'कुणीतरी सांगा, श्रीहरीला'
लेखनप्रकार
आशाबाईंनी म्हटलेले, राम कदम ह्यांनी संगीत दिलेले 'प्रेम आंधळं असतं' ह्या चित्रपटातील हे गीत आहे. कधीतरी साठीच्या दशकात हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ह्या गीतची ७८ आर. पी. एम. ची रेकॉर्ड मी घेतली होती. पुढे रेकॉर्ड प्लेयर नादुरूस्त झाला, तेव्हा सगळ्याच रेकॉर्ड्स एका मित्राला देऊन टाकल्या, त्यात हीही गेली. पुढे त्यातील बहुतेक सगळीच गाणी मी अन्य माध्यमांतून मी परत मिळवू शकलो. पण ह्या गीताच्या बाबतीत मी ते मिळवण्यात अयश्स्वी ठरलो. अधूनमधून जालावर मी ह्याचा शोध घेत राहिलो आणि अचानक काल मला ते 'यू ट्यूब' वर गवसले. त्यामुळे मला आनंद झाला आहे, व तो आपणां सर्वांत वाटावा म्हणून येथे हे लिहीतो आहे.
गाणे इथे ऐकता येईलः
http://www.youtube.com/watch?v=6G7mjs02mSI
गदिमांचे शब्द सुरेख आहेतच,. पण मला जाणवलेली दोन ठळक वैशिष्ठ्ये इथे नमूद करतो. पहिले, हे गाणे बरेचसे खर्जात आहे; खर्जातून सुरू होऊन टिपेला जाते व अंतर्याच्या शेवटी आशाबाई एक अप्रतिम मींड घेत मुखड्यावर येतात. चाल सरळ नाही, अवघड परंतु अत्यंत श्रवणीय आहे. हे गाणे कुठल्या रागाभोवती गुंफले आहे, ह्याविषयी तात्यांसारख्या जाणकाराने भाष्य करावे. गीताचे दुसरे वैशिष्ठ्य त्याची दीपचंदीतील रचना हे होय. जुन्या मराठी नाट्यसंगीतात हा ताल मुबलक वापरला जाई, पण मराठी चित्रपटसंगीतात हा ताल वापरलेला माझ्यातरी ऐकिवात नाही-- मग भले गाणे नाटकाचा प्रसंग बेतून का निर्माण केलेले असो (उदा. 'प्रथम तुज पाहता'). गाणे लयीशी सुरेख,. लडिवाळपणे खेळत पुढे जाते.
जिने साडेतीन गाणी अद्याप गायिली आहेत, व तरीही ती उठवळपणे कुठल्यातरी संगीतस्पर्धेत परिक्षक म्हणून जाऊन समोरच्या स्पर्धक गायिकेस 'तशी बरी गायिलीस तू, पण तुझ्या गाण्यात विब्रेटो आहे, तो जरा कमी कर, हं?" सांगते (आणी त्यावर ती गरीब बिचारी स्पर्धक माईक दोन्ही हातांत पकडून, अजिजीने 'हो' असे नम्रपणे वाकून सांगते)-- अशा गायिकेच्या गीतांत क्रम लावणे अगदी सोप्पे आहे. पण लता- आशा इत्यांदींच्या बाबतीत हे अवघड आहे; ज्यांनी दशकांनू दशके आपल्यावर बहारदार गायनाची बरसात केली आहे, त्यात आपण क्रम काय लावणार? तरीही, आशाबाईंच्या ह्या गीताचा क्रम मी त्यांच्या एस. डी. बर्मन व ओ. पी. ह्यांच्याकडे गायिलेल्या अनेक गीतांच्या जवळपास लावीन.
असो. गीताचा आनंद घ्यावा.
वाचने
9495
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
तसं गाण्यातलं आपल्याला काही
साडेतीन
कुणीतरी -
मस्त लेख आवडला, बाकी ते
तुझ्या आवाजात हे नाही आणि ते
धन्यवाद!
चंद्रकंस?
असंच वाटतं आहे
धन्यवाद
सुरेख
धन्यवाद
गाणे सुंदरच आहे. आपला लेखही
गाणं आवडलं. पहिल्यांदाच
सुरेख गाणे , सुरेख लेख ! !
छान