बावरे प्रेम हे - एक दिव्यपट
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं.