अनोळखी माणसाशी खूप बोलावं वाटतं.... आपण अधिक चिरपरिचित झालो की त्याचा कंटाळा यायला लागतो. कधी कधी जगरहाटीमुळे भेटी होत नाही. मग औपचारिकपणा शिल्लक राहिला की काय असे वाटायला लागते इतके दुरावतो. पुन्हा नव्या मित्र-मैत्रीणींची आयुष्यात घुसखोरी होते. पुन्हा पुर्वीच्या मित्रांची आठवण होते, बोलावंस वाटतं,हरवलेले क्षण शोधावेसे वाटतात.... आणि हे चक्र सतत चालू राहते. आणि हीच भावना आपल्या लेखनातून अगदी सहज व्यक्त झाली आहे.

आपल्या मैत्रीणीची आणि आपली जरुर भेट होईल.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा....!!!

-दिलीप बिरुटे

रविंद्र गायकवाड's picture

15 Jan 2010 - 1:27 pm | रविंद्र गायकवाड

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हे माझे स्वत्:चे मनोगत नसून स्वतः एक मुलगी आहोत असे स्वसंमोहण करूण लिहिलेले हे मनोगत आहे.

श्री(स्वतःच्या नावासमोर श्री लावयचे नसते हे ठाऊक आहे.) रविंद्र भालचंद्र गायकवाड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2010 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>स्वतः एक मुलगी आहोत असे स्वसंमोहण करूण लिहिलेले हे मनोगत आहे.
मला वाटलं तुम्ही मुद्दामहुन मुलाचे 'रविंद्र गायकवाड' असे नाव मिपावर [मुलांच्या धाकाने] घेतली की काय ! :)

>>श्री(स्वतःच्या नावासमोर श्री लावयचे नसते हे ठाऊक आहे.) रविंद्र भालचंद्र गायकवाड

श्री,श्रीमान,श्रीमती,महोदया, अशी आदरार्थी वचने कोणाच्या नावापुढे लावतात, लावली पाहिजे, त्याबद्दल कुठे माहिती वाचायला मिळेल...?

-दिलीप बिरुटे

रविंद्र गायकवाड's picture

16 Jan 2010 - 10:05 am | रविंद्र गायकवाड

फार काही सांगता येणार नाही.
कु, श्री, सौ, कै, वै, डॉ, प्रो एवढेच माहीत आहेत.

बाकी स्वतःच्या नावापुढे श्री लावणे शिष्ट समजले जाते. इथे केवळ पुरुषार्थी उल्लेखासाठी श्री वापरलेले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2010 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>श्री लावणे शिष्ट समजले जाते.

समजणार्‍यांच्या काय विचार करायचा. बिंधास्त लावत जा स्वतःच्या नावापुढं श्री.:)

श्री दिलीप बिरुटे
[अशिष्ट ]