सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

'कुणीतरी सांगा, श्रीहरीला'

Primary tabs

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
12 Nov 2011 - 9:01 am

आशाबाईंनी म्हटलेले, राम कदम ह्यांनी संगीत दिलेले 'प्रेम आंधळं असतं' ह्या चित्रपटातील हे गीत आहे. कधीतरी साठीच्या दशकात हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ह्या गीतची ७८ आर. पी. एम. ची रेकॉर्ड मी घेतली होती. पुढे रेकॉर्ड प्लेयर नादुरूस्त झाला, तेव्हा सगळ्याच रेकॉर्ड्स एका मित्राला देऊन टाकल्या, त्यात हीही गेली. पुढे त्यातील बहुतेक सगळीच गाणी मी अन्य माध्यमांतून मी परत मिळवू शकलो. पण ह्या गीताच्या बाबतीत मी ते मिळवण्यात अयश्स्वी ठरलो. अधूनमधून जालावर मी ह्याचा शोध घेत राहिलो आणि अचानक काल मला ते 'यू ट्यूब' वर गवसले. त्यामुळे मला आनंद झाला आहे, व तो आपणां सर्वांत वाटावा म्हणून येथे हे लिहीतो आहे.

गाणे इथे ऐकता येईलः

http://www.youtube.com/watch?v=6G7mjs02mSI

गदिमांचे शब्द सुरेख आहेतच,. पण मला जाणवलेली दोन ठळक वैशिष्ठ्ये इथे नमूद करतो. पहिले, हे गाणे बरेचसे खर्जात आहे; खर्जातून सुरू होऊन टिपेला जाते व अंतर्‍याच्या शेवटी आशाबाई एक अप्रतिम मींड घेत मुखड्यावर येतात. चाल सरळ नाही, अवघड परंतु अत्यंत श्रवणीय आहे. हे गाणे कुठल्या रागाभोवती गुंफले आहे, ह्याविषयी तात्यांसारख्या जाणकाराने भाष्य करावे. गीताचे दुसरे वैशिष्ठ्य त्याची दीपचंदीतील रचना हे होय. जुन्या मराठी नाट्यसंगीतात हा ताल मुबलक वापरला जाई, पण मराठी चित्रपटसंगीतात हा ताल वापरलेला माझ्यातरी ऐकिवात नाही-- मग भले गाणे नाटकाचा प्रसंग बेतून का निर्माण केलेले असो (उदा. 'प्रथम तुज पाहता'). गाणे लयीशी सुरेख,. लडिवाळपणे खेळत पुढे जाते.

जिने साडेतीन गाणी अद्याप गायिली आहेत, व तरीही ती उठवळपणे कुठल्यातरी संगीतस्पर्धेत परिक्षक म्हणून जाऊन समोरच्या स्पर्धक गायिकेस 'तशी बरी गायिलीस तू, पण तुझ्या गाण्यात विब्रेटो आहे, तो जरा कमी कर, हं?" सांगते (आणी त्यावर ती गरीब बिचारी स्पर्धक माईक दोन्ही हातांत पकडून, अजिजीने 'हो' असे नम्रपणे वाकून सांगते)-- अशा गायिकेच्या गीतांत क्रम लावणे अगदी सोप्पे आहे. पण लता- आशा इत्यांदींच्या बाबतीत हे अवघड आहे; ज्यांनी दशकांनू दशके आपल्यावर बहारदार गायनाची बरसात केली आहे, त्यात आपण क्रम काय लावणार? तरीही, आशाबाईंच्या ह्या गीताचा क्रम मी त्यांच्या एस. डी. बर्मन व ओ. पी. ह्यांच्याकडे गायिलेल्या अनेक गीतांच्या जवळपास लावीन.

असो. गीताचा आनंद घ्यावा.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

तसं गाण्यातलं आपल्याला काही कळत नाही. परंतू छान ओळख करुन दिली आहे गाण्याची.

आशाबाईंचं "सांज ये गोकुळी" हे आमचं आवडतं गाणं.

जिने साडेतीन गाणी अद्याप गायिली आहेत, व तरीही ती उठवळपणे कुठल्यातरी संगीतस्पर्धेत परिक्षक म्हणून जाऊन समोरच्या स्पर्धक गायिकेस 'तशी बरी गायिलीस तू, पण तुझ्या गाण्यात विब्रेटो आहे, तो जरा कमी कर, हं?" सांगते (आणी त्यावर ती गरीब बिचारी स्पर्धक माईक दोन्ही हातांत पकडून, अजिजीने 'हो' असे नम्रपणे वाकून सांगते)-- अशा गायिकेच्या गीतांत क्रम लावणे अगदी सोप्पे आहे. पण लता- आशा इत्यांदींच्या बाबतीत हे अवघड आहे; ज्यांनी दशकांनू दशके आपल्यावर बहारदार गायनाची बरसात केली आहे, त्यात आपण क्रम काय लावणार? तरीही, आशाबाईंच्या ह्या गीताचा क्रम मी त्यांच्या एस. डी. बर्मन व ओ. पी. ह्यांच्याकडे गायिलेल्या अनेक गीतांच्या जवळपास लावीन.

