पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.