महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

शेजाऱ्याचा डामाडुमा -भारताचे सख्खे शेजारी -एक होते हिंदू राष्ट्र - नेपाळी इतिहासाचा एक धावता आढावा - नेपाळ-२

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
4 Jan 2017 - 5:37 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

एक होते हिंदुराष्ट्र - नेपाळी इतिहासाचा एक धावता आढावा - भाग २

नेपाळ हे नाव घेऊन एकसंध राष्ट्राचे स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी नेपाळी प्रदेशाने अनेक युद्धे, अनेक राजे आणि राजवटी अनुभवल्या आहेत.

नेपाळचा प्रदेश अगदी रामायण-महाभारत काळापासून भारतीयांना ओळखीचा असावा. मिथिलेच्या राज्याची मानसकन्या जनकनंदिनी सीता ही लग्न करून भारतात आलेली आद्य नेपाळकन्या समजली जाते. मिथिलेच्या जनकराजाला ती सध्याच्या नेपाळातील 'जनकपूर' येथे यज्ञाची जमीन नांगरताना सापडली असा उल्लेख रामायणात आहे. राजा जनक हा महाविद्वान राजा होता आणि त्याच्या राज्यात 'रजक (धोबी) आणि 'कुंजर' (भाजीविक्रेते) सुद्धा अस्खलित संस्कृत भाषेत सर्व व्यवहार करत असत असे उल्लेख प्राचीन नेपाळी साहित्यातही आहेत. आजही नेपाळमध्ये जनकपुरचा उल्लेख 'जनकपूरधाम' असा आदरार्थी केला जातो आणि ते नेपाळचे संस्कृत अध्ययन-अध्यापनाचे केंद्र आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी 'मतातीर्थ' नावाची राजधानी असलेल्या शिवभक्त 'किरात' किंवा 'किरांत' राज्यांचा उल्लेख महाभारतात आहे. पांडव समर्थक सात्यकी राजाच्या मुखी असलेल्या संवादात 'युद्धापूर्वी अर्जुनाच्या बाजूने लढायला निघालेली ७०० विक्राळ हत्ती आणि अमाप धनुर्धारी वीर असलेली' किरात सेना ऐनवेळी पक्षबदल करून कौरवांच्या बाजूने लढली असे वर्णन आहे. प्राग्ज्योतिष (सध्याचे आसाम) चा राजा भगदत्तच्या 'एक औक्षहणी' सैन्यात बहुसंख्येने असलेल्या काटक किरातांना युद्धात हरवणे महाकठीण असल्याचे संवाद अन्य पांडव समर्थक राजांच्या तोंडी आहेत.

अनन्य शिवभक्त असलेल्या याच किरात राजांपैकी एक राजा (बहुदा यालांबर) हा प्रत्यक्ष देवराज इंद्राला भेटायला सदेह स्वर्गात जाऊन आला असल्याची वर्णने पाली आणि नेपाळी लोकसाहित्यात आहेत. ह्या भेटीची आठवण म्हणून आजही नेपाळमध्ये 'इंद्र जात्रा' नावाचा सण दरवर्षी प्रचंड उत्साहात साजरा केला जातो.

पण ही झाली लोकस्मृती आणि पुराणग्रंथातली माहिती.

इतिहासाला ठाऊक असलेली पहिली नेपाळी राजवट होती गवळी/गोपालक असलेल्या 'गोपाळ' राज्यकर्त्यांची. नंतर 'अहिर' राज्यकर्ते नेपाळवर काबीज झालेत, हे अहिर राजे स्वतःला 'यदुवंशी' आणि भगवान श्रीकृष्णाचे वंशज म्हणवत. ह्या दोन्ही राज्यकर्त्या घराण्यांबद्दल फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.

मग आलेत किरात किंवा किरांत राजे. नेपाळच्या ज्ञात इतिहासात किरातांच्या काळाबद्दल मतांतरे आहेत पण बहुतांश विद्वानांमध्ये किरात राज्यकर्त्यानी नेपाळच्या भूमीवर जवळपास १२०० वर्षे सलग निर्वेध राज्य केले ह्याबद्दल एकमत आहे. मग आले अल्पजीवी 'सोम' राजघराणे आणि तदनंतर चौथ्या शतकात नेपाळच्या सुवर्णकाळाचे शिल्पकार 'लिच्छवी' साम्राज्य स्थापन झाले. नेपाळची समृद्धी वर्धिष्णू झाली ती ह्याच लिच्छवी काळात.

