ही रेसिपी जरा सवडीनंच टाकायचा विचार होता, पण एकेक अनवट ब्याचलर्स रेशिप्या येताना बघितल्या आणि म्हटलं आपली साधीशी रेशिपी ह्यात डकवून टाकावी.
कोणाही ब्याचलराला/ ब्याचलरणीला ही रेशिपी सहज जमायला काहीच हरकत नसावी असं माझं मत, कारण याची सुरुवातच बिघडवण्याने होते. साधलीच नाही तर यद्वा तद्वा भविष्यति ( सु'संस्कृत' मंडळींनी जरा सांभाळून घ्या ) असा प्रकार आहे, कसं ते पुढे सांगतोच आहे. त्यामुळे काही वाया जाईल असा प्रश्नच नाही.
तर साहित्य पुढील प्रमाणे,
दूध २ लिटर,
साखर मध्यम आकाराचा दीड पेला ( चमच्यांच्या भाषेत सांगायचं तर २०-२५ चहाचे चमचे)
वेलची-जायफळाची पूड,
थोडं केशर,
बदाम पिस्त्याचे काप,
दीड चमचे तुरटी बारीक कुटलेली.
आता करायचं काय...तर दूध उकळत ठेवायचं, दूधाला छान उकळी आली म्हणजे तुरटीची पावडर चिमुट-चिमूटभर टाकून ढवळत रहायचं. चिमूट-चिमूट एवढ्यासाठीच टाकायचं, कारण त्यामुळे पनीर रवाळ येतं. एकदाच टाकली तुरटी तर ते तितकंसं रवाळ येत नाही. आता पनीर बनवण्यासाठी यात तुरटीऐवजी लिंबूही पिळता येतं, पण ते जर जास्त पडलं तर लिंबाचा विशिष्ट वास पनीरला येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुरटीच वापरणं बरं !! आता ती इकडे मिळते म्हणून, नाहीतर लिंबावाचून पर्याय नाही. पनीर आणि पाणी वेगळं होईपर्यंत उकळी आणावी . हे असं दिसलं म्हणजे, पनीर (छेना) तयार झालं.
आता हे एका पातळ सुती कापडात ओतावं आणि त्या फडक्याला गाठ मारुन ती पुरचुंडी साधारण तासभर टांगून ठेवावी जेणेकरुन पाणी निथळून जाईल. थोडंसं पाणी पनीरमध्ये राहू द्यावं अगदीच कोरडं होऊ देऊ नये.
आता एका जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत हे पनीर व दीड पेला साखर ओतून मंद आचेवर परतत राहावं (साखरेचं प्रमाणही अर्थात पनीर किती निघतंय यावर ठरवावं). साखर विरघळून साधारण घट्टपणा आला की वेलची-जायफळाची पूड, केशर घालून परतावे. आता हे बर्फीसाठी तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठीची एक खूण म्हणजे, पातेल्यातच एका बाजूला ते चमच्याने थापून बघावं तसंच राह्यलं तर बर्फीसाठी मिश्रण तयार आहे.
एका ताटात/ परातीत हे गरम असतानाच थापत न्यावं, नीट थापलं की वर बदाम पिस्त्याचे काप पेरुन परत एकदा वरचेवर हात फिरवावा. तासभर सेट होऊ द्यावं, नंतर पातळशा सुरीने वड्या पाडाव्यात. वडी उचलतानाही शक्यतो, सुरी वडीच्या खाली सरकवून वडी उचलावी. उगाच हाताने उचलायला जाऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडायचेच चान्सेस जास्त. मग पनीर बर्फी खायला तयार आहे.
आता टीपा:
१) एखादवेळेस साखर आणि पनीर परतून झाल्यावर ताटात पसरवताना पाणी अजूनही राह्यल्यासारखं वाटत असेल तर ते ताटभर न पसरवता ताटात थोडी जागा मोकळी ठेवावी. थापून झालं ताट थोडं मोकळ्या बाजूकडे कलथं करुन ठेवावं. म्हणजे झालंच असेल पाणी जास्त तर ते तिथे जमा होईल.
२) एवढा उपद्व्याप केला पण एकही बर्फीचा तुकडा ताटातून धडपणे बाहेर येत नसेल तर सरळ लहान लहान गोळे करुन कागदी द्रोणात भरुन फ्रिजमध्ये सेट करा, पनीर पेढे/ पनीर बॉल म्हणून खपतील सहज.
जाता जाता: ही रेशिपी अंडं घालून, चिकन घालून, पनीरशिवाय, दूधाशिवाय, मीठ घालून, साखरेशिवाय अशा कोणत्याही प्रकारे मी बनवून पाह्यलेली नाही. कोणी तशी बनवली असल्यास आणि कशी बनवावी याची कुणाला उत्सुकता असल्यास त्याची पाकृ जरुर द्या.
प्रतिक्रिया
12 Aug 2011 - 12:54 am | रेवती
पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच आहेत पण पाकृ वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे आधी आली नसावी मिपावर!
अभिनंदन रे सुधांशु! अश्शी झायरात करायला सांगत होते.;)
चिमूट-चिमूट एवढ्यासाठीच टाकायचं, कारण त्यामुळे पनीर रवाळ येतं.
लहान लहान गोळे करुन कागदी द्रोणात भरुन फ्रिजमध्ये सेट करा
या टिपा ग्रेट आहेत आणि तुझी अभ्यासु वृत्ती दर्शवतात.:)
12 Aug 2011 - 1:07 am | इंटरनेटस्नेही
पाकृ आणि फोटू चांगले तर आलेच आहेत पण पाकृ वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे आधी आली नसावी मिपावर!
हेच म्हणतो.. आता रेवती काकु.. लगेच सुरु कर बरं मुलगी बघायला आमच्या सुडसाठी! असा पाककला निपुण पती कोणाला आवडणार नाही!
12 Aug 2011 - 8:10 am | रेवती
पाककला निपुण पती कोणाला आवडणार नाही
आधीच गणपाने मुलींच्या अपेक्षा वाढवल्या. त्यात आता सुधांशुची भर पडली आहे.
इंटेश, तूही आता बर्या बोलानं पदार्थ शिकायला लाग बघू.;)
किती अटी असतात आजकाल मुलींच्याही!
12 Aug 2011 - 9:52 pm | इंटरनेटस्नेही
हो.. शिकायला लागणारे खरं.. आमच्या मातोश्रींनी आम्हाला कधी संधीच दिली नाही किचन मध्ये जाण्याची.. पण आता बस्स! उद्या न जाणो कोणी 'आयटी तज्ज्ञ' गळ्यात पडली तर उपासमार नको व्हायला! ;)
हो तर.. मीही ऐकुन आहे याबद्दल.. तीनचार वर्षात प्रत्यक्ष अनुभव देखील येईल.. :O
12 Aug 2011 - 8:44 am | स्पा
रेवती आजी बघ... जरा...
इथे सुधांशू आपला पोर्ट फ़ोलिओ अपग्रेड करत चाललाय
आणि तू नुसतेच बोल बच्चन देतेस .
कृती करा ;)
शोध आता मुली फटाफट
अवांतर : बाकी सुधांशू , तुझ्या अपेक्षा रेवती आजीला व्यनी करच ;)
अति अवांतर : रेवती आजी , तू त्यादिवशी काही यशोदा, रुक्मिणी आजींच्या नातीन्विषयी बोलत होतीस , काय झाल त्याचं ? :)
अति अति अवांतर : पाकृ बरी झालीये :D
12 Aug 2011 - 6:21 pm | रेवती
यशोदा, रुक्मिणी आजींच्या नातीन्विषयी बोलत होतीस
नक्कीच! विसरल्ये नाहिये मी!
मुली चांगल्या आहेत पण त्यांच्या काही अटी आहेत.
मुलगा दाखवण्याच्या कारेक्रमात मुलाला गाणं म्हणावं लागेल.
गाणं हे सिंघम चित्रपटातलं चालेल.
"मुला, चालून दाखव." म्हणताच पुरुषमुक्तीच्या खुळचट कल्पना डोक्यात न आणता चालून दाखवणे, पाककला निपपुणता टेस्ट घेतली जात असताना सर्व उत्तरे न लाजता देणे वगैरे साध्याशाच गोष्टी आहेत.
लो क्यालरी फोडणीचे पोहे, २% फ्याटची पनीर बर्फी, सुरळीची वडी व नंतर ब्ल्याक टी एवढ्यावर भागवले जाईल.
मुलाने फार कष्ट घेण्याची गरज नाही. दुपारी तीन ते चार पहिला कारेक्रम तर साडेचार ते साडेपाच दुसरा कारेक्रम होइल. नंतर मुली बिझी आहेत. हापिसच्या कामासाठी म्हणून दोघी परदेशी जायच्यात. मुलाची पत्रिका (जन्मपत्रिका व धाव्वी, बाराव्वीची गुणपत्रिका) तयार ठेवणे.
12 Aug 2011 - 7:11 pm | सूड
>>अश्शी झायरात करायला सांगत होते.
कसली झायरात नि कस्चं काय गो रेवतीआज्जी. मिपावर ब्याचलर रेशिप्यांची पद्धत नवी का आहे ? उदाहरणादाखल म्हणायचं झालं तर हे हे आणि हेच बघ ना !! गेलाबाजार हेही आहेच.
आम्हा लाभला पाकृरुपी वसा ।
आम्ही चालवू हा पुढे वा-रस्सा ॥ एवढंच म्हणेन. ;)
12 Aug 2011 - 2:16 am | अनामिक
व्वा व्वा सुधांशु... मस्तंच रे. लाळ गळतेय बदाबदा!
12 Aug 2011 - 2:20 am | शुचि
मस्त!!! :)
12 Aug 2011 - 5:26 am | आत्मशून्य
अशा सहज सोप्या आणी रूचकर पाकृ अजून येऊ देत. मज्या आली. कधी भेटायची सवड मिळाली तर आवर्जून ही पाकृ बनवून घेऊन ये.. अत्यंत आव्डीने संपवल्या जाइल :)
12 Aug 2011 - 8:13 am | बिपिन कार्यकर्ते
बेष्ट! आवडली आहे. :)
12 Aug 2011 - 8:26 am | रेवती
काय उपयोग?
तू ब्याचलर आहेस काय?
12 Aug 2011 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते
अगं काकू, हे ब्याचलर / विवाहित असं काही नस्तं गो! सगळं किनई आपल्या मानण्या न मानण्यावर असतं! ;)
12 Aug 2011 - 8:57 am | कवितानागेश
हीच ना रे?
त्या दिवशी दीड मिनिटात सांपली ती! :)
12 Aug 2011 - 9:09 am | प्रचेतस
सुड्या, पाकृ लैच झ्याक. आता इकडे येताना बनवून घेउन ये पटकन.
12 Aug 2011 - 9:19 am | मस्त कलंदर
ही तीच ती बर्फी आहे. सुडने शनिवार संध्याकाळच्या ट्रेनच्या गर्दीतून तिला अगदी जीवापाड सांभाळत आणली, आणल्यावरही काचेच्या भांड्याला कुणी जपणार नाही इतकं याचं चाललं होतं, "अरे सांभाळून", "हेलकावे देऊ नकोस", "कलतं करू नको" एक न दोन. त्यामुळे डब्यात काय असेल याची जाम उत्सुकता लागली होती. शेवटी डबा उघडला तर ही बर्फी निघाली!!!
मी: "या बर्फीचा डबा कलता झाला असता तर काय बिघडलं असतं?"
सुडः "कोसळल्या असत्या ना त्या"
मी: "कोसळायला त्या दरडी होत्या का?"
थोडक्यात काय रेवतीकाकू, या सुड्चं डोकं नाहीय थार्यावर. तेव्हा काय करायचं ते तुला ठाऊक आहेच. ;-)
12 Aug 2011 - 11:19 am | विश्वनाथ मेहेंदळे
याच संवादाची पार्श्वभूमी असल्याने मी सदर बर्फीला दरड-बर्फी असे innovative (हे मीच ठरवले) नाव देण्याचे सुचवले होते. पण सूडला "बॅचलर्स" हा शब्द नावात हवाच होता असे दिसते. काय करणार? गरजवंताला.... वगैरे वगैरे
असो, बर्फीचे कौतुक आधीच केल्याने परत तेच लिहित नाही.
12 Aug 2011 - 9:30 am | गवि
वा वा.. हीच ती आम्ही कट्टासमयी चाखलेली झकास बर्फी..
सूड हा वडेतज्ञ असण्यासोबत वडीतज्ञ ही आहे हे पाहून आनंद झाला.
12 Aug 2011 - 10:10 am | सहज
आवडली बर्फी व पाकृ.
12 Aug 2011 - 10:24 am | नितिन थत्ते
झ्याक पाककृती.
(पनीरच आवडत नाही त्यामुळे करून पाहणार नाही).
12 Aug 2011 - 10:41 am | किसन शिंदे
पनीर बर्फी १ नंबर रे सुड.
12 Aug 2011 - 10:45 am | जाई.
पाकक्रुती आवडली.
12 Aug 2011 - 10:48 am | गवि
विकतची पनीर / मलई बर्फी मलईदार लागते. घरी केली की तुपाच्या बेरीप्रमाणे / साक्याप्रमाणे कोरडी / रवाळ / चोथट लागते असे का?
12 Aug 2011 - 2:55 pm | सूड
कोरडी वाटू नये म्हणूनच मी वरती पनीरमध्ये थोडं पाणी असू द्यावं असं म्हटलंय. जनरली पनीर रवाळ न येता थोड्या मोठ्या गाठी आल्या तरी असं होत असावं हे माझं मत !! आता विचारलंतच म्हणून सांगतो, पनीर फडक्यातून काढलं की मी पुन्हा एकदा नीट मळून घेतो. म्हणजे गाठी राहत नाहीत, साखर सगळीकडे नीट लागते. बाकी बाजारातल्या आणि घरी बनवलेल्या वस्तूत थोडाफार फरक असतोच, सध्या मी पण नवशिकाच आहे म्हणा. कळलं यामागचं गुपित की नक्की सांगेन.
@ सुनील: बाजारतलं तयार पनीर आणून मी हे करुन पाह्यलं नाही, त्यामुळे नाही सांगू शकत. ते पनीर किसून कढवायला घेतलं की शैलेन्द्र म्हणतात तसं थोडं दूध घालून बघा.
12 Aug 2011 - 3:09 pm | प्रचेतस
पनीर जास्त रवाळ होण्यासाठी त्यात थोडा रवा मिसळला तर चालेल काय? ;)
12 Aug 2011 - 3:18 pm | स्पा
पनीर जास्त रवाळ होण्यासाठी त्यात थोडा रवा मिसळला तर चालेल काय?
खिक .......... आपण काढता का रवा? :D
12 Aug 2011 - 3:24 pm | प्रचेतस
आम्ही जिलब्या काढतो. (आणि तुम्हीसुद्धा)
12 Aug 2011 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते
अरेरे! काय दिवस आलेत... आमच्यावेळी असं नव्हतं ब्वॉ! आमच्यावेळी तर मिपावर काही लोक जाड बुडाच्या पातेल्यात गूळ काढायचे. ;)
12 Aug 2011 - 9:57 pm | शैलेन्द्र
पातेल्यात की पातेल्यातुन...
12 Aug 2011 - 10:54 am | सुनील
पनीर घरी तयार करण्यापेक्षा बाजारातून तयार आणले तर कृतीत काय बदल करावे लागतील?
12 Aug 2011 - 1:18 pm | शैलेन्द्र
बाजारातले पनीर बरेच कोरडे असते.. कदाचीत थोडेसे दुधात शिजवले तर रवेदार होवु शकेल.. पण पनीर घरी करणे खुपच सोपे आहे, बाजरातुन आनण्यापेक्षा..
12 Aug 2011 - 11:06 am | वेताळ
परवा मुंबईत झालेल्या दुध बंद आंदोलनात तुम्हाला मिळालेल्या दुधाचा हा चांगला वापर आहे.
12 Aug 2011 - 12:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सदर बर्फी ही सदर लेखकाने केली याला पुरावा काय ? सदर फोटोत सदर लेखक कुठेच दिसत नाही. त्यामुळे लेखक असलेला एक तरी फोटो पाहिजेच बुवा. मिपावर कुणीच असे करत नाही, तरीपण तुम्ही केलेच पाहिजेत (because you are one of the less equals).
शिवाय सदर फोटोतील व्यक्ती तुम्हीच आहात हे सिद्ध व्हावे म्हणून किमान दोन सरकारी ओळखपत्रे (पारपत्र किंवा पॅनकार्ड वैग्रे) याच्या प्रती (स्कॅन्ड कॉपी) जोडाव्यात. त्या प्रती विश्वासार्ह (डिजिटली बदल केले नाही ना) आहेत हे समजण्यासाठी त्या विषयातील तज्ञ व्यक्तीचे प्रमाणपत्र सदर लेखकाने सादर करावे. मग ते प्रमाणपत्र विश्वासार्ह आहे की नाही हे समजण्यासाठी दुसऱ्या तज्ञ व्यक्तीचे प्रमाणपत्र सादर करावे. (हा लूप कंटाळा येईपर्यंत फिरवत राहावा)
हे सगळे करण्याचे मागे कबुल करून सुद्धा तुम्ही ते केले नाही याची एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
(वरील प्रतिसाद कसा घ्यायचा, जड की हलका हे तुम्हाला माहित आहेच ;-) )
12 Aug 2011 - 2:56 pm | सूड
__/\__
:D
12 Aug 2011 - 12:55 pm | गणपा
सदर पाककृती 'अनवट' ;) प्रकारात मोडत असल्याने आवड्ल्या गेली आहे असे नमुद करतो. :D
12 Aug 2011 - 12:59 pm | गवि
हॅ हॅ हॅ.. :)
12 Aug 2011 - 1:20 pm | कच्ची कैरी
सहज आणि सोपी पा़ककृती ,मस्त !!
@ विश्वनाथ -तुमचा प्रतिसाद वाचुन खो-खो हसले :)
12 Aug 2011 - 1:40 pm | स्मिता.
बॅचलर्स बर्फी आवडली. फोटो बघूनच छान लगत असेल असं वाटतंय.
ही बॅचलर्स पनीर बर्फी विवाहितांनी बनवलेली चालते काय? ;)
12 Aug 2011 - 6:10 pm | रेवती
ही बॅचलर्स पनीर बर्फी विवाहितांनी बनवलेली चालते काय?
तशी चालेल. न चालायला काय झालय?
शक्यतो असे पदार्थ लग्न जमवण्याच्या कामी येत असतात हे ध्यानात ठेवावे.;)
12 Aug 2011 - 2:05 pm | धमाल मुलगा
ही एव्हढी अवघड पाकृ आणि म्हणे बॅचलर्स!
खोटारडेपणा करु नकोस बे.
असो. मिष्टर सुधांशु ह्यांच्या पाककलानिपुणतेबद्दल खात्री असल्याने ही बर्फीदेखील झक्कास झालेली असणार ह्यात वादच नाही. :)
12 Aug 2011 - 4:00 pm | परिकथेतील राजकुमार
पाकॄ भारीच रे एकदम.
पनीर आवडत नसल्याने कौतुक उरकते घेतो :) पण तुझ्या कष्टाला दाद देतो.
12 Aug 2011 - 4:33 pm | स्वाती दिनेश
बर्फी मस्त दिसतेय रे,
रेवती, वधूसंशोधन कुठवर आलं? ;)
स्वाती
12 Aug 2011 - 5:08 pm | ५० फक्त
मस्त रे सुधांशु, गेट वेल सुन सुन.
12 Aug 2011 - 7:44 pm | रेवती
गेट वेल सुन सुन.
खी खी खी
12 Aug 2011 - 6:58 pm | प्रभो
मस्त रे!!
12 Aug 2011 - 8:03 pm | रामदास
बायकोला नवरा लोकलच्या गर्दीत सांभाळून आणतो तितकं सांभाळून ह्या बर्फीचा डबा कट्ट्यावर पोहचला होता. ही काळजी बघून डोळे पाणावलेच पण मनात शंकेचं काहूर उठलं की हा म्हणतोय खरा पण हा अविवाहीत आहे का ?
(रेवतीताई वधू शोधण्यापूर्वी जरा विचार करा.)
12 Aug 2011 - 8:28 pm | माझीही शॅम्पेन
काकांशी असहमत होण्यासारख काही कारण दिसत नाही :)
सूड - बर्फी खल्लास होती रे (ती अति जेवणं मुले कशी बशी खल्लास करावी लागली हा भाग वेगळा :) )
12 Aug 2011 - 8:18 pm | मदनबाण
बर्फी तीही पनीरची !!! आहाहा... :)
आजच पनीर कढाई हा अप्रतीम पदार्थ रिचवुन आलोय !!! ;)
मध्यंतरी मित्रांबरोबर पार्टीसाठी एका हाटिलात जाणे झाले होते; तेव्हा तिथे पोटपुजा करताना स्टार्टस मधे काही पनीरचे लुसलुशीत तुकडे हादडले होते... मला कळलेच नाही की ते इतके लुसलुशीत कसे केले होते ते ? कोणास ठाव हाय काय या बद्धल ? म्हणजे पनीर इतके लुसलुशीत कसे करतात ते ?
(पनीर प्रेमी) :)
12 Aug 2011 - 9:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पनीर इतके लुसलुशीत कसे करतात ?
दुधाचे पनीर करताना त्यात धुण्याचा सोडा आणि चुनखडी यांचे ३:२ प्रमाणात केलेले मिश्रण घालावे. मात्र सगळे एकदम घालू नये, थोडे थोडे घालावे. शेवटी संहीत H2SO4 चे थेंब (१ लिटर दुधास ७.५ थेंब या हिशोबाने) घालावेत. पनीर एकदम लुसलुशीत होते. हाय काय आणि नाय काय !!!!
या उपायामुळे योग्य परिणाम मिळाला तर श्रेय माझे, मात्र काही चुकले आणि गडबड झाली तर तुमच्या पत्रिकेत लुसलुशीत पनीरचा योग नाही असे समजावे ;-)
(वरील प्रयोग कुणी केल्यास परिणामांची जबाबदारी मिपावर किंवा माझ्यावर राहणार नाही)
12 Aug 2011 - 10:49 pm | पैसा
बर्फी इकडे पाठवून दे थोडी, मी पण तुझ्यासाठी वधूसंशोधन सुरू करीन म्हणते!
12 Aug 2011 - 11:39 pm | पंगा
पूर्वीच्या काळात इतरांच्या बायकांना पोरे व्हावीत म्हणून असा प्रसाद वगैरे द्यायचे. उपयोग व्हायचा. (रामायण आठवा. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, झालेच तर बोनस म्हणून अंजनीसुद्धा.)
हल्लीच्या जमान्यात स्वतःला बायको मिळावी म्हणून इतरांना - अनेकींना - असा प्रसाद द्यावा लागतो असे दिसते. त्यानंतर मग उपयोग झाला तर झाला.
कालाय तस्मै नमः|
(अवांतर: याला प्रसादाचे अवमूल्यन म्हणावे काय?)
12 Aug 2011 - 11:51 pm | पैसा
त्याच्या पाककौशल्याची झाईरात करायची तर आधी काहीतरी मिळायला पाहिजे ना! या जगात फुकट काही मिळत नाही बरं!!
12 Aug 2011 - 11:57 pm | पंगा
जरूर.
अगदी!
बादवे ते अवमूल्यनाचे जरासे चुकलेच. इफेक्टिविटी कमी झाली असे म्हणता येईलही कदाचित. पण पूर्वी प्रसादाच्या बदल्यात देणार्याला काहीच मिळत नसे, हल्ली एखादी बायको मिळण्याची शक्यता तरी आहे म्हटले तर उलट प्रसादाची पर्चेसिंग पावर वाढली असे म्हणता येईल काय?
13 Aug 2011 - 12:06 am | पैसा
फक्त प्रसादाची पर्चेसिंग पॉवर प्रसादाच्या "कोलिती"वर अवलंबून राहील!
12 Aug 2011 - 11:55 pm | जागु
खुप छान रेसिपी आहे.