"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in पाककृती
4 Aug 2010 - 10:10 pm

नमस्कार मंडळी,
काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे??? आता आमचा बिकाच बघा ना आज मुंबई, उद्या पुणे, परवा दुबई, तेरवा अजुन कुठे??? प्रत्येक ठीकाणी त्याने स्वयंपाकाला बाई ठेवली तर!!!!! ;) यावर बिकाने उपाय शोधलाच आहे पहा खुप आधीच त्याने कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला लिहुन ठेवला आहेच. अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते). दोन्याची तर म्हणे उपासाच्या सारख्या स्पेशल स्वयपांकाची मास्टरी आहे. त्यांची उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.. हे सगळे बघुन आम्ही ही घेउन आलो आहोत "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा... उर्फ निख्याचा सल्ला ".

तर मंडळी आम्ही स्वयंपाक काय करायचा असा विचार करुन मिपाच्या समृद्ध पाककृती विभागात शिरलो. सर्व प्रथम पेठकर काका, गणपा अश्या जेष्ट बल्लवाचार्यांना प्रणाम करुन घेतला, मग स्वाती ताई, जागु, दिपाली पाटील यांचा पाककृतीचे स्मरण केले. पण आमच्या डोळ्यासमोर एकच पाककृती दिसत होती. जाई ताईंची "रावणी पिठले". सगळी पाककृती तिनदा वाचुन आम्ही लॅपटॉप ला ओट्यावर स्थानापन्न केले. आणि साहित्य शोधायला लागलो आणि आमच्या समोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.. १ वाटी डाळीचे पिठ अरे पण कोणत्या??? पहिल्यांदाच स्वयंपाक करणार्‍या नवशिक्यांनी कसे ओळखायचे कोणत्या डाळीचे ते. पहिले आठवली तुर दाळ पण मग आठवला चुचु चा धागा ज्यात तिने तुर डाळ महाग झाल्याने आम्ही कोब्रा गोड वरण भात कसे खाणार असा जागतिक प्रश्न उभा केला होता. पण याचाच अर्थ तुर डाळ वरणासाठी वापरातात, मग अचानक आठवले की अमरावतीकडे पिठल्याला बेसनही म्हणतात. मग बाजारातुन मुंबई बेसन आणावे लागेल. पण आणणार कोण??? मी??? शक्यच नाही. एकतर स्व्यंपाक करुन मी माझ्यावरच उपकार करतोय. खरे तर माझा आयडी आळश्यांचा राजा असायला हवा होता पण तो आधीच घेतलेला आहेच. मग शोधाशोध करत असताना आमच्या लक्षात आले की घरात फक्त कांदे आणि बटाटे आहेत.त्यामुळे उरला एकच ऑप्शन कांदा बटाटा रस्सा.

साहित्य :
३ मध्यम बटाटे
१ मोठा कांदा
३-४ मिरच्या
३-४ लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
तेल तुमच्या डायटनुसार

कृती
सर्व प्रथम बटाटे, कांदे एकसारखे चिरुन घ्यावेत. खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही. आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही. मिरच्या बारीक चिरुन घ्यावा त्याच सोबत लसणाचा पाकळ्यांचे सुद्धा बारिक तुकडे करुन घ्या. आता एका ताटात मिरच्या, आले लसुण ठेवुन त्याला वाटीने व्य्वस्थीत ठेचुन घ्या, छान एकजीव होई पर्यंत हे करत रहा. आता एका कढई मधे नेहमी प्रमाणे फोडणी तयार करा. तेल हे तुमच्या अंदाजाने आणि तब्येती नुसार टाका. बॅचलर लोकांनो एकटेच खाणार असाल तर हे तेल थोडे जास्त झाले तरी हरकत नाही, हळुहळु अंदाज जमेल. त्यात मोहरी, जिरे हे तुमच्या अंदाजा नुसार टाकावेत. मोहरी फुटल्या नंतर कांदा हा मिश्रणात टाकुन लालसर परतवुन घ्यावा. आता पुढे यात तुमच्या अंदाजा नुसार आधी तुम्ही तयार केलेला कांदा लसण आल्याच ठेचा टाकावा, नंतर गरम मसाला एक चमचा, पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा, एकवार सगळे परतुन घ्यावे. त्यानंतर तुमच्या कॅपॅसिटी नुसार तिखट टाकावे, आधीच तीन- चार हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचा अंदाज घ्यावा. आम्ही चार चमचे तिखट टाकले होते. त्यानंतर यामधे बटाटे टाकुन साधारण एक-दिड मिनिटे परतवुन घ्यावा. परतुन झाल्यानंतर वरुन एक वाटी पाणी अ‍ॅड करावे. आणि मग मंद आचेवर बटाटा शिजे पर्यंत ठेवावा. एवढे सगळे झाल्यावर अचानक तुम्हाला आठवेल तुम्ही भाजीत मिठ विसरलात. पण कहई हरकत नहई तुम्ही आताही मिठ अ‍ॅड करुच शकता. मिठ साधारण एक चमचा ठीक असेल. तर साधारण पाच दहा मिनिटाने एका पठीवर एक बटाटा घेउन तो चमच्याने दाबुन शिजला आहे का ते तपासुन घ्या. शिजला असेल तर तुमची भाजी तय्यर पटापट एखाद्या प्लॅट किंवा वाटी मधे वाढुन घ्या आणि खायला लागा.

टिपः भाजीतले प्रमाणे एकामाणसा साठी थोडी जास्त आहेत. दोन माणसांना पुरु शकेल.

चला आता पळतो आम्ही... उद्या लवकर उठायचे आहे पण तसेही नॅचरल आलारामाची (अलार्म म्हणने जमणार नाही) सोय भाजीने केलीच आहे.

प्रतिक्रिया

गणपा's picture

4 Aug 2010 - 10:18 pm | गणपा

दण-दणीत वेंट्री =))

चला दोन दिवसांच्या परिपाकाने निदान निदे कुकिंगला* लागले हे ही नसे थोडके.

*हो आता आम्ही शब्द जपुन वापरतो ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिल्यांदा लेख वाचला, तर प्रतिक्रिया द्यायची सोय नाही. आता पहाते तर खोका आला आहे, निषेध म्हणून प्रतिक्रिया देणारच नव्हते. पण निदे आता संपादक असल्यामुळे तीही सोय नाही. तेव्हा आता प्रतिक्रिया लिहीते:

निख्या, शिकलास रे शिकलास ... लिहायला! स्वयंपाकतर तसाही शिकावाच लागेल तुला, लग्नं झाल्यावर! मस्त चटपटीत लिहीलं आहेस. आता तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी पण पाकृ टाकणार.

अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते).

=)) =))

आणि एक, तू कांदे, बटाटे चिरले असशील यावर विश्वास नाही. तू बुक्का मारूनच कांदा बटाट्याचे तुकडे केले असणार! ;-)

दिनेश's picture

4 Aug 2010 - 10:17 pm | दिनेश

दण-दणीत वेंट्री =)).

लगे रहो निखिलशेठ.

ती लाकडी मॅट मस्त आहे. फोटो झकास :)

मराठमोळा's picture

4 Aug 2010 - 10:18 pm | मराठमोळा

लै भारी रे. फक्कड जमलीये पाकृ.
सजावट आणी फोटु मस्तच. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा आणी जेवणासाठी बायकोला/गर्लफ्रेंडला विनवण्यापेक्षा ;) स्वत: बनवुन खाल्लेल नक्कीच परवडण्यासारखं आहे. :)

मस्त रे...
आता तुझ्या लग्नाचा बार उडवायला हरकत नाही... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2010 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>आता तुझ्या लग्नाचा बार उडवायला हरकत नाही...
सहमत आहे. :)

लेखन आणि पाकृ मस्तच.. लगे रहो.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

4 Aug 2010 - 10:54 pm | रेवती

अरे प्रभो, तू आधी तुझ्या लग्नाचा बार उडव!;)
निखिलच्या लग्नात रस्साभाजीचा समावेश असेलच.

प्रभो's picture

4 Aug 2010 - 11:02 pm | प्रभो

ओय, तुला ३-३ गिनिपीग आहेत आता..
माझ्यावर घसरायचं नाही थोडे दिवस... ;)

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2010 - 10:24 pm | स्वाती दिनेश

मस्तच रे
फोटो पण झक्कास!
आणि प्रभोच्या म्हणण्याशी सहमत आहे, :)
स्वाती

चित्रा's picture

4 Aug 2010 - 10:33 pm | चित्रा

छान दिसते आहे बटाट्याची भाजी.

हेच म्हणतो!

फक्त ती भाजी एकास 'जास्त होईल'शी असहमत (इतकी चांगली दिसते आहे).

असुर's picture

4 Aug 2010 - 10:35 pm | असुर

णीषेध, णीषेध, णीषेध!!!
असला कातील फोटू टाकल्याबद्दल निदे यांचा टिळक चौकात जाहीर णीषेध!
आता मज बॅचलराला घरी जाऊन ही भाजी बनवणे कंपल्सरी झालं ना!
त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे म्हणजे केवळ छळ आहे! इथे कोथिंबीर कुठून आणू मी?

निदे: फक्त फोटू टाकलात, आमंत्रण कुठे आहे???

('चोता दोन' लंय आवडलंय! सगळे गेमा करून राह्यले राव!)

--असुर

निदे ला अश्या (आचार्‍याच्या) भूमिकेत पहायची सवय नसल्याने धक्का बसला.
फोटू मस्त आलेत. चवीबद्दल कळवायचे असल्यास भाजी पाठवा.

पुष्करिणी's picture

4 Aug 2010 - 11:00 pm | पुष्करिणी

झकास, चमचमीत दिसतेय मस्त!

मेघवेडा's picture

4 Aug 2010 - 11:00 pm | मेघवेडा

पाकृ, लेखन, सजावट सगळ्याच आघाड्यांवर सरशी! प्रभ्याशी बाडिस!

मितान's picture

4 Aug 2010 - 11:07 pm | मितान

आम्ही अशा बॅचलर भाज्यांना फॉर्म्युला ४६ भाजी म्हणतो. म्हणजे सगळे चौकार षटकार मारून केलेली भाजी ! :)
काय पण सजावट आहे.... झकास !

मिसळभोक्ता's picture

5 Aug 2010 - 3:07 am | मिसळभोक्ता

खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही.

एक सुधारणा. कांदा मधोमध चिरावा, मग धुवावा, आणि मग बारीक चिरावा. कांदा बाहेरून धुतल्यास काही उपयोग नाही.

(अनुभवी) मिसळभोक्ता

आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही.

उलट, अशी आधुनीक उपकरणे बॅचेलर असतानाच जास्त उपयोगाची, मिरची चिरत बसण्यापेक्षा, सरळ मिक्सर मध्ये टाकून मोकळे व्हावे.

(उपकरणप्रेमी) मिसळभोक्ता

छान पाककृती. बटाटा माझ्या आवडीचा.

(डायबेटिक) मिसळभोक्ता

आयटीतल्या लोकांना स्वयंपाक करताना बघून खरेच बरे वाटले. मिपावर गेले काही दिवस चाललेल्या दंग्यांतून काहीतरी ठोस पावले उचलल्याचे पाहून आणखी बरे वाटले.

(कन्स्ट्रक्टिव्ह) मिसळभोक्ता

छोटा डॉन's picture

5 Aug 2010 - 9:25 am | छोटा डॉन

>> एक सुधारणा. कांदा मधोमध चिरावा, मग धुवावा, आणि मग बारीक चिरावा. कांदा बाहेरून धुतल्यास काही उपयोग नाही.
सुधारणा ( नेक्स्ट रिलीज )
१. कांदा मधोमध चिरावा, धुण्याऐवजी १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा आणि मग चिरावा.
डोळ्यात अजिबात पाणी येत नाही.
२. कांदा चिरताना च्युईंगम खावे, शक्यतो पाणी येत नाही.
( तरीही आलेच तर च्युइंगनच्या चवीमुळे तोंड खारट होत नाही )

(बॉर्न टॅलेंटेड ) छोटा डॉन

>>अशी आधुनीक उपकरणे बॅचेलर असतानाच जास्त उपयोगाची, मिरची चिरत बसण्यापेक्षा, सरळ मिक्सर मध्ये टाकून मोकळे व्हावे.
अंशत : असहमत ...
मी तर म्हणतो की बॅचलर असताना लॅपटॉप आणि मोबाईल असणे जास्ती उपयोगाचे, स्वैपाक कर बसण्यापेक्षा, सरळ बाहेरुन फुड ऑर्डर करुन मोकळे व्हावे ...

(होम-डिलिव्हरीप्रेमी) छोटा डॉन

>>छान पाककृती. बटाटा माझ्या आवडीचा.
+१, असेच म्हणतो.

(आलुप्राठा) छोटा डॉन

>>आयटीतल्या लोकांना स्वयंपाक करताना बघून खरेच बरे वाटले. मिपावर गेले काही दिवस चाललेल्या दंग्यांतून काहीतरी ठोस पावले उचलल्याचे पाहून आणखी बरे वाटले.
+१, अक्षरश : सहमत ...
निख्याला स्वयंपाक करताना पाहुन डोळे भरुन आले, त्याचे लवकरात लवकर हात पिवळे* व्हावेत हीच सदिच्छा !

* पिवळे : स्वैपाक करताना नेहमी हळद हाताला, टी-शर्टाला, बर्म्युडाला लाहुन जे पिवळे होते ते नव्हे, इथे दोनाचे चार हा अर्थ घ्यावा ...

- ( हितचिंतक ) छोटा डॉन

सहज's picture

5 Aug 2010 - 10:26 am | सहज

निदे स्वैपाक करु लागला!!!!

निदेला गिफ्ट देण्यात येईल

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2010 - 11:19 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं रे निख्या. आम्हाला पण हा कांदाबटाट्याचा रस्सा लई आवडतो. त्यात एक बचकाभर गरम मसाला आणि २ बचके तिखट घालायचं आणि भाता बरोबर हाय हूय करत खायचं.
(झणझणीत रावण) पेशवे

बाकी स्वैपाक करायला शिकलास हे बरंच झालं. बाकी भांडी घासायला वगैरे पण शीक. लग्नाळू मुलांना सर्व कामं जमली पाहीजेत.
(ब्रम्हचारी) पेशवे

एखादा आवडीचा पदार्थ स्वतः करून खायला लै मजा येते. बाकी कोण चांगलं नाही म्हटले तरी स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतो. परत स्वतःची कांदा बारीक चिरणे, बटाट्याचे पातळ काप काढणे, पोळी गोल येणे अशी कौशल्ये बघून घरची मातृतुल्यं मंडळी खूष होतात. आणि म्हणतात किती दिवस स्वतःच्या हातचं खाशील? अशा वेळेला उगाच भाव खाता येतो.
(आपला हात जगन्नाथ वाला) पेशवे

आपण चांगले पदार्थ बनवत असलो आणि बाकीच्यांनाही खाऊ घालत असलो व इतरही छान झाला आहे असे म्हणत असले म्हणजे इतरांच्या पाकृंवर अधिकार वाणीने भाष्य करता येते. परत आयटीतल्या बायकांनी बनवलेल्या सपक पदार्थांना अधिकारवाणीने नावं ठेवता येतात. ;)
(आयटीतला) पेशवे

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला पण हा कांदाबटाट्याचा रस्सा लई आवडतो. त्यात एक बचकाभर गरम मसाला आणि २ बचके तिखट घालायचं आणि भाता बरोबर हाय हूय करत खायचं.

हेच बोलतो.

साला निख्या तु तर छुपा डॉन निघाला की राव ;) कसाकाय वेळ मिळतो बॉ तुम्हाला हे सगळे करायला येवढ्या 'बिजी' शेड्युल मधुन ?

अवलिया's picture

5 Aug 2010 - 11:21 am | अवलिया

आयटीतली पोरगी पटवली वाटत.

आयटीतल्या पोरींना कुकिंग येत नाही हे त्यांना नुकतेच उमगल्याने (निदे, आधी त्या लोकांचे आभार माना पाहु ;-) ) ते लागलीच तयारीला लागले आहेत.

उगाच पटवली वगैरे शब्द टाकुन त्यांच्या कार्यात खोडा नका टाकु, कसें? ;-)

चुकुन मिष्टेक.. निदे येक डाव माफी कराच ब्वा... नाही कराच तुम्ही माफ.

आनंदयात्री's picture

5 Aug 2010 - 11:28 am | आनंदयात्री

मस्त रे निख्या !!
बॅचलर भाज्या हा पहिला टप्पा .. आता हळुहळु चटण्या बिटण्यांकडे वळ !!

आणी रोज || श्री गणपाय नमः || हा जप १०८ वेळा न चुकता करत जा ..

-
आंद्या बल्लव

"कातिल" या विशेषणासाठी असुरशी सहमत... पटकन खावीशी वाटतेय, आणि मुख्य म्हणजे अगदीच रावणी वाटत नाहीए...

-(अरावणी)मकी

बाकी काही मतांसाठी प्रभो, बिरूते,स्वातीतै, मेघवेदा,चोता दोन यांच्या मतसाधर्म्याशी सहमत.
-(इथेतिथे सहमत) मकी..

जाताजाता, आमचे आंजा मित्र वायदेआझम चोता दोन (खीखीखी.... लै भारी वाटतंय असं लिहायला) मेथीच्या फांद्यांनी सजवलेल्या ब्रेड पकोड्यांची पाकृ (कुणाला ते माहित नाही , पण) फेकून मारणार होते. ती कधी येणारेय???
(वायदेआझमना वेळोवेळी वायद्यांची आठवण करून त्रास देणारी)मकी!!!

मेथीच्या फांद्यांनी सजवलेल्या ब्रेड पकोड्यांची पाकृ (कुणाला ते माहित नाही , पण) फेकून मारणार होते. ती कधी येणारेय???
(वायदेआझमना वेळोवेळी वायद्यांची आठवण करून त्रास देणारी)मकी!!!

ओ बाई, आम्हाला आमचय लायनीप्रमानं जाऊ द्या बरं ! :)

असो, ती पाकृ नक्की येणार, लवकरच !
खरं तर आजच टाकली असती परंतु माझ्या पाकृमुळे निख्याच्या धाग्याचा ट्यार्पीने मार नको खायला म्हणुन आज नको ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2010 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन संपादकांनी मिळून एकमेकांच्या २% ट्यार्पीची काळजी घेतलीच पाहिजे.

मकीने प्रतिसादात मला बाडीस लिहीले नाही म्हणून तिचा निषेध! ;-)

तुम्ही संन्यास घेणार असेही घोषित केले आहे !

छोटा डॉन's picture

5 Aug 2010 - 2:48 pm | छोटा डॉन

>>तुम्ही संन्यास घेणार असेही घोषित केले आहे !
आयला मग काय तुम्ही त्यासाठी देव पाण्यात घालुन बसला आहात की काय ?
( ह. घ्या. )

असो, तुम्हा सर्वांची खरोखर तशी इच्छा असेल तर मी खरोखर चपला घालुन निघुन जाईन. :)

मेघवेडा's picture

5 Aug 2010 - 3:13 pm | मेघवेडा

ओ चपला ठेवून जा. बर्‍याच जणांना द्यायची पाळी येणार असे दिसते आहे. तेव्हा नाममात्र शास्त्रापुरत्या चपला देण्याचा विचार मंडळ करीत आहे!

;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2010 - 2:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे डान्राव लोकप्रिय राजकारणी आहेत. त्यांनी एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती त्यांच्या पाठीराख्यांना रूचली नाही तर त्यांना निर्णय फिरवावा लागतो.

--राको. अ.अ.पा.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार

ओ बाई, आम्हाला आमचय लायनीप्रमानं जाऊ द्या बरं !

झेंडा फडकवायला ?

आणि हो ते आम्ही झेंडा चित्रपटाचे परिक्षण टाकणार होतो, बेंगळुरातील हाटेलांवर लिहिणार होतो ते आम्ही लिहिले नाही त्याबद्दल सॉरी बरका चोता दोन.

पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा

याला चीटींग म्हणतात :P
एनीथिंग टेस्ट्स बेटर विथ बेकन सारखे पावभाजी मसाला घातल्यावर कुठलीही भाजी भारी लागेल !!

शरयुप्रितम२०१०'s picture

5 Aug 2010 - 4:50 pm | शरयुप्रितम२०१०

गरमा गरम पुरी किंवा पराठा असल्यास बेत झक्कास होईल.
छान पाकृ
आवडली.:-)

सर येउ द्या अजुन असेच सुंदर लेखन !

अरे वा ... हे पाहिलंच नव्हतं .. बहुतेक तडीपारीच्या काळातलं आहे. नानांचे धन्यवाद
मस्त रे निदे. भारी च .. पण साला .. प्रतिक्रीयांमधुन न्हेमीप्रमाणे ज्याने त्याने स्वतःची ... केलीच आहे :)

असो ..

ज्ञानराम's picture

5 Feb 2011 - 2:21 pm | ज्ञानराम

मी चुकून "कांदा बटाटा 'बॅचलर' सस्सा" वाचलं!!!!!!!

सशांचे वर्ष या धाग्यामुळे सगळीकडे आता ससा दिसायला लागलाय ब्वा....

रेसीप छान आहे. फोटु बी लय भारी आलेत.

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 2:50 am | शहराजाद

छान सोपी पाकृ.

अजून एक सोपी पद्धतः

कापलेले कांदे- बटाटे, (आवडत असल्यास फ्लॉवर, मटार), टोमेटो ( टोमेटोचा कॅनमधला रस किंवा पेस्टही चालेल), काळा / गरम मसाला, तिखट-मीठ. सुक्या खोबर्‍याचा चुरा हाताशी असेल तर तोही थोडासा घालावा.

एका काचेच्या (मायक्रोवेव्ह सेफ) भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करून बुडेपर्यंत पाणी घाला. वीस- पंचवीस मिनिटं ( अंदाजे) मायक्रोवेव्हमध्ये शिजवा. टोमेटोने पुरेसा दाटपणा आला नसेल तर बटाट्याच्या काही फोडी कुस्करा. वरून तूप घाला.
फोडणी घालून, परतून केलेला रस्सा खमंग लागतो, पण तूप, मसाले इ मुळे हाही छान लागतो.

पर्नल नेने मराठे's picture

6 Feb 2011 - 2:24 pm | पर्नल नेने मराठे

मस्त्च !!!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

7 Feb 2011 - 12:03 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त दिसते आहे..
रा.पि. साठी बेसनच वापर्..आणि रा.पि. करण्याआधी खाली दिलेल्या विषेश टीप्पण्या आणि सुचना नीट वाचुन घे..
तिखट बेताचे वापरु शकतोस..
नाहीतर माझा उद्धार व्हायचा..!
रस्सा झकास दिसतो आहे...
चपत्या बिपात्यांच्या भानगडीत न पडता मस्त्..लुसलुशित ब्रेड पट्कन बुडवोनी आस्वादु घ्यावा..!! असे वाटोनी गेले क्षणभरु!!
:)