मक्केतील उठाव १
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.