शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
21 Jun 2017 - 5:55 pm

याआधीचे भाग येथे वाचता येतील :

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९

शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

आशियात इतरत्र अनेक जागी आहे तसा नेपाळच्या लोकशाहीलाही अगदी स्थापनेपासूनच अस्थिरतेचा शाप आहे. १९५१ च्या पहिल्या लोकशाही सरकारपासून ते आज २०१७ पर्यंत काठमांडूमधील सिंघदरबारच्या भिंतींनी तब्बल ४६ वेळा पंतप्रधानपदाचे शपथ ग्रहण बघितले आहे. म्हणजे एका पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारण १७ महिने! (भारतात ह्याच कालावधीत फक्त १८ वेळा, त्यातही एकूण १४ व्यक्तीच पंतप्रधान झाल्या आहेत यावरून नेपाळमधील अस्थिर लोकशाहीची कल्पना यावी). राणा परिवाराच्या ज्या घराणेशाहीला विरोध म्हणून लोकशाही संघर्ष झाला त्याच्या अगदी विरुद्ध नेपाळमध्ये 'लोकशाही राजघराणी' स्थापन झालीत. परत काही मोजक्या कुटुंबाकडे सत्ता आणि जनता उपाशी. ही अनेकानेक लोकशाही सरकारे नेपाळी जनतेच्या अगदी दैनंदिन आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यातसुद्धा पुनःपुन्हा अपयशी ठरली आहेत.

ह्या लेखमालेच्या सुरवातीच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे नेपाळ एकजिनसी राष्ट्र नाही. साठ वेगवेगळ्या भाषा बोलणारे दोनशेच्या वर वेगवेगळ्या जातीसमाजाचे लोक, शेजारच्या तिबेट आणि भूतानमधून आलेले शरणार्थी आणि तराई भागात शतकानुशतकं वसलेले भारतीय वंशाचे मधेसी लोक असा नेपाळी समाजाचा बहुमुखी चेहरा आहे. समाजात फूट पाडणारा जातीयवाद आणि प्रचंड गरिबी आहे. जनतेचे वर्षानुवर्षाचे 'कंडिशनिंग' आहे, प्रतिकूल हवामान, भूकंपासारखी नैसर्गिक संकटे आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेली सरकारी यंत्रणा आणि गटातटाचे राजकारण करण्यात मश्गुल राजकारणी असे आजच्या नेपाळचे चित्र आहे. सर्वसामान्य नेपाळी माणसाचे जीवन खडतर होते ते आजही तसेच आहे.

विकासाचं म्हणाल तर जगातल्या अति-दरिद्री देशांच्या यादीत नेपाळचा क्रम अफगाणिस्तानच्या खालोखाल १८ वा आहे (GDP Per Capita $698). गेल्या ७० वर्षात भारतातील जयनगर ते नेपाळमधील जनकपूरधाम ही ५३ किलोमीटरची आणि बिहारमधील रकसौल ते नेपाळमधील सिरसीया नाक्यापर्यंतची एक ६ किमीची, अशा दोन जुनाट रेल्वेलाईन सोडता नेपाळमध्ये कोठेही रेल्वे आली नाही. आणि हे दोन्ही मार्ग फक्त मालवाहतुकीसाठी - प्रवासी वाहतुकीसाठी नाहीत !

नेपाळच्या पूर्वपश्चिम पसरलेला १०२९ कि मी चा महिंद्रा महामार्ग आणि काठमांडूला बीरगंज येथे भारताला जोडणारा १९० कि मी चा त्रिभुवन महामार्ग हे भारत सरकारच्या मदतीने बांधण्यात आले. आजही जागोजागी रंग उडालेल्या पाट्यांवर 'भारत सरकारको सहयोगमा बनेला' लिहिलेले दिसते - पण ते तेव्हढेच. त्यानंतर नेपाळने स्वतः काही फार केलेले नाही. (चीननेही नेपाळ महामार्गाने जोडण्यासाठी काठमांडू ते कोडारी मार्ग बांधून दिला आहे. महामार्गाची अवस्था मात्र दयनीय आहे, पहिल्या काही वर्षातच ह्या वाटेची वाट लागली आहे.)

