अरेरे, विक्रांत चालली भंगारात

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
5 Dec 2013 - 10:25 am

इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता. त्यावरून या म्हणीची आठवण झाली.
Vikrant Ship

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर १९६१ मध्ये या विमानवाहू नौकेचा समावेश भारतीय नौदलात दिमाखाने झाला होता. त्या वेळी मी कॉलेजमध्ये शिकायला सुरुवात केली होती. पण विक्रांतचे आगमन ही एक खूप मोठी घटना होती आणि तिचा प्रचंड गाजावाजा झाला होता हे अजून आठवते. दस्तुरखुद्द पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी या समारंभाला हजेरी लावली होती यावरून त्याला केवढे महत्व दिले गेले होते हे लक्षात येईल. या युद्धनौकेला ठेवलेले 'विक्रांत' हे नावही तेंव्हापासूनच कायमचे स्मरणात घर करून राहिले आहे. ही आगबोट इंग्लंडमधून आणली गेली होती आणि तिचे आय एन एस विक्रांत असे नामकरण व्हायच्या आधी तिला एचएमएस हर्क्युलस असे नाव होते असेही वाचले होते. त्यामुळे तिला बहुधा ब्रिटिश नेव्हीमधून त्यांच्या स्टँडर्डनुसार निरुपयोगी झाल्यामुळे रिटायर केल्यानंतर भारताच्या गळ्यात बांधले गेले असेल किंवा कदाचित तात्पुरते औदार्य दाखवून पुढे त्याचे स्पेअर्स वगैरेंचा व्यवहार करण्यासाठी बहाल केली असेल अशी अनेकांची कल्पना झाली होती. तो काळच असा होता की आधुनिक काळातली फारच कमी यांत्रिक उत्पादने भारतात होत असत आणि जी काही होत असत त्यातली बहुतेक उत्पादने परकीयांच्या सहाय्याने कोलॅबोरेशनमध्ये होत असत. येनकेनप्रकारेण काही तरी चांगल्या उपयोगी वस्तू पदरात पाडून घेणे एवढेच खूष होण्यासाठी त्या काळात पुरेसे असायचे. संरक्षण खात्याच्या सर्वच व्यवहारात कमालीची गुप्तता राखली जात असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या तोफा, रणगाडे, विमाने, आगबोटी वगैरेंच्या खरेदीच्या बाबतीत उघडपणे चर्चा होतही नसत आणि झाल्या तरी त्या समजून घेण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. त्यामुळे ही जुनी आठवण वर लिहिल्याइतपतच स्पष्ट होती. या आगबोटीवर विमाने ठेवलेली असतात आणि त्यांना हवेत उडवण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी धावपट्ट्या (रनवे) तयार केलेल्या असतात यावरून तिच्या अवाढव्य आकाराची पुसटशी कल्पना येत होती. तोपावेतो मी कुठलेच विमानही पाहिलेले नसल्यामुळे ती कल्पनासुद्धा तशी धूसरच होती. नंतरच्या काळात अनेक वेळा बातम्यांमध्ये विक्रांतचे नाव आले आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत गेली.

या नौकेचा भारतात येण्यापूर्वीचा इतिहाससुद्धा मनोरंजक आहे. १९४३ साली म्हणजे दुसरे महायुद्ध जोरात चाललेले असतांना इंग्लंडमधल्या एका प्रसिद्ध कारखान्यात या नौकेची बांधणी सुरू झाली. त्या महायुद्धात नौदल आणि विमानदलांनी खूप महत्याची कामगिरी बजावली होती. ते युद्ध फक्त युरोपच्याच भूमीवर नव्हे तर इतर खंडांमध्ये तसेच महासागरांमध्येसुद्धा लढले जात होते. विमानवाहू जहाज समुद्रात दूर नेता येते आणि तिथून शत्रूवर हवाई हल्ला करता येतो अशा दुहेरी सागरी युद्धासाठीच या खास प्रकारच्या आगबोटीची रचना केली होती. पण ऑगस्ट १९४५ मध्ये हे महायुद्ध संपले आणि ही बोट सप्टेंबर १९४५ मध्ये तयार झाली. तोपर्यंत युद्ध संपलेले होते आणि त्यात इंग्लंड विजयी झाले असले तरी त्या देशाची आर्थिक स्थिती खस्ता झाली होती. मनुष्यबळ खच्ची झाले होते. ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नाही अशी प्रौढी इंग्रज लोक मारत असत ते पंचखंडात अस्ताव्यस्त पसरलेले साम्राज्य सांभाळणे त्यांना अशक्य झाले होते. यानंतर एका पाठोपाठ एक करून बहुतेक सगळ्या देशांना स्वातंत्र्य देणे भाग पडणार आहे याची स्पष्ट कल्पना आली होती. तसे होणार असेल तर विस्तारलेले साम्राज्य सांभाळण्यासाठी उभे केलेले अवाढव्य आरमार उगाचच कशाला ठेवायचे? असा सूज्ञ विचार करून तशा प्रकारचे धोरण आखले गेले. यामुळे एचएमएस हर्क्युलस असे नाव ठेवले गेल्यानंतरसुद्धा या बोटीला शस्त्रसज्ज करण्याची कारवाई केली गेलीच नाही. १९४६ साली तिला गुपचुप आडबाजूला नेऊन ठेऊन दिले गेले.

मोठ्या युद्धनौकांची बांधणी हे सुद्धा अचाट काम असते. ही जहाजे हजारो टन वजनाची आणि प्रचंड आकाराची असतात. सर्वसाधारण आकाराच्या कारखान्यात हे काम करता येत नाही. जहाजबांधणी करता येण्याजोग्या विशाल कारखान्यांना सुकी गोदी (ड्राय डॉक) असे म्हणतात. समुद्राच्या किंवा मोठ्या नदीच्या किना-यावर उभारलेल्या एका सुक्या गोदीत आधी जहाजाचा सांगाडा (स्ट्रक्चर) रचून उभा करतात. विशिष्ट प्रकारच्या पोलादाच्या जाड प्लेट्सचे शेकडो तुकडे विशिष्ट आकारांमध्ये कापून आणि त्यांना हवा तेवढाच बाक देऊन जोडणीसाठी तयार करतात. हे सगळे तुकडे एकमेकांना आणि त्या सांगाड्याला वेल्डिंग करून जोडतात. सगळ्या भागांची जोडणी आणि निरीक्षण (इन्स्पेक्शन) पूर्ण झाल्यावर त्या रिकाम्या जहाजाला हळूहळू पाण्यात ढकलत नेतात. याला लाँच करणे म्हणतात. हा पहिला महत्वाचा टप्पा असतो. त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ती बोट खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात सुद्धा सुरक्षितपणे चालू शकेल याची खात्री करून झाल्यानंतर तिला पुन्हा ड्राय डॉकमध्ये नेऊन तिच्यावर यंत्रसामुग्री, शस्त्रास्त्रे वगैरे चढवतात. समुद्रात गेल्यानंतर त्या नौकेला महिनोंमहिने तिथे काढायचे असतात. त्या कालखंडात त्या नावेवर काम करणा-या खलाशांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नौका चालवण्याची यंत्रसामुग्री, हल्ला किंवा बचाव करण्यासाठी ठेवलेल्या शस्त्रास्त्रांना चालवण्याची यंत्रणा आणि खलांशांना रहाण्याच्या द़ष्टीने ठेवलेल्या सुखसोयी या सगळ्या गोष्टी नीटपणे चालवून त्या व्यवस्थितपणे चालतात की नाही हे तपशीलवार पहावे लागते. त्यात ज्या बारीक सारीक त्रुटी आढळतात त्यांना दूर करणे आवश्यक असते. हे काम जिकीरीचे आणि वेळ खाणारे असते. याला कमिशनिंग म्हणतात. एचएमएस हर्क्युलस लाँच झाली असली तरी तिचे कमिशनिंग झालेले नव्हते.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काळात भारतावर ब्रिटीशांची सत्ता असतांना त्यावर समुद्रमार्गे आक्रमण होण्याची शक्यता शून्याच्या जवळपास होती. त्यामुळे ब्रिटीश इंडिया सरकारला फार मोठी नेव्ही बाळगण्याची आवश्यकता नव्हती. व्यापारी किंवा प्रवाशांची वाहतूक करणा-या जहाजांना समुद्री चांच्यां(पायरेट्स)पासून संरक्षण देणे एवढीच गरज त्या काळात होती. पण स्वतंत्र भारताला मात्र संरक्षणाच्या सर्वच बाबतीत सुसज्ज होणे अत्यंत आवश्यक होते. त्या दृष्टीने नियोजन करतांना आरमारासाठी एक विमानवाहू जहाज घ्यायचे ठरवले गेले. त्याबद्दल विचारविनिमय, वाटाघाटी वगैरे होऊन १९५७ साली ब्रिटनबरोबर एचएमएस हर्क्युलसच्या खरेदीचा करार करण्यात आला. दहा अकरा वर्षे नुसत्या पडून राहिलेल्या या जहाजाला पुन्हा सुसज्ज करून आणि त्यात काही आवश्यक अशा सुधारणा (मॉडिफिकेशन्स) करून त्या बोटीचे कमिशनिंग करणे, त्यावर अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवणे, त्यावर ठेवण्यासाठी योग्य आणि सक्षम अशी विमाने निवडून त्यांची खरेदी करणे, या सगळ्यांची कसून चाचणी घेऊन पाहणे, तंत्रज्ञांचे आणि कामगारांचे प्रशिक्षण वगैरे करण्यात आणखी तीन चार वर्षांचा कालावधी लागला. मार्च १९६१ मध्ये सगळे काम पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमधील भारताच्या त्याकाळच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांना ती सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर आवश्यक अशा इतर बाबी पूर्ण करून आणखी काही महिन्यानंतर तिचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला.

हे अवाढव्य आकाराचे जहाज तब्बल २१३ मीटर लांब, ३९ मीटर रुंद आणि सात मीटर उंच (किंवा खोल) असून त्याचे पूर्ण वजन (फुल लोड) १९,५०० टन इतके होऊ शकते. यावरून अंदाज येईल. ४०००० अश्वशक्ती किंवा ३० मेगावॉट (३०००० किलोवॉट) इतक्या शक्तीची दोन टर्बाइन्स त्यावर बसवलेली असून त्यांना वाफेचा पुरवठा करणारे चार बॉयलर्स ठेवलेले आहेत. चार प्रकारची अनेक विमाने या जहाजावर ठेवली जात होतीच. शिवाय बारा मोठमोठ्या तोफा आणि दारूगोळ्याचा भरपूर साठा त्यावर ठेवलेला असे. १००० पासून १३०० पर्यंत नौसैनिक या जंबो जहाजावर तैनात केले जात.

पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धांमध्ये आय एन एस विक्रांतने अत्यंत महत्वाची कामगिरी केली आणि नावाला जागून विजय मिळवून दिला. पूर्व पाकिस्तानच्या (आताच्या बांग्लादेशातल्या) नेव्हीचा पुरा बीमोड केलाच, तिथल्या बंदरांची नाकेबंदी करून बाहेरून कसल्याही प्रकारची मदत मिळणे अशक्य करून ठेवले होते. काळाबरोबर नव्या प्रकारच्या अधिक शक्तीशाली आणि वेगवान विमानांची गरज पडली. त्यांचा उपयोग करता येणे शक्य व्हावे यासाठी विक्रांतमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या. तिची जुनी झालेली इंजिने काढून त्यांच्या जागी चांगली नवी इंजिने बसवली गेली. असे करत करत आणखी पंधरा वीस वर्षे गेल्यानंतर मात्र या जहाजाचा वृद्धापकाळ सुरू झाला. त्यानंतर तिची डागडुजी होत राहिली असली तरी तिला खोल समुद्रात दूरवर पाठवणे धोक्याचे वाटायला लागले.

१९८७ साली एचएमएस हर्मिस ही विक्रांतहून मोठी विमानवाहू आगबोट खरेदी करून तिचे नाव विराट असे ठेवले गेले आणि विक्रांतला हळूहळू बाजूला करण्यात येऊन १९९७ मध्ये तिला नेव्हीच्या सेवेमधून मुक्त करण्यात आले. त्यानंतर या जहाजाचे काय करायचे हा प्रश्न गेली सोळा वर्षे विचाराधीन आहे. तिचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाय़ी करावा असा एक विचार होता, तर त्या जहाजाचे रूपांतर सागरी वस्तुसंग्रहालयात (म्यूजियममध्ये) करावे हा विचार जवळ जवळ पक्का झाला होता. पण प्रदर्शनाचे काम नेव्हीच्या अखत्यारात येत नाही. ते राज्य सरकार करू शकते. पण एवढे अवाढव्य जहाज कुठे ठेवायचे? ते पहायला जाणा-या पर्यटकांना तिथे कसे न्यायचे? किती लोकांना ते पहायची उत्सुकता असेल? आणि ते म्यूजियम चालवायला येणारा खर्च कसा भागवायचा? वगैरे प्रश्न समाधानकारक रीतीने न सुटल्यामुळे त्यातले काहीच यशस्वी रीतीने होऊ शकले नाही. या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही. भारतातील एकादी खाजगी संस्था किंवा व्यक्ती ही कला आत्मसात करून घेईल आणि विक्रांतचे रूपांतर आकर्षक अशा प्रदर्शनात करेल अशी एक आशा अजूनही वाटते.
Vikrant Museum

निकामी पडलेले जहाज आणि तिच्यावरील यंत्रसामुग्री यांचेसुद्धा मेन्टेनन्स तर करावे लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ आणि पैसे खर्च होतात. "हा पांढरा हत्ती असाच पोसत राहणे आता आपल्याला शक्य नाही." असे सांगून नौदलाने आपले हात झटकले आहेत आणि म्हाता-या झालेल्या विक्रांतचा आता नाइलाजास्तव भंगार म्हणून लिलाव करण्यात येत आहे. तिला खरेदी करण्यासाठी कोणती गि-हाइके बोली लावणार आहेत? विकत घेतल्यानंतर ते तिला बाळगणार आणि जपणार आहेत की तिची तोडफोड करून त्यातले पोलाद वितळवून वापरणार आहेत? एके काळी भारताचा मानदंड असलेली ही नौका परदेशातला कोणी व्यापारी विकत घेऊन दुसरीकडे घेऊन जाणार आहे का? की ही नौका वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने अनंत काळपर्यंत आपल्याकडे राहील? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.

सगळ्याच आगबोटी, मग त्या सामानाची वाहतूक करत असोत किंवा प्रवाशांची, त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर मोडीत काढल्या जातात. युद्धनौकासुद्धा त्याला अपवाद नाहीत, पण विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू नौका होती आणि छत्तीस वर्षे आपल्या आरमाराचा महत्वाचा भाग होती, त्यातली सहवीस वर्षे ती एकमेव होती, युद्धामध्ये तिने अविस्मरणीय अशी कामगिरी केली होती. या सगळ्यामुळे तिने भारतीयांच्या मनात घर करून ठेवले आहे. आता तिचा काही उपयोग राहिला नसला तरी तिच्या नाहीशा होण्याची हळहळ तीव्रतेने वाटते, पण व्यावहारिक दृष्टीने त्याला काय मोल आहे? आणि अशा किती गोष्टी आपण सांभाळून ठेवू शकणार आहोत? त्यासाठी किती खर्च करणे परवडण्याजोगे आहे? असे अनेक प्रश्न आहेत.

जुनी विक्रांत बोट जरी आता कायमची नजरेआड जाण्याची शक्यता समोर ऊभी ठाकली असली तरी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका या वर्षीच लाँच झाली आहे. तिचेही नाव विक्रांत असेच ठेवून ते नाव पुढे चालत राहण्याची व्यवस्था केली आहे. विराट सुद्धा आता जुनी व्हायला आली असून नवी विक्रांत कार्यान्वित झाल्यानंतर तिलाही रजा द्यावी लागणार आहे. दरम्यान नौदलाने विक्रमादित्य ही आणखी एक मोठी विमानवाहू नौका घेतली गेली आहे. पण आता या प्रकारच्या आगबोटींची निर्मितीच आपल्या देशात कोची इथे होऊ लागली असल्यामुळे गरजेनुसार त्या तयार केल्या जात राहतील. पहिली विक्रांत लिलावात निघाली तरी तिचे नाव आणखी काही दशके तरी चालत राहील.

मुक्तकलेखबातमीमाहिती

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

5 Dec 2013 - 10:38 am | मृत्युन्जय

छान लेख आहे. ही नौका महाराष्ट्र सोडुन इतर कुठल्यातरी सरकारला सांभाळायला द्यावी ते नक्की नीट व्यवस्था बघतील, महाराष्ट्र सरकार करंटे आहे आणि त्याला हे काम झेपणार नाही हे तर सरळ आहे.

मी-सौरभ's picture

5 Dec 2013 - 10:45 am | मी-सौरभ

मोदींच्या गुजरात सरकारला देऊन टाका. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Dec 2013 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी हेच म्हणायला आलो होतो. त्यांना सजेशन देखील द्या. पटेलांच्या नियोजित स्मारकाच्या आसपास कुठेतरी हीला ठेवा लई भारी धंदा होईल पर्यटनाचा.

रुस्तम's picture

5 Dec 2013 - 12:08 pm | रुस्तम

+१

आनंद घारे's picture

5 Dec 2013 - 2:19 pm | आनंद घारे

जी बातमी माझ्यासारख्या सामान्य वाचकापर्यंत पोचली आहे ती गुजरात सरकारला नक्कीच मिळालेली असणार. त्यांनी पुढाकार घेऊन काही केले तर ते दिसेलच.

आदूबाळ's picture

5 Dec 2013 - 12:21 pm | आदूबाळ

एच एम एस बेलफास्ट सारखं विक्रांतचं स्मारक झालं असतं तर फार मजा आली असती.

सुबोध खरे यांना विनंती - विक्रांतच्या आठवणी जागवण्यासाठी...

आयएनएस सह्याद्री ही सुद्धा संपुर्ण भारतीय बनावटीची आहे ना? पण विक्रांतपेक्षा खुपच लहान आहे.

आनंद घारे's picture

5 Dec 2013 - 2:58 pm | आनंद घारे

आयएनएस सह्याद्री ही सुद्धा संपुर्ण भारतीय बनावटीची पण वेगळ्या प्रकारची युद्धनौका आहे. या जहाजावर संहारक शक्ती असलल्या तोफा आणि क्षेपणास्त्रे आहेत पण विमाने नाहीत. यामुळे तिचा आकार (लांबी, रुंदी वगैरे) जुन्या विक्रांतच्या सुमारे अर्ध्याएवढा आणि नव्या विक्रांतच्या सुमारे पावपट आहे. भविष्यकाळात क्षेपणास्त्रे अधिक परिणामकारक किंवा निर्णायक ठरणार आहेत. यामुळे सह्याद्रीसारख्या फ्रिगेट मोठ्या संख्येने तयार केल्या जातील. विक्रांतसारखी अवजड जहाजे संख्येने कमीच असतील.

उद्दाम's picture

5 Dec 2013 - 1:48 pm | उद्दाम

आता कधी तरी असल्या वस्तू नष्ट कराव्या लागतीलच की. ब्रह्मास्त्र , रामाचा बाण .... ते विक्रांत .. सगळं स्टोअर करत बसलं तर लोकाना समुद्रात रहायला जावं लागेल.

लोटीया_पठाण's picture

5 Dec 2013 - 2:23 pm | लोटीया_पठाण

बरोब्बर…. यालाच पुरोगामी वगैरे म्हणतात का हो ??

ब्रह्मास्त्र , रामाचा बाण यासारखी शस्त्रास्त्रे एकदा वापर केल्यानंतर आपोआप नष्ट होत असतात. तोफेमधून उडालेले गोळे सुद्धा सहसा कोणी जपून ठेवत नाहीत. बंदुकीच्या किंवा पिस्तुलाच्या गोळ्या शोधून काढून मिळाल्या तर न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यापुरत्या ठेवल्या जातात. विक्रांत त्या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्याची एक्स्पायरी डेट निघून गेली असली तरी त्याच्या आठवणींचे आयुष्य अजून दहा वीस वर्षे शिल्लक असावे. त्यानंतर कदाचित कोणाला काही वाटणार नाही. पण माणसाचे मन थोडे विचित्र आहे. त्याला काल परवाच्या वस्तू जुन्या म्हणून फेकून द्याव्याशा वाटतात, पण दहा वीस हजार वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची गाडगी मडकी आणि लाखो वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची हाडे आणि कवट्या पाहून त्याल कसला आनंद मिळतो कोण जाणे.

ग्रेटथिन्कर's picture

5 Dec 2013 - 9:55 pm | ग्रेटथिन्कर

राम दंडकारण्यात फीरला ,ते रीझर्व करावे व तीथे हिंदूंसाठी मठ काढावेत ...-इती ग्रेटदींडर

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 9:58 pm | मुक्त विहारि

?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2013 - 12:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

निदान इथेतरी कचरा करु नकात...

मुक्त विहारि's picture

6 Dec 2013 - 6:18 pm | मुक्त विहारि

चला पार्टी करू या...

मदनबाण's picture

5 Dec 2013 - 4:29 pm | मदनबाण

लेख फार सुरेख झाला आहे.

रेवती's picture

5 Dec 2013 - 7:37 pm | रेवती

लेख आवडला हो घारेकाका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2013 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

महितीपूर्ण, सुरेख आणि प्रसंगोचित लेख.

विक्रांतचं संग्रहालय बनवून भारताच्या नौदलाच्या इतिहासातील हा मोठा टप्पा जपला जावा असेच वाटते.

विक्रांतचे संग्रहालय बनवून एक इतिहासाचा वारसा जपून ठेवावा या बद्दल कोणतेच दुमत नाही. परंतु त्यात येणारे वेगवेगळे प्रश्न असे आहेत. नौदलाच्या गोदीत जागा नाही. नवीन येणाऱ्या विक्रमादित्य अगोदर असणार्या विराट या दोन युद्धनौका ठेवायच्या असतील तर विक्रांतला दुसरी जागा देणे आवश्यक आहे. हि जागा महारष्ट्र सरकारने देणे आवश्यक आहे. कारण मुंबई बंदरात किंवा न्हावा शेवा मध्ये जागा नाही. जर तिला दुसरी जागा तयार करायची असेल तर त्या जागेला जाण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे गोदी/जेटी, त्याला जोडणारा रस्ता ई पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. यासाठी येणारा खर्च २००२ साली चारशे पन्नास कोटी होता हा पैसा उभा करणे आपल्या कल्याणकारी राज्याला( जे अगोदरच कर्जात बुडालेले आहे असे ऐकतो) शक्य झाले नाही. एवढा पैसा टाकून त्याचे संग्रहालय उभारणे हे खाजगी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले पण त्याला येणारा खर्च आणी त्यातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ जमेना म्हणून कोणतीही खाजगी संस्था त्याला तयार झाली नाही. नौदलाने आपला इतिहासाचा वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही दिवसात येणाऱ्या विक्रमादित्य या जहाज साठी जागा रिकामी करणे निकडीचे आणी तातडीचे झाल्याने ती भंगारात विकण्याचा निर्णय शेवटी घेतला गेला. नौदलाला विक्रांत केवळ चालू ठेवण्यासाठी वर्षाला बारा कोटी रुपये खर्च येत होता. आणी त्यावर कमीत कमी पस्तीस माणसे हि बंद स्थितीतहि साठी लागतात. यात हे जहाज गेली कित्येक दशके समुद्राच्या खार्या पाण्यात उभे असल्याने गंजाचे प्रमाण अफाट आहे. त्यामुळे एवढ्या अवाढव्य जहाजाला दर सहा महिन्यांनी रंग लावावा लागतो. त्याच्या आतील कक्षात विजेचे दिवे चालू ठेवावे लागतात यासाठी वीज लागते. मध्येच वीज गेली तर ताबडतोब पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी एक जनित्र चालू ठेवावे लागते त्याल लागणारा डीझेल चा खर्च असे अनेक खर्च( आग लागली तर आग विझवायला लागणाऱ्या बाटल्या रिचार्ज करणे, पिण्याचे पाणी भरणे त्याच्या टाक्या साफ ठेवणे ई ई ) आणी शेवटी त्या पस्तीस माणसांच्या मनुष्यबलाचा खर्च.
हे सर्व प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्याने नाईलाजाने ती भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला.
क्रमशः

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:02 pm | मुक्त विहारि

७०,००० कोटी क्रुष्णा खोर्‍यासाठी खर्च झाले आणि ४५० कोटी मात्र खूप मोठे झाले.

असो....

मेरा भारत महान

हातात घड्याळ घातले की असेच होणार, त्यापेक्षा कमळावरचे धनुष्यबाण बरे......

सचिन कुलकर्णी's picture

5 Dec 2013 - 10:08 pm | सचिन कुलकर्णी

एकंदरीत विक्रांतबाबतीत उगाच emotional होण्यात अर्थ नाही, असे आधीपासूनच वाटत होते.

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:30 pm | मुक्त विहारि

कुठली कारण मीमांसा?

७०.००० कोटी क्रुष्णा खोर्‍यात घालायला पैसे आहेत पण एक राष्ट्रीय अस्मिता जपायला पैसे नाहीत.ही कुठली कारणमीमांसा?

सचिन कुलकर्णी's picture

5 Dec 2013 - 10:36 pm | सचिन कुलकर्णी

परंतु मला खरे साहेबांनी सांगितलेली कारणे पटली. (मी तरी याबाबतीत सेंटी होऊन विचार नाही करू शकत)..

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:49 pm | मुक्त विहारि

दर माणशी १०० रु. तिकीट लावले तरी बराचसा खर्च निघू शकतो.

पण....

जावु दे.....

आपण आपले आय.पी.एल. आणि हिंदी सिनेमे बघू या.....तेव्हढीच देशसेवा....

थॉर माणूस's picture

6 Dec 2013 - 11:58 am | थॉर माणूस

आपल्या लोकांचा संग्रहालये (भारतातली) ती सुद्धा इतके पैसे देऊन पहाण्याबाबतचा एकूण उत्साह पहाता "बराचसा खर्च निघू शकतो" यावर विश्वास बसणे कठीण आहे.

ग्रेटथिन्कर's picture

6 Dec 2013 - 1:29 pm | ग्रेटथिन्कर

रोज तीन हजार लोकांनी विक्रांतला भेट दिली तरी..
3000*100=300000,
महीन्याचे 300000*30=90,00000
वर्षांचे 90,00000*12=10,80,00000
या हिशेबाने ४५० कोटींचा खर्च निघायला किमान ५०वर्ष तरी लागतील....

कालानुरुप तिकीटातली वाढ गृहीत धरली तरीही ४५० कोटीचे इंटरेस्ट, मेंटेनन्स ,कर्मचार्यांचे पगार वगैरे धरुन ती वाढ निगेट होईल. म्हणुन शंभर रुपये हाच तिकिटदर धरला आहे.

सुबोध खरे's picture

6 Dec 2013 - 6:41 pm | सुबोध खरे

साहेब,
सु श्री मायावती यांनी मुख्यमंत्री असताना नोइडा मध्ये प्रेरणा स्थळ आणी गौतम बुद्धाचा पुतळा बांधण्यासाठी ६८५ (सहाशे पंचा ऐशी) कोटी रुपये खर्च केले. त्यावेळेस हा विचार का केला नाही म्हणून आपण त्यांना विचारले काय? कि यातील किती पैसे परत मिळतील. "कोण मुर्ख ५०० कोटी गुंतवुन ५० वर्ष फीटायची वाट बघत बसेल?." हि गुंतवणूक किती आतबट्ट्याची आहे याचा आपण विचार केला काय? आपण धर्मनिरपेक्षतेची जाहिरात करता तर आपण खालील दुवा जरूर वाचावा.
http://www.firstpost.com/politics/the-four-challenges-mayawati-has-throw...
हा प्रश्न जर श्रद्धेचा आहे तर विक्रांतचे स्मारक बनावे हा प्रश्न सुद्धा लाखो सैनिकांच्या श्रद्धेचा असू शकतो. याच रीतीने राजघाटावर महात्मा गांधींचे स्मारक बांधण्याचे प्रयोजन काय असे आपण का विचारीत नाही?
कोणावर तरी वैयक्तिक टीका करताना आपण दुसर्याच्या श्रद्धेला यक्कस्चीत ठरवतो आहे हे भान आपले सुटले नसते तर बरे वाटले असते. मला असे कित्येक सैनिक माहित आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची तीस वर्षे विक्रांत आणी त्याचे दुरुस्ती यार्द यात सेवा करण्यात काढली आहेत.एखाद्याच्या श्रद्धेचा 'मोडके जहाज" असा जाहीर उपमर्द आपल्याला शोभत नाही.
असो आपले मत आपल्यापाशी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2013 - 7:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१०,०००

केवळ विरोधाकरता विरोध सुरू झाला की साराचार विचारबुद्धी गहाणखाती जमा होते. राजकारण एकदा डोक्यात भिनलं की मुद्दा जिंकणं मह्त्वाचं... अगदी देशाच्या अस्मितेची त्याच्यासमोर काय किंमत???!!! व्वा !

"आपल्या इथली सिस्टीमच खराब" असे म्हणणार्‍यांनी डोळे उघडून आरशात नीट बघितले "खराब सिस्टीम म्हणजे काय/कोण?" हे समजून येईल.

{"आपण काय लिहितोय यावरून आपली किंमत (मग ती नकली आयडीची का होईना) केली जाते... भले मग कोणी उलटा प्रतिसाद लिहो न लिहो ह्याचेही भान सुटण्याला काय नाव असावे बरे?" असा विचार करणारा} इए

मृत्युन्जय's picture

7 Dec 2013 - 11:09 am | मृत्युन्जय

१०० टक्के सहमत. श्रद्धा आणि प्रेरणास्थान यांची किंमत पैशात करता येत नाही.

रुस्तम's picture

7 Dec 2013 - 6:40 pm | रुस्तम

+१

सुबोध खरे's picture

5 Dec 2013 - 11:37 pm | सुबोध खरे

चारशे पन्नास कोटी आकडा खालील दुव्यानुसार आहे. http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-04-14/mumbai/28118326_1....
असो.
जहाज पाण्यात उभे असते तेंव्हा त्याला गंज लागणे हि कायम चालू असणारी प्रक्रिया आहे. पावसाळ्यानंतर पडणार्या पावसाने गंजाचे ओघळ जहाजाच्या बाह्य पृष्ठभागावर दिसतात. तसे दिसू नये म्हणून त्यावर लगेच रंग लावावा लागतो. दोन वर्षाच्त रंगाचा एक थर जमा होतोत तो ठोकून काढून टाकावा लागतो आणि नवा रंग लावावा लागतो
जहाजावर असणारे सगळे खिळे स्क्रू नट बोल्ट हे पितळेचे असावे लागतात कारण लोखंडाचे स्क्रू गंजून घट्ट होतात आणि नंतर उघडत नाहीत. आता हे पितळेचे स्क्रू सुद्धा त्यःची चमक जाऊ नये म्हणून त्यावर ब्रासो लावून दर एक दिवसा आड पॉलिश करावे लागते. पाण्याची टाकी लोखंडाची असल्याने तिच्या तळाशी गंज जमा होतो तो दर दोन वर्षांनी साफ करावा लागतो. असा रोजच करावा लागणारा मेंटेनन्स वर्षनुवर्षे करणे फार जिकीरीचे असते.
मी विभागप्रमुख(HOD) होतो म्हणून विक्रांत च्या डिकमिशनिंग च्या वेळेस मला बोलावणे आले होते. मी त्याला नम्रपणे नकार दिला होता. आमच्या सरानी विचारले असता मी सांगितले कि जेथे फुले वेचली तेथे गोवर्या वेचायला मला जावेसे वाटत नाही.
यानंतर एकदा गोव्यात व्हाईस अडमिरल शेखर सिन्हा यांच्या आणि इतर अधिकार्यानबरोबर बोलणे होत असताना मी स्पष्टपणे म्हटले होते कि विक्रांत संग्रहालय करणे महाराष्ट्र सरकारला झेपत नसले तर ती विकून टाकणे योग्य होईल. यावर तेथे गरमागरम चर्चा झाली. मी शांतपणे म्हटले कि आपले आपल्या वडिलांवर कितीही प्रेम असले तरी त्यांचा पार्थिव देह आपण कवटाळून ठेवत नाही. त्याचे योग्य अंत्य संस्कार करावेत आणि एक सुंदर स्मारक बांधावे. असेच विक्रांतचे स्मारक जमिनीवर बांधा म्हणजे त्याला अवाढव्य खर्च येणार नाही आणि त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा एवढा खर्च होणार नाही.त्यात विक्रांतचे असलेले सर्व फोटो किंवा स्लाईड शो दाखवावा. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये दाखवतात तसा.
अर्थात माझे सडेतोड (किंवा संवेदनाहीन) बोलणे फारसे कुणाला रुचत नाही. मला त्या बद्दल कोणाचाही कोणताही राग नाही. पण सैनिकांचे मोठे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यावी. त्यांच्यासाठी वसतिगृहे किंवा तत्सम सोयी उपलब्ध कराव्यात. (अशा सोयी नाहीत असे माझे म्हणणे नाही पण त्या अपुर्या आहेत). पण सरकारला यासाठी वेळ आहे का? आणि तशी त्यांची मानसिकता आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2013 - 12:40 pm | प्रभाकर पेठकर

विक्रांतचे स्मारक जमिनीवर बांधा म्हणजे त्याला अवाढव्य खर्च येणार नाही आणि त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा एवढा खर्च होणार नाही.त्यात विक्रांतचे असलेले सर्व फोटो किंवा स्लाईड शो दाखवावा.

१००% व्यवहार्य सुचना, त्यामुळे साहजिकच.... सहमत.

१००% सहमत.

जबरदस्त प्रतिसाद... १००% सहमत.

पण सैनिकांचे मोठे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यावी. त्यांच्यासाठी वसतिगृहे किंवा तत्सम सोयी उपलब्ध कराव्यात.

+१०००

रुस्तम's picture

7 Dec 2013 - 6:40 pm | रुस्तम

+१

राघवेंद्र's picture

5 Dec 2013 - 10:06 pm | राघवेंद्र

धन्यवाद घारे काका, खुप चांगल्या पध्दतीने लेख लिहिल्याबद्दल. धन्यवाद डॉक्टर साहेब, एकदम सत्य परिस्थिती सांगितल्या बद्दल. क्रमशः पाहुन छान वाटले.

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:32 pm | मुक्त विहारि

मस्त लेख.

आवडला.

मयुरा गुप्ते's picture

5 Dec 2013 - 10:34 pm | मयुरा गुप्ते

छान लेख घारे काका, उत्तम प्रतिसाद खरे काका..

विक्रांत भंगार निघणार ह्या बद्दल खरं तर काहीच धक्का बसला नाही. वडिलांच्या ऑफिस मुळे विक्रांत दर्शन झालं होतं, पूर्णपणे आंतर्बाह्य बघण्यास मिळाली होती, त्याची आठवण झाली.
इथे कॉरप्स क्रिस्टी ह्या बंदर असलेल्या शहरात "युएसेस लेक्झिंगटन" नावाची युद्धनौका बघितली होती. त्या आकाराचं धुड जपुन,सांभाळणे हे नक्कीच सोप्पी गोष्ट नसावी असा अंदाज आहे. पण विक्रांतच वस्तुसंग्रहालय करावं हा बाकी प्रचंड,दुर्दम्य ईच्छाशक्ती शिवाय होउच शकत नाही, कारण आर्थिक बोजा हा तळ दिसत नसलेला विषय आहे.

भंगारमध्ये काढण्या आधी निदान काही दिवस तरी सामान्य जनतेला प्रवेश फी सकट बघण्यास उपलब्ध करुन देण्यास काय हरकत आहे (का आधीच उपलब्ध होती?)

बाकी सरकारची ईच्छा. असो.

-मयुरा.

विद्युत् बालक's picture

5 Dec 2013 - 10:40 pm | विद्युत् बालक

आई वडील म्हातारे झाल्यावर घर लहान पडत्येय म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासारखे आहे हे ! :(

ज्या देशात सैनिकानंच किंमत नाही तिथे जहाजाची काय कथा ?

काही काही डगले घालणाऱ्या नेत्यांना उलटे करून झाडले तरी काही करोड पडतील

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:51 pm | मुक्त विहारि

हातात घड्याळ बांधणार्‍या?

विद्युत् बालक's picture

5 Dec 2013 - 11:08 pm | विद्युत् बालक

तेच ते :)

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 11:13 pm | मुक्त विहारि

ह्यावेळी जरा...

कमळाबाईच्या हातात धनुष्यबाण द्यायच्या विचारात आहे....

हातातील घड्याळ सोन्याचे झाले आणि धान्य पण सोन्याच्या भावाचे झाले.

विद्युत् बालक's picture

5 Dec 2013 - 11:22 pm | विद्युत् बालक

नथू गुग्गुळ चा डोस वाढवायला पाहिजे असे दिसत्येय पेशंट ला बहुतेक :D

विद्युत् बालक's picture

5 Dec 2013 - 11:22 pm | विद्युत् बालक

नथू गुग्गुळ चा डोस वाढवायला पाहिजे असे दिसत्येय पेशंट ला बहुतेक :D

आनंद घारे's picture

5 Dec 2013 - 11:24 pm | आनंद घारे

मुंबईतल्या लहान घरातसुध्दा ठेवायला जागा नाही म्हणून आपल्याला अनेक गोष्टी अनिच्छेने देऊन टाकाव्या लागतात आणि त्या घेणारा भेटला नाही तर त्या टाकून द्याव्या लागतातच. त्या वस्तूंबद्दल असलेले ममत्व त्या वेळी सोडून द्यावे लागतेच. याची मला कल्पना आणि भरपूर अनुभव आहे. मी सेवानिवृत्त होईपर्यंत अनेक वर्षे सरकारच्या कृपेने आलीशान निवासस्थानात रहात होतो. त्यामुळे हौसेने घेतलेल्या किंवा निरनिनिराळ्या ठिकाणांहून आणलेल्या अनेक शोभेच्या वस्तू, प्रियजनांनी दिलेल्या भेटवस्तू वगैरे वर्षानुवर्षे जमा करून ठेवलेल्या वस्तू तिथे पडून राहिलेल्या होत्या. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काही सुहृदांच्या किंवा प्रसंगांच्या आठवणी निगडित होत्या. ती जागा सोडून टूबीएचकेच्या फ्लॅट्मध्ये येतांना सगळे सामान बरोबर आणले असते तर फक्त ते सामान ठेवायलासुद्धा पुरेशी जागा माझ्याकडे नव्हती. त्यामुळे पुढील जीवनासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तू ठेवून घेऊन बाकीच्या सगळ्या वस्तू सोडून द्याव्या लागल्याच. आता खरेसाहेबांनी नेव्हीची मजबूरी सविस्तरपणे सांगितली आहे. ती मान्य व्हायलाच हवी. याची कल्पना मलाही होतीच आणि त्याच उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे.
लिलावात बोली करण्याएवढे पैसे ज्यांच्या कडे असतील ते काही योजना आखतीलच. समुद्रकिनार्‍यावर जागा घेऊन या जहाजाला पाण्यात ठेवणे महाग पडत असेल तर एकादी ड्राय डॉक बांधून तिथे ही बोट ठेवता येणे शक्य असावे. रेल्वेची ईंजिने आणि विमाने हॉलमध्ये मांडून ठेवलेली मी अनुक्रमे इंग्लंड आणि अमेरिकेत पाहिली आहेत.
हे जहाज कोणाला विकायचे हे ठरवतांना तो बिडर त्याचे काय करणार आहे हे देखील पहायला हवे आणि चार पैसे जास्त मिळतील म्हणून ते शिपब्रेकिंगला देऊ नये. त्या बाबतीत आपल्या अकौंटंट आणि ऑडिट्वाल्या मंडळींनी सूट द्यायला हवी असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2013 - 7:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिलावात बोली करण्याएवढे पैसे ज्यांच्या कडे असतील ते काही योजना आखतीलच. समुद्रकिनार्‍यावर जागा घेऊन या जहाजाला पाण्यात ठेवणे महाग पडत असेल तर एकादी ड्राय डॉक बांधून तिथे ही बोट ठेवता येणे शक्य असावे. रेल्वेची ईंजिने आणि विमाने हॉलमध्ये मांडून ठेवलेली मी अनुक्रमे इंग्लंड आणि अमेरिकेत पाहिली आहेत.
हे जहाज कोणाला विकायचे हे ठरवतांना तो बिडर त्याचे काय करणार आहे हे देखील पहायला हवे आणि चार पैसे जास्त मिळतील म्हणून ते शिपब्रेकिंगला देऊ नये. त्या बाबतीत आपल्या अकौंटंट आणि ऑडिट्वाल्या मंडळींनी सूट द्यायला हवी असे मला वाटते.

सहमत.

लिलावातून काय अगदी देशाच्या तिजोरीत फार मोठी भर पडेल इतके पैसे मिळतील असे नाही. त्यामुळे जर कोणी खरंच संग्रहालय करत असेल तर ते आर्थिकदृष्ट्या मानवण्यासाठी बोट कमी भावातही द्यायला हरकत नाही... किंबहुना तसेच करून संग्रहालयाच्या उत्तम असण्याबद्दलच्या अटी मान्य करून घ्याव्या असे मला वाटते. मात्र चलाखी करून आता कमी किंमतीत घेऊन नंतर अनावस्था करणार नाही किंवा भंगारात देऊन पैसे कमावणार नाही असे क्लॉजेस विक्री करारात टाकणे आवश्यक आहे.

आनंद घारे's picture

6 Dec 2013 - 11:05 am | आनंद घारे

डॉ.सुबोध खरे यांनी दोन भागात दिलेला मुद्देसूद प्रतिसाद माझ्या लेखाचे वाचनमूल्य वाढवणारा आहे. त्यांना धन्यवाद. व्यवहारी जगामध्ये टिकून रहायचे असल्यास प्रत्येक कार्याचा ताळेबंद (बॅलन्सशीट) ठेवावाच लागतो. देशाचे संरक्षण करणे हे नौदलाचे मुख्य काम आहे. नेव्हल डे साजरा करणे वगैरे काही नैमित्यिक कामे त्याबद्दल जनतेला माहिती व्हावी यासाठी लहान प्रमाणात केली जातात. इतिहासाची जपणूक करणे हे काम नागरी संस्थांचे आहे. त्याचा आर्थिक तसेच प्रशासकीय बोजा संरक्षण दलावर पडणे योग्य नाहीच. या मुद्यावर दुमत असायचे कारण नाही.
मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे कुठल्याही यंत्राचा मेंटेनन्स थांबवून त्याची रिप्लेसमेंट करावी लागते आणि असे निर्णय घेणे त्या क्षणी भावनिक दृष्ट्या किंचित अवघड वाटले तरी तांत्रिक कारणांमुळे ते घेणे किती आवश्यक असते याचे मला भान आहे. विक्रांतच्या जागी विराट आली आणि तिचेही दिवस संपत आले आहेत, आता विक्रमादित्य आली आहे आणि नवी विक्रांत बांधायला घेतली आहे. हे सगळे आवश्यकच आहे आणि याला पर्याय नाही. याबद्दलही कसला वाद नाही.
निकामी झालेल्या विक्रांतचे पुढे काय करायचे यावरच मतभेद आहेत. मी नोकरीत असतांना कारखान्यातल्या जुन्या यंत्रांची कशी विल्हेवाट लावायची यावर सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधी माझे विचार मांडलेले आहेत, वेळोवेळी त्यासंबंधी निर्णयसुद्धा घेतले आहेत. पण भावनात्मक कारणामुळे विक्रांतबद्दल डिस्पोजल हा शब्द वापरायला मन थोडे कचरते. मृत व्यक्तींबद्दल बोलायचे झाल्यास अगदी अपवादास्पद परिस्थितीमध्ये त्यांचे शरीर ममी करून जपून ठेवले जाते, पण सामान्यपणे ते शक्य नसते. मानवाचे शरीर हा निसर्गाचाच भाग असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये गिधाडांसारखे पक्षी (तेही आता दुर्मिळ झाले आहेत) त्या देहाचे लचके तोडतात, मुंग्यांसारखे कीटक त्यातले कण कण वेचून नेतात आणि काही सूक्ष्म जीवजंतू (बॅक्टीरिया) त्याला सडवून त्यातून मिथेन वायू निर्माण करतात वगैरे वगैरे. मृत व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांमुळे (पारशी समाज वगळता) आपल्याला ते सगळे नैसर्गिक असले तरी पहावले जात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या निर्जीव देहाचे दहन, दफन वगैरे करून त्याला नजरेआड केले जाते.
विक्रांत हे जहाज निर्जीव असले तरी त्याच्याशी भावनात्मक धागेदोरे जुळलेले असल्यामुळे ते भंगारात विकले गेल्यानंतर त्याला गॅस टॉर्चने आडवे उभे कापून आणि त्याच्यावर घणाचे घाव घालून छिन्नविछ्छिन्न केले जाणे, ते तुकडे भट्टीत टाकून त्यांना वितळवणे वगैरेच्या विचाराने अस्वस्थता वाटणार. हे जहाज कुठल्या तरी सागर किना-यावर असेच सोडून दिले किंवा एकाद्या सुरक्षित जागी त्याला जलसमाधी दिली तर समुद्राच्या खा-या पाण्याने त्याचे जे काय व्हायचे ते होईल, पण ते डोळ्यासमोर असणार नाही. हजारो टन पोलाद अशा प्रकारे वाया घालवणे शहाणपणाचे नाही असा विचार कदाचित मनात येणार नाही.
या जहाजाला नष्ट न करता आहे त्या रूपामध्ये समुद्रात तरंगत ठेवणे, त्यावरील विमानांना उडतांना आणि उतरतांना पाहता येणे हे सर्वात चांगले. सैन्यदलाच्या कामगिरीसाठी नाही, पण पर्यटकांना पाहतांना आनंद देण्यासाठी हे करता येणे शक्य असल्यास उत्तमच. ते परवडण्यासारखे नसेल तर त्या जहाजाला जमीनीवर आणून ठेवले तर गंज लागून ते हळूहळू क्षीण होत जाईल, पण बुडण्याची भीती राहणार नाही. त्याला एकादा स्वस्तातला रंग लावला तरी काही दशके तरी ते टिकू शकेल. तोपर्यंत सध्याची माणसांची पिढी काळाआड जाईल. त्यानंतर त्या नौकेचे काही का होईना याचे सोयरसुतक तेंव्हाच्या पिढीतल्या लोकांना वाटणार नाही.
स्वर्गवासी झालेल्या महान व्यक्तींच्या स्मारकांची दुरवस्था पाहता त्यात निर्जीव वस्तूंच्या स्मारकांची भर घालावी असे मला तरी अजीबात वाटत नाही. स्मारक असे नाव न देता, विक्रांतचे फोटोग्राफ, मॉडेल्स वगैरे जतन करून ठेवावेत, त्याची प्रदर्शने भरवावीत, त्याची वेबसाईट बनवून ती अपडेट करत रहावे वगैरे अगदी कमी खर्चाची कामे करायला हरकत नाही. कदाचित ती होतही असतील तर त्यांना प्रसिद्धी मिळायला हवी.

सुबोध खरे's picture

6 Dec 2013 - 1:11 pm | सुबोध खरे

घारे साहेब,
मी विक्रांतवर असताना तेथील विजेच्या तारांची लांबी सत्तर हजार किमी आहे असे ऐकले होते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेले तांबे शिवाय प्रत्येक पितळेचा नट बोल्ट ई गोष्टी काढून जर पुन्हा तशाच किंवा धातू म्हणून वापरता आल्या तर ते एका पिढीच्या दर्शनासाठी फुकट घालवण्यापेक्षा चांगले.केवळ पोलादच नव्हे तर अनेक उत्तम लाकडाच्या वस्तू आणी फर्निचर सुद्धा तसेच वाया घालवणे कदाचित बरोबर नाही.
मी विक्रांतवर दोन वर्षे राहिलो आहे. माझ्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा काळ होता. तिथेच मी माझ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिली आणी मला रेडियोलॉजी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याची संधी मिळाली. एकटाच डॉक्टर म्हणून वयाच्या २४- २५ वयाला अतिशय मानसन्मान सुद्धा मिळाला.लग्न हि झालेले नव्हते. अतिशय खुशाल चेंडू आयुष्य होते. चौदा नॉट वेगाने जाणार्या विमानवाहू नौकेच्या पुढच्या उड्डाण पुलाच्या टोकावर उभे राहून जसे काही आपल्या बापाची जहागीर आहे असे उभे राहणे (आपण टायटेनिक मध्ये पाहिले असेल तसे)आणी समुद्रावरील खरा वारा अंगावर घेत सूर्यास्त पाहणे. किंवा एक महिना समुद्रात युद्धसराव करून जेत्याच्या आवेशात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मुंबई बंदरात प्रवेश करणे या अतिशय सुखद आठवणी आजही अंगावर रोमांच आणतात
त्या आठवणी तशाच मनात जपून ठेवण्यासाठी मी विक्रांत चे गलितगात्र स्वरूप पाहायला परत कधीही गेलो नाही. एखाद्या तरुणाने एखाद्या तरुणीवर मनापासून प्रेम केले तर त्याने तिची उतारवयात कधीही भेट घेऊ नये. आपल्या मनातील प्रतिमेला फार मोठा धक्का बसू शकतो. तसेच काहीसे असावे.
असो. कालाय तस्मै नमः

ब़जरबट्टू's picture

6 Dec 2013 - 8:47 pm | ब़जरबट्टू

खरे साहेब,
तुमचे नुस्त अनुभव वाचुन अंगावर रोमांच आले. आणि एव्हढ्या सुखद आठवणी असतांना सुध्दा तुम्ही मांडलेले विचार पटलेले आहेत..

आपल्या संवेदनशील प्रतिक्रिया भावली. शेवट तर हळुवार करून गेला.

पैसा's picture

6 Dec 2013 - 7:36 pm | पैसा

विक्रांतच्या आयुष्याचा आढावा आणि तिला सेवामुक्त करण्यातली अपरिहार्यता.. घारेकाकांचा आणखी एक उत्तम लेख आणि डॉ. खरे यांच्या सुंदर प्रतिक्रिया. हा मिपावरच्या संग्राह्य लेखांपैकी एक झाला आहे!

एकदम बरोबर बोललात ज्योती ताई . मिपाच्या संग्रही लेखात याला घ्यायलाच हवे.

विवेकपटाईत's picture

6 Dec 2013 - 8:14 pm | विवेकपटाईत

मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे. प्रेताला ते कितीही मोठ्याव्यक्तीचे का असेना आपण जाळून / दफन करून नष्ट करतो.
शेवटी कीर्ती उरते, शरीर नाही.
विक्रांत भंगारात विकल्या गेले तरी ही त्याने केलेली कामगिरी अमर राहील.
शोक करणे व्यर्थ आहे. स्मारक ही किती वर्ष जपून ठेवणार, ते नष्ट होईलच. शेवटी कालाय तस्मे नम:

विकास's picture

6 Dec 2013 - 8:31 pm | विकास

घारे आणि खरे या दोहोंच्या लेखनातून नेहमीप्रमाणे बरीच नवीन माहिती कळली. त्याबद्दल दोघांना धन्यवाद! कधीकाळी नेव्हल डेच्या निमित्ताने विक्रांत आणि आयएनएस गंगा (आणि अजून एक आठवत नाही) जहाजांना भेटी दिल्या होत्या. विक्रांतचा हा प्रश्न वाचनात आला होता पण बाकी माहिती नव्हती.

जगातली ५०% मोडीत निघालेली जहाजे ही भंगार स्वरूपात गुजरातमध्ये येतात. अलंग शिपयार्ड मध्ये त्यांना मोडीत काढून रिसायक्लींग, हॅझार्डस वेस्ट वगैरे वेगळे करणे चालते...

या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही.

बरोबर आहे पण तरी देखील अमेरीकेसंदर्भात किंचीत असहमत. वॉशिंग्टन डिसी मधली स्मिथसोनियनची सगळी वस्तुसंग्रहालये ही जनतेसाठी मोफत आहेत. या सर्वच देशात (पक्षि: पाश्चात्यांमधे) इतिहासाचे दस्ताइवज अधिकृतपणे संग्रहीत करून ठेवायची पद्धतच नाही तर परंपरा आहे. दुर्दैवाने आपल्यातही ती जरी कधीकाळी असली तरी कुठेतरी वाटते की ब्रिटीशांच्या काळातील पारतंत्र्यात ती निघून गेली. जिथे वेगळी जागा न लागणारे किल्ले नीट ठेवले जात नाहीत तेथे विक्रांतची काय अवस्था... :(

विक्रांत विषयी वाचून खरच खूप वाईट वाटते .

लेख खूपच माहितीपूर्ण आहे. ज्ञानात खूप भर पडली .

विकास's picture

6 Dec 2013 - 9:35 pm | विकास

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका या वर्षीच लाँच झाली आहे. तिचेही नाव विक्रांत असेच ठेवून ते नाव पुढे चालत राहण्याची व्यवस्था केली आहे.

१२ ऑगस्ट २०१३ ला तीचे अधिकृत उद्घाटन झाले. त्याचे काही फोटो जालावर शोधताना मिळाले...चिनी माध्यमातून! :) अर्थात फोटोलिंक कॉपी करता येत नाही त्यामुळे ते कुठे आहेत याची लिंक देत आहे.

त्या व्यतिरीक्त हा पाक डिफेन्स वेबसाईट वरील फोटो:

Vikrant

अर्धवटराव's picture

6 Dec 2013 - 11:52 pm | अर्धवटराव

विक्रांतचा अपघात होऊन ति निकामी झाली नाहि. आपली ड्युटी पूर्ण करुन ति रीतसर रीटायर झाली. तिच्या रीटायरमेण्ट्ची कल्पना कमीतकमी पाच वर्ष आगोदर सर्वांना आली असणार. त्याचवेळी या रीटायर्ड लिजण्डला उत्तम आर्थीक फायद्याच्या गणीतात बसवुन तिचा वृद्धापकाळ सन्मानीत करण्याचे नियोजन सुरु करायला हवे होते. आपल्याकडे पाश्चात्यांचे अनुकरण करत थीम पार्क, वॉटरपार्क, कार रेसींग वगैरे सुरु झालच ना... आपल्याकडे विज्ञान संग्रहालय आहेत, टाटांसारखे संशोधनाला चालना देणारे उद्योगपती आहेत. थोडक्यात काय, तर आर्थीक फायद्याची गणीतं, गुंतवणुक, कल्पकता, मनुष्यबळ इ. सर्वकाहि आहे. पण या सर्व घटकांना योग्यवेळी एकत्र आणुन योजना आखणे व ति अमलात आणणे झालं नाहि... तसंही हे आपलं नेहमीचं रडगाणं आहे.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2013 - 9:48 am | मुक्त विहारि

+ १

शिशिर's picture

7 Dec 2013 - 10:30 am | शिशिर

फेस बुक वर मोहिम "सेव्ह विक्रांत"

SAVE Vikrant
http://youtu.be/-x0DJXD77z4
https://www.facebook.com/pages/SAVE-Vikrant/182986638572017?fref=ts

तुमचा अभिषेक's picture

7 Dec 2013 - 1:29 pm | तुमचा अभिषेक

वाचून विक्रांतबद्दल आत्मियता वाटू लागली. याआधी काही घेणेदेणे पडले नव्हते या बातमीविषयी. काहीतरी प्रॅक्टीकल सोल्यूशन निघेल आणि विक्रांत भंगारात जाण्यापासून वाचेल अशी अपेक्षा.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2013 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर

'विक्रांतचे संग्रहालय बनविण्यासाठी सव्वाशेकोटी रुपयांची गरज आहे आणि तेवढे पैसे महाराष्ट्र सरकारकडे नाहीत. त्यामुळे विक्रांत भंगारात काढण्यावाचून पर्याय नाही' असे सरकारचे म्हणणे आहे. - इति एबिपी माझा.

राजीव शुक्लांना अंधेरीतील शंभर कोटीचा भूखंड निव्वळ ९९ हजारात ह्याच महाराष्ट्र सरकारने दिला आहे. शिवाय ह्या भूखंडाशेजारचा दूसरा ३ हजार मिटर्सचा भूखंड वार्षिक ६ हजार रुपये भाडे तत्त्वावर दिला आहे. - इति एबिपी माझा.

विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करावे या विचाराला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा असावा असे दिसते. यासाठी लागणारा खर्च सव्वाशे कोटी आहे की पाचशे कोटी की अधिक हे तिथे नेमके काय काय करायचे यावर अवलंबून आहे. तसेच त्यासाठी लागणारी जागा कुठली घ्यायची यावरही आहे. सरकारच्या अंदाजपत्रांचे जे लक्षावधी करोडोंचे आकडे आपण वाचतो त्यामानाने हा खर्च फार जास्त वाटत नाही. पण नुसता खर्च केला आणि विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवले तर त्याला फारसा अर्थ नाही. ते वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय झाले, ते पहावे असे लोकांना वाटले आणि काही काळ तरी ते पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर तो खर्च सत्कारणी लागेल आणि त्यातला काही भाग वसूल सुद्धा होईल.
मागे एकदा नेव्ही डेच्या दिवशी उन्हातान्हात तासनतास रांगेमध्ये उभे राहून मी एक युद्धनौका पाहिली होती. त्या वेळी आम्हाला फक्त डेकवरून पाच मिनिटे फिरवून परत पाठवले होते. इंजिनरूम, होल्ड्स, आर्मामेंट्स किंवा डेकवरल्या इतर खोल्यासुद्धा कुलुपात बंद ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. पण यामुळे मला तरी काहीच पाहिल्यासारखे वाटले नाही. या कारणानेच मध्यंतरी विक्रांत या मोठ्या जहाजाला पहाण्याची संधी ठेवलेली असतांना सुद्धा ती घ्यावी असे आवर्जून वाटले नव्हते. तो अनुभव आठवून या दृष्टीने विचार केला तर जाणवले की जहाजाची रिकामी डेक अजीबात आकर्षक नसते. पैसे आणि वेळ खर्च करून ती पहायला लोक येणार नाहीत आणि आले तरी निराश होतील, आणखी कोणाला तिकडे जायची शिफारस करणार नाहीत.
परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2013 - 1:01 am | डॉ सुहास म्हात्रे

परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.

विकास's picture

7 Dec 2013 - 7:50 pm | विकास

दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यावर भर द्या - इती राज ठाकरे.

यात स्वार्थ आणि परमार्थ असावा असे वाटते. विक्रांत वाचू शकली तर जनतेकडून क्रेडीटही मिळेल आणि दादरला हेरीटेज दर्जा मिळाला नाही अथवा लांबला तर तेव्हढ्यात तसा मिळाल्यावर न चालणारी डेव्हलपमेंट देखील करायला वेळ मिळेल. ;)

बॅटमॅन's picture

8 Dec 2013 - 1:16 am | बॅटमॅन

सहमत!! बरेच काही दिसते आहे ;)

आनंद घारे's picture

7 Dec 2013 - 9:37 pm | आनंद घारे

यात 'राज'कारण असेलही, पण विक्रांत नावातली जादू किती पॉवरफुल आहे पहा!

आतिवास's picture

8 Dec 2013 - 12:15 am | आतिवास

माहितीपूर्ण लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद (काही अपवाद वगळता!)
काहीतरी मार्ग निघेल अशी आशा ...

विक्रांत परत येत आहे.

ओह्ह. भारीच की. अ‍ॅव्हेंजर प्लस जुनी पल्सर इन कॅफे रेसर स्टाइल. नाईस कॉम्बो.
एक शंकाय. प्लास्टीकमध्ये कसे वर्जिन प्लास्टिक दर्जेदार समजले जाते तसे मेटलबाबतीत नसते का? स्क्रॅप मेल्टींग करुन आलेले मिळालेले मेटल हे दर्जाबाबतीत कसे? मेटलर्जीवाले सांगतील का काही?

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 1:41 pm | तर्राट जोकर

मेटल रियुजेबल आहे. दर्जामध्ये फरक पडत नाही.

अरे जोकरभाई, खतरनाक फिचर्स हायेत बाइकला. वीडीओ पाह्यले. फिदाच झालो भौ शेप आणि स्टाइलवर. कॅफे रेसर लूक अन पिलीयन सीटची आयडीया सॉलीड एकदम. टँक एकदम मस्क्युलीन. जरा वायझर न वापरता राउंड रेट्रो हेडलँप दिला आन स्पोर्टी गिअरलिव्हर दिली तर १००/११० मार्क्स भौ.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 4:55 pm | तर्राट जोकर

एकदम सहमत. बोले तो झकास. हॅण्डल्बार आणि हेडलॅम्प पोर्शन टिपीकल बजाज वाटतंय (सस्ता टैप). ते कस्टमाइज करुन घेतलं तर बाईक भारी.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2016 - 3:33 pm | मराठी कथालेखक

भावना की व्यहवार या कात्रीत सापडल्यावर कल्पकतेने मार्ग काढायला हवा.
पर्यटन स्थळ म्हणून लोक येतील पण त्यासाठीचे ५०-१०० रुपयाचे तिकीट इतकाच फक्त उत्पन्नाचा मार्ग असण्याचे कारण नाही.
इतरही उपयोग शोधता येवू शकतील..(उदा: सिनेमाचे शुटिंग , हॉटेल ई)
एका राज्यासाठी ४५० कोटी हा तसा फार मोठा आकडा नाही, पण कल्पकता हवी, भ्रष्टाचार नको.

हेमंत लाटकर's picture

21 Mar 2016 - 8:22 pm | हेमंत लाटकर

कशा कशाचे स्मारक बनवायचे?

मी विमानवाहू नौका आत जावून बघितली आहे. अभियांत्रिकी चा एक जबरदस्त अविष्कार म्हणून जपून ठेवलीच पाहिजे पण लहान मुलांना सहज गत्या बघता यावी अश्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. रिटायर्ड नेवी लोकांना त्यावर ठेवावे म्हणजे खर्या युद्धांत नौका काही चालते, इत्यादी first hand माहिती मिळेल.

मी सान दियोगो मध्ये USS Midway पहिली होती आणि सांगून मला सुद्धा पटले नसते पण अनुभव अद्वितीय होता. कप्तानाचे केबिन पासून, Rabbit Hole, Slingshot, १९६० मधील टचस्क्रीन आणि १९५० मधला mouse, GPS नसताना सुद्धा व्यवस्थित दिशादर्शन करण्यासाठी असलेला महाप्रचंड ३२KB मेमोरी वाला Univac इत्यादी पहिले. विएत्नाम युद्धांत भाग घेतलेल्या वैमानिकाकडून विमान स्लिङ्ग्शोट द्वारे कसे हवेंत फेकले जाते, ते सर्व करण्यसाठी ९ लोक १० सेकंदात कसे काम करतात ह्याचे प्रात्यक्षिक पहिले. ९०+ वर्षांच्या एका व ww-२ सैनिकाकडून त्याचे मित्र युद्ध भूमीतील त्याचे फोटो इत्यादी पहिले. ह्या अतिशय handsome माणसाने गणितातील चांगले भवितव्य सोडून युद्धांत भाग घेतला होता. ह्याचे सर्व मित्र युद्धांत मारले गेले, पत्नी कसल्या तरी आजाराने हा युद्धांत असताना वारली इत्यादी सर्व माहिती त्याने दिली. हा माणूस म्हणजे चालता फिरता (wheelchair) संग्रहालय होता.

खर्या Plane Simulators मधून विमान भरारी घेतली. Air Craft carrier समुद्रात असताना समज एखादा माणूस चुकून पाण्यात पडला तर काय होते असा प्रश्न मी एका खालाश्याला विचारला. अश्या परिस्थतीत सुद्धा एक ठराविक प्रोसेस पाळली जाते, म्हणजे कप्तान पासून सध्या खलाश्यापर्यंत कुणी कुणी काय करायचे हे अगदी ठरून गेलेले असते.

कुणी तरी फुकट तिकीट दिली होती म्हणून आम्ही ह्या नौकेला भेट दिली आणि तासाभरात परत येवू म्हणताना अख्खा दिवस घालवला.

विक्रांत चे सुद्धा असे काही तरी करता येईल तर चांगले होईल भंगारात काय शिवाजी महराजांची तलवार सुद्धा काढता येईल पण कुणी लहान मुलाने पाहावे आणि आमच्या भूतकाळात शिरून शूराप्रती आदर, त्यागाप्रती कृतज्ञता आणि भविष्यासाठी प्रेरणा घ्यावी अश्या वस्तू शेकडो वर्षातून एकदाच निर्माण होतात.

अभियांत्रिकी चा एक जबरदस्त अविष्कार म्हणून जपून ठेवलीच पाहिजे पण लहान मुलांना सहज गत्या बघता यावी अश्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. रिटायर्ड नेवी लोकांना त्यावर ठेवावे म्हणजे खर्या युद्धांत नौका काही चालते, इत्यादी first hand माहिती मिळेल.

हे आता का लिहिताय? तुम्हाला खरेच माहीती नसते का उगी मनात आले ते लिहित राहता?
विक्रांत तोडली गेलीय. त्याच्या मेटलचे उपयोग करुन प्रॉडक्टस सुध्दा बाजारात आलेत. ह्या धाग्यातच दोन प्रतिसाद वर त्याचा आहे उल्लेख.

hmangeshrao's picture

22 Mar 2016 - 6:44 am | hmangeshrao

भीष्माचार्याचा रथ

रामाचा बाण

कर्णाचे ब्रह्मात्र

परशुरामाचा परशु

नथुचे पिस्तुल

वीक्रांत

....

सर्वांचे जतन झालेच पाहिजे

साहना's picture

22 Mar 2016 - 10:21 am | साहना

मेनकेची कन्चुकि

इरसाल's picture

22 Mar 2016 - 3:22 pm | इरसाल

शाहिस्तेखानाची तुटकी बोटं (कोणाच्यात पण उंगली करायला),
अफजलखानाची आतडी/कोथळा, (त्याचे झगे सुकवाय्ला दोरी सारखे)
औंरंगजेबाचे दाढीचे केस, (ब्रश बनवुन केस काळे करायला)

hmangeshrao's picture

25 Mar 2016 - 3:47 pm | hmangeshrao

हे सगळे मिळाले तर मला द्या.

हॅरी पॉटरच्या रुपबदल काढ्यात सगळे एकदम घालुन मी पिईन.