लिच्छवी राजा अंशुवर्माने तिबेट आणि पुढे चीनपर्यंत व्यापारी मार्ग शोधला आणि भरभराटीस आणला. व्यापार हेच राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे ह्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणून 'ट्रेड डिप्लोमसी' वगैरे शब्द आंतरराष्ट्रीय संबंधात प्रचलित नव्हते तेंव्हा त्याने राजकोषातील धन वापरून व्यापाऱ्यांना कर्जे, कर्ज-हमी, सुरक्षा रक्षक, याक आणि घोडे, राजाज्ञा पत्रे अशी सर्व मदत करून स्वतःच्या राज्याची भरभराट घडवून आणली. त्याकाळी जवळपास सर्व राज्यकर्त्यांचे प्रमुख उत्पन्न हे शासकीय करवसुली आणि युद्धात जिकंलेले धन एवढ्याच मार्गाने यायचे. राजाने स्वतः पुढाकार घेऊन नवीन व्यापारासाठी मार्ग शोधणे, व्यापारासाठी सुरक्षित रस्ते-चौक्या बांधणे आणि स्वतःकडे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि ट्रेड फायनान्सर (मराठी प्रतिशब्द सुचवा) वगैरे जबाबदारी घेणे जगाच्या ह्या भागात नवीन होते. (म्हणजे स्पेन, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि काही प्रमाणात अरब-रोमन राजवटी ह्या व्यापाऱ्यांना व्यापार मोहिमेसाठी वगैरे सरकारी/ स्वतःचे पैसे कर्जाऊ देत असत पण त्यापुढे फारश्या जात नसत. आपल्या उपखंडात हे प्रमाण अगदीच नगण्य होते) ह्या अंशुवर्माची कन्या 'भृकुटी' त्याच्या एक पाऊल पुढे होती, अगदी धाडसी आणि व्यापारनिपुण. अश्याच एका व्यापारी दलाची प्रमुख म्हणून तिबेटला गेली आणि तिने तिबेटच्या तत्कालीन सम्राटांशी लग्न केले. तिनेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध धर्म नेला असे मानतात. तिबेटमध्ये तिच्या सन्मानार्थ मंदिरे आणि गोम्पा बांधले आहेत. त्यापैकी काही आजही सुस्थितीत आहेत.

तर पार सातव्या शतकात तुटपुंज्या साधनांनिशी अवाढव्य हिमालय ओलांडून पलीकडच्या लोकांशी राजकीय-व्यापारी संबंध स्थापित करणारा अंशुवर्मा पहिला राज्यकर्ता ठरला आणि भृकुटीचे लग्न ठरले नेपाळ-तिबेट-चीन संबंधांची पहिली पायरी !

पुढे यथावकाश समृद्ध लिच्छवी साम्राज्य अंतर्गत यादवीमुळे खिळखिळे होत असताना उदय झाला तो 'मल्ल' सम्राटांचा. मल्ल राजांची प्रदीर्घ राजवट साधारण इसवी ११०० ते १७७० पर्यंत मानली जाते. जवळपास सर्वच मल्ल राजे युद्धनिपुण वीर, धुरंधर राजकारणी, कलाप्रिय रसिक आणि विद्वान होते. त्यांच्या काळात नेपाळ वैभवाच्या शिखरावर होता. ह्या सात-आठशे वर्षांच्या प्रदीर्घ मल्ल राजवटीला नेपाळचा दुसरा सुवर्णकाळ म्हणता येईल. १२२५ चा महाविनाशकारी भूकंप आणि १३४५ चे बंगालच्या सुलतान शमसुद्दीनने नेपाळवर केलेले आक्रमण ह्या दोन घटना वगळता मल्लकाळ हा बहुतांशी युद्धरहित आणि भरभराटीचा काळ होता. मल्ल राज्यांनी लिच्छवी राज्यांप्रमाणेच व्यापारउदीमाला भरघोस प्रोत्साहन आणि कलागुणांना उदार आश्रय दिल्यामुळे नेपाळचे वैभव वृद्धिंगत झाले आणि नेपाळी कलासंस्कृती बहरली. 'नेवार' शैलीतील अप्रतिम कलाकुसर असलेली अनेकमजली भव्य मंदिरे, राजवाडे आणि स्तूप राज्यभर उभे राहिले. आजही नेपाळमध्ये हे पुरातन वैभव काही प्रमाणात टिकून आहे. (मागच्या वर्षी झालेल्या विनाशकारी भूकंपात यातील अनेक देखण्या वास्तूंची बरीच पडझड झाली आहे)

