कावळा, कडी आणि कॅमेरा

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
14 Oct 2011 - 4:43 pm

मुंबईसारख्या महानगरात राहिल्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे इथे मानव प्राण्याखेरिज इतर प्राणी आणि पक्षी सृष्टी अगदीच मर्यादित प्रमाणात बघायला मिळते. शेवटी खरी प्राणी-पक्षी सृष्टी सिमेंटच्या जंगलात थोडीच पहायला मिळणार आहे? पण असं असलं तरी थोडासाच का होईना, इथे आपल्याही भोवताली, छोट्यासा निसर्गाचा एखादा तुकडा उपलब्ध असतोच. गरज असते फक्त तो शोधण्याची. काही वेळेला असंही होतं, हा निसर्ग, त्याच्या एखाद्या घटकाच्या माध्यमातून अगदी आपल्या घरापर्यंत येऊन बसतो आणि एक प्रकारे आपल्याला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो.

गेल्या रविवारी अशाच एका गोष्टीचा मी साक्षीदार झालो.

आता असं आहे की मुंबईत आमचं घर अगदी मध्यवर्ती भागात आहे. जवळपासच्या इमारतींपेक्षा जराशी अधिक उंची आमच्या इमारतीची असल्याने आणि त्यातही वरच्या मजल्यावरचं घर असल्याने आमच्या गॅलरीमध्ये सकाळच्या वेळेला काही पक्षांचा राबता असतो. आता आमच्या इथे काही भारद्वाज, तांबट, पोपट आणि कोकिळ प्रकारचे सुंदर दिसणारे, सुंदर आवाजाचे पक्षी काही येत नाहीत. आमचं 'मैत्र!' आपलं कावळे-कबुतरं-चिमण्यांशीच आणि त्यातही कावळ्यांशी जास्तच. ;-)

आमच्या आईची एक पद्धत आहे. सकाळी स्वयंपाक झाला की आधी त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्यातले पदार्थ आमच्या रोजच्या डब्यात पडता पडता एक पान गॅलरीत कावळ्यांसाठी ठेवलं जातं. आता हे बघायला आपण कशाला घरात थांबतोय? डबा भरलेला दिसला की आपल्याला ताबडतोब पळावं लागतं ना लोकल गाठायला! असो. पण गेले काही दिवस आई सांगत होती की कधी बाहेर पान ठेवायला उशीर झाला तर एक कावळा चक्क आईचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्या दाराची कडी ठोकतो. मी काही एकदम विश्वास ठेवला नाही कारण मला वाटलं की आईला काहीतरी भास होत असावा.

मग गेल्या रविवारी अस्मादिक (दर रविवारप्रमाणे) घरात लोळत पडलो असताना (भल्या पहाटे) साडे नवाच्या सुमारास आमच्या मागच्या दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. कोण आलंय हे बघण्यासाठी उठलो तर (खरंच) माझ्या आश्चर्याला पारच उरला नाही. एक कावळेबुवा आमच्या मागच्या दाराची कडी वाजवत होते आणि एक वेगळाच कण्ठरव करत होते. कावळ्याचा आवाज असा कधी ऐकू येईल यावर यापूर्वी माझा कधीच विश्वास बसला नसता पण मी स्वतःच्या कानानेच तो ऐकत होतो. थोड्या कबुतराच्या घुमण्यासारख्या वाटणार्‍या त्या आवाजात खूप अजिजी होती. आईने लगेच बोलून दाखवलं, "आता बसतोय ना विश्वास? भूक लागलीय तर कसा नरमाईने खायला मागतोय बघ! आवाजही ऐक! नाही तर तू, शिक जरा याच्याकडून!"

आता ऐकत थांबलो असतो तर आईचं उपदेशामृत थांबलंच नसतं म्हणून मग लगेच मोबाईलवर त्या कावळेबुवांचे फोटो घेऊ लागलो. एक दोन पोझेस दिल्यावर मी जरा जास्तच जवळून फोटो काढायला गेलो तर बुवा दाराच्या कडीवरून कठड्यावर जाऊन बसले आणि तिथूनच पुन्हा आईला त्यांच्या भोजनाची वेळ झाल्याची आठवण करू देऊ लागले.

