सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले. सीनीयर डॉक्टरसाहेबांना तिथून रोज त्यांच्या जुन्या दवाखान्यात जाणेयेणे कठीण होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो तोपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस करणे थांबवले होते. सकाळच्या वेळी त्यांच्या बंगल्यासमोरील अंगणात कोवळे ऊन खात आम्ही गप्पा मारत बसलो होतो. बंगल्याच्या गेटमधूनच एका माणसाने आरोळी ठोकली, "डॉक्टरसाब".
डॉ.कुंटे लगबगीने धावतच पुढे गेले. त्या माणसाला विचारले, "क्या हो गया? किसे तकलीफ है?"
त्याने विचारले, "डॉक्टरसाब घरमे है? उनसे अर्जंट काम है।"
डॉ.कुंटे त्याच्याकडे पहातच उभे राहिले. दोन तीन सेकंदांनंतर त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांनी मुलाला हाक मारली, "राजा, बाहेर तुझ्याकडे कोण आले आहे बघ रे !"
माझ्याकडे पहात पण विषण्णपणे स्वतःशीच पुटपुटले, "ढळला रे ढळला दिन सखया". संध्याछायांची होणारी ही जाणीव नक्कीच हेलावणारी होती.
सन १९९० चा सुमार - माझे दुसरे एक जवळचे आप्त वयाच्या सत्तरीकडे झुकले होते. वयोमानानुसार काही दुखणी मागे लागली असली तरी ते तसे टुणटुणीत होते. त्यांच्याहून वयाने दोन चार वर्षांनी मोठी किंवा लहान असलेली गावातली ज्येष्ठ मंडळी एक एक करून हळू हळू कमी होत होती. त्या सर्वांनी त्या लहान गावात उभा जन्म घालवलेला असल्यामुळे अर्थातच ती सगळी मंडळी जवळ जवळ रोज भेटत असत, करण्यासारखा दुसरा कोणता उद्योगच नसल्यामुळे रिकामा वेळ घालवण्यासाठी ते नेहमी एकमेकांकडे जात येत असत. त्यामुळे अचानक त्यातल्या एकाद्याला वरून बोलावणे आले तर बाकीच्यांना असह्य धक्का बसत असे. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो असतांना गावात अशीच एक घटना घडली होती. समाचाराला आलेली मंडळी बोलत होती, "अप्पांचं तसं सगळं झालं होतं, मुलं मार्गाला लागली होती, मुली सासरी नांदत होत्या, नातवंडांचं सुखही त्यांनी पाहिलं होतं, आता कुठली जबाबदारी त्यांच्यावर नव्हती .... वगैरे वगैरे". घरात आणि शेजारीपाजारी होत असलेल्या चर्चांमध्ये याचेच प्रतिध्वनी कानावर येत होते.
ते ऐकतांना माझ्या आप्ताच्या चेह-यावरले भाव मी पाहिले आणि मनात एकदम चर्र झाले. त्यांची पत्नी पूर्वीच अकाली स्वर्गवासी झाली असल्यामुळे ते एकटे झाले होते. त्यांच्याही मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या सासरी गेल्या होत्या, मुलाचे लग्ने होऊन सून घरी आली होती. आता घरातला आणि व्यवसायातला सर्व कारभार त्यांनी हातात घेतला होता. सर्व मुलामुलींनी 'हम दो हमारे दो' चा कोटा पूर्ण केलेला होता आणि ते आपापल्या चौकोनात सुखात होते, तसेच आपापल्या वाटांनी प्रगतीच्या मार्गावर चालत होते. त्यामुळे माझ्या या ज्येष्ठ आप्तांना आता आपली जगाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे की काय असे मनातून वाटले असावे. त्यांनी तसे बोलून दाखवले नसले तरी मला त्यांच्या चेहे-यावर ते दिसले असे निदान मनातून वाटले. पण माझ्याहून वयाने वीस वर्षांहून मोठ्या असलेल्याला मी कसले काउन्सलिंग करणार असा विचार करून मी काही बोललो नाही. पण त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमकुवत झालेली असावी. त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
जयवंत दळवी यांच्या संध्याछाया या नाटकाने अमाप लोकप्रियता मिळवली होती, तसेच अनेकांना अंतर्मुख केले असेल. ते नाटक आले त्या काळात मी वयाच्या माध्यान्हावरून किंचित पुढे सरकत होतो. आपल्या भविष्यकाळाची चाहूल लावणारे आणि त्याबद्दल अनिश्चिततेची शंका मनात उठवणारे हे नाटक होते. कदाचित त्यामुळे ते जास्तच प्रभावशाली वाटले, आतपर्यंत चटके लावत गेले. त्यानंतर 'तू तिथे मी', 'अवतार', 'बागबान' वगैरेसारख्या चित्रपटांची लाट येऊन गेली. "आमची मुले तशातली नाहीत हो" असे सांगायला ठीक असले तरी आत कुठे तरी थोडा हादरा बसल्याशिवाय रहात नव्हता.
ते सहन करत करत आणखी वर्षे गेली. लहान गावातल्या काळ्या मातीत रुजलेली मुळे आम्ही आपल्या हाताने कधीच नष्ट करून टाकली होती. मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या घरातल्या चिनी मातीच्या बरणीत लावलेल्या मनीप्लँटसारखे आमचे जीवन होते. वरवर कितीही वाढतांना दिसली तरी ती सगळी वाढ दुस-यांच्या आधारावर ! त्या झाडांच्या जेमतेम बोटभर आकाराच्या मुळांमध्ये झाडाला आधार देण्याची शक्ती कुठे होती? नोकरीत असतांनासुध्दा परगावी बदली होण्याची टांगती तलवार डोक्यावर होतीच. बढती होऊन वरचा दर्जा मिळाला की पहिले निवासस्थान सोडून तिकडे जात होतो. म्हणजे पुन्हा नवी मुळे फुटावी लागत होती. अखेर सेवानिवृत्तीनंतर चंबूगबाळे आवरून तो परिसरच सोडावा लागणार हे माहीतच होते. ते ही करावे लागलेच. नव्या जागेत नवे आधार शोधले.