पण सर्व वैभवशाली साम्राज्यांना असलेला शाप मल्लांना कसा चुकेल? त्यामुळे पुढे मल्ल साम्राज्य अंतर्गत भांडणे, ईर्षा आणि भाऊबंदकीला बळी पडून काठमांडू, भक्तपुर आणि ललितपुर अश्या छोट्या राज्यात विभागले गेले. राज्याच्या सीमांत प्रदेशातील अनेक छोट्या मांडलिक राज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले आणि मल्लांच्या शक्तीचा ऱ्हास सुरु झाला. राजकारणनिपुण अशी ओळख असलेले मल्ल राजे स्वतःच्या छोट्या छोट्या राज्यातील हेवेदावे आणि एकमेकांविरुद्ध युद्धात गुंतून पडले होते त्याचवेळी राजकीय पटलावर उदय होत होता तो नंतर अखंड नेपाळचे जनक गणल्या जाणाया पृथ्वीनारायण शाह ह्यांचा!

थोडे अवांतर:

एक गोष्ट एव्हाना तुमच्या लक्षात आलीच असेल. नेपाळला 'लोकशाही' किंवा 'गणतंत्राचा' फारसा इतिहास नाही. अगदी पूर्वापार एकछत्री साम्राज्य आणि अनिर्बध सत्ता राबवणारी राजेशाहीच कायम ह्या देशात होती. अर्थात इतर अनेक देशांप्रमाणे काही प्रजाहितदक्ष राजे नेपाळलाही लाभलेत, पण अगदी अलीकडे, म्हणजे १९५१ मध्ये भारताच्या सक्रिय समर्थनाने पहिला 'मर्यादित' लोकशाहीचा प्रयोग घडेपर्यंत नेपाळी जनतेला 'लोकशाही' म्हणजे काय हे फारसे माहिती नव्हते. एक सक्षम-स्थिर-टिकावू लोकशाही राज्य स्थापन करण्यात आज नेपाळला पुन्हा पुन्हा येणाऱ्या अनेक अडचणीचे मूळ नेपाळच्या ह्या इतिहासात तर नसेल?

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

लेखहे ठिकाण

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

4 Jan 2017 - 8:16 pm | राघवेंद्र

सुंदर लेखमाला !!!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

एस's picture

4 Jan 2017 - 8:31 pm | एस

पुभाप्र.

Nitin Palkar's picture

13 Jan 2017 - 8:58 pm | Nitin Palkar

पुभाप्र.

अनन्त अवधुत's picture

4 Jan 2017 - 10:26 pm | अनन्त अवधुत

पुभाप्र

पिलीयन रायडर's picture

4 Jan 2017 - 10:58 pm | पिलीयन रायडर

फारच उत्तम लेखमाला आहे ही. शिफारस मध्ये टाकायला हवी संमंने.

रघुनाथ.केरकर's picture

5 Jan 2017 - 11:01 am | रघुनाथ.केरकर

पि.रा यांचेशी सहमत.
ह्या लेखमालेची शिफारस व्हायला हवी.

संपादक मंड्ळ कृपया दखल घ्यावी

पैलवान's picture

5 Jan 2017 - 12:24 pm | पैलवान

+१ आणुमोदन!

अनिंद्य's picture

5 Jan 2017 - 9:53 am | अनिंद्य

@ राघव८२, एस, अनन्त अवधुत, पिलीयन रायडर - उत्साह वाढवलात, आभार!

@ पिलीयन रायडर
फारच उत्तम लेखमाला आहे ही. शिफारस मध्ये टाकायला हवी संमंने.
- म्हणजे काय?

