मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बॅचलर्स पनीर बर्फी

सूड · · पाककृती
ही रेसिपी जरा सवडीनंच टाकायचा विचार होता, पण एकेक अनवट ब्याचलर्स रेशिप्या येताना बघितल्या आणि म्हटलं आपली साधीशी रेशिपी ह्यात डकवून टाकावी. कोणाही ब्याचलराला/ ब्याचलरणीला ही रेशिपी सहज जमायला काहीच हरकत नसावी असं माझं मत, कारण याची सुरुवातच बिघडवण्याने होते. साधलीच नाही तर यद्वा तद्वा भविष्यति ( सु'संस्कृत' मंडळींनी जरा सांभाळून घ्या ) असा प्रकार आहे, कसं ते पुढे सांगतोच आहे. त्यामुळे काही वाया जाईल असा प्रश्नच नाही. तर साहित्य पुढील प्रमाणे, दूध २ लिटर, साखर मध्यम आकाराचा दीड पेला ( चमच्यांच्या भाषेत सांगायचं तर २०-२५ चहाचे चमचे) वेलची-जायफळाची पूड, थोडं केशर, बदाम पिस्त्याचे काप, दीड चमचे तुरटी बारीक कुटलेली. आता करायचं काय...तर दूध उकळत ठेवायचं, दूधाला छान उकळी आली म्हणजे तुरटीची पावडर चिमुट-चिमूटभर टाकून ढवळत रहायचं. चिमूट-चिमूट एवढ्यासाठीच टाकायचं, कारण त्यामुळे पनीर रवाळ येतं. एकदाच टाकली तुरटी तर ते तितकंसं रवाळ येत नाही. आता पनीर बनवण्यासाठी यात तुरटीऐवजी लिंबूही पिळता येतं, पण ते जर जास्त पडलं तर लिंबाचा विशिष्ट वास पनीरला येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुरटीच वापरणं बरं !! आता ती इकडे मिळते म्हणून, नाहीतर लिंबावाचून पर्याय नाही. पनीर आणि पाणी वेगळं होईपर्यंत उकळी आणावी . हे असं दिसलं म्हणजे, पनीर (छेना) तयार झालं. आता हे एका पातळ सुती कापडात ओतावं आणि त्या फडक्याला गाठ मारुन ती पुरचुंडी साधारण तासभर टांगून ठेवावी जेणेकरुन पाणी निथळून जाईल. थोडंसं पाणी पनीरमध्ये राहू द्यावं अगदीच कोरडं होऊ देऊ नये. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत हे पनीर व दीड पेला साखर ओतून मंद आचेवर परतत राहावं (साखरेचं प्रमाणही अर्थात पनीर किती निघतंय यावर ठरवावं). साखर विरघळून साधारण घट्टपणा आला की वेलची-जायफळाची पूड, केशर घालून परतावे. आता हे बर्फीसाठी तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठीची एक खूण म्हणजे, पातेल्यातच एका बाजूला ते चमच्याने थापून बघावं तसंच राह्यलं तर बर्फीसाठी मिश्रण तयार आहे. एका ताटात/ परातीत हे गरम असतानाच थापत न्यावं, नीट थापलं की वर बदाम पिस्त्याचे काप पेरुन परत एकदा वरचेवर हात फिरवावा. तासभर सेट होऊ द्यावं, नंतर पातळशा सुरीने वड्या पाडाव्यात. वडी उचलतानाही शक्यतो, सुरी वडीच्या खाली सरकवून वडी उचलावी. उगाच हाताने उचलायला जाऊन केलेल्या मेहनतीवर पाणी पडायचेच चान्सेस जास्त. मग पनीर बर्फी खायला तयार आहे. आता टीपा: १) एखादवेळेस साखर आणि पनीर परतून झाल्यावर ताटात पसरवताना पाणी अजूनही राह्यल्यासारखं वाटत असेल तर ते ताटभर न पसरवता ताटात थोडी जागा मोकळी ठेवावी. थापून झालं ताट थोडं मोकळ्या बाजूकडे कलथं करुन ठेवावं. म्हणजे झालंच असेल पाणी जास्त तर ते तिथे जमा होईल. २) एवढा उपद्व्याप केला पण एकही बर्फीचा तुकडा ताटातून धडपणे बाहेर येत नसेल तर सरळ लहान लहान गोळे करुन कागदी द्रोणात भरुन फ्रिजमध्ये सेट करा, पनीर पेढे/ पनीर बॉल म्हणून खपतील सहज. जाता जाता: ही रेशिपी अंडं घालून, चिकन घालून, पनीरशिवाय, दूधाशिवाय, मीठ घालून, साखरेशिवाय अशा कोणत्याही प्रकारे मी बनवून पाह्यलेली नाही. कोणी तशी बनवली असल्यास आणि कशी बनवावी याची कुणाला उत्सुकता असल्यास त्याची पाकृ जरुर द्या.

वाचन 14099 प्रतिक्रिया 55