ती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
29 Mar 2012 - 11:07 am

लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते. म्हणून मी म्हणेन की:

शी इज ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल ।
आय लव्ह हर, लव्ह हर, लव्ह हर, लव्ह हर, सो विल यू ।
शी इज ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल ।।

पण मग, अनुवाद हा माझा स्वभावच असल्याने मी लगेचच म्हणेन:

ती सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे ।
तिला मी चाहतो, चाहतो, तुम्हीही चाहाल, जिवापाड हो ।
ती सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे ।।

तर अशी एवंगुणविशिष्ट, सद्-गुणसुंदरी जेव्हा खरीखुरीच मला भेटायला येते
तेव्हाचा सुखसंवाद काय वर्णावा? तो काहिसा खालीलप्रमाणे होत असतो.

मी: गडे, सप्तरंगांच्या, स्वप्न दुनियेत नेशील का? (चाल: तुझ्या पंखांवरूनीया, मला तू दूर नेशील का?)
ती: गड्या, जनरहाटीच्या, विसर सव्यापसव्यांना!

मी: जिथे, कटकटींचा ह्या, सर्वही नाश होईल का?
ती: हो. हो. खरेच हो!
ती: तिथे, सर्वही सुखे, हात जोडुनी येतील ना!

मी: हो का? खरेच का?
ती: हो. हो. खरेच हो!

ती जाते तेव्हा मन प्रफुल्लित झालेले असते. चित्त प्रसन्न झालेले असते. व्यापांना सामोरे जाण्यासाठी मन सज्ज झालेले असते. तिच्या सहवासाचा महिमाच अगाध आहे. दिवस उगवतो. निरनिराळ्या कामांमध्ये मन गुंतत जाते. आयुष्यात धावपळ करून थकवा येतो. कामे होत नाहीत तेव्हा क्वचितप्रसंगी नैराश्यही येते. आणि मग तिची आठवण येते. तिच्यात अशी काय जादू आहे? तिच्या सहवासातच सौख्य सामावलेले आहे. तिच्या भेटीची ओढ अनावर असते. ती ओढ न रात्र पाहते, न दिवस पाहते. तीही फारच मोकळी आहे. माझ्यावर मेहेरबान आहे. 'भेट' म्हटल्यावर अजिबात आढेवेढे घेत नाही. खळखळ करत नाही. प्रतीक्षा करायला लावत नाही. जगावेगळ्या अनुभवाची मोहिनी सोबत घेऊनच येते ती. तुम्ही जर मला विचारलत की तुमच्या आरोग्याचे रहस्य काय आहे? तर मी सांगेन 'ती'च आहे, माझ्या आरोग्याचे रहस्य.

मात्र हे माझ्या लग्नाच्या बायकोजवळ बोलू नका. अहो कुणाला आपल्या नवर्‍याचे दुसर्‍या एखादीशी असलेले संबंध रुचतील? विशेषत: ते संबंध जर नवर्‍याला गौरवास्पद वाटत असतील तर! हे बघा, तुम्ही माझ्या मागे लागू नका. नाव सांगा, म्हणून. नाव फक्त लग्नाच्या बायकोचेच घेतात. मी तिचे नाव कसे घेऊ? माझे काय तिच्याशी लग्न झालेले आहे? काय म्हणता? "हवं तर उखाण्यात घ्या. पण, परदा नही जब कोई खुदा से, बंदों से परदा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या?" बरं बरं ठीक आहे. मी काही घाबरत नाही. मी नाव घेतो ऽ ऽ. पण मग हा कसला पुरातन उखाणा? असे मात्र म्हणू नका!

"डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कान्ही, पदी चालतो । जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो ॥
हाताने बहुसाळ, काम करितो, विश्रांती ही घ्यावया । घेतो 'झोप' सुखे, फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया ॥"

मौजमजारेखाटनप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

हा निद्रादेवीचा गौरव म्हणायचा की लाडीक छेडछाड ?

ऐसे येथ तुम्हीं पहा लिहुनिया झोपेवरी तें कसें|
वाचावें मज लागलेंचि पुरते, जागेपणींही तसें|
झोपेचे दिनिं चाललें स्तवन जें, ऐसें मिपातें खरें|
निद्रागीतचिं जागृतींत बघुनीं, वाटें मनासी बरें||१||

ही धरा दोनचि श्लोकीं लाभली शोभली बरी|
वाचतां वाचतां येक जिलबी पाडली खरी||

ऐसे येथ तुम्हीं पहा लिहुनिया झोपेवरी तें कसें|
वाचावें मज लागलेंचि पुरते, जागेपणींही तसें|
झोपेचे दिनिं जाहलें खवटसें पाहा जरीं खोबरें|
निद्रागीतचिं जागृतींत बघुनीं, वाटें मनासी बरें||१||

ही धरा दोनचि श्लोकीं लाभली शोभली बरी|
वाचतां वाचतां येक जिलबी पाडली खरी||२||

झोपेचे दिनिं जाहलें खवटसें पाहून हे खोबरें
निद्रागीतचिं जागृतींत बघुनीं, वाटे कशाला बरें ?

झोपेचे खोबरे झालेले पाहून खरे तर बरे वाटायला नको.

तुम्ही बरे वाटवून घेतलेत ही तुमची आपुलकी. त्याखातर मन:पूर्वक धन्यवाद !

आधीच्या प्रतिसादात दुरुस्ती केल्या गेली आहे ;)

मुक्त विहारि's picture

29 Mar 2012 - 1:30 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...

पैसा's picture

29 Mar 2012 - 1:44 pm | पैसा

निद्रेवर तुमचं फारच प्रेम दिसतंय!

लिना, बॅटमन, विहारि आणि ज्योति,

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

29 Mar 2012 - 6:07 pm | मुक्त विहारि

अहो गाववाले.....

आम्ही वाचतोय हो तुमचा ब्लॉग.....

एक डोम्बिवलीकर ह्या नात्याने स्वतःचा ब्लॉग सुरु करणे हा माझा गाव-सिध्ध अधिकार आहे...

आणि आम्ही लिहितो हे पण जगाला (पक्षी मिसळपाव ...आम्चे जग बॉ इथेच सम्पते)...लिहुन सान्गणे

रघु सावंत's picture

29 Mar 2012 - 11:06 pm | रघु सावंत

छान लिहिले आहे...