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2017 - 11:14 pm | पिलीयन रायडर

अहो स्वगृह मध्ये गेलं की समोर शिफारस टेबल दिसतोय ना, त्यात चांगले लेख देतात संपादक मंडळ. त्यात हा असायला हवा असे माझे मत! वेगळा विषय आहे. मिपावर येणार्‍या नव्या माणसाने वाचायला हवा. :)

फारच उत्तम लेखमाला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2017 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चालली आहे लेखमाला ! नेपाळचा इतिहास आणि त्याच्या भारताशी गुंफलेल्या कड्या समजत आहेत. पुभाप्र.


पाळला 'लोकशाही' किंवा 'गणतंत्राचा' फारसा इतिहास नाही. अगदी पूर्वापार एकछत्री साम्राज्य आणि अनिर्बध सत्ता राबवणारी राजेशाहीच कायम ह्या देशात होती. अर्थात इतर अनेक देशांप्रमाणे काही प्रजाहितदक्ष राजे नेपाळलाही लाभलेत, पण अगदी अलीकडे, म्हणजे १९५१ मध्ये भारताच्या सक्रिय समर्थनाने पहिला 'मर्यादित' लोकशाहीचा प्रयोग घडेपर्यंत नेपाळी जनतेला 'लोकशाही' म्हणजे काय हे फारसे माहिती नव्हते. एक सक्षम-स्थिर-टिकावू लोकशाही राज्य स्थापन करण्यात आज नेपाळला पुन्हा पुन्हा येणाऱ्या अनेक अडचणीचे मूळ नेपाळच्या ह्या इतिहासात तर नसेल?

आपल्याला तरी कुठे असा इतिहास होता? इंग्रज येईपर्यंत विविध प्रकारच्या राजेशाह्या (दिल्लीची शाही, त्याखाली एखादी नावापुरती स्थानिक राजवट, गावपातळीवर स्थानिक पाटील्/देशमुख्/सरदार मंडळींचा कारभार, इत्यादी. ब्रिटीश काळातही ब्रिटीश+संस्थानिक असा दुहेरी राज्यकारभार होता.
ब्रिटीशकाळात निवडणुका होत असत, पण त्यांचा स्कोप अगदी खेडोपाडी पसरलेला असेल, असा वाटत नाही. शिवाय त्यातून राज्यकर्ते निवडले जात नसत. केवळ राज्यकर्त्यापर्यंत 'मोजक्या' लोकांचा आवाज पोहचवणारे प्रतिनिधी निवडले जात. (त्या आवाजाचा 'राज्यकर्त्यांवर' कितपत परिणाम होत असेल, काय माहिती?)
त्यामुळे 'एक देश', लोकांनी 'राज्यकर्त्यांना' निवडून देणं, त्या प्रक्रियेत दिल्लीतील चांदणी चौकापासून ते परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ढेंगळी-पिंपळगाव मधील लोकांचा सहभाग असेल, हे 'आपल्यालाही' नवीन होतं. तरी भारतीय जनतेने ते बर्‍यापैकी स्वीकारलं. व रुजवलं.
(इतरही बरेच बदल भारतीय जनतेने बर्‍यापैकी सहजपणे पचवले व रुजवले : उदा नाण्यांची दशमान पद्धती)

त्यामुळे नेपाळला 'लोकशाही' संबंधित पुन्हा पुन्हा येणार्‍या अडचणींचे मूळ राजेशाहीत/लोकशाहीच्या अभावात नसून, दुसरे काहीतरी कारण असावे, असं मला वाटतं.

अवांतर : ही मिपावरील विशेष उल्लेखनीय लेखमालांपैकी एक असणार आहे. लगे रहो!

अनिंद्य's picture

6 Jan 2017 - 4:33 pm | अनिंद्य

@ पैलवान,

तुमचा मुद्दा अगदी तर्कसंगत आहे, पण लोकशाहीचे हे भारतीय मॉडेल थोडे अलीकडच्या इतिहासातले आहे. प्राचीन भारतात चित्र थोडे वेगळे होते. भारतात, विशेषतः उत्तर-पश्चिम भारतात अनेक 'गणराज्ये' होती. म्हणजे राज्यकर्ता लोकांच्या निवड प्रक्रियेतून ठरायचा. थेट पाणिनी आणि कौटिल्याच्या लेखनात गणराज्ये - राजा नसलेली लोकराज्ये - लोकांचे स्वशासन असलेली जनपदे इ. - बद्दल उल्लेख आहेत. उदा.- 'मरुत देशी प्रत्येक माणूस राजा आहे पण त्यांच्या जनपदाला राजाच नाही'

तसेच कपिलवस्तूचे शाक्य, सध्याच्या गुजरात प्रदेशातील यादव, वैशालीचे वैभवी गणराज्य, रामागम, पव, पांचाल, कंभोज, सध्याच्या बिहार-ओरिसा भागात असलेले वज्जण/वज्जैन गणराज्य, पुरु राजाला हरवण्याआधी अलेक्झांडरच्या नाकी नऊ आणणारे मल्ल गणराज्य, ईशान्य भारतात स्त्री-पुरुष दोघांना नेता निवडीचे अधिकार असलेली स्वयंभू लोकराज्ये, मध्य भारतात असलेली स्वतंत्र आदिवासी लोकराज्ये असा थोडातरी लोकशाही इतिहास भारताला आहे. अर्थात भारताचे एकूण आकारमान बघता ह्या गणराज्यांचे प्रभावक्षेत्र फार नाही आणि सलग लोकशासित राजवटी फार नाहीत हे खरेच.

भारतीयांचे सहजपणे बदल स्वीकारणे/पचवणे आणि एकूणच भारतीय जनतेची प्रगल्भता ह्याबद्दल तुमचे आकलन अचूक आहे. अन्यथा इतकी प्रचंड विविधता असताना एक लोकशाही देश म्हणून कारभार कठीण :-)

विस्तृत प्रतिक्रिया दिलीत, विशेष आभार!

एकुलता एक डॉन's picture

12 Feb 2017 - 11:34 pm | एकुलता एक डॉन

म्हणजे लोकशाहीची सुरुवात आपल्याकडे झाली ?

अनिंद्य's picture

13 Feb 2017 - 11:55 am | अनिंद्य

@ एकुलता एक डॉन

तसे मी म्हणत नाही, लोकशाहीचा थोडातरी इतिहास भारताला आहे हे मात्र खरे.

सुबोध खरे's picture

15 Feb 2017 - 11:34 am | सुबोध खरे

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ढेंगळी-पिंपळगाव मधील लोकांचा सहभाग असेल
पैलवान साहेब
तुम्हाला हे "ढेंगळी-पिंपळगाव" कसे हो माहित? तुम्ही तिकडचेच काय?
आमच्या सासर्यांचे ते गाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव "शंकरराव जोशी" तेथे त्यांचे बालपण गेले. त्यांची शेती तेथे अजून आहे.

पैलवान's picture

15 Feb 2017 - 5:19 pm | पैलवान

जग खरंच खूप लहान आहे!!!
लोकशाहीच्या उदाहरणासाठी मला एक छोटं गाव हवं होतं , मि गूगल मॅप मध्ये रॅण्डमली झूम केलं आणि महाराष्ट्राच्या साधारण मध्ये हे गाव सापडलं आणि मला ते नाव या उदाहरणासाठी परफेक्ट वाटलं !
केवळ योगायोग, बाकी काही नाही. :)

सुबोध खरे's picture

15 Feb 2017 - 6:33 pm | सुबोध खरे

काय हा योगायोग

सूड's picture

5 Jan 2017 - 8:36 pm | सूड

वाचतोय, पुभाप्र

माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या आवडीचा विषय तुम्ही मांडताय....लेख खूपच आवडला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे....शुभस्य शीघ्रम।

माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या आवडीचा विषय तुम्ही मांडताय....लेख खूपच आवडला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे....शुभस्य शीघ्रम।

समीर वैद्य's picture

5 Jan 2017 - 10:17 pm | समीर वैद्य

अतिशय उत्तम माहिती देणारा लेख. पुभाप्र....

व्हेंचर कॅपिटॅलिस्ट: "साहसी भांडवलदार" किंवा "उपक्रम भांडवलदार" म्हणता येईल
ट्रेड फायनान्सर : "व्यापारी भांडवल पुरवठादार" असे म्हणता येईल.

समीर वैद्य's picture

5 Jan 2017 - 10:17 pm | समीर वैद्य

अतिशय उत्तम माहिती देणारा लेख. पुभाप्र....

व्हेंचर कॅपिटॅलिस्ट: "साहसी भांडवलदार" किंवा "उपक्रम भांडवलदार" म्हणता येईल
ट्रेड फायनान्सर : "व्यापारी भांडवल पुरवठादार" असे म्हणता येईल.

sanket kulkarni's picture

5 Jan 2017 - 10:17 pm | sanket kulkarni

माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या आवडीचा विषय तुम्ही मांडताय....लेख खूपच आवडला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे....शुभस्य शीघ्रम।

sanket kulkarni's picture

5 Jan 2017 - 10:18 pm | sanket kulkarni

माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या आवडीचा विषय तुम्ही मांडताय....लेख खूपच आवडला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे....शुभस्य शीघ्रम।

समीर वैद्य's picture

5 Jan 2017 - 10:18 pm | समीर वैद्य

अतिशय उत्तम माहिती देणारा लेख. पुभाप्र....

व्हेंचर कॅपिटॅलिस्ट: "साहसी भांडवलदार" किंवा "उपक्रम भांडवलदार" म्हणता येईल
ट्रेड फायनान्सर : "व्यापारी भांडवल पुरवठादार" असे म्हणता येईल.

समीर वैद्य's picture

5 Jan 2017 - 10:18 pm | समीर वैद्य

अतिशय उत्तम माहिती देणारा लेख. पुभाप्र....

व्हेंचर कॅपिटॅलिस्ट: "साहसी भांडवलदार" किंवा "उपक्रम भांडवलदार" म्हणता येईल
ट्रेड फायनान्सर : "व्यापारी भांडवल पुरवठादार" असे म्हणता येईल.

डॉबरमॅन's picture

5 Jan 2017 - 10:23 pm | डॉबरमॅन
अनिंद्य's picture

6 Jan 2017 - 4:18 pm | अनिंद्य

@ रघुनाथ.केरकर, पैलवान, सौरा, डॉ सुहास म्हात्रे, सूड, sanket kulkarni, समीर वैद्य, डॉबरमॅन
- मालिका आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, आभार!

@ समीर वैद्य
- प्रतिशब्द सुचवल्याबद्दल आभार, अधिक सुटसुटीत / समर्पक पर्यायांच्या प्रतीक्षेत :-)

@ पिलीयन रायडर
- :-)

फारच सुंदर लेखमाला !!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!

सुखीमाणूस's picture

11 Jan 2017 - 8:21 pm | सुखीमाणूस

पुढचा भाग लवकर येउदे!!

अनिंद्य's picture

19 Jan 2017 - 12:41 pm | अनिंद्य

@ ज्ञान, सुखीमाणूस - आभार !
पुढील दोन भाग प्रकाशित केले आहेत.

पैसा's picture

20 Jan 2017 - 11:00 am | पैसा

अतिशय सुरेख! फारच मेहनतीने माहितीपूर्ण असे लिहिता आहात.

अनिंद्य's picture

23 Jan 2017 - 11:35 am | अनिंद्य

@ पैसा,
आभार.
मला तुमचे सदस्यनाम फारच आवडले आहे :-)

पैसा's picture

23 Jan 2017 - 1:16 pm | पैसा

=)) धन्यवाद!

आज उत्सुकता म्हणून बघितले तर साधारण २० दिवसात लेखमालेची सुमारे १९ हजार वाचने !
मिपावर माझ्या पहिल्याच लेखन-प्रयत्नाला उत्साही प्रतिसादाबद्दल वाचकांचे मनापासून आभार.

दीपक११७७'s picture

24 May 2017 - 7:04 pm | दीपक११७७

हे यश तुमच्या मेहनत व लेखनीची कमाल आहे.
खुप महीती पुर्ण आहे लेख मला वचतोय पुढचे भाग.

अतिशय अभ्यासपूर्ण लेखमाला. खुप आवडली.

रुपी's picture

26 May 2017 - 4:41 am | रुपी

+१

अनिंद्य's picture

29 May 2017 - 11:08 am | अनिंद्य

@ दीपक११७७
@ सौरा
@ रुपी

आभार.

पिशी अबोली's picture

28 Jun 2017 - 5:02 pm | पिशी अबोली

फारच भारी. एकदाची वाचायला सुरुवात झाली बुवा. आता सगळं वाचून काढते..

अनिंद्य's picture

29 Jun 2017 - 7:58 am | अनिंद्य

@ पिशी अबोली,
आभार.