शेजाऱ्याचा डामाडुमा- सुगौली तह आणि सत्तेचा बदलता सारीपाट - नेपाळ भाग ५

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 4:17 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा- सुगौली तह आणि सत्तेचा बदलता सारीपाट - नेपाळ भाग ५

नालापानीच्या युद्धानंतर शत्रू होते ते मित्र झालेत. पण ह्या मैत्रीत नेपाळच्या वाट्याला आला एक अन्यायकारक तह. ह्या सुगौलीच्या तहाने नेपाळचा स्वाभिमान, त्याच्या भविष्यातील योजना, त्याच्या गोरखा सैन्याचे पंचेवीस वर्षांचे श्रम-पराक्रम ह्यावर पूर्ण बोळा फिरवून त्याचे खच्चीकरण केले. आजही दक्षिण एशियाच्या इतिहासाचे अभ्यासक ह्या सुगौली तहाला अर्वाचीन नेपाळच्या राज्यकर्त्यांची सर्वात मोठी चूक समजतात.

जवळपास पंचेवीस वर्षे खपून गोरखा सैन्याने पूर्वेला सिक्कीम, पश्चिमेला कुमाऊ आणि गढवाल, हिमाचल प्रदेशातील देहरादून आणि सिरमौर तसेच दक्षिणेचा पूर्ण तराई प्रदेश काबीज केला होता. थेट काश्मीर खोऱ्यात, अगदी श्रीनगरमध्येसुद्धा ठाणी कायम केली होती. पैकी नालापानी युद्ध झाले ते आजच्या देहरादून जवळ, त्या प्रदेशातल्या वर्चस्वासाठी. ह्या युद्धाचा पूर्व भारत-तराई भाग, काश्मीरचा भाग, भूतान-सिक्कीमचा नेपाळी ताब्यातील मोठा भूभाग, दार्जिलिंगचा प्रदेश ह्या सर्वांशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. पण सुगौली तहाने हा सर्व भाग इंग्रज राजवटीच्या पंखाखाली आणला असेच नव्हे तर त्याने नेपाळचे लचके तोडले. (स्वगत - मला इथे नकाशे डकवायला कधी जमेल?)

नालापानीत गोरखा सैन्याचा निर्णायक पाडाव केल्यानंतर ब्रिटिशांनी सुगौली तहाची बोलणी चालू केली - आम्हाला फक्त नेपाळमधून तिबेट-चीन-भूतानला जाणाऱ्या व्यापारी मार्गातच रस आहे, बाकी नेपाळच्या प्रदेश आम्हाला नकोच आहे असे भासवून. अर्थातच हे खोटे होते. खरेतर ह्याचवेळी थोडा अधिकचा प्रयत्न करून ब्रिटिश अख्खा नेपाळ सहज गिळंकृत करू शकले असते. त्यांनी तसे केले नाही त्याला दोन खास कारणे आहेत. पहिले महत्वाचे कारण म्हणजे थेट सत्ता राबवायला अतिशय कठीण प्रदेश आणि दुसरे म्हणजे तिबेट आणि चीनच्या राज्यकर्त्यांची भीती. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर अस्थिरता नको असाही विचार ब्रिटिश राजवटीने केला. म्हणूनच नेपाळकडून ब्रिटिशांना स्वतःला हवा तेवढा भूभाग आणि ब्रिटिशांतर्फे लढण्यासाठी नेपाळचे गोरखा सैनिक असे दुहेरी लाभ सुगौली तहाद्वारे मिळवायचे होते. अर्थात त्यांचे ताबडतोबीचे लक्ष्य होते ते काटक आणि शूर गोरखा सैनिक. त्यांना भारतासारख्या प्रचंड मोठ्या प्रदेशावर राज्य करायचे तर सैन्य वाढवायलाच हवे होते.

तर ह्या नेपाळच्या ताब्यात असलेल्या भागांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त भाग ब्रिटिशाना 'नजर आणि कृतज्ञता' म्हणून बहाल करणाऱ्या सुगौलीच्या तहावर नेपाळतर्फे कोणी सही केली असेल तर राजगुरू गिरीराज मिश्र आणि दुभाषी म्हणून त्यांच्यासोबत असलेले चंद्रशेखर उपाध्याय यांनी ! अगदी राजा, पंतप्रधान, सेनापती वगैरे सर्व लोकांना डावलून युद्ध-तहाची एकतर्फी बोलणी (!) करून आणि राज्यकारभाराशी प्रत्यक्ष काही संबंध नसलेल्या ह्या दोघांची नेपाळतर्फे सही घेऊन ब्रिटिशांनी नवी सीमा आखली सुद्धा. ह्यात पूर्ण सिक्कीम, तराईचा प्रदेश, काश्मीरचा काही भाग, गढवाल, कुमाऊ, सिरमूर, असा सर्व भाग ब्रिटिश अमलाखाली घेण्यात आला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ताबडतोब स्वतःच ह्या सीमेला एकतर्फी मान्यता वगैरे देऊन नवा प्रदेश ताब्यात घेऊन ठाणी स्थापन केली. ब्रिटिशांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे काठमांडूच्या राजदरबारात ब्रिटिश एजन्ट नेमण्यात आला. त्याच्या परवानगीशिवाय कुठल्याही विदेशी व्यक्तींना नेपाळप्रवेशास बंदी घालण्यात आली.