पण म्हणून काय झाले? आता संध्या छाया दिसायला लागल्या असल्या तरी त्यांना भ्यायचे काय कारण आहे? उन्हाची रणरण संपली आहे. या लांबत जाणा-या सावल्यांचा मजेदार खेळ निवांतपणे पहावा. आजूबाजूच्या निसर्गाचे सौंदर्य संधीप्रकाशात जास्तच खुलून दिसते. आपल्याकडले ज्ञान आणि अनुभवांचे मधुघट कोणाला देऊन रिकामे होणारे नाहीत, उलट त्यात दिवसे दिवस आणखी काही थेंब जमा होत राहणार आहेत. मागचा आठवडा देण्याचे सुख (जॉय ऑफ गिव्हंग) चा होता म्हणे. तेच तर आता चालले आहे. आज ज्येष्ठ नागरिक दिवस आहे असे ऐकले. म्हणजे काय ते काही समजले नाही. पण या दिवशी माझ्या सहवयस्कांना मला एवढेच सांगावेसे वाटते की संध्याछायांना भिऊ नये. त्यांना धीटपणे सामोरे जावे, त्यांच्या बदलत जाणा-या आकारांची मजा लुटावी आणि देण्याचा आनंद घ्यावा.
प्रतिक्रिया
1 Oct 2011 - 5:35 pm | नितिन थत्ते
आवडले.
1 Oct 2011 - 5:38 pm | मी-सौरभ
मस्त लेख...
1 Oct 2011 - 6:07 pm | स्वाती२
आवडले.
1 Oct 2011 - 6:09 pm | जाई.
लेख आवडला
1 Oct 2011 - 6:49 pm | शुचि
फारच छान लेख. पण आचरणात आणने कठीण असावे. अर्थात जर समवयस्क मित्रपरिवार असेल तर ही संध्याकाळची वेळ सुसह्य होत असावी.
दळवींचे नाटक वाचले आहे. टचींग आहे.
1 Oct 2011 - 8:44 pm | आनंद घारे
सुसह्य असे म्हणण्याचा अर्थ आपल्याला काही तरी खूप सहन करावे लागते असा होतो. ते तर सर्वांनाच करावे लागते. तरुणांची सुद्धा त्यातून सुटका नसते.
सुसह्य म्हणतांना आपण रिअॅक्द्टिव्ह विचार करतो. माझे असे मत आहे की तसे न करता प्रोअॅक्द्टिव्ह विचार करायला हवा.
1 Oct 2011 - 7:09 pm | प्रियाली
पण उन्हाची रणरण प्रत्येकाच्या आयुष्यात या वयात संपतेच असे नाही. :) बहुधा, ज्यांच्या आयुष्यात ती संपत नाही त्यांचा थोडासा थकलेला, विन्मुखलेला प्रवास सुरूच राहत असावा आणि काळजीचे डोंगर उभे राहत असावेत.
1 Oct 2011 - 8:30 pm | आनंद घारे
पण उन्हाची रणरण प्रत्येकाच्या आयुष्यात या वयात संपतेच असे नाही
जीवनाचा संघर्ष आयुष्यभर चालतच असतो. जुन्या समस्या सुटल्या तर नव्या उभ्या रहात असतात. शारीरिक व्याधी जडतात. त्या सहन कराव्या लागतात. माझ्या लेखाचा भर मनाच्या उभारीवर आहे. "आता आपल्याला काही करायला शिल्लक राहिले नाही" किंवा "आता आपण काहीच करू शकत नाही" अशा नकारात्मक विचारांना थारा न देता आता आपण काय करू शकतो त्याचा विचार केला तर जीवनाची संध्याकाळ सुखावह वाटू शकते आणि तसा प्रयत्न करावा असे मला सांगायचे आहे. कदाचित ते लेखात स्पष्ट झाले नसेल.
1 Oct 2011 - 8:31 pm | प्रभाकर पेठकर
एखाद्याने सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत, सर्व सुख उपभोगले आहे आणि आता तो मृत्यूला सामोरे जाण्यास मुक्त आहे असे इतरांना वाटणे आणि तसे त्याला स्वतःला वाटणे ह्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. आपल्या तशा भावना शब्दात व्यक्त करणारे अनेक जणं असतात पण काय खरोखर ते त्या भावनांना प्रामाणिक असतात? उतारवयात विशेषतः शरीर प्रकृती धडधाकट म्हणण्याइतकी दणकट नसते तेंव्हा प्रत्येकवेळी शरीरात कुठे जरी 'खुट्ट' झालं तरी मन धास्तावतं. आता, 'माझी वेळ जवळ आली' ही भावना इंच इंच करत दरीच्या टोकावर नेऊन पोहोचवत असते.
ज्यांनी वरील सर्व मनाने स्वीकारलेले असते त्यांची देवाला एकच प्रार्थना असते, 'देवा, शेवट यातनामय करू नकोस. मला आणि माझ्यामुळे इतरांना कंटाळा येई पर्यंत माझे आयुष्य ओढू नकोस. मी यायला तयार आहे. शांत पणे झोपेत असताना घरातच मृत्यू येऊ दे.' दुर्दैवाने देव सगळ्यांचे ऐकतोच असे नाही.
ही शेवटची काही वर्षे समाधानात व्यतीत करण्यासाठी, व्यस्त राहण्यासाठी स्वतःला आवडेल अशा छंदात जगण्याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळच्या रम्य वेळी समवस्कांनी एकमेकांचे मन रमवित रपेट करावी, दुपारी (आवड असेल तर) वाचन आणि अल्पशी वामकुक्षी घ्यावी. मुलांच्या संसारात जमेल तशा लहान मोठ्या जबाबदार्या उचलून त्यांच्या संसाराला मदत करावी. जेणे करून आपण कामात व्यस्त राहून रिकाम्या वेळी मनाला भिववणारे विचार दूर राहतील.
आहार, विहार आणि डॉक्टरांनी सांगितली औषधे वेळच्यावेळी घ्यावीत.
संध्याछायेच्या सर्वांना शुभेच्छा....!
1 Oct 2011 - 8:39 pm | चिंतामणी
लहान गावातल्या काळ्या मातीत रुजलेली मुळे आम्ही आपल्या हाताने कधीच नष्ट करून टाकली होती. मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या घरातल्या चिनी मातीच्या बरणीत लावलेल्या मनीप्लँटसारखे आमचे जीवन होते. वरवर कितीही वाढतांना दिसली तरी ती सगळी वाढ दुस-यांच्या आधारावर !