पुढल्या पाच मिनिटांत आईच्या हातचे भोजन जेवून कावळेबुवा आपल्या मार्गाने उडून गेले.

मोबाईल कॅमेर्‍यातले फोटोही ठीकच आलेले तेव्हा म्हण्टलं भूकेच्या वेळेनुसार आमची कडी वाजवून भोजन मागवणारी आमच्या घराजवळची पक्षी-सृष्टी आपल्या मित्रांनाही दाखवावी म्हणून हा लेखन-प्रपंच!

दाराच्या कडीवर बसून ती वाजवणारे आमचे रोजचे पाहुणे 'कावळेबुवा'

कावळेबुवांची आणखी एक (जवळून घेतलेली) छबी

फार जवळ गेल्याने उडून गॅलरीच्या कठड्यावर स्थानापन्न झालेले कावळेबुवा.

मौजमजाछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

14 Oct 2011 - 4:46 pm | गवि

इंट्रेस्टिंग.. :)

पण फटू दिसत नाहीत. ऑर्कूट बरेच ठिकाणी ब्लॉक केलेले असते त्यामुळे बर्‍याच जणांना पाहता येणार नाहीत फोटो कार्यालयातून..

किसन शिंदे's picture

14 Oct 2011 - 5:01 pm | किसन शिंदे

आठवण छानच!!

दिलेल्या अनुभवावरून 'कडी वाजवणार्‍या कावळ्याचे' फोटो बघण्यास उत्सुक.

उद्या सकाळी बसतोच क्यामेरा घेउन आमच्या कावळ्यांचे फोटो काढायला, आमच्याकडे दुपारचे पण येतात आणि एक आधि ऐकलेलं पण आता अनुभवलेलं वैशिष्ट्य, आम्ही एका टोपलीत पोळी भात वगैरे टाकुन बाजुला पाण्याची वाटी ठेवलेलि असते, बाकी पक्षी टिपुन निघुन जातात, कावळा प्रत्येक घास पाण्यात बुडवुन खातो.

@ किसन, गविभौ,

फोटो पुन्हा टाकलेत, वेगळ्या ठिकाणहून.

आता दिसतील बहुतेक....

:-)

@ हर्षदभौ (५० फक्त),

कावळा हा एक हुशार पक्षी आहे हे अशा अनुभवांवरून नक्कीच पटतं.

:-)

निवेदिता-ताई's picture

14 Oct 2011 - 5:23 pm | निवेदिता-ताई

खरेच असे होते का हो

निवेदितातै, पुण्यात असाल तर माझ्या घरी या, तुम्हाला आख्खी शाळा दाखवतो माझ्या घ्ररी, या माझ्या धाग्यात एक फोटो आहेच बघा. http://misalpav.com/node/16302#comment-278273

आता दिसताहेत... आवडले. आणि घराचं लोकेशनही. अगदी पूर्वीची "घरं" असतात तसं.. फ्लॅटसारखं नव्हे.. :)

मुंबईत असं मिळणं विरळा..

किसन शिंदे's picture

14 Oct 2011 - 5:29 pm | किसन शिंदे

आता दिसताहेत... आवडले. आणि घराचं लोकेशनही.

अगदी अगदी..
पहिल्या फोटोतला तो अल्युमिनिअमच्या सळ्या असलेला सेफ्टी डोर आहे वाटतयं.

प्रास's picture

14 Oct 2011 - 5:51 pm | प्रास

@ गविभौ,

येस, इमारत - घर बर्‍यापैकी पूर्वीचं नि जुनंच आहे. ७० - ७२ वर्षांपूर्वीचं. चाळ शिष्टम. आम्ही तिथे ३३ वर्षांपूर्वी आलो. घरापासून रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मार्केट काय सांगाल ते फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर.....

@ किसनराव,

तो सेफ्टी डोअरच आहे पण १५ वर्षांपूर्वीचाच आहे. त्यापूर्वी याची गरजच लागायची नाही आणि दरवाजे फक्त रात्रीच बंद व्हायचे.