हा तह एकतर्फी होता, नेपाळवर अन्याय करणारा होता ह्यात काही वादच नाही. ब्रिटिशांना जे हवे ते सर्व ह्या तहामुळे मिळाले, पण नेपाळचे काय? त्यांना फक्त आश्वासन मिळाले. नेपाळवर आम्ही भविष्यात कधीही आक्रमण करणार नाही, उलट अन्य कोणातर्फे आक्रमण झाल्यास ब्रिटिश सैन्य नेपाळच्या बाजूने उभे राहील असे आश्वासन. एक मात्र झाले, ब्रिटिश सैन्यात गोरखा जवानांना देण्यात येणाऱ्या मानधनापैकी एक मोठा भाग नेपाळ नरेशांच्या तिजोरीत थेट जमा होण्याची व्यवस्था झाली. त्यामुळेच की काय त्यावेळी (आणि नंतरही) कुठल्याही राजाने किंवा त्यांच्यातर्फे काम पाहणाऱ्या काझी - भारदारानी ह्या सुगौली तहाला कसलाही विरोध केला नाही.

जागतिक पातळीवर/ दोन देशांमध्ये जेंव्हा करार-मदार होतात त्यामध्ये एक पुनर्विचार-नूतनीकरणाचे कलम हमखास असते. म्हणजे जेंव्हा चीनकडून ब्रिटिशांनी हाँगकाँग हे बेट ताब्यात घेतले तेव्हा किंवा वसाहतवादी पोर्तुगीजांनी चीनकडून बळेच मकाऊ बेट मिळवले तेंव्हासुध्दा करार करतांना पुढे ९९ वर्षानंतर पुनर्विचार-नूतनीकरण होईल असे कलम होतेच. त्यानुसार ती दोन्ही बेटे कराराचा कालावधी संपल्यानंतर थोड्याफार कटकटींनंतर चीनला परत मिळालीत हे आपण बघितलेच. असे कलम सुगौली तहाच्या मसुद्यात घालायला ब्रिटिश प्रतिनिधी ‘आठवणीनी विसरला’ आणि नेपाळचे नुकसान भविष्यातही कधी भरून येणार नाही ह्याची तजवीज झाली. म्हणूनच नेपाळमधील विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक ह्या सुगौली कराराचे वर्णन 'नेपाळी इतिहासातील सर्वात मोठी अक्षम्य चूक' / unpardonable historic mistake असे करतात.

* * * * * * * * * * *

ब्रिटिश सम्राट पहिल्या जॉर्जचे एक आवडते वाक्य होते - Continuity of life, policy and peace is what a King needs to reign perpetually.

पैकी पहिला मुद्दा म्हणजे राज्यकर्त्या व्यक्तींच्या वयाचा. दीर्घकाळ राज्य करायचे तर दीर्घायुषी असायलाच हवे. नेपाळी शाह कुटुंबातील बहुतेक राजे हे अल्पायुषी ठरले. त्यामुळे परत गादीवर नव्याने येणाऱ्या नेपाळ नरेशाचे वय फार कमी असणे हे ओघानेच आले. अश्यावेळी राजसत्तेचे वाटेकरी वाढतात, दरबारी राजकारणाला ऊत येतो आणि राजाच्या कुटुंबातील वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना स्वतःचे घोडे दामटायला संधी उपलब्ध होते. शाह राजवटीत हे असे खूपदा घडल्याने राजघराण्यातील स्त्रिया, राजाचे गणगोत, काझी, भारदार आणि सामंतांना खूप महत्व आले. अल्पवयीन राजाच्या वतीने बहुदा त्याची सख्खी किंवा सावत्र आई 'मुखत्यार' (regent) म्हणून राज्यकारभार चालवत असे. मग ह्या अल्पवयीन राजाचे लग्न स्वतःच्या मर्जीतील घराण्यात करण्यापासून ते उच्चपदांच्या वाटपात, गोरखा सैन्याने युद्धात जिकंलेल्या संपत्तीच्या आणि प्रदेशाच्या वाटावाटीत असे सगळीकडे अनेक परस्परविरोधी गटांची चढाओढ सुरु झाली. एकमेकांविरुद्ध कट कारस्थाने अगदी शिगेला पोहचली. काही प्रकरणे तर अगदी एकमेकांवर विषप्रयोग करण्याच्या पातळीवर गेलीत.