फारच छान.
1 Oct 2011 - 8:39 pm | ईन्टरफेल
फारच छान लेख आवडला
1 Oct 2011 - 9:08 pm | चित्रगुप्त
.....आता आपल्याला काही करायला शिल्लक राहिले नाही किंवा आता आपण काहीच करू शकत नाही......
याखेरीज "आता कुणाला आपली गरज वाटत/राहिली नाही" ही भावना फार क्लेशदायक वाटते (याचीच पुढली पायरी म्हणजे आता आपण नकोसे झालेले आहोत, असे वाटू लागणे).
आपली कुटुंबियांसाठी वा इतरांसाठी खूप काही करण्याची इच्छा आणि उभारी ही त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळू लागले, तर खचू लागते.
मुलाबाळांच्या जबाबदारीत आयुष्य खर्ची घालताना स्वतःच्या लहान सहान इच्छा राहून गेलेल्या असतात, त्या आता पूर्ण कराव्याश्या वाटत असतात, पण बरेचदा तसे करता येत नसते. (माझ्या वडिलांचे एक वृद्ध मित्र अंध झालेले होते, त्यांना डोसा खावासा वाटे (त्याकाळी इंदुरात फक्त एकाच ठिकाणी दोसा मिळायचा) मुले वगैरे त्यांना घेऊन जात नसावीत, किंवा हेच त्यांना सांगत नसतील. माझे वडील त्यांना भेटायला गेले, की त्यांना लांब असलेल्या उपहारगृहात हळू हळू हात धरून नेत असत).
वृद्ध लोकांना कुणाशी तरी बोलावे, आपले कुणीतरी ऐकावे, असे वाटत असते, परंतू त्यात इतरांना स्वारस्थ्य नसल्याचे जाणवणे ही पण एक क्लेशदायक बाब.
जिएंनी 'घर' या कथेत अश्या अनेक गोष्टींचे प्रभावशाली चित्रण केलेले आहे.
2 Oct 2011 - 1:36 am | प्रभाकर पेठकर
खूप जणांना मी आणि माझे ह्यातून बाहेर पडता येत नाही. माझं घरातील, संसारातील, मुलांच्या आयुष्यातील महत्त्व कमी होता कामा नये अशी भावना असते. अशा भावनेपोटीच आपल्या अढळ(?) स्थानाला ते घट्ट चिकटून राहायचा प्रयत्न करतात. ह्या प्रयत्नात आपण वयात आलेल्या मुलांच्या भावनांचा, आणि आपल्या इतक्याच वृद्ध झालेल्या पत्नीचा विचारही करत नाही व ह्या आपल्या अयोग्य वर्तणूकीने आपण त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच करत आहोत हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. मग त्यांच्या थंड प्रतिसादातून येणारी उद्विग्नता त्या ज्येष्ठाला क्लेशकारक होते. ह्यावर त्या वेळेस तसा तात्कालीक उपाय नसतो. किंवा तो उपाय जास्त त्रासदायक होतो. (कारण मनाविरुद्ध वागावे लागते). तर त्याची पूर्व तयारी मध्यमवयात असतानाच करायची. आपण कार्यरत असतानाच मनाने निवृत्तीची तयारी करावयास घ्यायची. ह्यालाच वानप्रस्थाश्रम म्हणतात असे वाटते. ऐहिक आयुष्यात राहूनही मोहातून हळू हळू काढता पाय घ्यायचा. ह्याची मनाला सवय झाली की प्रत्यक्षात येणारे निवृत्त आयुष्य तितके जड जात नाही.
कोणाला आपली गरज नाही, आपण इतरांना नकोसे झालो आहोत असा निराशावादी विचार मनात आणण्याऐवजी, आता जो मोकळा वेळ हातात आला आहे. तो वेळेअभावी न जमलेल्या एखाद्या छंदास जोपासण्यासाठी वापरावा. शारीरिक पंगुत्त्वामुळे एखादी गोष्ट जमण्यासारखी नसेल तर कुढत न बसता दूसरा काही मार्ग शोधावा.
विचार तर पक्के आहेत, प्रत्यक्ष वेळ येईल तेंव्हा काय काय जमते आहे ते पाहावे लागेल. तो पर्यंत (अजून २० वर्ष) मिपा असेल तर त्यावेळी प्रत्यक्ष परिस्थितीचे वर्णन टाकिनच मिपावर.
सर्वांना शुभेच्छा.
1 Oct 2011 - 9:35 pm | क्रेमर
लेखन व लेखनातील संदेश दोन्ही आवडले.
1 Oct 2011 - 9:48 pm | पैसा
ही वेळ प्रत्येकावरच येणार आहे तर आनंदाने या घटनेचं स्वागत करावं हा दृष्टीकोनही आवडला.
1 Oct 2011 - 10:17 pm | मोहनराव
लेख आवडला.
संध्याछायांची होणारी ही जाणीव विलक्षण असते आणि कोणीही ती थांबवु शकत नाही. पण येणारा प्रत्येक क्षण हा या जाणीवेचा विचार करण्यापेक्षा मन कशामधेतरी (वाचन, अध्यात्म...) गुंतवणे महत्वाचे.
2 Oct 2011 - 12:38 am | श्रावण मोडक
लेख आवडला.
2 Oct 2011 - 2:35 am | राजेश घासकडवी
आनंद घारे हे नाव खूप दिवसांनी बोर्डावर दिसलं हा आनंद लेख वाचून द्विगुणित झाला.
अत्यंत ओघवत्या भाषेत, साध्याच पण प्रभावी शब्दांमध्ये तुम्ही नेहमीच मांडता. तांत्रिक विषय मांडताना क्लिष्ट सूत्रांचा, संज्ञांचा भडिमार नाही आणि अशा जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिताना भावना पिळवटून काढणारे चरक नाहीत. जे आहे ते, जसं आहे तसं लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे. कणभरही अभिनिवेश दिसत नाही. मला वाटतं तुम्ही खरोखरच मनापासून वाचकाशी संवाद साधता, म्हणूनच इतकं निखळ, स्वच्छ लेखन येतं. तुमच्याकडून परिणामकारक लेखनाबाबतीत खूप शिकण्यासारखं आहे.
2 Oct 2011 - 8:25 am | रेवती
लेखन आवडले.
मनात काहीतरी जड झाल्यासारखं वाटलं.
2 Oct 2011 - 11:34 am | तिमा
लेखात व पेठकरांच्या प्रतिक्रियेत व्यक्त झालेल्या विचारांशी सहमत आहे. संध्याछायांची भीति वाटण्याचे काही कारण नाही. आपला उपयोग आप्तांना वा समाजाला होत असेल तर त्याला वाहून घ्यावे. आणि अडगळ होत असेल तर शक्यतो स्वतंत्र, किंवा अन्य काही कारणांमुळे ते शक्य नसल्यास, अलिप्तपणे रहायला शिकावे. विचारल्याशिवाय आपले मत कधीच देऊ नये. वर म्हटल्याप्रमाणे 'मी मी, माझे माझे, मला मला,' हे सोडले तर बाकीच्यांची कमीतकमी अडचण होईल.
2 Oct 2011 - 12:14 pm | मुक्तसुनीत
लेख , त्याची शैली, त्यातले विचार सर्वकाही आवडले. राजेश घासकडवीने अतिशय समर्पक शब्दांत त्याच्या गुणांचे विवेचन केलेले आहे.
वृद्धत्वाची अवस्था, त्याबद्दलचे विचार , त्याबद्दलचे भाष्य हा एक सार्वकालिक विषय आहे. लेखामधे जो सकारात्मक दृष्टीकोनाचा विचार मांडला आहे तो सर्व गोष्टींप्रमाणे वृद्धत्वालाही लागू आहेच. परंतु, आयुष्याच्या या अवस्थेमधे नव्याने अंगिकारायला तो कठीण पडत असणार याचीही मी कल्पना करू शकतो.
लेखामधे मांडलेली वृत्ती (जिचा उल्लेख पु ल देशपांड्यांनी आपल्या सुरेख शैलीत "छान पिकत जाणारे म्हातारपण" असा केलेला आहे) अंगिकारता न येण्याची कारणं ही शेवटी आयुष्याबद्दलच्या न सुटणार्या आसक्ती, अतृप्तीमधे शोधणं अनिवार्य ठरतं. जी गोष्ट एखाद्याच्या तरुणपणी विसंगत, चीड आणणारी वाटू शकते ती एखाद्या वृद्धाच्या ठायी पाहून दयेस पात्र असलेली वाटते. इसापाने लिहिलेल्या अनेक नीतीकथा लहानपणी वाचल्या होत्या त्या तेव्हा जराही न समजता आताआता उमजू लागल्या त्यापैकी एक अत्यंत भेदक सत्य सांगणारी आहे : "एकदा मृत्यूची देवता आणि कामदेवता एकाच गुहेमध्ये एकमेकीना भेटल्या आणि गप्पा मारता मारता तिथेच निजल्या. दोघींच्याही बाणांचे भाते जमिनीवर शेजारी शेजारी पडलेले होते आणि जेव्हा दोघी उठून आवराआवर करून निघून गेल्या तेव्हा एकमेकांचे बाण एकमेकींच्या भात्यात चुकून मिसळून गेले. तात्पर्य , तेव्हापासून कधीकधी तरुण माणसांचे अकाली मृत्यू ओढवलेले पहायला मिळतात तर काही वृद्ध व्यक्ती वासनेने बरबटलेल्या आहेत असं दिसतं. " इसापाच्या अनेक कथांप्रमाणे या कथेतलं भाष्य अधिकाधिक वेदनामय , भेदक रीतीने प्रत्ययाला येताना आपण पहातो.
लेखामध्ये उपेक्षेच्या अंधारात घुसमटणार्या वृद्धावस्थेचे वर्णन आलेले आहे. क्वचित् प्रसंगी याच्या विरुद्ध असलेली अवस्था अनुभवास येते हे नमूद करतो. आठवा, "सिंहासन" सिनेमातले श्रीराम लागूंच्या दाभाडेचे आणि त्यांच्या सुनेच्या संबंधांचे स्वरूप. बाह्यतः कुठेही लैंगिकतेचे चित्रण नाही ; तसे सूचनही नाही. मात्र सून आपल्या सासर्याची हिरो-वर्शिप करते आणि (बहुदा सामान्य वकूब असलेला) दाभाड्यांचा मुलगा हे मूकपणे पहाण्यापलिकडे काही करत नाही. फार कशाला, भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक प्रसिद्ध अमिताभ बच्चन यांचंच उदाहरण घेऊ. सत्तरी आली तरी कामाच्या, पैशाच्या, प्रसिद्धीच्या बाबतीत कसलीच कमतरता नाही ; परंतु त्यांच्या मुलाकडे फार काम नसल्याचं चित्र आहे. "सिनियर बच्चन" (या नावाने ते ब्लॉग लिहितात !) यांना यावयातही आपले नाणे वाजवून घेताना .प्रसिद्धीच्या शिखरावर असताना कुठतरी हे खुपत नसेल काय ?
असो. लेख आवडलाच. दळवींच्या नाना-नानी बरोबरच शेक्स्पियरच्या लियरची (पर्यायाने गणपतराव बेलवलकरांचीही !) , गडकर्यांच्या धुंडिराजाची , (बहुदा माधव जूलियन यांच्या ) "वृद्धकवी" नावाच्या कवितेतल्या "का उठता बसा तरुण मंडळी / का व्यर्थ उपचार हा , समताच योग्य या स्थळी" या सुरवातीच्या ओळींची आठवण झाली. अगदी "लगे रहो मुन्नाभाई" सिनेमा मधल्या "आने, चार आने बचे हैं, सुन ले मिस न करना यार" असा गमतीदार संदेश देणार्या गाण्यांचे संदर्भ मनात जागे झाले. लेखाबद्दल आभार.
ताजा कलम : वृद्धत्वाचा विषय निघाल्यावर "ज्याच्या सारखे वृद्ध होता आले तर आपण भाग्यवान ठरू" असं ज्यांच्याबद्दल वाटतं त्या विंदा करंदीकरांबद्द्ल सांगितल्या शिवाय रहावत नाही.
त्यांनी आपल्या एका रसिक मित्राच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता पहा .शीर्षक आहे "साठीचा गझल" !
सारे तिचेच होते,सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.
आम्हीहि त्यात होतो-- खोटे कशास बोला--
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !
उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी !
दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !
जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !
प्रत्यक्ष भेटली का ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी !
हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !
------------------------------------------------------------------------------------
आणि सर्वात शेवटी याच "गोड म्हातार्याची" कविता, जी वृद्धापकाळासाठीच काय पण सर्वत्र, सार्वकालिक आणि कुठल्याही अवस्थेसाठी लागू आहे :
2 Oct 2011 - 3:32 pm | मोहनराव
आपला प्रतिसाद फारच उत्तम आहे.
यावरुन अजुन एक झी टीव्ही मालि़केची- "श्रीयुत गंगाधर टिपरे" आठवण होते. प्रभावळकरांनी वृद्धाची उत्तम भुमीका केली आहे. येणार्या प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक द्रुष्टीकोनातुन पाहुन हसतखेळत आयुष्याचे क्षण घालवताना इथे दाखवलेले आहे. अर्थात बाकी इतके चांगले कुटुंब मिळण्याचे भाग्य सुद्धा पाहिजे म्हणा!!
2 Oct 2011 - 12:17 pm | स्मिता.
लेख आवडला... म्हणजे लिखाण आवडले.
पण लेखाचा विषय मात्र अंतःकरण जड करणारा आहे.
आपल्या अजूबाजूच्या वृद्धांची मनस्थिती आणि अनेक वर्षांनंतर का होईना आपल्यालाही त्या अवस्थेतून जायचे आहे या विचारांनी मन अस्वस्थ झाले.
2 Oct 2011 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घारे साहेब, लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
2 Oct 2011 - 3:55 pm | यशोधरा
प्रकटन फार आवडले. साध्या, मोजक्या शब्दांतले प्रामाणिक विचार.
2 Oct 2011 - 5:29 pm | गणपा
खूप दिवसांनी घारेकाकांच लेखन वाचायची संधी मिळाली.
काका मुक्तक आवडले.
2 Oct 2011 - 6:02 pm | अनिवासि
लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या.
मुक्तसुनितानी दिलेलि विन्दा ची कविता तर फारच भावली.
धन्यवाद
2 Oct 2011 - 7:48 pm | नरेश_
अतिशय अंतर्मुख करणारे तरीही सकारात्मक दृष्टीकोन देणारे लेखन, म्हणूनच आवडले. अभिनंदन, काका !
लेख वाचून क्षणभर वयोवृद्ध वडिलांच्या जागी स्वतःला कल्पून पाहिले... खरंच मुलं,रुढ अर्थाने कितीही गुणी वगैरे असली तरी कुठेतरी अन्याय हा होतो असं म्हणायला नक्कीच वाव असतो .मायेचे एकेक सहचर/सवंगडी पैलतीरी निघून जात असताना, मनाला आवर घालणे तसे कठीणच. अनेकांचे मरण व शेवटच्या काही दिवसातील डोळ्यांमधील भाव याचि डोळा बघितले असल्याने, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे सर्वांनाच जमते / जमेल असं नाही, असं नमूद करावेसे वाटते.
बाकी लेख आवडला हे वेगळे सांगत नाही !!
2 Oct 2011 - 7:55 pm | चतुरंग
अत्यंत संयत, अभिनिवेशरहित, सहज लिखाणाचा उत्कृष्ट नमुना.
इतर बर्याचशा गोष्टींप्रमाणेच वृद्धत्त्वही एकदम येत नाही. हळूहळू पिकत जाणारी माणसे आजूबाजूला आपण सारेच बघत असतो परंतु त्यांच्या मनोभूमिकेत जाऊन विचार करतोच असे नाही. आपल्या वाढत्या वयानुसार तो करायला लागणे जरुरीचे आहे असे वाटते. वृद्ध लोकांना भेडसावणारे प्रश्न आपल्याला त्यावेळी कसे त्रासदायक ठरणार नाहीत किंवा निदान कमी त्रासदायक ठरतील असे बघितले पाहिजे. आपला वेळ आणि शारीरिक, मानसिक ऊर्जा योग्यप्रकारे कशी वापरली जाईल हे बघणे आवश्यक.
वृद्धांशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. चटकन आठवणारे एक उदाहरण सावरकर आजोबांचे. त्यांच्याशी बोललो आणी एका लेखमालिकेचा अचानक जन्म झाला. अनेक चांगल्या आठवणींची नोंद मी वाचकांसाठी उपलब्ध करु शकलो. हे लेखन प्रसिद्ध झाले आणि एकाच वर्षात सावरकर आजोबा गेले.
बोललो नसतो तर केवढ्या ठेव्याला मुकलो असतो असे वाटत राहते.
'संध्याछाया भिवविति हृदया' हे 'संध्याछाया रमविति हृदया' कसे होईल याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.
(माध्यान्हीचा) रंगा
2 Oct 2011 - 8:50 pm | चित्रा
लिखाण आवडले. जरी लेखाचा विषय मनाची चलबिचल करणारा असला तरीही.
बाकी वर अमिताभ बच्चन यांचा विचार आला आहे. बच्चन कुटुंबाबद्दल, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. पण अमिताभ यांना आज जर मागणी आहे तर त्यांनी ती मुलासाठी बाजूस ठेवावी का? देव आनंद इतकी वर्षे चित्रपट का काढत राहिला? लता- आशा आज या वयातही का गात होत्या? त्यांनी गाणे थांबवावे का?
कसलीही आसक्ती नको असे म्हणणे सोपे आहे पण कामे न केल्याने येणारा एकाकीपणा अधिक वाईट असतो असे मला वाटते. शिवाय ज्या कामांची आयुष्यभर सवय नाही अशी कामे आणि सवयी अचानक लावून घेणे अवघड असते. जी कामी आयुष्यभर ओळखीची असतात तीच वृद्ध झाल्यानंतर केली जातात. तेव्हा तरुणपणातच चांगल्या, आणि घरगुती कामांची सवय लावून घेणे हे इष्ट ठरेल असे वाटते.
2 Oct 2011 - 9:21 pm | मुक्तसुनीत
बाकी वर अमिताभ बच्चन यांचा विचार आला आहे. बच्चन कुटुंबाबद्दल, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. पण अमिताभ यांना आज जर मागणी आहे तर त्यांनी ती मुलासाठी बाजूस ठेवावी का? देव आनंद इतकी वर्षे चित्रपट का काढत राहिला? लता- आशा आज या वयातही का गात होत्या? त्यांनी गाणे थांबवावे का?
कुणीही आपले काम थांबवावे असं कुठे म्हण्टलेलं मला आठवत नाही. अनेकविध व्यक्तींना एकत्र आणताना अनेक मुद्द्यांचा घाऊक प्रमाणात विपर्यास तर होत नाही ना ?
मुद्दा आपल्या मुलांच्या अपेशाबद्दल एखाद्या यशस्वी वृद्ध व्यक्तीला वाटू शकणार्या वैषम्याबद्दल आहे. तिथे "क्वचित घडणार्या घटनांमधे" याची वर्गवारी केली गेलेली आहे.
बाकी देव आनंद इतकी वर्षे चित्रपट का काढत राहिला , किंवा मंगेशकर भगिनी का गात होत्या किंवा अमुक कुणी कामच का केले वगैरे प्रश्न विचारण्याइतपत धैर्य अस्मादिकांपाशी असते तर आणखी काय हवे होते ? ;-)
कसलीही आसक्ती नको असे म्हणणे सोपे आहे पण कामे न केल्याने येणारा एकाकीपणा अधिक वाईट असतो असे मला वाटते. शिवाय ज्या कामांची आयुष्यभर सवय नाही अशी कामे आणि सवयी अचानक लावून घेणे अवघड असते. जी कामी आयुष्यभर ओळखीची असतात तीच वृद्ध झाल्यानंतर केली जातात. तेव्हा तरुणपणातच चांगल्या, आणि घरगुती कामांची सवय लावून घेणे हे इष्ट ठरेल असे वाटते.
१. "कसलीही आसक्ती नको" असे ( सोप्पे) विधान कुठे केल्याचे स्मरत नाही.
२. "एकाकीपणा वाईट म्हणून आसक्ती चांगली" असा मुद्दा असेल तर माझी असहमती जाहीर करतो. :)
मुकेश माचकरांचा हा , आजच प्रकाशित झालेला लेख मननीय आहे. आनंद घारे आणि माचकर यांना टेलीपथी झाली होती का काय ! :)
http://aarsaa.blogspot.com/2011/10/blog-post.html
2 Oct 2011 - 10:07 pm | चित्रा
घाऊक प्रमाणात विपर्यास करण्याचा हेतू नव्हता.
यांना यावयातही आपले नाणे वाजवून घेताना .प्रसिद्धीच्या शिखरावर असताना कुठतरी हे खुपत नसेल काय ?
यातून वैषम्य आले आहे असे सूचित करायचे आहे असे वाटले नाही. पण माझी समजून घेताना चूक झाली असावी.
१. "कसलीही आसक्ती नको" असे ( सोप्पे) विधान कुठे केल्याचे स्मरत नाही.
तुम्ही असे विधान केले असे मी म्हटलेले नाही. हे अनेकदा वृद्ध माणसांविषयी बोलताना जनरलायजेशन होत असते, याला मी दिलेले उत्तर आहे असे समजावे. तुमच्या मुद्याशी संबंध येऊ नये म्हणून परिच्छेद वेगळा केला.तरी स्पष्ट लिहायला हवे होते असे वाटते आहे. हे बोलण्यामागे बर्याच अंशी व्यक्तिगत अनुभव आहेत त्याची येथे चर्चा करत नाही.
२. "एकाकीपणा वाईट म्हणून आसक्ती चांगली" असा मुद्दा असेल तर माझी असहमती जाहीर करतो.
आसक्ती याचा अर्थ आपण कसा घेत आहोत? माझ्या दृष्टीने आसक्त राहून (पैसा मिळवणे, मानमरातब, इ मिळवणे या इच्छेने) काही काम करणे हे कधीही बरे असते. आसक्तीने माणसे मरताना पाहिलेली नाहीत, एकाकीपणातून माणसे मरताना पाहिली आहेत. पण तुम्ही असहमत असलात तरी माझी हरकत नाही. कदाचित मी आपले म्हणणे पटवून घेऊ/देऊ शकत नाही असे असावे.
2 Oct 2011 - 10:18 pm | मुक्तसुनीत
आसक्तीबद्दल : माझ्या मते कार्यरत रहाणे महत्त्वाचे. पैसा-मानमरातब-प्रसिद्धी यांच्या तृष्णेने कार्यरत रहाणे म्हणजे आसक्तीच्या धोक्याच्या मार्गाने जाणे आहे. देव आनंद ८८ व्या वर्षी कसे विदूषकी चाळे करतात याचं माचकरांच्या लेखातलं वर्णन विनोदी नव्हे तर दयनीय आहे. असा हपापलेपणाचा रस्ता बर्याचदा हास्यास्पदतेकडे जातो हे निराळे सांगायला हवे काय ?
एकाकीपणा आणि आसक्ती यांच्यात काही झिरो-सम गेम आहे असं मला व्यक्तिशः वाटत नाही. एक आहे म्हणजे दुसरं अस्तित्वात असूच शकत नाही अशी परिस्थिती मला तरी वाटत नाही. माणसं एकाकीपणामुळे मरतात हे फारच सर्वसामान्य सत्य आहे. त्याचा संबंध वृद्धत्वामधल्या मॅचुरिटीशी, आसक्तीरहित कार्यरत असण्याशी तंतोतंत लावता येणार नाही. या अर्थाने माझी असहमती मी विशद करतो.
3 Oct 2011 - 5:17 am | चित्रा
>त्याचा संबंध वृद्धत्वामधल्या मॅचुरिटीशी, आसक्तीरहित कार्यरत असण्याशी तंतोतंत लावता येणार नाही.
आसक्तीरहित कार्यरत? :) प. पू. मुसुबुवांचे गीता प्रवचन सुरु झाले का काय? (कृपया हलके घेणे).
बाकी घारे यांचा लेख आवडला, आणि प्रतिसाद सर्वच वाचनीय आहेत, अधिक अवांतर नको म्हणून इथे चर्चा थांबवते.
3 Oct 2011 - 5:56 am | मुक्तसुनीत
चला , निदान "सोप्प्या विधानांच्या" लेबलपासून एकदम प.पू. चे लेबल मिळवेपर्यंतचा प्रवास तरी झाला आमचा ! एकंदर आतला समतोल ठीक आहे याचीच पावती मिळाली म्हणायचे. ;-)
3 Oct 2011 - 1:26 pm | श्रावण मोडक
आसक्तीरहित कार्यरत? असा प्रश्न चित्राला पडला आहे. मला तो प्रश्न पडला नाही. कसलीही आसक्ती नसतानाही माणूस कार्यरत राहू शकतो, असा मी त्या शब्दद्वयीचा अर्थ घेतला. माझे चूक असू शकते. तसे असल्यास चित्राचा प्रश्न बरोबर. खरे तर चर्चा चालू ठेवली पाहिजे तुम्ही. एरवी वावदूक बरेचसे आम्ही वाचत असतोच.
उचकपाचक करून पाहिलं, तर तिथंही चर्चा दिसली नाही. व्यनित... जाऊ दे.
3 Oct 2011 - 9:06 am | पाषाणभेद
एक अंतर्मुख करणारा लेख.
आयुष्याच्या संध्याकाळी शरीर साथ देत नसते. सगेसोयरे, सुनामुले सगळ्याच वृद्धांना साथ देतील असेही नाही. काही वेळा मृत्यू येत नाही म्हणून जगायचे असते. त्याची आठवण करत जगणे हेच दिवसाचे कार्य होवून बसते. एक अनामिक जगण्याची रित, पद्धती परमेश्वराने मानवाच्या आयुष्यात घालून ठेवलेली आहे.
येथेच असलेल्या एका कवितेची आठवण राहून राहून येते:
तु माझी काठी हो
(वरील लिंक प्रचाराच्या हेतूने दिलेली नाही.)
3 Oct 2011 - 9:23 am | ऋषिकेश
उत्तम प्रकटन!
3 Oct 2011 - 12:26 pm | मृत्युन्जय
खुप सुंदर प्रकटन आहे घारेकाका.
3 Oct 2011 - 1:55 pm | मदनबाण
सुंदर लेखन !
माझ्या खव मधे कधी काळी मी केलीली "आयुष्याच्या संध्याकाळी असेच दोघे राहु आपण..." ही कविता आठवली.
(संपूर्ण आठवत नाहीये आत्ता. :( )
3 Oct 2011 - 4:18 pm | श्यामल
खुप सुंदर लेख ! लेखातली आनंदाच्या देवाण घेवाणीची भावना तर त्याहुनही सुंदर. !!
4 Oct 2011 - 10:11 am | समीरसूर
खूप सुंदर लेख!
अगदी नेमकी व्यथा सोप्या शब्दात मांडली आहे.
श्रद्धेने काम करत राहण्याची सवय वयाचा विसर पाडायला भाग पाडते हे मी पाहिलेले आहे.
माझे बाबा, ज्यांना त्यांच्या उमेदीच्या वयात संपूर्ण गाव एस. पी. किंवा बाबा किंवा कुळकर्णी सर म्हणून ओळखत असे, अजूनही सतत कुठल्यातरी कामात स्वतःला गुंतवून ठेवतात. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी त्यांना स्वस्थपणे खुर्चीत बसलेले किंवा पलंगावर लोळत पडलेले अजिबात पाहिलेले नाही. आता वयोमानानुसार दुपारी ४५ मिनिटे झोपतात आणि कुणी पाहुणे आल्यास बसून त्यांच्याशी बोलतात; परंतु एरवी ते सत्तरीतही दांडग्या उत्साहाने काहीतरी काम करत असतात. निवृत्त होऊन त्यांना आता १३ वर्षे झाली. त्याआधी शिक्षक म्हणून त्यांनी ३५ वर्षे तन-मन-धनाने सेवा केली. कित्येक आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत शिकवले. कित्येक मुलांच्या वह्या-पुस्तकांचा, गणवेषाचा खर्च त्यांनी उचलला. निवृत्तीनंतरही त्यांनी बराच काळ मुलांना शिकवण्यात घालवला. कौटुंबिक जबाबदार्या समर्थपणे पेलत असतांना त्यांनी माणसे जोडण्याचे काम अगदी मनापासून केले. म्हणून अजूनही त्यांचे विद्यार्थी त्यांना कुठेही भेटले तरी अगदी वाकून नमस्कार करतात. एसटीमधला कंडक्टर असो किंवा एखाद्या ऑईल मिलचा मालक किंवा एखादा उच्चपदस्थ अधिकारी, त्यांचे सगळेच विद्यार्थी त्यांच्या हृद्य आठवणींमध्ये रमून जातांना मी कित्येकदा पाहिलेले आहे. बाबा म्हणतात हीच त्यांची आयुष्याची खरी कमाई. मागे 'दो दूनी चार' हा ऋषि कपूरचा एक चांगला चित्रपट बघतांना मला सारखी बाबांच्या आयुष्याची आठवण येत होती. मला आणि माझ्या थोरल्या भावाला त्यांनी शिकवले पण कधीच आम्हाला त्याचा गैरफायदा घेऊ दिला नाही. त्यांनी स्वतः परीक्षेचा पेपर तयार केला असला तरीही आम्हाला कधीही त्यांनी एका शब्दाने त्याची खबर लागू दिली नाही; बाकी प्रश्न सांगणे, उत्तरे घोटवून घेणे हे प्रकार तर शतयोजने दूर राहिले.
त्यांना कित्येकवेळा सांगूनही घरातली कामे न करणे त्यांना जमत नाही. औपचारिक शिक्षण नसतांना प्राथमिक दुरुस्तीचं आणि बांधकामाविषयीचं त्यांचं ज्ञान अनुभवावर आधारित असल्याने बावनकशी आहे. त्यांनी त्यांच्या काळात तीन घरे बांधली; त्यांचा बांधकामावर लक्ष ठेवण्याचा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. अजूनही घरात मिक्सर नादुरुस्त झाला तर ते उघडून बसतात नाहीतर दुरुस्तीसाठी घेऊन जातात. व्हाईट सिमेंट आणून बाथरूमचा गळणारा पाईप दुरुस्त करतात; एम-सील आणून फ्लशचा पाईप दुरुस्त करतात; एखाद्या छोट्या भिंतीला रंग देतात; मागे कुठलंस केमिकल आणून त्यांनी किचन ओट्याचा निखळणारा भाग जोडून टाकला होता. असे काही केमिकल मिळते हे मला ठाऊकही नव्हते. टाईटबॉण्ड की बॉण्डटाईट असेच काहीतरी त्याचे नाव आहे. नातवांना लीलया सांभाळतात; त्यांना शिकवतात; त्यांना फिरायला घेऊन जातात; संध्याकाळी भाज्या निवडतात; सणासुदीला तोरण-हार तयार करतात; जंगी पूजा करतात; दिवाळीत रोषणाई करतात; व्यायाम करतात, फिरायला जातात; सतत काहीतरी आजार असूनदेखील कधीच तक्रार करत नाहीत; गावी गेले की गहू, डाळी, भाज्या, पापड, हळद, तिखट असे आम्हा दोन भावांना वर्षभर पुरेल इतके सामान (भाज्या वगळता) घेऊन येतात. या वयातला त्यांचा उत्साह, त्यांची शारीरिक श्रम करण्याची क्षमता माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
पुण्यात आमचे फ्लॅट झाल्यानंतर त्यांनी गावातून (४५० किमी) ट्रक करून धान्याच्या कोठ्या, अस्सल सागवानी लाकडाचे बनवून घेतलेले पलंग, कपाटे इत्यादी अवजड सामान पुण्यात आमच्या फ्लॅट्सपर्यंत आणले होते. पुण्यातल्या सुंदर दिसणार्या फर्निचरपुढे या गावरान फर्निचरची सुंदरता फिकी पडते खरी पण मजबूतीमध्ये हे फर्निचर अव्वल ठरले.
कुठल्याही संकटात खचून जाणे, टेंशन घेणे, हतबल होणे त्यांना माहितच नाही. कुठलेही संकट असले तरी हसतमुखाने त्याचा सामना करण्याचे त्यांचे धैर्य आम्हाला नेहमीच उभारी देत आले आहे. काही संकट उद्भवल्यास ते त्याचा नकारात्मक विचार आधीच झटकून टाकतात आणि मग सगळ्या शक्यतांचा विचार करून निर्णय घेतात. आम्हालाही काही अडचण आली तर ते सर्वप्रथम धावून येतात आणि धीर देतात. सगळ्या टेंशनचा आपल्या आवाजाने आणि बोलण्याने खातमा करतात. कुठल्याही व्यक्तीला धीर देणे, त्याच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणे, त्याच्या कुठल्याही छोट्या गोष्टीचं कौतुक करून त्याला अधिकाधिक पुढे जाण्यासाठी उद्युक्त करणे यात त्यांचा हातखंडा आहे. आजकाल निखळ कौतुक करण्याची प्रवृत्ती मागे पडत चालली आहे. लोकं तोंडदेखलं कौतुक तर करतच नाहीत परंतु धीर येईल असे दोन शब्द देखील बोलत नाहीत.
एखादी व्यक्ती चिंताक्रांत असेल तर "बाबा रे, चिंता करू नकोस; तू प्रयत्न करतोयस ना, मग तुला त्याचं फळ नक्कीच मिळेल. देव प्रयत्न करणार्यांना कधीच निराश करत नाही; फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे कर" असं सांगणं देखील खूप उभारी देऊन जातं. आजकाल लोकं ती देखील तसदी घेत नाहीत. एखाद्या व्यक्तीला उभारी देणं; त्याने केलेल्या कामाचं कौतुक करणं याला किती कष्ट किंवा किती खर्च येतो? पण लोकांना या सोप्या पण खूप प्रभावी गोष्टी जमत नाहीत. बाबांनी बोलण्याच्या कलेचा उपयोग करून कित्येकांना उभारी दिली. त्यांचा स्वतःचा फायदा देखील त्यामुळे झाला. व्यावहारिक जगात गोड बोलल्याने आणि नम्रता बाळगल्याने आपली कितीतरी कठीण कामे होतात हे त्यांची शिकवण मला आयुष्यभर पुरेल. धीर देणं, गोड बोलणं, नम्र असणं, दुसर्यांचं मनमोकळेपणाने कौतुक करणं या गोष्टी आजकाल झपाट्याने कमी होत आहेत.
एकदा आमच्या ऑफीसातल्या सहकार्याची आई घरात पडली. "काळजी करू नकोस रे, तुझी आई ठीक होईल लवकर." असं म्हणण्याचं सौजन्यही काही लोकांनी दाखवलं नाही. नुसता कोरा चेहरा करून बेचव कॉफीचे घोट रिचवत राहिले. आपल्या शिक्षणाचा काय उपयोग जर आपण कुणाला उभारी देऊ शकत नसू.
निवृत्तीनंतरही बाबांचा वेळ कसा जातो हे त्यांनाच कळत नाही; आम्हाला प्रश्न पडतो की एवढा उत्साह त्यांच्यात येतो कुठून.
--समीर
4 Oct 2011 - 12:34 pm | चित्रगुप्त
समीर यांच्या बाबांकडून खरोखर प्रत्येकाला खूप काही शिकण्यासारखे आहे.
त्यांच्याबद्दल सुरेख शब्दात माहिती दिल्याबद्दल आभार.
4 Oct 2011 - 10:26 am | ऋषिकेश
सहज आठवली म्हणून संदीप खरे यांची म्हातारपण ही कविता देत आहे:
एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे
येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले
चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही
जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी
कंप कंपनीचा संप करतात बोटे काही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही
देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने झाले बांदे, तरी आखडून वाकतात खांदे
मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही
शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट
इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या
ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण
आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..
एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे
- संदीप खरे
4 Oct 2011 - 2:14 pm | मेघवेडा
खूप सुंदर प्रकटन. प्रतिसादही वाचनीय.