शिक्षणाची तर फारच वाईट अवस्था. युनाइटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) शाळा शिकणाऱ्या लोकांची शाळेतली वर्षे, त्यांची पुढे शिकण्याची शक्यता आणि त्यावर सरकार आणि अन्य लोकांचा होत असलेला खर्च असे सर्व मुद्दे लक्षात घेऊन ते एक HRD इंडेक्स काढते. २०१६च्या आकडेवारीनुसार सुमारे २०० देशांमध्ये ह्यात नेपाळचा क्रमांक १४५ वा आहे - म्हणजे अतीव मागास. (ह्यात शेजाऱ्यांमध्ये मोठ्या भावाची भूमिका वठवणाऱ्या आपल्या भारताची अवस्थाही फार काही भूषणावह नाही, आपण १३५व्या क्रमांकावर आहोत.)

प्रमुख रस्त्याची डागडुजी करणे, काठमांडू आणि पर्यटक येतात त्या शहरांची थोडीफार निगा राखणे यापलीकडे शासनतंत्राला नागरिकांची काही फार चिंता आहे असे दृश्य दुर्दैवाने कोठे दिसत नाही. शहरे बकाल होताहेत, प्रदूषण प्रचंड वाढले आहे, सर्व नियम धाब्यावर बसवून डोंगर फोडून केलेली बांधकामे आहेत. सार्वजनिक सुविधा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दुर्गम गावांची आणि तेथिल नागरिकांची अवस्था आणखी दयनीय आहे. शेती फारशी पिकत नाही, पर्यटक सगळीकडे येतातच असे नाही आणि छोटेमोठे उद्योगधंदे आणि व्यापारातून फार काही रोजगार निर्माण झालेला नाही. सरकार नावाची काही यंत्रणाच ह्या दुर्गम भागात पोचलेली दिसत नाही. ह्या सर्व बाबींमुळे ९० च्या दशकापासून नेपाळच्या दुर्गम भागात माओवादी शक्तींसाठी पोषक अवस्था निर्माण झाली आहे. चीनचा नेपाळी माओवादी शक्तींना उघड पाठिंबा आहे, छुपी आर्थिक आणि शस्त्रांची मदतही आहे. त्यामुळे हे लोण नेपाळच्या अन्य भागात पसरायला जास्त वेळ लागला नाही. माओवादी आंदोलन चिरडण्यासाठी नेपाळी सरकारांनी लष्कराच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले त्यात सुक्याबरोबर ओले जळते तसे अनेक निर्दोष नागरिकही मोठ्या प्रमाणात मारले गेले आहेत. एका निष्पक्ष अंदाजाप्रमाणे १९९६ ते २००६ या काळात माओवादी हिंसाचारात सुमारे किमान १३००० लोकांनी जीव गमावला आहे आणि सुमारे दीड लाख लोक निर्वासित झाले आहेत. हे आकडे फार मोठे आहेत.

ह्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका फार महत्वाची होती आणि आहे. भारतीय सरकारांमध्ये नेपाळशी असलेल्या संबंधांबद्दल बरीच एकवाक्यता असली तरी सरकारपरत्वे त्यात वेळोवेळी फरक पडतो. नेपाळी राजेशाही, नेपाळी सैन्य आणि नेपाळी जनतेच्या आकांक्षा ह्या सूत्र-त्रयीवर भारताचे नेपाळ धोरण ठरत असे, अगदी २००० सालापर्यंत हे तीन घटक एकमेकांना काहीसे समतोल होते. माओवादी हिंसक आंदोलन आणि त्याला नेपाळच्या पहाडी भागात मिळणारा लक्षणीय पाठिंबा ह्यामुळे हा समतोल ढासळला. नेपाळच्या जवळपास अर्ध्या भूभागावर माओवाद्यांनी समांतर सरकारे स्थापन केली आणि नेपाळी सरकारांचे धाबे दणाणले. ह्या सर्व समस्यांमुळे नेपाळ सरकार अडचणीत आले असतांनाच आधीच्या भागात सांगितल्या प्रमाणे (वाचा - शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६) एका असामान्य घटनेने नेपाळला हादरवून सोडले - ती म्हणजे १ जून २००१ च्या उत्तररात्री काठमांडूच्या नारायणहिटी राजवाड्यात नेपाळ नरेश राजे बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, त्यांचे दोन्ही वारस राजपुत्र, त्यांचा भाऊ, बहिणी, आत्या झाडून सर्व राजपरिवार एका नृशंस हत्याकांडाला बळी पडला….. हे हत्याकांड घडवले राजे बिरेंद्र यांचा घोषित वारस युवराज दिपेंद्रने स्वतः !! युवराज दिपेंद्रने सर्वांना ठार केल्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असा चौकशी समितीचा निष्कर्ष आला. एकूणच ही घटना म्हणजे नेपाळच्या इतिहासातील कोट पर्वानंतरचा दुसरा मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरली. ही घटना घडली आणि नेपाळमधील माओवादी आंदोलनाला धार आली. जवळपास पूर्ण राजपरिवार ठार झाल्यामुळे नेपाळभर अस्थिरता आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले. राजे बिरेंद्र यांचे फारसे लोकप्रिय नसलेले धाकटे भाऊ ज्ञानेंद्र यांचा राज्याभिषेक घडला. संपूर्ण राजपरिवाराची हत्या घडवण्यात ज्ञानेंद्र यांचा काहीतरी सहभाग असावा अशी कुजबूजही झाली.

