श्री गणेश लेखमाला २०२३

1

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
17 Mar 2011 - 12:32 am

भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची. ती आली की या उघडलेल्या काळजातली ही कुपी बंद करुन घ्यायची अन या दुष्ट जगापासुन आपल्या नाजुक लाडक्या लेकीला दुर घेउन जायचं आहे.

हे चित्र आहे माझ्या मनातल्या भावनांचं. वेळ होती भर दुपारची सुर्य पुर्ण डोक्यावर आला होता, आणि आम्ही होतो मुखापाशी सांदण दरीच्या. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे.
इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. जाणार कुठं हो, फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा. क्षणात असं वाटावं की जणु त्या भुमातेच्या काळजापर्यंत घेउन जाणारा राजरस्ता तो हाच.

रतनवाडीला श्री अम्रुतेश्वराचं दर्शन घेउन पुढं ५-६ किमीवर एक छोटी वाडी आहे, साम्रद नाव तिचं आणि या वाडीवरची एक छोटी वाट घेउन येते या दरीच्या मुखाशी. मुखापाशीच्या दाट झाडीजवळ येउन स्व:ताभोवती एकदा डाविकडुन उजवीकडे फिरलं की दिसतात ते रतनगड, त्याच्या खुट्टा, समोर आजोबा, त्याच्या टोकाचा सितेचा पाळणा, मग अलंग, मदन, कुलंग आणि नंतर कळसुबाई.

सगळा धीर गोळा करुन यांना हात जोडुन नमस्कार करायचा आणि चालायला लागायचं. तसं एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात.


त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं गार असणा-या पथ्थरांचा आहे. या गारव्यात संगमरवराच्या गारव्याची शिरशिरी नाही तर एका गुढ रम्य खोलात घेउन जाणारी आश्वासक धुंदी आहे.

एक आकर्षक उत्सुकता आपल्याला पुढं ओढत राहते आणि आपण ओढले जात राहतो. एखादा डाव्या बाजुनं जातोय तर पुढचा त्याला उजव्या बाजुची सोपी वाट दाखवतोय.

एकाच्या अनुभववावर दुस-याची नवलाई मात करु पाहते आहे तर दुस-याच क्षणाला अनुभव भारी पडतोय. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत.

अलिखित नियम असा की जो मोठा आहे तो पिण्यासाठी वापरायचा तर दुसरा हात पाय धुण्यासाठी. आपण शांतपणे नियम पाळतो. गार पाण्यानं तोंड धुवुन एकदम ताजं वाटतं, पुढचा उतार जरा जास्तच आहे, आता जपुन. विश्वासुन आणलेली साधनं दगा देताहेत तेंव्हा सकाळपासुन ३-४ तासांचीच ओळ्ख असलेले हात पुढं येत आहेत. मग असंच पुढं जात जात ऐकुन वाचुन ओळखीचा झालेला तो पाणसाठा येतो. आतासुद्धा पार गळ्यापर्यंत येईल इतकं पाणि आहे तिथं. आम्ही बॅगा पुन्हा व्यवस्थित पॅक केल्या आणि त्या पाण्यात उतरलो. कल्पनेच्या पलीकडे थंड असलेले पाणि, आणि खाली स्वच्छ दिसणारे तळाचे दगड यावरुन एक एक जण पुढं सरकतो. अर्थातच एकमेकांच्या मदतीनं. ज्यांना जन्मजात पाण्याचं आकर्षण आहे ते दोन चार बुड्या मारुन घेतात, बुडायची भिती नाही अन कुणि बुड्वायची पण नाही. सगळे जण मान वर करुन आपण किती खाली आलोय हे पाहताहेत. नेहमी उंचीवरुन खालची छोटी छोटी वस्ती, घरं, झाडं पाहायची सवय आता उपयोगची नाही हे कळालेलं आहे.

प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं. पाण्यात भिजायची नशा करुन झाल्यावर आम्ही पुढं सरकतो,
आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथं एक मोठा दगड आहे, त्यावर आडवं झोपुन वर पाहिलं तर आकाश फक्त ५-१० फुटांचंच दिसतं.अजुन थोडं पुढं गेलं की समोरचा डोंगर खुणावतो, बोलावतो ये ये म्हणुन. सांभाळुन इथुन पुढं जाणं शक्य नाही.

एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे.

बहुधा पंढरीच्या विठठलाला युगे अठ्ठावीस सोबत करत असावा. इथं सुरक्षित दरीची वाट संपते, थोडावेळ तिथं बसुन आम्ही परतायला सुरु करतो.

एसीच्या गारव्यात बसुन फक्त बोटं चालवायची सवय असल्यानं आज भुक जरा जास्तच जाणवते आहे. त्यामुळं थोडं भराभर चालत पुन्हा पहिल्या पाणवठयाला येतो. पोटातल्या भुकेला थोडं शांत करुन, पुन्हा निघतो, आता वरुन आम्ही किती खाली उतरलो होतो ते पाहायला.
दरीच्या फार जवळ जाता येत नाही पण टोकाला आल्यावर जाणवतं ते फक्त आपलं खुजेपण. पटते ती निसर्गाची अफाट शक्ती, साद घालतो तो नव्या साहसाचा आवाज.

१४ फेब्रुवारीचा खादाडि कट्टा, सांदण दरीचं स्वप्न जागवुनच संपला होता. बरोबर २९ दिवसांनी १३ मार्चला पहाटे साडेचार वाजता घरुन मिंटीमधुन निघालो, धमु, गणेशा, मनराव व शेवटि वल्ली, असे एकुण पाचजण बरोबर सहाला पुण्याच्या बाहेर पडलो.

मोशीमार्गे नाशिक हायवेला लागलो. आधी सिओसिओ पंप दिसल्यावर मिंटीची पोटापाण्याची व्यवस्था करुन पुढे नारायणगावापर्यंत थेट गेलो. इथं राजकमल या प्रसिद्ध मिसळ जाईंट्वर थांबलो.

पोटभर मिसळ हादडुन निघालो ते थेट रतनवाडीलाच थांबलो. मध्ये वाटेत गणेशाचा मित्र ह्रुषीकेश, त्याच्या बहिणिसह आम्हाला जॉईन झाला होता.

रतनवाडीचं अम्रुतेश्वराचं देउळ,समोरची पुष्करिणि इथं एक तास भर घालवुन भरपुर फोटो काढले,


मग निघालो आजच्या मुख्य ठिकाणाला. - सांदण दरी, फारसा परिचित नसलेला हा एक चमत्कार आहे. त्याचं यथाशक्ती वर्णन वर आलं आहे. पर्यटकांची अजुन एवढी वर्दळ नाही. तसा हा भाग वाहतुकिच्या मानानं मागास आहे. जे खरंच चांगलं आहे.
परत येताना बराच उशीर झाला होता मग जेवण आळेफाट्याला करुन व्यवस्थित घरी आलो.

माझी ही मिपा ग्रुपची दुसरी सहल, साठा उत्तरी कहाणि ज्यांच्यामुळं द्वि उत्तरी सुफ़ळ संपुर्ण झाली आहे, त्या सर्वांना म्हणजे धमाल मुलगा, वल्ली, मनराव आणि गणेशा यांना मनापासुन अतिशय धन्यवाद.

ह्रुषिकेश आणि त्याच्या बहिणिला तर खास धन्यवाद, न विसरता केलेल्या लिंबु सरबतासाठी.

धागा खुप मोठा होईल यासाठी इथ सगळ्यांनी काढलेल्या फोटोंपैकी काही थोडेसेच फोटो दिलेले आहेत. बाकी फोटोच्या लिंक खाली देत आहे.
फोटोंसाठी सर्वांना अतिशय धन्यवाद.

वल्ली - https://picasaweb.google.com/borkarsagar/SandhanValley2ndVisit#
मनराव - https://picasaweb.google.com/sathe.sameer/SandanDariMar132011#
धमाल् मुलगा - https://picasaweb.google.com/105698585060670224831/AmruteshwarSandanDari#
५० फक्त - https://picasaweb.google.com/harshad.chhatrapati/Sandan2011March#

प्रवासधर्मजीवनमानभूगोलमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

17 Mar 2011 - 12:56 am | चिंतामणी

ह्या मोहीमेतील काही फोटो धमुच्या चेपुवर थोड्यावेळापुर्वीच बघीतले होते. आता वर्णनासहीत आल्याने जास्त आवडले.

