अस्वस्थामा...
आभासी सुखाची शंभर शकले
डोक्यावर मिरवत फिरत होता
एक उन्मत्त अश्वत्थामा...
पोतडीतले उद्याच्या चिंतेचे
बाटलीबंद भूत
पाठीवरल्या गाठोड्यातून
शोधत होते सुटकेचा रस्ता ...
निराश सुस्काऱ्याचे फवारे
शकलांच्या सुकल्या खपल्या भेदून
चौफेर उसळत धावत सुटले
भळाळत्या चिळकांड्या
कारंजी होऊन नाचू लागल्या...
बाटलीतलं भूत बाहेर काढून
रिती बाटली फिरवत
अस्वस्थ अश्वत्थामा फिरतोय
दारोदार, तेलाची भीक मागत...
बाटलीतलं भूत आता
मानगुटीवर बसलंय!!