तर २००१ मध्ये ज्ञानेंद्र यांच्या राज्यारोहणानंतर नेपाळातील राजेशाही आणि मर्यादित लोकशाही व्यवस्था पूर्णपणे संपवून गणतंत्र आणि संपूर्ण लोकशाही पद्धतीचा आग्रह टिपेला पोहचला. ज्ञानेंद्र लोकप्रिय नव्हतेच पण त्यांचे राजकीय डावपेचसुद्धा चुकले. १९९६ पासून नेपाळच्या भूभागावर होणाऱ्या जनतेच्या कत्तली आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती हाताळण्यात नेपाळी शासन कमी पडले होतेच, त्यात ज्ञानेन्द्रांच्या येण्याने फार काही फरक अपेक्षित नव्हता. पण त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या लष्कराने माओवाद्यांएवढेच किंबहुना अधिकच बळ वापरून नेपाळच्या सामान्य नागरिकांचे जगणे कठीण केले, अनेकदा निशस्त्र आंदोलकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे असंतोषाचा आगडोंब उसळला. त्यात बुडत्याचा पाय खोलात जातो तसे राजे ज्ञानेंद्र यांनी २००५ साली पंतप्रधानपदच रद्द करून सत्ता-सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेऊन थेट राजशासन आणले. माओवादी आंदोलनाला ग्रामीण भागात मिळणारे समर्थन आणि शहरी भागात होणारी राजेशाहीच्या पूर्ण उच्चाटनाच्या मागणीचा वाढता जोर अशा कचाट्यात ते सापडले. अखेर काठमांडूत निघणारे लाखो नेपाळी नागरिकांचे मोर्चे आणि त्यावर तुटून पडणारे सैन्य आणि पोलीस ह्या रोजच्या दृश्यामुळे त्यांची उरली सुरली पत त्यांनी गमावली आणि अखेर २००८ मध्ये त्यांना पदच्युत करून नेपाळ 'गणराज्य' घोषित होऊन २४० वर्षाची राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आली.

आता 'पूर्ण' लोकशाहीचे स्वप्न साकार झाले तरी नेपाळच्या जनतेचे हाल काही संपले नाहीत. युनाइटेड कम्युनिस्ट पार्टी (माओवादी), नेपाळी काँग्रेस, मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट कम्युनिस्ट पार्टी, मधेसी जनाधिकार फोरम, प्रजातंत्र पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांच्या कडबोळ्यांचे अस्थिर सरकार आणि संगीत खुर्चीचा खेळ असेच दृश्य गेली दशकभर आहे. नेपाळचे नवीन राज्यघटना ठरवणे हा कळीचा मुद्दाच अजून सर्वपक्षीय राजकारण्यांना मिळून सोडवता आला नाही, ह्यातच सर्व आले. नेपाळी राजकीय नेते परिपक्वता दाखवतील आणि नेपाळला पुन्हा देशात राजकीय स्थिरता आणि समृद्धीचे दिवस येतील अशी नेपाळी जनतेची आशा आजही आहे. एक शेजारी देशाचा नागरिक म्हणून आपलीही तीच अपेक्षा, नाही का?

* * *

आता आपल्या ह्या शेजारी देशाबद्दल काही गमतीशीर माहिती:

• नेपाळ नाव घेतल्याबरोबर काय आठवते तर हिमालय आणि त्यातही माऊंट एव्हरेस्ट! जगातील सर्वोच्च हिमशिखर. पण हे एकच नव्हे तर जगातील पहिल्या १० हिमशिखरांपैकी ८ एकट्या नेपाळमध्ये आहेत. नेपाळी स्वतः एव्हरेस्ट ला एव्हरेस्ट म्हणतच नाहीत.माऊंट एव्हरेस्ट नाव ब्रिटिशांनी दिलेले आहे - त्याचे नेपाळी नाव सगरमाथा / सागरमाथा. शेर्पा लोक त्याला चोमोलुंग्मा (जगन्माता) म्हणतात.

• नेपाळ 'स्वातंत्र्य दिवस' नाही, कारण तो कधीच परकीय अमलाखाली नसलेला आशियातील एकमेव देश आहे, नेपाळचे सर्वोच्च पद कायम नेपाळी व्यक्तीनेच भूषवले आहे.

• नेपाळमध्ये शनिवारी कोठलेही सरकारी आदेश घोषित करत नाहीत. नवीन कामे सुरु करण्यासाठी, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी इतर दिवस निवडतात. ह्यामागे काय कारण आहे ते कुठलाही अधिकारी व्यक्ती सांगत नाही.

• काठमांडूच्या प्रख्यात पशुपतीनाथ मंदिराचे सर्व सेवक-पुजारी-पुरोहित हे कासारगोड, भटकळ, सिरसी, चिक्कमंगळूर ह्या कर्नाटकाच्या किनारी भागातून स्थलांतरित होऊन शेकडो वर्षांपूर्वी काठमांडूला स्थिरावलेल्या लोकांचे वंशज आहेत.

• तुळजा (तलेजू) भवानी ही नेपाळच्या सम्राटांची कुलदेवता. योगायोगाने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अनेक राजकुलांची कुलदेवता तुळजाभवानी आहे. नुसते नावात नाही तर पूजा-पद्धती-चालीरीतीही ह्या तलेजू भवानीचे महाराष्ट्रात असलेल्या तुळजाभवानीशी बरेच साम्य आहे. उदा. नेपाळमध्ये अन्यत्र कुठे नसलेली घट बसवण्याची प्रथा.

• नेपाळ आणि भारताच्या कर्नाटक प्रांतामध्ये ऐतिहासिक संबंधाची एक विशेष कडी आहे - नेपाळमधील तिरहुत, सिमरौनगढ किंवा डोय ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अतिप्राचीन राज्याचे प्रमुख स्वतःला कर्नाटकातील चालुक्य सम्राटाचे प्रतिनिधी / वंशज म्हणवत. त्याचे २३० वर्षे टिकलेले स्वतंत्र राज्य, ते स्थापन करणारा नान्य देवा (न्यायदेव) नावाचा राजा, त्याचे तुळजा भवानीचे भक्त असणे अशा अनेक गोष्टी जुन्या नेपाळी हस्तलिखितात सापडतात.

• सध्या नेपाळ राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेला 'शीतल निवास' हा महाल भारतीय उच्चायुक्तांचे निवासस्थान होते. ते नेपाळ सरकारने आग्रहाने भारताकडून परत मागून घेतलेले आहे. आधी ब्रिटिश आणि नंतर भारतीय प्रतिनिधींची नेपाळमधील वट काय होती याची कल्पना येण्यासाठी एक छोटे उदाहरण पुरेसे आहे. आता थोडे दूरवर लैंचौर भागात बऱ्याच मोठ्या भूभागावर भारताचे नवीन राजदूतावास आहे आणि तेथे अन्य भारतीय कार्यालये एकाच जागी आणण्यात आली आहेत.

• भारत-नेपाळ मैत्री करारानुसार भारतीय भूमीतून नेपाळला जाणाऱ्या कुठल्याही देशाकडून आलेल्या मालावर भारतीय कस्टम ड्युटी इ. सोपस्कार करावे लागत नाहीत, हा सर्व माल ड्युटी फ्री असतो.

• IFS, IAS IPS अश्या भारतीय केंद्र सरकारकडून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि नियुक्त्यांमध्ये नेपाळी नागरिकांसाठी काही राखीव जागा आहेत, फक्त काही विशिष्ट भारतीय राज्यात त्यांना नियुक्ती देण्यात येत नाही. भारतीयांना मात्र नेपाळी शासनातील कुठल्याही पदावर राहता येत नाही.

• राजेशाही संपुष्टात आल्यानंतर भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जमीन विकत घेण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

• १९६३ सालापासून एका अघोषित तहानुसार नेपाळला विकल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या व्यापारात भारतीय सैन्य आणि अन्य भारतीय संस्थांची एकाधिकारशाही (मोनोपोली) मान्य करण्यात आली आहे. ह्या तहाला नेपाळमधील झाडून सर्व राजकारण्यांचा पाठिंबा आणि नेपाळी सैन्यदलाच्या झाडून सर्व उच्चाधिकाऱ्यांचा विरोध आहे असे वेळोवेळी लक्षात येते.