:-)

असो. गेले ते दिवस....

प्रचेतस's picture

14 Oct 2011 - 6:26 pm | प्रचेतस

मस्त लिहिले आहेस रे मित्रा.
कावळा खरेच फार हुशार प़क्षी आहे. आमच्या एका मित्राने एकदा एका कावळ्याची खोडी काढली म्हणजे त्यांच्या घराजवळच्या झाडावर असलेल्या कावळीने अंडी घातली होती आणि हे महाशय ग्यालरीतून त्या कावळ्यांना हाकलू लागले. झालं कावळा- कावळीने डूख धरला. येता जाता कावळा कावळी दोघं फक्त त्याच्याच डोक्यावर चोची मारू लागले, मग त्याने टोपी घातली, तरीसुद्धा टोपीवर चोची पडतच राहिल्या मग शेवटी हेल्मेट घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जवळजवळ महिनाभर हा सर्व प्रकार सुरु होता.

शुचि's picture

14 Oct 2011 - 6:50 pm | शुचि

कावळा खरेच फार हुशार प़क्षी आहे.

कावळे हुशार असतातच पण हा कावळा लेखकाच्या घरातून हक्कानं अन्न मागतोय म्हणून आश्चर्य वाटलं. मजाही वाटली. माझ्याइथे चिमण्या खूपच कमी दिसत असत. एखादी आल्यावर मग तीला पोळीचे तुकडे (किंवा मुलगा घरी असला तर कुकीचे तुकडे) असे घालत असे. पाणी ठेवलेले असे. त्यामुळे एकीबरोबर चार पाच तश्याच चिमण्या येऊ लागल्या. नंतर मात्र कबूतराएवढ्या आकाराचे पक्षी येऊन दादागिरी करू लागल्यावर चिमण्या येईनाश्या झाल्या. मग मीही पोळी देणे बंद केले. पूर्वी आम्ही नेमानं पक्षीगृह आणि धान्य ठेवायचो पण पक्षी कमी आणि खारोट्याच सगळं संपवायच्या. त्यांचा आहारही पक्ष्यांपेक्षा जास्त असतो. बिचारे पक्षी!

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2011 - 8:01 pm | प्रभाकर पेठकर

१०० टक्के सहमत.

आमच्याकडेही आई अशीच रोज एका कावळ्याला गरमागरम, साजूक तूप वगैरे लावून खाऊ घालायची.
आई पोळ्या करीत असता ठराविक वेळी तो कावळा स्वयंपाकघराच्या खिडकी येऊन बसायचा. जरा उशीर झाला, आईचे लक्ष नसले, की आवाजात पराकोटीचे मार्दव आणून विशिष्ट आवाज काढायचा. अर्धी पोळी खाऊन झाली की तृप्त मनाने उडून जायचा, दूसर्‍या दिवशी ठराविक वेळी येण्यासाठी. जाता-जाता तो त्याच्या आवाजात 'थँक्यू' ही म्हणत असावा. कोणाला लेको लकळते आहे त्याची भाषा.
आता पुण्यात राहतो तर तिथेही माझी पत्नी एका लंगड्या कावळ्याला पोळी खाऊ घालते. त्याचा एक पंजा कुठल्यातरी अपघातात (बहुतेक मांज्यात अडकून किंवा लहानपणीच) तुटला आहे. तोही रोज सकाळी ठराविक वेळी पोळी खावयास येतो. आम्ही कधी जेवायला बाहेर जाणार असलो तरी पत्नी त्याच्या साठी एक पोळी करतेच करते. मला मात्र त्यामुळे त्याच्या बद्दल मनात असूया वाटते. तोही कधी आपले लक्ष नसले की ओरडून ओरडून लक्ष वेधतो. त्याच्या आवाजात मार्दव नसते तर हक्काच्या वसूलीचा अधिकार असतो. (पुण्याचा आहे नं!)