काठमांडूच्या राजमहालात हे सर्व प्रकार होत असले तरी सीमेवरचे नेपाळी सैन्य मात्र स्वस्थ बसले नव्हते. सुगौलीच्या अपमानास्पद तहाने झालेल्या पीछेहाटीला भरून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. चीनच्या क्विंग राजवटीची तिबेटवरची पकड ढिली पडली आहे असे बघून १८४१ साली ब्रिटिश सैन्याच्या सोबतीने त्यांनी तिबेटवर पुन्हा आक्रमण केले. पण चीनची मदत न घेताच तिबेटी सैन्याने स्वतःच हे आक्रमण परतवून लावले. गोरखा सैन्याचे प्रयत्न पुन्हा वाया गेले.

दरम्यानच्या काळात काठमांडूच्या दरबारात नेपाळ नरेशाचे पद अधिकाधिक शोभेचे होऊन खरी सत्ता पूर्णपणे राजकुळातल्या स्त्रिया आणि दरबाऱ्यांच्या हाती गेली. मोठया सैनिक तुकड्यांची मालकी आणि राजाशी असलेले जवळचे संबंध हीच खरी पात्रता आणि हीच दरबारातली चलनी नाणी. हळूहळू एक वेळ अशी आली की 'मुखत्यार' आणि पंतप्रधानपदाला राजापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले. ह्या राजकीय पोकळीत नेपाळी सैन्याने आपले एक वेगळे, थोडे स्वतंत्र असे स्थान ठळक केले होते. हे चालले असताना १८४५ साल उजाडले होते.

* * *

थोडे अवांतर:

कोणताही देश समजून घ्यायचा तर त्याच्या भूगोलापेक्षा त्याचा इतिहास आणि समाजाची जडण-घडण जाणून घेणे ही एक महत्वाची पायरी असते. आज आपले शेजारी म्हणून जे देश आहेत ते भारताशी थोडे फटकून वागतात, भारताच्या मदतीला अव्हेरतात किंवा त्याची पुरेशी परतफेड करत नाहीत असा जो सार्वत्रिक समज आहे त्याची मुळे बहुतेकदा इतिहासातल्या अनेक घटनांमध्ये असतात / आहेत. भारत-नेपाळ-तिबेट-चीन संबंध हे पुरातन असले तरी इतिहास, अविश्वास आणि गैरसमजाचे बळी आहेत. परस्पर गुंतागुंत कमी की काय म्हणून आपल्या शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांना एक विशेष आयाम आहे तो ब्रिटिश राजवटीचा, त्याच्या अतिरिक्त ऐतिहासिक ओझ्याचा.

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

वाचतोय. पुढील भाग लवकर टाका. नकाशे व इतर फोटो लेखात डकविण्यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.

खूप मस्त चाल्लीय लेखमाला..

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2017 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

अधिकाधिक रोचक होत चालली आहे लेखमाला !

स्वगत - मला इथे नकाशे डकवायला कधी जमेल?

१. त्यासंबधी इथे माहिती मिळेल.

२. ते तंत्र जमेपर्यंत, नकाशांचे / चित्रांचे दुवे (लिंक्स) लेखात अथवा प्रतिसादात टाकल्यास संपादक आणि / किंवा साहित्य संपादक लेखात चित्रे टाकू शकतील.

अनिंद्य's picture

8 Feb 2017 - 2:55 pm | अनिंद्य

आभार!
प्रयत्न करतो.

पैसा's picture

9 Feb 2017 - 4:37 pm | पैसा

सुरेख लिहिताय!

अनिंद्य's picture

11 Feb 2017 - 10:04 pm | अनिंद्य

@ एस, शलभ, डॉ सुहास म्हात्रे, पैसा
वेळोवेळी आपण देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार!
- अनिंद्य

एकुलता एक डॉन's picture

13 Feb 2017 - 9:33 am | एकुलता एक डॉन

अभ्यासपूर्ण लेख
पु ले शु

अनिंद्य's picture

13 Feb 2017 - 5:46 pm | अनिंद्य

आभार !

Nitin Palkar's picture

15 Feb 2017 - 8:52 pm | Nitin Palkar
खूप चांगला गृहपाठ! अतिशय ओघवती शैली. लिहते रहा. पुलेशु!
अमितदादा's picture

18 Feb 2017 - 12:37 am | अमितदादा

अभ्यासपूर्ण लेख..

अनिंद्य's picture

20 Feb 2017 - 11:17 am | अनिंद्य

@ Nitin Palkar, अमितदादा
- आभार!

एकुलता एक डॉन's picture

22 Feb 2017 - 1:01 am | एकुलता एक डॉन

पुढचा भाग टाका राव

अनिंद्य's picture

23 Feb 2017 - 4:58 pm | अनिंद्य

@ एकुलता एक डॉन
- पुढील भाग प्रकाशित केला आहे.