• भारतीय सैन्याचे जे मोजकेच तळ भारताच्या हद्दीबाहेर आहेत त्यापैकी काही नेपाळ मध्ये आहेत. नेपाळमधील सुरखेत भागात असलेल्या भारतीय विमानदलाच्या तळाला ताबडतोब हलवावेत अशी मागणी नेपाळमध्ये जोर धरून आहे, पण हे होण्याची शक्यता जवळपास नाही. भारतीय सैन्याला थेट तिबेटपर्यंत धडक देता येण्यासाठीच ह्या तळाचे प्रयोजन आहे.

• आशियात सर्वत्र राजकीय घराणेशाही दिसते, म्हणजे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होणे वगैरे. पण एकाच आई-वडिलांच्या तीन सुपुत्रांनी प्रत्येकी तीनदा नेपाळचे पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम आहे मातृका प्रसाद, बिश्वेश्वर प्रसाद आणि गिरीजा प्रसाद कोईराला ह्या सख्ख्या भावांच्या नावावर. गमतीचा भाग म्हणजे पहिले गैर-राणा पंतप्रधान असलेले मातृका प्रसाद कोईराला काही महिने आपल्याकडे, भारतात, बिहार काँग्रेसचे अध्यक्षही होते. प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला ही ह्याच प्रसिद्ध नेपाळी कोईराला कुटुंबाची एक सदस्य आहे.

• बोलण्या-लिहिण्यात 'पनौती' शब्द आपल्यापैकी अनेकांना आला असेल. त्याचा साधारण अर्थ ब्याद - अशुभ जागा किंवा व्यक्ती असा आहे. पण 'पनौती' नावाचे एक तीर्थस्थळ नेपाळला आहे, काठमांडू पासून जेमतेम ३५ किलोमीटर अंतरावर. ह्या देवळात जायला नेपाळी शाह नरेशांना नेहेमी बंदी. त्याचे कारण पनौती गावाची मालकी खुद्द नारायणाची / श्रीविष्णूची समजल्या जाते. ते गाव पहिल्या शाह नरेशाने, पृथ्वीनारायणाने, स्वतःच्या राज्याला जोडले. तेंव्हापासून 'खऱ्या' नारायणाच्या रागाला बळी पडू नये म्हणून नेपाळ नरेश - म्हणजे श्रीविष्णूचा भूतलावरील अवतार - दोधांमध्ये प्रत्यक्ष भेट झाली नाही.

• काठमांडूच्या उत्तरेला ‘वृद्ध निळकंठ’ नावाच्या देवळात अशीच एक नागशय्येवर पहुडलेल्या श्रीविष्णूची १५ फुटी अप्रतिम सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे साधी दृष्टी जरी टाकली तरी नेपाळ नरेश ताबडतोब मृत्यू पावेल अशीही एक समजूत आहे, अर्थातच आजवर कोठल्याही शाह नरेशाने ह्या देवळाला भेट दिलेली नाही.

• नेपाळचे मैथुनशिल्पांचे खजुराहो - हे आहे आपल्या भारतात.
(चित्र - GoSeeFeel.com या संस्थळावरून साभार)

काशी-क्षेत्राशी असलेल्या शाह परिवाराच्या ऋणानुबंधांना उजाळा देण्यासाठी आणि निर्वासित अवस्थेत मनाला शांती मिळावी म्हणून नेपाळ नरेश रणबहादूर शाह देव ह्यांनी काशीत नेपाळी पद्धतीचे मंदिर १८०१ साली बांधले. पशुपतीनाथ आणि ललितागौरी देवीला समर्पित खास पॅगोडा शैलीतील हे काष्ठमंदिर आजही सुस्थितीत आहे. नेपाळी संस्कृतीचे हे बेट वाराणसीच्या नागरी शैलीतल्या हजारो मंदिरांच्या गर्दीत उठून दिसते. त्याची ओळख म्हणजे लिच्छवी-नेवार शैलीतील कलात्मक मैथुन शिल्पे, पण दगडात नाही तर लाकडी कोरीवकाम असलेल्या तुळया आणि खांबांमध्ये. प्रख्यात मणिकर्णिका घाटाच्या अगदी जवळ असलेल्या ह्या मंदिरात फारसे भारतीय यात्रेकरू जात नाहीत, विदेशी पर्यटक मात्र आवर्जून जाताना दिसतात.

• संपूर्ण दक्षिण आशियात टोयोटो कंपनीच्या गाड्या टॅक्सी म्हणून वापरणारा सार्क समूहातील पहिला देश म्हणजे नेपाळ. काठमांडूला टोयोटाच्या टॅक्सी बघून भारतातल्या तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्नाने आपली (त्यावेळी भारतातील बहुदा एकमेव) टोयोटा गाडी वापरणे सोडून दिले होते.