हे कावळे आपल्या उड्डाणक्षेत्रात जेंव्हा एखादी घार येते तेंव्हा तिच्या मागे लागून लागून तिला तिथून हुसकाऊन लावतात. तशी घार, कावळ्यांना घाबरत वगैरे नाही. ती मस्त विहरत असते पण कावळे ४-५ च्या समुहात तिच्या आजूबाजूला बोंबलत उडत राहतात आणि ह्या विहरण्यातील गंमत हरवून वैतागलेली घार निघून जाते.

कबुतरे शांतीदूत म्हणे. कबुतर खिडकिच्या छपरावर बसलेले असेल तर तिथे कावळ्याला बसू देत नाही. कावळा येऊन बसला तर त्याच्या जवळ जाऊन त्याला उडवून लावलं जातं. तो तिथून, समंजसपणे, दूसर्‍या टोकाला जाऊन बसला तर तिथे जाऊन त्याला हुसकाऊन लावले जाते. हा खेळ तो कावळा, कंटाळून, तिथून उडून दूर जात नाही तो पर्यंत चाललेला असतो.

दोन कबुतरांना आपापसात मारामारी करतानाही पाहिले आहे. ते आपल्या पंखांनी समोरच्या कबुतराच्या अक्षरशः कानफटात लगावतात. मी खाली कार पुसत असताना, फटॅक फटॅक असे आवाज आल्याने चमकून वर पाहीले तर खिडकिच्या छपरावर दोन कबुतरे एकमेकांच्या कानाखाली आवाज काढीत होती.

कावळा-(आणि बहुतेक) कावळी समोरच्या विजेच्या तारेवर निवांत गप्पा मारत बसलेले असतात. विशेषतः नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर. गप्पा मारता मारता एकमेकांच्या पिसांमधे अडकलेले गवत, किंवा तत्सम काही, आपल्या चोचीने काढून एकदूसर्‍याला मदतही करीत असतात. पण कधी कधी एखाद्या दाणग्या कावळ्याला हे आवडत नाही आणि तो येऊन दाण्णकन त्या तारेवर अशा कोनात येऊन बसतो की ती तार झोके खायला लागते. कावळा-कावळीला तोल सांभाळणे (शारीरिक...., मानसिक नाही) अवघड होऊन बसते त्यामुळे ती जोडी तिथून दूर निघून जाते. कदाचित ती कावळी त्या परिसरातील एकमेव सुंदर आणि सेक्सी कावळी असावी त्यामुळेच तो दाणग्या कावळा 'तू माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही' अशा खलनायकी भावनेतून तसे वागत असावा.

माझ्या बहिणीच्या घरासमोरच्या झाडावर एक कावळा यायचा. तो तर विविध आवाज काढणारा कलाकार होता. स्वांतसुखाय, तो अनेकविध आवाज काढायचा. आसपास बागडणार्‍या खारूताईंना आश्चर्यचकित करून सोडायचा. त्यांचे ओरडणे चाललेले असायचे. त्यांच्या आवाजाबरहुकूम आवाज काढायचा हा प्रयत्न करायचा. इतरही आवाज त्याला काढता यायचे. असो.

पक्षांचे, प्राण्यांचे विश्व पाहात बसणे हा एक विरंगुळा होऊ शकतो.

मन१'s picture

14 Oct 2011 - 9:56 pm | मन१

भन्नाट निरिक्षण.
प्रतिसादक उत्तम छायाचित्रकार असावा ह्यात आश्चर्य नाही.
कबूतराबाबत तर १००% सहमत. आमच्याबिल्डिंगसमोरच मुठा नदी वाहते. त्याच्या काठावरच्या वस्तीत कुणीतरी अनेक कबूतरे पाळली आहेत. त्यातलेच मागे एकदा उडत उडत एकदा चक्क फ्लॅटमध्ये घुसले होते.
पाळिव असल्याने त्याला माणसाची भीती नसावी.(त्याला हाकलायचे अगणित चाळे केल्यावरही ते जागचे हलतही नव्हते, नुसते टकमका पाहत होते.) शेवटी त्याला दाणे टाकत गेलो. ते दाणे वेचीत वेचीत टेरेसबाहेर जाताच टेरेसचे काचेचे दार लावून घेतले. त्याने रोज टेरेसवर येणे आणि आम्ही दाणे टाकने हे नित्य झाले होते.(त्याच्याच थव्यातले इतर कबूतर इथे येत नसत, त्यांना मालकाने दिलेले खाणे पुरेसे होत असावे. हे माझ्यासारखेच खादाड असल्याने इथे समव्यसनी प्राण्याच्या शोधात पोचले असावे.)
एकदा एक मांसाहारी मित्र येउन कबूतराचे मांस उत्तम,चविष्ट असते असे म्हणत एकटक बघत कबूतराकडे जाउ लागला. तेव्हा उडालेले तो पक्षी पुन्हा कधीही ह्या टेरेसवर आलेला नाही.

मी अगोदर लालबागला रहायला होतो ५ मजल्यावर. पहिल्याच दिवशी रहायला गेल्यावर कळाले की तिथे एक कावळेबुवाही रहात होते माळ्यावर. खिडकीची काच तुट्लेली असल्याने त्यांना व्हीजाची गरज नव्हती.
मी घरात आलो की ते खिडकीच्या बाहेर तर जायचे पण मला घराबाहेर काढण्यासाठी तिथेच जोरजोरात ओरड्त बसायचे. तिथुन हाकलल तर परत परत यायचे. कधी तर आपले लक्ष न्सेल तर खिडकीतुन आत येउन डोक्यावर हल्लाही करायचे. मग मी काच बसवुन घेतली तरीही तो कावळा ३-४ महीने येत होता. न कंटाळता जोरजोरात ओरडायचा. निषेध करायचा. मग यायचा अचानक बंद झाला तर मलाच चुकल्यासारख वाटायचं.
अशीच शिरुरला माझ्या आईकडे एक मांजर आहे. ती रात्री-बेरात्री बाहेर जाते येते तिच्यासाठी खिडकी उघडी ठेवावी लागते. चुकुन बंद केली तरी ती दरवाजा उघडेपर्यंत ओरडत रहाते. हे तर ठीकच.
पण तिची खासीयत म्हणजे आमचा दुधवाला रात्री आठला येतो. मुख्य रस्त्यापासुन आमचे घर ३५०-४०० मीटर असेल. तर ही मांजर बरोबर दुधवाल्याला घ्यायला मुख्यरस्त्यावर हजर असते न चुकता. अगोदर मला आई सांगायची पण मला खरं वाटले नाही. मागच्या महीण्यात मी स्वतः हा अनुभव घेतला सलग २-३ दिवस. तो दुधवाला आतमधे वळाल्यावर ३-४ घरी दुध देतो. ही तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवुन. तो निघाला की ही त्याच्या पुढेच पण भरोसा अजिबात नाही, सारखे मागे बघणार तो आला की नाही. शेवटी आमचे घर पहील्या मजल्यावर तो जिना चढायला सुरवात करतो तोपर्यंत ही दोन वेळा त्याला बघायला जाते. हा तिचा नित्यनेम.
बरं एवढी मेहनत केल्यावर काय मिळतं तर १५-२० ग्रॅम दुध त्यात तेवढच पाणी घालुन. मी आईला म्हणालो ती एवढी आटापिटा करते दुधासाठी तर तिला बिनापाण्याच थोडं जास्त दुध का देत नाहीस.
आई म्हणाली ती काय लहान आहे का आता? तुला काय जातय सांगायला? ती माउ इतकी शहाणी आहे की तिला गरम चपाती भाकरी असेल तरच खाते. भेळ, फरसान अस काहीही तिला वर्ज नाही.

पैसा's picture

14 Oct 2011 - 8:04 pm | पैसा

प्रासकडचा कावळा मजेशीर आहे, तशाच वल्ली आणि पेठकर काकांनी सांगितलेल्या हकीकतीमधले कावळेही. कावळा हा कोणाला त्रास देणारा पक्षी नव्हे, पण कबुतरांचं एवढं कौतुक लोक का करतात कोणजाणे! आमच्या रत्नागिरीच्या बंद फ्लॅटच्या खिडक्यांवर कबुतरांनी घाणीचे केलेले ढीग साफ करताना अगदी वैताग येतो दर वेळी.

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2011 - 8:30 pm | प्रभाकर पेठकर

आमच्या रत्नागिरीच्या बंद फ्लॅटच्या खिडक्यांवर कबुतरांनी घाणीचे केलेले ढीग साफ करताना अगदी वैताग येतो दर वेळी.
माझ्याही पुण्यातल्या पहिल्या फ्लॅटचा, ह्या कबुतरांनी, सार्वजनिक संडास करून टाकला होता. तो फ्लॅट घेतल्या पासून वापरात नव्हता. आणि खिडकिची काच फुटली होती. आख्या फ्लॅट मध्ये कबुतरांची विष्ठा, पिसे आणि एक दोन मेलेली कबुतरे असा सगळा राडा होता.

तो फ्लॅट विकण्याआधी साफ सफाई करावी म्हणून मी बहिणीच्या मोलकरणीला घेऊन गेलो. फ्लॅट मध्ये फक्त आम्ही दोघेच, मी आणि ती मोलकरीण. फ्लॅटचे निरिक्षण झाल्यावर मला म्हणाली, 'साहेब, पँट काढा.' मी उडालोच एकदम. तिच्याकडे वळून बघतो तर लॉफ्टवरून एक जुनी पँट अर्धवट लटकत होती (कुणा पेंटरची होती ती). त्या कडे अंगुली निर्देश करून तीची मागणी होती. तिथपर्यंत तिचा हात पोहोचत नव्हता आणि साफसफाईला काही कपडा तिने आणला नव्हता.

हुश्श..! त्या दिवशी इज्जत वाचली माझी.

अनपेक्षित विनोद होता. मी उडालेच! नंतर हसून वाट लागली.

रत्नागिरीत फ़्लॅट आहेत आता?
जन्मल्यापासून चौदा वर्षं तिथे गेली.त्यालाही वीस वर्षं झाली.
मी खरंच खूप मागे सोडून आलो का माझ्या रत्नागिरीला.
भीती वाटली एकदम काळाची.


कावळ्यांचे इतके रंकज किस्से वाचुन पुन्हा पितृपक्ष चालु झाला की काय आशी पुसट शंका मनाला चाटुन गेली.

सगळेच किस्से सांगत आहेत तर आमच्याकडुनही एक किस्सा. (बहुतेक या आधी मिपावरच कुठल्याश्या धाग्यात सांगुन झाला आहे.)
तेव्हा मी बहुतेक यत्ता ६-७वी मध्ये होतो. आमच घर पहिल्या माळ्यावर होत. ईमारतीच्या मागच्या बाजुस एका आंब्याच्या झाडाची एक फांदी आमच्या बाल्कनी जवळ आली होती. त्यावर एका कावळ्याने घरट बांधुन संसार थाटला होता. अगदी घराची पहिली काडी जमवण्या पासुन आम्ही साक्षिदार होतो. तर त्याच बांधकाम चालु असताना थकुन भागुन स्वारी आमच्या बाल्कनीत विसाव्याला यायची. गंमत म्हणुन आईन एक दिवस त्याला खायला भाकर तुकडा आणि एका डबीत पाणी ठेवल. आणि नंतर तो नेमच झाला.
काड्या काड्यांनी कावळ्याच घरट साकारल. एका सुमुहुर्तावर एका कावळीला पटवुन, तिला घर दाखवायला घेउन आला. बहुतेक घर आवडल असाव तिला. त्यांचा संसार चालु झाला. नव्या नवरीला घेउन कावळे बुवांची बाल्कनी वारी चालु होतीच.
येथावकाश कावळी घरट्यातच बसुन राहु लागली. कावळेबुबा पोटापाण्याच्या उद्योगासाठी भटकंती करुन येत. एक दिवस कावळेबुबा चोचीत (त्याच्या) अंड्यांची रिकामी कवचं घेउन बाल्कनीच्या कठड्यावर आले. बहुतेक कौतुकाने घेउन आला असेल आपल्या वाढत्या संसाराची बातमी द्यायला.
पिल्ल झाल्यावर त्यांच्या भरवण्याचा कार्यक्रम पहाणे हा नित्याचा टाईम पास झाला. आमच्या घरुन त्यांना नित्यनियमाने शिधा मिळतच होता. हळु हळु पिल्लही मोठी होत होती. पंख फडफडवणे चालु होते.
एक दिवस माझ्या मनात काय कली संचारला माहित नाही. मी गमती गमतीत काही कागदाचे बाण केले आणि ते त्या घरट्याच्या दिशेन भिकावले. स्वतःच्या पिल्लांच्या जिवावर बेततय म्हटल्यावर कावळे बुवा बिथरले. रागा रागाने झाडाच्या खोडावर चोच आपटुन निषेध नोंदवु लागले. मला त्याची गंमत वाटली. मस्करीत अजुन एक पाउल पुढे टाकलं. बाणाच्या टोकाला आग लावली आणि भिरकावला. आता मात्र त्या कावळ्याचा संयम संपला सरळ माझ्या दिशेन झेपावला. मी टरकुन थोडा मागे झालो. आणि एक सणकुन धपाटा पाठीत बसला. कळवळुन मागे पाहिल तर आमच्या बहिणा बाई उभ्या होत्या.
तीन माझ्या कानाला धरुन आई बाबांपुढे उभ केल. पुढे काय झाल ते सांगण्या सारख नाही. :(

पण तेव्हा पासुन त्या कावळ्याने आमच्या बाल्कनीत येण सोडल. :(

रामायण महाभारत पाहून आमच्याही बालमनावर असे विपरीत परिणाम झाले होते! गमतीत छत्रीच्या काड्यांचा धनुष्य आणि बाण एकदा गच्चीतून दिसणार्‍या कावळ्याच्या घरट्यावर नुसते रोखले होते. लगेच एका कावळ्याने डोक्यावर अश्शी टोच मारली की जन्मभर आठवण राहिली.

विकास's picture

14 Oct 2011 - 9:35 pm | विकास

मस्तच निरीक्षण आणि फोटो आहेत!

कावळेबुवा आमच्या मागच्या दाराची कडी वाजवत होते आणि एक वेगळाच कण्ठरव करत होते. कावळ्याचा आवाज असा कधी ऐकू येईल यावर यापूर्वी माझा कधीच विश्वास बसला नसता पण मी स्वतःच्या कानानेच तो ऐकत होतो.

अहो तो त्या कावळ्याचा आवाज नव्हता, त्याच्या पोटातले कावळे ओरडत होते, त्याचा आवाज होता. ;)

बाकी वर गणपाने म्हणल्याप्रमाणे कावळ्याचे महत्व पितृपक्षादी कर्मांसाठीच नसावे, असे "पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे" ही ज्ञानदेवांची ओवी ऐकताना वाटते.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Oct 2011 - 10:38 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त लिहिले आहेस ...आवडला लेख

चित्रा's picture

15 Oct 2011 - 12:11 am | चित्रा

मस्त लेख, आणि सर्वांचे अनुभव आणि प्रतिसादही मस्त. मांजरीचा अनुभव वाचून चित्रच डोळ्यापुढे उभे राहिले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2011 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणि प्रतिसादही मस्तच.

[आमचीही कावकाव]

मस्त लिवल हाय... :)
कावळोबा लयं इंटलिजंट असतोया हे आमासनी लहान असानाच कळलं व्हतं ! आठवा बरं माठ=>पाणी=>चोचीने दगड्=>पाणी मिळाले वाली इष्टोरी. ;)

बाकी आपल्या पोटपुजेची सोय कुटं होईल हे प्राण्यांसनी बरुबर समजतया बघा...:)
समुद्राकाठी जाउन एक माणुस कासवांना आओ... आओओओ अशी हाक मारायचा, लगेच कासवं खाण्यासाठी पाण्याच्या बाहेर यायला सुरवात करायची :--- इति अमुल सुरभी मालिकेतला यक यपिसोड.