हे शब्दशः पटलं. मुळात असे कार्यक्रम हीच एक नौटंकी असते. विशेषतः लिटील चॅम्पसारख्या कार्यक्रमांमध्ये त्या छोटया मुलांना कळत तरी असेल का समोरचा परीक्षक काय अकलेचे तारे तोडतोय हे. किती आत्मियतेने गातात ती छोटी मुलं. त्यांच्या निरागस गाण्याचं कौतुक करायचं सोडून दिड शहाणे परीक्षक तुझ्या आवाजात हे नाही आणि ते नाही करत बसतात.

श्रावण मोडक's picture

12 Nov 2011 - 11:42 am | श्रावण मोडक

साडेतीन गाण्यांची टिप्पणी अगदी मार्मीक. अशा मोजक्या वाक्यांसाठी तुमचे लेखन वाचायचे असते.

विदेश's picture

12 Nov 2011 - 12:00 pm | विदेश

जिने साडेतीन गाणी अद्याप गायिली आहेत, .... जबरदस्त .

कुणीतरी सांगा अशा परीक्षिकेला - आता पुरे !

५० फक्त's picture

12 Nov 2011 - 2:20 pm | ५० फक्त

मस्त लेख आवडला, बाकी ते व्हिब्राटो का काय म्हणजे काय असतं हे कुणी समजवेल का ?

अविनाशकुलकर्णी's picture

12 Nov 2011 - 4:35 pm | अविनाशकुलकर्णी

तुझ्या आवाजात हे नाही आणि ते नाही करत बसतात.

..........................................
लहान मुले नाचतात तिथे हि हेच असते...
महागुरु नावाचा प्राणी डोक्याला टोप लावुन अंगात आल्या सारखे वागत असतो....

पैसा's picture

12 Nov 2011 - 5:41 pm | पैसा

एका अतिशय सुरेख गाण्यासाठी धन्यवाद!

राजेश घासकडवी's picture

12 Nov 2011 - 6:17 pm | राजेश घासकडवी

सुंदर गाणं. राग चंद्रकंस असावा. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती....

रामदास's picture

12 Nov 2011 - 7:26 pm | रामदास

आठवायला आवडतील अशी आणखी काही गाणी प्रदीप यांनी सुचवावी अशी विनंती.
मला आठवलेलं गाणं आज तुजसाठी या पावलांना अशा काहीशा शब्दाचं आहे.
बरखा ऋतु बैरन हमारी रे । पपीहा कुहु कुहु करे जीया जले अशी एक चिज ऐकल्याचं आठवतं आहे . तोच हा राग आहे का ?

चित्रा's picture

13 Nov 2011 - 9:04 am | चित्रा

सुरेख गाणे आहे.

नंदन's picture

13 Nov 2011 - 9:25 am | नंदन

गाणं आहे, मनःपूर्वक धन्यवाद. इथे हे गाणं जोगकंस रागात असल्याचं म्हटलंय.

विकास's picture

19 Nov 2011 - 12:57 am | विकास

सुंदर गाणे आहे. त्याचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! मराठी गाणी शोधणे कधी कधी खूप अवघड जाते. कधी स्पेलींग चूक-बरोबर लागते तर कधी कधी ते मराठीत लिहीलेले असते आणि तसे शोधावे लागते. असो.

"जिने साडेतीन गाणी अद्याप गायिली आहेत,..." या चपखल परीच्छेदाशी सहमत!

बाकी यावरून अजून दोन (माझ्या आवडीची गाणी) आठवली आणि सुदैवाने त्याचे दुवे देखील मिळाले.

आज मोरे मन लागो (अपूर्ण) हे भीमसेन-आशाने म्हणलेले सुहासिनीतील शास्त्रीय गीत.

तसेच याच चित्रपटात आशाने "मी तर प्रेम दिवाणी" हे एका अर्थी पारंपारीक चालीत आळवून म्हणलेले सुरेख आणि आवडते गाणे. पण तेच गाणे ललीता फडके यांनी शास्त्रीय संगीताच्या पठडीत म्हणले आहे, चित्रपटात देखील केवळ एकच कडवे आहे पण मला ते जास्त भावले आहे.

गाणे सुंदरच आहे.
आपला लेखही आवडला.

रेवती's picture

19 Nov 2011 - 2:31 am | रेवती

गाणं आवडलं. पहिल्यांदाच ऐकलं.
शिर्षक वाचून आधी कुणीतरी बोलवा दाजिबाला सारखं असेल असं वाटलं होतं.

वाहीदा's picture

20 Nov 2011 - 12:37 pm | वाहीदा

हे गाणे या आधी कधीच ऐकले नाही .
सुंदर गाणे , सुंदर लेख !

तिमा's picture

20 Nov 2011 - 1:15 pm | तिमा

प्रदीपजी,
गाणं ओळखीचं आहे, पण तरी आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच ताल 'दीपचंदी' आहे हेही माहित नव्हते.