• नेपाळच्या तराई भागात भोजपुरी भाषा सर्रास बोलली जाते आणि भारतात दार्जिलिंग आणि जवळपासच्या भागात नेपाळी भाषा. (सध्या दार्जिलिंग भागात प्राथमिक शाळांपासून बंगाली भाषेची सक्ती करण्याच्या प्रस्तावामुळे वातावरण ढवळून निघाले आहे)

क्रमशः

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

21 Jun 2017 - 11:39 pm | अमितदादा

उत्तम लेख ... शेवटचे मुद्दे तर खूप माहितीपूर्ण

उत्तम माहिती दिली आहे. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2017 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत रोचक लेखमालेतील नेपाळची प्रदीर्घ आणि माहितीपूर्ण ओळख खूप खूप आवडली. *BRAVO*

सहसा वाचनात न येणारी शेवटची माहिती तर खास आवडली. *ok*

पुढच्या देशाबद्दलच्या लेखाची प्रतिक्षा आहे ! लवकरच टाका.

अनिंद्य's picture

22 Jun 2017 - 9:18 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

आभार!

आजच पिताश्रींनी भारतातील जयनगर ते जनकपूरधाम नेपाळ हा प्रवास 'रेल्वेने' केल्याची (वर्ष १९७२) आठवण सांगितली. संदर्भ पुन्हा-पुन्हा तपासले पाहिजेत हा धडा शिकलो. :-)

शेजाऱ्याचा डामाडुमा नेपाळवर जरा जास्तच रेंगाळला खरा. आता पुढचा भाग शेवटचा आणि मग नवीन देश.

- अनिंद्य

तुषार काळभोर's picture

24 Jun 2017 - 7:53 pm | तुषार काळभोर

वा!!
भूतान व म्यानमार बद्दल वाचायची खूप इच्छा आहे.

अनिंद्य's picture

25 Jun 2017 - 1:41 pm | अनिंद्य

पुढचा देश बहुतेक बांगलादेश किंवा मालदीव. बघू काय जमतंय ते.

दीपक११७७'s picture

22 Jun 2017 - 11:43 am | दीपक११७७

फारच छान माहीती, उत्तम लिखान
धन्यवाद.

अनिंद्य's picture

23 Jun 2017 - 11:52 am | अनिंद्य

@ दीपक११७७

प्रोत्साहनाबद्दल आभार !

अनिंद्य's picture

22 Jun 2017 - 9:11 pm | अनिंद्य

@ अमितदादा,
@ एस

आभार!

अनिंद्य's picture

25 Jun 2017 - 4:46 pm | अनिंद्य

नेपाळचे मैथुनशिल्पांचे खजुराहो - हे आहे आपल्या भारतात. -(चित्र - GoSeeFeel.com या संस्थळावरून साभार)

अरेरे , हे चित्र दिसले नाहीच :-(

ज्योति अळवणी's picture

26 Jun 2017 - 1:19 am | ज्योति अळवणी

खूप वर्षांची इच्छा आहे नेपाळ बघायला जाण्याची. हा लेख वाचला नंतर तर पक्क ठरवलं आहे की लवकरात लवकर वेळ काढून नेपाळला जायचं

अनिंद्य's picture

27 Jun 2017 - 11:27 am | अनिंद्य

ज्योति अलवनि,
प्रतिक्रियेबद्दल आभार, मालिकेचे आधी प्रसिद्ध केलेले भागही वाचावेत असा आग्रह करतो.
नेपाळ भेटीनंतर तुमचे अनुभव अवश्य लिहा.

निमिष ध.'s picture

27 Jun 2017 - 12:36 am | निमिष ध.

सगळी लेखमाला अगदी सुंदर झाली आहे. अतिशय आवडली. नेपाळबद्दल फार माहिती नसते आपल्याला त्यामुळे चांगली ओळख झाली.

टोयोटा ची पहिली ओळ्ख माझी पण नेपाळ मध्ये टॅक्सी म्हणूनच होती. आता टोयोटा गाडी वापरताना हे सगळे आठवून मजा वाटती आहे.

अनिंद्य's picture

27 Jun 2017 - 1:35 pm | अनिंद्य

निमिष ध.,

आभारी आहे. यू आर राईट, शेजारी देश दुर्लक्षित आहेत.