प्राजु's picture

17 Mar 2011 - 1:24 am | प्राजु

आमचा धम्या तर भटकाच आहे...! कौतुक वाटतं तुम्हा सर्वांचं!
आणखी फोटो बघायला आवडतील पिकासाची लिंक डकवा इथे. :)

तुमच्यासाठी खास ही प्रतिक्रिया..
आपली वर्णन करण्याची हातोटी अप्रतिम आहे. लेखनशैली लाजवाब आहे..
लिहित रहा. :)

रेवती's picture

17 Mar 2011 - 3:01 am | रेवती

सगळे फोटो आवडले.

तुमच्या निसर्गानुभवात आम्हाला सामावून घेतलंत, धन्यवाद! आणखी सफरी येऊ द्यात.

आनंदयात्री's picture

17 Mar 2011 - 5:53 am | आनंदयात्री

वाह वा. फोटो सुरेख आहेतच, शब्दचित्रं तर त्यावर वरकडी. खुप छान लिहलय.

स्पा's picture

17 Mar 2011 - 6:31 am | स्पा

सगळेच फोटू जबर्या.......

सांडण दरी खरच गूढ आहे
देवळांचे नक्षीकाम तर अफाटच...
हर्षद ची लेखणी + त्याचा क्यामेरा हे आता भन्नाट कोम्बिनेषण झालेले आहे

अवांतर : धम्या काय लष्करी ट्रेनिंग ला आलेला कि काय? :D

सहज's picture

17 Mar 2011 - 7:04 am | सहज

वरील सर्वांशी सहमत.

प्रीत-मोहर's picture

17 Mar 2011 - 7:06 am | प्रीत-मोहर

ज ब रा ट .....

पिकासाची लिंक द्या

नगरीनिरंजन's picture

17 Mar 2011 - 7:11 am | नगरीनिरंजन

झकास हर्षदराव! लेखन+चित्रं दोन्ही उच्च.
धमु, कमांडो? ;-)

वपाडाव's picture

17 Mar 2011 - 12:30 pm | वपाडाव

असेच म्हंतो....
अवांतर :
फुल्ल्ल जळुन खाक्क....
देवा असं कसं झालं रे.....तेज्यायला....

प्रचेतस's picture

17 Mar 2011 - 8:42 am | प्रचेतस

हर्षद धन्यवाद.
खूपच सुरेख वर्णन केले आहेस एका अविस्मरणीय ट्रेकचे. आठवणी तर अजूनही ताज्याच आहेत ज्या कधीही पुसल्या जाणार नाहीतच. पाण्यातून जायचा थरार तर जबराच.
पण खरे कौतुक आहे ते तुझे. नुसता ट्रेकच केला नाहिस तू, तर शिवाय ५०० किमी ड्रायव्हिंग पण अतिशय एकाग्रतेने केलेस. आम्ही आपले शिटांवर बसून मारे मस्त गप्पा ठोकत होतो, गाणी ऐकत होतो.

आता पुढच्या ट्रेकची आतुरतेने वाट पाहातोय.

हर्षद धन्यवाद.

असेच म्हणेन ..

पुर्ण प्रवास .. वर्णन कीती छान शब्दात वर्णन केले आहे तुम्ही .. अप्रतिम

मनराव .. वल्ली .. धमु यांचे ही खुप आभार .... आमची पहिलीच भेट होती असे वाटलेच नाही ..

पुढील ट्रेक च्या प्रतिक्षेत ..

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 6:06 pm | धमाल मुलगा

वल्लीकाकांशी सहमत.

हर्षद एक लै भारी इव्हेंट मॅनेजर आहे असं माझं मत झालं आहे. :)

शिवाय एव्हढी पायपीट करुनही एकुण पाचेकशे किमीचं अंतर एकट्यानं गाडी चालवणं म्हणजे गम्मत नाही.

पुढीले फोटोंच्या प्रतिक्षेत!;)

sneharani's picture

17 Mar 2011 - 10:26 am | sneharani

मस्त वर्णन!फोटोदेखील सुंदर!!

ज्ञानराम's picture

17 Mar 2011 - 10:52 am | ज्ञानराम

मस्त वर्णन!फोटोदेखील सुंदर!! असेच म्हणेन....

हर्शद , अप्रतिम कशाला म्हणु ? तुझ्या फोटोग्राफीला कि तुझ्या लिखाणाला , कळेना . तुझ्या ह्या लिखाणातुन मी सांदण दरी फिरुन आले , सुंदरच :)
असाच लिहीत राहा म्हणजे माझ ही फिरण होईल :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Mar 2011 - 11:24 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्त वर्णन आणि सुंदर फोटो

नि३सोलपुरकर's picture

17 Mar 2011 - 11:57 am | नि३सोलपुरकर

हर्षदराव .... लै भारी
वर्णन अप्रतिम

स्पंदना's picture

17 Mar 2011 - 12:30 pm | स्पंदना

आता सगळ्यांनी सांगुन झालेल परत परत सांगु का?

छ्या ! जरा नवे शब्द बनवायला पाहिजेत आता !

सगळे फोटो अन वर्णन ही आवडल्च पण नुसत्या एका शिल्पाचा तो, मला वाटत्य शेवटुन तीसरा, तो खुप्प्प खुप्प आवडला.

मंदिराच शिखर कस तास्ल्या सारख गुळगुळीत आहे ना?

इंटरनेटस्नेही's picture

17 Mar 2011 - 12:48 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय सुंदर.. फोटो पाहतानाच तिथे गेल्याचा भास झाला. सर्वजण अगदी एक्सर्प्ट ट्रेकर वाटत आहेत! सुंदर! ऑसम!

हरिप्रिया_'s picture

17 Mar 2011 - 2:07 pm | हरिप्रिया_

सहीच...
फोटो आणि वर्णन पण...

पियुशा's picture

17 Mar 2011 - 3:47 pm | पियुशा

कड्क!
सहि आहेत :)

सगळ अप्रतीम फक्त आम्हाला नेलं नाही अन ती मिसळ एवढ्च वाईट्ट..........

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2011 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर हो भटकी जमात :)

सर्व काही छान. पण मला आमंत्रण नाही म्हणजे काय?

- (भटक्या) पिंगू

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 6:32 pm | धमाल मुलगा

आणि एकदम झक्कास वर्णन.
सुंदर शब्दखेळ मांडला हर्षदराव! १०० पैकी २०० गुण. :)

प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं.

हे तर लऽऽय भारी!

बाकी दोस्ताहो,
हे सांदण दरी नावाचं जे काही प्रकरण आहे ना, एक नंबरचं हुंब भानगड बगा.
वल्लीच्या एका धाग्यावरचे फोटो पाहून आमचा सगळ्यांचा भटका स्वभाव जागा झाला आणि फटाफट ठरलंही.

सांदणदरीबाबत खरं म्हणजे फोटो दाखवून किंवा सांगून खरं रुप कळतच नाही. शप्पथ अहो! वल्लीच्या धाग्यावरचे फोटो पाहून "जायलाच पाहिजे" असं वाटलं खरं. पण तिथं पोचल्यावर कळलं, राजेहो...हे प्रकरण फोटोत दिसतं त्याच्या लाखपटीनं भारी आहे. :)

'दर भटकंतीत एकदातरी कडमडायचंच' ह्या रिवाजानुसार माझं २-३ धडपडून झालं, मनरावाचं फोटोशेशनचं काम मनापासून झालं. वल्ली-द-डायरेक्टर ह्यांना आपण सुचवलेल्या ठिकाणी येऊन मंडळ खुश झालेलं पाहून बरं वाटलं, गणेशाचं पाण्यात मनसोक्त डुंबाडुंबी करुन झालं,...आणि ५० फक्त ह्यांची आनंदाची शेंचुरी झाली. :)

@ स्पा, नगरीनिरंजनः
अरे भौ, तो माझा भटकंतीचा युनिफॉर्म आहे. :)
मातकट रंगाचा कॉटन टी मळलेला कळ्त नाही. घाम भरपूर शोषुन घेतो, पावसापाण्यात भिजलं तरी लवकर वाळतो. आणि आर्मीची डंग्री तर बेष्टेष्ट असते. जाड कापड, पण वाळतंही पटकन. मांडी-गुडघ्यांशी सैलसर आणि घोट्याशी निमुळती..सगळ्यात कंफर्टेबल डिझाईन. आणि त्यावरचा पट्टा एकदम दणकट असतो. आमच्यासारख्या पडीक माणसाला बरं असतं. कुठं पडलं झडलं, अवघड ठिकाणी अडकलं तर चक्क तो पट्टा टांगून लोंबकळताही येतं इतका दणकट. त्याच्या आधारानं अवघड ठिकाणाहून सुटका करुन घेता येते. :)

'सांदणदरी एक निसर्गनवल' नामक भटकंती वृत्तांत विमुक्त अथवा वल्ली यांपैकी कुणीतरी टाकला होता.. तेव्हापासून तिथं जायची मनीषा आहे. मिपाकरांचा आणखी एक ग्रुप जाऊन आलेला पाहून मस्त वाटलं.

झकास वर्णन हर्षदराव. फोटूही मस्तच!

प्राजक्ता पवार's picture

17 Mar 2011 - 7:00 pm | प्राजक्ता पवार

फोटो व लेखन दोन्ही छान :)

मुलूखावेगळी's picture

17 Mar 2011 - 7:17 pm | मुलूखावेगळी

मस्त हो हर्शद छान व्रुत्तांत आनि फोटो. :)

स्मिता.'s picture

17 Mar 2011 - 7:27 pm | स्मिता.

सांदण दरीचे फोटो फारच रोमांचकारी आहेत. दोन भल्या मोठ्या पहाडांमधल्या चिंचोळ्या वाटेने ट्रेकींग करायची मला तरी भीती वाटली असती.
मंदिराचेही फोटो क्लासच!

दीविरा's picture

17 Mar 2011 - 8:52 pm | दीविरा

फोटो पाहून डोळे फाटले :)

अशा जागा आपल्याकडे आहेत :) हे माहित नव्हते.

असेच भटकत रहा आणि आम्हालाही भटकंतीची मजा घेऊ द्या :)

ज्ञानेश...'s picture

17 Mar 2011 - 9:03 pm | ज्ञानेश...

अप्रतिम ठिकाण, आणि वर्णनही अगदी नेमके..!

या सांदणदरीचे काही फोटो बघतांना मला अपरिहार्यपणे आठवला तो नुकताच पाहिलेला सिनेमा- १२७ अवर्स.
तुम्हा लोकांनाही क्षणभर अ‍ॅरॉन राल्स्टन असल्यागत वाटले असेलच. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2011 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे........!

-दिलीप बिरुटे

सांजसखी's picture

17 Mar 2011 - 9:23 pm | सांजसखी

खूप छान !!
सुरेख फोटो आणि प्रभावी लेखन यामुळे जणू आम्ही सुध्दा कल्पनाविश्वातील सांदणदरीला जाऊन आलो..

चित्रा's picture

17 Mar 2011 - 9:46 pm | चित्रा

आवडली भ्रमंती. फोटो सर्वच छान आले आहेत.
उतरत्या वाटेचा विशेष आवडला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Mar 2011 - 11:59 pm | निनाद मुक्काम प...

त्या दरीच्या आठवणी मनात रेंगाळत असतील अजुन.
.
खरच महाराष्ट्रातील दऱ्या /डोंगर / किल्ले / मंदिरे सर्वच अप्रतिम
लिखाण आवडले .मिसळ पाहून येथे जिभेवर ...
लाळेला गळायला अजून एक निमित्त
पु ले शु

अप्पा जोगळेकर's picture

18 Mar 2011 - 12:08 am | अप्पा जोगळेकर

अतिशय सुंदर छायाचित्रे.

इथून पुढे खाली जायला रस्ता नाही.
आय सस्पेक्ट. ऐकीव माहितीनुसार इथून खाली जायला रस्ता आहे जो डोळखांबला उतरणार्या करवलि/चोंढे घाटाला कुठेतरी मिळतो.

सांदणला एक फार विचित्र अनुभव आला होता. घळ पाहून आलो. आमच्याबरोबर साम्रद गावातली दोन पोर होती. बोलण्यातून कळले की त्या मुलांना गावातल्या शाळेत शिकण्याची परवानगी नाही. का विचारले तर म्हणे तिथे फक्त हिंदू मुलं शिकू शकतात. मी विचारलं की तुम्ही कोण तर ती पोरं म्हणे आम्ही महादेव कोळी. मला काहीच संदर्भ लावता आला नाही पण इतकी छान दरी पाहिल्याचा आनंदच पळून गेला. त्यांना सांदण घळीतलं जे पिण्याच पाणी होतं ते पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती.

बरोबर अप्पा.. पुढे उतरले की तो रस्ता समोरील बहुतेक करवली घाटात जातो .. परंतु लिहितानाचा उद्देश असा होता की येथुन पुढे खाली जाण्यसारखा रस्ता राहिलेला नाही.. एकदम तिव्र उतार आहे..
बाकी तरीही नको नको म्हंटले तरी आम्ही थोडे पुढे गेलोच होतो ..

--------

तुम्ही सांगितलेला अनुभव वाचुन वाईट वाटले ..
पण तुम्ही कधी गेला होता ?
मागील महिन्यातच मी रतनगड ला जावुन आलो होतो.. तेंव्हा बरोबर असणारे गाईड पण महादेव कोळीच होते .. त्यांचा एक मुलगा शिकुन राजुर ला कामाला आहे ..
साम्रद -रतनवाडी हे अंतर फक्त ५-७ की.मी आहे .

जर असे असेन तर पुढील भेटीत काय तरी केले पाहिजे असे वाटते ..

प्रचेतस's picture

18 Mar 2011 - 8:43 am | प्रचेतस

रस्ता आहेच हो अप्पा. शेवटी काहीही झालं तरी ती घळच.
पुढे जायला रस्ता नाही तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी. पुढे ३/४ मोठे मोठे रॉकपॅचेस आहेत. रॅपलिंग करून खाली उतरावे लागते तेव्हा तो रस्ता पुढे करोली घाटाला जाउन मिळतो.

सांदणला एक फार विचित्र अनुभव आला होता

असं असेल असे वाटत नाही. कारण पहिल्या वेळी जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा साम्रद मधलेच खंडूमामा नावाचे महादेव कोली जमातीचे वाटाड्या आमच्याबरोबर आले होते. त्यांनीतसे काहीच सांगितले नाही. शिवाय साम्रद हे पूर्ण गावच, गाव तरी कसे म्हणायचे त्याला, ती एक छोटेखानी वाडीच संपूर्ण महादेव कोळी समाजाची. त्यामुळे तिथे त्यांनाच मज्जाव असेल असे वाटत नाही.

पुष्करिणी's picture

18 Mar 2011 - 12:27 am | पुष्करिणी

ठिकाण ,वर्णन,फोटो, सुंदर/ अप्रतिम/ उच्च .

आय अ‍ॅम जेलस

आत्मशून्य's picture

18 Mar 2011 - 2:36 am | आत्मशून्य

फोटोत डोंगर चातकाप्रमाणे जणू पावसाळ्याची वाटच पहात आहेत असा भास झाला.... अर्थातच सूंदर वर्णन.

सविता००१'s picture

18 Mar 2011 - 2:33 pm | सविता००१

फोटो आणि वर्णन सुद्धा...
शब्द सम्पले.

VINODBANKHELE's picture

20 Mar 2011 - 2:57 pm | VINODBANKHELE

तुमच्या पैकी कुणी गुगल मॅप वर सांदण दरी अ‍ॅड करु शकता का?

क्रान्ति's picture

20 Mar 2011 - 3:59 pm | क्रान्ति

हर्षू, तू जिथं जातोस ते ठिकाण जास्त सुंदर की त्यावरचं तुझं लिखाण जास्त सुंदर, हे ठरवणं नेहमीच कठीण असतं. आणि फोटो तर कहरच असतात. खूप सुंदर लिहितोस रे!

प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं.

हे असं जे लिहितोस, ते थेट मनात उतरतं. असंच सुंदर लिहित रहा, आणि मस्त भटकत रहा!

तायडी

जागु's picture

21 Mar 2011 - 3:51 pm | जागु

लय भारी.

गुगल मॅप वर सांदण दरी अ‍ॅड केली आहे ,
ति बरोबर आहे का?
बघुन कुणीतरी सांगा जरा.
मराठी मधे नाव टाकले आहे.सांदण दरी

धमाल मुलगा's picture

14 Apr 2011 - 6:06 pm | धमाल मुलगा

इथं लिंक देता का?

शाहिर's picture

14 Apr 2011 - 4:35 pm | शाहिर

लय भारी ..

चित्रार्जुन's picture

15 Jun 2014 - 7:48 am | चित्रार्जुन

लिन्क देता का जरा बाकी सर्व १ न.