काठमांडूच्या टोयोटो टॅक्सी, होंडाच्या 'हिमालय-प्रूफ' बाइक्स, पंचतारांकित कसिनो एव्हरेस्ट, कॅसिनो रॉयल मध्ये आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघितलेले रॉलेत.. पोकर आणि ब्लॅकजॅक.... रम्य आठवणी :-)

बाय द वे, जुगाराला सरकारी मान्यता देणारा पहिलाच एशियन देश नेपाळ. ह्या लेखमालेमुळे नॉस्टॅल्जिया अनुभवला.

सर्व भाग वाचून प्रतिक्रिया दिलीत, पुनश्च आभार.

सौन्दर्य's picture

27 Jun 2017 - 2:53 am | सौन्दर्य

माझा एक नेपाळी मित्र आहे. एकदा तो बोलताना म्हणाला की नेपाळमध्ये 'बहादूर' हे आदरार्थी वचन सर्रास वापरले जाते कारण नेपाळी लोकांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर नेपाळला कधीही पारतंत्र्यात जाऊ दिले नाही.

अनिंद्य's picture

27 Jun 2017 - 2:02 pm | अनिंद्य

@ सौन्दर्य,

अगदी बरोबर. शौर्य हा नेपाळजनांचा खरा दागिना.

अवांतर - तुमचे सदस्यनाम फार 'सुंदर' आहे, आवडले आहे. :-)

वरुण मोहिते's picture

27 Jun 2017 - 11:32 am | वरुण मोहिते

अनेक नवीन मुद्दे समजले . आता प्रतीक्षा पुढील भागांची .

अनिंद्य's picture

27 Jun 2017 - 3:43 pm | अनिंद्य

@ वरुण मोहिते,

आभार.

नेपाळबद्दलचा ११ व आणि शेवटचा भाग कालच प्रकाशित केला आहे.
तुम्ही पहिल्या भागापासून वेळोवेळी प्रतिसाद दिला, काही मुद्दे मांडले. त्यावरून तुमचे नेपाळ कनेक्शन आहे असे जाणवले. जमल्यास अनुभव शेअर करा.

पैसा's picture

21 Jul 2017 - 6:24 pm | पैसा

नेपाळी राजघराण्याचे हत्याकांड झाले तेव्हा ज्ञानेंद्र यांच्याबद्दल लोकाना प्रचंद प्रमाणात संशय वाटला होता. विजयाराजे शिंदे या नेपाळी राजघराण्याशी संबंधित आहेत बहुतेक. आणि त्यांच्या घरातल्या एका मुलीचा नेपाळी राजपुत्राशी विवाह ठरला होता. पण लग्न होण्यापूर्वी हे हत्याकांड झाले असे आठवते.

लेखातील इतर माहिती मनोरंजक सुद्धा आहे. व्यवस्थेतील काही कलमे काश्मिरप्रमाणे वाटतात.

अनिंद्य's picture

22 Jul 2017 - 2:40 pm | अनिंद्य

@ पैसा

बरोबर, हत्याकांडाबाबत श्री ज्ञानेंद्र शाह यांच्यावर शंका घेण्यात आली होती. पण चौकशी समितीच्या अहवाल वेगळा आला.

ग्वाल्हेरच्या श्रीमती विजयाराजे सिंधिया ह्या मूळच्या नेपाळी राणावंशीय राजकन्या, त्यांचे आजोबा (आईचे पिताश्री) नेपाळमधून निर्वासित होऊन मध्यप्रदेशात स्थायिक झाले. विजयराजेंच्या चार मुलींपैकी एक (उषाराजे) यांचा विवाह नेपाळच्या प्रसिद्ध राणा कुटुंबातील पशुपती शमशेर राणा यांच्याशी झाला आहे (हे राणा आजही राजकारणात सक्रिय आहेत - त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे). ह्या दाम्पत्याची मुलगी देवयानी राणा आणि तत्कालीन नेपाळी युवराज दीपेंद्र शाह यांचे प्रेमसंबंध नेपाळमध्ये उघड गुपित होते. नेपाळी राजपरिवाराच्या हत्याकांडाचे एक कारण दीपेंद्र-देवयानी यांच्या विवाहाला शाही परिवाराचा असलेला विरोध असे सांगण्यात आले होते.

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2017 - 10:13 pm | एकुलता एक डॉन

नेपाळ एवढा गरीब आहे तर चीन भांडवलशाही करून त्याला आकर्षित करू शकेल

अनिंद्य's picture

22 Jul 2017 - 1:21 pm | अनिंद्य

@ एकुलता एक डॉन

भांडवल वर्षाव तर सुरु आहेच. गेल्या ३ वर्षात नेपाळमध्ये चिनी गुंतवणूक पूर्वीपेक्षा तिप्पट झाली आहे.

२०१७ च्या सुरवातीला काठमांडूत झालेल्या 'नेपाळ इन्व्हेस्टमेंट समिट' ह्या परिषदेत चिनी कंपन्यांनी ८.३ बिलियन डॉलर्स एव्हढ्या प्रचंड रकमेचे करार केले आहेत. (भारतीय कंपन्या आणि भारत सरकार मिळून नियोजित रक्कम ०.३ बिलियन एव्हढी आहे - यावरून तफावत लक्षात यावी).

काठमांडू ते कोडारी ह्या चीनने बांधून दिलेल्या महामार्गाबद्दल मी लिहिले आहेच. सध्या चीन सरकारतर्फे तिबेटी प्रदेशातून नेपाळला रेल्वेनेही जोडण्याच्या अति-महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन सुद्धा जोरात सुरु आहे.

अमितदादा's picture

22 Jul 2017 - 9:49 pm | अमितदादा

अनिंद्य यांनी थोडक्यात सांगितलंच आहे. नेपाळ मागील वर्षी झालेल्या नाकेबंदी मुळे नेपाळ चीन कडे अधिकच आकर्षित झाला आहे. मध्यंतरी kp ओली (?) पंतप्रधान असताना त्यांनी चीन ला जाऊन चिनी तेल कंपन्याबर करार केले, चिनी तेल कंपन्यांनी काही टँकर नेपाळ ला पाठवले देखील होते परंतु गेल्या भूकंपात नेपाळ चीन महामार्ग अवजड वाहतुकीस नादुरुस्त असल्याने नेपाळ ला चीन तर्फे तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात अजून सुरु झाला नाहीये. नुकतेच चीन चे इंटरनेट केबल नेपाळचा सीमेपर्यंत येऊन पोहोचल्याचे वाचले म्हणजे तेलापाठोपाठ इंटरनेट सप्लाय मधील भारताची मक्तेदारी चीन काही वर्षात मोडून काढेल. काही वर्षांपूर्वी नेपाळ मधील एका मोठ्या धरणाचे आणि वीज निर्मिती केंद्राचे कॉन्ट्रॅक्ट चीन ला भारताचा दबाव झुगारून देण्यात आल्याचे वाचले होते (सध्य स्थिती माहित नाही त्या प्रोजेक्ट ची). जसे चीन चे आर्थिक संबंध वाढीला लागतील तसे चीन चे नेपाळ मधील महत्व वाढत जाणार हे निश्चित, पण भारताचे महत्व कमी होऊ नये हीच अपेक्षा.
नुकत्याच काही काळजी वाटणाऱ्या बातम्या वाचनात आल्या, दार्जिलिंग मध्ये नेपाळी वंशाचे लोक बहुसंख्य आहेत आणि सध्या तिथे स्वतंत्र राज्यासाठी जोरदार आंदोलन चालू आहे, यावेळी नेपाळ मध्ये काही वार्ताहार ह्या आंदोलनास खतपाणी घालत होते, तसेच नेपाळ सरकार ने भूमिका घ्यावी अशी मागणी करत होते. अर्थात नेपाळ सरकार ने कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नाही हीच ती काय समाधानाची गोष्ट.

अनिंद्य's picture

24 Jul 2017 - 11:29 am | अनिंद्य

चीन नेपाळला खुष्कीच्या मार्गाने करत असलेल्या 'मदती'बद्दल मी नेपाळ भाग १ मध्ये लिहिले आहे. ही मदत दिवसेंदिवस वाढतच जाणार असे दिसते आहे.

बाकी दार्जिलिंग भागातील 'गोरखालँड' चे आंदोलन बरेच जुने आहे. आताच ह्या जुन्या मुद्द्याने नव्याने उचल खाण्याचे तात्कालिक कारण प्राथमिक शाळेपासून बंगाली भाषा शिकण्याची राज्य सरकारने केलेली सक्ती हे आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नेपाळमध्ये पुन्हा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली आहे, कोणत्याही पक्षाला किंवा युतीला बहुमत नाही !

मालिकेत लिहिल्याप्रमाणे १९९० पासून लोकशाही सरकारांकडे सत्तेच्या चाव्या हस्तांतरित होऊन आता ३२ वर्षे होत आली आहेत. या ३२ वर्षात नेपाळमध्ये ३२ लोकशाही सरकारे आली आणि गेलीत !!!

वर्षानुवर्षे असलेला राजकीय अस्थिरतेचा शाप सुटण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत.